माझं गाव-हरिहरेश्वर.-१

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
23 May 2012 - 2:37 pm

खरं म्हणजे हरिहरेश्वर माझं अजोळ.पण वडिलांकडून 'हे माझं गावं' असं म्हणावं असं कोणतंही गाव नसल्यामुळे लहानपणापासून,अगदी पहिली/दुसरीत असल्यापासून माझी मे महिन्याची सुट्टी म्हणजे हरिहरेश्वर असं समिकरण झालवतं.सुट्टी लागल्या दिवसापासून ते शाळा सुरु व्हायच्या दिवसापर्यंत मी आणी मोठाभाऊ(दादा), आमची घरुन रवानगी (किंवा हकालपट्टी ;-) ) मु.पो.हरेश्वरला असायची.

मी या पौरोहित्याच्या व्यवसायात पडल्यापासून,मला गेल्या १० वर्षात मे महिना हा अमचा सिझनचा असल्यामुळे माझ्या मामाच्या गावाला कध्धीही जाता आलं नव्हतं.म्हणजे एरवी अधुन मधुन जायचो,पण ती मे महिन्यातली मजा काहि अनुभवता येत नव्हती,पण या वर्षी पंचांगवाले दाते यांचे कृपेकरोन आंम्हा सर्व भटजींना गुरु/शुक्र अस्ताचे निमित्तानी मे महिन्याची सुट्टी मिळाल्यामुळे हरेश्वरला जायचा योग आला. (त्यामुळेच गेल्या अख्ख्या मार्च/एप्रिलचा कामाचा प्रचंड ताण मला एरवी पेक्षा सहज सहन झाला असावा.) तसही मला १०मे पर्यंत बारिक सारिक काम होतच.पण ११मे मी मनानी कोकण दोर्‍याची ओपनींग डेट म्हणुन निश्चित केलेली होती.१० मे-ला माझं चालू काम संपताना/घरी येताना,माझ्या मनात शाळेत असताना शेवटचा पेपर-टाकताना जी खुषी दाटून यायची (ग्येले ते दीस ;-) ) तीच त्या दिवशी आलेली होती. आणी मग पुढे तेच जुन चक्र चालू झालं.१० ला का कोण जाणे कळत नव्हतं,पण होता होता संध्याकाळ होत नव्हती. आणी संध्याकाळ होऊन रात्र झाली तर झोप लागत नव्हती.
अखेर ११ला मी आधी रेवदंड्याला मावशीच्या घरी,आणी तिथुन दुसर्‍याच दिवशी दुपारी माझ्या कळव्याच्या आलेल्या मामासह त्याच्या व्ह्यान मधुन सगळेजण हरेश्वरला गेलो. तिथुन श्रीवर्धन पर्यंत पोहोचलो,आणी मग माझा गावाचा-मोड ऑन>> झाला,कारण पूर्वी त्या लाल डब्यातून एकदा पुण्याहून श्रीवर्धनला येऊन पडलो...(पार्सल सारखे!) की मग पुढे हरेश्वरला नेऊन टाकणार्‍या ,खास खिळखिळ्या झालेल्या,दुसर्‍या लोकल लाल डब्यात पडायचो.मग तो लाल्या उर्फ यश्टीचे विंजिन त्याच्या खास खड्र्रss खड्र्रss घ्यांss घ्यांss अश्या अवाजाच्या कुठल्याही घराण्याशी न जुळणार्‍या रागात आंम्हाला हरेश्वरला नेऊन विसर्जन करायचा. (हो... विसर्जनच! कारण तो पर्यंत त्यावेळी असलेल्या पर्याप्त रस्त्यांमुळे आणी त्याच रस्त्यावर मेंटेन झालेल्या येश्टीमुळे देहातली हाडं खिळखिळी होऊन अस्थी विसर्जनाचीच वेळ आलेली असायची)

पण यावेळी रस्ताही छान होता आणी बरोबर मामाची व्ह्यान होती म्हणुन,आणी आमची श्रीवर्धन-हरेश्वर टप्याची वेळ तीच संध्याकाळच्या येश्टीची 'सोडायची' अशी जुळून आल्यामुळे मला लै मज्जा येत होती. पूर्वी येश्टीतनं जाताना एकेक गाव जसं मागे पडायला लागायचं,तशी मनातली गावभेटीची हुरहुर अधिक दाटायला लागायची.तसच यावेळी मला सायगाव /काळिंजे/ भेंडखोल-कडे,अश्या गावांच्या पाट्या जायला लागल्यावर मनात आनंद आणी हुरहुर अश्या मिश्र भावना दाटत होत्या.तसच मागे एकदा याच काळिंज्याच्या जवळपास गतिरोधक या पाटिवरच्या शब्दाचा खाडाखोड करुन केलेला अचरट पंचनामाही ;-) अठवत होता.तसच खास त्या लालमातीच्या गुण-धर्मानी युक्त विचारांची मधुनच दिसणारी पुढं गाव व शाळा आहे.वहाने सावकाश हाका! ही पाटिपण मज्जा देऊन जात होती.हे सगळ होता होता आंम्ही मावशीच्या घरी हरेश्वरला पोहोचलो. आणी तिथुन दुसर्‍या दिवशी माझा,हरेश्वर या बालजीवनातला अत्यंत जिव्हाळ्याच्या शिनुमातला ''मामाचं घर'' हा पार्ट सुरू झाला...

मामाचं घर- सुदैवानी हे आईच्या अजोबांच्याही पूर्वी बांधलेलं घर अजुनही तसच ठणठणीत आणी शाबूत आहे...

सकाळी उठल्यावर साधारण नऊ वाजता नाश्टा(घरातला) वगैरे झाला,की मी ,माझी बाकिची शेजारपाजारची आणी आलेली अशी आठदहा जणांची टिम गावावर स्वारी करायला निघायचो.मग पहिल्यांदा खोताच्या वाडितल्या कैर्‍यांवर हल्ला व्हायचा.
हा खोताच्या वाडिकडे जणारा रस्ता आणी आत दिसतय ते भलंमोठ्ठं १ ट्र्क अंबा देणारं एक झाड

अता तसं म्हातारं झालय,पण अजुनही अंबे देण्याचा जोम तोच आहे.. ;-)

ह्या झाडावरच्या कैर्‍या-नेलेल्या मिठाला जागुन भरपुर हदडून झाल्या,किंवा तिथनं कुणी हुसकवलं, कि मग शेजारी मोहन मामाच्या वाडितल्या जांबांवर आम्ची नजर पडायची.तिथंही अटकाव झाला,तरी त्यांच्याही इथे आलेली दोनचार कार्टी आम्च्या ग्यांगमधे सामिल असल्यामुळे मार पडत नसे,आंम्ही अती नासधुस करतोय असं वाटलं तर फक्त हुसकाऊन लावित!.मग नंतर आंम्ही त्याच्या शेजारच्या विठोबाच्या देवळात

मेंढिकोट/झब्बू/गड्डेरी/बदामसात असे-इतरांना आंम्ही शांत बसलोय,असा देखावा करणारे खेळ खेळत बसायचो. वातावरणातली धुळ जरा खाली बसली,की लगेच त्याच मोहन मामाच्या मळ्यातल्या दुसर्‍या अंब्याच्या झाडावर आमची धाड पडायची.हे झाड बुटकं असल्यामुळे आजुबाजुच्या गवताच्या गंज्यांवर चढुन कैर्‍या उडवता यायच्या... थोडक्यात म्हणजे,दगड मारायचे कष्ट वाचायचे..!

मग त्यानंतर आमच्या चार्ज झालेल्या गाड्या घरांच्या अंगणांमधे खांब-खांबोरी/एकटप्पा आऊट क्रिकेट/चोर-पोलिस इ.खेळांमधे परत डाऊन व्हायच्या..त्यातले वळचणी आणी दोन घरांच्या मधले बोळ हे आम्चे एकशेवीसनी पळायचे महामार्ग होते...

भरपुर हुंदडुन झाल्यावर परत पोटात आग पडायची.आणी,कोकणच्या हवेला ''खाल्लं काहिही आणी कितिही,तरी पचतं लवकर'' हा सार्वत्रिक परिणाम असल्यामुळे...भूक लागल्याची जाणिव होऊन आमचा मोर्चा परत घरांकडे वळायचा...
त्यानंतर दुपारी १ /२ वाजता आंम्ही परत ताजे तवाने होऊन वळायचो...ते उन्ह टाळून वाडित धिंगाणा घालायला...!

क्रमशः.....

वावरसंस्कृतीसमाजजीवनमानमौजमजाआस्वादलेखप्रतिभा

प्रतिक्रिया

मस्त नॉस्टॅल्जिया रंगत होता तोच क्रमशः? :(

पुभाप्र - सोबत एखादी झकास कविता वगैरेही येऊ द्या गुर्जी.. :)

स्पा's picture

23 May 2012 - 3:14 pm | स्पा

क ल्ल स

नंदन's picture

23 May 2012 - 3:58 pm | नंदन

मस्त नॉस्टॅल्जिया रंगत होता तोच क्रमशः?
पुभाप्र - सोबत एखादी झकास कविता वगैरेही येऊ द्या गुर्जी..

तंतोतंत

सविता००१'s picture

23 May 2012 - 2:53 pm | सविता००१

मस्त फोटो आणि वर्णन. - त्यातले वळचणी आणी दोन घरांच्या मधले बोळ हे आम्चे एकशेवीसनी पळायचे महामार्ग होते... हे तर अतिशय पटलं. वाचता वाचता लहानपणात कधी पोहोचले, कळालंच नाही. आता लवकर पुढचा लेख येउद्या. हे क्रमशः..... नको वाटतं अगदी.

बॅटमॅन's picture

23 May 2012 - 2:55 pm | बॅटमॅन

सही!!!!

ख्ररेच खुप मजा येत होती वाचताना

उदय के'सागर's picture

23 May 2012 - 3:04 pm | उदय के'सागर

कसलं भारी.... ज्याचं अजोळ किंवा मुळ गाव कोकण आहे अश्यांचा खुप हेवा वाटतो ..... नशिबवान तुम्हि!!!

एवढी मज्जा करत होतात लहानपणी तरी अत्रुप्त कसे हो तुम्ही??? ( बरोबरच आहे म्हणा, अशी मजा कितिही मिळाली तरी कोणीही अत्रुप्तच राहिल :) )

>>>कसलं भारी.... ज्याचं अजोळ किंवा मुळ गाव कोकण आहे अश्यांचा खुप हेवा वाटतो ..... नशिबवान तुम्हि!!!

+1

मस्त फोटो हो गुरुजी !
एकदम णॉस्‍टॅल्जिक !

अगदि अगदि ..
खरच गुर्जि भारी भारी भारी :)

मोहनराव's picture

23 May 2012 - 3:17 pm | मोहनराव

गेले ते दिवस.. राहिल्या फक्त आठवणी.. मस्त लिहीले आहे.
पण हे क्रमशः का बुवा.. पुभाप्र.

किती स्वछ आणि सुबक आहे हे गाव ..

वहाने सावकाश हाका!

:)

अत्रुप्त आत्मा साहेब, निव्वळ लाजवाब .
तुम्ही पौरोहित्याच्या व्यवसायात असलात तरीही म्हणावस वाटत तुमच्यावर सरस्वती देवीचा वरद हस्त आहे.
तुमच लिखाण आम्हालाही त्या लिखाणात सामावुन घेत व आम्हीही त्या लिखाणातुन आमच्या भुतकाळात आजोळी किंवा वडिलांच्या गावात जातो व समाधानाच स्मित हास्य हळुच चेहर्‍यावर येत.

खरच निव्वळ लाजवाब लिखाण आहे.

प्रभाकर पेठकर's picture

23 May 2012 - 3:52 pm | प्रभाकर पेठकर

किती 'शांSSSSत' आणि 'थंSSSSडं' छायाचित्र आहेत आपल्या कोकणाची..(आणि स्वच्छताही वाखाणण्यासारखी आहे, बरं का!) ह्या अशा थंडाव्यात, कोणी निरुद्योगी म्हंटलं तरी हरकत नाही पण आयुष्य, आपल्या स्वतःच्या अटींवर, 'मनसोक्त' जगावं असंच वाटतं.

प्रचेतस's picture

23 May 2012 - 3:54 pm | प्रचेतस

छान लिहिलंत बुवा.
मामाचं घर आवडलं. काळवत्री दगडांनी बांधलेलं जोतं, त्यावर सगळा घराचा डोलारा. सभोवतालची झाडी, खूप छान वाटलं पाहून. तुम्ही लिहिलेल्या आठवणीही हृद्यच.

पुढचा भाग लवकर टाका आता.

क्रमशः नकोय, बाकि मज्जा आली वाचून.

अत्रुप्त आत्मा's picture

23 May 2012 - 4:56 pm | अत्रुप्त आत्मा

हा घ्या पुढचा भाग http://www.misalpav.com/node/21740

पैसा's picture

23 May 2012 - 7:14 pm | पैसा

लैच आवडलं.

रेवती's picture

23 May 2012 - 7:54 pm | रेवती

सगळं भन्नाट!

मोदक's picture

24 May 2012 - 2:06 am | मोदक

व्वा बुवा..!

स्पंदना's picture

24 May 2012 - 7:51 am | स्पंदना

आई ग्ग!

कैरीच्या नुसत्या नावान तोंड आंबल. या अश्या आंबलेल्या तोंडान पुढ जेवायच म्हणजे दात कसे सळसळ व्हायचे.

निव्वळ खमंग अतृप्त! अगदी त्या लाल डब्याच्या प्रवास वर्णनासकट अन ते व्वर गुरु लोपल्याचा उल्लेख, अन सुट्टीच्या नादान उडालेली झोप. ह्या! काय काय अन कश्या कश्याला दाद द्यावी? वाक्य न वाक्य 'माशाल्ला !' म्हणाव अस.

५० फक्त's picture

24 May 2012 - 8:20 am | ५० फक्त

लई भारी ओ बुवा, तुम्हाला एक प्यार्टी आपल्याकडुन,

आणि तुमचा हेवा वाटतो, बाकी प्रत्यक्ष भेटल्यावर बोलुच.

चौकटराजा's picture

24 May 2012 - 9:48 am | चौकटराजा

अ आ , तुमचे नाव अत्रुप्त आत्मा असले तरी आमचा आत्मा मात्र आपले लेख वाचून तृप्त होत
असतो. मागे चौल ,द्त्तमंदीर, रेव्दंडा, ई ची सहल केली होती. त्याची आठवण आली.

छानच लिहील आहेत. पुढचा भाग येउद्यात लवकर.

प्रमोद देर्देकर's picture

28 Oct 2014 - 2:20 pm | प्रमोद देर्देकर

वा वा हा लेख म्हणजे माझीपण कोकण वारीच की. तो मध्यल्या बोळाचा फोटो भन्नाट आहे.

>>>दिवशी दुपारी माझ्या कळव्याच्या आलेल्या मामासह त्याच्या व्ह्यान मधुन सगळेजण हरेश्वरला गेलो. >>>>

ओ बुवा तुम्ही कधी मामांकडे आलात की या गरिबाच्या घरी पायधुळ झाडा की राव.

रचक्याने कळव्याला कुठे राहातात तुमचे हे मामा.

तुमचा अभिषेक's picture

28 Oct 2014 - 2:26 pm | तुमचा अभिषेक

सुंदर लिहिलेय. तसेही कोकणचे काहीही भावतेच. पुढच्यावेळी फोटो जास्त येऊद्या.
आम्ही सिंधुदुर्गचे पण श्रीवर्धनला मित्राकडे आठवडाभर राहून आलोय. श्रीवर्धन, हरिहरेश्वर आणि परीसर आवडीचाच.
खोताच्या वाडीकडे जाणारा रस्ता तर आमच्याच गावच्या घराच्या बाजूला काढलेला फोटो तर नाही ना असे वाटून गेले..

पिंपातला उंदीर's picture

28 Oct 2014 - 2:57 pm | पिंपातला उंदीर

आठवणी जाग्या झाल्या २ वर्षापुर्वीच्या . अप्रतिम जागा आहे . व्यापारीकरण न झाल्याने गर्दी पण नसते . कुटुंबे नावाचे एक गृहस्थ जेवणाची व्यवस्था करतात . काय अप्रतिम जेवण होत म्हणून सांगू . हरिहरेश्वर च अलिबाग किंवा लोणावळा होऊ नये हि सदिच्छा

अत्रुप्त आत्मा's picture

28 Oct 2014 - 4:33 pm | अत्रुप्त आत्मा

@ कुटुंबे नावाचे एक गृहस्थ जेवणाची व्यवस्था करतात .
काय अप्रतिम जेवण होत म्हणून सांगू. >>> तो मोहन कुटुंबे. (मानलेला) मामा माझा. त्याच्या घराच्या पुढे असलेली दोन घरं आमची! समुद्राकडे रस्ता जातो..त्याशेजारची. :)

पिंपातला उंदीर's picture

28 Oct 2014 - 8:37 pm | पिंपातला उंदीर

हो का? राहायला मि तिथे बाजुलाच होतो. पाहिलि आहेत ति घर. पुण्याचे एक ग्रुहस्थ आहेत त्यानि एक दोन मजलि बन्गला बान्धला आहे तिथे बाजुलच. तिथेच राहात होतो

डोळ्यांचं पारणं फेडणारं कोकणासारखं दुसरं काहिच नाही जगात.... नशीबवान आहात बुवा....

अवांतर- दुचाकीवरून फिरणारा एखादा ग्रुप काढणार का कोणी मुंबईचा ?

अत्रुप्त आत्मा's picture

28 Oct 2014 - 6:19 pm | अत्रुप्त आत्मा

आज ह्या लेखाचा पहिला भाग वर आला आणि त्याबरोबर मेघवेडा यांची ही रिक्वेश्ट नजरेला आली. ( सोबत एखादी झकास कविता वगैरेही येऊ द्या गुर्जी.. )

तेंव्हा ते सुचलं नाही/विसरलं...आणि आज हे असं बाहेर आलं.

मामाचं गाव

अस्सं मामाचं ते गावं
माझ्या मनाचं अंगणं
मनी मनाच्या खेळाचं
साधं सरळं शिंपणं

शिंपलेल्या भींती तेथे
आणि सारवली घरं
गेल्या चुली सार्‍या तरी
दाटे मनातच धूरं

झोपाळा तो अता हले
रोज बोलवी मनाला
म्हणे गाणी कुठे गेली
साद देई ह्या कानाला

वाडी बोलाविते रोज ,
जरी शिंपणं थांबलं
आता मना मधे होई
आठवणीचं सिंचन

रहाट तो मागे..गेला,
मग मोटारंही आली
माझ्या अवघ्या मनाची,
खोलं विहिरं जाहली

लाल माती माझ्या गावी,
आता बोलावित आहे.
कधी येशील मैतरा,
रस्त्यातुन वेडी पाहे.

कित्ती गेले जन्म तरी
पुण्य कसं हे सरलं???
देह होइ राखं राखं
तरी माती ती उरेलं!

उगविन पुन्हा तेथे
बीज अंकुर होऊन
फसंविनं देवाजीला
थांब...! आलो हा जाऊन!

मग देवाजी डरेल
म्हणे..नको तेथे जाया
अजोळची माती येडी
लावे भलतीचं माया

राहो सुखे आत्मा तुझा
तुला कसले मरणं???
अरे मरणं-जन्माचे
आहे निमित्त-कारणं

देवाजीच्या बाता आज
का हो मनामधी आल्या?
डोळे झाले ओले चिंब
आणि सार्‍या प्रगटल्या!

आता जाइन पुन्हा मी
गावं-देवाला भेटेनं!
मग पुन्हा नवा जन्म
नवी कहाणी सांगेन.

मिटू मिटू म्हणे मन
परी काव्यंही मिटे ना
जगण्याचा सोस भारी
अन्..शेवट सुचे ना

आता ठेवतो मिटूनी
माझी आठंवणं वही
तरी मनं बघा कसे???
म्हणे..नाही! नाही!! नाही!!!
============================
अतृप्त......

प्रचेतस's picture

29 Oct 2014 - 12:51 pm | प्रचेतस

सुरेख कविता आत्मूस.
स्वतंत्र धाग्यावर टाका ना.

पिंपातला उंदीर's picture

28 Oct 2014 - 8:33 pm | पिंपातला उंदीर

या लेखाचा दुसरा भाग साप्डत नाहि. कोणि लिन्क देता का लिन्क

अत्रुप्त आत्मा's picture

28 Oct 2014 - 10:41 pm | अत्रुप्त आत्मा

हा घ्या पुढचा भाग http://www.misalpav.com/node/21740

विवेकपटाईत's picture

29 Oct 2014 - 8:11 pm | विवेकपटाईत

लेख, कविता आणि फोटो सर्वच सुंदर