भाग-१ http://www.misalpav.com/node/21739#
दुपार झाली की आमचा मोर्चा वाडिकडे वळायचा....
मग आधि सुरु व्हायचं ते देऊळ बांधणं.हा आमचा दर चारेक दिवसांनंतरचा कार्यक्रम होता. (कारण शेजारचा दुसरा मोठ्ठा कंपू येऊन देऊळ उध्वस्त करायचा,मग आंम्ही त्यांच्या बांधलेल्या किल्ल्यांना भूसुरुंग लाऊन यायचो ;-) )
ही आमची देऊळ करायची परमनंट जागा
आंम्ही खास गवंडीकाम केल्यासारख्या विटा वगैरे पाडून भिंती बांधायचो,चार बाजुनी भिंती बांधुन झाल्या की मग वहिच्या पुठ्याचं मातिच्या पल्पमधे लडबडवुन वाळवलेलं चौकोनी छप्पर,नंतर त्याच पल्पमधे लडबडवलेली नारळाची शेंडीच्या भागाकडची करवंटी कळस म्हणुन लावायची..आणी तयार व्हायचं देऊळ,मग त्यात आत एखादा गणपतिचा लहानसा फोटू लावायचा आणी रात्री उजेडासाठी भुतलपांड्या केशराच्या छोट्या डबिची पणती...ही पणती संध्याकाळी लाऊन आल्यावर रात्री जर का कुणी तिथुन गेलं,तर लांबुनच त्या छोट्याश्या देवळाच्या भिंतिंच्या होलातुन आणी छताच्या पुठ्याच्या फटितून येणारा पणतिचा प्रकाश लांबुन असा दिसायचा,की भुतभूत भुताटकी म्हणत तो पळून यावा!
तोपर्यंत मामा वाडिला शिपण लावायला यायचा,मग आजुबाजुच्या नारळपोफळीच्या आळ्यांमधे त्याचं पाणी साठायला लागलं,की आंम्ही त्यात सुपारिच्या विरि पासुन ही अशी होडी करुन वहात सोडायचो.
मग एकामेकाच्या होड्यांमधे दगड टाकुन आरमार बुडवण्याचं युद्ध चालायचं,त्यात आळंबिळं तुटलं की मामा ''थांबा हो तुमच्या अता..'' म्हणुन काठी घेऊन मागे लागायचा.त्याला चुकवुन परत शेजारच्या वाडित जायचो.मग तिथे पहिली होडि कुणी बुडवली? यावरुन थोरल्या भावंडांची कमिटि बसून बरेचदा माझा व माझा तसल्या कारवायंमधला तेंव्हाचा राइट हँड,मामेभाऊ-धन्या असं दोघांच्या शिक्षेचं फर्मान निघायचं.मग थोरली भावंड आमच्या कपाळावर पिचकि ची फळं फोडायची...शिक्षा म्हणुन!
हे आतलं मऊ फळं...ते कपाळावर फोडलं की त्यातला चिकट गर पचकन सगळिकडे तोंडावर उडायचा
मग ४ वाजत आले की घरी जाऊन चहा बट्रर/टोश्टं खाऊन पुन्हा वाडित यायचो कधि पत्ते खेळले जायचे,तर कधी मागच्या शेतातल्या वडावर सूरपारंब्या..हो पण अजुन एक दोन मज्जा दाखवायच्या र्हातील... वाडितल्या मातित हे शंकूच्या आकाराचे छोटेसे खळगे पडलेले असायचे
त्यात काडी गोल गोल फिरवत ''मोरा मोरा मुंबैची वाट दाखव ना..!'' असा मंत्र म्हटला की त्यातुन एक ढेकणा सारखा बारिक किटक बाहेर यायचा,पकडायला जाईपर्यंत परत मातित गाडुन घ्यायचा... त्याला मोर का म्हणायचे मला आजही माहित नाही,काडीनी गोल गोल फिरवत वन्स-मोर दिल्यावर बाहेर येतो...म्हणुन असेल कदाचित..! ---''मोरा मोरा मुंबैची वाट दाखव ना..!''
बाहेर आलेला वन्स-मोर... ;-)
मग मी कधी कधी मूड आला तर त्याच माझ्या राइटहँडला,धन्याला घेऊन वाडित पानाचं दुकान लावायचो, पुना बनारस आणी कलकत्ता असे तिनही ब्रँड अॅव्हलेबल असायचे. त्या पानातले जिन्नस म्हणुन- भिंतिला फासायच्या चुनखडीतला चुना/मातिच्या पल्पचा कात/लाकडाच्या भुग्याची सुपारी/आणी पानपाचोळ्याच्या चुर्याचा तंबाखू..अशी अजोड तयारी असायची.
पूना सादा
हे कलकत्ता..
आणी हे बनारस..
हे दुकान अवरता अवरता...म्हणजे मावशीच्या कश्टमची-नरवेलाची लय बेक्कार लागणारी शिमटी घेऊन दुकानावर धाड पडली की मुद्देमाल तस्साच सोडून,आंम्ही समुद्रावर धूम ठोकायचो...
हरेश्वरला आमच्या घरामागेच समुद्र आहे... चला जाऊ तिकडे---
मग तिथे तर काय...आहाहा...पाण्यात पार संध्याकाळ होईपर्यंत अशी काही चंगळ चालायची की त्याला जगातल्या कुठल्याही पार्क-केलेल्या-वॉटरची सर येणार नाही..त्यातच वाळुचे किल्ले,बीच क्रिकेट हे ओल्या कपड्यांनीच चालायचं...वाळलं,,,की पुन्हा पाण्यात!
हरेश्वरचा समुद्र किनारा...
हा समोर मोरेश्वराचा डोंगर
केवड्याचं बन
आणी अता या दोन पूर्ण नॅचरल स्मायल्या---ओळखा पाहू...?
समुद्रावरनं कपडे वाळवुन गपचुप घरी यायचो...(वाटेत कुणाच्यातरी व्हिरी वर ते धुतलेले असायचे,पण दुसर्या दिवशी अंघोळीच्या वेळी केसात अडकलेली समिंदराची वाळू -घाण- करायची. किंवा प्यांटिच्या खिशात अडकलेली कपडे धुताना कळायची..आणी ते मावशिला कळ्ळं की पुन्हा बुकलले जायचो..)
घरी आलो की मग झोपाळ्यावरची सवारी सुरु व्हायची...
-झोपाळा हा कोकणच्या घरांचा आत्मा आहे.आजही एखाद्या माणसानी कोकणात,भलंमोठ्ठं घर बांधुन ते अख्खं एसी केलं.तरी जर त्याच्या घरात ओटिवर झोपाळा नसेल तर तो माणुस कोकण संस्कृतीच्या हिशोबी ''बाद खात्यात'' लागेल. अश्या घराच्या वास्तुशांतीला गावातली लोकं आली तर ती घरमालकाला,काय ह्हो... झोपाळा नाय बांधलात---एवढं घर बांधून..!? असं जागेवर प्रेझेंट देतील.नंतर मागुन गावभर,''हा बंss..असांss कांssय तोंss...!झोपाळाच नाय केलान, येवढं घर बांदुन!'' असा त्याच्या नावानी गुलाल उधळत फिरतील ते वेगळच.
''झोपाळा''..
याच झोपाळ्यावर मी.. सुट्टीत आलेल्या माझ्या मावस/मामे भावंडांबरोबर मराठी/हिंदितली यच्चयावत गाणी म्हणत जवळ जवळ सुट्टितली प्रत्येक संध्याकाळ घालवलेली आहे. साधारण संध्याकाळी ६नंतर ,बाहेरून गाव उंडारुन आल्यावर-''हातपाय धुवुन,जरा देवापुढे बसा रे...रामरक्षा म्हणत(नस्ता व्याप तो सुट्टितला) '' असं झालं ,की कशिबशी ती रामरक्षा म्हणुन सगळेजणं ह्या झोपाळ्यावर झाशिची राणी जशी घोड्यावर बसली तसे आरुढ व्हायचो..आणी झोपाळा अख्खा फ्रंट-बॅक लोड झालेला असायचा. मग आम्ची पायानी झोके काढत गाणी सुरु व्हायची. प्रांत कोकण असल्यामुळे सुरवात नेहमी नाट्यसंगितानी व्हायची,''रम्य ही स्वर्गाहुनी लंकाss'' नंतर पुढच्या गाण्याला, ''शंकर डमरुडम बोलेss...आss आss'' असा मधेच कोरस लागायचा आणी नंतर लगेच गाडी,'' माझे माहेर पंढरी''वर यायची..त्यातच अचानक कुणितरी''पर्बतों से आज मै टकराss गया--हे झोपाळा वर जाताना--आणी खाली येऊन परत वर मागे जाई पर्यंत मागुन कोरस--''तुमने दी आवाज लो मै आss गयाss...'' हे गाणं म्हणायचा.पण का कोण जाणे या गाण्याचं एकही कडवं त्यावेळी कधिही कुणालाही अठवायच नाही... मग विसरल्या सारखं झालं कि लगेच ''शूर आम्ही-सरदाssर आंम्हाला काय कुणाची भीssती'' हे चालु व्हायचं... तो पर्यंत ''एss,बास झाले तुमचे झोपाळे, जे(य*)वाला चला रेss'' अशी मामाची करडी हाक यायची. (*या हकेतलं वैशिष्ठ्य म्हण्जे जेवाला हा उच्चारी शब्द.! संपूर्ण रायगड जिल्ह्याला य हे अक्षर बर्याचश्या ठिकाणी सायलंट आहे...म्हणजे-कराला,मराला, असं तिकडे सगळ चालत... )
मग आंम्ही दिवसभर कारवाया करुन दमलेले वीर, समोर आलेल्या जेवणावर अडवा हात मारुन,बाकिच्यांची जेवणं होइपर्यंत,कुणी अंगणातल्या बाजेवर,कुणी झोपाळ्यावर ,कुणी तसेच जमिनीवर,असे अंथरुणं लागेपर्यंत धाराशाई व्हायचो...मग मामा/आई/मावशी असे आंम्हाला तिथुन ओढत...''उट..उट..उट..चल हातरुणावर..'' ''बापरे काय मख्ख गोळा झालाय या पल्ल्याचा..!'' असे उद्गार काढत अंथरुणावर आणुन टाकायचे.... आणी रात्रीच्या सरत्या वेळेत मी आई आणी मावशीच्या मधे,गावातल्या उलाढालीं विषयी चाललेल्या दबक्या अवाजातल्या गप्पा ऐकत ऐकत कधी गाढ झोपायचो ते मला कळायचंही नाही... ही आईच्या कुशितली गप्पांच्या नादात मिळणारी झोपेची गोळी दुसरिकडे कुठ्ठेही मिळणार नाही... यावेळी हरेश्वरला माझ्या जवळ ही गोळी नव्हती,पण आठवणींच्या गोळिने ते माझं काम बरचसं सुकर केलं,असं मात्र मला खात्रिने म्हणता येइल...
प्रतिक्रिया
23 May 2012 - 5:07 pm | पियुशा
आवडेश ,आवडेश अगदी त्रिवार आवडेश
मस्त सफर घडवुन आणली तुमच्या गावाची :)
26 May 2012 - 9:34 pm | मृगनयनी
मस्त मस्त मस्त!!.. लयी भारी फोटो!!!!..... झोपाळा मस्त आहे... आणि दिलेल्या माहितीमुळे आमच्या ज्ञानात अधिक भर पडली!!! :) :)
23 May 2012 - 5:29 pm | प्रचेतस
पहिला भाग सुंदर होताच पण हा भाग अप्रतिम झालाय.
लहानपणच्या रम्य आठवणींची सफर एकदम मस्त घडवलीत.
लेखाचा समारोप एकदम भावुक करणारा.
23 May 2012 - 5:31 pm | प्यारे१
सुपर लाईक हो भटजी!
23 May 2012 - 5:45 pm | निश
अत्रुप्त आत्मा साहेब ,
निव्वळ लाजवाब, अप्रतिम, सुंदर, मस्त, वा, छान, सुरेख, झकास, भन्नाट, लय भारी, फक्कड,
एकदम सही....
अहो कौतुकाचे शब्ब्द पण अपुरे आहेत कौतुक करायला एवढा चांगला लेख झाला आहे.
23 May 2012 - 5:49 pm | मोहनराव
डोळ्यासमोर जसंच्या तसं चित्र उभे केलंत तुमच्या बालपणीचे! लाजवाब!!
23 May 2012 - 6:06 pm | पिंगू
लय भारी भटजीबुवा..
आता एकदा तरी हरिहरेश्वरला जायलाच पाहिजे.
- (कधीही हरिहरेश्वरला न गेलेला) पिंगू
23 May 2012 - 6:13 pm | वपाडाव
१. उभ्या सळयांच्या खिडक्या,
२. बैठकीतील बांधलेली बंगइ (झोपाळा),
३. शहाबादी फरशा,
४. माळवदाचं छत,
५. चौकट असलेले दोन पटांचे दार,
६. एवढं मोठ्ठं अंगण
हे सगळं पाहुन ऊर लै भरुन आला...
अन त्यावर तुमचं मुक्तपणे बागडणं... अन सोबत आम्हालाही उडवणं...
भटजीबुवा, यु इज रियल्ली रॉक्स !!!
23 May 2012 - 6:23 pm | भीमाईचा पिपळ्या.
व्वा भटजीबुवा लै भारी.
:)
हे खूप म्हणजे खूपच आवडले. किती सोस इंग्लीसचा. :D
23 May 2012 - 6:15 pm | राजघराणं
लय भारी भटजीबुवा..
आता एकदा तरी हरिहरेश्वरला जायलाच पाहिजे. .. मुक्काम तुमच्याकडेच
23 May 2012 - 7:08 pm | पैसा
हरिहरेश्वरची आणि तुमच्या बालपणाची मस्त सफर घडवलीत. त्यामुळे मला पण लहानपणचे बरेच उपद्व्याप आठवले. धन्यवाद!
24 May 2012 - 2:10 am | मोदक
+१
23 May 2012 - 8:05 pm | रेवती
तुमचं लेखन आणि फोटू बघून तिथे जाऊन आल्यासारखं वाटलं.
आम्हीही दर उन्हाळी सुट्टीत कोकणात काकांकडे जायचो.
तुम्ही देऊळ बांधायचात तसं आम्ही घर बांधायचो.
काकांनी तिथल्या वाचनालयाला बरीच देणगी दिल्याने आम्हाला ते प्रत्येकी ५ पुस्तके नेऊ देत असत.
रोज सायकली भाड्याने घेऊन चालवणे, लाल मातीत व समुद्रावर खेळणे, आंबे उतरवायला माणसे आली की त्यांचे काम पहाणे, देवळात गारव्याला गप्पा मारत बसणे यात दिवस संपायचा. सुट्टीतले वापरलेले कपडे पुन्हा घेऊन जाण्याची गरज पडत नसे इतके मळायचे, लाल व्हायचे. जायचे दिवस जवळ आले की आंब्याच्या पेट्या बांधल्या जायच्या. आजकाल बॉक्सेस असतात पण त्यावेळी लाकडी पट्ट्यांना खोळे ठोकून बनवलेल्या. धान्य पाखडायची सुपे, आमसुले, रातांब्याच्या सरबताचं घरगुती कॉन्सन्ट्रेट, आवळ्याचं लोणचं, आंबापोळी, फणसपोळी अशा वस्तूंनी भरलेल्या सुटकेसा घेऊन घरी यायचो त्यामुळे आठवणी खूप दिवस पुरत असत.
23 May 2012 - 9:03 pm | जेनी...
गुर्जि ..खरच सुंदर आहे गाव.
मामाच्या गावाला जाऊया . हे गान आठवल...
छान छान :)
23 May 2012 - 9:17 pm | स्वच्छंदी_मनोज
व्वा....
खम्प्लीट नॉस्टॅल्जीक केलेत राव... एवढच म्हणतो...
23 May 2012 - 9:40 pm | सूड
छान आहे आजोळ तुमचं, फोटो मस्तच !! वर्णन वाचून नॉस्टॅल्जिक झालो, अर्थात आमचं आजोळ तुमच्यासारखं कोकणातलं नसलं तरी आजोळच्या आठवणी हळवं करुन जातात. झालेले लाड, केलेला दंगा सगळंच. सुट्टी मग ती कसलीही असो दिवाळीची की उन्हाळ्याची चार दिवस तरी माझा मुक्काम आजोळी असे. आमच्या घरी लहानपणी काही खाताना असं खावं तसं खाऊ नये असा प्रकार नसायचा. पोळीभाजी एका हाताने खायची सवय लावली ती आजीने. लहानपणी मला जेवताना डाव्या हातावर जोर देवून तो जमिनीवर टेकून बसायची सवय होती. किती केलं तरी मी काही माझी सवय सोडायला तयार नव्हतो, मग आजीने काय सांगावं ? म्हणे, 'अरे असं जमिनीवर हात टेकून बसलास की जे खाशील ते सगळं जमिनीत जातं, पोटात जात नाही' त्या क्षणी जो जेवताना नीट बसायला लागलो तो आजपर्यंत. आता आजीचं हे उत्तर आठवलं की हसू येतं. लहानपणी कडक शिस्तीचे वाटणारे आजोबा नंतर आठवडाभरात फोन केला केला नाही की 'पोरांनो फोन करत चला रे, काळजी वाटते' असं म्हणायचे तेव्हा कसंसं व्हायचं. म्हणजे ते दम देणारे आजोबा कुठे गेले हा प्रश्न पडायचा. असो...बरंच काही मनात आलं. एवढ्यावरच थांबतो. :)
23 May 2012 - 10:43 pm | मी-सौरभ
हरिहरेश्वरला मी बर्याच वेळा गेलोय पण आता जाईन तेव्हा ही नविन ओळख सोबत असेल :)
(कोकणात असचं टुमदार आजोळ असलेला)
24 May 2012 - 12:20 am | इष्टुर फाकडा
तुमच्या आत्मिक अशांततेमुळे तुमचा नॉस्टॅल्जिया इतका सुंदर उतरलाय कि गोनीदांच्या 'पडघवली' ची जोर्रात आठवण झाली. आता पुन्हा वाचणे आले.
26 May 2012 - 11:17 pm | अत्रुप्त आत्मा
@तुमच्या आत्मिक अशांततेमुळे >>> फारच मन-कवडेबुवा-तुंम्ही ;-)
आंम्ही जाम खुष तुमच्या या संशोधनावर
24 May 2012 - 3:47 am | प्रभाकर पेठकर
लहानपणी खुप खुप मोठ्ठ व्हावसं वाटतं तर मोठ्ठे झाल्यावर लहानपणच्या आठवणी 'त्या' रम्य काळात ओढून नेतात. आता तुमचे हे दोन्ही लेख वाचल्यावर मन भूतकाळातून वर्तमानात यायला तयारच नाही. फार हटवादी आहे ते. पण सुख दिलेत तुम्ही.
शेवटच्या दोन वाक्यांनी बाकी मन हेलावून गेले.
24 May 2012 - 8:01 am | लीलाधर
मस्त मज्जा केलीस राव :) पार अगदी आपल्या मामाच्या घरी घेऊन गेलास हो. आता मनाला हुरहुर लागली बघ पार कधी एकदा मामाकडे जातोय असं झालय रे..........
''बापरे काय मख्ख गोळा झालाय या पल्ल्याचा..!'' हा हा हा हे वाक्य वाचून ह. ह. पु वाट लागली बघ रे :) बाकी पुढल्या खेपेस मलाही आगाउ सांग म्हणजे आणखी मज्जा येईल मामाकडे गेल्यावर.
निव्वळ अप्रतिम सुंदर सुरेख लय भारी बघ...
24 May 2012 - 8:04 am | स्पंदना
काय लिहु? काय वाचु काय बघु? अस झाल नुसत . भिंगरी फिरल्यागत आठवणी फिरव्ल्या तुम्ही अतृप्त! वर वपा म्हंटल्या सारख( हा एव्हढ चाम्गल कस काय लिहुन गेला भाउ? खोडाळ कुठल! मे बी तुमच्या लिखाणाचा परिणाम असावा) उर भरुन आल.
नशिबवान आहात अतृप्त. ती मंदिर, पानाची दुकान, त्या खोड्या अन तो मार. ती गाणी तर कानात भिनली बघा!
24 May 2012 - 8:22 am | Pearl
चांगलं लिहिलं आहे. खूप छान झालेत दोन्ही भाग.
आवडले. आणि फोटोमुळे आमची पण सफर झाली हरिहरेश्वरची.
खरचं नशीबवान आहात.
24 May 2012 - 8:44 am | ५० फक्त
ज ळ व णे, बाकी काही नाही, भेटा आता,
आणि भटो भटो को़कणात गेला होता, हे फोटो आणि रिपोर्ट सोडुन अजुन काय घेउन आला आहात, खोब-याच्या वड्या वगैरे, कधी देणार आहात.
24 May 2012 - 8:48 am | मदनबाण
झोपाळ्यावर बसुन झोका खाण्याची मजा काही औरच असते :)
मस्त लेखन... :)
24 May 2012 - 8:57 am | नाखु
लिखाण आणि स्मरण रंजन... माणुस वर्तमान काळ हा भुत काळातल्या रम्य आठवणींच्या शिदोरीवर जगतो.
गुरु तुम्ही भग्य्वान हीच शिदोरी नव्याने चाखत आहात (आणि आम्हाल वाटत आहात)
दंडवत देवा..
24 May 2012 - 9:19 am | अमृत
एक्दम झाक... मस्त वाटलं वाचून आणि फोटो पण झकास्स्स्स्स.. काल एकपण दिसत न्हवता पण आज समदे येवस्थीत दिसत्यात...
अमृत
24 May 2012 - 10:47 am | सुप्रिया
सुरेख!!
24 May 2012 - 12:37 pm | Maharani
खुपच छान लेख!!मला माझ्या बालपणीचे दिवस आठवले!!!!
24 May 2012 - 2:07 pm | चावटमेला
वा!! मजा आली. आपल्या ह्रदयात दोन नाजूक कोपरे कायमचे घर करून राहतात, एक म्हणजे आपले मूळ गाव जिथे आपण लहानाचे मोठे होतो, शिकतो आणि दुसरे म्हणजे आपले आजोळ जिथे आपण कायमच लहान राहतो. ह्यातला एकही कोपरा थोडा हलवून पाहिला ना तर नकळत स्मित करणारे ओठ आणि तितक्याच नकळतपणे हलकेच पाणावणारे डोळे ह्या दोन्ही अनुभूती एकत्रच मिळतात..
24 May 2012 - 2:18 pm | जागु
वा छानच लिहीले आहे.
तुम्ही ज्याला पिचकीची फळे म्हणता त्याला आम्ही डवचाणे म्हणतो. आमचाही पुर्वी तोच खेळ असायचा.
स्माईली एक खेकड्याची आहे एक माखलीची असावी.
24 May 2012 - 2:26 pm | अत्रुप्त आत्मा
@स्माईली एक खेकड्याची आहे एक माखलीची असावी.>>> येस येस.. करेक्ट :-)
24 May 2012 - 2:21 pm | अत्रुप्त आत्मा
मूळ धाग्यात गर्दी झाली असती,म्हणुन काहि इतर फोटो इथे देतो आहे. :-)
पडवी मागचा शंकर आणी नंदी
वळचणीच्याच चणीची माऊ... हाय का नाय वाघाची मावशिबाय ;-)
अता गाई गेल्या पण मामाच्या गोठ्यात म्हैशी हायेतच..
फोटू घेतोय म्हटल्यावर तिनीच परत ''पोज'' दिलिन ;-)
अता ही व्हिर..मे मुळे तळाला गेलीये... पण भर पावसात यात ,धबाधब उड्या मारायला काय मज्जा यायची..
हे त्या पत्ते खेळायचो त्या विठोबाच्या देवळातले --विठ्ठल रखुमाई... या उभयतांवर माझ्या आईची अशी निस्सिम श्रद्धा होती की तिचं ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन झाल्यावर तीला पहिले ६ महिने बाकि काहिच बोलता यायचं नाही..पण हॉस्पिटल मधे डॉक्टरला ''रखुमाईsss'' अशी हाक मात्र ती बरोब्बर मारायची
हे गावातलं जुनं (अता नविन झालेलं) गणपति मंदिर...
आणी ह्यो आतला बाप्पा..
आणी हे त्याच्याच जवळ बांधलेला ''हरिहरेश्वर कला-प्रसारक मंडळाचा''... म्हणजेच गावतल्या ''नाटकं'' करणार्या ;-) कंपूचा हा स्टेज :-) .. अता गावातलं ''नाटक'' (हनुमान जयंतीला होणारं) हाच एक स्वतंत्र नाटकाचा विषय असल्यानी इथे तो भय कारक विस्तार करत नाही... ;-)
आणी हा त्या स्टेजच्या बरोब्बर समोरचा बीच कडे जाणारा रस्ता... ह्याचा फायदा म्हणजे,कित्तीही माणसं आली,तरी बसायला जागा फुल्ल.. ;-)
24 May 2012 - 3:09 pm | धुमकेतू
अप्रतिम !!!
कोकण आणि आजोळ ह्या दोन्ही गोष्टी मनाला हळव्या करून जातात !
धन्यवाद अतृप्त आत्मा !
24 May 2012 - 4:50 pm | मेघवेडा
मस्त!
गावातल्या नाटकांबद्दल लिहाच आता. :)
24 May 2012 - 5:34 pm | समीरसूर
दोन्ही भाग अत्यंत सुंदर आणि खरोखर 'प्रेक्षणीय' झाले आहेत. लिखाण इतकं छान आहे की स्वतः मीच हे सगळं करतोय की काय असा भास व्हावा. वाचून खूप मजा आली. हा भाग तर खूपच जमून आलाय. अजून येऊ द्या...
--समीर
24 May 2012 - 5:35 pm | यकु
लेख आणि सग्गळे फोटू क्लास्स !
24 May 2012 - 10:20 pm | पिवळा डांबिस
का कुणास ठाऊक पण ही लेखमाला नजरेतून सुटली होती....
आज दोनही भाग वाचले, सुरेख आहेत....
विशेषतः या भागातील पहिला आणि तुमच्या प्रतिसादातील शेवटला फोटो! एकदम आमच्या आजोळाची आठवण आली!!!
जियो!!!
25 May 2012 - 12:20 pm | चौकटराजा
अ आ, एकच शब्द- लाजवाब ! तुम्ही ते मोरा चे घर (?) दाखवले ना ! खरंच बालपणात घेऊन
गेलात. मी हरिहरेश्वर व रामेश्वर इथे समुद्रात मांडी घालून स्नान केले आहे. यासाठी व खडकातील गुहांच्या कोरीव लेण्यासाठी आपले गाव लक्षात कायमच राहील. आता परत गेलो तर रहायचा खर्च वाचला आमचा ! आ चौ रा.
25 May 2012 - 1:52 pm | मृत्युन्जय
निखालस निरागस आणि अतीव सुंदर. झक्कास.
26 May 2012 - 3:28 pm | JAGOMOHANPYARE
छान
26 May 2012 - 11:44 pm | बॅटमॅन
म्हणवता अत्रुप्त पण केलेत आत्यंतिक त्रुप्त :) ढेकर दिला वाचून एक समाधानाचा :)
27 May 2012 - 10:27 pm | भरत कुलकर्णी
सुंदर लेख आणि फोटोसुद्धा!
4 Jun 2012 - 12:42 am | राजहंस
अप्रतिम लेख आणि फोटो पण कमाल च काढलेत.
29 Oct 2014 - 4:58 am | खटपट्या
आत्मु, संपवू नका हो. अजून लिवा ना... फोटो टाका
18 Jun 2017 - 8:26 am | प्रमोद देर्देकर
गुरुजी ,
हा लेख पुन्हा वाचला कारण पुढच्या विकांतला हरिहरेश्वर श्रीवर्धन असा बेत आहे.
18 Jun 2017 - 8:29 am | प्रमोद देर्देकर
गुरुजी ,
हा लेख पुन्हा वाचला कारण पुढच्या विकांतला हरिहरेश्वर श्रीवर्धन असा बेत आहे. जेवणाची सोय कुठे होईल ते ठिकाण सांगा तसेच तो समुद्राच्या काठाने कुठे तरी रोड जातो ते ठिकाण सांगा.
18 Jun 2017 - 10:27 am | सतिश गावडे
18 Jun 2017 - 10:37 am | सतिश गावडे
18 Jun 2017 - 10:43 am | सतिश गावडे
18 Jun 2017 - 9:51 am | कुशल द. जयकर
जेवढ्या छान आठवणी
तेवढं छान लीहीलही आहे
आठवणी आमच्याकडेही आहेत
पण शब्द जुळत नाही ही खंत आहे
लेख फार छान आहे व फोटो
सोने पे सुहागा
18 Jun 2017 - 9:52 am | कंजूस
पाचसहावेळा हरेश्वर श्रीवर्धन केलय. असंच आहे
20 Jun 2017 - 6:56 pm | सिरुसेरि
छान फोटो आणी माहिती . असं आजोळचे गाव , दुर्वांची आज्जी यांची वेगळीच मजा असते .
20 Jun 2017 - 9:12 pm | मोदक
+91 95452 31518
निलेश पाटील - सदगुरू कृपा. या रस्त्यावरच आहे.
बहुदा आधी फोन करून जेवणाची ऑर्डर द्यावी लागेल. इथले जेवण मला आवडले.
21 Jun 2017 - 3:33 pm | हतोळकरांचा प्रसाद
वर आलेला लेख परत वाचला, यावेळेला अजूनच भारी वाटला (कदाचित गावाकडं चक्कर मारायचा बेत मनात घोळत असल्यामुळे असेल ;) ). लै मंजे लैच भारी, गुरुजी!
18 Jul 2017 - 4:13 pm | II श्रीमंत पेशवे II
अप्रतिम लेख आणि फोटो पण कमाल च काढलेत.
डोळ्यासमोर जसंच्या तसं चित्र उभे केलंत तुमच्या बालपणीचे!
श्रीवर्धन ला असेच मोठे झालो आम्ही ...