युद्ध ते धर्मयुद्ध.. तत्त्वासाठी
श्रीनिवास हेमाडे
*/
/*-->*/
/*-->*/
'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग'सारखी आध्यात्मिक लढाई वगळली तर प्रत्येक मानवी लढाई सामान्य लोकांचे नुकसान करते. दंगल, लढाई म्हणजे लोकांकडून लोकांचेच नुकसान. हे सारे कशासाठी ? तर 'तत्त्वासाठी !!’ पण अशा 'तत्त्वासाठी' होणाऱ्या लढाया म्हणजे 'तात्त्विक' लढाया नव्हेत, हे समजून घेतले पाहिजे...
एकदा व्यक्तीचे किंवा समाजाचे तत्त्वज्ञान निश्चित झाले की ती व्यक्ती, तो समाज त्या तत्त्वासाठी हवे ते करायला तयार होतो. भोग ते त्याग; टोकाचे शोषण ते उग्र संन्यास, अशी एक कोणती तरी जीवनध्येये निश्चित होऊन त्यानुसार व्यक्तिगत जीवनाचे तसेच समाजाच्या सार्वजनिक जीवनाचे धोरण आखले जाते. त्या धोरणाला कालांतराने श्रद्धेचे स्वरूप प्राप्त होते. आणि मग कोणत्याही श्रद्धेचे स्वरूपच असे बनते की ती श्रद्धा म्हणजे कधीही न बदलणारा आणि ज्याचे काहीही उल्लंघन करता येत नाही, असा जणू निसर्गनियम बनते.
तत्त्वासाठी त्याग, समाजसेवा अथवा प्रसंगी समाजापासून दूरचे विरक्त एकांत जीवन स्वीकारले तर समाजाचे फारसे नुकसान होत नाही, उलट अशा जीवन रीतीचे स्वागतच होते. तत्त्वासाठी भांडण, वाद, 'बा'चा 'बा'ची सुरू झाली की मग मात्र समाजाचे व्यापक नुकसान होते.
मुद्दय़ांची लढाई गुद्दय़ांवर आली की भांडण कोणत्या थराला जाईल, याचे भविष्य सांगता येत नाही. भांडण करायचेच हे धोरण स्वीकारले गेले की त्याची शेवटची पायरी युद्ध हेच असते, हे भविष्यकथन करणे शक्य आहे. तहाची शक्यता संपुष्टात आली की युद्धात एकाचा खात्रीचा नाश व जिंकणाऱ्याचा विजय हे चित्र स्पष्ट असते.
न्यायालय हा भांडण सोडविण्याचा कायदेशीर मार्ग असला तरी प्रत्येक भांडण काही न्यायालयात जात नाही. अनेकदा भांडणे रस्त्यावर सोडविली जातात. काही भांडणे हेतुत: रस्त्यावरच सोडविली जातात. त्या वेळी मात्र 'तत्त्वासाठी भांडण' लोकांना महाग पडते.
विशेषत: धर्म, वर्ण, वंश अथवा जात या तत्त्वासाठी संघर्ष झाला की अपरिमित नुकसान होते. यात नेमके काय होते पाहा. जातीय दंगल असो अथवा युद्ध असो, वित्तहानी व जीवहानी होते. वित्तहानीचे प्रमाण कमी-जास्त असू शकते. युद्ध, महायुद्ध झाले तर तेही प्रमाण खूप असते, ते भरून काढण्यासाठी वर्षांनुवष्रे लागतात. अर्थात कितीही नुकसान झाले तरी वित्तहानी भरून काढता येते, पण जीवहानी कायमची असते, कधीही भरून काढता येत नसते. वित्तहानी म्हणजे अन्नधान्य, घरेदारे, दुकाने, सेवा केंद्रे, इस्पितळे, वाहने, इतर वस्तू किंवा विविध प्रकारची खासगी, सरकारी, निमसरकारी कार्यालये, दस्तऐवज, बँका, शाळा, इत्यादी यांचे नुकसान होणे. यात खासगी आणि सरकारी मालकी असा मालकीभेद करता येईल. खासगी म्हणजे लोकांच्या व्यक्तिगत मालकीची (यात कंपन्यांची मालकी गृहीत धरता येईल.) आणि सरकारी म्हणजे सरकारच्या सार्वजनिक मालकीची. पण सरकारच्या मालकीची याचा अर्थ सरकार, शासन या नावाची लोकांपासून वेगळी अशी काही गोष्ट असते, तिच्या मालकीची ही मालमत्ता असते; असे नाही तर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे कर भरणाऱ्या भिक्षेकरी ते गर्भश्रीमंत नागरिकाच्या करातूनच सरकारी मालमत्ता अस्तित्वात येते. सरकारी मालमत्तेचे नुकसान झाले की सरकार पुन्हा खुला-छुपा कर लादून लोकांकडून नुकसानभरपाई वसूल करते. पुन्हा लोकांचेच नुकसान होते. कोणत्याही खासगी वा सरकारी वित्ताचे नुकसान याचा अर्थ लोकांच्याच वित्ताचे नुकसान.
आता, गल्लीतील दंगल असो किंवा जागतिक महायुद्ध असो, युद्धात भाग घेणारे सनिक आणि ज्यांचे नुकसान होते ती माणसे; या दोन्ही बाजूत एक गोष्ट समान असते. नुकसान करणारे आणि नुकसानग्रस्त दोघेही सामान्यजन असतात. दंगलीत रॉकेल-पेट्रोलचे बोळे, हातोडे, चाकू-सुरी, तरवारी घेऊन पुढे सरसावणारे कार्यकत्रे आणि बंदुका-रायफली, बॉम्ब घेऊन युद्धात लढणारे सनिक हे सामान्यजनच असतात. कार्यकर्ता हा आपला पक्ष, संघटना यांच्या तत्त्वासाठी 'आदेश' म्हणून लढतो. सैनिक नोकरीचे कर्तव्य म्हणून लढत असला तरी 'देशप्रेम' हे 'तत्त्व' जोडीला असतेच. सैनिकाची निवड आणि सामान्य कार्यकर्त्यांची निवड, दोन्ही निवडी सामान्यजनातील तरुण वर्गातून केल्या जातात. मग, दोघेही जिवावर उदार होऊन लढतात, तत्त्वासाठी! दंगल, लढाई म्हणजे लोकांकडून लोकांचेच नुकसान. हे सारे कशासाठी? तर तत्त्वासाठी!!
बरे, आता दंगलीचे-युद्धाचे आदेश देणारे सर्व सिंहसेनापती मात्र सुरक्षित कडेकोट बंदोबस्तात आपापल्या थंडगार कार्यालयात, घरी, फार्महाऊस, इत्यादी ठिकाणी श्री. बाबुराव बागुलांच्या भाषेत जीवनाचा यथायोग्य सत्कार करीत बसलेले असतात. जी. ए. कुलकर्णीच्या 'रमलखुणा' या कथासंग्रहातील 'इस्किलार' या कथेत सैन्यातील अधिकाऱ्याचे वर्णन आहे. 'धोक्याच्या जागेपासून अनेक योजने दूर राहून इतक्या कडव्या त्वेषाने लढणारा अधिकारी साऱ्या देशात मिळणार नाही. जगात असा कोणताही महान त्याग नसेल की जो हा आपल्या सनिकांकडून करवणार नाही. असे कोणते साहस नसेल की तो अत्यंत संथ धैर्याने त्यांना करायला सांगणार नाही. आणि या कर्तृत्वाबद्दल त्याला इतके मानसन्मान मिळाले आहेत की ते सारे एकत्र दाखवायचे म्हटले तर शहराची तटबंदी पुरायची नाही.'
धर्मयुद्ध तर अतिउन्माद निर्माण करणारा असतो. मराठी विश्वकोशातील नोंदीनुसार 'मध्ययुगीन युरोपमध्ये मुस्लीम सत्तेच्या ताब्यात गेलेली ख्रिस्ती लोकांची 'पवित्र भूमी' (पॅलेस्टाइनमधील जेरुसलेम, बेथलिएम इ. शहरे) परत मिळविण्यासाठी वेळोवेळी केलेल्या लष्करी प्रयत्नांना (इ. स. १०९६ ते १२९१) सर्वसाधारणपणे 'क्रूसेड' ही संज्ञा देण्यात येते. कोणत्याही पवित्र वाटणाऱ्या कार्यासाठी काढण्यात येणाऱ्या मोहिमेसाठी हा शब्द इंग्रजी भाषेत रूढ झाला. त्याला मराठीत 'धर्मयुद्ध' हा प्रतिशब्द वापरण्यात येतो. धर्म व नीती यांनुसार चालविलेले युद्ध हा त्याचा अर्थ येथे अभिप्रेत नाही. परधर्माच्या लोकांचे धर्मातर करणे हासुद्धा त्याचा उद्देश नव्हता. 'धर्माच्या संरक्षणासाठी त्याच्या शत्रूंचा नि:पात करणे' ही धर्मयुद्धाची कल्पना त्या काळाच्या युरोपीय जनमानसात होती असे दिसते. साधारणपणे इ. स. १०९७ ते १२९१ यादरम्यान आठ धर्मयुद्धे झाली. यांपैकी पाचव्या, फ्रान्स आणि जर्मनीतील धर्मयुद्धास 'बालकांचे धर्मयुद्ध' म्हणण्यात येते.''
प्राचीन भारतात रामायण-महाभारतीय युद्ध 'धर्मरक्षण व धर्मसंस्थापन' यासाठी होते, असा निर्वाळा देण्यात येतो. हिंदू-बौद्ध-जैन या तीन धर्मामध्येही प्राचीन काळी युद्धे झाली. तथापि मानवी इतिहासात ज्यांना धर्मयुद्धे म्हटले गेले त्या अर्थाची धर्मायुद्धे जागतिक पातळीवर नव्याने उद्भवलेल्या 'दहशतवाद' या रूपात दिसतात. समाजजीवनात या युद्धाचा मुखवटा वर्ण-जात-िलगभेद यांना दिला जातो तसा तो बहुधर्मीय तत्त्वे नष्ट करण्यालाही दिला जातो. दंगलींना धर्मयुद्धे मानली गेली की तिचे परिणाम आणि पडसाद भयावह होतात. दंगलीतील, मिरवणुकीतील, निषेध मोर्चातील खळ्ळ् खटय़ाक असो अथवा धर्मयुद्ध.. ते करणारे 'धर्मवीर' ठरवले जातात आणि दोन्ही ठिकाणी जीव जातो तो सामान्यजनांचा. हे कसे, याचे दर्शन भीष्म साहनी यांच्या 'तमस' कादंबरीतही घडते. प्राचीन ग्रीक संस्कृतीतील मूठभरांची लोकशाही ते (राजेशाही, सरंजामशाही, लष्करशाही, उदारमतवाद, मार्क्सवाद, समाजवाद, वसाहतवाद) आजच्या संसदीय लोकशाहीपर्यंत अस्तित्वात आलेल्या सर्व प्रकारच्या विचारसरणी म्हणजे तत्त्वांची लढाई आहे. पण जीवन जगायचे आहे, तत्त्वेही पाळावयाची आहेत, संघर्षही टाळावयाचा आहे तर हा मार्ग नव्हे. वाद तत्त्वाचा असेल तर वादाचा, भांडणाचा मार्गही तात्त्विकच असला पाहिजे. ते मार्ग कोणते? त्यातील पहिला भारतीय मार्ग पुढील लेखात पाहू..
http://tattvabhan.blogspot.in/2014/06/blog-post_5268.html वरून
पूर्वप्रकाशन आणि सौजन्य: लोकसत्ता, दि.३० जानेवारी २०१४
तत्त्वभान
०१. तत्त्वभानाच्या दिशेने ०२. भानावर येण्यापूर्वी.. ३. स्वजाणिवेचे पक्व रूप ४. तत्त्वाचा 'ते'पणा
प्रतिक्रिया
22 Jul 2015 - 9:00 pm | द-बाहुबली
गुड... नमनाला आवश्यक तेल नक्किच वाहिले आहे त्यामुळे पुढीच्या भागाची विषेश आतुरतेने वाट बघणे आहे. लेट्स सी तत्वाने तत्व नेमके मारले कसे जाते ते....
24 Jul 2015 - 2:14 pm | निरन्जनदास
चांगला निर्णय
25 Jul 2015 - 3:29 pm | द-बाहुबली
"नमनाला आवश्यक तेल" च्या जागी आपण "नमनाला घडाभर" असे वाचावे. म्हणजे इतरांच्या निर्णयाच्याबरोबर स्वकृतीच्या (लिखाणातील) परिक्षणाचीही सवय लागुन जाइल अन्यथा.. आपण अजुन एक सर... या आधीचे सर तर लैच अफलातुन होते म्हणजे पब्लीक अगेंस्ट झालं लक्षात आलं की पब्लीक डीमांड्ची लिखाणे करुन लै मनोरंजन करत असत. फार मोठ्ठे लोक त्यांनी हे मनोरंजन्करुन जोडले होते... त्या सरांच्या सरसरीची सर तुम्हाला नाइ ;)
आता ही काइ पेपरातील लेखमाला न्हाइ की पब्लीक वाचेल अन उसासे सोडून मोकळे होइल... हे अंजा आहे म्हणाजे चर्चा तर होणारच.
बाय डिफाल्ट तत्व हा एक अनुभव आहे. अनुभव नसेल तर तत्व तत्व नाही आणी बाय डिफॉल्ट आपण मुळात असा कुठलाच अनुभव घेउ शकत नाही जो मुळात अनुभव नाही... ओब्जेक्ट ओरिएंटेशन्च्या भाषेत बोलले तर
class experience{
}
class fun:experience{
}
class sorrow:experience{
}
class element{
}
experience a = new sorrow
experience b = new fun
experience c = new element // this would result in type mismatch error...
मंग आता सांगा "तत्त्वभान" या पलिकडे आणखी काही उरते का ?
25 Jul 2015 - 4:31 pm | टवाळ कार्टा
वा वा,,,तुमी पन शी प्लश प्लश वाले का?
25 Jul 2015 - 5:03 pm | द-बाहुबली
शार्प आहे.
22 Jul 2015 - 9:24 pm | गामा पैलवान
निरन्जनदास,
प्रस्तुत लेख तत्त्वज्ञानापेक्षा युद्धाची अधिक चर्चा करतो आहे. याचे प्रयोजन कृपया समजावून सांगावे ही विनंती.
आ.न.,
-गा.पै.
24 Jul 2015 - 2:15 pm | निरन्जनदास
कृपया
आधीचे चारही लेख आणि त्यावरील सर्व चर्चा पाहावी. त्यात कुठेतरी आपले उत्तर आहे.
25 Jul 2015 - 1:52 am | गामा पैलवान
निरन्जनदास,
तुमचे उत्तर एखाद्या वर्गशिक्षकाप्रमाणे आहे. मागील चारही लेख चर्चांसहित वाचून त्यातून युद्ध या विषयाची संगती लावणे साधारण वाचकास अवघड आहे.
मी माझ्या परीने शोध घेतला तेव्हा हा एकमेव उल्लेख सापडला :
>> तेव्हा न्याय-अन्याय, पोषण-शोषण, वर्ण-जात-जमात, छळछावण्या, युद्धे, शांतता या साऱ्या व्यवस्था मानवी
>> ज्ञानशास्त्रीय जाणिवेचा आविष्कार आहेत.
आता याचा तत्त्वज्ञानाशी सांधा कुठे जुळतो ते स्पष्ट करावे ही विनंती.
आ.न.,
-गा.पै.
23 Jul 2015 - 12:30 am | अत्रुप्त आत्मा
उत्तम मांडणि . फ़क्त , @ कार्यकर्ता हा आपला पक्ष, संघटना यांच्या तत्त्वासाठी 'आदेश' म्हणून लढतो.>> याच्या पुढे "आणि त्याचे 'उद्दिष्ट' म्हणुनहि लढतो!" .. हे असे वाक्य असायला हवे,असे मला वाटते. :)
24 Jul 2015 - 2:17 pm | निरन्जनदास
तुमची सूचना ही चांगली भर होईल. धन्यवाद