काय भुर्रकन गेले ते दिवस! शाळेचे! कळलंसुद्धा नाही!
कॉलेजात जायच्या आणि पुढे काहीतरी बनायच्या ध्येयापुढे आपल्या बालपणाच्या सोनेरी पानाला आपण अगदी सहज, उडत्या पांढर्या म्हातारीला तिच्या बीमधून काढून एकेक करून वार्यावर भिरकावून द्यावं तसं भूतकाळाच्या अंगणात नेमाने रतीब घालत टाकून आलो. आता ते बालपणाच सोनेरी पान दुरून फक्त पाहता येतं. परत मिळवता येत नाही, इतकंच कशाला, त्याला स्पर्शही करता येत नाही! मुकलो त्याला कायमचंच!
आज मेंदूला ताण देत वर्गातल्यांची नावे आठवावी लागतात. कोण कुठे बसायचं, कोण कस शिकवायचं हे इतरांकडून विचारून खात्री करून घ्यावी लागते!
एक मात्र नक्की, भूतकाळात रमताना शाळेच्या आठवणींसारखं दुसरं काहीच नसत. क्वचित बदललेली शाळा, बदललेले वर्ग, बदललेले बेंच, बदललेले शिक्षक, नवे जुने मित्र! काही जुनेच काही मागून आलेले. काही मध्येच शाळा सोडून गेलेले! शाळेची नवी-जुनी इमारत, शाळेच मैदान, तिथला झेंड्याचा कट्टा! असा फार मोठा आणि वैविध्यपूर्ण पसारा चुंबकाला चिकटलेल्या विविध लोखंडांच्या वस्तूंप्रमाणे झालेला असतो. एकेक क्षण त्या चुंबकापासून खेचून घेऊन नीट न्याहाळीत बसावे वाटते. यासारखा विरंगुळाही नसावा!
शाळेतली पूजा, शाळेचं स्नेहसंमेलन, शाळेत करून मागितलेले तक्ते! शाळेत वर्ग सजवताना पताक्यांसोबत घातलेला धिंगाणा! सर्वांच्यासोबत खाल्लेला मार! शाळेची सहल! टिंगल टवाळी, अखंड बडबड, मॉनिटरने वहीत नावं लिहून घेणे मग ती सरांपर्यंत पोचू नये म्हणून धडपडलेलो आपण! कधीतरी वर्गातल्या एखाद्या मुलीने मारलेली हाक सुखद धक्का देऊन गेलेली! अरे, हिला आपलं नाव माहितीये! तीच गोड शिरशिरी आताही नकळत अंगातून उठतेच!
जीवावर आलेल्या त्या घटक चाचण्या, सहामाह्या आणि त्याहून मनाला टोचणारे ते वर्गात पेपर देऊन सरांचे मार्क सांगण्याचे प्रसंग. कधी शाळेत आलेले जादूचे प्रयोग, कागदाची ओरिगामी शिकवणारे कलाकार. त्याची पुस्तके घेऊन शिकण्याचा प्रयत्न करताना फसल्याची जाणीव होणारे आपण. नळावर पाणी प्यायला जणू गोठ्यातून सोडून दिलेली तहानलेली वासरं गायांची कास लुचायला धावतात तसे धावणारे आपण. काय सुंदर दिसत हे आता आठवणींतून! धावत्या चित्रांचा पटच जणू कुणी समोर धरून दाखवीत आहे!
अजून एक विशेष सांगायचं म्हणजे नोकरी धंद्यात जवळपास प्रत्येक आजूबाजूवाल्यांशी स्पर्धा करणारे आपण, वर्गमित्रांसोबत अगदी बरोबरीचे होऊन जातो. त्यांच्यात कधीच कोणी मोठा आणि लहान नसतो. हे मित्र कधी भेटले की सख्खे नातलग भेटल्याचा आनंद होतो. कधी एकमेकांची प्रशंसा करताना शब्द कमी पडू लागतात त्याचवेळी एकमेकांची गमतीने उणीदुणी काढताना कसली भीडही ठेवली जात नाही. हे फक्त शाळेतल्या मित्रांसोबत सहजशक्य असतं!
प्रचंड प्रमाणात (पक्षी: पाण्यासारखे!) सोमवार ते शनिवार, आयुष्यातले, शाळेतल्या मित्रांसोबत खर्च केलेले असतात. कधी काही खास रविवारसुद्धा! तेव्हा कळतच नसतं हे क्षण किती खास आहेत आणि आठवणी होऊन पुढे आयुष्यभर आनंद देणार आहेत. तेव्हा घड्याळाच्या अन कॅलेंडराच्या मदतीने नियती भराभर आपले वय वाढवीत असते. आणि आपण जणू प्रवाहाच्या मधल्या धारेत जखडून जाऊन एका ठराविक गतीत वाहत असतो.
काय एकेक आठवणी
काढाव्या तेवढ्या कमीच!
खोल पाहत बसणं आणि
खुदकन हसणंही उगीच!
रोज त्याच चालीवर शिकवणारे
दोन-चार शिक्षक आठवतात
वर्गातल्यांची नावे आठवताना
एकेक चेहरे डोळ्यांपुढून सरकतात!
पहिल्या दिवसाची प्रार्थनेची रांग अन
दिवस पहिला बेंचवरचा आठवतो
वर्गशिक्षकांची हजेरी आणि मागचा
फळ्यावरचा सुविचार आताही वाचता येतो!
मोठेपणीच्या या लंचटाईमला
मधल्या सुट्टीतली भूक लागत नाही
डबे काढून बसा एकत्र सगळे
अस सांगणारी घंटा आता वाजत नाही!
तेव्हाचे गृहपाठाला कुरकुरणारे हात
आता लिहिण्यासाठी आसुसतात
वाटतं, धावत जाऊन शाळेला विचाराव
सोमवारी येऊ का शाळेच्या गणवेशात?
- संदीप चांदणे (२१/१०/१५)
प्रतिक्रिया
21 Oct 2015 - 2:01 pm | बाबा योगिराज
कामुन खपल्या काडु रैले?
अजून ही शाळेतल्या "त्या आपल्या" बेंच वर जाऊन बसाव वाटत. शाळेतल्या प्रत्येक मास्तर, बाई, मामा सगळ्यांना परत परत भेटाव वाटतंय.
परत सगळ्या मित्रांना भेटून प्लास्टिचा बॉल आणि लिहायच्या पॅडची बैट घेऊन क्रिकेट खेळाव वाटतंय.
मस्त लेख...
शेवटल्या बेंचावरचा बाबा...
21 Oct 2015 - 3:25 pm | चांदणे संदीप
येग्झ्याटली!
21 Oct 2015 - 2:14 pm | अंतरा आनंद
कविता आवडली.
21 Oct 2015 - 2:17 pm | द-बाहुबली
लिहीत रहा.
21 Oct 2015 - 2:17 pm | मीउमेश
सुन्दरच
21 Oct 2015 - 3:34 pm | जगप्रवासी
दुखर्या नसेवर हात ठेवलात भाऊ....शाळेचे दिवस आठवले की आपोआप सेंटी मेंटी व्हायला होत.
21 Oct 2015 - 3:42 pm | चांदणे संदीप
खेंगाट - मेंगाट सारखंच वाटल!
असो, वाचून मनातल शेअर केल्याबद्दल आभारी आहे!
Sandy
21 Oct 2015 - 3:48 pm | सौंदाळा
शाळा सोडल्यानंतर अजुनही (मधली २-३ वर्षे वगळता) १५ - ऑगस्टला शाळेत जातो.
आत वर्गांमधुन चक्कर मारतो. अर्थात नोकरी आणि शाळा एकाच शहरात असल्यामुळे हे शक्य आहे पण बाकीच्यांनासुद्धा अधुन-मधुन असे जमवता येवु शकते.
21 Oct 2015 - 3:53 pm | चांदणे संदीप
भारीच की!
21 Oct 2015 - 4:29 pm | मुक्त विहारि
बालपण आणि कुमार वय कुरतडणारा....
असो,
(शाळा अजिबात न आवडणारा) मुवि
21 Oct 2015 - 8:38 pm | चाणक्य
मलाही माझी शाळा कधी आवडली नाही. कारण आमची खरंच तिथे 'शाळा' झाली.
21 Oct 2015 - 4:35 pm | बोका-ए-आझम
शिक्षण पूर्ण करावं लागलं. एका शाळेत सलग पहिली ते दहावी गेलो नाही त्यामुळे एकाच शाळेची अशी अात्मीयता नाही. लेख छान आहे. ज्यांना असे दिवस शाळेत अनुभवायला मिळाले त्यांचा हेवा वाटतो. बाकी मुविंशी सहमत. तसेही ते आणि मी एकाच शाळेत होतो - दहा वर्षांच्या अंतराने.
21 Oct 2015 - 8:48 pm | मांत्रिक
मस्तच चांदणेबुवा!!! अगदी नाॅस्टॅल्जिक केलंत! गेले ते दिन गेले! पुन्हा कधीच येणार नाहीत परत! काय ते सुंदर दिवस! श्या!!!
21 Oct 2015 - 10:26 pm | चांदणे संदीप
@ मुवि, चाणक्य, बोका-ए-आजम:
मलाही शाळा कधीच आवडली नाही! हे कसं झाल? अस विचाराल तर त्याच्याही खूप गमतीजमती आहेत, त्याही पुन्हा कधीतरी सांगीनच!
लेखाच शीर्षक जरी माझी शाळा वगैरे असलं तरी लेख लहाणपणाला, त्या शाळकरी वयाला आणि वर्गमित्रांना केंद्रस्थानी ठेऊनच लिहिला आहे! त्यामुळे जरा फोकस तिकडे वळवलात तर त्याची मजा घेता येईल! बाकी शाळेबद्दल कचकचून सहमत आहेच!
@मांत्रिक : बरेच दिवसांनी गरीबाकडे येणं केलत! येत ऱ्हावा आधनमधन, बर वाटतं!
सर्व वाचकांचे पुन्हा एकदा आभार!
Sandy
21 Oct 2015 - 10:33 pm | दिवाकर कुलकर्णी
सुन्दर
21 Oct 2015 - 10:43 pm | ज्योति अळवणी
कायम शेवटच्या बाकावरचे असल्याने शिक्षकांच्या हिट लिस्ट मध्ये होते. tomboy... मस्तीखोर मुलगी म्हणून नावडती होते. हुशार मुलच सर्व गुण संपन्न असतात अश्या सार्वत्रिक समजामुळे जे काही थोडे गुण होते ते शाळेत कधीच समोर आले नाहीत. त्यामुळे शाळा हा काही फार आत्मीयतेचा विषय नाही. पण तुमचा निबंध आवडला.
22 Oct 2015 - 11:16 am | मुक्त विहारि
हा सगळ्याच शिक्षकांचा आणि शिक्षिकांचा, प्रचंड गैरसमज असतो.
22 Oct 2015 - 7:40 pm | चतुरंग
मार्क्स मिळवणारेच हुषार हा आणखी एक! :)
22 Oct 2015 - 1:33 am | जव्हेरगंज
वाटत, धावत जाऊन शाळेला विचाराव
सोमवारी येऊ का शाळेच्या गणवेशात?>>>>> क्लास !!!
( मोठेपणीचा निबंध म्हटल्यावर जरा येगळ्याच अपेक्षेने आलतो ;-) )
22 Oct 2015 - 3:06 am | रातराणी
आवडला निबंध!
22 Oct 2015 - 11:10 am | पद्मावति
सुरेख लिहिलंय. आवडलं.
22 Oct 2015 - 7:32 pm | चित्रगुप्त
सुंदर आठवणींची सुंदर कविता.
23 Oct 2015 - 12:27 am | उगा काहितरीच
सुंदर लेख ... बालपणात घेऊन गेला.
23 Oct 2015 - 8:16 am | मनीषा
निबंध चांगला आहे ...
कविता फारच छान
23 Oct 2015 - 7:29 pm | शिव कन्या
तेव्हाचे गृहपाठाला कुरकुरणारे हात
आता लिहिण्यासाठी आसुसतात
वाटत, धावत जाऊन शाळेला विचाराव
सोमवारी येऊ का शाळेच्या गणवेशात?
परत आठवणींच्या जगात. सुंदर.
23 Oct 2015 - 7:36 pm | इडली डोसा
शाळेतले सगळेच अनुभव चांगले होते असं म्हणता येणार नाही पण ८ -१० शाळा खूप काही शिकवुन गेली.
23 Oct 2015 - 7:40 pm | इडली डोसा
मला ८ वी. ते १०वी असं म्हणायचं होतं वरच्या प्रतिसादात .
23 Oct 2015 - 7:40 pm | पैसा
लिखाण आवडलं.
23 Oct 2015 - 7:59 pm | चांदणे संदीप
नवीन वाचक आणि प्रतीसादकांचे धन्यवाद! ____/\____
शाळेतल्या जुन्या काही मित्रांना शाळा सोडल्यानंतर थेट मागच्याच आठवड्यात ठरवून भेटता आले. तेही कायअप्पा/कस्काय/वत्सलाबाई मुळे! तेव्हाच्या भावनांचा उचंबळून आलेला हा शब्दाविष्कार आहे!
एक मित्र बोलला ते अत्यंत पटले, ते म्हणजे : "या हातातल्या मोबाईलमधल्या व्हाट्सअपचा आज पहिल्यांदा उपयोग झाल्यासारखा वाटतोय!"
असो, हा लेख पुन्हा पुन्हा वाचताना मलाच ते बालपणीचे दिवस आठवून त्रास होणार हे नक्की! त्यावर उतारा म्हणून एक लहानपणीचे मार खाल्लेले, फजिती झालेले प्रसंग चित्रित करणे हाच उतारा वाटतोय!
मिपा शक्ती दे! (म्हणजे मिसळपाव खाऊनच लिहायला बसतो, कसे?)
Sandy