कंपनी सरकार
सकाळी मला जागवणारा गजर होतो तो माझ्या विदेशी कंपनीच्या मोबाईलमध्ये. मी उठतो. विदेशी कंपनीच्या टूथपेस्टने ब्रश करतो. देशी दुधात विदेशी चहाची पावडर टाकून केलेला चहा पितो. विदेशी ब्लेड वापरून देशी गालांची दाढी करतो. मग विदेशी कंपनीचा साबण लावून अंघोळ करतो. पाणी मात्र देशी गढूळच असते. मग विदेशी कंपनीचे घड्याळ घालतो. विदेशी कंपनीचे तयार कपडे घालतो. विदेशी 'सेंट' अंगावर उडवून (डॉलर कधी उडवायला मिळणार कुणास ठाउक) विदेशी बुटात स्वदेशी पाय घालून विदेशी गाडीतून स्वदेशी कंपनीच्या नोकरीवर जातो. एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी कशी मिळेल याची दिवसभर काळजी करतो. विदेशी बँकेचे कर्ज फेडण्य़ासाठी ही स्वदेशी नोकरी करावी लागते. मुलाला कुठलं शिक्षण दिल्यावर विदेशी जायला मिळेल याची माहिती मिळवतो. दिवसभर विदेशी काँप्युटरवर काम करतो. लंचब्रेकमध्ये ऑफिससमोरच्या मॅकडोनाल्डमध्ये जाउन सॅण्डविच, पिझ्झा वगैरे खातो. याच जागेत पूर्वी भटकाकांचे क्षुधाशांतीगृह होते. तिथल्या साबुदाणा वड्याची उगीचच आठवण वगैरे काढतो. भटकाका कुठं गेले (किंवा केव्हा गेले) कुणास ठाउक).संध्याकाळी घरी येतो. विदेशी कंपनीच्या टीव्हीवर प्रोग्राम पाहतो. हे कार्यक्रमही झकास विदेशीच वाटतात. सिरीयलमधल्या प्रत्येक बाप्याला एक बायको आणि दोन लफडी असतात. प्रत्येक बाईला एक नवरा आणि दोन भानगडी असतात. हे बघून डोके फिरल्यावर मग विदेशी व्हीस्कीचे दोन पेग घेतो. सोडाही विदेशीच असतो. मुलं अजून लहान असल्याने विदेशी कोला, पेप्सी वगैरे पितात. बायको विदेशी फ्रीजमधले विदेशी आईस्क्रिम खाते. मग चायनीज हॉटेलात जेवायला जातो. कधी चुकून इंडियन हॉटेलात जेवायला गेलोच तर अमेरिकन चॉप्सी, चिकन सिंगापूरी असल्या नावाचेच पदार्थच खातो. कोल्हापूरी, मालवणी वगैरे नावाचे पदार्थ मेनू कार्डावर वाचत सुद्धा नाही. रात्री विदेशी कंपनीचा एसी लावून झोपी जातो.
आपलं सगळं आयुष्य या विदेशी कंपन्यांनी ताब्यात घेतले आहे. या कंपन्य़ा अगदी कायदेशीर रीतीने भारतात व्यवसाय करत आहेत. भारतीय पाण्यापासून या कंपन्या विषारी शीतपेये बनवतात. त्या पासून मिळणारा कोट्यवधी रुपयांचा नफा विदेशी जातो. आपण वापरत असलेली प्रत्येक गोष्ट विदेशी कंपनीची किंवा विदेशी तंत्रज्ञान वापरुन भारतीय कंपन्यानी बनवलेली असते. याला जागतिकीकरण म्हणतात. आता भारतीय जमिनीत पेरलं जाणारं बी विदेशी असेल, खतं विदेशी असतील. पिकांवरची कीड विदेशी असेल. त्यावर फवारायचं किटकनाशक विदेशी असेल. आता आपलं सारं काही विदेशी असेल. आपला जूता जपानी असेल, पतलून इंग्लीशस्तानी असेल, लाल टोपी रुसी असेल पण दिल हिंदुस्तानी आहे की नाही हे तपासून घ्यावं लागेल.
भारताला पारतंत्र्य मिळालं ते कंपनी सरकारच्या शिरकावानंतर. आज भारतावर पुन्हा एकदा कंपनी सरकारचंच राज्य आहे. आपलं सरकारही बर्याच देशी आणि विदेशी कंपन्याच चालवतात. तरीही आपण स्वतंत्र आहोत या आभासाचं स्मरण करण्याचा आजचा दिवस. आपला स्वातंत्र्यदिन.
-बाजीराव
(दै. तरुण भारत, बेळगाव मधून १६.०८.२००६ रोजी पूर्वप्रकाशित.)
प्रतिक्रिया
15 Aug 2008 - 4:03 pm | II राजे II (not verified)
वा !
मस्त फटकेबाजी !!
आवडली !
तरीही आपण स्वतंत्र आहोत या आभासाचं स्मरण करण्याचा आजचा दिवस.
सहमत.
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
15 Aug 2008 - 4:06 pm | सुचेल तसं
जबरदस्त!!!
http://sucheltas.blogspot.com
15 Aug 2008 - 6:45 pm | चंबा मुतनाळ
छान टोलेबाजी केली आहे (दोन वर्षांपूर्वी!). परंतु ह्यात काळजी करण्यासारखे काय कळले नाय बॉ!
रोज विदेशी पेग मारणारा
चंबा
15 Aug 2008 - 8:54 pm | मुशाफिर
जागतिकीकरणाला माझा अजिबात विरोध नाही (आणि तुमचाही नसावा असे वाटते), पण ते भारताच्या फायध्याचे असेल तोपर्यन्तच!
६१ वा स्वातन्त्र्य 'दीन' (आता हा शब्द असाच लिहायला हवा!!!!) :) साजरा करणार्या सगळ्या भारतीय नागरिकाना वास्तवाची थोडी तरी जाणिव ह्या लेखाच्या निमित्ताने झाली तर हे ही नसे थोडके!
लेख आवडला.
15 Aug 2008 - 11:44 pm | प्राजु
भारताला पारतंत्र्य मिळालं ते कंपनी सरकारच्या शिरकावानंतर. आज भारतावर पुन्हा एकदा कंपनी सरकारचंच राज्य आहे. आपलं सरकारही बर्याच देशी आणि विदेशी कंपन्याच चालवतात. तरीही आपण स्वतंत्र आहोत या आभासाचं स्मरण करण्याचा आजचा दिवस. आपला स्वातंत्र्यदिन.
मस्त फटकारले आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
16 Aug 2008 - 3:59 am | धनंजय
चांगली चालू आहे टोलेबाजी!
(माझे बरेचसे कपडे - अमेरिकेत घेतलेले - मेड इन इंडिया असतात... बहुधा माल वेगवेगळ्या देशांतल्या वेगवेगळ्या कंपन्यांचा असेल तर पैकी कुठलीही कंपनी एकाधिकारी होणार नाही. त्या राज्याचे सरकार बळकावू शकणार नाही, असे वाटते.)
16 Aug 2008 - 4:07 am | मदनबाण
बाजीराव आपली टोलेबाजी फारच आवडली..
मदनबाण.....
"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
16 Aug 2008 - 7:17 am | सर्किट ली (not verified)
दोन वर्षात काहीही बदललेले नाही !
वरील धनंजयांनी लिहिलेले आहे, त्याच्याशी सहमत !
शिवाजी महाराजांच्याही काळाआधी सावकारी सरकार होतेच की, आता ह्या सावकारांना ब्यांका म्हणतात. त्या कंपन्यांच्या मालकीच्या असतात. त्यामुळे कंपनी सरकार अनेक वर्षांपासून आहेच. आता त्यांना नावे आहेत, एवढेच.
- सर्किट
16 Aug 2008 - 10:41 am | अवलिया
त्यामुळे कंपनी सरकार अनेक वर्षांपासून आहेच. आता त्यांना नावे आहेत, एवढेच.
इतकेच नव्हे तर अशा कंपन्याचे शेअर घेवुन, त्यांच्या नोक-या करुन, त्यांना उत्पादन व सेवा पुरवुन तसेच त्यांचे उत्पादन वा सेवा खरेदी करुन त्यांच्या पापात आपण भागीदार होत आहोत. त्यामुळे त्यांना दुषणे देण्याचा नैतिक अधिकार आपणास नाही असे मला वाटते.
जेव्हा सगळं गाव पाप करतं तेव्हा कुणीच पापी नसतं
नाना