बाजीरावांची टोलेबाजी :३: अर्धांगीची वटपौर्णिमा...

बाजीराव's picture
बाजीराव in जनातलं, मनातलं
18 Jun 2008 - 9:38 pm

बाजीरावांची टोलेबाजी :१: हा माझा वसंत नाही...
बाजीरावांची टोलेबाजी :२: कोंबडी कविसंमेलन

काल वटपौर्णिमा झाली. वटपौर्णिमेच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी अशी सौ. बाजीरावांची गेल्या कित्येक वर्षांची मागणी
आहे. निदान बायकांना तरी सुट्टी द्यावी व निवांतपणे वडाला फेर्‍या मारायची मोकळीक ठेवावी ही त्यांची उपमागणी आहे. पण आपले
सरकार स्त्रियांना ना रक्षण देते ना आरक्षण. ते सुट्टी कुठून देणार? त्यामुळे सौ. बाजीराव वडाच्या झाडाची एखादी डहाळी बाजारातून
विकत आणतात. त्या डहाळीलाच वडाचे झाड समजून पूजा करायची आणि झटपट सगळे आवरून ऑफिसला पळायचे ही तिची पद्धत.
मी तिला किती वेळा म्हणायचो की हा आपला शेवटचाच जन्म आहे, तेव्हा विनाकारण तू पुढच्या सात जन्माचे ऍडव्हान्स बुकिंग
करण्याच्या फंदात पडू नकोस. आणि वडाची डहाळी तोडून घरी आणून पूजा म्हणजे निव्वळ कॉम्प्रमाईज आहे. ती काही खरी पूजा
नाही. चांगली नऊवारी साडी नेसून, नटूनथटून, पूजेचं ताट घेऊन, वडाच्या झाडाजवळ जाऊन, त्याला सूत गुंडाळून, फेर्‍या मारून
केलेली ती खरी पूजा. तसल्या पूजेला सात जन्माची गॅरंटी असते. घरी डहाळी आणून केलेल्या पूजेला दोनतीन जन्माचा डिस्काउंट
द्यावा लागत असणार. असलं काही बोललं की सौ. बाजीराव जाम रागावतात.
ती तरी काय करणार? शहरात खूप इमारती बांधाव्या लागतात. रस्ते करावे लागतात. त्यासाठी मोठमोठी झाडं तोडावी लागतात.
एखाद्या शहरात अगदी वडाच्या झाडाला सूत गुंडाळत पूजा करायची म्हटली तर वडाचं झाड शोधेपर्यंत अमावस्या उजाडायची. त्यामुळे
दसर्‍याला जशी आपट्याची पाने विकत आणतो, संकष्टीला दुर्वा विकत आणतो, गुढीपाडव्याला आंब्याची पाने विकत आणतो,
सत्यनारायणाच्या पूजेला कर्दळीचे खूंट विकत आणतो तशीच वटपौर्णिमेला वडाची डहाळी विकत आणायची पद्धत पडली आहे. आपले
सगळे सण, सगळी व्रतवैकल्ये त्यांचा मूळचा उद्देश हरवून नुसती यांत्रिक क्रिया बनलीत तशीच वटपौर्णिमा.
ऑफिसात गेलो तर शेजारच्या टेबलावरचे टोणपेअण्णा उदास होऊन बसले होते. म्हटलं "काय झालं अण्णा?" तर म्हणाले, "काय
होणार? अडकलो ना पुन्हा सात जन्म. काल झाली ना ती वटपौर्णिमा! आमच्या वटवट सावित्रीने यावेळी वडाचे झाड हुडकून अगदी
साग्रसंगीत पूजा करून सात जन्म हाच पती मिळावा अशी प्रार्थना केलीय. नेमकी रविवारी यावी पौर्णिमा? हा एकच जन्म
तिच्याबरोबर काढताना जीव मेटाकुटीला आला आहे हो. सात जन्म केवळ अशक्य. '' होणार होतो मुक्त अगदी, नव्हती मला कसली
तमा। हाय पण ही आड आली, अर्धांगीची वटपौर्णिमा!" भाऊसाहेबांचा शेर ऐकवून अण्णा तसेच उदास बसून राहिले. आता
टोणपेवहिनी शाळेत हे.मा. आहेत, जरा कडक शिस्तीच्या आहेत, सतत बोलायची त्यांना सवय आहे हे खरं. त्यामुळे कधी अण्णांना
वह्या तपासाव्या लागतात, पेपर तपासावे लागतात, रिझल्टशीट बनवावे लागतात. पण वहिनींनी कधी त्यांना छड्या मारल्या असतील
असं नाही वाटत. नशीब एकेकाचे.
तेवढ्यात देशपांडे आला. त्याचं नुकतंच लग्न झालेलं. म्हणून त्याला मुद्दाम विचारलं की, "कशी झाली वटपौर्णिमा? चांगला रविवार
आला होता." तर तो मिश्कीलपणानं डोळा घालत म्हणाला, "एकदम झकास. सकाळी वटपौर्णिमा, दिवसभर चावट पौर्णिमा." मी
आणि टोणपेअण्णांनी मोठा सुस्कारा सोडला. नशीब एकेकाचे.

-बाजीराव.

(दै. तरुण भारत, बेळ्गाव मध्ये १२.०६.२००६ रोजी पूर्वप्रकाशित)

साहित्यिकलेख