बोटीवरील जीवन

स्वीट टॉकर's picture
स्वीट टॉकर in जनातलं, मनातलं
10 Mar 2016 - 6:54 am

जर तुम्हाला कोणी म्हणालं की उद्यापासून तुमच्या आयुष्यात पाण्याचा तुटवडा असणार नाही, लाइट जाणार नाही, हवा आणि पाणी यांचं प्रदूषण असणार नाही, ट्रॅफिकची कोंडी असणार नाही, भ्रष्टाचार असणार नाही, मराठी - अमराठी किंवा जात - धर्माचा भेदभाव असणार नाही, त्याचं राजकारण असणार नाही, कोणीही रांग मोडणार नाही, थुंकणार नाही, दारू पिऊन कामावर येणार नाही, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणार नाही, जोरात संगीत लावून दुसर्‍याची झोपमोड करणार नाही, कचरा खिडकीतून बाहेर अथवा रस्त्यावर फेकणार नाही, “हे माझं काम नाही” असं कोणी म्हणणार नाही, तुमचं घर चुकून उघडं राहिलं तरी कोठल्याही वस्तूची चोरी होणार नाही, प्रत्येक जण दिलेली वेळ पाळेलंच, आणि काही कारणामुळे पाळणं शक्य नसेल तर आधी तुम्हाला फोन करून जरूर कळवेलंच, आणि जर एखादा मनुष्य वरीलप्रमाणे वागू शकत नसेल, आणि त्याला दोन संधी देऊनही सुधारत नसेल तर त्याला खड्याप्रमाणे उचलून अलगद या समाजातून काढून टाकलं जाईल, एकंदर काय, तर उद्यापासून रामराज्य असणार आहे, तर कोणीही असाच समज करून घेईल की बोलणार्‍याच्या डोक्यावर परिणाम तरी झाला आहे किंवा निवडणुका जवळ आल्या आहेत.
(उफ्फ! आयुष्यात पहिल्यांदाच इतकं लांबलचक वाक्य लिहिलं.)

मात्र मला जर कोणी असं म्हणालं तर माझ्या दृष्टीनी त्याचा अर्थ असा की माझी सुट्टी संपवून मी उद्या बोटीवर परत रुजू होणार आहे.

बोटीवरची जीवनपद्धती इतकी स्वच्छ आणि सरळसोट असते!

मात्र या बोटीवरच्या जीवनाबद्दल इतके गैरसमज आहेत की सॅम्युअल जॉन्सन सारख्या लेखकानी लिहिलं आहे, “बोटीवर राहाणं म्हणजे तुरुंगात राहाण्यासारखंच. वर बुडायची भीती. मात्र बोटीपेक्षा तुरुंगात जागा जास्त, जेवण जास्त चवदार आणि मित्रमंडळी जास्त सभ्य!”

बिचारा सॅम्युअल जॉन्सन!

बोटीवरची जीवनपद्धती इतकी नाकासमोर आणि सरळसोट असते याची कारणं काय?

एक म्हणजे पूर्णपणे नैसर्गिक वातावरणात राहायचं तर बेशिस्त राहून चालणारच नाही. जे दूरच्या ट्रेक वा गिर्यारोहणाला गेले आहेत त्यांना याचा चांगला अनुभव असतो. एकदा मनुष्यवस्ती सोडली की काहीही मदत मिळण्याची शक्यता संपते. म्हणजे आपल्याला काय काय लागण्याची शक्यता आहे याची जमवाजमव आधीच व्यवस्थित करायला तर लागतेच, शिवाय असलेली सामुग्री, शिधा, पाणी वगैरे मोहीम संपेपर्यंत पुरवण्याच्या दृष्टीनी रोजच्या वापरावर नियंत्रण ठेवावंच लागतं.

‘ठेवावंच लागतं’ हे म्हणणं सोपं आहे. पण ह्या म्हणण्याला अर्थ केव्हां प्राप्त होतो? जेव्हां आपण ‘न ठेवणार्‍या’वर कारवाई करू शकतो तेव्हांच. आज जर आपल्या शेजार्‍यानी कचरा डब्यात टाकण्या ऐवजी खिडकीतून बाहेर टाकला तर आपण त्याला सांगू शकतो, पटवू शकतो, त्यावर सामाजिक दबाव टाकू शकतो. तितकी रग असली तर त्याच्या कानाखाली आवाजही काढू शकतो. पण निर्लज्जम् सदा सुखी! तरीही तो बधला नाही तर आपण काही करू शकंत नाही. त्याला त्या घरातून आपण हाकलू शकंत नाही.

बोटीवर आपण त्याला त्या घरातून हाकलू शकतो. आमच्या बोटीवरच्या बोलीभाषेत त्याला “Next port to be airport.” असं म्हटलं जातं. (पुढच्या बंदराला बोट पोहोचली की विमानाचं तिकिट देऊन त्याची रवानगी केली जाते.) मग युनियन काही करंत नाही? इतकी नेभळट आहे की काय ही युनियन? तसं नाही. ही युनियन आंतरराष्ट्रीय स्थरावर आहे आणि तिचे व्यवहार आपल्या नेहमी बघण्यात येणार्‍या युनियन्सपेक्षा खूपच प्रगत आणि पारदर्शक आहेत. याला देखील कारण आहे. भारतात राहून ही युनियन परदेशात असलेल्या बोटींवर कसा वचक ठेवणार? ते केलं जातं जागतिक युनियन्सशी संलग्न राहून. त्यांच्याशी संलग्न राहायचं तर त्यांचे नियम पाळावेच लागतात. याचा अर्थ एखाद्याने बोटीवर धोकादायक वर्तन केलं आणि कंपनीने सर्व कागदपत्रांची पूर्तता करून त्याच्यावर कारवाई केली तर युनियन त्यालाच समज देते. त्याची बाजू घेऊन भांडत बसत नाही.

जर का केस लढण्याची वेळ आली तर ती बाहेरच्या कोर्टात होते. त्यामुळे धाकधपटशा, लाचलुचपत, राजकारण वगैरे देखील वापरता येत नाही.

तात्पर्य, नाकासमोर कार्यपद्धती. भरपूर काम करा, शुद्ध मोकळ्या हवेत रहा, दुसर्‍याच्या खर्चानी जग बघा, बायकामुलांनाही जग दाखवा, सलग पाच पाच महिने सुट्टी एन्जॉय करा, वर चांगल्यापैकी पैसेही कमवा! त्यावर आयकर भरू नका ! (परदेशी चलन कमावणारे हे सरकारचे जावई असल्यामुळे त्यांना आयकरही माफ आहे!)

बोटीवरची करियर जर इतकी स्वप्नवत् आहे तर प्रत्येक मुलगाच ही घेत का नाही? गेली चाळीस वर्षं हाच प्रश्न माझ्या डोक्यात घोंघावतोय. (जस्ट जोकिंग.)

फार वर्षांपूर्वी ‘मार्मिक’ मध्ये ‘मराठी तरुणांसाठी करियर’ या सदरात एक लेख होता. त्यात एक ओळ होती - “मराठी पालकांच्या दृष्टीने प्रत्येक सैनिक हा रणांगणावर मरतोच, प्रत्येक बोट ही बुडतेच आणि प्रत्येक विमान हे कोसळतंच.”

दुसरं कारण म्हणजे तिकडचं काम. जेव्हां एखादा मुलगा बी.ई. (मेकॅनिकल) होतो तेव्हां त्याची अपेक्षा असते की आपण ज्या फॅक्टरीत काम करू तिथे आपलं वेगळं ऑफिस नसलं तर निदान टेबल असावं, आपल्या हाताखाली खूपसे कामगार आणि दोन चार फोरमन असावेत. दिवसभर काम केल्यानंतर आपल्या कपड्यांची इस्त्री टिकली नाही तरी चालेल, पण ते निदान स्वच्छ तरी रहावेत. (आणि ती बहुतांशी पूर्ण देखील होते).

बोटीवरचा माहोल वेगळा असतो. इंजिन रूममध्ये साधारणपणे नऊ जण असतात. पाच इंजिनियर्स आणि चार खलाशी. खलाशांचं काम इंजिनियरांना मदत, साफसफाई आणि रंगरंगोटी वगैरे. प्रत्यक्ष काम इंजिनियरनीच करायचं. मुख्य काम काय? तर मशिनरी चालवणं आणि त्याचा मेंटेनन्स करणं. बोटीवर एकंदर मशिनरी भरपूर आणि मोठी थोरली असते. आपल्या इथल्या गाडीच्या मेकॅनिकला हेल्मेट, हातमोजे आणि स्टीलच्या चवड्यांचे सेफ्टी शूज् घातले तर तो जसा दिसेल तसा एखादा टिपिकल मरीन इंजिनिअर दिसतो. बोटीवरची नव्वद टक्के मशिनरी इंजिनरूममध्ये ठासून भरलेली असते. त्यामुळे तिथे तापमान गरमागरम आणि आर्द्रता भरपूर. त्यामुळे बदाबदा घाम येत असतो. विषुववृत्तीय प्रदेशात अर्ध्या दिवसात ओव्हरऑल (याला ‘बॉयलरसूट’ असंही म्हणतात) ओलाचिंब झाल्यामुळे बदलायला लागतो. इंजिनरूम वातानुकूलित कधीही नसते. ती अशक्यप्राय गोष्ट आहे.

बंदिस्त जागेत इतकी मशिनरी चालल्यामुळे प्रचंड आवाज होत असतो त्यामुळे कानावर ear muffs लावावे लागतात. साधं संभाषण म्हणजे उंच स्वरातच. वातावरण वादळी असलं तर बोट हलते. त्याचा देखील सुरवातीला त्रास होतो. इंजिनरुमची उंची साधारणपणे सहा मजल्यांएवढी असते त्यामुळे चढणं उतरणं खूपच होतं. पोट सुटलेला मरीन इंजिनिअर क्वचितच.

एकंदर काय, तर शारिरिक मेहनत भरपूर. कामाच्या कपड्यांना डाग असणं आणि नखं काळी असणं नॉर्मल. सुशिक्षित मुलांना ते जमतंच असं नाही. कित्येक मुलं सोडूनही जातात.

मी ज्युनिअर इंजिनिअर म्हणून दीड वर्ष काम करून सुट्टीवर आलो तेव्हां माझ्या वडिलांनी मला ओळखलंच नाही ! इतका बारीक झालो होतो. पण अशक्त बारीक नव्हे.

मला कोणीतरी विचारलं, “काय रे तुला तिथे काय काम असतं?”

मी विनोद करण्याच्या दृष्टीनी उत्तर दिलं पण ते सत्यापासून फारसं दूर नव्हतं. “इंजिनिअरिंग रामा गडी. दोन वेळ जेवण. राहायला जागा. पडेल ते काम!”

----------------------------------------------------------------------------------------------------------------------
त.टी.
कार्यबाहुल्यामुळे खूपच महिन्यात कीबोर्ड हातात घेतला नव्हता. आता लिहायला सुरवात केल्यावर असं लक्षात आलं की बाकी सर्वांप्रमाणेच बोटीवरच्या जीवनाला देखील इतके कंगोरे आहेत की एका लेखात ते कोंबता येणार नाहीत.

प्रत्येक कंगोर्‍यासाठी एक एक लेख लिहीन. मात्र ही लेखमालिका असणार नाही. प्रत्येक लेख स्वतंत्र. पुढचा लेख कळण्यासाठी आधीचा वाचायची अजिबात जरूर नाही.

कथासमाजजीवनमानkathaaप्रवासदेशांतरनोकरीलेखअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

मस्त सुरुवात. पुढील लेखाची वाट बघते.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

10 Mar 2016 - 7:15 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

छान सुरुवात. येउंद्या पुढचे भाग पटापट. डॉ. खरेंच्या लेखमालेची आठवण आली.

कविता१९७८'s picture

10 Mar 2016 - 7:47 am | कविता१९७८

मस्त माहीती, बोटीवरील जीवनाबाबतचे समज अगदि तसेच आहेत आणि तुमच्या लेखनाने ते बदलतील असेहि वाटते

रामदास's picture

10 Mar 2016 - 7:53 am | रामदास

तुमचा पहीला शो प्रचंड टाळ्या घेणार !!
पुढच्या लेखाची उत्सुकता आहे.

मस्त सुरुवात..
पुलेप्र..

राही's picture

10 Mar 2016 - 8:32 am | राही

आपली लिहिण्याची पद्धत आवडली. वाचकांना आपल्याबरोबर घेत समान पातळीवर संवाद साधला आहे. ते आवडले.

बोका-ए-आझम's picture

10 Mar 2016 - 8:55 am | बोका-ए-आझम

धाकटा भाऊ मर्चंट नेव्हीत असल्यामुळे बरंच ऐकलंय पण तो सीमन म्हणून गेला त्यामुळे ती बाजू जास्त ऐकलीय. तुमच्यामुळे आता इंजिनियरिंगची बाजू कळेल! पुभाप्र!

सतिश गावडे's picture

10 Mar 2016 - 11:24 am | सतिश गावडे

व्यापारी आरमाराबद्दल तुझ्या एका भावाकडूनच मी थोडेफार ऐकले आहे. :)

एका वेगळ्याच जगाची आणि कारकीर्द पर्यायाची अभिनिवेशरहीत ओळख करून दिल्याबद्दल धागाकर्त्याचे आभार !!

नाखु's picture

10 Mar 2016 - 8:55 am | नाखु

शेवटी देवाला दया आली म्हणायची मिपाकरांची

धुराळी धाग्यातल्या धुळवडीने धाराशायी धडकलेला धोंडा
नाखु

टीप :ज्यांचा देवावर विश्वास नाही त्यांनी आप्लया इच्छेनुसार "नाव" टाकणे

धगालेखकाने बोटीवर असलेल्या संधी आणि पात्रता (प्रशिक्षण) यांचा उल्लेख केला तर मेहेर्बानी.

उगा काहितरीच's picture

10 Mar 2016 - 8:59 am | उगा काहितरीच

मस्त सुरूवात . पुभाप्र...

रोचक माहिती असणारा छान लेख.पुढच्या लेखनाच्या प्रतीक्षेत.

नरेंद्र गोळे's picture

10 Mar 2016 - 9:15 am | नरेंद्र गोळे

शिस्तीचे स्वावलंबी जीवन जगण्यातील समस्या ह्या निमित्ताने समोर येतील. येऊ द्यात पुढले लेख.

मस्त सुरुवात. पुलेप्र.

प्रमोद देर्देकर's picture

10 Mar 2016 - 10:02 am | प्रमोद देर्देकर

वा अजुन एक बोट मास्तर आले की. अजुन समुद्रप्रवास घडला नाही त्यामुळे जिथे चहुकडे अथांग पाणी असते असा अनुभव आलेला नाही. तुमचे लेख पटापट येवु द्या सर.

सतिश गावडे's picture

10 Mar 2016 - 11:28 am | सतिश गावडे

मुंबईकरांना समुद्र प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी सोपा पर्याय म्हणजे गेटवेवरून घारापूरीला जाणे.

आम्ही हा अनुभव तीसेक मिपाकरांच्या सोबतीने घेतला.

मृत्युन्जय's picture

10 Mar 2016 - 10:46 am | मृत्युन्जय

मस्त सुरुवात. अजुन येउ द्यात.

नि३सोलपुरकर's picture

10 Mar 2016 - 11:07 am | नि३सोलपुरकर

छान सुरुवात.
पुढच्या लेखाची उत्सुकता आहे.

अनुप ढेरे's picture

10 Mar 2016 - 11:16 am | अनुप ढेरे

रोचक सुरुवात!

प्रत्येक लेख स्वतंत्र. पुढचा लेख कळण्यासाठी आधीचा वाचायची अजिबात जरूर नाही.

हे मला फार आवडले. येऊंद्या.
मस्त लिहिताय गोडबोलेसाहेब.

प्रसाद गोडबोले's picture

10 Mar 2016 - 11:40 am | प्रसाद गोडबोले

नमस्कार प्रसाद गोडबोले :)

मिसळपाव वर स्वागत !

पुढील लेखनास शुभेच्छा !!

अभ्या..'s picture

10 Mar 2016 - 12:05 pm | अभ्या..

आँय
स्वयेचि करुन घेई नमस्कार
तो एक प्रगो.

संजय पाटिल's picture

10 Mar 2016 - 11:46 am | संजय पाटिल

मस्त सुरवात;
पुढ्चे भाग लवकर लवकर येवू देत..

स्वच्छंदी_मनोज's picture

10 Mar 2016 - 11:50 am | स्वच्छंदी_मनोज

स्वतंत्र लेखांच्या लेखमालेची वाट बघतोय.

राजाभाउ's picture

10 Mar 2016 - 12:30 pm | राजाभाउ

मस्त सुरवात. पभाप्र

मराठी कथालेखक's picture

10 Mar 2016 - 1:13 pm | मराठी कथालेखक

छान छान

दैनंदिन जीवन कसे असते ? साप्ताहिक सुटी असते का ? फोन /इंटरनेट सुविधा कशा असतात ? जेवण कसे असते ? शाकाहारी माणूस तग धरु शकेल इतका शाकाहार असतो का ? आजारी पडल्यास वैद्यकिय सुविधा असतात का ? प्रत्येक इंजिनिअरला स्वतंत्र बेडरुम असते का ? इंजिन रुम, डायनिंग, डेक, बेडरुम ई ची छायाचित्रे टाकलीत तर अजून आवडेल

झालंच तर ....सोमालियाचा काही अनुभव असेल तर ते ही येवू द्या...

वा वा. अत्यंत रोचक. नवीन जग पहायला मिळणार.

लवकर लिहा. धन्यवाद.

पैसा's picture

10 Mar 2016 - 1:26 pm | पैसा

झकास सुरुवात! पुढचे लेख लिहा तब्बेतीत!

सुबोध खरे's picture

10 Mar 2016 - 1:35 pm | सुबोध खरे

गोडबोले साहेब
तुमच्या लेखाने आमच्या पुर्वायुष्याला उजाळा मिळाला. इंजिन रूम मधील "भट्टी" आणी "आवाज" चे अनेक अनुभव ऐकायला आवडतील.
येऊ द्या अजून असे सुरेख लेख.

तुषार काळभोर's picture

10 Mar 2016 - 1:36 pm | तुषार काळभोर

पुढील भाग सावकाश आले तरी चालतील, पण डिट्टेलवार येऊद्या.

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Mar 2016 - 1:53 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुस्वागतम् !

बहुतेकांना नाव माहित असलेल्या, पण त्यापेक्षा अधिक काहीच माहीत नसलेल्या व्यवसायाबद्दलची माहिती !

तुमच्या सोईने हवे त्या फॉर्मॅटमधे लिहा, पण हात न राखता भरपूर लिहा... जगाची फेरी मारण्याच्या संधीशिवाय या व्यवसायात काय काय करायला मिळते/लागते याचे बारकावे समजून घ्यायची खूप उत्सुकता आहे !

नीलमोहर's picture

10 Mar 2016 - 2:12 pm | नीलमोहर

मर्चंट नेव्ही या क्षेत्राबद्दल खूप उत्सुकता होती मात्र माहिती नव्हती, या लेखांमुळे ती मिळेल.
धन्यवाद आणि पुलेशु.

मस्त लेख आणि लिहिण्याची पद्धत. पुभाप्र.

क्रेझी's picture

10 Mar 2016 - 2:32 pm | क्रेझी

माझा एक मित्र मर्चंट नेव्हीमधे आहे त्याने एकदा त्यांच्या कामाचं स्वरूप सांगायचा प्रयत्न केला पण मला ते समजण्यापलिकडे भयंकर वाटलं पण तो काहितरी 'भारी' काम करतोय इतकं मात्र नक्की समजलं. आता तुमच्या ह्या लेखामुळे आणि पुढे येणा-या लेखांमुळे कदाचित तो काय सांगायचा प्रयत्न करत होता ते समजेल :)

पहिलाच लेख पण मस्त वाटलं वाचून, पु.ले.ल.ये.द्या :)

सस्नेह's picture

10 Mar 2016 - 2:47 pm | सस्नेह

मस्त लेखन.
बोटीवरच्या डॉक्टरनंतर आता बोटीवरच्या इंजिनिअरचे अनुभव ऐकण्यास उत्सुक.

भाऊंचे भाऊ's picture

10 Mar 2016 - 5:11 pm | भाऊंचे भाऊ

रोचक.

तर्राट जोकर's picture

10 Mar 2016 - 5:40 pm | तर्राट जोकर

भा हा री ही . फेटा उडवण्यात आलेला आहे. __/\__

स्वीट टॉकर's picture

12 Mar 2016 - 11:07 am | स्वीट टॉकर

प्रतिसादातला फक्त नमस्कार कळला. बाकी डोक्यावरून गेलं!! सांगता का?

सुमीत भातखंडे's picture

10 Mar 2016 - 6:47 pm | सुमीत भातखंडे

मस्त सुरुवात.
आता लवकर-लवकर टाका पुढचे लेख.

काय सुंदर लिहिलंयत!! जबरदस्त!!

धन्यवाद!

स्वीट टॉकर's picture

10 Mar 2016 - 11:22 pm | स्वीट टॉकर

सर्वजण,
मनापासून धन्यवाद.
तुमच्या सगळ्यांच्या इतक्या उंचावलेल्या अपेक्षा बघून टेन्शनच येऊ पाहातंय.

कॅ जॅ स्पॅ - डॉ. खरेंची लेखमालिका मी नुकतीच वाचली. मस्तच लिहिली आहे. मात्र तेव्हां मी सभासद नसल्यामुळे प्रतिसाद देऊ शकलो नाही. आता देईन.

ना खु - ध ची पंगत :)
बोटींवरील संधी आणि पात्रतेबद्दल येईलच.

प्र गो - आधीच गोडबोल्यांचा सुळसुळाट. त्यात प्रसाद हे नाव बर्‍यापैकी पॉप्यूलर. मग प्रगोंचा काय तुटवडा?

म क - आत्तापर्यंत काढलेल्या फोटोंमध्ये माणसं ही मध्यवर्ती पात्रं होती. रिकाम्या खोल्यांचे फोटो मिळवतो आणि टाकतो. बाकी तुम्ही विचारलेली माहितीही मिळेलच.

सु ख - तुम्ही तर जबरदस्त लिखाण केलेलं दिसंत आहे. मी सभासद झाल्यापासून आजपर्यंत पासवर्डचा प्रॉब्लेम येत होता. तो आजच सुटला आहे. आता वाचीनच.

क्रेझी - माझं प्रांजळ मत असं आहे की सैन्यदलातले लोक खरोखर 'भारी' काम करतात. त्यांच्याबद्दल मला प्रचंड आदर आहे. बाकी आपण सगळे कमी अधिक प्रमाणात सुरक्षित अशा वातावरणात काम करतो.

त जो - प्रतिसादातला फक्त नमस्कार कळला. बाकी डोक्यावरून गेलं!! सांगता का?

तर्राट जोकर's picture

12 Mar 2016 - 2:27 am | तर्राट जोकर

पुढचा लेख यीऊ द्या. मग सांगेन. ;-)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

12 Mar 2016 - 6:50 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

टेन्शन नको. सुचेल तसं लिहा. असा चांगला लेख बर्‍याचं दिवसांनी आलाय. वाट पाहतोय पुढच्या भागाची.

@रिमाइंडर टु डॉक
तुम्हीपण बर्‍याचं दिवसात काही लिहिलेलं नाहित.

नूतन सावंत's picture

11 Mar 2016 - 8:46 am | नूतन सावंत

वेगळ्या विषयाविषयी माहिती तुम्ही अतिशय रंजकते मांडली आहे.पुलेशु आणि पुभाप्र.

शित्रेउमेश's picture

11 Mar 2016 - 10:40 am | शित्रेउमेश

मस्त... अगदी सुंदर लिहिलंयत!!
पुलेशु आणि पुभाप्र..

चला एक सुन्दर लेखमाला वाचायला मिळनार तर..

गोडबोले साहेब, एक नंबर लेखन बघा तुमचं.

माझा एक मित्र मर्चंट नेव्हीत आहे, सीमन म्हणून. तुमच्यामुळे आता ही दुसरी बाजूही कळणार. एकच नंबर!!!!

Vasant Chavan's picture

11 Mar 2016 - 2:13 pm | Vasant Chavan

जबरदस्त

मुक्त विहारि's picture

11 Mar 2016 - 10:57 pm | मुक्त विहारि

पुभाप्र.

तुम्हाला बोटीवरचा जॉब कसा मिळाला?

किंबहूना बोटीवर जॉब मिळवण्याची पात्रता आणि संधी पण समजल्या तर उत्तम.

समुद्रावर काम करायची बरीच इच्छा होती, पण आमच्या सायन्सने ते स्वप्न धूळीस मिळवले.

तुषार काळभोर's picture

12 Mar 2016 - 6:25 am | तुषार काळभोर

डायरेक्ट मुद्द्याला हात!
स्वीटॉ: ही माहिती पण द्या.

मुक्त विहारि's picture

12 Mar 2016 - 7:55 am | मुक्त विहारि

उगाच "ताकाला जावून भांडे लपवण्यापेक्षा" आपली विनंती मांडणे उत्तम.

ताक देणा-याचा आणि ताक घेणा-याचा, दोघांचाही वेळ वाचतो.

तुषार काळभोर's picture

12 Mar 2016 - 11:40 am | तुषार काळभोर

:)
सहमत

ग्रेट लिहिताय. आणखी लेखनाची वाट पाहते.

श्रीरंग_जोशी's picture

12 Mar 2016 - 2:41 am | श्रीरंग_जोशी

या विषयावर फारसं पूर्वी वाचलेलं नसल्याने तुम्ही तुमचे अनुभवकथन मिपावर लिहिणे सुरु केल्यामुळे खूप आनंद झाला.
मिपावर स्वागत आहे. मिपावर धडाक्यात सुरुवात झाली आहे.

तुमचे पुढील लेखन वाचण्यास उत्सुक.

मर्चंट नेव्ही बद्दल सहा महिने बोटीवर आणि सहा महिने सुट्टी असं ऐकुन आहे... जर खरच सहा महिने सुट्टी मिळत असेल तर बोटीवरच्या सहा महिन्यात कोणत्या दिव्यातून जावं लागतं ते वाचायला आवडेल.

पुलेप्र.....(पोहता येत नसल्यामुळे) लाईफ जॅकेट घालून बसलेली इ.डो.

यशोधरा's picture

12 Mar 2016 - 8:40 am | यशोधरा

माझी एक मैत्रीण इंजिनीअर म्हणून बोटीवर काम करते आणि उरलेल्या ६ महिन्यांत हिमालयात ट्रेकींग करत फिरते! :)

इडली डोसा's picture

12 Mar 2016 - 8:46 am | इडली डोसा

फक्त भविष्यातली मी :)

यशोधरा's picture

12 Mar 2016 - 11:13 am | यशोधरा

हीहीही! तथास्तु ;)

ही उल्लेखलेली मैत्रीण खरंच फिरते मस्त. खूप ट्रेक्सही झालेत करुन तिचे. ६ महिन्यांच्या सलग सुट्टीमुळे २ -२ ट्रेक्स होतात एका सुट्टीत तिचे. हे तर केवळ स्वप्नवत वाटते मला...

स्वीट टॉकर's picture

12 Mar 2016 - 11:58 am | स्वीट टॉकर

यशोधरा,
अजून या करियरमध्ये मुली अगदी अभावानेच आढळतात. त्यात ती सुट्टीत हिमालयात ट्रेकिंग करते म्हणजे खरोखरच वंदनीय आहे. तिला माझा मनापासून नमस्कार सांगा!

अशा मुलींचा आयुष्याकडे बघण्याचा एक हटके अँगल असतो. तिला लिहितं करता आलं तर बघा ना. तेवढा पेशन्स तिच्याकडे नसला तर मुद्दे लिहून माझ्याकडे पाठवू दे. मी लेख लिहून तिला परत पाठवीन. पटला तर तिला पब्लिश करू दे.

यशोधरा's picture

12 Mar 2016 - 1:01 pm | यशोधरा

विचारुन बघते.

विद्यार्थी's picture

12 Mar 2016 - 8:47 am | विद्यार्थी

मस्त, मजा आली वाचून. कोणीतरी हे सगळे समोरासमोर बसून सांगताय असे वाटले. लेखनाच्या शैलीला १० पैकी १० :-)

सुबोध खरे's picture

12 Mar 2016 - 11:20 am | सुबोध खरे

गोडबोले साहेब
बोटीवरच्या माणसांची प्रत्येक बंदरात एक बायको असते अशी वदंता आहे
या बद्दल तुमचे काय मत आहे?

सतिश गावडे's picture

12 Mar 2016 - 11:25 am | सतिश गावडे

डॉक, लष्कराच्या का होईना पण तुम्हीही बोटीवर होतात असे म्हणण्याचा मोह होतोय. :)

सुबोध खरे's picture

12 Mar 2016 - 12:38 pm | सुबोध खरे

गावडे साहेब
आमची कसली बोट हो? उणी पुरी १००० माणसं आणी मी एकटा डॉक्टर. प्रत्येक माणूस मला ओळखत असे. वार्षिक वैद्यकीय तपासणी किंवा सुटी वर जाण्य़ाअगोदर माझ्या कडे येत असत
दोन दोन महिने समुद्रात फिरून कोणत्याच बंदरात न शिरता परत मुंबईत येत होतो.
नुसत्या मार्मागोवा बंदरात ६ तास विक्रांत उभी करण्याचे भाडे ५०००० होते( १९९०) तेंव्हा सकाळी सात वाजता पोहोचलो तर विमानाचे सुटे भाग बोटीवर चढवून बारा वाजेपर्यंत बंदर सोडायचो. कसलं काय? एकदा कोची बंदरात दोन दिवस थांबलो होतो तेंव्हा बाजारात जा किंवा हॉटेलात. आमचेच नौसैनिक दिसत होते आणी प्रत्येक सैनिक गुड मोर्निंग गुड आफ्टर नून करत असे. एकटाच डॉक्टर असल्याने सगळेच मला ओळखत होते. त्यातून एखाद्या डॉक्टर मैत्रिणी बरोबर बोलताना आढळलो कि लगेच संध्याकाळी कोणतरी इंजिनियर नाही तर पायलट , "डॉक्टर, आज सकाळी तुम्हाला "गर्ल फ्रेंड" बरोबर बोलताना पाहिले" म्हणून (हेवा वाटलेल्या) स्वरात आठवण करून देत असे कि तुमच्या वर लक्ष आहे म्हणून. कसलं काय?
जाऊ द्या. उगाच जखमेवरील खपली काढलीत.

सतिश गावडे's picture

12 Mar 2016 - 12:46 pm | सतिश गावडे

आमची कसली बोट हो?

एकंदरीत तुमची बोट शब्दशः लष्कराच्या भाकर्‍या होती. =))

स्वीट टॉकर's picture

12 Mar 2016 - 12:49 pm | स्वीट टॉकर

मनुष्य कसला स्तुतिप्रिय प्राणी आहे! तुम्ही सगळ्यांनी इतकं कौतुक केलं आहे की नवीन लेखन करण्याऐवजी माझा बराच वेळ पुनःपुन्हा चांगले प्रतिसाद वाचण्यात मी घालवतो!

सु ख - कुठलाच विषय वर्ज्य नाही. त्यामुळे 'बंदरातल्या बायका' हा देखील हाताळला जाईलच!

इ डो - बोटीवर नोकरी करण्यासाठी पोहता येणं सक्तीचं आहे पण त्याचा फारसा उपयोग होत नाही. जीव वाचवायला लाइफ जॅकेटच खरं! त्याहीबद्दल येईलच.

वगिश's picture

13 Mar 2016 - 5:45 pm | वगिश

मस्त।।।।

गामा पैलवान's picture

13 Mar 2016 - 11:45 pm | गामा पैलवान

स्वीट टॉकर,

यापूर्वी तुमची मालिका वाचलीये. परत वाचायला आवडेल. :-) याअगोदर बंदरातल्या बायका हा विषय मालिकेत नव्हता मात्र! त्यामुळे अधिक उत्सुकता आहे. ;-)

आ.न.,
-गा.पै.

जुइ's picture

14 Mar 2016 - 6:40 am | जुइ

पुढील लेखाच्या प्रतीक्षेत!

या सीरीजनंतर बोटींचे अपघात, बुडणं यावर काही माहिती देणारी मालिका लिहीण्याचा विचार करा. विमानाबाबत एनटीएसबी, डीजीसीए, आयकाओ अशा संस्था असतात तशा बोटींबाबत कोणत्या?

अपघातांचं इनव्हेस्टिगेशन आणि रिपोर्टिंग (आणि अनुषंगिक सुरक्षिततेसाठी सूचना) हे काम कोण करतं?

स्वराजित's picture

15 Mar 2016 - 2:52 pm | स्वराजित

___/\___

स्वीट टॉकर's picture

15 Mar 2016 - 4:17 pm | स्वीट टॉकर

गवि - बोट ज्या देशाची असते (म्हणजे ज्या देशात ती रजिस्टर झालेली असते) त्या देशाचे व ज्या देशात अपघात झालेला आहे त्या दोन्ही देशांचे डी.जी.शिपिंग अपघाताचं विश्लेषण करतात.

धनंजय माने's picture

23 Mar 2016 - 12:55 am | धनंजय माने

इंटरेस्टींग.