बाजीरावांची टोलेबाजी :८: गणपतीबाप्पा म्होरंऽऽया!

बाजीराव's picture
बाजीराव in जनातलं, मनातलं
2 Sep 2008 - 7:31 am

गणपतीबाप्पा म्होरंऽऽया!

गणपती उत्सव उद्यावर आलाय. घरगुती गणपती उत्सवाला लोकमान्यांनी सार्वजनिक रुप दिलं. या
निमित्ताने लोक एकत्र आले. विचारांचे आदानप्रदान झाले. एक चळवळ उभी राहिली. ती त्या काळाची
गरज होती. स्वातंत्र्यचळवळीचा तो एक भाग होता. आज स्वातंत्र्याची साठी उलटून गेलीय, पण
परिस्थितीत काहीही फरक नाही. दारिद्र्य, अज्ञान, अंधश्रद्धा, रोगराई सारं तसंच आहे. बर्‍याच गोष्टींचा
पुनर्विचार, पुनरावलोकन होणं आणि पुनर्मुल्यांकन करणं आवश्यक आहे. समाजात आज अनेक प्रथा
अशा आहेत की त्या मोडीत काढायला हव्यात. बर्‍याच गोष्टी बदलायला हव्यात. मी असं म्हणतोय.
तुमचंही अगदी असंच मत असणार. पण तुम्ही आणि मी एकमेकाला भेटत नाही. आपण एकत्र येत
नाही. आपण विचार मांडतो, गप्प बसतो. थोड्याशा कृतीची गरज असते. ती आपल्या हातून घडत
नाही. ज्यांना चांगल्या कल्पना सुचतात, समाजाबद्दल ज्यांना आस्था आहे, कळकळ आहे, तळमळ
आहे असे लोक नुसतेच बोलत राहतात आणि विचारवंत म्हणवून घेण्यात धन्यता मानतात.

हेच ते लोक. जे निवडणूकीत मतदान करत नाहीत. आपण मतदान का करत नाही यावर त्यांचं एक ठाम मत असतं. राजकारण्यांनी देश कसा बिघडवला आहे; कोण वाट्टेल ते गुंड, मवाली, दरोडेखोर
कसे निवडून येतात; लोकशाहीची कशी विटंबना चालली आहे; भ्रष्टाचार कसा माजला आहे हे सारं प्रचंड
तळमळीने सांगतात. या असल्या लोकांना मतदान करणं हे कसं पाप वाटतं ते ही सांगतात.
आपल्याला काही बोलता येत नाही. बदमाष मंडळी निवडून येत राहतात. डोळ्यासमोर एखादा गुन्हा
घडतो. ही विचारवंत मंडळी पुढचं सारं ओळखतात. आता इथं थांबलो तर पोलीस, कोर्ट हे झंगट मागं
लागणार; पुन्हा जीवाला धोक्याची शक्यता हे लक्षात येतं. मग काढता पाय घेतात. साक्षीदार मिळत
नाहीत. गुन्हेगार सुटून जातो.

गणपती ही विद्येची अधिदेवता. सार्‍या विद्या, कला त्याच्या ठिकाणी वसतात. तो विघ्नहर्ता आहे. कुठल्याही कार्याच्या आरंभी त्याची पुजा करण्याची आपली परंपरा आहे. समाजात जे विचारवंत,
बुद्धिवंत, ज्ञानवंत, शास्त्रज्ञ, वैज्ञानिक, उद्योजक आहेत हे सारे गणपतीचीच रुपं म्हणायला हरकत नाही.
समाजातल्या एखाद्या गटाचे, गुणाचे, गणाचे नेतृत्त्व ते करतात. त्या अर्थाने ते 'गण'पतीच असतात.
पण ही सगळी मंडळी काहीशी आपल्यातच मुश्गुल असतात. आत्मकेंद्रित असतात. स्वत:च्या कलेचा,
विद्येचा, बुद्धिचा अहंकार त्यांना समाजापासून विनाकारण दूर ठेवतो. सामान्य माणसांच्यात कमी
मिसळणं त्यांना समाजापासून तोडतं. यातूनच या मंडळींचे स्वतंत्र कोष बनतात.
या सार्‍या गणपतींना एक सांगणं आहे. थोडेसे 'सार्वजनिक' व्हा. तुमचं समाजात मिसळणं, तुम्हाला जे सांगावसं वाटतंय ते सार्‍यांना सांगणं आणि काही सामाजिक कर्तव्यं चोखपणे बजावणं याची आज
नितांत गरज आहे. तुमची उदासिनता देशाला, समाजाला अधोगतीला नेतेय. तुमचं हे समाजाकडं पाठ
फिरवणं समाजाचं नुकसान करतंय. या गणपतीउत्सवानिमित्त विचार करा. तुमच्यावर लोकांचा विश्वास
आहे. तुम्ही मोकळेपणानं बोला. कृतीशील व्हा. आम्ही तुम्हाला साथ देऊ. तुम्ही निर्भय व्हा. खूप
लोक तुमच्यामागं उभी राहतील. सारी (अ)व्यवस्था एका दिवसात बदलणं शक्य नाही. पण एक
चांगली सुरवात तरी होईल. समाजातल्या तुमच्यासारख्या गुणी माणसांनी, गणपतींनी असं मागं राहून
चालणार नाही. यावर्षी 'गणपतीबाप्पा मोरया' म्हणतांना तुम्हालाही आवाहन करतो; 'आता मागं राहू
नका, गणपतीबाप्पा म्होरंऽऽया!'

-बाजीराव

(दै. तरुण भारत, बेळ्गावमधून पूर्वप्रकाशित)

वाङ्मयलेख

प्रतिक्रिया

रामदास's picture

2 Sep 2008 - 7:52 am | रामदास

विषय आहे. आणखी विस्तारपूर्वक लिहाल का.?

सुनील's picture

2 Sep 2008 - 12:29 pm | सुनील

मध्यमवर्गीय मानसिकता दाखवण्याचा एक स्तुत्य प्रयत्न. पण लेख थोडासा विस्कळीत वाटतो. मुद्दा नेमकेपणाने भिडत नाही. लेख थोडा नीट "बांधलात" तर तो सद्य परिस्थितीवर भाष्य करणारा उत्तम लेख ठरेल, असे वाटते.

(बूर्ज्वां) सुनील

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

लिखाळ's picture

2 Sep 2008 - 6:55 pm | लिखाळ

छान लेख.

अमोल नागपूरकर's picture

24 Dec 2008 - 2:03 pm | अमोल नागपूरकर

लिओ टोलस्तोय चे एक वाक्य आठवले.
'ह्या जगात दुर्जन लोक जितक्या सहजतेने एकत्र येतात तितक्या सहजतेने सज्जन लोक एकत्र आले असते तर जगात कधीच कुठलेही दुष्क्रुत्य घडले नसते'