लहान मुलांची आकलन क्षमता/शक्ती

देवदत्त's picture
देवदत्त in जनातलं, मनातलं
15 Dec 2007 - 1:41 am

आज सकाळी कार्यालयात जाण्याकरीता बसमध्ये बसलो होतो. माझा भ्रमणध्वनी वाजला. पाहिले तर बहिणीचा फोन. उचलला पण काही आवाज नाही आला. थोड्यावेळाने बहिणीने संदेश पाठवला की तिने फोन नाही केला. अनिकेत फोनशी खेळत होता. अनिकेत म्हणजे माझा भाचा. वय फक्त ९ महिने. मी बहिणीला संदेश पाठवला. "बरे आहे. त्याला कळते की फोन कसा लावावा. आता तो फक्त बोलणे जमण्याची वाट बघत असेल." :)

आता ह्यात अनिकेतला खरोखर किती कळते ते माहित नाही, पण नेहमीचाच विचार मनात आला, "आज काल लहान मुलांना जास्त कळते."

बहुतेक जण म्हणत असतात की आज कालची मुले smart असतात. ह्याबाबतीत मला माझ्या बहिणीचे मत पटते. "जे सभोवताली असते, त्यातूनच मुले शिकतात ना? आपल्या पालकांनी आपल्याला फक्त चांगल्या गोष्टीच आपल्या समोर ठेवल्यात. ज्या गोष्टी नकोत त्या समोर नाही आणल्यात. त्यावरून आपण शिकलो की काय वस्तू कशाप्रकारे वापरावी. कुठे कसे वागावे. पुढे मग आपण आपल्या अनुभवातून पुन्हा त्या गोष्टींत नवीन जगाप्रमाणे भर टाकली. आता त्या गोष्टी आपण लहान मुलांसमोर ठेवणार. त्यामुळे मुळात जुन्या जगातील नको असलेल्या गोष्टी चाळून गाळूनच इतर त्यांच्यासमोर येणार."
डार्विनचाच सिद्धांत आहे ना तो? (शाळेतले आठवत नाही हो आता)
आता ह्या उदाहरणात, लहान मुलांसमोर आपण ज्याप्रमाणे भ्रमणध्वनी सारखा वापरतो, त्याप्रमाणे त्यांनाही तो हवासा वाटतो. पुढे मग आपले पाहून मग ते लहानपणीच भ्रमणध्वनी वापरायला शिकतील. चुकलो, शिकायला लागलेत.

पण खरोखरच, लहान मुलांची आकलन शक्ती हा अभ्यासाचा विषय आहे. लोकांनी त्यावर संशोधनही केले आहे आणि सुरूही आहेत. बसमध्ये, रस्त्यावर पहा ना. लहान मुले कशी सर्व गोष्टी निरखून पाहत असतात. अर्थात त्यांच्याकरीता सर्व नवीनच असते. पण प्रत्येकाचे निरिक्षण वेगवेगळ्या प्रकारे होत असेल असे मला वाटते. एखाद्या मुलाला भडक रंग जास्त आवडत असतील (बहुतेक लहान मुलांना त्याचे आकर्षण असतेच.) एखाद्याला हलणाऱ्या गोष्टींचे जास्त आकर्षण असेल.

२/३ वर्षांपुर्वी डिस्कव्हरी वर एक कार्यक्रम पाहिला होता. त्यात लहान मुले चालताना शिकतात तेव्हा बहुतेक गोष्टी त्यांना आधीपासूनच माहित असतात असे सांगितले होते, नीटसे आठवत नाही. एखादा मुलगा चालताना, जिना उतरताना आपल्याला तोल सांभाळता येतो की नाही ते नीट पाहतो मगच चालायचा प्रयत्न करतो.
त्या कार्यक्रमात दाखवल्याप्रमाणे, एका लहान मुलाला एका टेबलावर उभे ठेवले आहे. त्या टेबलजवळच दुसरा टेबल ठेवला आहे. दुसऱ्या टेबलजवळ त्याची आई त्याला बोलावते (की असेच काहीतरी). दोन्ही टेबलांच्या मध्ये, तो मुलगा फक्त एकच पाय ठेवून दुसऱ्या टेबलवर जाऊ शकेल एवढ्या रूंदीची पट्टी /फळी ठेवली आहे. त्या मुलाला आधाराकरीता हाताच्या उंचीवर एक दुसरी लाकडी पट्टी दिली आहे, जेणेकरून तो त्या पट्टीचा आधार घेउन त्या फळीवरून दुसऱ्या टेबलवर जाऊ शकेल. इथे तो मुलगा सहजपणे गेला.
पुढे त्याच प्रयोगात हाताच्या लाकडी पट्टीऐवजी एक रबरी पट्टी लावली आहे. जेव्हा त्या मुलाला पुन्हा दुसऱ्या टेबलवर बोलावले, तेव्हा त्याने त्या रबरी पट्टीला हात लावला. त्याला कळले की ही पट्टी आपल्याला आधार देऊ शकत नाही तर तो पुढे गेलाच नाही, आणि रडायला लागला.
तसेच जिना चढताना उतरतानाही लहान मुले कठड्याचा वापर करूनच उतरतात हेही दाखविण्यात आले होते.

आता तुमच्यापैकी बहुतेकांनी हे आधी पाहिले असेलच.
एका मित्राच्या मुलाचे (वय जवळपास १० महिने) तोल सांभाळणे मी पाहिले तेव्हा ते कौतुकास्पद वाटले. झाले काय की मी सोफ्यावर बसलो होतो. तो मुलगा सोफ्यासमोरील टेबलचा आधार घेऊन उभा राहीला. त्याला सोफ्यावर यायचे होते. त्याने उजव्या हाताने टेबल पकडून डाव्याने सोफ्याला हात लावायचा प्रयत्न केला. तो सोफा लांब असल्याने त्याने उजव्या हाताने माझ्या पायाचा आधार घेतला. पुढे आला. मग डाव्या हाताने माझ्या पायाचा आधार घेऊन उजव्या हाताने सोफा पकडला आणि मग सोफ्याजवळ गेला. तेव्हा मला तो डिस्कव्हरीचाच कार्यक्रम आठवला.

जवळपास १२ वर्षांपुर्वी एक ३/४ वर्षांचा मुलगा एक व्हिडीयो गेम खेळत होता. मी गमतीत त्याचे सेल काढून घेतले आणि त्याला सांगितले की हे चालत नाही. त्याने नीट पाहिले, गेमच्या मागील सेलचा कप्पा उघडला आणि म्हणाला की ’इथे सेल पाहिजेत.’ घ्या. आता त्यांना काय काय माहित आहे.

एक गंमत पहा. एखादा लहान मुलगा जर धावता धावता पडला तर तो उठतो. इकडे तिकडे बघतो. जर कोणी आसपास असेल आणि त्याला पडताना पाहिले असेल असे त्याला वाटले, तर लगेच भोकांड पसरतो. अन्यथा जर कोणी लक्ष दिले नाही तर स्वत:च उठून चालायला लागतो.

आणि भरपूर गोष्टी असतील. सध्या तरी एवढेच आठवत आहे. बाकी नंतर कधीतरी.

जीवनमानतंत्रराहणीशिक्षणमौजमजाप्रकटनविचारअनुभवमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

ऋषिकेश's picture

15 Dec 2007 - 2:42 am | ऋषिकेश

अगदी खरय.. यावर डिस्कव्हरीवरील आपण म्हणताय तो कार्य्क्रम मी देखील पाहिला आहे. माझं निरिक्षण असं की आताची मुले धड बोलायला यायच्या आत डिव्हीडी प्लेअर चालू बंद करताना मी स्वतः पाहिले आहे.. त्यांना हवे ते कार्टुन ही मुले लावायचा हट्ट देखील करतात :) अशी अनेक छोटी छोटी उदा. आहेत.
या "स्मार्ट" मुलांकडे पाहून मी लहानपणी फारच "येडपट" होतो असे वाटू लागले आहे :) (कोण रे तो.. अजूनही फरक नाही पडलाय फार तुझ्यात म्हणतोय ;) )

(येडू) ऋषिकेश

शलाका पेंडसे's picture

15 Dec 2007 - 4:56 pm | शलाका पेंडसे

हल्लीची मुलं खूपच स्मार्ट असतात. आपण फारच बावळट होतो असं वाटायला लागतं.

विसोबा खेचर's picture

15 Dec 2007 - 6:23 pm | विसोबा खेचर

एक गंमत पहा. एखादा लहान मुलगा जर धावता धावता पडला तर तो उठतो. इकडे तिकडे बघतो. जर कोणी आसपास असेल आणि त्याला पडताना पाहिले असेल असे त्याला वाटले, तर लगेच भोकांड पसरतो. अन्यथा जर कोणी लक्ष दिले नाही तर स्वत:च उठून चालायला लागतो.

देवदत्तराव,

आपला छोट्यांच्या मानसशास्त्राचा दांडगा अभ्यास दिसतो आहे! :)

सुंदर लेख... अजूनही लिहा ही विनंती!

तात्या.

देवदत्त's picture

15 Dec 2007 - 8:37 pm | देवदत्त

नाही हो तात्या... दांडगा अभ्यास असे काही नाही. जे आहे ते आतापर्यंतचे निरीक्षण.

आता त्या पडण्याच्या प्रकाराचा मित्राच्या मुलावर आम्ही प्रयोग करतो. तो जर पडला, तर खास लक्ष दिल्याचे दाखवत नाही. जर का तो जास्तच रडायला लागला किंवा वाटले की त्याला खरोखरीच लागले असेल, तर मग (आपण जे नेहमी करतो तसे) त्याला सांगतो की काही नाही झाले, किंवा त्या जागेवर त्यालाच चापटी मारायला लावतो. तो ही चापटी मारता मारताच हसायला लागतो.

प्राजु's picture

17 Dec 2007 - 9:05 am | प्राजु

सध्या माझ्या घरात घडताना मी रोज पाहते आहे. माझ्या वयाच्या १८ व्या वर्षी मी काँप्युटर ला प्रथम हात लावला. तेव्हा बोंबलायला इंटरनेट नावाचा काही प्रकार असतो हे माहिती हि नव्हते. आज माझा ४ वर्षांचा मुलगा इंटरनेट एक्सप्लोररच्या ऍड्रेसबार मध्ये www.starfall.com असे टाईप करून ती साईट चालू करून त्यावर मस्त खेळत बसतो..
इतकेच नव्हे तर.. क्रेडिट कार्डवर शॉपिंग करायचे हे ही त्याला माहीती आहे. तो वॉलमार्ट च्या काऊंटरवरचा बिलिंग करणारा माणूस आणि मी शॉपिंग करून त्याच्याकडे बिलिंग साठी यायचे आणि मग कार्ड स्वाईप करून पेमेंट... असा रोजचा खेळ आहे आमचा.

- प्राजु (खेळून दमलेली )

सोनम's picture

29 Mar 2009 - 4:44 pm | सोनम

तुम्ही लेख छान लिहिला आहे. :) :) :)

माझा भ्रमणध्वनी वाजला. पाहिले तर बहिणीचा फोन. उचलला पण काही आवाज नाही आला. थोड्यावेळाने बहिणीने संदेश पाठवला की तिने फोन नाही केला. अनिकेत फोनशी खेळत होता.
माझी भाची १ वर्षाची आहे. पण तिला मोबाईल दिला की ती ही कोणते ही बटन दाबून कोणालाही फोन लावते. तिची आकलन शक्ती पाहून मला तर खूप नवल वाटते तिला एवढ्या लहान वयात किती समजते.

एक गंमत पहा. एखादा लहान मुलगा जर धावता धावता पडला तर तो उठतो. इकडे तिकडे बघतो. जर कोणी आसपास असेल आणि त्याला पडताना पाहिले असेल असे त्याला वाटले, तर लगेच भोकांड पसरतो. अन्यथा जर कोणी लक्ष दिले नाही तर स्वत:च उठून चालायला लागतो.
लहान मुले कधी पडली तर रडत नाही. स्वत : हा खेळता खेळता पडली तर रडत नाही. आणि आजूबाजूला कोणी असेल तर लगेच रडायला सुरुवात करतात.