तत्त्वभान
१. तत्त्वभानाच्या दिशेने
भानावर येण्यापूर्वी..
- श्रीनिवास हेमाडे
*/
/*-->*/
'जाणीव म्हणजे काय?' हा तात्त्विक प्रश्न आहे. त्याचे तात्त्विक उत्तर शोधताना लक्षात येते की, जाणीव म्हणजे मनुष्याची ज्ञानशास्त्रीय चेतना, आत्मभान. ही अशी जाणीव मनुष्याकडे आहे म्हणून नीतिशास्त्र निर्माण होऊ शकते, 'योग म्हणजे चित्तवृत्तीनिरोधन'याचा अर्थ माणसांना कळू शकतो, धर्म- धर्माज्ञा आणि राज्यघटनाही निर्माण होऊ शकते..
'भान' म्हणजे सावधपण किंवा जाणीव होणे. आकलन, समजणे, शुद्ध येणे हे काही इतर समानार्थी शब्द. भान हा फारसा प्रचलित शब्द नाही. जाणीव हा मात्र अधिक वापरात असलेला शब्द आहे. जाणीव म्हणजे समजूत, ज्ञान.
या लेखात 'जाणीव' ही संज्ञा मराठीतील अथवा कोणत्याही भाषेतील विशिष्ट शब्द म्हणून नाही तर 'एक तात्त्विक संकल्पना' या अर्थाने आणली आहे. 'जाणीव म्हणजे काय?' हा तात्त्विक प्रश्न आहे. तिचे उत्तर मानसशास्त्र, मज्जातंतूशास्त्र इत्यादी विज्ञानशाखांकडून दिले जाते. धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्र तर हा स्वत:चा क्षेत्रसिद्ध अधिकार समजते. उदाहरणार्थ, जाणीव-राणीव-नेणीव किंवा बोध-अबोध मन, इत्यादी. पण तो अर्थ इथे अपेक्षित नाही. प्रश्न तात्त्विक असल्याने उत्तर तात्त्विक शोधण्याचा हा प्रयत्न आहे.
या विश्वाविषयी माणसाला अपार कुतूहल आहे. विश्वाचे निरीक्षण करताना माणसाला दोन गोष्टी ठळकपणे जाणवतात. काही गोष्टी निर्जीव आहेत, तर काही सजीव आहेत. जिवंत असणे ही सजीवता आणि जिवंत नसणे ही निर्जीवता.
माणूस, प्राणी हे सजीव तर दगड, धोंडा निर्जीव. सजीवता ही विशिष्ट घटना आहे. काही वेळा तिची मिसळण झाल्याचे वाटून निर्जीव वस्तूही सजीव असल्याचा भास होतो. रेडिओचा शोध लागला तेव्हा गाणारी बाई आत बसली आहे, यावर अनेकांचा विश्वास होता. रेल्वेचा शोध लागला त्या काळात सुरुवातीला 'हा माणसांना खाऊन टाकणारा राक्षस आहे', असे वाटून रेल्वे ओस पडली होती. वनस्पतींनाही सजीव मानले जाते, पाणी जिवंत समजले जाते. आज संगणकाला 'विचार करणारे यंत्र' हा दर्जा बहाल करण्यात आला आहे. यंत्रमानव, उपमानव या अत्याधुनिक; तर यक्ष, किन्नर या जीवयुक्त मानवाच्या प्राचीन कल्पना आहेत. वनस्पती सृष्टी, पाणी यांना सजीव मानल्यामुळे निसर्गही सजीव बनतो. एवढेच काय, पण अखिल ब्रह्मांडात पृथ्वी हाच एकमेव सजीव ग्रह मानला जातो.
या साऱ्या ठिकाणी सजीवतेचा अर्थ चेतना असणे असा समजला जातो. पण चेतना आणि जाणीव यात फरक करणे गरजेचे आहे. खुर्ची आणि खुर्चीत बसलेला माणूस यात फरक काय? खुर्ची जिवंत नाही, माणूस जिवंत आहे; माणसात चेतना आहे. चेतना ही काय गोष्ट आहे? ती देहाशिवाय स्वतंत्र असणारी की देहाशीच निगडित असणारी गोष्ट आहे? या चेतनेचे स्वरूप काय? बेशुद्ध माणूस आणि मृत माणूस यांच्यात चेतनाचे स्वरूप काय?
येथे चेतना (consciousness) आणि जाणीव (awareness) असा फरक शक्य आहे. मृतात चेतना नसते आणि बेशुद्ध माणसात चेतना असते, पण 'जाणीव' नसते. येथे मृताविषयी विचार करावयाचा नसून जिवंत माणसाविषयी विचार करावयाचा आहे. बेशुद्धावस्थेतील माणसातील चेतना ही 'जीवशास्त्रीय चेतना' आणि शुद्धीवर असलेल्या माणसातील चेतना ही 'ज्ञानशास्त्रीय चेतना' होय. या दुसऱ्या ज्ञानशास्त्रीय चेतनेलाच 'जाणीव' (awareness) म्हणता येईल.
आता, दुसऱ्या चेतनेबद्दल- ज्ञानशास्त्रीय जाणिवेबद्दल अधिक विचार करावा लागेल. बेशुद्धावस्थेत माणसाला कळत नसतेच, पण 'आपल्याला कळत आहे की नाही' हेही त्याला कळत नसते. म्हणून कळणे आणि आपल्याला कळणे, यात फरक करता येतो. या दुसऱ्या गोष्टीलाच बहुधा स्वजाणीव म्हटले जाते. अर्थात प्रत्येक वेळी 'आपल्याला कळत आहे' हे स्पष्टपणे कळलेच पाहिजे, असे नाही. काही वेळेला तरी 'आपल्याला कळत आहे' किंवा 'आपल्याला कळत नाही' हे त्याला नक्कीच कळत असते. हे दुसरे कळणे, हेच माणसाचे मुख्य सामथ्र्य आहे. ते ज्ञानाचे ज्ञान होय. स्वजाणिवेची जाणीव अशी पुढची पायरी असू शकते. .
माणसाची ही ज्ञानशास्त्रीय जाणीवच त्याला आत्मभान देते. 'मी' ज्ञान घेणारा ज्ञाता, ज्ञान निर्माण करणारा निर्माता आणि स्वत: 'मी'च ज्ञानाचा विषय असणारा विषयीही आहे, असे या आत्मभानाचे स्वरूप असते. ही ज्ञानशास्त्रीय जाणीव प्राण्यांमध्ये नसते. प्राणी आणि माणूस यांच्या आहार, निद्रा, भय, मथुन या प्रेरणा सारख्याच असतात. पण प्राण्यांना ज्ञानशास्त्रीय आत्मभान नसते.
काय कळते आहे, यात स्वत:ची जाणीव समाविष्ट असल्याने माणूस 'स्व'चा शोध घेतो. हा 'स्व' म्हणजे भाषिक पातळीवर ज्याला 'मी' म्हटले जाते ते आत्मभान असते. बुद्धिमान प्राणी ते भक्त किंवा 'मी ब्रह्म' हा आत्मभानाचा कल्पनाविस्तार असतो.
आत्मभानाची ही ज्ञानशास्त्रीय जाणीव कोणते मानवी कार्य घडवून आणते? ही जाणीव अनघड, भरड अशा निसर्गातून मानवी जगाची निर्मिती करण्याची प्रेरणा माणसाला देते. हे सामाजिक जग असते. पृथ्वी या खगोलशास्त्रीय जगावर सामाजिक जगाचे आरोपण होते. अन्न, वस्त्र, निवारा, संगीत, साहित्य, सौंदर्य, नीती, तत्त्वज्ञान, धर्म, विज्ञान, तंत्रज्ञान या मानवी निर्मिती रूपात आत्मभानाचे प्रकटीकरण घडते.
लक्षात हे घेतले पाहिजे की, रोज अन्नाची गरज असली तरी प्राणी पाकशास्त्र निर्माण करीत नाहीत, माणूस निर्माण करतो आणि माणूस पाकशास्त्र, कामशास्त्र निर्माण करतो तसा धर्मशास्त्र, धर्मग्रंथही निर्माण करतो. धर्माज्ञाही माणूसच निर्माण करतो, लिखित-अलिखित भाषा माणूसच निर्माण करतो. संयम बाळगण्याची क्षमताही 'माझी'च असते, हेही 'माझे'च भान आहे.
निर्मिती ही आत्मभानाचे आणि संयमाचे निदर्शक आहे, तसे त्या उलट संहार, विध्वंस हे बेभानाचे लक्षण आहे. खगोलीय जगाची निर्मिती आणि तिचा संहार 'मी' करीत नाही, ते 'माझ्या' पलीकडचे आहे; बेभान झालो की सामाजिक जगाचा संहारही 'मी'च करतो. तेव्हा न्याय-अन्याय, पोषण-शोषण, वर्ण-जात-जमात, छळछावण्या, युद्धे, शांतता या साऱ्या व्यवस्था मानवी ज्ञानशास्त्रीय जाणिवेचा आविष्कार आहेत.
आपल्या कृत्याची जाणीव असल्यानेच माणूस एखाद्या कृत्याकडे प्रवृत्त किंवा निवृत्त होतो. जाणिवेचा हा घटकच त्याला आत्मसंयम देतो. पतंजलींनी 'योग म्हणजे चित्तवृत्ती निरोध' असे म्हटले आहे. वनस्पतींमध्ये चित्त (चेतना) असते, प्राण्यांमध्ये चित्तवृत्ती (चेतना आणि विकार) असतात, पण नियंत्रण नसते. माणसात मात्र (चेतना आणि विकार आणि) नियंत्रण असते. ते 'निरोध' या शब्दाने व्यक्त होते. वनस्पतीबाबत निरोधाचा प्रश्न उद्भवत नाही आणि प्राण्यांना निरोधाचे भान नसते. 'निरोधनाचे' भान हे नीतीचे भान असते, ते केवळ माणसात असते. ज्या व्यक्तीत हे 'निरोध' सामथ्र्य विकसित होते, तो योगी, संन्यासी. बौद्ध विचारातही 'दु:खनिरोध' आढळतो, तो याच भानातून.
हे भान विकसित होणे आधुनिक लोकशाही धर्मासाठी अनिवार्य आहे. 'धृ' म्हणजे धारण करणे (धारयति इति धर्म:) म्हणून धर्म म्हणजे लोकधारणा करणारे तत्त्व. लोकशाही हा आजचा धर्म, 'युगधर्म' आहे. संविधान हीच माझी 'धर्माज्ञा' असते. लोकशाही हा अत्याधुनिक, व्यापक, मानवतावादी धर्म आहे. हा धर्म प्रत्येक माणसासह सर्व सजीवांच्या जगण्याचा मूलभूत हक्क बजावण्याची संधी देतो. संविधान ही 'धर्माज्ञा' ताठर, कठोर नाही, ती बदलता येते, दुरुस्त करता येते. नवा नीतीनियम करता येतो. कालबाह्य गोष्टी वगळून ही 'धर्माज्ञा' कालसुसंगत करता येते.
भानावर येण्यापूर्वी या रीतीचे आत्मभान आपण जागे करू शकलो तर आणखी काही गोष्टींचे भान विकसित करणे सहजी जमेल.
लोकसत्तेत ०७ जानेवारी २०१४ रोजी पूर्वप्रकाशित.
प्रतिक्रिया
29 Jun 2015 - 4:43 pm | उगा काहितरीच
अगाबाबौ ! (भान आले कि सविस्तर प्रतिक्रिया देईन )
29 Jun 2015 - 9:47 pm | निरन्जनदास
चालेल ! नव्हे, पळेल !!
मी वाट पाहायला तयार आहे. ती सवय आहे.
29 Jun 2015 - 7:29 pm | पैसा
लक्षात येतंय.
आवडले. जो असा निरोध करू शकत नसेल तो माणूसपणाच्या एक पायरी खाली आहे असे समजावे का? कारण हे "भान" बहुसंख्यांना नसतेच.
29 Jun 2015 - 9:54 pm | निरन्जनदास
खरे आहे तुमचे म्हणणे. निरोध करू शकत नसेल तो माणूसपणाच्या एक पायरी खाली आहे असे समजायला हरकत नसावी. बहुतेकजण 'बेभान' असतात. गोची अशी आहे की "आपण बेभान आहोत'' याची जाणीव त्यांना असू शकते, पण ते ''भानावर येण्यास'' तयार नसतात. पण तसा भास देण्यात ते यशस्वी होतात, इथे त्यांची आणि आपली, म्हणजे प्रेक्षकांची गफलत होऊ शकते. म्हणून ''साव ऽ ऽऽ धान ! "
29 Jun 2015 - 10:10 pm | पैसा
काही जणांना आपण भानावर आहोत असा आत्मविश्वास असतो, पण दुरून पाहणार्याला काही वेगळंच दिसतं.
The whole problem with the world is that fools and fanatics are always so certain of themselves, and wise people so full of doubts.
रसेल आठवला.
दु:खनिरोधः याबद्दल वाचायला आवडेल.
29 Jun 2015 - 10:24 pm | निरन्जनदास
अगदी बरोबर.
दु:खनिरोधः येईलच पुढे.
29 Jun 2015 - 10:27 pm | पैसा
पुढील लिखाणाची वाट बघेन.
29 Jun 2015 - 10:31 pm | निरन्जनदास
धन्यवाद
आणि
स्वागत !!
29 Jun 2015 - 9:27 pm | सुधीर
'योग म्हणजे चित्तवृत्ती निरोध' आणि 'हे भान विकसित होणे आधुनिक लोकशाही धर्मासाठी अनिवार्य आहे'.
हे शेवटचे दोन पॅरा आवडले.
29 Jun 2015 - 9:55 pm | निरन्जनदास
धन्यवाद सुधीर !
30 Jun 2015 - 12:11 am | अत्रुप्त आत्मा
@ माणसाची ही ज्ञानशास्त्रीय जाणीवच त्याला आत्मभान देते. 'मी' ज्ञान घेणारा ज्ञाता, ज्ञान निर्माण करणारा निर्माता आणि स्वत: 'मी'च ज्ञानाचा विषय असणारा विषयीही आहे, असे या आत्मभानाचे स्वरूप असते. >> अप्रतिम!
वाचनखूण साठवलि गेली आहे. :)
1 Jul 2015 - 5:05 pm | निरन्जनदास
धन्यवाद अतृप्त !
तुम्हाला किमान तृप्ती देता आली, याचे समाधान वाटते
30 Jun 2015 - 8:59 am | स्वीत स्वाति
निर्मिती आणि संहारचा पॅरा आवडला.
पु भा शु.
1 Jul 2015 - 5:06 pm | निरन्जनदास
धन्यवाद ! खरे तर हा शब्द अपुरा आहे, पण कामचलाऊ मानू.
30 Jun 2015 - 9:30 am | मुक्त विहारि
सध्या तरी बर्याच गोष्टी किचकट आणि समजण्याच्या पलीकडे आहेत. (दोष तुमचा नाही, आमच्या स्वल्प मतीचा आहे.)
पुढे कधी तरी निवांत वेळ मिळाला, तर परत एकदा व्यवस्थित, तन-मन एकत्र करून आणि मनन-चिंतनासाठी वेळ मिळाला तर, वाचायचा विचार आहे.
30 Jun 2015 - 9:42 am | टवाळ कार्टा
तुम्हाला समजल्यावर आम्हा पामरांसाठी निरुपण कट्टा ठेवा :)
1 Jul 2015 - 5:16 pm | निरन्जनदास
आनंदाने ठेऊ !
30 Jun 2015 - 10:11 am | सुबोध खरे
सध्या तरी बर्याच गोष्टी किचकट आणि समजण्याच्या पलीकडे आहेत. (दोष तुमचा नाही, आमच्या स्वल्प मतीचा आहे.)
हेच म्हणतो.
मुळात माझे मन तत्वज्ञान सारख्या गंभीर विषयात रमत नाही. वाचले पण फारसे समजले नाही. (स्वगत-- बाप रे लोक इतका गूढ आणि खोल विचार करतात)
आमची पट्टी काळी दोन. पांढरी पाच कशी झेपणार?
त्यामुळे सध्या पास.
30 Jun 2015 - 10:18 am | पैसा
डॉक. आता या लेखाबद्दल मनातला तत्त्वज्ञान हा शब्द काढून टाका आणि एका वेळी एकेक पॅरेग्राफ वाचून बघा ही विनंती!
30 Jun 2015 - 10:41 am | सुबोध खरे
पैसा ताई
हे असेच काहीतरी मोठ्या प्रमाणात मनोविकार शास्त्रात होतं. म्हणून आमचे ब्रिगेडियर पेठे सर(मनोविकारशास्त्राचे प्राध्यापक ज्यांच्या हाताखाली मी काही महिने काम केले) मला म्हणाले तू मनोविकार शास्त्रापेक्षा( PSYCHIATRY) क्षकिरण शास्त्र( RADIOLOGY) हा विषय घे ( SUBJECTIVE पेक्षा OBJECTIVE) घे. ते तुला जास्त चांगले जमेल.
मी त्यांचा शतशः ऋणी आहे. मला तत्त्वज्ञानाबद्दल आदर आहे पण ते मला झेपत नाही. तुझे आहे तुजपाशी मधील "डिके" सारखी माझी गत आहे.
आपला
शरद तळवलकर ( काना मात्रा नसलेला सरळ माणूस)
30 Jun 2015 - 10:48 am | पैसा
:)
तुम्हाला आणि निरन्जनदासांनाही एक शंका विचारते. मी साधे म्हणून वाचले आणि मला या लेखातले बरेच भाग कळले. जे कळले नाहीत त्यासाठी मी निरन्जनदासांना हळूहळू विचारीनच.
पण माझ्या माहितीत एकाने अगदी लहान कॉलेज आणि नोकरीच्या वयात तत्त्वज्ञानाचे खूप ग्रंथ वाचले, अगदी विवेकानंद सुद्धा. आणि मग तो अन्य काही कारणाने माईल्ड डिप्रेशनमधे गेला. सायकिअॅट्रिस्टकडे गेला तेव्हा त्यानी त्याला हे सगळे वाचन आधी बंद कर म्हणून सांगितले. तत्त्वज्ञान वाचून एखाद्याचे डिप्रेशन वाढेल असे होऊ शकते का?
1 Jul 2015 - 5:12 pm | निरन्जनदास
यात फार काही अवघड नाही. तुम्ही वेळ काढायला हरकत नाही.
तुमचा प्रतिसाद येणे महत्त्वाचे.
30 Jun 2015 - 10:30 am | चौकटराजा
?????????
1 Jul 2015 - 5:12 pm | निरन्जनदास
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
30 Jun 2015 - 12:38 pm | तुडतुडी
पण माझ्या माहितीत एकाने अगदी लहान कॉलेज आणि नोकरीच्या वयात तत्त्वज्ञानाचे खूप ग्रंथ वाचले, अगदी विवेकानंद सुद्धा. आणि मग तो अन्य काही कारणाने माईल्ड डिप्रेशनमधे गेला. सायकिअॅट्रिस्टकडे गेला तेव्हा त्यानी त्याला हे सगळे वाचन आधी बंद कर म्हणून सांगितले. तत्त्वज्ञान वाचून एखाद्याचे डिप्रेशन वाढेल असे होऊ शकते का?>>>
मुळात आत्मभान येणे , 'स्व' ची जाणीव होणे हे भयानक काहीतरी आहे असंच ९०% लोकांचं मत असतं . ज्याला त्याची आवड असते त्यांना इतर लौकिक गोष्टींमध्ये रस वाटत नाही . कारण त्यातला फोलपणा त्यांना समजलेला असतो . परंतु इतरांना मात्र हे डिप्रेशन किंवा औदासिन्य वाटतं .
त्यांनी स्वतः विवेकानंद किवा तत्सम वाचल्याशिवाय त्याचं महत्व समजणार नसतं .
1 Jul 2015 - 6:03 pm | निरन्जनदास
सुहृद मित्र सुबोध, पैसा आणि तुडतुडी,
तुम्ही चर्चेचा श्रीगणेशा केला हे अतिशय छान.
हे पाहा,
आता एक समस्या समजावून घेत येते का ते पाहू.
प्रथम हे पहिल्या लेखात मी हे अधोरेखित केले आहे की तत्त्वज्ञान ही कुणा एकाची मक्तेदारी नाही, त्यावर प्रत्येक माणसाला बोलण्याचा अधिकार आहे.
तत्त्वज्ञान आणि तत्त्वभान यात मी व्यावसायिक तत्त्ववेत्ता (Professional Philosopher म्हणजे तत्त्वज्ञानाचा शिक्षक ) म्हणून ढोबळमानाने कसा फरक करतो आहे, तर तत्त्वज्ञान ही शिकण्याची तांत्रिक गोष्ट आहे तर तत्त्वभान महणजे ही तांत्रिक गोष्ट कशी शिकायची हे शिकायचे आहे. हा काही अंशी प्रशिक्षणाचा खेळ आहे. या खेळाचा मी एक प्रशिक्षक आहे, असे समजू.
हा खेळ, त्याचे नियम समजावून घेऊन आपण खेळलो तर फार मजा येईल. हा नियम अर्थात प्रत्येक खेळाला लागू आहे. अगदी प्रेमाच्या खेळासह!
पण नियम समजावून न घेता खेळायला जो जाईल त्याचा गोंधळ होणारच. तेच पैसा जे उदाहरण देतात त्यातील माणसाबाबत घडले असावे. शिवाय त्या म्हणतात "तो अन्य काही कारणाने माईल्ड डिप्रेशनमधे गेला." आणि सायकिअॅट्रिस्ट म्हणतो, " हे सगळे - म्हणजे तत्त्वज्ञानाचे वाचन आधी बंद कर"
आता हे चमत्कारिक आहे.
"तत्त्वज्ञान वाचून एखाद्याचे डिप्रेशन वाढेल असे होऊ शकते का?" याचे स्वतंत्र उत्तर "आहे/नाही" असे दोन्ही देता येईल. तुम्ही कोणत्या प्रकारचे तत्त्वज्ञान वाचता, निर्माण करता यावर तुमची मानसिकता अवलंबून राहील. काफ्का, कामु वाचाल तर निराशा वाटू शकते. मी नववीत म्हणजे १४ व्या वर्षी जी ए वाचायला सुरुवात केली. रमलखुणा वाचून नियतीवाद घुमू लागला. समजत नव्हतं. पण का समजत नाही, म्हणून पिच्छा पुरवला आणि तत्त्वज्ञानाचा खजिना गवसला. निराशा टाळली.
पण म्हणून खूप आनंद झाला असे नाही. अजूनही जी ए वाचतो, आत कुठेतरी नवीन डोळा उघडतो!
वि आ बुवा, ठणठणपाळ, पु. ल. वाचाल तर सगळा ताण जाईल.
आपण सारेजण तत्त्वज्ञान समजावून घेऊ. मलाही तुमच्यामुळे नव्या गोष्टी कळतील की.
सायकल दुरुस्त करायची तर आधी टोपली, त्यात पाणी, चिकटपट्टी, फेविकॉल, पंप इत्यादी घ्यावे लागेल; तसे तत्त्वाचे, तत्त्वज्ञानाचे भान म्हणून काहीएक जाणीव विकसित करावी लागेल, ती करू. मग तुम्ही ज्या तत्त्वज्ञानाकडे जावयाचे आहे त्याची निवड करू शकता.
माझे सारे प्रतिपादन सुधारणेसाठी खुले आहे, हे वेगळे नमूद करायला नको.
1 Jul 2015 - 6:09 pm | पैसा
प्रतिसाद आवडला.
2 Jul 2015 - 4:46 pm | अस्वस्थामा
अभिनिवेशरहित लेखन आणि हा प्रतिसाद देखील खूप आवडला..
आणि
हे मस्तच.. :)
असो, आज हे वाचायला आमचे "सर" इथे हवे होते असे नमूद करतो. ;)
(नेमाडे सर, तुम्हाला हे "सर" माहित नसतील तर तुम्ही या "सरांची" चिंता करु नका. चर्चेत कधीतरी ते येतीलच. )
2 Jul 2015 - 5:54 pm | निरन्जनदास
"सायकल दुरुस्त करायची तर आधी टोपली, त्यात पाणी, चिकटपट्टी, फेविकॉल, पंप इत्यादी घ्यावे लागेल; तसे तत्त्वाचे, तत्त्वज्ञानाचे भान म्हणून काहीएक जाणीव विकसित करावी लागेल, ती करू. मग तुम्ही ज्या तत्त्वज्ञानाकडे जावयाचे आहे त्याची निवड करू शकता." या विधानात आणखी थोडी दुरुस्ती करतो. ती अशी : सायकल दुरुस्त करायची तर आधी टोपली, त्यात पाणी, चिकटपट्टी, फेविकॉल, पंप इत्यादी साधने, उपकरणे हाताशी घ्यावी लागतील, मगच प्रत्यक्ष सायकल दुरुस्ती करता येईल. ती दुरुस्त झाली की आहेच ती दामटायला तयार ! ; तसे तत्त्वाचे, तत्त्वज्ञान जाणून घ्यावयाचे तर तत्त्वज्ञानाची साधने, उपकरणे हाताशी घ्यावी लागतील, ही साधने कोणती याचे भान म्हणून काहीएक जाणीव विकसित करावी लागेल, ती करू. मग कोणतेही तत्त्वज्ञान अवघड राहणार नाही, होता होईल, तितके ते आकलनशक्तीच्या कह्यात येईल. तत्त्वज्ञानाच्या स्वरूपानुसार संथ गतीने आकलनशक्तीही विकसित होत राहील..... मग, तुमच्या समोर उभ्या ठाकलेल्या अनेक विचारविश्वातून तुम्ही ज्या तत्त्वज्ञानाकडे जावयाचे आहे त्याची निवड करू शकता.
सरांना भेटायला मी उत्सुक आहे.
1 Jul 2015 - 8:04 pm | सस्नेह
वा, खूप सोपे करून सांगितले आहे.
चेतना आणि जाणीव, ज्ञान आणि भान इ. विवेचन पटले.
2 Jul 2015 - 5:55 pm | निरन्जनदास
धन्यवाद स्नेहांकिता !
1 Jul 2015 - 9:19 pm | अर्धवटराव
असं काहिसं म्हणायचं आहे का आपल्याला?
तसं असल्यास विश्लेषणाची प्रेरणा हिच मनुष्य शरीराला इतर प्राण्यांपासुन वेगळं करते ??
2 Jul 2015 - 6:09 pm | निरन्जनदास
बरोबर ! विश्लेषण ही बौद्धिक कृती निखळ मानवी घटना आहे.
बुद्धि (Reason), आत्मभान (Self awarness) आणि करुणा (Compassion) ही तीन वैशिष्ट्ये माणसाची लक्षणे आहेत.
निव्वळ बुद्धिमान माणूस कितीही अधम पातळीवर जाऊ शकतो, याची उदाहरणे देण्याची गरज नाही. ज्याला आपण काय करीत आहोत, याची जाणीव असते तोच करुणाभाव विकसित करतो. येशूचं स्मरण केलं तर काय मिळतं, " हे ईश्वरा, त्यांना माफ कर ते काय करीत आहेत, हे त्यांना कळत नाही !! "
करुणाहीन बुद्धि हिंसेशी मैत्री करते !
करुणा असेल तर आणि तरच मानवतेचा उदय शक्य होतो.
2 Jul 2015 - 4:49 pm | अस्वस्थामा
अजून एक, तुमच्या लेखांमध्ये पुढच्या मागच्या लेखनाचा दुवा टाकता आला तर पहावे.
तसेच धागा जर दखल पात्र झाला तर नवीन लेख आलेले लक्षात येईल इतरांच्यापण. (आम्हाला खोदकाम करावे लागले दुसर्या भागासाठी. )
(सा.सं. बघा जरा. :) )
2 Jul 2015 - 6:21 pm | निरन्जनदास
ही सूचना चांगली आहे. मला ही तांत्रिक माहिती नाही, पण संपादक मंडळीशी बोलून ठरविता येईल.
5 Jul 2015 - 10:45 am | ज्ञानोबाचे पैजार
मी पहिल्यांदा हे कबुल करु इच्छितो की या विषयावर बोलण्याचा मला काही एक अधिकार नाही. कारण या विषयाचा कोणत्याही प्रकारचा अभ्यास मी केलेला नाही. मी खाली जी काही विधाने करणार आहे ती केवळ माझ्या शंका निरसन करण्यासाठीच केली आहेत. ती विधाने सत्य आहेत, किंवा मी म्हणतो ते बरोबरच आहे असा कोणताही दावा मी करत नाही.
जर येथे विध्वंस करणे म्हणजे एखादी गोष्ट नष्ट करणे असेल तर ज्या शक्तीने हा खेळ रचला आहे ती शक्तीसुध्दा विध्वंस करताना दिसतेच ना? (महापुर, दुष्काळ, त्सुनामी, अवकाशातली ब्लॅकहोल्स इत्यादी.)
वरील विधान काही काळासाठी बाजूला ठेवले तरी सुध्दा जिवंत रहायचे असेल तर विध्वंस करावाच लागतो. विध्वंस केल्या शिवाय तुमच्या पोटात अन्न जाणार नाही. मग विध्वंस बेभान कसा? या पुढे जाउन जर मी असा दावा केला की "विध्वंस करणे ही नैसार्गीक प्रवृत्ती आहे आणि संयम हा निसर्गनियमाच्या विरुध्द आहे." तर माझ्या विधानात काही चुक आहे का?
यापुढे जाउन असेही म्हटले जाते की या जगात कोणीच कशाचीही निर्मिती करु शकत नाही आणि त्याचा विध्वंसही करु शकत नाही. जे काही आपण जगतो, बघतो, अनुभवतो ती केवळ एकाच उर्जेची विविधरुपे आहेत. उदा. सुर्यापासून पृथ्वी निर्माण झाली, आणि त्या पासून जीवसृष्टी. याच न्यायाने निर्मीती आणि विध्वंस म्हणजे एखाद्या उर्जास्वरुपाचे दुसर्या उर्जास्वरुपात रुपांतर करणे. जर असे असेल तर मग निर्मीती म्हणजे आत्मभान आणि विध्वंस म्हणजे बेभान पणा कसा? हे कसे ठरवले जाते?
असा दावा करणे ही केवळ एक आत्मप्रौढी आहे असे वाटते. कारण असा दावा केवळ मनुष्यप्राणी इतर मनुष्यप्राण्यांपुढे करताना दिसतो. इतरांनी ते मान्य करावे यासाठी सुध्दा मनुष्यप्राणी इतरांशी संवाद साधताना दिसत नाही. जणू या विश्र्वातला एकमेव सजीव मनुष्यच आहे. (इथे मला जी.ए. कुलकर्णी यांची हंस आणि कावळे ही गोष्ट आठवत आहे.) जेव्हा मनुष्य या कोशामधुन बाहेर पडेल / फेकला जाईल तेव्हा कदाचीत त्याला प्रचंड मोठा धक्का बसेल.
मी वर म्हणालो आहे की या जगात आपण जे काही अनुभवतो ती एकाच उर्जेची विविधरुपे आहेत. ज्ञान हे देखिल त्याच उर्जेचे एक रुप आहे. हे जर मान्य केले तर ज्ञान निर्माणही होत नाही आणि नष्टही. ते असतेच. काही जणांना ते आहे याची जाणीव असते / होते आणि काही जण अजाणतेपणी सुखात असतात. ज्ञानाची जाणीव जिवनात अशांतता निर्माण करते. (हे लिहीताना माझ्या डोळ्यासमोरुन मॅट्रीक्स मधला "निओ" आहे. मॉर्फियस त्याला जाणीव करुन देत नाही तो पर्यंत तो मॅट्रीक्स मधे सुखाने रहात असतो. )
माझ्या या शंकांची उत्तरे तुमच्या लेखमालेच्या पुढच्या भागांमधे येणार असतील तर इथे दिली नाहीत तरी चालु शकेल.
पैजारबुवा,
6 Jul 2015 - 12:27 pm | मराठी_माणूस
माझ्याही मनात असे विचार आले होते . तुम्ही ते व्यवस्थित शब्दात मांडले आहेत. विशेष करुन प्राण्यांचा आत्मभानाचा मुद्दा.
कदाचीत , प्राण्यांना देखील आपल्या पेक्षा वेगळ्या प्रकारचे भान असेल जे आपल्या समजण्या पलीकडे असेल . जसे की , आपण एकमेकांशी भाषेच्या माध्यमातुन संवाद साधतो , प्राणी सुध्दा एकमेकांशी संवाद साधतात जो आपण समजु शकत नाही.
हेमाडे सरांच्या उत्तराची प्रतिक्षा आणि उत्सुकता.
7 Jul 2015 - 2:38 pm | निरन्जनदास
हं, हे ही फार चूक नाही.
प्राण्यांना भान नसते, असे नाही. पण ते 'आत्मभान' नसते.
म्हणजे मानवी आत्मभान ज्या स्वरूपाचे असते, त्या स्वरूपाचे नसते. समाज, भाषा, संस्कृती, धर्म, तत्त्वज्ञान, तंत्रज्ञान, विज्ञान इत्यादी मानवी आविष्कार केवळ मानवी आत्मभानच निर्माण करू शकते, प्राणिज भान नव्हे.
समाज आणि समूह, टोळी, थवा, कळप यात आपण फरक का करतो ? कारण यातील प्रत्येक गोष्ट वेगळी आहे, वेगळ्या जीवांना लागू आहे.
अगदी फार काय पण खुद्द ही प्रस्तुत चर्चा फक्त मानव आणि केवळ मानवामध्येच चालू आहे, यापेक्षा वेगळा पुरावा कशाला ?
माणसाला भाषा असेल काय ? त्याचे संवादाचे माध्यम कोणते ? अशी चर्चा कोणत्याही प्राण्यात चालू नाही, माणसात चालू आहे !
प्राण्यांचा अभ्यास माणूस करतो, प्राणी माणसाचा करीत नाहीत. त्यांना परंपरा नसते, कारण स्मृती नसते. परिणामी ते केवळ जनन करण्याखेरीज काहीच करू शकत नाहीत. माणसाची स्मृती इतकी ताणली गेली की त्याला गतजन्मीचे आठवते !!!
पुढे, अबब !!!! म्हणावे असे अनेक जन्माचे आठवते. श्रीकृष्ण तोच दावा करतो.
अहो, जन्म, पुनर्जन्म, त्याचे चक्र, त्यातून मोक्ष हे आम्ही निर्माण केलेले महाजाल आहे ! प्राण्यांनी नाही.
पण छान, चांगली भरीव चर्चा या निमित्ताने होते, याचे समाधान.
मराठी माणसाला विचार केलाच पाहिजे बरं .
7 Jul 2015 - 11:29 am | निरन्जनदास
पैजारबुवा,
प्रथम दिलगिरी व्यक्त करतो.. तुम्हाला प्रतिसाद देण्यास उशीर झाला.
आणि आता, अनुक्रमे जाऊ.
हे पाहा, मी पहिल्या लेखातच असे म्हंटले आहे की तत्त्वज्ञानावर बोलण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. याचे कारण प्रत्येक 'जन' काहीतरी दृष्टीकोन बाळगत असतो. त्यामुळे तुम्ही अगदी बोलू शकताच. आणि मुळात हा विषयच असा आहे की प्रत्येक वेळी जगण्याचा नवा पैलू समोर आणि सामोरा येतो. त्यामुळे कितीही "परिपूर्ण' दृष्टीकोन मांडला तरी काहीतरी उरलेले असतेच. खरे तर त्यातूनच 'ईश्वर' जन्माला येतो.
अधेमध्ये ईश्वर येत राहील.पण ते असो,
यात काय होते पाहा : मानवी संस्कृतीची निर्मिती ही एक सुरचना आहे. निसर्ग रचना करीत नाहीत, निसर्गात केवळ घटना घडतात. त्यांचा आपण अर्थ लावीत असतो. महापुर, दुष्काळ, त्सुनामी, अवकाशातली ब्लॅकहोल्स ही केवळ 'असणे' आहेत. त्यामागे हेतू नाही, नसतोही.. निसर्ग विध्वंस करीत नाही. पृथ्वीवर कुणीच नव्हते (किंवा आजही मंगळ, गुरु, प्लुटो या ग्रहांवर कुणी नाही), तेंव्हा काहीही घडले तरी कुणाचेच काही नुकसान घडले नाही. पण माणसाचा निसर्गाशी संपर्क आला आणि निसर्गावर हेतूचे आरोपण सुरु झाले. निसर्ग जणू मानवी (अन्थरोपिक) झाला. बीज फुटणे, त्याचा रोप, वृक्ष होणे ही नैसर्गिक क्रिया आहे, ती हिंसा नाही. त्यात कर्त्याला म्हणजे निसर्गाला "आत्मभान" नाही. त्यामुळे त्याला तो काय करीत आहे, हे कळत नाही.
रचना आपण करतो. "आत्मभान" आपल्याला असते. आता, हे विसरणे किंवा दृष्टीआड करणे हा हिंसेचा मार्ग आहे. इतरांनी निर्माण केलेले काहीही नष्ट करणे, ही हिंसा असते. पण अन्न तयार करणे, ही हिंसा नाही, ते पोषण आहे.
बॉम्ब इत्यादी युद्ध जनक कृती ही निर्मिती आहे का ? नाही ! कारण ती हिंसेची साधने आहेत. पण स्वयपाकघरातला चाकू ही निर्मिती आहे, आरोग्यविषयक साऱ्या वैद्यकीय शस्त्रक्रिया हिंसा नाही, ती निर्मिती आहे. नवीन काही निर्माण होण आणि ते जीवनदायी असणे, ही निर्मिती मानावी. पण नेमकी हीच, म्हणजे निर्मितीला हिंसा समजणे ही चूक जैनांनी केली आणि अहिंसेचा गैरअर्थ लावला, प्रत्यक्षात ते शोषणाचे नेते बनले. तुम्हाला माहित आहे का जैन धर्म भाजी कापणे, शिजविणे इत्यादीला हिंसा मानतोच, पण संभोगाला ही हिंसाच मानतो. त्यामुळे 'ब्रह्मचर्य' नावाची गोची त्यांनी प्रसारित केली. आता, विरोधाभास असा की हे तत्त्वज्ञान जगाला सांगण्यासाठी नवी माणसे हवीत, आपलीच हवीत, जैन हवीत तर 'संभोग' ही हिंसा करावी लागते ! ती त्यांनी केली. पण कशी ? बासुंदी खायची पण त्यात उंदीर पडल्यासारखा चेहरा करून !! आता, पहिल्या जैनाने हि "उन्दिरयुक्त बासुंदी' खाल्लीच नसती, तर त्याच्याबरोबरच जैन संप्रदायाची पर्मनंट हिंसा झाली असती. तसे झाले नाही. कारण .... शोधू आपण....
निसर्गातील उर्जेचे रुपांतर ही सुद्धा हिंसा नाही, ते तुम्ही अधोरेखित करता तसे केवळ "रुपांतर" आहे. "उर्जा अक्षय्यता" हा निसर्गनियम आहे.
आता, ज्ञानाला उर्जा समजणे हे रूपक आहे. तेच जी एं नी वापरले आहे. ज्ञानाला अक्षय्यतेचा नियम लागू करणे, हा 'तर्कदोष' आहे. पण पुन्हा हीच महाभयावह चूक आम्ही ,म्हणजे वैदिक परंपरेने करून एक चिरस्थायी शोषण व्यवस्था आणली. पूर्वमीमांसा या संप्रदायाने ज्ञान अपौरुषेय मानले, त्यावर मूठभरांची मिरास आणली, वेद्वाक्ये सत्य व युक्त समजून ज्ञानवंचित समाज निर्माण केला ! ज्ञानाला आत्म्याप्रमाणे अमर मानून वर्ण-जाती-लिंगभेद आणले गेले आणि एक पांगळा समाज तयार झाला.
आता, आपण हे लक्षात घेऊ की ज्ञान ही कृत्रिम घटना आहे, तिचा प्रसार ही जाणीवपूर्वक करावयची कृती आहे.
हे पाहा , ज्ञानाला असे आदर्श स्वरूप देता येत नाही. ते दिले गेले की तुम्ही म्हणता तसे वाटू लागते. ज्ञानाची जाणीव अशांतता कशी निर्माण करेल ?
आपले प्राधान्य कशाला ? हा प्राचीन प्रश्न आहे : दुःखी सॉक्रेटीस की सुखी डुक्कर !
कुंती कृष्णाकडे , तुकोबा विठोबाला दु:खाची मागणी करतात.
कोणत्या सुखी डुकराची स्मारके, पुरस्कार आपल्यात आहेत? (सध्या ही लाटही आलीय बरे का !! नावे माणसांची असतात, एवढाच फरक.)
मुक्ता साळवे, फुले, आंबेडकर, आगरकर, स्मृतिचित्रे लिहिणाऱ्या लक्ष्मीबाई यांना अज्ञानामुळे सुख मिळाले की दु:ख ?
अनेक प्रश्न आहेत, सोडविता येतील तितके सोडवू.
मालिका जशी पुढे सरकेल, तसा काही खुलासा होत राहील, पण नवे प्रश्न येतील, त्यांचे स्वागत करू.
तुमच्यामुळे नवे चिंतन झाले, हा काय कमी फायदा झाला ?
निरंजनदास
7 Jul 2015 - 1:21 pm | ज्ञानोबाचे पैजार
सविस्तर उत्तरासाठी धन्यवाद,
उत्तरावर विचार करतो आहे.
ज्या शंकांची उत्तरे मिळाली नाहीत ती मिळवण्यासाठी मालिका वाचत राहीन,
पैजारबुवा,
7 Jul 2015 - 7:20 pm | अर्धवटराव
नैसर्गीक घटनांचा अन्वयार्थ लावणं, त्याला निर्मीती वा विनाशाची लेबलं लावणं हा जर आत्मभानाचा अविश्कार असेल तर तो माणसात निसर्गाकडुनच आलाय. मानवाला 'निर्मीती' ठाऊक आहे पण निसर्गाला नाहि असं होणार नाहि. जे घडतय ते केवळ ट्रान्फोर्मेशन असेल (आणि ते तसं आहेच) तर मानवी भानाला जाणवणारी निर्मीती/विनाश वगैरे देखील केवळ क्रिया आहेत. आणि जर मानवी भान सत्य असेल तर ते निसर्गात देखील ओतप्रेत भरलं आहे. निसर्गातल्या क्रिया विनाउद्देश असु शकतात पण भानरहित नाहि.
7 Jul 2015 - 9:31 pm | निरन्जनदास
निसर्गाला भान असते तर त्याने पृथ्वीवर रेडिमेड माणूस पाठविला असता,
आणि
असा
पण निसर्ग असा दावा करीत नाही, कारण त्याला भान नाही.
अखिल ब्रह्मांडात पृथ्वीवर जीवनमान आहे, म्हणून तिला सजीव मानणे आणि तिचा आदर करणे, आई मानणे ही कृतज्ञता आहे. पण म्हणून निसर्ग सजीव मानणे हा तर्कदोष असतो.
7 Jul 2015 - 10:48 pm | अर्धवटराव
असं का वाट्तं तुम्हाला? आणि निसर्गात भान नसतं तर त्याच निसर्गाची निर्मीती म्हणजे जो मानव त्यात भान निसर्गबाह्य पद्धतीने आलं (किंवा डेव्हलप झालं) असं म्हणायचं आहे का? असं असेल तर तुमची निसर्गाबद्द्लची संकल्पना फार मर्यादीत आहे. निसर्ग आणि मनुष्य हेच जिथे वेगवेगळे नाहित तिथे मनुष्यामधलं भान तरी निसर्गबाह्य कसं असेल?
धर्मसंस्थेबद्दल सध्या न बोललेलं बरं. तो फार वेगळा विषय होईल.
अखिल ब्रह्मांडात केवळ पृथ्वीवर जीवनमान आहे असं मानणं हा तर्कदोष आहे. शिवाय तुम्ही ज्याला जीवनमान म्हणताहात ते एका विशिष्ट शरीरशास्त्र दृष्टीने एकवेळ ठीक आहे. शिवाय याच शरीराचं घडण ज्या निसर्गात, आणि निसर्गनियमांनी होतं, त्या निसर्गाकडेच मनुष्यशरीरात वावरणार्या (किंवा जाणवणार्या) सजीववत्वाचं प्रेरकत्व जातं. निसर्ग सजीव असल्याशिवाय मनुष्य सजीव असुच शकत नाहि.
8 Jul 2015 - 9:33 am | निरन्जनदास
फारच छान ! आवडलं.
तुमच्या प्रतिसादाबद्दल मी अतिशय आभारी आहे.
तुम्ही चालना देणारे म्हणणे मांडले आहे. आता, आपण तुमच्या मांडणीनुसार अनुक्रमे जावू.
१.
, म्हणजे नेमके काय आहे ? हे मला कळले नाही. म्हणजे निर्मितीची कोणती प्रक्रिया, कोणत्या क्रमाने, किती काळ, कुठे, कोणत्या नियमांनी आणि का घडली ?
२.
, हे तुम्ही अचूक हेरलेत; हे मलाच माहित नव्हते. ते तुम्हाला कळाले. कृपया मला माझी निसर्गाची संकल्पना समजावून द्यावी.
३. निसर्ग आणि मनुष्य हेच जिथे वेगवेगळे नाहित तिथे मनुष्यामधलं भान तरी निसर्गबाह्य कसं असेल? हा प्रश्न खरच महत्वाचा आहे. पण
म्हणजे नेमके काय ते मला समजले नाही. कृपया समजावून द्यावी.
४. "धर्मसंस्थेबद्दल सध्या न बोललेलं बरं. तो फार वेगळा विषय होईल." हे तुमचे म्हणणे मान्य आहे. याबद्दल आपण निवांतपणे बोलू.
५."अखिल ब्रह्मांडात केवळ पृथ्वीवर जीवनमान आहे असं मानणं हा तर्कदोष आहे." हे ही माझ्या आकलनशक्ती पलीकडील विधान आहे. कृपया समजावून द्यावे.
६. निसर्ग सजीव असतो, या विधानाचा अर्थही माझ्या आकलनशक्ती पलीकडील आहे. कृपया समजावून द्यावे.
8 Jul 2015 - 4:42 pm | अर्धवटराव
१)
ड्जण्ट मॅटर. त्याकरता अनेक थेअरी वैज्ञानीक तपासताहेत. मूळ प्रश्न इतकाच कि मानवाला 'निर्मीती' शक्य आहे काय आणि असल्यास ति येते कुठुन. कारण ति क्षमता मानवाने निर्माण केलेली नाहि.
२)
निसर्ग म्हणजे मानव विरहीत एक कॉम्प्लेक्स क्रियांचं जंजाळ असं काहिसं वाटलं तुमच्या प्रतीसादातात.
३)
अमुक एका ठिकाणि मनुष्य संपतो आणि निसर्ग सुरु होतो (किंवा त्या उलट) असं ठिकाण शोधा.
४)
धन्यवाद
५)
अखील ब्रह्मांडात केवळ पृथ्वीवर जीवन आहे असं मानणं म्हणजे आपण संपूर्ण पालथं घातलं असं म्हणावं लागेल.
६)
मानव, वा इतर कुठलाहि प्राणि सजीव आहे + तो नैसर्गीक प्रक्रियेतुन घडला आहे.
9 Jul 2015 - 4:25 pm | निरन्जनदास
तुमच्या कोणत्याही प्रतिपादनात स्पष्टता नाही. मी विचारलेल्या शंका तुम्ही दूर करीत नाही. मी हतबल आहे.
शिवाय पुन्हा एक नवा दावा तुम्ही केला आहे :
पृथ्वी सोडून कोणत्या ग्रहावर जीवन आहे, ते तुम्ही पुराव्यासह दाखवित नाही आहात. तुमच्या ज्ञान आम्हाला द्या.
9 Jul 2015 - 6:05 pm | अर्धवटराव
अशा आमच्या आठवणींच्या खपल्या काढु नका हो. जीवाला फार त्रास होतो :)
तर्कदोषाचं उदाहरण म्हणुन ते दिलय.
नको. तुमचं ब्रॉडकास्टींग उत्तम चाललय कि.
7 Jul 2015 - 11:29 pm | राही
इतके सुंदर विवेचन!
" निसर्ग विध्वंस करीत नाही. पृथ्वीवर कुणीच नव्हते (किंवा आजही मंगळ, गुरु, प्लुटो या ग्रहांवर कुणी नाही), तेंव्हा काहीही घडले तरी कुणाचेच काही नुकसान घडले नाही. पण माणसाचा निसर्गाशी संपर्क आला आणि निसर्गावर हेतूचे आरोपण सुरु झाले. निसर्ग जणू मानवी (अन्थरोपिक) झाला. बीज फुटणे, त्याचा रोप, वृक्ष होणे ही नैसर्गिक क्रिया आहे, ती हिंसा नाही. त्यात कर्त्याला म्हणजे निसर्गाला "आत्मभान" नाही. त्यामुळे त्याला तो काय करीत आहे, हे कळत नाही.
निसर्गाला हेतू नाही, त्याला आत्मभान नाही... नेमकी वाक्ये. फक्त एक शंका आहे, ती पुन्हा कधीतरी.
आत्मभान हा माझा आवडता विषय आणि परवलीचा शब्द आहे.
उत्सुकतेने वाचून पुनःप्रत्ययाचा आनंद घेत आहे.
8 Jul 2015 - 9:39 am | निरन्जनदास
धन्यवाद राही,
पण तुमची शंका जरूर विचारा.
इथे विचारु नये असे वाट्त असेल तर माझा सं-पत्ता shriniwas.sh@gmail.com असा आहे.
7 Jul 2015 - 2:43 pm | निरन्जनदास
पैजारबुवा,
धन्यवाद कसले डोंबलाचे ! उलट मीच तुमचा थॅन्क्यू आहे.
पण विचारात आणि विचारत राहावे , ही विनंती.
8 Jul 2015 - 1:49 pm | मितभाषी
और आन्दो. वाच्।तोय.
सन्क्शिप्त वाटले. मोठे भाग टाका.
8 Jul 2015 - 4:15 pm | निरन्जनदास
हं,
आपण नावच मितभाषी घ्यायचं आणि लोकांना "और आन्दो" म्हणायचं !
मजा करताय राव तुम्ही!!
8 Jul 2015 - 4:27 pm | मदनबाण
रचना आपण करतो. "आत्मभान" आपल्याला असते.
हे देहभान असे हवे ? "आत्मभान" हे आत्म्याशी आणि त्या अनुशंगाने परमेश्वराशी असते.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Zara Zara... :- R H T D M
8 Jul 2015 - 4:56 pm | निरन्जनदास
नाही, देहभान नाही.
आत्म याचा अर्थ 'असण्याची जाणीव. याचा आत्म्याशी संबंध नाही. परमेश्वराशी तर नाहीच नाही.
तुम्ही आधीचे लेख वाचले आहेत काय ? कृपया वाचा.
9 Jul 2015 - 1:58 pm | मदनबाण
आत्म याचा अर्थ 'असण्याची जाणीव. याचा आत्म्याशी संबंध नाही.
असण्याची जाणीव हे चेतना (consciousness) असल्यामुळे संभव होते ना ? आत्म्या शरीरात असल्यानेच चेतनेचे अस्तिव असते आणि म्हणुनच मनुष्या देहातुन प्राण निघुन गेल्यावरच शरीर संपूर्णपणे अचेतन होते. त्यामुळे असण्याची जाणीव होण्याचा आणि आत्म्याचा संबंध आहे.
तुम्ही आधीचे लेख वाचले आहेत काय ?
हो...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kisi Disco Mein Jayen...
9 Jul 2015 - 4:29 pm | निरन्जनदास
तुम्ही आत्मा आहेच, असे गृहीत धरत आहात. ते गृहीत न धरता चेतनेचे स्पष्टीकरण देता येते का ? हा प्रश्न आहे.
पुढील काही लेखात तुमच्या शंकाची उत्तरे मिळू शकतील. थोडी वाट पहावी, ही विनंती.
8 Jul 2015 - 5:07 pm | बॅटमॅन
मानवेतरांना आत्मभान नाही हे तरी पूर्णतः सिद्ध कुठं झालंय? यावर कन्क्लूझिव्ह संशोधन माझ्या माहितीप्रमाणे अजून झालेलं नाही.
9 Jul 2015 - 4:33 pm | निरन्जनदास
यातला साधा प्रश्न असा आहे की मानवेतरांना आत्मभान आहे की नाही, हे तुम्ही मानव बोलत आहात, मानवेतर नाही. तुमच्या आत्मभानाबद्दल मानवेतर बोलत आहेत का ? नाही !
आत्मभान = ज्ञानात्मक जाणीव हे विसरलो की गडबड होते.
9 Jul 2015 - 4:43 pm | बॅटमॅन
हाउ डू यू नो की ते बोलत नाहीत?
मानवेतर सजीवांचे आपसातले जे काही संभाषण/संपर्क साधण्याची पद्धत असते ते मानवाला पूर्णपणे समजले आहे का? जर नसेल तर निव्वळ मानवाला कळत नाही म्हणून काही नाही असे म्हणण्यापैकीच आहे. हा तर मानवकेंद्रित दृष्टिकोन झाला!
9 Jul 2015 - 5:03 pm | संदीप डांगे
निव्वळ मानवाला कळत नाही म्हणून काही नाही
तथाकथित बुद्धीवाद्यांचा असाच दावा असतो.
9 Jul 2015 - 5:06 pm | संदीप डांगे
आत्मभान = ज्ञानात्मक जाणीव
मानवेतर प्राण्यांना एखाद्या कृतीत धोका आहे हे कळलं तर ते परत तीच चूक करतांना दिसत नाहीत. ही ज्ञानात्मक जाणीव नाही का? मानव अशा चुका वारंवार करतांना दिसतो.
9 Jul 2015 - 4:43 pm | संदीप डांगे
सहमत.
फक्त मनुष्याला आत्मभान आहे याच्या पुष्ट्यर्थ लेखकांनी दिलेले स्पष्टीकरण पुरेसे नाही. कदाचित मनुष्य ज्या उलाढाली आज करतोय ते पाहून इतर प्राणी मनातल्या मनात हसतही असतील आणि म्हणत असतील की "बाबारे, हे सगळे उद्योग करून झालेत आमचे. शेवटी चार मूळ भावनांपलिकडे काहीच नाही हे आम्हाला कळलंय. म्हणून शांतपणे जगत असतो. सगळे निसर्गनियम व्यवस्थित पाळून. तूच अशांत आहेस कारण तू जस्ट अभीच आया है ज्युनिअर..."
आता म्हणा ह्याला काही पुरावा आहे काय? तर असं नाहीये ह्यालाही काही पुरावा नाहीये. मानव स्वतःला सर्वश्रेष्ठ मानत आलाय ते मला कायमच डोक्यात गेलेलं आहे. अरे चार मूळ भावना नियंत्रित करू शकत नाही तो कसा काय सर्वश्रेष्ठ?
9 Jul 2015 - 8:09 pm | गामा पैलवान
निरन्जनदास,
आपला लेख व संदेश वाचले. काही विधानांवर चर्चा करेन म्हणतो.
१.
>> पूर्वमीमांसा या संप्रदायाने ज्ञान अपौरुषेय मानले, त्यावर मूठभरांची मिरास आणली, वेद्वाक्ये सत्य व युक्त
>> समजून ज्ञानवंचित समाज निर्माण केला !
पटलं नाही. हा दावा खरा असेल तर भक्तीमार्गी संत सगळ्या सर्वदेशी, सर्वकाळी, सर्वलिंगी, सर्वजात, सर्ववयीन कसे आढळून येतात? ते एका मूठभरांच्या गटात दाखल व्हायला हवेत ना? भक्तिमार्ग वेदविरोधी नाही.
२.
>> लोकशाही हा आजचा धर्म, 'युगधर्म' आहे. संविधान हीच माझी 'धर्माज्ञा' असते. लोकशाही हा अत्याधुनिक,
>> व्यापक, मानवतावादी धर्म आहे. हा धर्म प्रत्येक माणसासह सर्व सजीवांच्या जगण्याचा मूलभूत हक्क बजावण्याची
>> संधी देतो. संविधान ही 'धर्माज्ञा' ताठर, कठोर नाही, ती बदलता येते, दुरुस्त करता येते. नवा नीतीनियम करता
>> येतो. कालबाह्य गोष्टी वगळून ही 'धर्माज्ञा' कालसुसंगत करता येते.
असहमत. भारतीय राज्यघटनेत सामान्य नागरिकांना मार्गदर्शन करणारे काहीही नाही. अपवाद करायचाच झाला तर फक्त ५१ व्या कलमाचा किंचित प्रमाणावर करता येईल. त्यात नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांकडे ढोबळमानाने निर्देश आहे.
भारतीय जनमानसास अधिकारांपेक्षा कर्तव्यपूर्ती अधिक महत्वाची वाटते. त्यामुळे उपरोक्त विधान भारताच्या संदर्भात निरर्थक आहे.
३.
>> निसर्ग रचना करीत नाहीत, निसर्गात केवळ घटना घडतात. त्यांचा आपण अर्थ लावीत असतो.
हे फार धाडसी विधान आहे. सूर्य पृथ्वीपासून १०८ सौरव्यास दूर आहे, तर चंद्र पृथ्वीपासून १०८ चांद्रव्यास दूर आहे. त्यामुळे खग्रास सूर्य्ग्रहानाच्या वेळेस चंद्रबिंब सूर्यबिंबास अचूकपणे झाकतं. आता हे इतकं प्रमाण आपोआप उत्पन्न झालं का?
पृथ्वीवरील वातावरणात प्राणवायूचं प्रमाण २०% आहे. ते जरासं वाढून २२% झालं तर वनस्पती उत्स्फूर्तपणे पेट घेतील. हे प्रमाण निसर्गत: आढळून येतं. हेही आपोआप झालं का?
या घटनांचा अर्थ काय लावायचा? निसर्ग रचना करतो आहे की नाहीये? ईश्वराने सृष्टी (=निसर्ग) उत्पन्न केली असा लावावा का?
आ.न.,
-गा.पै.
11 Jul 2015 - 6:16 pm | गामा पैलवान
निरन्जनदास,
>> त्यात कर्त्याला म्हणजे निसर्गाला "आत्मभान" नाही. त्यामुळे त्याला तो काय करीत आहे, हे कळत नाही.
एक शंका आहे. मी जे खातो तो आहार माझं शरीर माझी परवानगी न घेता पचवून टाकतं. अन्नपचन ही एक नैसर्गिक क्रिया आहे, बरोबर? ती जिथे होत असते त्या शरीर नामे पिशवीला त्या क्रियेचं भान नाहीये. म्हणजेच मला आत्मभान असलं तरी माझ्या शरीराला मात्र आत्मभान नाही.
तर मग मी माझ्या शरीराहून वेगळा मानावा का? तुमची मते ऐकायला आवडतील.
आ.न.,
-गा.पै.
13 Jul 2015 - 4:24 pm | निरन्जनदास
बॅटमॅन आणि संदीप मित्रहो,
तुमच्या चर्चेतून सिद्ध होणारी एकच गोष्ट आहे की तुम्ही भूतदयावादी आहात ? तुम्हाला प्राण्यांची काळजी आहे.
प्राण्यांच्या वतीने तुम्ही बुद्धिमान मनुष्यप्राणी बोलत आहात. तुमचे दावे 'बोलाची कधी बोलाचाच भात' असे होत आहे.
तुमच्याशी स्वतःच्या भावना बोलणारा प्राणी भेटला तर मी त्यास भेटण्यास उत्सुक आहे.
तथाकथित, अकथित, कथित, थकीत इत्यादी बुद्धिवाद्याचे सारे प्रकार केवळ माणसाचेच असतात, प्राण्यांचे नाही.
अन्न, पाणी आणि लिंगभाव या खेरीज प्राण्यांना जास्त काही नसते.
आता, प्राण्यांनाच थेट माझ्याशी बोलू द्या .
मग आपण बोलू.
13 Jul 2015 - 4:52 pm | संदीप डांगे
अन्न, पाणी आणि लिंगभाव या खेरीज प्राण्यांना जास्त काही नसते.
मानवाप्राण्याचा सर्वात मोठा भ्रम तो हाच. आहारनिद्राभयमैथूनच्या पलिकडेही अनेक प्राणी अनेक भावना दाखवतात. माणसांपेक्षा प्राण्यांचे भवतालच्या निसर्गाबद्दलचे ज्ञान कैक पटीने जास्त असते. (भूकंप व सुनामी यापुर्वीचे प्राण्यांचे व्यवहार, योग्य मार्ग शोधत आपल्या मूळ ठिकाणी परतणे, इत्यादी.) प्रत्येक पक्षी-प्राण्याची स्वत:ची एक भाषा असते हे तरी तुम्ही मान्य कराल की नाही? त्यांची भाषा आपल्याला कळत नाही म्हणून त्यांना कसलेच ज्ञान नाही असे म्हणणे ही आत्मप्रौढी झाली. एखादा आदीवासी भले आपल्यासारखी चार बुकं शिकला नसेल पण त्याच्याकडे आपल्यापेक्षा वेगळे ज्ञान खचितच असेल आणि ते आपल्या चार बुकांपेक्षा जास्त मौल्यवान असेल. आपण ज्याप्रकारे व्यवहार करतो तसे व्यवहार न करणार्यांना गावंढळ व आडाणी समजणे हे स्वतःला आधुनिक समजणार्या माणसाच्या अहंकाराचे प्रथम लक्षण आहे. ज्या पद्धतीने पाश्चात्त्य देशातील पांढर्या लोकांना आफ्रीकी वंशाचे लोक हे आपल्याच मनुष्यवंशाचे वाटतच नव्हते, त्याप्रमाणेच इतर श्वापद ही चार भावनांपलिकडे काहीच राखत नाहीत असे मानणे आहे.
प्राण्यांनी तुमच्याशी बोलले तरच तुम्हाला त्यांचे काय ज्ञान आहे/नाही हे समजेल असं तुमचं म्हणणं विचित्र आहे असे नम्रपणे नमूद करतो.
13 Jul 2015 - 5:10 pm | ज्ञानोबाचे पैजार
डांगे सरांचे म्हणणे बरोबर वाटते.
विशेषत: प्राणी ज्या शांतपणे मृत्यू ला सामोरे जातात ती शक्ती मिळवण्या साठी मनुष्याला अपार कष्ट करावे लागतात.
अजूनहि बरीच उदाहरणे देता येतील
मनुष्य हा प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आहे हा दावा मान्य करता येणार नाही.
पैजाराबुवा,
13 Jul 2015 - 5:25 pm | संदीप डांगे
धन्यवाद पैजारबुवा,
मनुष्याने स्वतःच स्वतःला श्रेष्ठ ठरवून, निसर्गापासून वेगळा ठरवून निसर्गातून आपसूक मिळणार्या मौल्यवान ज्ञानाला दरवाजे बंद केलेत असं कधी कधी वाटतं. माणसाने आजवर जी काही प्रगती, विकास केलाय तो निसर्गाचेच निरिक्षण करून/त्याची कॉपी मारून केलाय. इतर प्राण्यांना तसे करण्याची काही आवश्यकता वाटली नसावी कारण उपजतच त्यांना मनुष्यापेक्षा जास्त क्षमता निसर्गाने बहाल केल्या आहेत. त्यांचे जगणे मनुष्यप्राण्यापेक्षा नक्कीच मजेदार आहे असे वाटते.
13 Jul 2015 - 5:11 pm | मराठी_माणूस
खालिल वाक्ये आजच्या लोकसत्ता मधील ह्या लेखातील आहेत http://www.loksatta.com/sampadkiya-news/humans-forefathers-1122407/.
13 Jul 2015 - 8:55 pm | निरन्जनदास
माफ करा, पुन्हा तीच चूक घडते आहे.
प्राण्यांना भावना आहेत आणि त्यांना भाषा आहे, म्हणून त्यांना संस्कृती निर्माण करता येते, असे नाही.
माणसाने संस्कृती निर्माण केली, धर्म, तंत्रज्ञान तत्त्वज्ञान आणि कितीएक विज्ञाने निर्माण केली.
साधी गोष्ट सौंदर्यशास्त्र हा भावनांचा आविष्कार आहे आणि भाषाशास्त्र, अर्थनिर्धारणशास्त्र इत्यादी भाषेचे. प्राणी हे करू शकत नाहीत.
'प्रत्येक पक्षी-प्राण्याची स्वत:ची एक भाषा असते' हे विधान वैज्ञानिकदृष्ट्या अवैध आहे. तुम्ही 'प्राण्यांना संवादाची एक त्यांच्यापुरती पद्धती असते' असे म्हणू शकता फार तर.
आता, तुम्ही जर असे म्हणाल की त्यांच्यातही ते असतेच, तर बोलणेच खुंटले !!
दुसरे, तुम्ही आदिवासी मध्येच कुठून आणले ?
ती माणसे आहेत, त्यांच्यात बुद्धिमत्ता आहे. ते विविध प्रकारे व्यक्त करतात, त्यांना कमी लेखणे चूकच आहे.
हे, पहा, आपण काय पाहत आहोत; तर एकूण प्राणी जगतात माणूस हा प्राणी वेगळा कसा, का आहे ते ! (त्यात जगातले सगळे आदिवासी येतात ) माणसचे वैशिष्ट्य : बुद्धी, आत्मभान आणि करुणा. हे प्राण्यात नसते, हे कृपया लक्षात घ्या. ते अविकसित आहेत. आजचा सर्वात प्रगत प्राणी केवळ मनुष्य.
आता, मराठी माणसाने काय लक्षात घ्यावे ;
तर ते हे की पशु-पक्ष्यांना माणसापेक्षा जास्त तीव्र इंद्रिय असेलही. पण माणूस इंद्रियांच्या दृष्टीने पाहता अतिशय मर्यादित आहे. म्हणूनच त्याने इंद्रियांचा विस्तार केला. जसे कि हातोडा हा हाताचा विस्तार आहे, दुर्बीण हा डोळ्याचा , फोन-मोबाईल हा कानाचा इत्यादी. असा विस्तार प्राणी करू शकले का ? विज्ञान-तंत्रज्ञान (इंटरनेट मानवी आहे. प्राणिज नाही. ) हा मानवी ज्ञानाचा, त्याच्या अनंत मर्यादांचा विस्तार आहे. माणूस आपल्या मर्यादांवर मात करण्याचा प्रयत्न करतो.
'मधमाशांशी कामापुरता संवाद साधू शकते' पण कामापुराताच, माणूस बिनकामाचे किती फालतू संवाद करतो ! किती रद्दी निर्माण करतो?
शेवटचा मुद्दा प्राणी माझ्याशी बोलले तर त्यांना माझ्या भाषेतच बोलावे लागेल. मी त्यांच्या भाषेत कसा बोलणार?
विनोद म्हणून ची ची चू चू ठीक आहे. अर्थात तो विनोदही आपणच करतो.
प्राण्याची भाषा ही म्हणजे प्राण्यांची संवादाची रीत त्यांची त्यांच्यापुरती खासगी असते. आणि भाषा खासगी नसते. कोणतीही भाषा जर ती भाषा असेल तर ती सार्वजनिकच असते. म्हणूनच कोणत्याही माणसाला - मराठी माणूस - धरून कोणतीही भाषा शिकता येते. एकजण दुसऱ्याची भाषा शिकू शकतो. प्राणी माणसाची भाषा शिकत नाहीत. ते ध्वनी ओळखतात.
आता, कृपया तिन्ही लेख आपण प्रत्येकांनी एकामागे एक असे वाचावेत, सुटे वाचू नयेत. शक्य तो प्रिंट काढून समोर ठेऊन वाचावेत. ही विंनती.
आता, आपण पुढील लेखाकडे जाऊ.