बाजीरावांची टोलेबाजी :५: टिळक, आम्हाला क्षमा करा!

बाजीराव's picture
बाजीराव in जनातलं, मनातलं
1 Aug 2008 - 9:24 pm

टिळक, आम्हाला क्षमा करा!

आज १ ऑगस्ट. लोकमान्य टिळक पुण्यतिथी. शाळाशाळातून वक्तृत्त्व स्पर्धा होतील. सगळे बालवक्ते टिळकांनी बालपणी निबंधात संत हा शब्द तीनप्रकारे कसा लिहिला, शिक्षकांनी एक शब्द बरोबर धरून बाकी दोन चूक धरताच सगळेच शब्द बरोबर धरण्याचा हट्ट टिळकांनी कसा धरला त्याची गोष्ट सांगतील. त्याच बरोबर वर्गात मुलांनी शेंगा खाल्ल्या आणि फोलपटे तेथेच टाकली. पण चूक कुणीच कबूल करेना. मग शिक्षकांनी सगळ्या मुलांना छड्या मारायला सुरवात केली. पण टिळकांनी बाणेदारपणे 'मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी हात पुढे करणार नाही' असे सांगितले होते ती गोष्ट सांगतील. वर्षानुवर्षे हेच चालत आले आहे. हल्ली वक्तृत्त्व स्पर्धा वगैरे तरी होतात की नाही कुणास ठाऊक. पण मुलांचं टिळकांबद्दलचं ज्ञान इथंच आणि एवढ्यावरच संपतं.
टिळक, तुमच्या वर्गातल्या काही मुलांनी पुढं स्वातंत्र्य मिळाल्यावर खूपच शेंगा खाल्ल्या आणि फोलपटे सार्‍या देशभर टाकली. पण त्यांना छड्या मारण्याचे धारिष्ट्य एकाही 'सरां'ना झाले नाही. ही मुलेही भलतीच बाणेदार. त्यांनीही छड्या खायला हात कधीच पुढे केला नसता. त्यांचे हात लाच घेण्यासाठी पुढे झालेले लाखो लोकांनी टीव्हीवर पाहिले. ही मुले आता लोकसभेत, विधानसभेत दंगामस्ती करतात. घटनेचे, संसदेचे पावित्र्य नष्ट करतात. पण त्यानाही कुठलेच सर छड्या मारू शकत नाहीत. संत वगैरे शब्दांची तर आता सगळ्यांनाच ऍलर्जी आहे. कुठल्याच प्रकाराने हा शब्दच लिहिला जाणार नाही याची काळजी सगळेजण घेतात. प्रश्नपत्रिकेतून सतांच्याबद्दल वेडेवाकडे उतारे छापले जातात. यांना कुणी छड्या मारायच्या?
तुम्ही स्वातंत्र्यासाठी मंडालेच्या तुरुंगात शिक्षा भोगलीत. आताचे नेते भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन झालेल्या शिक्षा पंचतारांकित इस्पितळातून उपभोगतात. नंतर निर्लज्जपणे समाजात वावरतात. तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांचे समर्थक त्यांचे स्वागत करतात. सत्कार करतात. सुवासिनी त्यांना पंचारत्या ओवाळतात. त्यांचे सरकारातले स्थानही अढळ असते. कुणालाही खेद नाही, खंत नाही. यांना छड्या कुणी मारायच्या?
तुमचा 'केसरी' गर्जणारा होता. आताची सारी वृत्तपत्रे कुणा ना कुणाच्या ताटाखालची मांजरे झाली आहेत. मंत्री, शिक्षणसम्राट, उद्योगपती यांच्या वाढदिवसाच्या पुरवण्य़ा छापून जाहिरातींची साय ओरपण्यात मग्न आहेत. बातम्या छापायलाही पैसे आणि दाबायलाही पैसे. 'पाची बोटे तुपात' अशी वृत्तपत्रांची चैन, चंगळ आहे. अशा तुपाने बुळबुळीत झालेल्या संपादकीय हातांना लेखणीसुद्धा नीट धरता येत नाही. टीकेचे आसूड वगैरे कसे धरणार? अग्रलेखांची परंपरा मोडीत निघाली आहे. तेवढ्या ताकदीचे संपादकही आता दुर्मिळ झालेत. पेपर रंगीत झालेत, स्वस्त झालेत. पण जनतेचा आवाज त्यांतून उठेनासा झाला आहे. 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?' हा प्रश्न आजही पडतो. पण तो लोकांना. वृत्तपत्रांना त्याचे काहीही देणेघेणे नाही. 'सरकारच्या जाहिराती ठिकाणावर आहेत काय?' एवढीच त्यांना काळजी.
परवा काही एका संदर्भासाठी एका प्रसिद्ध वाचनालयाच्या अध्यात्म, तत्त्वज्ञान विभागात 'गीतारहस्य' शोधत होतो. मिळता मिळेना. मग ग्रंथपालाला विचारले. त्याने 'रहस्यकथा' विभागात शोधायला सांगितले. नेमके मिळाले. पण बर्‍याच वर्षात कुणीही हात न लावल्याने खूप धूळ साठली होती त्याच्यावर. ही आमच्या अनास्थेची, सांस्कृतिक-सामाजिक र्‍हासाची आणि धुळीला मिळत चाललेल्या नीतीमूल्यांची धूळ होती. ती झटकण्याचे धाडस मला झाले नाही. टिळक, आम्हाला क्षमा करा.

-बाजीराव

(दै. तरुण भारत, बेळगाव मध्ये दि. ०१.०८.२००६ रोजी पूर्वप्रकाशित.)

वाङ्मयलेख

प्रतिक्रिया

चतुरंग's picture

1 Aug 2008 - 9:35 pm | चतुरंग

एकदम चपखल आणि मार्मिक टिप्पणी! :)

चतुरंग

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Aug 2008 - 7:14 pm | बिपिन कार्यकर्ते

सहमत.

यशोधरा's picture

1 Aug 2008 - 9:47 pm | यशोधरा

एकदम चपखल आणि मार्मिक टिप्पणी!

आवडली टिप्पणी..

झकासराव's picture

1 Aug 2008 - 10:07 pm | झकासराव

खुप आवडली ही टोलेबाजी.
सणसणीत आहे एकदम.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

लेख आवडला.
(टोलेबाज)बेसनलाडू

सर्किट's picture

1 Aug 2008 - 11:18 pm | सर्किट (not verified)

मग ग्रंथपालाला विचारले. त्याने 'रहस्यकथा' विभागात शोधायला सांगितले. नेमके मिळाले.

मस्त ! टोलेबाजी आवडली.

मीही एकदा गुनार मिरडाल चे एशियन ड्रामा शोधत होतो. ते सापडले नाटकांच्या सेक्शन मध्ये.

- सर्किट

सुवर्णमयी's picture

1 Aug 2008 - 11:57 pm | सुवर्णमयी

मार्मिक लेखन! आवडले.

प्राजु's picture

2 Aug 2008 - 12:10 am | प्राजु

चांगलाच टोला हाणला आहे.
शेवट जास्ती आवडला.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विकास's picture

2 Aug 2008 - 12:21 am | विकास

लेख आवडला... टोलेबाजी बरोबरच त्यामागचा "त्रागा" पण दिसतोय.

गीता रहस्य, रहस्य कथांच्या भागात ठेवणारे महाभाग बघितल्यामुळे मी उत्सुकते पोटी बॉस्टन युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीत शोधले, अर्थातच ते रहस्य कथा विभागात नव्हते पण माहीतीसकट व्यवस्थित मिळू शकते म्हणून कळले...आणि हो हे प्रथमावृत्तीतील म्हणले आहे (शके १८५७, १९३५-३६)

Author Tilak, Bal Gangadhar, 1856-1920
Title The Hindu philosophy of life, ethics and religion. Om-tat-sat, s'r¯imad Bhagavadg¯it¯a rahasya; or, Karma-yoga-s¯astra, including an external examination of the g¯it¯a, the original Sanskrit stanzas, their English translation, commentaries on the stanzas, and a comparison of eastern with western doctrines, etc., by Bal Gangadhar Tilak ... translated by Bhalchandra Sitaram'Sukthankar ..
Publisher Poona [Published for Tilak bros. by R. B. Tilak] Saka year 1857; 1935-36
Edition 1st ed

LOCATION CALL NO. STATUS
Mugar Library BL1130 .T5 v. 1 AVAILABLE
Mugar Library BL1130 .T5 v. 2 AVAILABLE

तसेच गुगलबुक्समधे आहे का पहायला गेलो. ते नव्हते पण युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन च्या ग्रंथालयातून घेतलेले अरविंद घोषांचे , Bal Gangadhar Tilak: His Writings and Speeches, By Bal Gangadhar Tilak, Babu Aurobindo Ghose
Published by Ganesh, मद्रास 1919 हे पुस्तक दिसले. त्यात लोकमान्यांनी अमरावतीस केलेले गीता रहस्यावरील भाषण वाचायला मिळाले. हे पुस्तक मुद्रणहक्क (कॉपि राईट्स?) समाप्त झाल्याने विनामुल्य डाऊनलोड करता येते.

भारतात ही पुस्तके नक्कीच कुठेतरी असतील पण सहजसाध्य असतील का? जर एखाद्याला वाचायची असतील/अभ्यास करायचा असेल तर? का जसे वेद हे मर्यादीत लोकांमध्ये राहीले तसेच काहीसे? ह्या शेवटच्या वाक्याचा संदर्भ असा की, एकदा लोकमान्यांना त्यांच्या मुलांनी अशा अर्थी विचारले की जर वेद आपलेच होते तर पाश्चात्यांकडून त्याचे अर्थ का शिकावे लागतात? (मॅक्समुल्लर आणि टिळकांचा त्या संदर्भात संवाद चालत असे.) . त्यावर टिळक या अर्थी उत्तरले, "कधी काळी आपले वेद हे असुरांनी पळवले आणि ते परत आणण्यासाठी देवाला अवतार घ्यावा लागला. आज आपले वेद हे असुरांनी नाही पळवले तर ते विद्वत्तेने आणि अभ्यासाने बाहेर नेलेत. ते परत आणायचे असतील तर त्यासाठी अभ्यास आणि विद्वत्ताच आपल्यात आणावी लागेल." यातील वेद हा शब्द सोडून जर नुसते "ज्ञान" म्हणले - अधुनीक, ऐतिहासीक, प्रागतीक काहीही, तर आज आपण (त्यात मी ही आलोच) सर्वजण समाज आणि देश म्हणून पूर्णपणे विसरलेलो आहोत असे वाटते. परीणामी परत पाश्चात्य आपल्याला आपल्या धर्माचा अर्थ, इतिहास, समाजव्यवस्था आणि अजून काही सांगणार आणि आपण आपल्याला त्यांच्याच नजरेतून कसे आहोत हे ठरवणार की काय अशी शंका येते.

ऋषिकेश's picture

3 Aug 2008 - 10:36 am | ऋषिकेश

सुंदर.. मार्मिक.... रोखठोक!
अतिशय आवडले

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

II राजे II's picture

3 Aug 2008 - 4:33 pm | II राजे II (not verified)

आवडले !!!

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

पंचम's picture

3 Aug 2008 - 4:48 pm | पंचम

लेख आवडला!!!!!!!!!!!!!!!

ढिंग टांग's picture

3 Aug 2008 - 4:49 pm | ढिंग टांग

टोलेबाजी आवडली.