बाजीरावांची टोलेबाजी :१: हा माझा वसंत नाही...
कोंबडी कविसंमेलन
कोंबडीला आलेल्या तापामुळे महाराष्ट्राला ताप झाला. लोकांनी कोंबड्या, अंडी खाणे बंद केले. मग या धंद्याला संरक्षण द्यायला सारेच पुढे सरसावले. मंत्र्यांनी विधानसभेत कोंबडी खाऊन दाखवली. फुकट कोंबडी महोत्सव साजरे झाले. नीळू फूले, आशा काळे वगैरे मंडळीनी खुशाल कोंबडी खावा अशी जाहिरात केली. याचसाठी एक कवीसंमेलन करावे आणि कवींच्या तोंडून कोंबडी महिमा ऐकवावा अशी आयडिया कुणाला तरी सुचली. रामदास फुटाणेंना हे कंत्राट देण्यात आले. त्यांनी दादरला शिवाजी मंदिरात कोंबडी कविसंमेलन आयोजित केले. संमेलनानंतर सर्व रसिक श्रोत्यांना फुकट कोंबडी चापायला मिळणार असल्याने इतकी गर्दी झाली की शिवाजी मंदिरातला कार्यक्रम शिवाजी पार्कवर घ्यावा लागतो कि काय असे वाटले.
वात्रटिका हे आपले पुस्तक 'मुर्गीक्लबच्या क्षुधाशील सदस्यास' अर्पण करणारे कवी मंगेश पाडगावकर यांनी सुरवात केली.
सलाम मुर्गीयो, सलाम.
कोंबड्यांच्या खात्म्याला सलाम
त्यांच्या आत्म्याला सलाम
कोंबड्या निर्मिणार्या परमात्म्याला सलाम.
कोंबडीच्या दोन्ही लेगांना सलाम
त्या आधीच्या पाच सात पेगांना सलाम...
पाडगावकरांची कविता रंगतच गेली.
नंतर आले मुर्गीक्लबचे सदस्य विंदा.
देणार्याने फुकट कोंबडी देतची जावे
खाणार्याने फुकट कोंबडी खातची जावे
कवितेच्या या पहिल्या ओळींनीच वन्समोअर मिळवला. पाडगावकरांनी 'खरा चित्पावन' अशी दाद दिली. शेवटी विंदा म्हणाले...
देणार्याने देत जावे, खाणार्याने खात जावे
कोंबडीला नसतात हात, म्हणून तिचे पाय घ्यावे.
विंदांनंतर आले नारायण सुर्वे. त्यांनी सर्व चाकरमान्यांना कोंबडी खायला काहीही हरकत नसल्याचे गावाकडे कळवायला सांगितले, ते या कवितेतून.
तुम्ही सुखात कोंबडी खावा, असं पत्रात लिव्हा.
भाव उतरले कधी नव्हं ते, झालीया कोंबडी स्वस्त
दोन्ही येळेला कोंबडीच खावा चानस घावलाय मस्त
रोज अंड्यांचा रतीब लावा, असं पत्रात लिव्हा...
त्यानंतर महेश केळुसकरांनी खास मालवणी चवीची कविता ऐकवली.
स्वस्तात घावली, शिजायला लावली, तिखट झनाट
तोंडात घास घातला आणि झालो झिनझिनाट...
नंतर आले फमु शिंदे. त्यांनी अत्यंत गहिवरलेल्या आवाजात कविता सादर केली..
कोंबडी म्हणजे नुसतेच एक खाणे नसते
गळ्यातून थेट पोटात शिरणारे गाणे असते.
कोंबडी असते पोल्ट्रीवाल्याची आई
हॉटेलमालकाची आई
अंडीवाल्याची कमाई
कोंबडी खाणे म्हणजे सदेह स्वर्गात जाणे असते.
नारायण सुमंतानी
चिकन झाले रांधूनी, बैस तू अन् हाणरे
बर्ड फ्लूचा गल्बला खोटारडा हे जाण रे
ही कविता सादर केली.
नायगावकरांनी आपली शाकाहारी ही कविता सादर केली. शेवटी हे काय चाललंय शाकाहारी असा प्रश्न करुन 'त्यापेक्षा कोंबडी बरी' असे उद्गार काढून हशा वसूल केला. कविसंमेलन रंगतच गेले. पण बाहेरून तंदुरीचे, रश्श्याचे दरवळ येताच श्रोते बाहेर धाव घेऊ लागले.
मग रामदास फुटाण्यांनी समारोपाची कविता सादर केली.
बकरा म्हणाला कोंबडीला, फार नाचलीस, पण नाही वाचलीस.
कोंबडी म्हणाली,
आधी खाण्यासाठी मारायचे, आता खाऊ नये म्हणून मारतात.
पण तुला रे आता कोण सोडवणार?
ताप आम्हाला आला, पण तुझं मरण आता खूप आधीच ओढवणार...
-बाजीराव
(दै. तरुण भारत, बेळ्गाव मध्ये ३१.०३.२००६ रोजी पूर्वप्रकाशित)
प्रतिक्रिया
21 Apr 2008 - 12:25 am | व्यंकट
सही आहे.
व्यंकट
21 Apr 2008 - 8:05 am | सहज
बर्डफ्लु च्या काळात हे लिखाण एकदम फ्रेश. :-)
21 Apr 2008 - 1:23 pm | ठणठणपाळ
मस्त आहे. वेगवेगळ्या कवींच्या शैलींची सहीसही नक्कल केली आहे.
23 Apr 2008 - 9:46 pm | तळीराम
बाजीराव, तुम्ही इथेही? आनंद आहे. तुमची टोलेबाजी तिथे बंद का झाली ते कळले नाही. इथे जुने पुन्हा प्रकाशित करण्याऐवजी नवे लिहा असे सुचवतो... तुमचे लिखाण फर्मास होते.
तळीराम (सांगलीकर)
24 Apr 2008 - 2:49 pm | मनस्वी
+१