Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by निरन्जनदास on Mon, 06/29/2015 - 16:22
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
सद्भावना
लेख
अनुभव
मत
वाद
तत्त्वभान १. तत्त्वभानाच्या दिशेने
भानावर येण्यापूर्वी..
- श्रीनिवास हेमाडे      
'जाणीव म्हणजे काय?' हा तात्त्विक प्रश्न आहे. त्याचे तात्त्विक उत्तर शोधताना लक्षात येते की, जाणीव म्हणजे मनुष्याची ज्ञानशास्त्रीय चेतना, आत्मभान. ही अशी जाणीव मनुष्याकडे आहे म्हणून नीतिशास्त्र निर्माण होऊ शकते, 'योग म्हणजे चित्तवृत्तीनिरोधन'याचा अर्थ माणसांना कळू शकतो, धर्म- धर्माज्ञा आणि राज्यघटनाही निर्माण होऊ शकते..
'भान' म्हणजे सावधपण किंवा जाणीव होणे. आकलन, समजणे, शुद्ध येणे हे काही इतर समानार्थी शब्द. भान हा फारसा प्रचलित शब्द नाही. जाणीव हा मात्र अधिक वापरात असलेला शब्द आहे. जाणीव म्हणजे समजूत, ज्ञान.

या लेखात 'जाणीव' ही संज्ञा मराठीतील अथवा कोणत्याही भाषेतील विशिष्ट शब्द म्हणून नाही तर 'एक तात्त्विक संकल्पना' या अर्थाने आणली आहे. 'जाणीव म्हणजे काय?' हा तात्त्विक प्रश्न आहे. तिचे उत्तर मानसशास्त्र, मज्जातंतूशास्त्र इत्यादी विज्ञानशाखांकडून दिले जाते. धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्र तर हा स्वत:चा क्षेत्रसिद्ध अधिकार समजते. उदाहरणार्थ, जाणीव-राणीव-नेणीव किंवा बोध-अबोध मन, इत्यादी. पण तो अर्थ इथे अपेक्षित नाही. प्रश्न तात्त्विक असल्याने उत्तर तात्त्विक शोधण्याचा हा प्रयत्न आहे.

या विश्वाविषयी माणसाला अपार कुतूहल आहे. विश्वाचे निरीक्षण करताना माणसाला दोन गोष्टी ठळकपणे जाणवतात. काही गोष्टी निर्जीव आहेत, तर काही सजीव आहेत. जिवंत असणे ही सजीवता आणि जिवंत नसणे ही निर्जीवता.

माणूस, प्राणी हे सजीव तर दगड, धोंडा निर्जीव. सजीवता ही विशिष्ट घटना आहे. काही वेळा तिची मिसळण झाल्याचे वाटून निर्जीव वस्तूही सजीव असल्याचा भास होतो. रेडिओचा शोध लागला तेव्हा गाणारी बाई आत बसली आहे, यावर अनेकांचा विश्वास होता. रेल्वेचा शोध लागला त्या काळात सुरुवातीला 'हा माणसांना खाऊन टाकणारा राक्षस आहे', असे वाटून रेल्वे ओस पडली होती. वनस्पतींनाही सजीव मानले जाते, पाणी जिवंत समजले जाते. आज संगणकाला 'विचार करणारे यंत्र' हा दर्जा बहाल करण्यात आला आहे. यंत्रमानव, उपमानव या अत्याधुनिक; तर यक्ष, किन्नर या जीवयुक्त मानवाच्या प्राचीन कल्पना आहेत. वनस्पती सृष्टी, पाणी यांना सजीव मानल्यामुळे निसर्गही सजीव बनतो. एवढेच काय, पण अखिल ब्रह्मांडात पृथ्वी हाच एकमेव सजीव ग्रह मानला जातो.
या साऱ्या ठिकाणी सजीवतेचा अर्थ चेतना असणे असा समजला जातो. पण चेतना आणि जाणीव यात फरक करणे गरजेचे आहे. खुर्ची आणि खुर्चीत बसलेला माणूस यात फरक काय? खुर्ची जिवंत नाही, माणूस जिवंत आहे; माणसात चेतना आहे. चेतना ही काय गोष्ट आहे? ती देहाशिवाय स्वतंत्र असणारी की देहाशीच निगडित असणारी गोष्ट आहे? या चेतनेचे स्वरूप काय? बेशुद्ध माणूस आणि मृत माणूस यांच्यात चेतनाचे स्वरूप काय?

येथे चेतना (consciousness) आणि जाणीव (awareness) असा फरक शक्य आहे. मृतात चेतना नसते आणि बेशुद्ध माणसात चेतना असते, पण 'जाणीव' नसते. येथे मृताविषयी विचार करावयाचा नसून जिवंत माणसाविषयी विचार करावयाचा आहे. बेशुद्धावस्थेतील माणसातील चेतना ही 'जीवशास्त्रीय चेतना' आणि शुद्धीवर असलेल्या माणसातील चेतना ही 'ज्ञानशास्त्रीय चेतना' होय. या दुसऱ्या ज्ञानशास्त्रीय चेतनेलाच 'जाणीव' (awareness) म्हणता येईल.

आता, दुसऱ्या चेतनेबद्दल- ज्ञानशास्त्रीय जाणिवेबद्दल अधिक विचार करावा लागेल. बेशुद्धावस्थेत माणसाला कळत नसतेच, पण 'आपल्याला कळत आहे की नाही' हेही त्याला कळत नसते. म्हणून कळणे आणि आपल्याला कळणे, यात फरक करता येतो. या दुसऱ्या गोष्टीलाच बहुधा स्वजाणीव म्हटले जाते. अर्थात प्रत्येक वेळी 'आपल्याला कळत आहे' हे स्पष्टपणे कळलेच पाहिजे, असे नाही. काही वेळेला तरी 'आपल्याला कळत आहे' किंवा 'आपल्याला कळत नाही' हे त्याला नक्कीच कळत असते. हे दुसरे कळणे, हेच माणसाचे मुख्य सामथ्र्य आहे. ते ज्ञानाचे ज्ञान होय. स्वजाणिवेची जाणीव अशी पुढची पायरी असू शकते. .

माणसाची ही ज्ञानशास्त्रीय जाणीवच त्याला आत्मभान देते. 'मी' ज्ञान घेणारा ज्ञाता, ज्ञान निर्माण करणारा निर्माता आणि स्वत: 'मी'च ज्ञानाचा विषय असणारा विषयीही आहे, असे या आत्मभानाचे स्वरूप असते. ही ज्ञानशास्त्रीय जाणीव प्राण्यांमध्ये नसते. प्राणी आणि माणूस यांच्या आहार, निद्रा, भय, मथुन या प्रेरणा सारख्याच असतात. पण प्राण्यांना ज्ञानशास्त्रीय आत्मभान नसते.

काय कळते आहे, यात स्वत:ची जाणीव समाविष्ट असल्याने माणूस 'स्व'चा शोध घेतो. हा 'स्व' म्हणजे भाषिक पातळीवर ज्याला 'मी' म्हटले जाते ते आत्मभान असते. बुद्धिमान प्राणी ते भक्त किंवा 'मी ब्रह्म' हा आत्मभानाचा कल्पनाविस्तार असतो.

आत्मभानाची ही ज्ञानशास्त्रीय जाणीव कोणते मानवी कार्य घडवून आणते? ही जाणीव अनघड, भरड अशा निसर्गातून मानवी जगाची निर्मिती करण्याची प्रेरणा माणसाला देते. हे सामाजिक जग असते. पृथ्वी या खगोलशास्त्रीय जगावर सामाजिक जगाचे आरोपण होते. अन्न, वस्त्र, निवारा, संगीत, साहित्य, सौंदर्य, नीती, तत्त्वज्ञान, धर्म, विज्ञान, तंत्रज्ञान या मानवी निर्मिती रूपात आत्मभानाचे प्रकटीकरण घडते.

लक्षात हे घेतले पाहिजे की, रोज अन्नाची गरज असली तरी प्राणी पाकशास्त्र निर्माण करीत नाहीत, माणूस निर्माण करतो आणि माणूस पाकशास्त्र, कामशास्त्र निर्माण करतो तसा धर्मशास्त्र, धर्मग्रंथही निर्माण करतो. धर्माज्ञाही माणूसच निर्माण करतो, लिखित-अलिखित भाषा माणूसच निर्माण करतो. संयम बाळगण्याची क्षमताही 'माझी'च असते, हेही 'माझे'च भान आहे.

निर्मिती ही आत्मभानाचे आणि संयमाचे निदर्शक आहे, तसे त्या उलट संहार, विध्वंस हे बेभानाचे लक्षण आहे. खगोलीय जगाची निर्मिती आणि तिचा संहार 'मी' करीत नाही, ते 'माझ्या' पलीकडचे आहे; बेभान झालो की सामाजिक जगाचा संहारही 'मी'च करतो. तेव्हा न्याय-अन्याय, पोषण-शोषण, वर्ण-जात-जमात, छळछावण्या, युद्धे, शांतता या साऱ्या व्यवस्था मानवी ज्ञानशास्त्रीय जाणिवेचा आविष्कार आहेत.

आपल्या कृत्याची जाणीव असल्यानेच माणूस एखाद्या कृत्याकडे प्रवृत्त किंवा निवृत्त होतो. जाणिवेचा हा घटकच त्याला आत्मसंयम देतो. पतंजलींनी 'योग म्हणजे चित्तवृत्ती निरोध' असे म्हटले आहे. वनस्पतींमध्ये चित्त (चेतना) असते, प्राण्यांमध्ये चित्तवृत्ती (चेतना आणि विकार) असतात, पण नियंत्रण नसते. माणसात मात्र (चेतना आणि विकार आणि) नियंत्रण असते. ते 'निरोध' या शब्दाने व्यक्त होते. वनस्पतीबाबत निरोधाचा प्रश्न उद्भवत नाही आणि प्राण्यांना निरोधाचे भान नसते. 'निरोधनाचे' भान हे नीतीचे भान असते, ते केवळ माणसात असते. ज्या व्यक्तीत हे 'निरोध' सामथ्र्य विकसित होते, तो योगी, संन्यासी. बौद्ध विचारातही 'दु:खनिरोध' आढळतो, तो याच भानातून.

हे भान विकसित होणे आधुनिक लोकशाही धर्मासाठी अनिवार्य आहे. 'धृ' म्हणजे धारण करणे (धारयति इति धर्म:) म्हणून धर्म म्हणजे लोकधारणा करणारे तत्त्व. लोकशाही हा आजचा धर्म, 'युगधर्म' आहे. संविधान हीच माझी 'धर्माज्ञा' असते. लोकशाही हा अत्याधुनिक, व्यापक, मानवतावादी धर्म आहे. हा धर्म प्रत्येक माणसासह सर्व सजीवांच्या जगण्याचा मूलभूत हक्क बजावण्याची संधी देतो. संविधान ही 'धर्माज्ञा' ताठर, कठोर नाही, ती बदलता येते, दुरुस्त करता येते. नवा नीतीनियम करता येतो. कालबाह्य गोष्टी वगळून ही 'धर्माज्ञा' कालसुसंगत करता येते.

भानावर येण्यापूर्वी या रीतीचे आत्मभान आपण जागे करू शकलो तर आणखी काही गोष्टींचे भान विकसित करणे सहजी जमेल.

लोकसत्तेत ०७ जानेवारी २०१४ रोजी पूर्वप्रकाशित.

  • Log in or register to post comments
  • 26798 views

Book traversal links for २. भानावर येण्यापूर्वी

  • ‹ १. तत्त्वभानाच्या दिशेने
  • Up
  • तत्त्वभान ३. स्वजाणिवेचे पक्व रूप ›

प्रतिक्रिया

Submitted by उगा काहितरीच on Mon, 06/29/2015 - 16:43

Permalink

अगाबाबौ ! (भान आले कि

अगाबाबौ ! (भान आले कि सविस्तर प्रतिक्रिया देईन )
  • Log in or register to post comments

Submitted by निरन्जनदास on Mon, 06/29/2015 - 21:47

In reply to अगाबाबौ ! (भान आले कि by उगा काहितरीच

Permalink

उगा काहितरीच

चालेल ! नव्हे, पळेल !! मी वाट पाहायला तयार आहे. ती सवय आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Mon, 06/29/2015 - 19:29

Permalink

छान!

लक्षात येतंय.
आपल्या कृत्याची जाणीव असल्यानेच माणूस एखाद्या कृत्याकडे प्रवृत्त किंवा निवृत्त होतो. जाणिवेचा हा घटकच त्याला आत्मसंयम देतो. पतंजलींनी 'योग म्हणजे चित्तवृत्ती निरोध' असे म्हटले आहे. वनस्पतींमध्ये चित्त (चेतना) असते, प्राण्यांमध्ये चित्तवृत्ती (चेतना आणि विकार) असतात, पण नियंत्रण नसते. माणसात मात्र (चेतना आणि विकार आणि) नियंत्रण असते. ते 'निरोध' या शब्दाने व्यक्त होते. वनस्पतीबाबत निरोधाचा प्रश्न उद्भवत नाही आणि प्राण्यांना निरोधाचे भान नसते. 'निरोधनाचे' भान हे नीतीचे भान असते, ते केवळ माणसात असते. ज्या व्यक्तीत हे 'निरोध' सामथ्र्य विकसित होते, तो योगी, संन्यासी. बौद्ध विचारातही 'दु:खनिरोध' आढळतो, तो याच भानातून.
आवडले. जो असा निरोध करू शकत नसेल तो माणूसपणाच्या एक पायरी खाली आहे असे समजावे का? कारण हे "भान" बहुसंख्यांना नसतेच.
  • Log in or register to post comments

Submitted by निरन्जनदास on Mon, 06/29/2015 - 21:54

In reply to छान! by पैसा

Permalink

खरे आहे !

खरे आहे तुमचे म्हणणे. निरोध करू शकत नसेल तो माणूसपणाच्या एक पायरी खाली आहे असे समजायला हरकत नसावी. बहुतेकजण 'बेभान' असतात. गोची अशी आहे की "आपण बेभान आहोत'' याची जाणीव त्यांना असू शकते, पण ते ''भानावर येण्यास'' तयार नसतात. पण तसा भास देण्यात ते यशस्वी होतात, इथे त्यांची आणि आपली, म्हणजे प्रेक्षकांची गफलत होऊ शकते. म्हणून ''साव ऽ ऽऽ धान ! "
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Mon, 06/29/2015 - 22:10

In reply to खरे आहे ! by निरन्जनदास

Permalink

हम्म

काही जणांना आपण भानावर आहोत असा आत्मविश्वास असतो, पण दुरून पाहणार्‍याला काही वेगळंच दिसतं. The whole problem with the world is that fools and fanatics are always so certain of themselves, and wise people so full of doubts. रसेल आठवला. दु:खनिरोधः याबद्दल वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments

Submitted by निरन्जनदास on Mon, 06/29/2015 - 22:24

In reply to हम्म by पैसा

Permalink

अगदी बरोबर.

अगदी बरोबर. दु:खनिरोधः येईलच पुढे.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Mon, 06/29/2015 - 22:27

In reply to अगदी बरोबर. by निरन्जनदास

Permalink

धन्यवाद!

पुढील लिखाणाची वाट बघेन.
  • Log in or register to post comments

Submitted by निरन्जनदास on Mon, 06/29/2015 - 22:31

In reply to धन्यवाद! by पैसा

Permalink

धन्यवाद !

धन्यवाद आणि स्वागत !!
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर on Mon, 06/29/2015 - 21:27

Permalink

शेवटचे दोन पॅरा

'योग म्हणजे चित्तवृत्ती निरोध' आणि 'हे भान विकसित होणे आधुनिक लोकशाही धर्मासाठी अनिवार्य आहे'. हे शेवटचे दोन पॅरा आवडले.
  • Log in or register to post comments

Submitted by निरन्जनदास on Mon, 06/29/2015 - 21:55

In reply to शेवटचे दोन पॅरा by सुधीर

Permalink

धन्यवाद सुधीर !

धन्यवाद सुधीर !
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Tue, 06/30/2015 - 00:11

Permalink

@ माणसाची ही ज्ञानशास्त्रीय

@ माणसाची ही ज्ञानशास्त्रीय जाणीवच त्याला आत्मभान देते. 'मी' ज्ञान घेणारा ज्ञाता, ज्ञान निर्माण करणारा निर्माता आणि स्वत: 'मी'च ज्ञानाचा विषय असणारा विषयीही आहे, असे या आत्मभानाचे स्वरूप असते. >> अप्रतिम! वाचनखूण साठवलि गेली आहे. :)
  • Log in or register to post comments

Submitted by निरन्जनदास on Wed, 07/01/2015 - 17:05

In reply to @ माणसाची ही ज्ञानशास्त्रीय by अत्रुप्त आत्मा

Permalink

समाधान

धन्यवाद अतृप्त ! तुम्हाला किमान तृप्ती देता आली, याचे समाधान वाटते
  • Log in or register to post comments

Submitted by स्वीत स्वाति on Tue, 06/30/2015 - 08:59

Permalink

अजून सविस्तर वाचायला आवडेल .

निर्मिती आणि संहारचा पॅरा आवडला. पु भा शु.
  • Log in or register to post comments

Submitted by निरन्जनदास on Wed, 07/01/2015 - 17:06

In reply to अजून सविस्तर वाचायला आवडेल . by स्वीत स्वाति

Permalink

धन्यवाद

धन्यवाद ! खरे तर हा शब्द अपुरा आहे, पण कामचलाऊ मानू.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Tue, 06/30/2015 - 09:30

Permalink

सध्या तरी लेख चाळत आहे....

सध्या तरी बर्‍याच गोष्टी किचकट आणि समजण्याच्या पलीकडे आहेत. (दोष तुमचा नाही, आमच्या स्वल्प मतीचा आहे.) पुढे कधी तरी निवांत वेळ मिळाला, तर परत एकदा व्यवस्थित, तन-मन एकत्र करून आणि मनन-चिंतनासाठी वेळ मिळाला तर, वाचायचा विचार आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Tue, 06/30/2015 - 09:42

In reply to सध्या तरी लेख चाळत आहे.... by मुक्त विहारि

Permalink

तुम्हाला समजल्यावर आम्हा

तुम्हाला समजल्यावर आम्हा पामरांसाठी निरुपण कट्टा ठेवा :)
  • Log in or register to post comments

Submitted by निरन्जनदास on Wed, 07/01/2015 - 17:16

In reply to तुम्हाला समजल्यावर आम्हा by टवाळ कार्टा

Permalink

आनंदाने

आनंदाने ठेऊ !
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Tue, 06/30/2015 - 10:11

In reply to सध्या तरी लेख चाळत आहे.... by मुक्त विहारि

Permalink

सध्या तरी बर्‍याच गोष्टी

सध्या तरी बर्‍याच गोष्टी किचकट आणि समजण्याच्या पलीकडे आहेत. (दोष तुमचा नाही, आमच्या स्वल्प मतीचा आहे.) हेच म्हणतो. मुळात माझे मन तत्वज्ञान सारख्या गंभीर विषयात रमत नाही. वाचले पण फारसे समजले नाही. (स्वगत-- बाप रे लोक इतका गूढ आणि खोल विचार करतात) आमची पट्टी काळी दोन. पांढरी पाच कशी झेपणार? त्यामुळे सध्या पास.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Tue, 06/30/2015 - 10:18

In reply to सध्या तरी बर्‍याच गोष्टी by सुबोध खरे

Permalink

ओके!

डॉक. आता या लेखाबद्दल मनातला तत्त्वज्ञान हा शब्द काढून टाका आणि एका वेळी एकेक पॅरेग्राफ वाचून बघा ही विनंती!
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Tue, 06/30/2015 - 10:41

In reply to ओके! by पैसा

Permalink

पैसा ताई

पैसा ताई हे असेच काहीतरी मोठ्या प्रमाणात मनोविकार शास्त्रात होतं. म्हणून आमचे ब्रिगेडियर पेठे सर(मनोविकारशास्त्राचे प्राध्यापक ज्यांच्या हाताखाली मी काही महिने काम केले) मला म्हणाले तू मनोविकार शास्त्रापेक्षा( PSYCHIATRY) क्षकिरण शास्त्र( RADIOLOGY) हा विषय घे ( SUBJECTIVE पेक्षा OBJECTIVE) घे. ते तुला जास्त चांगले जमेल. मी त्यांचा शतशः ऋणी आहे. मला तत्त्वज्ञानाबद्दल आदर आहे पण ते मला झेपत नाही. तुझे आहे तुजपाशी मधील "डिके" सारखी माझी गत आहे. आपला शरद तळवलकर ( काना मात्रा नसलेला सरळ माणूस)
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Tue, 06/30/2015 - 10:48

In reply to पैसा ताई by सुबोध खरे

Permalink

:)

:) तुम्हाला आणि निरन्जनदासांनाही एक शंका विचारते. मी साधे म्हणून वाचले आणि मला या लेखातले बरेच भाग कळले. जे कळले नाहीत त्यासाठी मी निरन्जनदासांना हळूहळू विचारीनच. पण माझ्या माहितीत एकाने अगदी लहान कॉलेज आणि नोकरीच्या वयात तत्त्वज्ञानाचे खूप ग्रंथ वाचले, अगदी विवेकानंद सुद्धा. आणि मग तो अन्य काही कारणाने माईल्ड डिप्रेशनमधे गेला. सायकिअ‍ॅट्रिस्टकडे गेला तेव्हा त्यानी त्याला हे सगळे वाचन आधी बंद कर म्हणून सांगितले. तत्त्वज्ञान वाचून एखाद्याचे डिप्रेशन वाढेल असे होऊ शकते का?
  • Log in or register to post comments

Submitted by निरन्जनदास on Wed, 07/01/2015 - 17:12

In reply to सध्या तरी लेख चाळत आहे.... by मुक्त विहारि

Permalink

मुक्ती

यात फार काही अवघड नाही. तुम्ही वेळ काढायला हरकत नाही. तुमचा प्रतिसाद येणे महत्त्वाचे.
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Tue, 06/30/2015 - 10:30

Permalink

??

?????????
  • Log in or register to post comments

Submitted by निरन्जनदास on Wed, 07/01/2015 - 17:12

In reply to ?? by चौकटराजा

Permalink

!!!!!!!!!!!!!!!

!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by तुडतुडी on Tue, 06/30/2015 - 12:38

Permalink

पण माझ्या माहितीत एकाने अगदी

पण माझ्या माहितीत एकाने अगदी लहान कॉलेज आणि नोकरीच्या वयात तत्त्वज्ञानाचे खूप ग्रंथ वाचले, अगदी विवेकानंद सुद्धा. आणि मग तो अन्य काही कारणाने माईल्ड डिप्रेशनमधे गेला. सायकिअ‍ॅट्रिस्टकडे गेला तेव्हा त्यानी त्याला हे सगळे वाचन आधी बंद कर म्हणून सांगितले. तत्त्वज्ञान वाचून एखाद्याचे डिप्रेशन वाढेल असे होऊ शकते का?>>> मुळात आत्मभान येणे , 'स्व' ची जाणीव होणे हे भयानक काहीतरी आहे असंच ९०% लोकांचं मत असतं . ज्याला त्याची आवड असते त्यांना इतर लौकिक गोष्टींमध्ये रस वाटत नाही . कारण त्यातला फोलपणा त्यांना समजलेला असतो . परंतु इतरांना मात्र हे डिप्रेशन किंवा औदासिन्य वाटतं . त्यांनी स्वतः विवेकानंद किवा तत्सम वाचल्याशिवाय त्याचं महत्व समजणार नसतं .
  • Log in or register to post comments

Submitted by निरन्जनदास on Wed, 07/01/2015 - 18:03

Permalink

अतिशय छान !

सुहृद मित्र सुबोध, पैसा आणि तुडतुडी, तुम्ही चर्चेचा श्रीगणेशा केला हे अतिशय छान. हे पाहा, आता एक समस्या समजावून घेत येते का ते पाहू. प्रथम हे पहिल्या लेखात मी हे अधोरेखित केले आहे की तत्त्वज्ञान ही कुणा एकाची मक्तेदारी नाही, त्यावर प्रत्येक माणसाला बोलण्याचा अधिकार आहे. तत्त्वज्ञान आणि तत्त्वभान यात मी व्यावसायिक तत्त्ववेत्ता (Professional Philosopher म्हणजे तत्त्वज्ञानाचा शिक्षक ) म्हणून ढोबळमानाने कसा फरक करतो आहे, तर तत्त्वज्ञान ही शिकण्याची तांत्रिक गोष्ट आहे तर तत्त्वभान महणजे ही तांत्रिक गोष्ट कशी शिकायची हे शिकायचे आहे. हा काही अंशी प्रशिक्षणाचा खेळ आहे. या खेळाचा मी एक प्रशिक्षक आहे, असे समजू. हा खेळ, त्याचे नियम समजावून घेऊन आपण खेळलो तर फार मजा येईल. हा नियम अर्थात प्रत्येक खेळाला लागू आहे. अगदी प्रेमाच्या खेळासह! पण नियम समजावून न घेता खेळायला जो जाईल त्याचा गोंधळ होणारच. तेच पैसा जे उदाहरण देतात त्यातील माणसाबाबत घडले असावे. शिवाय त्या म्हणतात "तो अन्य काही कारणाने माईल्ड डिप्रेशनमधे गेला." आणि सायकिअ‍ॅट्रिस्ट म्हणतो, " हे सगळे - म्हणजे तत्त्वज्ञानाचे वाचन आधी बंद कर" आता हे चमत्कारिक आहे. "तत्त्वज्ञान वाचून एखाद्याचे डिप्रेशन वाढेल असे होऊ शकते का?" याचे स्वतंत्र उत्तर "आहे/नाही" असे दोन्ही देता येईल. तुम्ही कोणत्या प्रकारचे तत्त्वज्ञान वाचता, निर्माण करता यावर तुमची मानसिकता अवलंबून राहील. काफ्का, कामु वाचाल तर निराशा वाटू शकते. मी नववीत म्हणजे १४ व्या वर्षी जी ए वाचायला सुरुवात केली. रमलखुणा वाचून नियतीवाद घुमू लागला. समजत नव्हतं. पण का समजत नाही, म्हणून पिच्छा पुरवला आणि तत्त्वज्ञानाचा खजिना गवसला. निराशा टाळली. पण म्हणून खूप आनंद झाला असे नाही. अजूनही जी ए वाचतो, आत कुठेतरी नवीन डोळा उघडतो! वि आ बुवा, ठणठणपाळ, पु. ल. वाचाल तर सगळा ताण जाईल. आपण सारेजण तत्त्वज्ञान समजावून घेऊ. मलाही तुमच्यामुळे नव्या गोष्टी कळतील की. सायकल दुरुस्त करायची तर आधी टोपली, त्यात पाणी, चिकटपट्टी, फेविकॉल, पंप इत्यादी घ्यावे लागेल; तसे तत्त्वाचे, तत्त्वज्ञानाचे भान म्हणून काहीएक जाणीव विकसित करावी लागेल, ती करू. मग तुम्ही ज्या तत्त्वज्ञानाकडे जावयाचे आहे त्याची निवड करू शकता. माझे सारे प्रतिपादन सुधारणेसाठी खुले आहे, हे वेगळे नमूद करायला नको.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 07/01/2015 - 18:09

In reply to अतिशय छान ! by निरन्जनदास

Permalink

धन्यवाद!

प्रतिसाद आवडला.
  • Log in or register to post comments

Submitted by अस्वस्थामा on गुरुवार, 07/02/2015 - 16:46

In reply to अतिशय छान ! by निरन्जनदास

Permalink

अभिनिवेशरहित लेखन आणि हा

अभिनिवेशरहित लेखन आणि हा प्रतिसाद देखील खूप आवडला..
सायकल दुरुस्त करायची तर आधी टोपली, त्यात पाणी, चिकटपट्टी, फेविकॉल, पंप इत्यादी घ्यावे लागेल; तसे तत्त्वाचे, तत्त्वज्ञानाचे भान म्हणून काहीएक जाणीव विकसित करावी लागेल, ती करू. मग तुम्ही ज्या तत्त्वज्ञानाकडे जावयाचे आहे त्याची निवड करू शकता. माझे सारे प्रतिपादन सुधारणेसाठी खुले आहे, हे वेगळे नमूद करायला नको.
आणि
प्रथम हे पहिल्या लेखात मी हे अधोरेखित केले आहे की तत्त्वज्ञान ही कुणा एकाची मक्तेदारी नाही, त्यावर प्रत्येक माणसाला बोलण्याचा अधिकार आहे.
हे मस्तच.. :) असो, आज हे वाचायला आमचे "सर" इथे हवे होते असे नमूद करतो. ;) (नेमाडे सर, तुम्हाला हे "सर" माहित नसतील तर तुम्ही या "सरांची" चिंता करु नका. चर्चेत कधीतरी ते येतीलच. )
  • Log in or register to post comments

Submitted by निरन्जनदास on गुरुवार, 07/02/2015 - 17:54

In reply to अभिनिवेशरहित लेखन आणि हा by अस्वस्थामा

Permalink

धन्यवाद अस्वस्थामा

"सायकल दुरुस्त करायची तर आधी टोपली, त्यात पाणी, चिकटपट्टी, फेविकॉल, पंप इत्यादी घ्यावे लागेल; तसे तत्त्वाचे, तत्त्वज्ञानाचे भान म्हणून काहीएक जाणीव विकसित करावी लागेल, ती करू. मग तुम्ही ज्या तत्त्वज्ञानाकडे जावयाचे आहे त्याची निवड करू शकता." या विधानात आणखी थोडी दुरुस्ती करतो. ती अशी : सायकल दुरुस्त करायची तर आधी टोपली, त्यात पाणी, चिकटपट्टी, फेविकॉल, पंप इत्यादी साधने, उपकरणे हाताशी घ्यावी लागतील, मगच प्रत्यक्ष सायकल दुरुस्ती करता येईल. ती दुरुस्त झाली की आहेच ती दामटायला तयार ! ; तसे तत्त्वाचे, तत्त्वज्ञान जाणून घ्यावयाचे तर तत्त्वज्ञानाची साधने, उपकरणे हाताशी घ्यावी लागतील, ही साधने कोणती याचे भान म्हणून काहीएक जाणीव विकसित करावी लागेल, ती करू. मग कोणतेही तत्त्वज्ञान अवघड राहणार नाही, होता होईल, तितके ते आकलनशक्तीच्या कह्यात येईल. तत्त्वज्ञानाच्या स्वरूपानुसार संथ गतीने आकलनशक्तीही विकसित होत राहील..... मग, तुमच्या समोर उभ्या ठाकलेल्या अनेक विचारविश्वातून तुम्ही ज्या तत्त्वज्ञानाकडे जावयाचे आहे त्याची निवड करू शकता. सरांना भेटायला मी उत्सुक आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Wed, 07/01/2015 - 20:04

Permalink

वा, खूप सोपे करून सांगितले

वा, खूप सोपे करून सांगितले आहे. चेतना आणि जाणीव, ज्ञान आणि भान इ. विवेचन पटले.
  • Log in or register to post comments

Submitted by निरन्जनदास on गुरुवार, 07/02/2015 - 17:55

In reply to वा, खूप सोपे करून सांगितले by सस्नेह

Permalink

धन्यवाद

धन्यवाद स्नेहांकिता !
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Wed, 07/01/2015 - 21:19

Permalink

प्रेरणेचं विश्लेषण म्हणजे आत्मभान...

असं काहिसं म्हणायचं आहे का आपल्याला? तसं असल्यास विश्लेषणाची प्रेरणा हिच मनुष्य शरीराला इतर प्राण्यांपासुन वेगळं करते ??
  • Log in or register to post comments

Submitted by निरन्जनदास on गुरुवार, 07/02/2015 - 18:09

In reply to प्रेरणेचं विश्लेषण म्हणजे आत्मभान... by अर्धवटराव

Permalink

बरोबर

बरोबर ! विश्लेषण ही बौद्धिक कृती निखळ मानवी घटना आहे. बुद्धि (Reason), आत्मभान (Self awarness) आणि करुणा (Compassion) ही तीन वैशिष्ट्ये माणसाची लक्षणे आहेत. निव्वळ बुद्धिमान माणूस कितीही अधम पातळीवर जाऊ शकतो, याची उदाहरणे देण्याची गरज नाही. ज्याला आपण काय करीत आहोत, याची जाणीव असते तोच करुणाभाव विकसित करतो. येशूचं स्मरण केलं तर काय मिळतं, " हे ईश्वरा, त्यांना माफ कर ते काय करीत आहेत, हे त्यांना कळत नाही !! " करुणाहीन बुद्धि हिंसेशी मैत्री करते ! करुणा असेल तर आणि तरच मानवतेचा उदय शक्य होतो.
  • Log in or register to post comments

Submitted by अस्वस्थामा on गुरुवार, 07/02/2015 - 16:49

Permalink

अजून एक, तुमच्या लेखांमध्ये

अजून एक, तुमच्या लेखांमध्ये पुढच्या मागच्या लेखनाचा दुवा टाकता आला तर पहावे. तसेच धागा जर दखल पात्र झाला तर नवीन लेख आलेले लक्षात येईल इतरांच्यापण. (आम्हाला खोदकाम करावे लागले दुसर्‍या भागासाठी. ) (सा.सं. बघा जरा. :) )
  • Log in or register to post comments

Submitted by निरन्जनदास on गुरुवार, 07/02/2015 - 18:21

Permalink

चांगली सूचना

ही सूचना चांगली आहे. मला ही तांत्रिक माहिती नाही, पण संपादक मंडळीशी बोलून ठरविता येईल.
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Sun, 07/05/2015 - 10:45

Permalink

सर तुमचा या क्षेत्रातला अधिकार मान्य करुन.....

मी पहिल्यांदा हे कबुल करु इच्छितो की या विषयावर बोलण्याचा मला काही एक अधिकार नाही. कारण या विषयाचा कोणत्याही प्रकारचा अभ्यास मी केलेला नाही. मी खाली जी काही विधाने करणार आहे ती केवळ माझ्या शंका निरसन करण्यासाठीच केली आहेत. ती विधाने सत्य आहेत, किंवा मी म्हणतो ते बरोबरच आहे असा कोणताही दावा मी करत नाही.
निर्मिती ही आत्मभानाचे आणि संयमाचे निदर्शक आहे, तसे त्या उलट संहार, विध्वंस हे बेभानाचे लक्षण आहे
जर येथे विध्वंस करणे म्हणजे एखादी गोष्ट नष्ट करणे असेल तर ज्या शक्तीने हा खेळ रचला आहे ती शक्तीसुध्दा विध्वंस करताना दिसतेच ना? (महापुर, दुष्काळ, त्सुनामी, अवकाशातली ब्लॅकहोल्स इत्यादी.) वरील विधान काही काळासाठी बाजूला ठेवले तरी सुध्दा जिवंत रहायचे असेल तर विध्वंस करावाच लागतो. विध्वंस केल्या शिवाय तुमच्या पोटात अन्न जाणार नाही. मग विध्वंस बेभान कसा? या पुढे जाउन जर मी असा दावा केला की "विध्वंस करणे ही नैसार्गीक प्रवृत्ती आहे आणि संयम हा निसर्गनियमाच्या विरुध्द आहे." तर माझ्या विधानात काही चुक आहे का? यापुढे जाउन असेही म्हटले जाते की या जगात कोणीच कशाचीही निर्मिती करु शकत नाही आणि त्याचा विध्वंसही करु शकत नाही. जे काही आपण जगतो, बघतो, अनुभवतो ती केवळ एकाच उर्जेची विविधरुपे आहेत. उदा. सुर्यापासून पृथ्वी निर्माण झाली, आणि त्या पासून जीवसृष्टी. याच न्यायाने निर्मीती आणि विध्वंस म्हणजे एखाद्या उर्जास्वरुपाचे दुसर्‍या उर्जास्वरुपात रुपांतर करणे. जर असे असेल तर मग निर्मीती म्हणजे आत्मभान आणि विध्वंस म्हणजे बेभान पणा कसा? हे कसे ठरवले जाते?
प्राण्यांना ज्ञानशास्त्रीय आत्मभान नसते.
असा दावा करणे ही केवळ एक आत्मप्रौढी आहे असे वाटते. कारण असा दावा केवळ मनुष्यप्राणी इतर मनुष्यप्राण्यांपुढे करताना दिसतो. इतरांनी ते मान्य करावे यासाठी सुध्दा मनुष्यप्राणी इतरांशी संवाद साधताना दिसत नाही. जणू या विश्र्वातला एकमेव सजीव मनुष्यच आहे. (इथे मला जी.ए. कुलकर्णी यांची हंस आणि कावळे ही गोष्ट आठवत आहे.) जेव्हा मनुष्य या कोशामधुन बाहेर पडेल / फेकला जाईल तेव्हा कदाचीत त्याला प्रचंड मोठा धक्का बसेल.
'मी' ज्ञान घेणारा ज्ञाता, ज्ञान निर्माण करणारा निर्माता आणि स्वत: 'मी'च ज्ञानाचा विषय असणारा विषयीही आहे, असे या आत्मभानाचे स्वरूप असते.
मी वर म्हणालो आहे की या जगात आपण जे काही अनुभवतो ती एकाच उर्जेची विविधरुपे आहेत. ज्ञान हे देखिल त्याच उर्जेचे एक रुप आहे. हे जर मान्य केले तर ज्ञान निर्माणही होत नाही आणि नष्टही. ते असतेच. काही जणांना ते आहे याची जाणीव असते / होते आणि काही जण अजाणतेपणी सुखात असतात. ज्ञानाची जाणीव जिवनात अशांतता निर्माण करते. (हे लिहीताना माझ्या डोळ्यासमोरुन मॅट्रीक्स मधला "निओ" आहे. मॉर्फियस त्याला जाणीव करुन देत नाही तो पर्यंत तो मॅट्रीक्स मधे सुखाने रहात असतो. ) माझ्या या शंकांची उत्तरे तुमच्या लेखमालेच्या पुढच्या भागांमधे येणार असतील तर इथे दिली नाहीत तरी चालु शकेल. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on Mon, 07/06/2015 - 12:27

In reply to सर तुमचा या क्षेत्रातला अधिकार मान्य करुन..... by ज्ञानोबाचे पैजार

Permalink

माझ्याही मनात असे विचार आले

माझ्याही मनात असे विचार आले होते . तुम्ही ते व्यवस्थित शब्दात मांडले आहेत. विशेष करुन प्राण्यांचा आत्मभानाचा मुद्दा. कदाचीत , प्राण्यांना देखील आपल्या पेक्षा वेगळ्या प्रकारचे भान असेल जे आपल्या समजण्या पलीकडे असेल . जसे की , आपण एकमेकांशी भाषेच्या माध्यमातुन संवाद साधतो , प्राणी सुध्दा एकमेकांशी संवाद साधतात जो आपण समजु शकत नाही. हेमाडे सरांच्या उत्तराची प्रतिक्षा आणि उत्सुकता.
  • Log in or register to post comments

Submitted by निरन्जनदास on Tue, 07/07/2015 - 14:38

In reply to माझ्याही मनात असे विचार आले by मराठी_माणूस

Permalink

माणूस आणि प्राणी

हं, हे ही फार चूक नाही. प्राण्यांना भान नसते, असे नाही. पण ते 'आत्मभान' नसते. म्हणजे मानवी आत्मभान ज्या स्वरूपाचे असते, त्या स्वरूपाचे नसते. समाज, भाषा, संस्कृती, धर्म, तत्त्वज्ञान, तंत्रज्ञान, विज्ञान इत्यादी मानवी आविष्कार केवळ मानवी आत्मभानच निर्माण करू शकते, प्राणिज भान नव्हे. समाज आणि समूह, टोळी, थवा, कळप यात आपण फरक का करतो ? कारण यातील प्रत्येक गोष्ट वेगळी आहे, वेगळ्या जीवांना लागू आहे. अगदी फार काय पण खुद्द ही प्रस्तुत चर्चा फक्त मानव आणि केवळ मानवामध्येच चालू आहे, यापेक्षा वेगळा पुरावा कशाला ? माणसाला भाषा असेल काय ? त्याचे संवादाचे माध्यम कोणते ? अशी चर्चा कोणत्याही प्राण्यात चालू नाही, माणसात चालू आहे ! प्राण्यांचा अभ्यास माणूस करतो, प्राणी माणसाचा करीत नाहीत. त्यांना परंपरा नसते, कारण स्मृती नसते. परिणामी ते केवळ जनन करण्याखेरीज काहीच करू शकत नाहीत. माणसाची स्मृती इतकी ताणली गेली की त्याला गतजन्मीचे आठवते !!! पुढे, अबब !!!! म्हणावे असे अनेक जन्माचे आठवते. श्रीकृष्ण तोच दावा करतो. अहो, जन्म, पुनर्जन्म, त्याचे चक्र, त्यातून मोक्ष हे आम्ही निर्माण केलेले महाजाल आहे ! प्राण्यांनी नाही. पण छान, चांगली भरीव चर्चा या निमित्ताने होते, याचे समाधान. मराठी माणसाला विचार केलाच पाहिजे बरं .
  • Log in or register to post comments

Submitted by निरन्जनदास on Tue, 07/07/2015 - 11:29

In reply to सर तुमचा या क्षेत्रातला अधिकार मान्य करुन..... by ज्ञानोबाचे पैजार

Permalink

अधिकार प्रत्येकाला

पैजारबुवा, प्रथम दिलगिरी व्यक्त करतो.. तुम्हाला प्रतिसाद देण्यास उशीर झाला. आणि आता, अनुक्रमे जाऊ. हे पाहा, मी पहिल्या लेखातच असे म्हंटले आहे की तत्त्वज्ञानावर बोलण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. याचे कारण प्रत्येक 'जन' काहीतरी दृष्टीकोन बाळगत असतो. त्यामुळे तुम्ही अगदी बोलू शकताच. आणि मुळात हा विषयच असा आहे की प्रत्येक वेळी जगण्याचा नवा पैलू समोर आणि सामोरा येतो. त्यामुळे कितीही "परिपूर्ण' दृष्टीकोन मांडला तरी काहीतरी उरलेले असतेच. खरे तर त्यातूनच 'ईश्वर' जन्माला येतो. अधेमध्ये ईश्वर येत राहील.पण ते असो,
निर्मीती म्हणजे आत्मभान आणि विध्वंस म्हणजे बेभान पणा कसा?
यात काय होते पाहा : मानवी संस्कृतीची निर्मिती ही एक सुरचना आहे. निसर्ग रचना करीत नाहीत, निसर्गात केवळ घटना घडतात. त्यांचा आपण अर्थ लावीत असतो. महापुर, दुष्काळ, त्सुनामी, अवकाशातली ब्लॅकहोल्स ही केवळ 'असणे' आहेत. त्यामागे हेतू नाही, नसतोही.. निसर्ग विध्वंस करीत नाही. पृथ्वीवर कुणीच नव्हते (किंवा आजही मंगळ, गुरु, प्लुटो या ग्रहांवर कुणी नाही), तेंव्हा काहीही घडले तरी कुणाचेच काही नुकसान घडले नाही. पण माणसाचा निसर्गाशी संपर्क आला आणि निसर्गावर हेतूचे आरोपण सुरु झाले. निसर्ग जणू मानवी (अन्थरोपिक) झाला. बीज फुटणे, त्याचा रोप, वृक्ष होणे ही नैसर्गिक क्रिया आहे, ती हिंसा नाही. त्यात कर्त्याला म्हणजे निसर्गाला "आत्मभान" नाही. त्यामुळे त्याला तो काय करीत आहे, हे कळत नाही. रचना आपण करतो. "आत्मभान" आपल्याला असते. आता, हे विसरणे किंवा दृष्टीआड करणे हा हिंसेचा मार्ग आहे. इतरांनी निर्माण केलेले काहीही नष्ट करणे, ही हिंसा असते. पण अन्न तयार करणे, ही हिंसा नाही, ते पोषण आहे. बॉम्ब इत्यादी युद्ध जनक कृती ही निर्मिती आहे का ? नाही ! कारण ती हिंसेची साधने आहेत. पण स्वयपाकघरातला चाकू ही निर्मिती आहे, आरोग्यविषयक साऱ्या वैद्यकीय शस्त्रक्रिया हिंसा नाही, ती निर्मिती आहे. नवीन काही निर्माण होण आणि ते जीवनदायी असणे, ही निर्मिती मानावी. पण नेमकी हीच, म्हणजे निर्मितीला हिंसा समजणे ही चूक जैनांनी केली आणि अहिंसेचा गैरअर्थ लावला, प्रत्यक्षात ते शोषणाचे नेते बनले. तुम्हाला माहित आहे का जैन धर्म भाजी कापणे, शिजविणे इत्यादीला हिंसा मानतोच, पण संभोगाला ही हिंसाच मानतो. त्यामुळे 'ब्रह्मचर्य' नावाची गोची त्यांनी प्रसारित केली. आता, विरोधाभास असा की हे तत्त्वज्ञान जगाला सांगण्यासाठी नवी माणसे हवीत, आपलीच हवीत, जैन हवीत तर 'संभोग' ही हिंसा करावी लागते ! ती त्यांनी केली. पण कशी ? बासुंदी खायची पण त्यात उंदीर पडल्यासारखा चेहरा करून !! आता, पहिल्या जैनाने हि "उन्दिरयुक्त बासुंदी' खाल्लीच नसती, तर त्याच्याबरोबरच जैन संप्रदायाची पर्मनंट हिंसा झाली असती. तसे झाले नाही. कारण .... शोधू आपण.... निसर्गातील उर्जेचे रुपांतर ही सुद्धा हिंसा नाही, ते तुम्ही अधोरेखित करता तसे केवळ "रुपांतर" आहे. "उर्जा अक्षय्यता" हा निसर्गनियम आहे. आता, ज्ञानाला उर्जा समजणे हे रूपक आहे. तेच जी एं नी वापरले आहे. ज्ञानाला अक्षय्यतेचा नियम लागू करणे, हा 'तर्कदोष' आहे. पण पुन्हा हीच महाभयावह चूक आम्ही ,म्हणजे वैदिक परंपरेने करून एक चिरस्थायी शोषण व्यवस्था आणली. पूर्वमीमांसा या संप्रदायाने ज्ञान अपौरुषेय मानले, त्यावर मूठभरांची मिरास आणली, वेद्वाक्ये सत्य व युक्त समजून ज्ञानवंचित समाज निर्माण केला ! ज्ञानाला आत्म्याप्रमाणे अमर मानून वर्ण-जाती-लिंगभेद आणले गेले आणि एक पांगळा समाज तयार झाला. आता, आपण हे लक्षात घेऊ की ज्ञान ही कृत्रिम घटना आहे, तिचा प्रसार ही जाणीवपूर्वक करावयची कृती आहे.
ज्ञान निर्माणही होत नाही आणि नष्टही. ते असतेच. काही जणांना ते आहे याची जाणीव असते / होते आणि काही जण अजाणतेपणी सुखात असतात. ज्ञानाची जाणीव जिवनात अशांतता निर्माण करते.
हे पाहा , ज्ञानाला असे आदर्श स्वरूप देता येत नाही. ते दिले गेले की तुम्ही म्हणता तसे वाटू लागते. ज्ञानाची जाणीव अशांतता कशी निर्माण करेल ? आपले प्राधान्य कशाला ? हा प्राचीन प्रश्न आहे : दुःखी सॉक्रेटीस की सुखी डुक्कर ! कुंती कृष्णाकडे , तुकोबा विठोबाला दु:खाची मागणी करतात. कोणत्या सुखी डुकराची स्मारके, पुरस्कार आपल्यात आहेत? (सध्या ही लाटही आलीय बरे का !! नावे माणसांची असतात, एवढाच फरक.) मुक्ता साळवे, फुले, आंबेडकर, आगरकर, स्मृतिचित्रे लिहिणाऱ्या लक्ष्मीबाई यांना अज्ञानामुळे सुख मिळाले की दु:ख ? अनेक प्रश्न आहेत, सोडविता येतील तितके सोडवू. मालिका जशी पुढे सरकेल, तसा काही खुलासा होत राहील, पण नवे प्रश्न येतील, त्यांचे स्वागत करू. तुमच्यामुळे नवे चिंतन झाले, हा काय कमी फायदा झाला ? निरंजनदास
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Tue, 07/07/2015 - 13:21

In reply to अधिकार प्रत्येकाला by निरन्जनदास

Permalink

धन्यवाद,

सविस्तर उत्तरासाठी धन्यवाद, उत्तरावर विचार करतो आहे. ज्या शंकांची उत्तरे मिळाली नाहीत ती मिळवण्यासाठी मालिका वाचत राहीन, पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Tue, 07/07/2015 - 19:20

In reply to अधिकार प्रत्येकाला by निरन्जनदास

Permalink

नाहि पटलं.

नैसर्गीक घटनांचा अन्वयार्थ लावणं, त्याला निर्मीती वा विनाशाची लेबलं लावणं हा जर आत्मभानाचा अविश्कार असेल तर तो माणसात निसर्गाकडुनच आलाय. मानवाला 'निर्मीती' ठाऊक आहे पण निसर्गाला नाहि असं होणार नाहि. जे घडतय ते केवळ ट्रान्फोर्मेशन असेल (आणि ते तसं आहेच) तर मानवी भानाला जाणवणारी निर्मीती/विनाश वगैरे देखील केवळ क्रिया आहेत. आणि जर मानवी भान सत्य असेल तर ते निसर्गात देखील ओतप्रेत भरलं आहे. निसर्गातल्या क्रिया विनाउद्देश असु शकतात पण भानरहित नाहि.
  • Log in or register to post comments

Submitted by निरन्जनदास on Tue, 07/07/2015 - 21:31

In reply to नाहि पटलं. by अर्धवटराव

Permalink

निसर्गभान

निसर्गाला भान असते तर त्याने पृथ्वीवर रेडिमेड माणूस पाठविला असता, आणि असा
रेडिमेड माणूस पृथ्वीवर आला, हाच दावा धर्मसंस्थेचा असतो !
पण निसर्ग असा दावा करीत नाही, कारण त्याला भान नाही. अखिल ब्रह्मांडात पृथ्वीवर जीवनमान आहे, म्हणून तिला सजीव मानणे आणि तिचा आदर करणे, आई मानणे ही कृतज्ञता आहे. पण म्हणून निसर्ग सजीव मानणे हा तर्कदोष असतो.
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Tue, 07/07/2015 - 22:48

In reply to निसर्गभान by निरन्जनदास

Permalink

परत असहमत.

निसर्गाला भान असते तर त्याने पृथ्वीवर रेडिमेड माणूस पाठविला असता,
असं का वाट्तं तुम्हाला? आणि निसर्गात भान नसतं तर त्याच निसर्गाची निर्मीती म्हणजे जो मानव त्यात भान निसर्गबाह्य पद्धतीने आलं (किंवा डेव्हलप झालं) असं म्हणायचं आहे का? असं असेल तर तुमची निसर्गाबद्द्लची संकल्पना फार मर्यादीत आहे. निसर्ग आणि मनुष्य हेच जिथे वेगवेगळे नाहित तिथे मनुष्यामधलं भान तरी निसर्गबाह्य कसं असेल?
रेडिमेड माणूस पृथ्वीवर आला, हाच दावा धर्मसंस्थेचा असतो !
धर्मसंस्थेबद्दल सध्या न बोललेलं बरं. तो फार वेगळा विषय होईल.
अखिल ब्रह्मांडात पृथ्वीवर जीवनमान आहे, म्हणून तिला सजीव मानणे आणि तिचा आदर करणे, आई मानणे ही कृतज्ञता आहे. पण म्हणून निसर्ग सजीव मानणे हा तर्कदोष असतो.
अखिल ब्रह्मांडात केवळ पृथ्वीवर जीवनमान आहे असं मानणं हा तर्कदोष आहे. शिवाय तुम्ही ज्याला जीवनमान म्हणताहात ते एका विशिष्ट शरीरशास्त्र दृष्टीने एकवेळ ठीक आहे. शिवाय याच शरीराचं घडण ज्या निसर्गात, आणि निसर्गनियमांनी होतं, त्या निसर्गाकडेच मनुष्यशरीरात वावरणार्‍या (किंवा जाणवणार्‍या) सजीववत्वाचं प्रेरकत्व जातं. निसर्ग सजीव असल्याशिवाय मनुष्य सजीव असुच शकत नाहि.
  • Log in or register to post comments

Submitted by निरन्जनदास on Wed, 07/08/2015 - 09:33

In reply to परत असहमत. by अर्धवटराव

Permalink

फारच छान !

फारच छान ! आवडलं. तुमच्या प्रतिसादाबद्दल मी अतिशय आभारी आहे. तुम्ही चालना देणारे म्हणणे मांडले आहे. आता, आपण तुमच्या मांडणीनुसार अनुक्रमे जावू. १.
माणूस निसर्गाची निर्मिती आहे
, म्हणजे नेमके काय आहे ? हे मला कळले नाही. म्हणजे निर्मितीची कोणती प्रक्रिया, कोणत्या क्रमाने, किती काळ, कुठे, कोणत्या नियमांनी आणि का घडली ? २.
माझी निसर्गाची संकल्पना फार मर्यादीत आहे
, हे तुम्ही अचूक हेरलेत; हे मलाच माहित नव्हते. ते तुम्हाला कळाले. कृपया मला माझी निसर्गाची संकल्पना समजावून द्यावी. ३. निसर्ग आणि मनुष्य हेच जिथे वेगवेगळे नाहित तिथे मनुष्यामधलं भान तरी निसर्गबाह्य कसं असेल? हा प्रश्न खरच महत्वाचा आहे. पण
निसर्ग आणि मनुष्य हेच जिथे वेगवेगळे नाहित
म्हणजे नेमके काय ते मला समजले नाही. कृपया समजावून द्यावी. ४. "धर्मसंस्थेबद्दल सध्या न बोललेलं बरं. तो फार वेगळा विषय होईल." हे तुमचे म्हणणे मान्य आहे. याबद्दल आपण निवांतपणे बोलू. ५."अखिल ब्रह्मांडात केवळ पृथ्वीवर जीवनमान आहे असं मानणं हा तर्कदोष आहे." हे ही माझ्या आकलनशक्ती पलीकडील विधान आहे. कृपया समजावून द्यावे. ६. निसर्ग सजीव असतो, या विधानाचा अर्थही माझ्या आकलनशक्ती पलीकडील आहे. कृपया समजावून द्यावे.
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Wed, 07/08/2015 - 16:42

In reply to फारच छान ! by निरन्जनदास

Permalink

:)

१)
म्हणजे निर्मितीची कोणती प्रक्रिया, कोणत्या क्रमाने, किती काळ, कुठे, कोणत्या नियमांनी आणि का घडली ?
ड्जण्ट मॅटर. त्याकरता अनेक थेअरी वैज्ञानीक तपासताहेत. मूळ प्रश्न इतकाच कि मानवाला 'निर्मीती' शक्य आहे काय आणि असल्यास ति येते कुठुन. कारण ति क्षमता मानवाने निर्माण केलेली नाहि. २) निसर्ग म्हणजे मानव विरहीत एक कॉम्प्लेक्स क्रियांचं जंजाळ असं काहिसं वाटलं तुमच्या प्रतीसादातात. ३) अमुक एका ठिकाणि मनुष्य संपतो आणि निसर्ग सुरु होतो (किंवा त्या उलट) असं ठिकाण शोधा. ४) धन्यवाद ५) अखील ब्रह्मांडात केवळ पृथ्वीवर जीवन आहे असं मानणं म्हणजे आपण संपूर्ण पालथं घातलं असं म्हणावं लागेल. ६) मानव, वा इतर कुठलाहि प्राणि सजीव आहे + तो नैसर्गीक प्रक्रियेतुन घडला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by निरन्जनदास on गुरुवार, 07/09/2015 - 16:25

In reply to :) by अर्धवटराव

Permalink

स्पष्टता नाही.

तुमच्या कोणत्याही प्रतिपादनात स्पष्टता नाही. मी विचारलेल्या शंका तुम्ही दूर करीत नाही. मी हतबल आहे. शिवाय पुन्हा एक नवा दावा तुम्ही केला आहे :
अखील ब्रह्मांडात केवळ पृथ्वीवर जीवन आहे असं मानणं म्हणजे आपण संपूर्ण पालथं घातलं असं म्हणावं लागेल.
पृथ्वी सोडून कोणत्या ग्रहावर जीवन आहे, ते तुम्ही पुराव्यासह दाखवित नाही आहात. तुमच्या ज्ञान आम्हाला द्या.
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on गुरुवार, 07/09/2015 - 18:05

In reply to स्पष्टता नाही. by निरन्जनदास

Permalink

:)

तुमच्या कोणत्याही प्रतिपादनात स्पष्टता नाही. मी विचारलेल्या शंका तुम्ही दूर करीत नाही. मी हतबल आहे. शिवाय पुन्हा एक नवा दावा तुम्ही केला आहे
अशा आमच्या आठवणींच्या खपल्या काढु नका हो. जीवाला फार त्रास होतो :)
पृथ्वी सोडून कोणत्या ग्रहावर जीवन आहे, ते तुम्ही पुराव्यासह दाखवित नाही आहात.
तर्कदोषाचं उदाहरण म्हणुन ते दिलय.
तुमच्या ज्ञान आम्हाला द्या.
नको. तुमचं ब्रॉडकास्टींग उत्तम चाललय कि.
  • Log in or register to post comments

Submitted by राही on Tue, 07/07/2015 - 23:29

In reply to अधिकार प्रत्येकाला by निरन्जनदास

Permalink

माय गॉड, माय गॉड

इतके सुंदर विवेचन! " निसर्ग विध्वंस करीत नाही. पृथ्वीवर कुणीच नव्हते (किंवा आजही मंगळ, गुरु, प्लुटो या ग्रहांवर कुणी नाही), तेंव्हा काहीही घडले तरी कुणाचेच काही नुकसान घडले नाही. पण माणसाचा निसर्गाशी संपर्क आला आणि निसर्गावर हेतूचे आरोपण सुरु झाले. निसर्ग जणू मानवी (अन्थरोपिक) झाला. बीज फुटणे, त्याचा रोप, वृक्ष होणे ही नैसर्गिक क्रिया आहे, ती हिंसा नाही. त्यात कर्त्याला म्हणजे निसर्गाला "आत्मभान" नाही. त्यामुळे त्याला तो काय करीत आहे, हे कळत नाही. निसर्गाला हेतू नाही, त्याला आत्मभान नाही... नेमकी वाक्ये. फक्त एक शंका आहे, ती पुन्हा कधीतरी. आत्मभान हा माझा आवडता विषय आणि परवलीचा शब्द आहे. उत्सुकतेने वाचून पुनःप्रत्ययाचा आनंद घेत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by निरन्जनदास on Wed, 07/08/2015 - 09:39

In reply to माय गॉड, माय गॉड by राही

Permalink

धन्यवाद राही

धन्यवाद राही, पण तुमची शंका जरूर विचारा. इथे विचारु नये असे वाट्त असेल तर माझा सं-पत्ता shriniwas.sh@gmail.com असा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by निरन्जनदास on Tue, 07/07/2015 - 14:43

Permalink

धन्यवाद कसले डोंबलाचे !

पैजारबुवा, धन्यवाद कसले डोंबलाचे ! उलट मीच तुमचा थॅन्क्यू आहे. पण विचारात आणि विचारत राहावे , ही विनंती.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com