तालिबानीस्तान !

भोचक's picture
भोचक in जनातलं, मनातलं
18 Feb 2009 - 2:48 pm

भारताची राजधानी दिल्लापासून दीडशे किलोमीटर पलीकडच्या प्रांतात भारतीय कायदे चालू शकणार नाहीत, असे सरकारनेच जाहीर केले तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? चकीत होऊन पहायची गरज नाही. भारतात असे कधी होणार नाही. पण भारताचे कधी भले न पाहिलेल्या पाकिस्तानमध्ये मात्र असे होतेय. राजधानी इस्लामाबादपासून दीडशे किलोमीटरवर असलेल्या 'स्वात' प्रांतात आता पाकिस्तानी कायदे चालणार नाहीत. पाकिस्तानी सरकार आणि या भागात वर्चस्व असलेल्या तालिबान्यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता या भागात न्यायदानाच्या प्रक्रियेसाठी 'शरीया' कायदे लागू होतील. गेल्या अनेक वर्षांपासून या भागात सुरू असलेला संघर्ष संपावा म्हणून सरकारने हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात असले तरी या निर्णयामागे सरकारची हतलबलताच दिसून येते. कारण तालिबान्यांच्या उच्चाटनासाठी या भागात घुसलेल्या लष्कराच्या हाती फक्त अपयशच लागले आहे. त्यामुळे थोडक्यात सरकारने आता या भागाच्या 'तालिबानीकरणास'च एकप्रकारे मान्यता दिली आहे.

आधी या स्वात प्रांताविषयी थोडं जाणून घेऊ. स्वात हा भाग पाकिस्तानच्या वायव्य सरहद्द प्रांतात वसला आहे. सैदु शरीफ ही या भागाची राजधानी. पण मिंगोरा हे या भागातील प्रमुख शहर आहे. खरं तर हे पूर्वीचे संस्थान होते. अगदी पाकिस्तान स्थापन झाल्यानंतरही ते सुखनैवपणे नांदत होते. पण १९६९ मध्ये ते वायव्य सरहद्द प्रांतात सामील झाले. या भागाला पाकिस्तानचे स्वित्झर्लंड म्हणतात. उंच पर्वतराजी, हिरवागार प्रदेश आणि रमणीय तलाव यांनी हा प्रदेश नटलेला आहे. निसर्गाने या भागाला भरभरून काही दिले आहे. पण त्याचवेळी नागरी भागापासून त्याला तोडलेही आहे. दुर्गमतेमुळे या भागात जाणे अवघड आहे. त्यामुळेच तालिबान्यांनी या भागातून पाकिस्तानच्या सरकारी प्रतिनिधींना हटवून कब्जा केला आहे.

या भागातून वाहणारी प्रमुख नदी म्हणजे 'स्वात'. तिचा उल्लेख अगदी 'ऋग्वेदा'तही 'सुवास्तू' नदी या नावाने आढळतो. प्रदेशाचा उल्लेख गेल्या दोन हजार वर्षापासून विविध ठिकाणी आढळतो. पौराणिक काळात उद्यान नावाने हा प्रदेश ओळखला जात होता, तो येथील निसर्गसौंदर्यामुळेच. जग जिंकायला निघालेला अलेक्झांडर या भागात येऊन गेला होता. येथील गावांचे उल्लेखही ग्रीक भाषेत आढळतात. पुढे इसवी सन ३०५ पूर्वी मौर्य साम्राज्यांतर्गत हा प्रदेश आला. मात्र, त्यानंतर या भागात बौद्ध संप्रदायाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला. एवढेच काय वज्रायन हा बुद्ध मार्गातील पंथ याच भागात उदय पावला. या भागात आजही बुद्धांचे विहार, स्तुत, मूर्ती बुद्धकालाची साक्ष देत उभ्या आहेत. हिंदू राजे राज्य करत असताना या भागात संस्कृतही बोलली जात होती. पुढे १०२३ च्या सुमारास गझनीच्या मोहम्मदाने भारतावर आक्रमण केले आणि हा भाग बळकावला. या भागात इस्लामचा प्रसार होण्यासही गझनी कारणीभूत ठरला. पुढे राजे बदलत गेले, पण सत्ता इस्लामीच राहिली.पुढे पाकिस्तानात सामील झाल्यानंतर येथे स्थानिक प्रशासन निर्माण करण्यात आले. येथून प्रतिनिधीही निवडून जाऊ लागले. पण अफगाणिस्तानात वाढत असलेले तालिबान्यांचे लोण याही भागात येऊन पोहोचले आणि धर्मवेडाचा उद्रेक येथेही झाला.

तालिबानचे वर्चस्व
मौलाना फाझुल्ला हा मुलतत्ववादी नेता याला कारणीभूत ठरला. या भागाचे तालिबानीकरण करायचे या हेतूने त्याने तेहरिक ए नाफाझ ए शरीयत ए मोहम्मदी नावाची संघटनाच स्थापन केली. गेल्या काही वर्षांत या संघटनेचे वर्चस्व वाढत होते. पोलिस चौक्यांवर हल्ले कर, निरपराध नागरिकांना मार हा त्यांचा एककलमी कार्यक्रम होऊन बसला आहे. या भागातील ५९ गावात त्यांनी समांतर सरकार स्थापन केले आहे. तेथे शरीयत कायदा लागू केला आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानचे तब्बल २० हजार सैनिक या भागात तैनात असूनही त्यांचे येथे काहीही चालत नाही. आता तालिबान्यांनी मुलींच्या शिक्षणाला बंदी घातली आहे. या भागात ४०० शाळा असून त्यात ४० हजार मुली शिकतात. या शाळाच आता बंद पाडल्या आहेत. या शाळा बंद करण्याचा आदेश तालिबानने कालमर्यादा घालून दिला होता. हा आदेश झुगारून मिंगोरा भागातील दहा शाळा उघडल्या खर्‍या पण तालिबान्यांनी त्या बॉम्बस्फोटांनी उडवून लावल्या.

तालिबानी दहशत
तालिबानी अतिरेक्यांची दहशत एवढी आहे की २००७ मध्येत्यांनी अलपुरी या जिल्ह्याचे मुख्यालय ताब्यात घेतले, त्यावेळी स्थानिक पोलिसांनी त्यांचा प्रतिकार न करता ते त्यांच्या ताब्यात दिले आणि स्वतः पळून गेले. तालिबानी अतिरेक्यांत उझबेक, ताजिक व चेचेन बंडखोरांचाही समावेश आहे. २००७ मध्येच या भागातील मोठे व्यावसायिक व अवामी नॅशनल पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष मालक बख्त बैदर यांची अतिरेक्यांनी हत्या केली. याशिवाय सुधारणावादी प्राध्यापक इसरार मोहम्मद व त्यांचा मुलगा झुबीर यांचे अपहरण केले. अवामी नॅशनल पार्टीचे आणखी एक नेते अब्दूल जब्बार खान यांच्यावरही अयशस्वी हल्ला करण्यात आला. हिंसाचार घडवून आणत त्यांनी या भागातील लोकांमध्ये भय निर्माण केले आहे.

सरकारने टेकले गुडघे
गेली दोन वर्षे या भागात सरकार आणि तालिबानी बंडखोर यांच्यात हिंसाचार सुरू होता. यात १२०० लोक मृत्युमुखी पडले आहेत. १७० शाळा, कॉलेजेस उडविण्यात आली. शिवाय या हिंसाचाराला कंटाळून तीन लाख लोक विस्थापित झाले आहेत. या भागात स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करता येत नसल्याने अखेरस पाकिस्तान सरकारने तालिबानींपुढे गुडघे टेकणे पसंत केले. मंगळवारी तालिबानमधील ज्येष्ठ लोक (जिर्गा) आणि सरकारी प्रतिनिधींची बैठक झाली. तीत या भागात शरीयत कायदा लागू करण्यास मान्यता देण्यात आली. त्यामुळे आता न्यायदानात सरकारी हस्तक्षेप काहीही रहाणार नाही. सुप्रीम कोर्ट वगैरे 'भानगड' नसेल. मिंगोरा येथेच कोर्ट असेल. येथील केसेस इस्लामाबादला नेल्या जाणार नाहीत.

असे होईल न्यायदान
गुन्हेगारी प्रकरणे चार महिन्यात निकाली काढली जातील. तर दिवाणींसाठी सहा महिन्यांची कालमर्यादा असेल. एलएलबी करताना शरीयतचा अभ्यास न करणार्‍यांना आता तीन महिन्यांचा 'क्रॅश' कोर्स सक्तीने करावा लागणार आहे. शिवाय प्रत्येक कोर्टात शरीयतचा प्रतिनिधी (हा प्रामुख्याने तालिबानीच असेल) महत्त्वाच्या पदांवर हजर असेल. कुठल्याही प्रकरणाची अंतिम सुनावणी मिंगोरा येथेच होईल. न्यायदान करणार्‍या न्यायाधीशांना आता काझी असे संबोधले जाईल. जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या न्यायाधीशाला जिला काझी असे म्हटले जाईल. महत्त्वाचे म्हणजे या सगळ्यांनी दाढी राखणे सक्तीचे असेल.

गेल्या अनेक वर्षांपासून हिंसाचाराने पोळलेल्या या भागाने सरकार आणि तालिबानी यांच्यात झालेल्या कराराचे स्वागत केले असले तरी आगामी काळ मात्र कठीण असेल हे तालिबान्यांच्या एकूण हालचालींवरून दिसून येते. पाकिस्तानचा कायदाच जिथे चालणार नसेल तिथे कसे राज्य असेल याची कल्पनाच केलेली बरी. सत्तेत कोण आहे त्यावर न्याय दिला जाणार असेल तर त्याला न्याय तरी म्हणता येईल काय? अफगाणिस्तानात हिंसाचाराला कंटाळलेल्या लोकांनी सुरवातीला तालिबान्यांचे स्वागत केले होते. पण पुढे काय घडले हा इतिहास आहे. त्यामुळे सध्या शांतता प्रस्थापित होण्यासाठी झालेल्या या करारामुळे स्वातमधील ग्रामीणांना हायसे वाटत असले तरी पुढचा काळ कठीण आहे हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. अफगाणिस्तानमधील तालिबानींना सुरवातीला पाकिस्तानचाच वरदहस्त होता. आता त्याच तालिबानींनी पाकिस्तानलाच गिळंकृत करायला सुरवात केली आहे. भस्मासूर आता पाकिस्तानवर उलटला आहे. काळाचा महिमा अगाध असतो, हेच खरे.

हे ठिकाणसंस्कृतीइतिहासजीवनमानराजकारणविचारलेखमतबातमीसमीक्षा

प्रतिक्रिया

लिखाळ's picture

18 Feb 2009 - 3:55 pm | लिखाळ

भोचकराव,
लेख छान आहे.
बरीच माहिती समजली.
-- लिखाळ.

शैलेन्द्र's picture

18 Feb 2009 - 4:02 pm | शैलेन्द्र

सुंदर लेख..

अविनाशकुलकर्णी's picture

18 Feb 2009 - 4:19 pm | अविनाशकुलकर्णी

लेख चान आहे बरेच कळाले

धमाल मुलगा's picture

18 Feb 2009 - 4:27 pm | धमाल मुलगा

भोचकशेठ,
उत्तम लेख. आवडला.
माहितीपुर्ण लेख लिहिण्याची आपली नेहमीची हातोटी छानच आहे. :)

बाकी,
हे तालीबानी जर स्वतःच्या मर्जीनेच आणि ताकदीने करत असतील तर संशय येतो, की खरंच पडद्यामागे कोण आहे! कारण आजवर जेव्हा जेव्हा मंदी/मंदीसदृश परिस्थिती अमेरिकेवर ओढवली तेव्हा जगात कुठे ना कुठे युध्दं झाली, त्या ह्या 'लॉर्ड ऑफ वॉर्स'नी आपलं उखळ पांढरं करुन अर्थव्यवस्था सावरुन घेतली.
१६/११चा हल्लाही असाच त्यांच्या पथ्यावर पडणारा आहेच की.

-(हल्ली कोणावरच विश्वास न उरलेला) ध मा ल.

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::

झेल्या's picture

18 Feb 2009 - 4:45 pm | झेल्या

फारच अभ्यासपूर्ण...!

अगदी वस्तुनिष्ठ आणि माहितीपूर्ण लेख आवडला.

-झेल्या

थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.

विटेकर's picture

18 Feb 2009 - 4:48 pm | विटेकर

अतिशय सुरेख आणि थोड्क्यात आपण प्रश्न छान समजाऊन सांगितला आहे.
काहि नकाशे टाकता आले असते का?
आणि आपल्या सिमावर्ति भागावर याचा नेमका काय परिणाम होईल असे वाटते?
हि मंडळि हळू हळु POK आणि काश्मिर मध्ये सरकतील का?
-विटेकर

आपणांस आहे मरण! म्ह् णोन राखावें बरवेपण!!

घाशीराम कोतवाल १.२'s picture

18 Feb 2009 - 5:04 pm | घाशीराम कोतवाल १.२

भोचक राव खुप दिवसानी आपण असे माहिति पुर्ण लिखाण केले आहे हि माहिति सकाळी पेपरमधे वाचली होती
पण आपण खुपच खोलात माहिती दीलित

काहि नकाशे टाकता आले असते का?

जरासा बदल करा यात पाकीस्तानचा नकाशा टाका आणी स्वात प्रांत जरा ठळक करुन सांगा
लोकांना पण जरा कळु देत हा भस्मासुर यांच्यावर कसा उलटला आहे ते

हि मंडळि हळू हळु POK आणि काश्मिर मध्ये सरकतील का?

सध्या तरी हे सांगणे कठीण आहे पण भविष्यात भारताला काळजी घ्यावी लागेल यांच्यापासुन

___________________________________________________
मुख्यकार्यकारी अधिकारी
भुर्जीपाव डॉट कॉम.

तिमा's picture

18 Feb 2009 - 6:55 pm | तिमा

लेख चांगला आहे. पण पकिस्तानातील या घडामोडींनी हुरळता कामा नये. हे तालिबानचे संकट दिवसेंदिवस भारताच्या उंबरठ्यावर येऊ घातले आहे.

राघव's picture

18 Feb 2009 - 7:05 pm | राघव

बर्‍याच नवीन गोष्टी कळाल्यात.

डिस्क्लेमर: खाली मांडलेले सर्व केवळ माझी मते आहेत. चु. भू. द्या. घ्या.

बरेच धागे आपापसांत गुंतलेले आहेत. काही मला वाटतात ते असे -
- पाकिस्तानी सरकार व लष्कर यांच्यात एकमत नाही हे जगजाहीर सत्य आहे.
- आय.एस.आय. ला पाकिस्तानी लष्कराचा पाकिस्तानी सरकार विरुद्ध छुपा पाठिंबा असणे अशक्य नाही.
- कट्टरपंथियांना (म्हणजेच आपल्यासाठी दहशतयांना; उदा. लष्कर्-ए-तय्यबा, तालिबान; यांना)आय.एस.आय चा पूर्ण पाठिंबा आहे.
- अमेरिकेच्या उपखंडातल्या प्रभावाला शह देण्यासाठी का होईना, चीनचा पाकिस्तानला (म्हणजे पाकिस्तानी लष्कराला व आय.एस.आय. ला)पाठिंबा आहे, पर्यायाने लष्करी व आर्थिक मदतीचा छुपा स्त्रोत असणारच जो देशविकासासाठी वापरल्या जाणार नाही हे उघड आहे.
- उघड अमेरिकेला पाठिंबा देणे व दहशतवाद्यांच्या बिमोडासाठी (फक्त)आवाज उठवणे ही पाकिस्तानी सरकारची मजबुरी आहे. तसे केले नाही तर जग पाकिस्तानला एकटे पाडेल आणि खरोखर असे केले तर कट्टरवादी व लष्कर यांच्या मनाविरुद्ध करावे लागेल, जे करणे सद्यस्थितीत पाकिस्तानी सरकारला शक्य नाही.
- स्वात प्रांतासाठीचा हा तह हा अमेरिकेस असलेला राजकीय शह आहे असे मानण्यास पुरेशी जागा आहे.
.
.

यावरून बरेच तर्काधिष्ठित निष्कर्ष काढता येतील. त्यातले काही -
- लोकशाही सरकार असणे हे लष्कराचे केवळ जगाला दाखवण्याचे धोरण आहे, कारण मुळात अशी लोकशाही असणे लष्कराच्या अधिकारांत बाधा आणते.
- सरकारी तोंडे कितीही व काहीही बोललीत तरी मुळात ज्याचे पारडे जड त्याचा पाठिंबा कट्टरवाद्यांस असल्यामुळे धोका हा आहेच.
- पाकिस्तानी अण्वस्त्रे ही अतिशय काळजीची गोष्ट म्हणून जगभर बघितल्या जाते, पण कट्टरवाद्यांविरुद्ध हुकुमाचे पान म्हणून पाकिस्तानी लष्कर ते वापरत असणे अशक्य नाही. अर्थात ती किती दिवस सुरक्षित हातात राहू शकतील हे एक कोडेच आहे.
.
.

या माझ्या विचारसरणीत एक बाजू मला स्वत:ला नीट उमगत नाही -
पाकिस्तानी लष्कराचा कट्टरपंथियांना असणार्‍या पाठिंब्यामागे काय फायदा असेल? सरकारला मुठीत ठेवण्यासाठी वापरणे याशिवाय आणखी काही उपयोग ध्यानात येत नाही, जे पुरेसे वाटत नाही.

माझी विचारसरणी चुकीची असल्यास उत्तमच.

मुमुक्षु

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Feb 2009 - 8:14 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

भोचकशेट, अतिशय माहितीपूर्ण लेख आणि मुमूक्षु, तार्किक प्रतिसादही.

यात आपल्यासाठी वाईट गोष्ट अशी आहे की आपली आणि पाकिस्तानची भौगोलिक सीमा. चीनला त्यामानाने कट्टरवाद्यांचा धोका कमी आहे कारण त्यांची सीमा छोटी आहे आणि धर्माधारित भांडणं, यात दहशवादी हल्लेही आलेच (पाकिस्तान आणि चीनमधे) होणं कठीण आहे.
पाकिस्तानात शांतता असेल तर आपल्याही देशात शांतता (अंतर्गत नव्हे) रहाणं सोपं होईल. पाकिस्तानात मूलतत्त्ववादी असणं ही आपल्यासाठी आनंदोत्सव करण्यासारखी बाब नाही.

अदिती

सर्वसाक्षी's picture

18 Feb 2009 - 7:21 pm | सर्वसाक्षी

चांगला लेख. काही माहित नसलेल्या घटना समजल्या, आभार.

शितल's picture

18 Feb 2009 - 7:42 pm | शितल

छान माहिती वर्धक लेख आवडला. :)

भोचकसाहेबांचा लेख आणि मुमुक्षभौंचा प्रतिसाद अप्रतिम ...!

हा माझ्या जिव्हाळ्याचा व अभ्यासाचा विषय आहे.
लवकार्च "सविस्तर प्रतिसाद" देईन, त्यासाठी ही जागा राखुन ठेवत आहे ...

कॄपया ह्याला प्रतिप्रतिसाद न देऊन सहकार्य करावे ... :)

------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

संदीप चित्रे's picture

18 Feb 2009 - 9:39 pm | संदीप चित्रे

तुम्ही असेच उत्तम लेख लिहावे ह्या शुभेच्छा .

विकास's picture

18 Feb 2009 - 9:48 pm | विकास

लेख आवडला. मुमुक्षुंनी केलेले काही तर्क हे बुद्धीबळातील डावाप्रमाणे सुसंगत वाटत असले तरी खरे-खोटे कळायला जागा नाही. यात एकच गोष्ट नक्की खरी आहे आणि ती म्हणजे येनकेन प्रकारेण तालीबान आता पाकीस्तानात आले आहे. अर्थात भारताच्या सीमेवर आले आहे.

आता तरी आपल्या सरकारचे डोळे उघडणे महत्वाचे वाटते. आपण सेक्युलर आहोत आणि सेक्युलर नजरेतूनच प्रत्येक घटने कडे पहाणे महत्वाचे आहे. अर्थात यासाठी व्होटबँकेचे राजकारण टाळावे लागेल आणि आंतर्राष्ट्रीय शक्ती म्हणून स्वतःचे स्थान दाखवावे लागेल. त्या अर्थी ओबामाच्या काश्मिरमधे नाक खुपसण्यास मुत्सद्दीपणे आपल्या सरकारने आणि (कदाचीत) सनदी अधिकार्‍यांकडून विरोध झाला (जो कधी वर पण आला नाही). तसेच या योग्य वेळेस केलेल्या हस्तक्षेपाने ओबामाला त्यातून माघार घ्यावी लागली आहे, ही घटना त्या अर्थी उत्साहवर्धक आहे. फक्त ही केवळ सुरवात आहे. असे नको होयला वरकरणी ओबामाची माघार आणि वस्तुस्थितीत आपली...

बाकी याच संदर्भात म.टा. मधील अग्रलेख पण वाचण्यासारखा वाटला.

राघव's picture

19 Feb 2009 - 7:44 am | राघव

हे केवळ तर्कच आहेत. खरे-खोटे कळण्यास मार्ग नाही.
तुम्ही म्हणता तसे तालिबान पाकिस्तानात आलेले आहेच, अन् त्याचा सगळ्यात मोठा धोका हा भारतालाच आहे.
त्यांच्या विरोधात भारत राजनैतिक व सामरिक पातळींवर काय पावले घेतो यावर दक्षिण आशियातली राजकीय-आर्थिक-सामरिक परिस्थिती अवलंबून राहिल.
म.टा. च्या लिंक बद्दल धन्यवाद. :)
मुमुक्षु

प्राजु's picture

19 Feb 2009 - 12:29 am | प्राजु

विनाश काले विपरीत बुद्धी म्हणतात ते पाकिस्तानच्या बाबतीत पूर्ण पणे खरे होते आहे तर!
असो..
लेख माहितीपूर्ण आहे. आवडला.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मृदुला's picture

19 Feb 2009 - 1:42 am | मृदुला

एकंदरित तालीबान भारताच्या उंबरठ्यावर येऊ घातले आहे. काळजी करण्याचीच वेळ!

लेख आवडला.

बेसनलाडू's picture

19 Feb 2009 - 2:45 am | बेसनलाडू

(भयभीत)बेसनलाडू

अनिल हटेला's picture

19 Feb 2009 - 6:46 am | अनिल हटेला

सहमत !!

उत्तम माहितीपूर्ण लेख !!!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

सुक्या's picture

19 Feb 2009 - 6:56 am | सुक्या

भोचकराव,
अतिशय सुंदर लेख. बर्‍याच माहीत नसलेल्या गोष्टी समजल्या. पुलेशु.

सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो. <:P

सहज's picture

19 Feb 2009 - 8:21 am | सहज

मुळ लेख व काही प्रतिसाद दोन्ही छान.

धन्यवाद.

माझी दुनिया's picture

19 Feb 2009 - 8:58 am | माझी दुनिया

याच नावाने काल लोकसत्ता मध्ये संपादकीयही वाचले होते.

____________
माझ्या लिखाणावर सर्व प्रकाशकांची मोजकी प्रतिक्रिया असते : साभार परत !
_____________
माझी दुनिया

विकास's picture

19 Feb 2009 - 10:59 am | विकास

लोकसत्तातील संपादकीयाच्या दुव्याबद्दल धन्यवाद! माहीतीपूर्ण होते. शिवाय कधी नव्हे ते, संघ, भाजप, हिंदूत्व, मध्यमवर्ग, उच्च वर्ग वगैरे काही प्रकार त्यात नव्हते. नाहीतर ओबामाला शिंका का येतात या वर अग्रलेख लिहीला तरी त्यात संघाला शिव्या दिसतील... :-)

सुनील's picture

19 Feb 2009 - 11:05 am | सुनील

चालायचचं! काहींना ज्यात्-त्यात गांधी-नेहेरू दिसतात तर काहींना ज्यात-त्यात हिंदुत्ववादी दिसतात!! फिटंफाट!!

;)

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विसोबा खेचर's picture

22 Feb 2009 - 4:47 pm | विसोबा खेचर

भोचकगुरुजी,

नेहमीप्रमाणेच उत्तम लेख..!

तात्या.

यशोधरा's picture

22 Feb 2009 - 4:52 pm | यशोधरा

एकूण कठीणच दिसतेय!

प्रदीप's picture

22 Feb 2009 - 5:16 pm | प्रदीप

आवडला. चांगला आढावा घेतला आहे. धन्यवाद.