सविनय कायदेभंग - हेन्री डेव्हिड थोरो

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
30 Aug 2011 - 12:00 am

श्री. अण्णा हजारेंनी जी प्रस्थापित सरकारविरूध्द चळवळ उभी केली आणि यशस्वी केली. ती योग्य आहे का यावर अनेक चर्चा चित्रवाणी व वर्तमानपत्रांमधे झाल्या. त्यांच्या आंदोलनाविरूद्ध एक समान आरोप होता तो म्हणजे आपल्या राज्यघटनेविरूद्ध असे अहिंसक आंदोलन पुकारणे योग्य आहे का ?

मते अनेक असतील किंवा आहेत पण १८४६ साली लिहिलेला हा निबंध मात्र आजही वाचण्यासारखा आहे याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही..........

ले. हेन्री डेव्हिड थोरो
जन्म : जुलै १२, १८१७
मृत्यू : मे ६, १८६२
एकूण आयूष्य : ४४ वर्षे.
कर भरला नाही म्हणून तुरूंगात गेल्यावर लिहीलेला लेख –
काही ठिकाणी समजण्यासाठी बदल केले गेले गेले आहेत, पण मुळ विचारांना कोठेही धक्का लावलेला नाही.

सविनय कायदेभंग –

कमीत कमी बंधने असणे हे चांगल्या शासनपद्धतीचे लक्षण आहे असे मी मानतो आणि त्या दिशेने लवकर प्रवास व्हावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. असे झाले तर टोकाला जाऊन असेही म्हणता येईल की ज्यात ’शासनच लागत नाही ती सर्वोत्कृष्ठ शासन पद्धती. जेव्हा माणसाची एवढी तयारी होइल तेव्हा अशी शासन पद्धती येइल याच्याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही. चांगल्या शासनपद्धतीची उपयुक्तता वादातीत आहे पण काही सरकारे ही दुर्दैवाने उपयूक्त नसतात आणि सगळ्याच सरकारांची उपयुक्तता केव्हा ना केव्हा तरी ढासळते. खडे सैन्य असावे की नाही किंवा किती असावे याच्या विरुद्ध अनेक मुद्दे आहेत आणि त्यातील काही आपण खोडूही शकत नाही तेच मुद्देही सरकारविरूद्ध वापरले जाऊ शकतात. खडे सैन्य हे राज्यकर्त्या सरकारचेच एक अंग आहे. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सरकार किंवा राज्यकर्ते हे जनतेने निवडून दिलेले असतात. या पलिकडे त्याला अर्थ नाही त्यामुळेच त्यांच्यातर्फे एखादे काम किंवा एखादा कायदा आमलात आणायच्या अगोदरच जनता त्यांना खाली खेचू शकते किंवा त्यांची कान उघडणी करू शकते. उदा. मेक्सीकोचे युद्ध घ्या. थोड्या लोकांनी सरकारला हाताशी धरून जी उलथापालथ केली ती सर्व जनतेला मान्य होण्यासारखी नव्हतीच.

आजचे सरकार तरी काय आहे ? परंपरेच्या नावाखाली आहे तीच राज्यव्यवस्था तोडमोड न करता आहे तशीच पूढच्या पिढीला सुपूर्त करणे हेच यांचे ध्येय आहे. हे करताना जसा काळ जातो तसा प्रामाणिकपणा कमी होतोय याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. आज एकाही नागरीकाची चेतना आणि शक्ती या सरकारमधे नाही कारण एक माणुसही त्यांना त्याला हवे तसे वाकवू शकतो. एखाद्या खेळण्यातील बंदूकीची किंमतही आज जनता या सरकारला देत नाही. मग जनतेला अशी काहीतरी यंत्रणेची गरज भासू लागते की जी सरकारविषयी त्यांच्या ज्या काही कल्पना आहेत त्या प्रत्यक्षात उतरवेल. यावरून हेच सिद्ध होते की सरकार यामुळे लोकांवर आणि स्वत:वर सुद्धा माणसे लादू शकते आणि त्यातून फायदा करून घेऊ शकते.

जे सगळ्यात चांगल आहे त्याला आपण परवानगी द्यायलाच पाहिजे. पण या सरकारने कुठलीही उद्यमशील योजना राबवीली नाही मात्र असल्या मार्गातून बाजूला होण्याची तत्परता मात्र दाखिवीली. देश खरा स्वतंत्र आहे का हा खरा प्रश्न आहे. शासन स्वत: काही करत नाही, जनतेला खर्‍या अर्थाने सुशिक्षित करत नाही. जे काही आत्तापर्यंत मिळवलेले दिसत आहे ते जनतेच्या मुलभूत गुणांनी. जर सरकारने वेळीच योग्य धोरण अवलंबविले असते तर जनतेने यापेक्षाही जास्त मिळवले असते, करून दाखविले असते. जर सरकार खरेच उपयुक्त असेल तर माणसे आनंदाने एकामेकांच्या मतांची फिकीर करतील. जर सरकार सगळ्यात उपयुक्त असेल तर सरकार जनतेला त्यांच्या मताप्रमाणे वागायला पूर्ण मूभा देईल. उपयुक्त असेल तर व्यापारउदीम हा रबराच्या चेंडू प्रमाणे सरकारने उभ्या केलेल्या अनेक अडथळ्याच्यावरून पूढे मागे उड्या मारताना दिसणार नाही. सरकारमधील माणसांच्या हेतूंपेक्षा जर त्यांच्या निर्णयांच्या परिणामांवरून त्यांची योग्यता, उपयुक्तता ठरविली तर त्यांना आंदोलने करणार्‍या जनतेसारखेच तुरूंगात टाकावे लागेल.

पण सरकार नकोच या टोकाच्या मार्गाला येण्यापेक्षा मी अधिक चांगल्या शासनाची मागणी पूढे रेटतो. प्रत्येक माणसाला कशा प्रकारचे शासन पाहिजे आहे हे सांगण्याचा आधिकार आहे आणि त्याने ते सांगितले की ते मिळवायच्या दिशेने त्याने एक पाऊल पूढे टाकले असे मी म्हणेन.

एकदा निवडून आल्यावर राज्यकर्ते अनेक दिवस राज्य करतात कारण ते चांगले असतात किंवा ते लोकोपयोगी कामे करतात, किंवा त्यांच्या मनात दुबळ्या लोकांबद्दल सहानभूती असते म्हणून नव्हे तर त्याचे खरे कारण ते ताकदवान झालेले असतात हे आहे. हेही लक्षात घेतले पाहिजे की ज्या शासनामधे फक्त बहूमत राज्य करते ते शासन खर्‍या न्यायावर आधारीत कसे असेल ? अशी राज्यपध्दती विकसीत होईल का? ज्यात बहूमत चांगले काय आणि वाईट काय याचा निर्णय न करता सतसद्विवेक बुद्धी ते काम करेल ? शासन अधिक जास्त उपयूक्त कसे ठरेल या संधर्भातीलच निर्णयप्रक्रिया बहूमतावर सोडली पाहिजे. निवडून आलेल्या प्रतिनिधीपाशी माणसांनी आपली सतसदविकवेकबुद्धी एका क्षणासाठीही गहाण टाकावी का ? तसे असेल तर माणसांमधल्या सतसदविवेकबुद्धिला काय अर्थ आहे ? मला वाटते आपण पहिल्यांदा माणसे असायला पाहिजे आणि नंतर नागरीक. सत्य आणि कायदा या दोन्हीमधे सत्यालाच जास्त महत्व आपण द्यायला पाहिजे. पहिल्यांदा सत्य आणि मग कायदे, हे आपण नीट लक्षात ठेवले पाहिजे. कुठल्या वेळी काय योग्य हे गृहीत धरण्याचा व ते करण्याचा माझा हक्क हेच माझे कर्तव्य आहे. आता तुम्ही असेही म्हणाल सरकारला किंवा एखाद्या संस्थानाला सतसद्‌विवेकबुद्धी कशी असू शकेल ? पण लक्षात घ्या त्या संस्थानात किंवा शासनात काम करणार्‍या माणसांची सतसद्‌विवेकबुद्धी हीच त्या संस्थानाची किंवा सरकारची सतसदविवेकबुद्धी असते. कायद्याने माणसाला कधीच कणभरही न्यायप्रिय बनविलेले नाही. उलट जे सुस्थितीत आहेत त्यांना न्यायाचे दलाल मात्र कायद्याने बनविलेले आहेत. कायद्याला परमेश्वरापेक्षाही महत्व देण्याने काय होते बघा...एखादी कवायत करणारी सैनिकांची रांग ज्यात सगळ्यात पूढे त्यांचा जनरल आहे, मागे इतर आधिकारी आणि सैनिक आहेत अशी ही पलटण कवायत करत युद्धात सहभागी होते. हो ! त्यांच्या मनाविरूद्ध ! त्यापेक्षाही भयंकर म्हणजे त्यांच्या सतसद्‌विवेकबुद्धीविरूद्ध सुद्धा. त्यांना फक्त त्यांच्या या कवायतीच्या परिणामांची जाणीव असते. मग ही माणसे आहेत का मुठभर नालायक माणसांच्या चाकरीतील हलणारे छोटे दगडाचे किल्ले ? फौजेच्या तळावर आपण जाल तेव्हा एखाद्या सैनिकाच्या स्मारकाला भेट द्या. जिवंतपणे लढणार्‍या या सैनिकाच्या रायफलची तेथे आता फक्त सावली असते. “नाही चिरा नाही पणती” असे काव्य लिहून ही वस्तुस्थिती बदलत नाही हेही खरे आहे.

आपल्या लक्षात आता आले असेल की ही माणसे शासनाची चाकरी ही माणूस म्हणून नाही तर एखादे यंत्राने ती करावी अशी करत असतात. त्यांचे मन भले मग त्यांना काहीही सांगत असूदे ! बर्‍याचदा त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे, त्यांच्या नैतिक आधिकाराप्रमाणे वागताच येत नाही. असे असेल तर त्यांच्यात आणि खेळणातल्या मानवी आकृत्यांमधे काय फरक आहे ? खेळणी ही आपण आपल्याला पाहिजे तेव्हा आपल्या फायद्यासाठी आपण तयार करु शकतो. समाज मग यांना बुजगावण्याचीच किंमत देतो. तरीही हे सामान्यपणे चांगले नागरीक असतात असे म्हटले पाहिजे. उरले – राजकारणी, वकील, मंत्री, नोकरशाही जे शासनाची सेवा त्यांची बुद्धी वापरून करतात असे म्हटले जाते, त्यांच्यात नैतिकतेचा आनंदी आनंद असल्यामुळे ते बहुतांशी सैतानाचीच त्याला देव समजून सेवा करतात असे म्हटले पाहिजे. फारच थोडे असे असतात की जे स्वत:च्या सतसद्‌विवेकबुद्धीला स्मरून शासनाची सेवा करतात त्यात असतात देशभक्त, हुतात्मे, सुधारणावादी इ.. त्यांचा त्यांच्या या कामामुळे सरकारला विरोध करण्यातच वेळ जात असल्यामुळे त्यांना शासन हे शत्रू मानते. मग शहाणा माणूस कोणाला म्हणायचे ? जो बुजगावणे होण्याचे नाकारेल आणि त्यासाठी त्याच्या पदाचाही त्याग करू शकेल त्याला -
“मी नाही होणार त्यांची मालमत्ता !
नाही माझा जन्म त्यासाठी.
माझी विद्वत्ता नाही नोकर होण्या त्यांचा.
हे विश्वची घर माझे, मी विश्वाकरता !

दुर्दैवाने आज जे असे करतात आणि स्वत:ला समाजाला अर्पण करतात त्याला शासनकर्ते स्वार्थी आणि मूर्ख समजतात आणि जे शासनकर्त्यांना आपल्यातले थोडेसे देतात त्यांना ते दानशूर आणि शहाणे समजतात.

आज अशा सरकारशी माणसाचे कसे संबंध असावेत ? उत्तर हेच आहे की असे संबंध हे बदनामी स्विकारल्याशिवाय अशक्य आहेत त्यामुळे जे सरकार एवढे वैचारीक/आर्थिक भ्रष्ट आहे त्याच्याशी एक क्षणही संबंध ठेवणे शक्य नाही.

समाजाने माणसाचा क्रांती करण्याचा हक्क मान्य केलेला आहे. क्रांतीचा अर्थ अधिक व्यापकतेने घेतला पाहिजे. क्रांती म्हणजे मला जे मान्य नाही त्याच्यात सामील न होण्याचा हक्क. वेळ पडल्यास जे पटत नाही त्याला विरोध करण्याचा हक्क. जेव्हा त्या शासनकर्त्यांची दडपशाही वाढेल आणि कार्यक्षमता लयास जाईल त्यावेळी त्यांना विरोध करायचा हक्क. आता हीच वेळ आली आहे असे सगळ्या जनतेचे म्हणणे आहे. जर या सरकारने चैनीच्या वस्तूवरचे कर वाढवले तर मला त्याचे काही वाटणार नाही कारण त्या चैनीच्या वस्तूंशिवाय मी जगू शकतो. प्रत्येक राज्यपद्धतीचे समाजाशी खटके उडतच असतात. हे खटकेच किंवा संघर्ष वाइटाला अटकाव करत असतो. पण जेव्हा खूलेआम टोळ्या करून संपत्तीवर धाड पडते आणि ती लुबाडली जात तेव्हा ते शासन आता यापूढे आम्हाला नकोच असे म्हणणे भाग आहे. दुसर्‍या शब्दात सांगायचे म्हणजे ज्या राज्यपद्धतीत समाजाचा मोठा भाग हा दारिद्र्यात खितपत पडला आहे, आणि हे शासनकर्ते त्यांचे संरक्षणही करू शकत नाहीत, जेथे आवाज उठवल्यावर आणिबाणी जाहीर केली जाते, नोकरशहांशी हातमिळवणी करून राष्ट्रीय संपत्ती गिळंकृत केली जाते, अशा वेळी प्रामाणिक माणसाच्या मनात क्रांतीचे विचार घोळतील यात नवल ते कसले ! नव्हे ते त्याचे कर्तव्यच बनते. हे कर्तव्य फार तातडीचे आहे कारण आपला शत्रू आतच आहे.

पाले नावाच्या एक तत्ववेत्ता, ज्याला बर्‍याचजणांची “नैतिकता” या विषयावरचा आधिकारी म्हणून मान्यता आहे त्याने एका लेखात म्हटले आहे...
“शासनाचे ऐकणे हे कर्तव्य मानायचे की नाही हे फक्त शासन उपयूक्त आहे का नाही ही एकच गोष्ट ठरवू शकते. सरकारला सत्तेवर रहायचा हक्क जोपर्यंत समाजाच्या हिताचे रक्षण होते आहे तोपर्यंतच. त्याच्याही पूढे ते अस्तित्वात राहिले आणि जनता त्यांचे - प्रस्थापीत सरकारचे ऐकत राहिली तर ती देवाची इच्छा म्हणावी लागेल पण त्यापूढे नाही. हे एकदा मान्य केले की विरोधाचे प्रत्येक प्रकरण हे तोलले जाऊ शकेल. एका बाजूला धोके आणि तक्रारी आणि दुसर्‍या पारड्यात त्या दूर करण्याच्या शक्यता. पण एक लक्षात घ्या, पॅलेने ज्यात उपयुक्तता हा निकष लावता येत नाही अशा शक्यतेवर विचार मांडलेला नाही. ही शक्यता जर गृहीत धरली तर प्रत्येक समाजाच्या घटकाला ज्यात शेवटचा घटक एक माणूस आहे, त्याला न्याय करावाच लागणार मग त्याची किंमत कितीही असुदेत.

वास्तवात सुधारणांच्या विरोधात सगळे राजकारणी आहेत असे म्हणणे धाडसाचे होईल. या सुधारणांच्या विरोधात खरे आहेत ते सत्तेचे दलाल, औद्योगिक साम्राज्ये आणि श्रीमंत शेतकरी. त्यांना मानवतेपेक्षा व्यापार-उदीम जास्त महत्वाचा वाटतो. त्यामुळे सामान्य माणसांना न्याय मिळू नये अशी त्यांनी सोय केलेली असते. त्याची पडेल ती किंमत मोजून. माझे खरे भांडण सीमेपलिकडच्या लोकांशी नव्हे तर या घरातील लोकांशीच आहे. आपल्याला सुधारणा ही हळू हळू होत असते असे म्हणायची सवयच असते. कारण लोकांची यासाठी मानसिक तयारी नसते, पण मुख्य कारण हे असते की ज्या समुहाला ही सुधारणा घडवून आणायची असते तो तुलनेने लहान असतो आणि सत्तेतल्या लोकांपेक्षा सांपत्तिक स्थितीने तुलनेने मागासलेला असतो. किती लोकं आपल्यासारखी प्रामाणिक किंवा चांगली आहेत हे त्यावेळी महत्वाचे नसून एकही डाग नसलेला एखादा तरी माणूस आहे का याचा शोध घेणे महत्वाचे असते. कारण तोच हे बांडगूळ नष्ट करू शकतो. आज परिस्थिती अशी आहे की भ्रष्टाचाराचा विरूद्ध लाखो लोक आहेत पण त्याचा अंत करण्यासाठी कोणीच काही करत नाही. हे एके काळी स्वातंत्र्यासाठी लढलेले लोक खिशात हात घालून स्वस्थ बसतात आणि आम्हाला काय करायचे हे माहीत नाही असा आक्रोश करतात. भ्रष्टाचारापासून स्वातंत्र्य हा विषय त्यांना दररोजच्या बाजारभावापेक्षा कमी महत्वाचा वाटतो. आणि रात्री हा समाज दोन्ही गोष्टींबाबत काही करता येत नसल्यामुळे चडफडत झोपी जातो. या आजच्या जमान्यात देशभक्त आणि प्रामाणिक माणसांचा बाजारभाव काय आहे हा खरोखरीच चिंतनाचा विषय आहे. ते सध्याच्या परिस्थितीबद्दल नाराजी व्यक्त करतात, खेद व्यक्त करतात, यासाठीच का स्वातंत्र्य मिळवले असे खालच्या दबलेल्या आवाजात कुजबुजतात, अगदीच चिडले तर अर्ज करतात. पण ते अशी एकही क्रिया करत नाहीत की ज्याचा काही फायदा होऊ शकेल. ते शांतपणे दुसरा कोणीतरी हे काम करेल आणि या भ्रष्टाचाराच्या भस्मासुराचा नाश करेल या आशेने वाट बघत असतात. त्यांच्या दृष्टीने त्यांचे एक मत हीच त्यांची एकमेव ताकद असते. किंबहुना त्यांना हेच शिकवलेले असते. एक मत दिले की उलथापालथ होईल असा त्यांचा गोड गैरसमज असतो. ही परिस्थिती सगळीकडेच सर्व क्षेत्रात असते. एकच माणूस असतो ज्याच्या कडे गुण आहेत पण त्या गुणाचे ग्राहक नऊशे नव्वॅणव असतात. ज्याच्याकडे खरी सत्याची ताकद आहे तोच महत्वाचा असतो. कोणापेक्षा ? या ९९९ लोकांपेक्षा. हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

सर्व मतदान हे एखाद्या खेळासारखे असते. फक्त त्याला एक नैतिकतेचा मुलामा दिलेला असतो. या खेळात आपल्याला चांगले आणि वाईट या दोन्हीपैकी एकाची बाजू घ्यायची असते आणि हा एक प्रकारचा जूगारच असतो. मी चांगल्याच्या बाजूने मत टाकतो पण विजय चांगल्याचाच होईल का या बाबतीत मी बेफिकीर असतो. ते मात्र मी बहूमतावर सोडतो. म्हणजे मला जे चांगले वाटते, व जे चांगले आहे हे इतरांना चांगले वाटले नाही किंवा त्यांना तसे पटवले गेले की संपले. यामुळे होते काय की जर त्यांच्या उपयोगी एखादा उमेदवार पडला तर तो चांगला असे समिकरण तयार होते. याचा दुर्दैवाने असा अर्थ होतो की तुम्ही अत्यंत दुबळ्या आवाजात एका मताद्वारे सांगत असता की चांगले काय आणि वाईट काय ! आणि दुबळ्यांच्या मताला तीच किंमत मिळते जी मिळायला पाहिजे. शहाणा माणूस सत्य हे कधीच दैवाच्या भिकेवर सोडत नाही. तो यासाठी बहूमतावरही अवलंबून रहात नाही आणि सत्तेचा त्यासाठी उपयोग करत नाही. मग समजा सर्व समाजाने भ्रष्टाचार नष्ट करायच्या बाजूने मतदान केले तर त्याची कारणे काय असावीत ? फार सोपी आहेत. एकतर त्याला त्याच्याशी काही घेणे देणे नसावे, किंवा आता भ्रष्टाचार फारच थोडा उरला असेल. किंवा ते स्वत: या भ्रष्टाचाराचे बळी असतील आणि त्यांना त्यांच्या मताने यापासून मुक्ती मिळणार असेल........

पुढच्या भागात कायदेभंगाची तात्विक बैठक .....
क्रमश:

जयंत कुलकर्णी.

धोरणइतिहाससमाजराजकारणशिक्षणविचारसमीक्षालेखसंदर्भभाषांतर

प्रतिक्रिया

आळश्यांचा राजा's picture

30 Aug 2011 - 1:31 am | आळश्यांचा राजा

अण्णांच्या आंदोलनाला अहिंसक म्हणावे का हा प्रश्न पडला आहे. "यांचा जीव गेला तर काय परिणाम होतील" अशी भीति सरकारला आंदोलनकर्त्यांनी घातली असेल तर ती हिंसेची धमकीच आहे. असो. निबंध वाचतोय.

जयंत कुलकर्णी's picture

30 Aug 2011 - 7:18 am | जयंत कुलकर्णी

अशी भीती सरकारला होती. ती त्यांच्या कर्माने ! Cant Help !

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Aug 2011 - 2:44 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

थोरोच्या लिखाणासंबंधी काही संदर्भ सुचवू शकाल काय? काही चांगली पुस्तकं, किंवा निवडक निबंधांचं संकलन वगैरे.

जयंत कुलकर्णी's picture

30 Aug 2011 - 7:17 am | जयंत कुलकर्णी

नमस्कार !

Internet archieves वर जवळ जवळ सगळेच आहे. मला वाटते पहिल्यांदा त्याचे Walden हे पुस्तक वाचण्यास घ्यावे. नंतर त्याचेच श्रीमती. दुर्गा भागवत यांनी मराठीत भाषांतर केलेले आहे असे मला वाटते ते वाचावे. बहुतेक त्यांनीच केले आहे, खात्री नाही कारण बरीच वर्षे झाली.

लिखाण खूपच क्लिष्ट आहे, पण एकदा का त्याची लय सापडली आणि त्याची लिहायची पद्धत कळाली की मग मजा येते. जेव्हा त्याचे लिखाण (जुन्या पद्धतीचे असल्यामुळे) समजत नाही तेव्हा ते जर मोठ्यांने वाचले तर समजते असा अनूभव आहे. असे का ? मला माहीत नाही. अर्थात हे माझ्याबाबतीत झाले. पण बर्‍याच जणांना समजण्याची शक्यता जास्तच आहे याची मला खात्री आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Sep 2011 - 7:45 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

होय, जुनं इंग्लिश वाचताना मलाही बर्‍याचदा हीच अडचण येते, बर्ट्रांड रसलच्या 'Why I am not a Christian' या नावाने प्रसिद्ध झालेला निबंधसंग्रहाचं असंच झालं. पण इतर काही उदा: Conquest of happiness, Marriage and morals, Science and religion यांच्याबाबतीत हा प्रश्न कमी आला.

निवांत पोपट's picture

30 Aug 2011 - 8:43 am | निवांत पोपट

<<बहुतेक त्यांनीच केले आहे, खात्री नाही कारण बरीच वर्षे झाली.>>

त्यांनीच केले आहे.वाल्डनकाठी विचारविहार ह्या नावाने.सुंदर पुस्तक आहे.

निवांत पोपट's picture

30 Aug 2011 - 8:43 am | निवांत पोपट

<<बहुतेक त्यांनीच केले आहे, खात्री नाही कारण बरीच वर्षे झाली.>>

त्यांनीच केले आहे.वाल्डनकाठी विचारविहार ह्या नावाने.सुंदर पुस्तक आहे.

ऋषिकेश's picture

30 Aug 2011 - 9:23 am | ऋषिकेश

अरे वा.. परवाच या धाग्यात मी या निबंधाचा उल्लेख केला होता आणि आता हा मोठाच खजिना दिलात.

आणि याचे भाषांतर सुरेख झाले आहे. बरेच चपखल शब्द योजले आहेत. अभिनंदन! (आणि आभार! :) )

सहज's picture

1 Sep 2011 - 6:43 am | सहज

धन्यवाद.

"सिम्प्लिफाय सिम्प्लिफाय" असं सांगणारा हा माणूस मला फार आवडतो.

वाचतोय पुढचे भाग येउद्या लवकर

जयंत कुलकर्णी's picture

1 Sep 2011 - 5:08 pm | जयंत कुलकर्णी

- काटेकोरपणे ऐषारामाने, जगून आपण आयुष्य वाया घालवतोय ! चला साधेपणाने जगूया ! साधेपणाने जगू या !

:-)

खरे आहे तो म्हणतो ते " माझ्याकडे किती कमी आहे याचा आता मला राग येत नाही"

जाई.'s picture

1 Sep 2011 - 10:00 am | जाई.

माहितीपूर्ण रोचक लेख