डिसक्लेमर – हे लेखन इथे प्रकाशित करण्याचा उद्देश म्हणजे रायडींग ऑन अ सनबीम या डॉक्युमेंट्री फिल्मबाबत अधिकाधिक लोकांपर्यंत माहिती पोचवणे हा आहे. यामध्ये मिसळपाव.कॉमची भूमिका केवळ एक माध्यम एवढीच मर्यादित आहे.
मौक्तिक कुलकर्णी - एक इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर व न्युरोसायंटिस्ट पण पट्टीचा भटक्या. २००८ साली त्याने त्याची पहिली बॅकपॅकिंग मोहीम पार पाडली. ही मोहीम होती दक्षिण अमेरिकेतील चार देशांमध्ये मोटरसायकलवरून एकट्याने केलेली ५००० मैलांची भ्रमंती. या प्रवासावर त्याने 'A Ghost of Che' हे पुस्तक लिहिले. शिक्षण व नोकरीनिमित्त अमेरिकेत काही वर्षे राहिलेल्या मौक्तिकने भारतात परतण्याचा निर्णय घेतला. पण त्यापूर्वी त्याने ३६ देशांची वर्षभर भटकंती केली.
भारतात परतल्यानंतर त्याची गाठ राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक ब्रह्मानंद सिंग यांच्याशी पडली. दोघांमधील चर्चेच्या वेळी ब्रह्मानंद सिंग यांना वाटले की या सर्व भटकंतीच्या मोहिमांवर आधारीत एखादी डॉक्युमेंट्री फिल्म करण्याची संधी गमावली गेली आहे. त्यावर मौक्तिकने भारतात अशीच मोहीम पार पाडण्याचा मनोदय बोलून दाखवला. यातूनच आपल्या देशाबद्दल जरा अपारंपरिक डॉक्युमेंट्री बनवावी ही कल्पना पुढे आली. या मोहिमेदरम्यान प्रसिद्ध पर्यटनस्थळे टाळून वेगळा भारत अनुभवावा व चित्रित करावा. विशेषकरून विविध भागांतील सर्वसामान्य लोक कसे जगतात, त्यांच्या विचारसरणी, स्वभाव आणि त्यांच्यातले विरोधाभास टिपता येतील.
ब्रह्मानंद यांनी मौक्तिकच्या जोडीला सामंथा जो फिट्झसिम्न्स हिला सादर करायचे ठरवले. सामंथाने कॅलिफोर्नियातील बर्कली येथील विद्यापीठात मानववंशसास्त्राचे (Anthropology) व संगीताचे शिक्षण घेतले आहे. या प्रकारे जगभर भटकलेला भारतीय मुलगा व पूर्वी भारत न पाहिलेली मुलगी यांच्या नजरेतून भारताचे दर्शन घडवता येईल.
चित्रीकरणाचे काम पुर्ण झाल्यावर राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या एडिटर आयरीन धर मलिक यादेखील मौक्तिक व ब्रह्मानंद यांच्या चमूमध्ये सामील झाल्या. प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी मौक्तिक व सामंथा यांचा प्रवास समजून घेण्यासाठी अथक परिश्रम घेतले. अन त्यानंतरच हे चित्रण अधिक प्रेक्षणीय बनवण्यासाठी त्यांनी आपले काम सुरू केले.
ये जवानी हैं दिवानी, क्वीनसारख्या नव्या हिंदी चित्रपटांतून पर्यटनाच्या बॅकपॅकिंग या प्रकाराची ओळख भारतीय प्रेक्षकांना होऊ लागली आहे. तरीही अजूनही आपल्या तरुणाईने हा प्रकार त्या प्रमाणात स्वीकारलेला नाही. रायडींग ऑन अ सनबीम ही डॉक्युमेंट्री प्रेक्षकांना या प्रकारच्या पर्यटनाबद्दल आकर्षित करण्यात नक्की यशस्वी होईल. भारत वैविध्यपूर्ण, काहीसा अनाकलनीय पण तरीही उमेदीने व प्रेमाने भरलेला देश आहे याची झलक या चित्रपटातून दिसून येईल.
३६ देशांमधल्या भटकंतीतून निरनिराळ्या संस्कृती न्याहाळल्यानंतर मौक्तिकचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कधी उदारमतवादी, कधी मिश्किल तर कधी तात्त्विक असा झाला आहे. सौंदर्यवती सामंथा हिची भर पडल्यामुळे हा प्रवास अधिकच आकर्षक झाला आहे.आपण भारताबद्दल कुठलंही विधान केलं तरी त्याविरुद्धचं विधानही तेवढंच खरं असत हे तर आपल्याला पदोपदी जाणवतं. या मुद्द्यावर प्रकाशझोत टाकण्यासाठी ब्रह्मानंद यांनी मौक्तिक या न्युरोसायंटीस्टच्या व सामंथा या ऍन्थ्रोपोलॉजिस्टच्या नजरेतून विविध उदाहरणांच्या मदतीने आपल्या देशाबद्दलचं एक छान कोलाज पडद्यावर उमटवायचं ठरवलं आहे.
यातून तयार झालेला हा चित्रपट कधी खेळकरपणे तर कधी गंभीरपणे प्रेक्षकांना भारताच्या सद्य परिस्थितीतल्या विरोधाभासाची सैर घडवून आणतो. काही आर्थिकदृष्ट्या पुढारलेले तर काही अजूनही मागासलेले खेडेगाव, कट्टर देशाभिमान जागृत असलेले व देशविरोधी चळवळी सुरू असलेले प्रदेश, सांस्कृतिक वारसा जपणारी अन पुरोगामी विचारांचा पुरस्कार करणारी शहरे असे भारताचे विविध पैलू या चित्रपटातून दिसून येतील.
"गॅप इयर किंवा शाळा कॉलेजचे शिक्षण संपल्यावर एक वर्ष सुटी घेऊन जग फिरणे ही प्रथा युरोपियन, अमेरिकन अन ऑस्ट्रेलियन लोकांमध्ये प्रचलित आहे. अशा प्रवासांतून शिकायला मिळणारे आयुष्याबद्दलचे धडे आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचे असतात. याउलट आपल्या देशात अशा उपक्रमांकडे वेळ वाया घालवण्याचा एक मार्ग म्हणून पाहिलं जातं" असं मौक्तिक म्हणतो.
"मागच्या वर्षी अमेरिकेतून परत आल्यानंतर मी भारतभर बऱ्याच ठिकाणी युवा पिढीबरोबर व्याख्यानांच्या माध्यमातून संवाद साधला. त्यातून आजचा भारतीय युवक जागा झाला आहे आणि त्याला वेगळं काही तरी करून दाखवायची उमेद आहे हे मला स्पष्टपणे आढळून आलं आहे. आता ही युवाशक्ती हिंसक आंदोलनांत वाया जाण्याऐवजी तिला योग्य दिशा दाखवणं आवश्यक आहे. रायडींग ऑन अ सनबीमच्या द्वारे आम्ही तरुणांमध्ये बॅगपकिंगचा प्रवास लोकप्रिय करण्याचा प्रयत्न करत आहोत. वर्षभरापूर्वी एक पेन घेऊन कागदावर जी संकल्पना मांडली होती, तिचं रूपांतर एका चित्रपटात झालेलं आहे, इति मौक्तिक.
चित्रपटाचा प्रोमो व्हिडिओ
मौक्तिक व या चित्रपटाच्या संपूर्ण चमुला चित्रपटाच्या यशस्वितेसाठी मनपूर्वक शुभेच्छा!!
या प्रकल्पासाठी पैसे उभारण्यासाठी चित्रपटाच्या चमूने पब्लिक फंडिंगचा अभिनव मार्ग स्वीकारला आहे. या प्रकल्पाबद्दल कुठलेही प्रश्न असल्यास मौक्तिक कुलकर्णी यांना संपर्क करावा. त्यांचा ईमेल पत्ता - mauktikk@yahoo.com
प्रतिक्रिया
24 Sep 2014 - 8:23 pm | श्रीरंग_जोशी
रायडींग ऑन अ सनबीम या चित्रपटाविषयी अधिक जाणून घ्यायचे असल्यास खालील फेसबुक समुदायाला भेट द्यावी
https://www.facebook.com/groups/118658161641320/
24 Sep 2014 - 8:55 pm | अर्धवटराव
तिकडे मॉम मंगळाला भेटायला गेल्याच्या प्रवासाची बातमी, आणि इकडे तरुणाईच्या काहिसा अपरिचीत आणि नाविन्यपूर्ण प्रवासाची डॉक्युमेंट्री. मस्त उल्हासीत करणारं वातावरण आहे आज.
24 Sep 2014 - 9:17 pm | सुहास..
उत्सुक !!
24 Sep 2014 - 9:44 pm | बहुगुणी
पहायला पाहिजे. ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद!
24 Sep 2014 - 9:46 pm | आतिवास
नवी माहिती आहे. फेसबुक पेजवर बघते अधिक माहिती.
24 Sep 2014 - 10:22 pm | एस
चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागली आहे.
24 Sep 2014 - 11:20 pm | डॉ सुहास म्हात्रे
माहितीसाठी धन्यवाद ! आता बघायची उत्सुकता लागली आहे !
25 Sep 2014 - 10:07 am | नि३सोलपुरकर
ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद!
चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागली आहे.
26 Sep 2014 - 7:52 pm | श्रीरंग_जोशी
सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार. तुमच्याप्रमाणेच मला देखील हा चित्रपट पाहण्याची उत्कंठा आहे.
मौक्तिकची नुकतीच प्रकाशित झालेली मुलाखत - http://yourstory.com/2014/09/riding-on-a-sunbeam/.
26 Sep 2014 - 9:57 pm | दशानन
उत्सुक आणि वाटत पाहतो आहे.
26 Sep 2014 - 10:20 pm | मुक्त विहारि
मंडळ आभारी आहे...
27 Sep 2014 - 2:21 am | स्रुजा
ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद! छान लेख !!
27 Sep 2014 - 9:17 am | ज्ञानोबाचे पैजार
बघायलाच पाहिजे
माहिती बद्दल धन्यवाद
पैजारबुवा,
27 Sep 2014 - 11:17 am | Maharani
ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद..
उत्सुकता निर्माण झाली आहे डाक्यूमेंट्री बघण्याची....
27 Sep 2014 - 6:24 pm | बॅटमॅन
हाण तेजायला. मराठी पाऊल पडते पुढे!!!!
नक्कीच पाहणार हा पिच्चर.
20 Dec 2014 - 8:33 pm | श्रीरंग_जोशी
रायडींग ऑन अ सनबीम - प्रदर्शित होण्यापूर्वीचा अंतिम प्रोमो.
मिपाकरांनी दिलेल्या प्रोत्साहनासाठी मौक्तिकने आपल्या सर्वांचे आभार मानले आहेत.
20 Dec 2014 - 10:31 pm | खटपट्या
अप्रतीम
21 Dec 2014 - 6:12 am | मुक्त विहारि
पाहिला असेल तर परीक्षणाच्या प्रतिक्षेत आहे.
सध्या तरी पहायला मिळेल असे वाटत नाही.
यु-ट्युब वर असेल तर, लिंक दिलीत तर उत्तम..
21 Dec 2014 - 6:16 am | श्रीरंग_जोशी
हा चित्रपट लौकरच प्रदर्शित होणार आहे. तारीख जाहीर केलेली नाही.
या दुव्यावर माहिती मिळत राहील...
https://www.facebook.com/RidingOnASunbeam
21 Dec 2014 - 6:21 am | मुक्त विहारि
पेज , लाइक करण्यात आलेले आहे.
21 Dec 2014 - 10:37 am | एस
चित्रपट नक्कीच पाहू. मौक्तिकच्या संघाचे अभिनंदन आणि शुभेच्छा!