कर्मयोगी! (भाग पहिला)
कर्मयोगी! (भाग दुसरा)
कर्मयोगी! (भाग तिसरा)
कर्मयोगी! (भाग चौथा)
कर्मयोगी! (भाग पाचवा)
कर्मयोगी! (भाग सहावा)
कर्मयोगी! (भाग सातवा)
पूर्वसूत्र : "हल्ली दमसास टिकत नाही त्यामुळे मनासारखे वाजवता येत नाही!" आजोबा म्हणाले. त्यामुळे ते जरा नाराज होते. पण एकेकाळी हे उत्तम बासरीवादन करीत असणार ह्याची चुणूक त्यांच्या वादनातून निर्विवादपणे दिसते!
------------------------------------------------------------------------
एकीकडे अभिजीत मोठा होत होता. बघता बघता दहावीचे वर्ष आले. तो इंग्लिश गणितासाठी दहिसरला खाजगी शिकवणीला जात असे. तिथे उत्तम गुण मिळवून हा पहिला येत असे. दहावीला त्याला ८७% मार्क्स मिळाले. गणितात त्याला गुण थोडे कमी मिळाल्याने त्याचा नंबर बोर्डात येऊ शकला नाही. अकरावी, बारावीसाठी त्याने पार्ला कॉलेज निवडले. तिथे १२ वी झाला खरा पण त्याला पुन्हा मार्क्स कमी मिळाल्याने इंजिनिअरिंगला जाता आले नाही. तो नाराज झाला. मग मॅट्रिकच्या मार्कांवर मी त्याला विजेटीआयला डिप्लोमा मेकॅनिकलला अॅडमिशन घेऊन दिली. त्याने तिकडे जवळजवळ ४-५ महिने पूर्ण केले. तसा तो मनातून खूष नव्हताच. एक दिवस त्याला त्याच्या मित्राच्या आईकडून समजले की 'वसंतदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालत, सायन' इथे काँप्यूटरला जागा आहेत. त्याने ते सौ. सरलाच्या कानावर घातले. तिने त्याला सांगितले "बाबारे, खाजगी महाविद्यालयाची फी आपल्याला परवडणार नाही. आपली तेवढी ऐपत नाही. जे आहे त्यातून तू शिक्षण घे." पण सौ. ने माझ्याही कानावर ही गोष्ट घातली.
मी म्हणालो "हो फी भरता येणे शक्यच नाही पण तरीही वसंतदादा कॉलेजला जाऊन यायला काय हरकत आहे. फार तर पैसे नसताना कशाला आलात म्हणतील. तसेही जे आहे ते चालूच आहे."
बोरिवलीला माझा मेव्हणा श्री.सुरेश गोखले असतो. त्याला म्हटले "अरे बाबा असे असे अभिजितच्या अॅडमिशनचे काम आहे बरोबर येतोस का?" तो आणी मी बरोबर कॉलेजात गेलो.
कमिटीसमोर मिटिंग झाली. मी सांगितले "माझ्याजवळ फार पैसे नाहीत. मी तुमची फारशी फी देऊ शकणार नाही. अगदीच थोडी देऊ शकेन पण मुलगा हुषार आहे. त्याला अॅडमिशन देऊ शकलात तर तो नाव काढेल."
तेव्हा तिथले अधिकारी म्हणाले "अहो सावरकर, सगळेच असे म्हणतात की त्यांचे मूल हुषार आहे. तुम्ही आमच्या चार वर्षांच्या रु ३५००० पैकी किती फी देऊ शकाल?"
मी म्हणालो "पाच हजार देऊ शकेन."
ते म्हणाले "ताबडतोब भरा."
मी म्हटले "अहो इतके पैसे रोख माझ्याजवळ असते तर मग ३५००० सगळेच नसते का भरले? मला २-४ दिवसाची मुदत द्या."
तिथल्या लोकांनी थोडा विचार केला, काही चर्चा केली आणी कशी कोण जाणे अभिजितला अॅडमिशन मिळाली!
मी त्यांना सांगितले "तुम्ही प्रवेश दिला आहे तर मी खात्रीने सांगतो की तो ह्या सेमेस्टरला पहिला येईल!" खरेतर परीक्षेला केवळ दीडेक महिनाच राहिला होता तरीही कसा कोण जाणे मी हे बोलून गेलो!
आता पुढचा प्रश्न फीचा होता. सर्व वर्षांची मिळून नाही म्हटले तरी रु. २५००० फी जमा करायची होती. गिरगावातल्या ब्राम्हणसभेत कर्जाकरता विचारणा केली. ते म्हणाले की आम्ही एवढे पैसे देऊ शकत नाही. थोडीफार मदत करु. त्यांची तक्रार अशी होती की आधीच्या अनुभवात कित्येक विद्यार्थी पैसे घेऊन गेले. पुढे शिकून नोकर्या मिळवल्या, बरेचजण परदेशातही गेले पण पुन्हा संस्थेत फिरकत नाहीत. संस्थेला मदत तर राहूच द्या नेलेले पैसेही परत करण्याचे नाव नाही!
सौ.सरलाच्या बहिणीचा मुलगा बँक ऑफ इंडियात आहे तो म्हणाला आपण बॅंकेत शैक्षणिक कर्जासाठी प्रयत्न करुन बघू. त्याने थोडी खटपट केली आणि बँकेने कर्ज मंजूर केले. मी अभिजितला सांगितले "बाबा रे, हे कर्ज तू तुझ्या जबाबदारीवर घेतो आहेस हे पक्के ध्यानात घे. आम्ही तुझे क्षेमकुशल बघू शकतो पण उद्या कर्ज फेडा म्हणलास तर ते आम्हाला शक्य नाही हे तुला माहीत असलेले चांगले!" कदाचित हे बोलणे थोडे रोखठोक वाटेल. परंतु मी अनुभवाने एक गोष्ट शिकलेलो आहे की तुम्ही जेवढे मनमोकळे, स्पष्ट आणि परिस्थितीची योग्य जाणीव मुलांना देऊन असाल तेवढे तुमचे आणि मुलांचे संबंध चांगले रहातात. त्यांच्या मनात कुठल्याही प्रकारच्या वावग्या कल्पनांना थारा मिळत नाही. असो. आता अभिजितच्या शिक्षणाचा प्रश्न सुटला होता. एव्हाना नोव्हेंबर उजाडला होता. डिसेंबरमध्ये पहिल्या सहामाहीची परीक्षा आली! केवळ एकच महिना अभ्यास करुन देखील तो पहिल्या सेमेस्टरला पहिला आला. मी अभावितपणे कॉलेजच्या लोकांना दिलेला शब्द त्याने खरा केलान. पुढेही त्याने सर्व वर्षात फर्स्टक्लास मिळवून चांगले यश मिळवले.
शेवटल्या वर्षाच्या प्रोजेक्टसाठी तो गोदरेज कंपनीत जात होता. त्याचे काम बघून तिथले मॅनेजर श्री. परपेरिया म्हणाले "तू आमच्याकडे जॉइन होशील का?" ह्याने लगेच हो म्हणून सांगितले. त्याची प्रवेशपरीक्षा घेतली त्यात हा ४८/५० गुणांनी पास झाला. लगेच तिथे नोकरी सुरु झाली. थोड्याच दिवसात ह्याला कामासाठी कंपनीने विमानाने बंगलोरला पाठवले. आजोबा माझ्याकडे रोखून बघत म्हणाले "आताच्या काळात देशोदेशी प्रवास करणार्या लोकांना हे सगळे किरकोळ वाटेल. आणि मी कसला बडेजाव सांगतो आहे असे कदाचित वाटू शकेल परंतु ज्या परिथितीतून आम्ही सुरुवातीला गेलो आहोत त्यामानाने ह्या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी नवलाईच्याच होत्या. कधी स्वप्नातही आल्या नव्हत्या." ह्या नोकरीतून त्याने बँकेचे सर्व कर्ज फेडले आणी एका जबाबदारीतून मोकळा झाला. त्यामुळे आम्हालाही बरे वाटले. एकीकडे गोदरेजमध्ये रुजु झाला तरी त्याला संगणक क्षेत्रात काम करायचे होते हा त्याचा ध्यास पक्का होता. पुढे दीडेक वर्षातच त्याने जिऑमेट्रिक सॉफ्टवेअर ह्या कंपनीत इंटरव्यू दिला आणि तिथे त्याची निवड झाली. कंपनीने मग त्याला २००३-०४ साली स्टुटगार्ट, जर्मनी येथे पाठवले. आधी तिथे केवळ वर्षभरासाठीज जाणार होता. पुढे मुक्काम वाढल्यावर त्याने आग्रह धरला की "आई-बाबा तुम्ही दोघेही माझ्याकडे या!" ह्या उतारवयात कुठे प्रवास करायचा असे म्हणत होतो पण त्याने फारच नेट लावला. मग त्याच्या आग्रहाखातर उभयता २००५ साली जर्मनीला गेलो. "स्टुटगार्टच्या विमानतळावर आम्हाला नेण्यासाठी आलेल्या अभिजितला बघितले, त्याच्या चेहेर्यावरचे भाव इतके उत्फुल्ल, समाधानाचे आणि कर्तव्यपूर्तीचे होते की आयुष्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले!" आजोबांचा गळा अवरुद्ध झाला होता. आयुष्यातल्या एका टप्प्याची आठवण त्यांना आनंदाश्रूंचे लेणं देऊन गेली!
थोडे सावरल्यावर ते म्हणाले "आमच्या नातीचा चि.गार्गीचा जन्म स्टुटगार्टचा. आमच्या तिथल्या वास्तव्यातच आम्हाला नातीचे सुख मिळाले. त्यानंतर अभिजित जेव्हा पुन्हा बंगलोरला आला तेव्हा त्याच्या दुसर्या अपत्याचा चि.आदित्यचा जन्म झाला. आणि आज तर तुमच्यासमोर मी अमेरिकेत आहे!" इथला विसा तुम्हाला मिळणार नाही असे अनेक लोक खात्रीने सांगत होते. माझ्यासारख्या ८५ वर्षाच्या माणसाला वयामुळे प्रवासाची शक्यताही अवघड वाटत होती. पण मी मेडिकली फिट ठरलो आणी वीसा मिळाला, इकडे यायला मिळाले. मुलाचा भरलेला संसार बघायला मिळाला.
मला वाटते मी माझ्याबद्दलच बोलतो आहे पण माझ्या भावंडांबद्दल फारसे सांगितले नाही. एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की "दूरदर्शनवर, तसेच मराठी व हिंदी सिनेमामधून चमकणारे नामवंत अभिनेते श्री. जयंत सावरकर हे माझे धाकटे बंधू आहेत. नटवर्य कै.मामा पेंडसे ह्यांचा हा जावई. 'उत्तरायण' ह्या प्रसिद्ध सिनेमाचे कथा पटकथा लेखक श्री. कौस्तुभ सावरकर हा जयंताचा मुलगा, आमचा पुतण्या. 'एवढंसं आभाळ' ह्या सिनेमाचे कथा, पटकथा लेखनही त्यानेच केले आहे. लहानपणापासून अनेक सिनेमातून बालकलाकाराच्या भूमिकाही त्याने केल्या आहेत. हे सांगण्याचे कारण म्हणजे हे सगळे माझे निकटचे नातेवाईक आहेत आणि त्यांचा अभिमान वाटतो. माझे दुसरे धाकटे बंधू कै.गोपाळराव ह्यांचा गुहागरला कॉंट्रॅक्टरचा बिझिनेस आहे. व्याडेश्वराच्या देवळाजवळ त्यांची इस्टेट आहे. आता त्यांची मुले सर्व कामकाज बघतात.
तुमचा आयुष्याकडे बघायचा दृष्टिकोन काय आहे असे विचारल्यावर आजोबा म्हणाले "आयुष्यातून आनंद निर्माण झाला पाहिजे. आपलं जगण्याचं उद्दिष्ट काय आहे हे समजायला हवं. हे करायचं नाही ते करायचं नाही अशा आडकाठी करायची नाही. आमचे वडील नेहेमी सांगत की ज्या गावात जाल त्याप्रमाणे राहणे ठेवा. नाविन्याला बिचकायचं नाही. कुढत बसायचं नाही. आम्हाला रडणं माहितीच नाही. परिस्थिती येतच असते आणि आपण त्यातूनच मार्ग काढायचा असतो, त्यातंच कर्तृत्व सिद्ध होतं. आमचे वडिल सतत नामस्मरण करायचे. "नारायण, नारायण" हा जप सातत्याने त्यांच्या तोंडात असे. मीही नामस्मरण करतो. "श्रीराम जय राम जयजय राम" हा त्रयोदशाक्षरी मंत्र जपतो. माझा विश्वास आहे. माझे आयुष्य बघितलेत तर अडचणी आणि त्याचे निराकरण हे हातात हात घालूनच कायम माझ्यासमोर आलेले दिसतील"
त्यांच्या दिनक्रमाबद्दल बोलताना ते म्हणाले "गेली सात वर्षे दहीसरला आम्ही दोघेच राहतो. पहाटेपासून आमचा दिवस सुरु होतो. ४.४५ ला उठून शुचिर्भूत होऊन माझे रामरक्षा, गायत्री मंत्र आणि सूर्याची २४ नावे अर्घ्यासह होतात. पेपर आणणे, दूध आणणे, किराणा सामान आणणे ही सर्व कामे माझी मीच करतो. बासरीचा रियाज करतो. स्वरांच्या सान्निध्यात चित्त आनंदी रहाते. मी अजूनपर्यंत लोकलने प्रवासही करीत होतो. आताशा तब्बेत बरी नसते मग नाईलाजाने टॅक्सी करावी लागते. कित्येकदा "तुम्हा म्हातार्यांना इकडे ठेवून तुमचा एकुलता एक मुलगा आणि सून परदेशी कसे गेले?" असे लोक विचारतात. त्यावर मी सांगतो की आम्ही आमचे आयुष्य जगलो. माझे वडील गुहागरात होते आणि मी भरपूर भटकलो. आमचे आनंद आम्ही मिळवले. त्यांचा आनंद त्यांनी मिळवावा. त्यात आम्ही आड का म्हणून यावे? अभिजित - अस्मिताचे लग्न झाले तेव्हाही त्यांना आम्ही सांगितले की तुम्हा उभयतांना वेगळे रहायचे असेल तर आमची ना नाही. तो तुमचा निर्णय असेल."
माझं लोकांना एकच सांगणं आहे की मुलांवर असे प्रेम करा की ती आपण होऊन तुमच्याजवळ येतील. अपेक्षा ठेवू नका. त्यांना आयुष्याचा आनंद घेऊ देत. लोक आम्हाला बोलतात "वा आजोबा, ह्या वयात अमेरिकेला! घ्या फिरुन घ्या!!" पण मला ते पटत नाही. आता ह्या वयात आम्ही काय बघणार, काय फिरणार. आम्ही इथे फिरण्यासाठी आलेलो नाही तर मुलांच्या संसारात आनंद घेण्यासाठी आलो आहोत. नातवंडांशी गप्पा मारायला आलो आहोत. हे मी उद्वेगाने म्हणत नाही. समाधानाने म्हणतो. आमचे सगळे जगून झाले आहे. आम्ही सुखी आहोत. आमचे मन अजिबात विटलेले नाही. प्रत्येक आईबापाने आपल्या मुलांना असे प्रेम द्यायला हवे की मुलाला बापाबद्दल द्वेष वाटता कामा नये." मग एकदम हसून म्हणाले "असो. मी भाषणच द्यायला लागलो की!"
दर फेब्रुवारी महिन्यात आम्ही उभयता ताम्हनमळ्याला जातो. सौ.सरलाच्या माहेरी गोखल्यांकडे दरवर्षी माघी गणपतीचा उत्सव असतो. दरसाल एका भावंडाकडे कार्य लावून दिलेले आहे . "विराग उत्सव मंडळ" असे मंडळाचे नाव आहे. तीन दिवसाचा उत्सव असतो. झाडून सगळी गोखले मंडळी जमतात. बरेचसे लोक मुंबईवरुन येतात. मुलं, सुना, नातवंडे सगळे आवर्जून येतात. अगदी तरुण पिढीचे लोकही आवर्जून येतात. मोठे कौटुंबिक संमेलनच होते. अंतराने लांब रहात असले लोक मनाने जवळ आहेत!
भारतातून परदेशात आलेली वयस्कर मंडळी कंटाळून जातात असे आपण ऐकतो. "तुम्हाला परदेशात कंटाळा येत नाही का?" असेही विचारतात लोक. मी म्हणतो मुला-सुनेकडे कंटाळा कसला? आपलेच घर आहे, नातवंडे आहेत. तुमचे मन रमवण्याची साधने तुम्ही शोधून काढायला हवीत. त्यांच्या आनंदात तुमचा आनंद असायला हवा. सौ.सरलाला वाचनाची अत्यंत आवड आहे. सतत वाचत असते. चर्चा करते. राजकारणात काय चालले आहे त्याबद्दलही चर्चा करते. प्रत्येक गोष्ट पॉझिटिवली बघायची हे ब्रीद आहे. कंटाळा हा शब्द येऊ द्यायचा नाही.
"नवीन पिढीबद्दल तुमचे मत काय आहे? ह्या पिढीला तुम्ही काय सांगाल?" असे मी विचारले.
आजोबा म्हणाले "नवीन पिढी चलाख आहे, स्मार्ट आहे. अनेक गोष्टीत त्यांना गती आहे. शिक्षणाच्या, नोकरी-धंद्याच्या भरपूर संधी आहेत. स्पर्धाही खूप आहे. टीका म्हणून नाही पण एक निरीक्षण म्हणून असे सांगावेसे वाटते की ऐकीव माहितीवर भाषणबाजी करु नका. आपण मेहेनतीने, कष्टाने आपला अधिकार सिद्ध केला पाहिजे आणि तो टिकवून ठेवला पाहिजे. काही माहीत नसताना उगाच वायफळ चर्चा करु नका. शब्दांचे बुडबुडे काढू नका. विषयाची खोली समजून घ्या आणि मग पुढे चला. आनंदी रहा. काम करत रहा. आशा ठेवू नका. पैसा हे साधन आहे, साध्य नव्हे ही गोष्ट कधीही नजरेआड करु नका. हव्या त्या गोष्टी आपोआप मिळत जातात!" मी नतमस्तक होतो. एक कृतार्थ आयुष्य स्वतःच्या तोंडाने स्वतःची कहाणी सांगत होते आणि मी ऐकत होतो. "धन्य भाग सेवा का अवसर पाया!" ही अवस्था काय वेगळी असेल!!
एक समाधानी आयुष्य जगताना श्री.सच्चिदानंद सावरकर व सौ.सरला सावरकर सोबत भाग्यवान अस्मादिक!
(समाप्त)
-चतुरंग
प्रतिक्रिया
14 Sep 2009 - 6:26 am | स्वाती२
कर्मयोगी सावरकर आजोबांची ओळख करुन दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
15 Sep 2009 - 10:24 am | सायली पानसे
जबरदस्त लेख माला. अश्या आजोबांची ओळख करुन दिल्याबद्दल मनापासुन धन्यवाद.
14 Sep 2009 - 6:46 am | सहज
शेवटचा भाग अतिशय वाचनीय.
आज्जी-आजोबांना नमस्कार व त्यांच्या निरोगी दीर्घायुष्याकरता देवाकडे प्रार्थना.
चतुरंगांना धन्यु!
14 Sep 2009 - 7:44 am | विकास
असेच म्हणतो.
(बाकी का कोणास ठाऊक यांच्याबरोबर Six degrees of separation आहे की काय असे मला वाटत आहे).
14 Sep 2009 - 8:36 am | क्रान्ति
सावरकर आजोबांची जीवनयात्रा वाचता वाचता गुंगून जायला होतं! या कृतार्थ, समाधानी लक्ष्मी-नारायणाचं आयुष्य खरंच स्फूर्तिदायक आहे. आजी-आजोबांना अनेकानेक शुभेच्छा आणि त्यांची गाथा आमच्यापर्यंत पोहोचवणार्या चतुरंग यांना शतशः धन्यवाद! =D>
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी
14 Sep 2009 - 10:09 am | समंजस
उत्तम लेख!!!
सावरकर आजोबांच्या आयुष्या बद्दल वाचून आनंद मिळाला!!
14 Sep 2009 - 10:25 am | विसोबा खेचर
मन तृप्त झालं रे रंगा!
सावरकर आजोबांबद्दलची ही लेखमलिका मिपावर यावी हे मिपाचं भाग्य! मिपाला अधिकाधिक समृद्धीकडे नेणारी!
संग्राह्य लेखमालिका...
तात्या.
15 Sep 2009 - 12:05 am | संजय अभ्यंकर
"सावरकर आजोबांबद्दलची ही लेखमलिका मिपावर यावी हे मिपाचं भाग्य! मिपाला अधिकाधिक समृद्धीकडे नेणारी!"
रंगाशेठची अजून एक सेंचुरी!
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
14 Sep 2009 - 1:56 pm | ऋषिकेश
या अप्रतिम जीवनप्रवासाला सामोरे गेलेल्या सावरकर दांपत्यांचे मनापासून अभिनंदन.. आणि दोघांना सदृढ दिर्घायुष्याच्या शुभेच्छा!
या प्रवासाला शब्दबद्ध करणार्या चतुरंग यांचे अनेक अनेक आभार!
ऋषिकेश
------------------
दूपारचे १ वाजून ५३ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक गीत "जीवनगाणेऽऽ गातच रहावे.. झाले गेले विसरूनी जावे.. पुढे पुढे चालावे...."
14 Sep 2009 - 6:46 pm | चित्रा
सावरकर आजोबांची ओळख आवडली. परदेशी राहणार्या मुलांबद्दल त्यांनी दाखवलेला उदारमतवाद खूपच कौतुकास्पद वाटला आणि दिलेला सल्लाही लक्षात ठेवण्यासारखाच आहे.
बाकी सर्व वरीलप्रमाणेच म्हणते.
धन्यवाद.
15 Sep 2009 - 11:25 am | नंदन
वरील दोन्ही प्रतिसादांशी सहमत आहे. आजोबांची कहाणी समर्थपणे आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल मनःपूर्वक आभार.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
15 Sep 2009 - 12:18 am | प्राजु
सुरेख!!
एक पर्वच आहे हे. खूप आवडले लेखन.
आजी-आजोबांना नमस्कार सांगा.
विलक्षण अनुभव जगले आहेत ते.. देव त्यांना भरपूर निरोगी आयुष्य देवो.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
15 Sep 2009 - 9:24 pm | शाल्मली
उत्तम लेखमाला!
सावरकर आजोबांना नमस्कार आणि त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला निरोगी दीर्घायुष्य मिळो ही देवाजवळ प्रार्थना!
सावरकर आजोबांची आम्हा सर्वांना ओळख करुन दिल्याबद्दल चतुरंगांचे पुनश्च आभार! :)
--शाल्मली.
23 Oct 2013 - 10:27 pm | राघवेंद्र
चतुरंग यांना खुप धन्यवाद. आजोबांचा प्रवास खरच थक्क करण्याजोगा आहे.
राघवेंद्र
10 Oct 2014 - 11:36 pm | अमित खोजे
अशा असाधारण व्यक्तिमत्वाची ओळख करून दिल्याबद्दल चतुरंग यांचे मनापासून धन्यवाद.
खरंच त्यांचे विचार, आचरण, संकटांना तोंड देण्याची वृत्ती, शून्यातून सर्वस्व निर्माण करण्याची धमक हे पाहून आपल्यालाच जगायची नवीन उर्मी मिळते. त्यांना भेटायला नक्कीच आवडेल.!
आज माझ्या सध्या नोकरीमध्ये भेडसावणाऱ्या काही प्रश्नांनादेखील या कर्मयोगीने उत्तरे दिली आहेत हे विशेष नमूद करू इच्छितो.
11 Oct 2014 - 1:46 am | चतुरंग
दुर्दैवाने आता सावरकर आपल्यात नाहीत. २०१० सालीच त्यांचे दु:खद निधन झाले! :(