ही घटना बोटीवर घडलेली आहे. मात्र ती कुठेही घडू शकली असती आणि त्याचे परिणाम तितकेच तीव्र होऊ शकले असते.
मी बोटीवर थर्ड इंजिनियर होतो. एका मालवाहू बोटीवरच्या लोकांची संख्या हल्ली पंचवीसच्या आसपास असते. तेव्हां ती पंचेचाळीस असायची. इंजिनरूममध्ये काम करणार्या खलाशांचा एक म्होरक्या असायचा. त्याला ‘इंजिन सारंग’ म्हणत. आमचा इंजिन सारंग कोकणातला होता. वय साधारण पंचावन्न वर्षं.
तेव्हां इ मेल वगैरे नव्हते. पत्रानीच बातम्या कळायच्या. एका पत्रात त्याला त्याच्या आईचं देहावसान झाल्याची बातमी कळली.
घरापासून दूर राहाणार्या कित्येक लोकांमध्ये एक गैरसमज असतो. घरी एखादी वाईट घटना घडली, मुख्यत्वे तब्येतीबाबतीत, तर त्यांना असं वाटतं ‘मी जर तिथे असतो तर मी काहीतरी करून हे टाळलं असतं.’ खरं तर घरच्यांनी आणि डॉक्टरांनीदेखील सर्वतोपरी प्रयत्न केलेलेच असतात. तरीही.
आमचा सारंगदेखील अशा प्रकारची विधानं करायचा. आम्ही त्याची समजूत घालायचा प्रयत्न करायचो. मात्र नकारार्थी विचारांवर औषध प्रत्येकानी स्वतःचं स्वतःच शोधायचं असतं. दुसरा ते देवू शकंत नाही. आमच्या बोलण्यानी फारसा फरक पडला नाही.
बोटीवर खलाशांकडून काम करून घेणं हे सेकंड इंजिनियरचं काम. बातमी कळल्यावर त्यानी सारंगला दोन दिवस विश्रांती दिली. काम संपवून बोट बंदरातून बाहेर पडली आणि पुढच्या बंदराकडे मार्गक्रमणा करू लागली. साधारण दहा दिवस गेले.
आम्ही अट्लांटिक महासागरात होतो. एके दिवशी सकाळी सारंग कामावर आला नाही. चौकशी केल्यावर कळलं की तो ब्रेकफास्टला देखील आलेला नव्हता. त्याची कॅबिन रिकामी होती. बोटीच्या बाजूला असलेल्या कठड्याला Gunwale म्हणतात. (पूर्वी तिथे तोफा लावलेल्या असंत म्हणून असेल बहुतेक. उच्चार ‘गनल’.) बोटीवर शोधाशोध केल्यावर गनलजवळ त्याच्या रबरी सपाता मिळाल्या. रात्रीत कधीतरी त्यानी पाण्यात उडी मारली होती!
आम्ही लगेच बोट आल्यापावली उलटी वळवली. बोट कॅनडाच्या जवळ असल्यामुळे कॅनेडियन कोस्ट गार्डला सूचना केली. त्यांनी देखील बोटी धाडल्या. आसपास असलेल्या सर्व बोटींना ही सूचना देण्यात आली. तो जिथे असण्याची शक्यता होती तिथे कसून शोध सार्यांनी घेतला. पण काही मागमूस लागला नाही. एक दिवसाच्या निष्फळ शोधानंतर मार्गस्थ झालो.
पाणी प्रचंड थंड! त्याच्या कॅबिनमध्ये त्याचं लाइफ जॅकेट आणि TPA (Thermal Protective Aid) चा सूट होता. त्या दोन साधनांशिवाय पाण्यात काही मिनिटांपेक्षा जास्त काळ जिवंत राहाणं अशक्यच होतं.
ही आत्महत्याच आहे असं जरी आपल्याला माहीत असलं तरी त्यात काहीतरी काळंबेरं आहे अशी शक्यता गृहित धरूनच पंचनामा करावा लागतो. डेकवर रबरी सपाता व्यवस्थित लावलेल्या होत्या. कॅबिनमध्ये कसलीही झटापट झाल्याच्या खुणा नव्हत्या. दोन कॅबिन्सच्या मध्ये पातळ लाकडी पॅनेल असतं. त्याच्या दोन्ही बाजूला राहाणार्या कोणालाही रात्री काहीही धडपड ऐकायला आलेली नव्हती. आम्ही कॅबिनला सील लावलं. पुढे बंदरावर पोहोचल्यावर कॅनेडियन पोलिसांनी पंचनामा केला आणि अपेक्षेप्रमाणे ‘आत्महत्याच आहे’ असा निर्वाळा दिला.
बोटीवर अपघाती किंवा नैसर्गिक रीत्या मृत्यू आला तर आमच्या कॉन्ट्रॅक्टप्रमाणे बर्यापैकी नुकसानभरपाई कुटुंबाला मिळते. शिवाय प्रत्येकाचा स्वतःचा विमा असतो तो वेगळाच. मात्र आत्महत्या असली तर सगळीच गणितं बदलतात. बहुदा त्याच्या पश्चात त्याच्या विधवेला फारसं काही मिळणार नाही अशी शक्यता दिसल्यामुळे बोटीवरील सगळ्यांनी दोन दिवसांचा पगार गोळा करून तिला पाठवण्याची व्यवस्था केली. सेकंड इंजिनियर व्यक्तिशः आणखी काही मदत करू शकत होता. तो कसा? खलाशांचा ओव्हरटाइम त्याच्या हातात असतो. त्याने त्या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून आत्महत्येच्या आधल्या दिवशीपर्यंत भरपूर ओव्हरटाईम लिहिला. त्या ओव्हरटाइमचे पैसे देखील तिला मिळाले.
कालांतराने आपापली कॉन्ट्रॅक्ट्स संपवून आम्ही सगळे पांगलो. आणि हा दुर्दैवी एपिसोड संपला.
संपला असं आम्हाला वाटलं.
साधारण एक वर्षानी सेकंड इंजिनियर सुट्टीवर असताना त्याला पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं गेलं. त्याच्यावर मनुष्यवधाचा आरोप ठेवला गेलेला होता! सारंगचा मृत्यू सेकंड इंजिनियरच्या वागण्यामुळे झाला असा आरोप!
तो हबकलाच! मनुष्यवध? सारंगच्या आईच्या निधनाशी कोणाचाही सुतराम संबंध नाही. शक्य तितकी मदत आम्ही त्याच्या बायकोला केली. सारंगच्या मृत्यूमध्ये दुसर्या कोणाचाही हात नाही. तरी मनुष्यवध?
पुरावा काय? तर सारंगच्या अंतिम महिन्याच्या प्रत्येक दिवशी सोळा-अठरा तास काम करायला लागल्याची नोंद त्याच्या ओव्हरटाइम शीटमध्ये होती. खाली सेकंड इंजिनियरची सही! त्याच दिवसात त्याला त्याच्या आईच्या मृत्यूची बातमी मिळाली होती. तरी देखील त्याची अजिबात तमा न करता त्यानी सारंगला कामाला जुंपलं असणार. इतकंच नव्हे, तर त्याच दिवसात जर बाकीच्या सर्व खलाशांचा ओव्हरटाइम पाहिला तर तो अगदीच जुजबी! म्हणजे फारसं निकडीचं काम नसताना सुद्धा सेकंड इंजिनियरनी वाकडी वाट करून फक्त सारंगला कामाला लावलं असणार आणि बाकीच्या सगळ्यांना आराम दिला असणार. साहजिकच सारंगला ते सहन झालं नसणार!
सेकंड इंजिनियरला अटक झाली!
आपण चित्रपटात बघतो की दुष्ट आरोपीचा वकील एक कागद घेवून येतो, ‘जमानत’ बरोबरच आणखी काही उर्दु शब्द फेकतो आणि दुसर्याच क्षणी जामीन मिळते. वस्तुस्थिती मात्र खूपच वेगळी आहे (असं मला सेकंड इंजिनियर कडून कळलं). त्यात मुरलेल्यांना पट्कन् जामीन मिळवता येत असेल. पण आपल्यासारख्यांना नाही. खूप खर्च आणि प्रयत्नांनी त्याला जामीन मिळाला.
त्याने लगेच त्यावेळीस बोटीवर असलेले चीफ इंजिनियर, कॅप्टन, आणि खरं काय झालं ते जाणणारे आम्ही सगळे - या सर्वांना भेटून खरं काय काय झालं याची स्टेटमेंट्स घेतली. काहींनी द्यायचं नाकारलं! कठिण समय येता, कोण कामास येतो!
सारंगच्या घरच्या लोकांनी सेकंड इंजिनियरला “आम्ही तिचं मन वळवून ही केस मागे घ्यायला लावतो” असं सांगून वारंवार त्याच्याकडून चिकार पैसे उकळले. पण केस काही मागे घेतली जाईना. त्याचा पासपोर्टही जप्त झाल्यामुळे नोकरी करणं शक्य नव्हतं. आमदनी शून्य, खर्च मात्र पाण्यासारखा!
जो दुसर्यावरी विश्वासला, त्याचा कार्यभाग बुडाला॥ या उक्तीनुसार सेकंड इंजिनियरने स्वतःच काहीतरी करायचं ठरवलं. दावा सारंगच्या बायकोनी लावलेला होता. त्यामुळे तो तिला खरं सांगून मन वळवायला तिच्या गावी गेला.
तिथे पोहोचल्यावर त्याला एक धक्काच बसला. सारंगची बायको संपूर्णपणे अशिक्षित होती. तिच्या जवळपासच्या लोकांनी तिला ‘खूप पैसे मिळतील’ असं सांगून वेगवेगळ्या कागदांवर अंगठे घेतले होते. तिला सेकंड इंजिनियरवर केस करण्याची इच्छा अजिबात नव्हती ाणि केसबद्दल काहीही माहिती नव्हती !
आणखी एक वाईट गोष्ट म्हणजे आता सारंगच्या विधवेला एकत्रित कुटुंबातले बाकीचे लोक घरातून हाकलून देण्याच्या प्रयत्न करू लागले होते. तिचे हाल होत होते. वर ‘तक्रार परत घे’ म्हणून सेकंड इंजिनियर तिला विनंती करू लागल्यावर ती ओक्साबोक्शी रडायलाच लागली. सेकंड इंजिनियरनी तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. तेव्हां कोणीतरी फोटो घेतला आणि तो न्यायालयात दाखल केला!
Trying to pressurize the litigant! झालं! त्याचा जामीन रद्द झाला आणि त्याची रवानगी परत तुरुंगात! त्याला कुठेच उजेड दिसेना! तो गेला डिप्रेशनमध्ये!
त्याला सहानुभूति दाखविण्यापलिकडे आम्ही काहीच करू शकत नव्हतो. महिने उलटत गेले. त्याची गालफडं बसली, डोळे खोल गेले, वजन भसाभस उतरलं. भयानक काळवंडला. त्यातल्या त्यात दोन जमेच्या बाजू म्हणजे त्याचं लग्न झालेलं नव्हतं आणि त्याच्या वडिलांची साम्पत्तिक स्थिती चांगली होती.
पाण्यासारखा पैसा खर्च झाला. केस नऊ वर्षांनी संपली. सुदैवानी त्याची सुटका झाली! मात्र या नऊ वर्षात तो किती वर्षांनी वयस्क झाला याचा हिशोबच नाही.
आयजीच्या जिवावर बायजी उदार होऊ शकत नाही. ही शिकवण मिळायला त्याला भयंकर किंमत मोजायला लागली होती.
बोटीवरचे आधीचे लेखः
http://www.misalpav.com/node/35411
http://www.misalpav.com/node/35243
http://www.misalpav.com/node/35291
http://www.misalpav.com/node/36405
http://www.misalpav.com/node/35459
http://www.misalpav.com/node/36269
http://www.misalpav.com/node/36698
प्रतिक्रिया
17 Nov 2016 - 2:37 pm | पद्मावति
आई गं. कठीण आहे. वाईट वाटले त्या इंजिनियर साठी :(
17 Nov 2016 - 2:39 pm | महासंग्राम
एकदम वेगळाच अनुभव लिहिलात तुम्ही... लिहिते रहा.
17 Nov 2016 - 3:13 pm | पियुशा
:( :(
भल्याचा जमाना नै राहीला.
17 Nov 2016 - 3:20 pm | नाखु
त्या
गिधाडे म्हणून मी गिधाडांचा अपमान करू इच्छीत नाही.
एक व्यक्ती आयुष्यातून उठली ह्यांच्या हव्यासापायी.
17 Nov 2016 - 4:50 pm | बोका-ए-आझम
असंच म्हणतो. गिधाडं बिचारी निसर्गाने नेमून दिलेलं काम करतात. पण अशा मानवी गिधाडांचं काय?
17 Nov 2016 - 3:30 pm | एस
अरेरे!
17 Nov 2016 - 3:40 pm | पाटीलभाऊ
फारच विचित्र आणि वाईट अनुभव कथन केलात तुम्ही.
असेच लिहीत रहा.
17 Nov 2016 - 3:48 pm | पुंबा
सुन्न करणारा अनुभव. अतिशय निराश वाटले. माणुसकी, सहृदयता वगैरे केवळ शब्दांचे बुडबुडे वाटावे असं वर्तन आपल्या सहकार्याबरोबर झाले. अशा अनुभवांमुळे लोक मदत सढळ हाताने मदत करायला पुढाकार घेत नाहीत. सेकंड इंजिनीयर अन्यायाचा बळी आणि खलाशाची बायको शोषणाची, समाज म्हणून आपलं फार काही चुकत आहे हे सिद्ध करणारं आहे हे सारं. धुडगूस या चित्रपटाची आठवण झाली तिची दुर्दशा वाचताना. स्वीट टॉकरजी आपले आभार हे शेयर केल्याबद्दल.
17 Nov 2016 - 11:40 pm | अमितदादा
प्रतिसादाशी सहमत. अतिशय खिन्न वाटलं लेख वाचून.
17 Nov 2016 - 3:50 pm | आदूबाळ
बाप रे! भयानक!
17 Nov 2016 - 3:59 pm | अजया
बाप रे!
17 Nov 2016 - 4:16 pm | पुजारी
सौरा शी सहमत ! +१११
17 Nov 2016 - 5:26 pm | सस्नेह
हॉरिबल !
17 Nov 2016 - 6:15 pm | टुकुल
अतिशय सुन्न करणारा अनुभव
17 Nov 2016 - 8:03 pm | झेन
मुडद्याच्या टाळुवरचे लोणी खाणारे लोक वाढलेत खरं.
17 Nov 2016 - 8:13 pm | यशोधरा
अतिशय हळहळ वाटली वाचताना.
17 Nov 2016 - 8:31 pm | डॉ सुहास म्हात्रे
भयानक अनुभव !
17 Nov 2016 - 11:55 pm | अर्धवटराव
झणझणीत अंजन घातलं आमच्या डोळ्यात. यापुढे औट ऑफ द वे कोणाला मदत करताना शंभरदा विचार करण्यात येईल.
18 Nov 2016 - 2:56 pm | mayu4u
सहमत!
18 Nov 2016 - 3:08 pm | मृत्युन्जय
आयला. मोठीच शिकवण मिळाली या गोष्तीतुन आम्हाला सुद्धा. अवघड आहे.
19 Nov 2016 - 8:07 am | पिलीयन रायडर
बापरे..! असं काही होईल असं वाटलंच नाही आधी. उलट ओव्हर टाईम देऊन किती मदत केली असंच वाटलं. हे फारच वाईट आहे हो.. :(
19 Nov 2016 - 9:49 am | तुषार काळभोर
भयानक!!
19 Nov 2016 - 10:32 am | सविता००१
अतिशय हळहळ वाटली.