बाजीरावांची टोलेबाजी:९:पुढच्या वर्षी लवकर ये...!

बाजीराव's picture
बाजीराव in जनातलं, मनातलं
14 Sep 2008 - 3:07 pm

कैलासावर शंकर आणि पार्वती काळजी करत बसले होते. `मला बाई फार काळजी वाटते' हे वाक्य पार्वतीमातेनं गेल्या दहा दिवसात लाखवेळा तरी उच्चारले होते. वर्षातून दहा दिवस गणपती पृथ्वीतलावर भरतखंडात महाराष्ट्रदेशी वास्तव्यासाठी जायचा. सध्या तिथली परिस्थिती बिघडत चालली होती. म्हणून पार्वतीमातेला काळजी वाटत होती एवढंच. शंभर-दीडशे वर्षापूर्वीची गोष्ट वेगळी होती. तेव्हा गणपतीचे वास्तव्य घरातूनच असायचे. लहान मुले गणपतीवर फार प्रेम करायची. परतल्यावर गणपतीही अगदी आनंदात असायचा. सहलीला जाऊन आलेली मुले जशी आपल्या आईला गंमतीजमती सांगतात तशा तिथल्या गोष्टी सांगायच्या. कुठं त्याचं वास्तव्य दीड दिवस असायचं, कुठं पाच, कुठं सात तर कुठं दहा दिवस. गणपती येणार म्हणून लोक अगदी आनंदात असायचे.
नोकरीचाकरीनिमित्त बाहेरगावी असलेली मंडळी सणाला घरी यायची. घराला रंगरंगोटी व्हायची. सगळं घर आनंदात असायचं. रोज आरत्या म्हणायच्या. नैवेद्याला कुठे उकडीचे मोदक, कुठे तळलेले मोदक, नाना तर्‍हेची पक्वान्ने, फळफळावळ खारीक खोबरे, पंचखाद्य अशी रेलचेल असायची. लोकांचंही गणपतीबाप्पावर भारी प्रेम. अनंतचतुर्दशीला निरोप देताना सगळीजणं पाणावल्या डोळ्यांनी `पुढच्या वर्षी लवकर ये हं' असं सांगायची. अनंतचतुर्दशीला संध्याकाळी किंवा फार तर रात्री गणपती घरी परतायचा.
लोकमान्य टिळक नावाच्या एका मोठ्या देशभक्तानं गणेशभक्तीला एका विधायक चळवळीचं स्वरुप दिलं. गणपती सार्वजनिक झाले. लोक एकत्र आले. एका विचारानं भारले गेले. लोकमान्यांचा हेतू सफल झाला. देशाला स्वातंत्र्य मिळालं. गणपती आता मंडपातूनही रमू लागला. सार्वजनिक गणपती उत्सव हा संस्कृतीचा उत्सव असायचा. त्याचा `फेस्टीवल' झाला नव्हता. प्रत्येक मंडपासमोर त्या त्या काळातल्या नामवंत गायक गायिकांच्या मैफली रंगायच्या. नाटकं व्हायची. गणपती फारच आनंदात असायचा. परत आला की तिथे ऐकलेली गाणी छान गाऊन दाखवायचा. शंकरपार्वतीही तल्लीन व्हायचे. नंतर नंतर या उत्सवाचं स्वरुप पालटत गेलं. उत्सव भलताच सार्वजनिक झाला. गाणी चलती असलेली पण भलतीसलतीच वाजवली जायची. कानात ती गाणी बराच काळ सलत असायची. `दम मारो दम, हवा हवा, रंभा हो हो हो, चोली के पीछे क्या है, नवीन पोपट हा, नागोबा डुलायला लागला, चांद दिखला जा' असलं काहीतरी दरवर्षी नवं गाणं गणपती ऐकून यायचा आणि त्याचे ते तीक्ष्ण, विशाल, सुपासारखे कान दुखतात म्हणून तक्रार करायचा. शंकर त्याला समजावायचे. `तू शूर्पकर्ण म्हणून प्रसिद्ध आहेस. सूप ज्याप्रमाणे धान्य पाखडतं; हवं ते ठेवतं आणि नको ते टाकतं, तसं तू कर.' त्यावर गणपती म्हणायचा, `पिताश्री, पृथ्वीतलावर डॉल्बी नावाची एक महाध्वनीप्रदूषिका आहे. तिचा आवाज इतका कर्णकटू आहे की या काळात अनेक माणसे कर्णबधीर बनतात, अनेकांचा रक्तदाब वाढतो, अनेकांच्या हृदयाची धडधड वाढते, म्हातारेकोतारे तर जागीच प्राण सोडतात. या ध्वनिलहरी कानावर इतक्या जोरात आदळतात की निवडायला आणि पाखडायला वेळच नसतो. दहा दिवस हे सहन केल्यावर विसर्जनाच्या मिरवणुकीत पुन्हा डॉल्बी आहेच. जोडीला झांज, ढोल पथक असतं. माणसं इतकी धुंद होऊन नाचत असतात की मिरवणूक पुढं सरकतच नाही. त्यात पुन्हा बर्‍याच ठिकाणी रस्ते इतके खराब आणि खड्ड्याचे आहेत की समुद्रावर पोचेपर्यंत अंग अगदी खिळखिळं होतं.' या सार्‍यामुळं पार्वतीमाता फार चिंतेत असायची. त्यातच भरतदेशी वेगवेगळ्या विध्वंसक संहारास्त्रांचा उपद्रव भलताच वाढू लागला होता. सणासुदीला, गर्दीच्या ठीकाणी नेहमीच विस्फोट व्हायचे. मिरवणुकीत सैनिकांचा बंदोबस्त असायचा, पण पार्वतीमातेला काळजी वाटायचीच. `साक्षात विघ्नहर्त्याची कसली काळजी करतेस' अशी समजुत शंकर घालायचे.
आज अनंतचतुर्दशी होऊन एक दिवस उलटून गेला तरी गणपती घरी परत आला नव्हता. पार्वतीमातेचं हृदय काळजीनं गलबलू लागलं होतं. तिचा धीर सुटत चालला होता. तेवढ्यात गणपतीबाप्पा घरी परतले. ते खूप म्हणजे खूपच थकले होते. पार्वती म्हणाली, `किती रे बाळा उशीर? किती काळजी करायची आम्ही? विमानानं यायचस ना हवंतर!' गणपती म्हणाला, `विमानानं नाही गं जमत. माझ्याकडच्या त्रिशूळ, पाश, अंकुश या शस्त्रांमुळं मला विमानात प्रवेशच नाही. मी समुद्रमार्गानेच येतो. पण यंदा मिरवणूक फारच लांबली गं. रस्त्यात इतके खड्डे होते आणि मंडळी इतकी धुंद होऊन नाचत होती की मला चौपाटीवर `ड्रॉप' करायलाच चक्क तीस तास लागले. मग होणारच ना उशीर. मी तरी काय करणार?’ त्यावर पार्वती म्हणाली, `ते सगळं ठीक आहे रे. पण आम्हाला काळजी वाटते ना. आता पुढच्या वर्षी लवकर ये.'

-बाजीराव

(दै. तरुण भारत, बेळगावमध्ये दि. ०९.०९.२००६ रोजी पूर्वप्रकाशित.)

वाङ्मयलेख

प्रतिक्रिया

सहज's picture

14 Sep 2008 - 6:04 pm | सहज

बाजीराव जियो!

यशोधरा's picture

14 Sep 2008 - 6:19 pm | यशोधरा

एकदम खास!

पक्या's picture

15 Sep 2008 - 1:07 am | पक्या

छान टोलेबा़जी..आवडली

अभिज्ञ's picture

15 Sep 2008 - 1:21 am | अभिज्ञ

बाजीरावांची अफलातून टोलेबाजी आवडली.

अभिज्ञ.

बेसनलाडू's picture

15 Sep 2008 - 1:23 am | बेसनलाडू

नेहमीसारखीच मस्त टोलेबाजी!
(वाचक)बेसनलाडू

धनंजय's picture

15 Sep 2008 - 2:53 am | धनंजय

आवडली.

मदनबाण's picture

15 Sep 2008 - 3:36 am | मदनबाण

टोलेबाजी आवडली.....

मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

चतुरंग's picture

15 Sep 2008 - 3:39 am | चतुरंग

बाप्पा मोरया! लवकर या! :)

चतुरंग

हर्षद आनंदी's picture

15 Sep 2008 - 9:47 am | हर्षद आनंदी

सचिनचा स्ट्रेट ड्राईव्ह, ख्रिस गेलचा फ्लिक...

तसाच बाजीरावांचा टोला....

वैशाली हसमनीस's picture

15 Sep 2008 - 9:56 am | वैशाली हसमनीस

जबरदस्त टोलेबाजी !आवडली.

प्रकाश घाटपांडे's picture

15 Sep 2008 - 10:03 am | प्रकाश घाटपांडे

सुंदर लेख.
आज टिळक हयात असते तर?
प्रकाश घाटपांडे

मनिष's picture

15 Sep 2008 - 12:35 pm | मनिष

लेख फार आवडला

स्वाती दिनेश's picture

15 Sep 2008 - 12:51 pm | स्वाती दिनेश

टोलेबाजी (नेहमीप्रमाणेच) झक्कास..
लेख आवडला हेवेसांनल.
स्वाती