डोंगराला वळसे घालत जाणारा नागमोडी रस्ता
चढता चढता अचानक उतरंड, पुन्हा चढ...
कुठे वळणावर अचानक सुर्योदय दिसतो
कधी दरड कोसळून रस्ता तुंबतो
कुठे पाय घसरणार, कुठे ठेचाळणार
कधी मृगजळ दिसणार, कधी अंधार दाटणार
काही चिकटवत, काही झटकत,
अरूंद रस्त्यावर अगणीत मुसाफीर भळाभळा वाहत.
धावणारे, धापा टाकणारे,
पाय ओढीत चालणारे,
विजयोन्माद करीत सुसाटणारे,
धक्काबुक्की करीत माजणारे,
स्वत: पडून रस्ता अडवणारे,
दुसर्याला पाडून रस्ता मिळवणारे,
सारेच मुसाफीर एका अगम्य घाईत
कोणाकडेच वेळ नाही
ना पडलेल्याला सावरायला
ना कोणाकडे बघायला
समोरचा नारींगी सुर्यास्त बघायला वेळ नाही
वाटेत उमलल्या फुलांचा सुगंध जाणवत नाही
सर्वातून वाट काढत पुढे पळणारे असंख्य मुसाफीर
थांबला, संपला
पडला, तुडवला
धीमा, मागे टाकला
सुसाटला, चमकला
धक्का मारला, पुढे गेला
धक्का खाल्ला, चरफडला
आंधळ्या शर्यतीतले मुसाफीर
जाडे रोडे मोठाड लहानगे ऊंच ठेंगणे उंदीर
काळे गोरे भुरे लाल पिवळे हिरवे उंदीर
हिंस्त्र हळवे भुरटे फसवे दयाळू लाजाळू घाबरट बावळट शहाणे वेडे उंदीर
लंगडे आंधळे बिनपायांचे दहा पायांचे कुबडीवाले सायकलवाले मोटरवाले पॅरॅशूटवाले
सूट्वाले धोतरवाले लुंगीवाले साडीवाले नागडे उघडे
पुष्ट तुष्ट रोगी योगी धोंगी भोगी
इतःस्ततः आणि पुढेपुढे धावणारे उंदीर
सगळ्यांचे एकच कर्म.
डोंगराला वळसे घेत चढ उतार करणारा रस्ता कापीत पळायचे
समोरच्याच्या आणखी समोर जायचे
मागच्याला आणखी मागे टाकायचे
ह्या भाउगर्दीत कधी चुकूनमाकून
एखादा उंदीर थबकतो.
दरीच्या पायथ्याशी झुळझुळ वहाणारा निर्झर,
डोळे भरून बघतो.
पाण्यात पोहणारे बदकांचे कुटूंब त्याला बोलावते.
आणि अचानक.............
उंदीर एकला वेडा, तोडूनी बेडी,
मारली उडी अशी वेडी.....
प्रतिक्रिया
9 Jul 2008 - 7:07 am | शितल
सारेच मुसाफीर एका अगम्य घाईत
कोणाकडेच वेळ नाही
ना पडलेल्याला सावरायला
ना कोणाकडे बघायला
समोरचा नारींगी सुर्यास्त बघायला वेळ नाही
वाटेत उमलल्या फुलांचा सुगंध जाणवत नाही
सर्वातून वाट काढत पुढे पळणारे असंख्य मुसाफीर
हे मस्तच रचले आहे
9 Jul 2008 - 7:36 am | यशोधरा
मस्तच!
एकला वेडा, तोडूनी बेडी,
मारली उडी अशी वेडी.....
मारलेली उडी सफल होवो!! निदान उडी मारली ती चूक झाली, असे न वाटो....
10 Jul 2008 - 9:26 am | विसोबा खेचर
धावणारे, धापा टाकणारे,
पाय ओढीत चालणारे,
विजयोन्माद करीत सुसाटणारे,
धक्काबुक्की करीत माजणारे,
स्वत: पडून रस्ता अडवणारे,
दुसर्याला पाडून रस्ता मिळवणारे,
सारेच मुसाफीर एका अगम्य घाईत
वा! भन्नाट लिहिलं आहे!
तात्या.
10 Jul 2008 - 11:45 am | आनंदयात्री
सही कविता अरुणराव.
10 Jul 2008 - 12:04 pm | अरुण मनोहर
सही पहचाना आपने. ही पद्य कविता म्हणूनच लिहीली होती. पण वाचकांना गोंधळ नको म्हणून, लेख वगैरे प्रकारात टाकली!
10 Jul 2008 - 11:59 am | अरुण मनोहर
शितल, यशोधरा, तात्या, आनंदयात्री, प्रोत्साहनासाठी धन्यवाद. तसेच सर्व वाचकांचे पण आभार.
10 Jul 2008 - 5:27 pm | वरदा
चढता चढता अचानक उतरंड, पुन्हा चढ...
कुठे वळणावर अचानक सुर्योदय दिसतो
कधी दरड कोसळून रस्ता तुंबतो
कुठे पाय घसरणार, कुठे ठेचाळणार
कधी मृगजळ दिसणार, कधी अंधार दाटणार
काही चिकटवत, काही झटकत,
अरूंद रस्त्यावर अगणीत मुसाफीर भळाभळा वाहत.
ह्या ओळी जास्त आवडल्या.
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt