माझ्याच कार्यालयात काम करणार्या ग्वाल्हेरच्या अरूंधती आमडेकर या मराठी मुलीने लिहिलेला हा लेख. दिल्लीला जवळजवळ खेटलेल्या ग्वाल्हेरमध्ये मराठी कोणत्या रूपात नांदतेय ते आपल्याला कळेल. भाषाचा संपूर्ण लहेजा तिथलाच आहे. फक्त वाक्यरचना वाचण्यास सोपी जावी म्हणून तेवढी संपादीत केलीय. बाकी शब्द वगैरे तेच ठेवलेत.
'अरे, यार दादा तूने आज फिर मेरा पेन ले लिया. आई देख ना इसको. बाबा आपके लिए चाय बनाऊ?
माझं एवढं बोलण झालं की बाबांचा चेहरा बघायसारखा असतो.
"हुम्म, हे काय चालू ए अरुंधती तुझं. किती वेळा सांगायचं की घरात तरी मराठीत बोलत जा. आता कॉलेज झालं ना तुझं. घरी आली आहेस तू, इथे सगळ्यांना मराठी कळतं बरं का.
'अहो बाबा पण मला कुठे कळत'. हीहीहीहीहीही...'
'हसू नको, सांगितलेलं ऐकत जा.
'अरे भूल जाती हू ना बाबा.'
कॉलेजहून आल्या आल्या माझं बाबांशी रोज ह्या मुद्यावर बोलणं व्हायचं आणि मी रोज बाबांना हेच पटवायचा प्रयत्न करत असायचे की मला मराठी येते. फक्त मी बोलायला मी नेमकी विसरते. मी कधीही मराठी बोलणं विसरणार नाही. त्याची तुम्ही अजिबात काळजी करू नका. पण ही गोष्ट मी त्यांना हिंदीत बोलायचे, हे मात्र खरं आहे.
हीच कहाणी आहे ग्वाल्हेरच्या जवळ जवळ सगळ्याच मराठी परिवारांची. आमच्याकडे घरी आजीशी मराठीत बोलणे 'कंपलसरी' आहे. कारण हिंदी बोलताना आजीची 'टोन' इतकी 'फनी' असते ना किकी आमचं हसूच थांबत नाही आणि आम्ही हिंदी बोलायला सुरवात केली की तीही हिंदीतच उत्तर द्यायला सुरवात करते याला कारण तिचा अव्यक्त रागही असतो कदाचित, असं मला वाटत.
ग्वाल्हेरला आम्ही 1990 मध्ये आलो. माझं ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण ग्वाल्हेरला झालं. माझं फ्रेंड सर्कल पूर्ण हिंदीच होतं. 'इक्का दुक्का' मराठी मैत्रिणी होत्या. पण त्याही माझ्यासारख्या मराठीची एलर्जीवाल्या. सर्कलमध्ये ज्या हिंदी मैत्रिणी असायच्या, त्यांचा आमच्या मराठीत बोलण्याला प्रचंड विरोध असायचा. तो आजही कायम आहे. म्हणजे मराठीपासून आम्हाला दूर करणार्या होत्या त्या ह्या हिंदी मैत्रिणीच.
ग्वाल्हेरमधील मराठी कुटुंबांपैकी पन्नाशी किंवा साठी उलटलेले लोकच फक्त मराठीत जास्त बोलतात. गुरुवारी वाड्यावरच्या दत्त मंदिरात कधी गेल्यावर कळतं "मराठी अपली मायबोली" अशी काही म्हण आहे मराठीत. बर्याच बायका तिथे घोळका घालून मराठीत गप्पा मारताना दिसतात. दत्त मंदिराच्या बाहेर फराळाचे सामान विकणारे काका बायकांशी चक्क मराठीतच बोलतात. काय हवं आई? काय हवं ताई? असं विचारतात.
ग्वाल्हेरला अतिशय धार्मिक लोक राहतात असं मला वाटतं. वार किंवा तिथीप्रमाणे प्रत्येक मंदिरात पूर्ण दिवस कायम 'भीड़' असते. 'जैसे' गुरुवारी दत्ताच्या मंदिरात, एकादशीला विठ्ठल मंदीरात वगैरे वगैरे. साठीपलीकडचे लोक भजन, कीर्तन आणि देव दर्शनात व्यस्त असतात. साठीखालचे म्हणजे 30-60 या वयोगटातले आपल्या नोकरी-धंद्यात आणि घर कामात, मुला-मुलींच्या शिक्षणात व्यस्त असतात.
या खालच्या वयोगटातले बर्याच एक्टिविटीजमध्ये व्यस्त असतात. 'जैसे' स्पोर्ट्स, म्यूझिक (व्होकल आणि इंस्ट्रुमेंटल दोन्ही) मी स्वतःही सितार शिकत होते. पण पूर्ण करू शकले नाही. माझं खेळाकड़े जास्त लक्ष होतं. इथे मूल शाळेला जाऊ लागल की टिपीकल मराठी आई-वडिल त्याला जगातील सगळ्या एक्टिविटीजचे ट्रेनिंग द्यायचा प्रयत्न करतात. मी सितार शिकत असताना एकदा एक काकू आपल्या अडीच वर्षाच्या मुलीला क्लासिकल गाणं शिकवायला म्हणून आमच्या गायन शाळेत घेऊन आल्या. आमच्या प्रिंसिपल मॅडमनी सांगितल कि आम्ही साडेतीन पेक्षा कमी वयाच्या मुलांना एडमिशन देत नाही. पण काकू काही ऐकायला तयार नव्हत्या. एडमिशन नका देऊ चालेल. पण इथे बसायची परमिशन द्या. काही तरी शिकेल ती.
धन्य हो माते. अहो पण गाणं काय? हे तरी कळू द्या त्या छोटीला. कसं तरी करून आमच्या प्रिंसिपल मॅडमने सुटका करून घेतली. ग्वाल्हेरला मुलांमधे गाण्याचा 'अवेयरनेस' खूप आहे. विशेष करून मराठी मुलांमध्ये. पण एखाद्या मराठी सिरियलचं नाव विचाराल तर त्यांना सांगता येणार नाही.
ग्वाल्हेरचा मराठी माणूस म्हणजे आपला परिवार, आपली मुलं, त्यांचं भविष्य, आपलं देव दर्शन, आपली प्रार्थना, आपला धर्म, आपला व्यवहार, आपली माणसं, आपले व्रत सण वगैरे वगैरे यात अडकलेला. हीच त्यांच्या जगायची सीमा आहे. बाकी दुनियेत काय घड़तय ते फक्त वर्तमान पत्रात वाचून बाजूला टाकतो. त्यावर चर्चाही होते, पण आपली सगळी कामं झाल्यावर, कधी वेळ मिळाला तर.
नुकतीच मला लिटल चॅम्प्सचा प्रोग्राम इंदुरला बघण्याची संधी मिळाली. कार्यक्रम अभय प्रशालमध्ये होता."आयला, काय गर्दी होती तिथे बाप रे"... वीस हजार मराठी लोक एक साथ बघायला आले होते. ग्वाल्हेरला मराठी कार्यक्रमासाठी एवढी मोठी जागा लागत नाही. तिथे आर्टिस्ट कंबाइन म्हणून एक ओडी आहे. तिथे मराठी नाटक, गाण्याचे वगैरे कार्यक्रम होतात असतात. क्राऊड फारसा नसतो. ग्वाल्हेरला नाटकापेक्षा कथेकरी लोकाना छान रिस्पॉन्स मिळतो. बाहेर गावाचे कथेकरी बुवा लोक ग्वाल्हेरच्या श्रोत्यांची खूप प्रशंसा करतात आणि इंदुरचे मराठी श्रोते देवाला कमी वेळ देतात असं सांगतात. तिथे पुण्याचे बुर्शे बुवा आणि ओक नावाचे कथेकरी खूप लोकप्रिय आहेत. त्यांच्या कथेत व कीर्तनात लोकांची 'एक्स्ट्रा भीड़' असते.
आता कामानिमित्त इंदुरला येऊन माझी मराठी जरा सुधारली. (फक्त बोलायची लिहायाची नाही) माझ्यासाठी माझं ग्वालियर आता ग्वाल्हेर झालं आहे. पण माझी ताई अजूनही भोपाळला भोपालच म्हणते.
प्रतिक्रिया
27 Feb 2009 - 5:02 pm | दशानन
>>दिल्लीला जवळजवळ खेटलेल्या ग्वाल्हेरमध्ये
नाही हो दुर आहे खुप .... ग्वाल्हेर मध्य प्रदेश मध्ये.... कमीत कमी ३००-३५० किलोमिटर दुर दिल्ली पासून.
Brains x Beauty x Availability = Constant.
This constant is always zero. सत्य वचन :D
27 Feb 2009 - 4:59 pm | अमोल नागपूरकर
८००-९०० नाही. ते दिल्ली पासुन फक्त ३२१ किमी दूर आहे.
27 Feb 2009 - 5:03 pm | दशानन
तुमचं बरोबर आहे :)
मी आताच चेक केलं
27 Feb 2009 - 5:07 pm | विसोबा खेचर
भोचकगुरुजी,
आपले असे लेख मला नेहमीच आवडतात. आपला इंदुरी हिंदीचा लेखही असाच खूप आवडला होता! हाही आवडला...
बाय द वे,
माझ्या माहितीप्रमाणे 'एखाद् दुसरा' या शब्दाकरता 'एक्का-दुक्का' हा शब्द ही हिंदी भाषेला बनारसची देन आहे. एक्का-दुक्का हा मूळ शब्द बनारसचा! :)
असो...
आपला,
(हिंदी भाषेचा लहेजा, त्याचा गोडवा यावर मनापासून प्रेम करणारा) तात्या.
27 Feb 2009 - 8:37 pm | प्राजु
छान लिहिले आहे ग्वाल्हेरच्या मराठी बद्दल.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/