(मिपाकरांना नमस्कार. मी बेळगावहून प्रकाशित होणार्या दै. तरुण भारत या वृत्तपत्रात "टोलेबाजी '' या नावाचे सदर सहा महिने लिहित होतो. ही २००६ सालची गोष्ट. हे सदर तभाच्या सातही आवृत्त्यांतून संपादकीय पानावर रविवार सोडून रोज प्रसिद्ध व्हायचे. त्याला खूप मोठा वाचक वर्ग लाभला होता. मिपाचा सदस्य झाल्यानंतर इथल्या अभिजनांसाठी त्यातले काही निवडक लेख येथे प्रकाशित करावेत अशी इच्छा झाली. दै. तरुण भारतच्या संपादकांनी , तसेच मिपाच्या संचालकांनीही याला परवानगी दिली. दोघांचेही आभार.)
हा माझा वसंत नाही
पावसाळ्याची चाहूल लागते ती वृत्तपत्रातूनच. म्हणजे रेनकोट, छत्र्यांच्या जाहिरातींमुळे आणि प्रसिद्ध होणार्या पावसाच्या कवितांमुळे. प्रत्यक्षात पाऊस कधी वेळेवर येतो, कधी वाट पाहून दमवतो. पण कविंना त्याच्याशी काही संबंध नसतो. तसंच काहीसं वसंत ऋतूचं झालंय. गुढीपाडवा आला रे आला की लगेच मंडळी ``वसंत ऋतू आऽऽला'' असं गात सुटतात. यांना कशी आणि कुठे वसंताची चाहूल लागते कोणजाणे. शिशिर संपून वसंत येतो. सार्या सृष्टीला म्हणे नवचैतन्याचे डोहाळे लागतात. निसर्ग मुक्तहस्ते रंगगंधांची उधळण करतो. कवी साहित्यिकांना नवसृजनाचे धुमारे फुटतात. (बाकी सगळं ठीक आहे. हा भाग जरा डेंजरस. वसंतात या मंडळींपासून जरा दूरच रहायला हवं.) तो मोहर काय, तो कोकीळ काय, तो हवेत दरवळणारा मादक गंध काय, विचारु नका. म्हणून मग मी ही ठरवलं की आपणही यंदा वसंतऋतू एंजॉय करायचा. मी लगेच एका ट्रॅव्हल कंपनीला फोन केला आणि विचारलं की तुमच्या काही वसंत ऋतू स्पेशल टूर्स वगैरे असल्या तर सांगा. तर तिथे जी कुणी सुकन्या फोनवर होती, तिला वसंत ऋतू वगैरे काही कळेना. ती सारखी इंडियात फिरण्यापेक्षा सिंगापूर, बँकॉक, पट्टायाला जा असं सांगत राहिली. मी फोन बंद केला.
आमच्या दुसर्या एका मित्राला फोन केला. तो ते पक्षी निरीक्षण की काय करतो. बिचारा खूप लांब लांब कुठेतरी फिरत असतो. त्याला म्हटलं की वसंत ऋतू आला असं ऐकलं. तर जरा कोकिळाचा आवाज ऐकायचा होता. कुठल्या एरियात भेटेल? तर तो म्हणाला, "अगदी खरं सांग. चिमणी पाहून किती दिवस झाले? आता शहरात झाडे नाहीत, पक्षी नाहीत. शहरात वसंताला आता नो एन्ट्री आहे. लांब कुठंतरी जंगलात गेलास तरच वसंत." त्यानं फोन बंद केला. पण ते चिमण्यांचं काही डोक्यातून जाईना. मी बायकोला विचारलं, "अगं, चिमण्या दिसत नाहीत त्या अलिकडं?" तर बायको म्हणाली, "कुठल्या काळातल्या गोष्टी करता आहात? तुमच्या लहानपणी चिमण्यांच्या उजेडात अभ्यास केल्याच्या गोष्टी सारख्या सांगत असता. आता आपण इन्व्हर्टर घेतल्यापासून कंदीलसुद्धा नाहीत घरात." तिच्या डोक्यात वेगळ्याच चिमण्या होत्या. मी नाद सोडला. एकंदर त्या वसंत ऋतूशी कुणाला काही फारसं देणंघेणंच नव्हतं.
बँकेलल्या मित्राला विचारलं तर म्हणाला, "तेव्हा नेमकं इयरएंडींग असतं रे. कुठला वसंत नी कुठलं काय. स्टेटमेंटस वगैरे अगदी वेळेवर पाठवावी लागतात. लगेच ऑडिट असतं पुन्हा." तेवढ्यात आमच्या त्या पक्षीमित्रानं मोबाईलवर कोकिळाच्या आवाजाची रिंगटोन पाठवली. अगदी बरं वाटलं. म्हटलं वसंत ऋतू संपेपर्यंत आता क्षणाक्षणाला कोकिळाचा आवाज ऐकता येईल. आपल्या नशीबी इतकाच वसंत.
या खटाटोपात एप्रिलच्या सुरवातीलाच आम्ही अगदी "फूल" झालो. वसंताचा स्पर्शही न झालेलं नापसंत फूल. सुरेश भटांच्या ओळी मला भलत्याच अर्थाने सामोर्या आल्या.
"कुठलेच फूल आता मजला पसंत नाही
कळले मला अरे हा माझा वसंत नाही."
-बाजीराव.
(दै. तरुण भारत, बेळ्गाव मध्ये पूर्वप्रकाशित)
प्रतिक्रिया
19 Apr 2008 - 8:01 pm | अभिज्ञ
आपले लेख या आधिहि वाचले आहेत.
लेख आवडला.
आपण आपले आधिच प्रसिध्द झालेले लेख मिपाकरांना उपलब्ध करुन देत आहात त्याबद्दल धन्यवाद.(तात्यांचे व किरण ठाकुर ह्यांचे सुध्दा)
परंतु वर्तमानपत्रात कदाचित आपल्यावरती "जागेचे" बंधन असावे,त्यामुळे लेख थोडासा
छोटा वाटतोय.इथे तसे जागेचे बंधन नाहि.त्यामुळे अजुनही लेख आपल्याला आणिक खुलवता येइल.
सुचनेचा जरुर विचार करावा हि विनंति.
अबब.
19 Apr 2008 - 8:35 pm | विद्याधर३१
अशी स्फुटे वाचायला मजा येते..
असेच नवे लेखन येउ द्या.......
विद्याधर
20 Jul 2008 - 10:40 pm | तळीराम
छान आहे.. आवडला.