शैशव, बाल्य, पौगंड, तारूण्य, गृहस्थ अन वार्धक्य अशा षटजीवनावस्थांमध्ये कैचर्य (असा शब्द कदाचित मराठीत सापडतो) किंवा कचेरीगिरी (साध्या भाषेत ऑफिसमनशिप) अंतर्भूत करावी असे माझ्यासारख्या नोकरमाणसाला वाटते. नवतारूण्याअंती, गृहस्थांगी अन वार्धक्यापूर्वी आपण आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा कालखंड खेचर म्हणून एका मळ्यात ओझं वाहत सोसतो. हे मळं म्हणजे ऑफिस होय.
इंग्रज जाता जाता भारताला हा नोकरपणा आंदण देऊन गेले. तारुण्यसुलभ "जग जिंकायची इच्छा" ही उपजतच सगळ्यांत असते. बिल गेट्स, टाटा, बिर्ला किंवा सचिन, धोनी, सानिया अथवा अमिताभ, शाहरूख किंवा ऎश्वर्या असं काहीतरी व्हावं असं आपण ठरवलेलं असतं (असा विचार करायला कुणाचा पैसा जातो?) अन त्याच गुर्मीत कॉलेजाचा शेवटचा वर्षाचा निकाल लागतो. तेव्हाच आपल्या इच्छाकांक्षांचाही कायमचा निकाल लागून गेलेला असतो. सेकण्ड क्लास किंवा खरे इंजिनियर असाल तर केटी असं युनिव्हर्सिटीचं लव्ह लेटर घेऊन आपण जग जिंकायला निघतो आणि सुरूवातीच्या काही दिवसांच्या लुटुपुटू नोकरीशोधन लढाईत धारातीर्थी पडतो. मनातल्या टाटा-बिर्लाला टाटा करायची वेळ येते. इण्टरह्व्यू देऊन देऊन आपले रेज्युमी चणेवाल्याकडे पोहोचलेले असतात. चणे खाल्यावर तेच रेज्युमी फुकटात वाचत कुणीतरी आपली कीव करत त्यांना गटारात टाकतो. असे रेज्युमी मग नाल्यातले उंदीरही तोंडी लावत नाहीत. मग अशा कित्येक न खाल्यागेलेल्या आय.टी. रेज्युमींचं कोंडाळं होतं आणि नाला चोंदून पावसाळ्यात पूर येतो! अहो खरं सांगतोय. "२६ जुलैची १०१ कारणं" ह्या माझ्या अप्रदर्शित पुस्तकाची शप्पथ!
तर अशा स्ट्रगलर परिस्थितीत आपल्याला एके दिवशी एका इंडीयन मल्टीनॅशनल आय टी (हा एक फसवा प्रकार आहे... स्वदेशी आणि विदेशी दोन्ही एकच कसं असू शकेल) कंपनीत नोकरी मिळते. इथेच जीवनाची सगळी गम्मत संपलेली असते. "आय.टी. कंपनीत आहे आमचा विनू", आई बाबा कौतुकाने सगळ्यांना सांगत असतात. आपण मात्र, "भला उसकी सॅलरी मेरी सॅलरीसे ज्यादा कैसे?" किंवा "उसका प्रोजेक्ट डेव्हेलपमेण्ट और मेरा मेन्टेनन्स कैसे?" अशा मत्सरग्रस्त वातावरणात कंपनीचा एक दोन वर्षांचा बॉण्ड साईन करत असतो. आपलं फ्रेशर असं नामःकरण होतं. ही डेजिग्नेशन वास्तविक 'प्रेशर' अशी असते.
कंपनीत जॉईन झाल्यावर मग आपल्याला एसीतलं क्युबिकल, फास्ट पीसी, १ जिबीपीएस इंटरनेट, स्वतःचा फोन, आरामदायक खुर्ची, चहा, कॉफी, कोल्डड्रिंक वेंडींग मधिन्स, कॉल कनेक्ट डिसकनेक्ट करणारी मधाळ आवाज असलेली, सुंदर युवा नसली तरी सुबक मध्यमवयीन रिसेप्शनिस्ट अन शनिवारची सुट़्टी हे सगळं मिळतं अन आपण मोमेण्टरीली सद़्गदीत होऊन जातो. एवढ्या ऎषोआरामाची आपल्या याधी घरी किंवा कॉलेजात अजिबात सवय नसते. सुरूवातीला सगळं कसंसंच वाटतं. हे सगळं जमायला कित्येक आठवडे जाऊ द्यावे लागतात.
ह्या वैकुण्ठसृष्टीत मग एके दिवशी कानामागनं सॅलरी येते अन तिखट होऊन जाते. कागदावर दाखवलेले अंक एकदम तीन चार हजारांनी कमी झालेले दिसतात. फसल्याची जाणीव ह्यायला लागते. पण अक्च्युअली आपण जेव्हा इंजिनियरींग जॉइन करतो ना तेव्हाच खरे फसलेलो असतो. पण असायनमेण्ट लिहिताना व मागल्या सेमिस्टरच्या केट्या सोडवताना हे विचार करायचा वेळच मिळाला नसतो. ह्या पहिल्या सॅलरीच्या दिवशी टॅक्सेशनचं सेमिनार असतं. आपल्या सारखेच इतरही काही फसलेले इंजिनियर जमतात अन झालेल्या अन्यायाची दाद मागतात. कंपनीच्या फायनान्स डिपार्टमेण्टची हेड आपल्याला सफाईदार उत्तर देत फसवत असते. त्यात गव्हर्नमेण्ट पॉलिसिज असतात, फायनॅन्स मिनिस्टरची भाषणं असतात, स्पेशल टॅक्सेशन फॅक्ट्स असतात. हे सारं अर्थकारण, १ आणि ० च्या जगात शिकलेल्या सॉफ्टवेयर इंजिनियर्सच्या डोक्यावरून जात असतं. गमतीचा भाग असा की आपल्यालही "ती आपल्याला फसवतेय!" हे माहित असतं पण वेफर वड्याचा स्नॅक खात आपण ती जे सांगतेय ते स्वतःला हतबलतेनं पटवत असतो.
अशाच सेमिनार मधून बाहेर पडल्यावर "मग कसा होता सेमिनार?" विचारणाऱ्या शरद बनसोडेला मी "वड्यात मीठ जास्त होतं" अशी टिप्पणी दिलेली मला आठवतेय.
मग हे दुष्टचक्र रूटीन होतं. सकाळचा घडाळ्याचा गजर हा प्रोजेक्ट मॅनेजरच्या आवाजासारखा भासू लागतो. तसा वाटू नये म्हणून मी मध्यंतरी मॅडोनाच्या आवाजात गरजणारं चिनी घड्याळ आणलं होतं. पण त्यानंतर प्रोजेक्ट मॅनेजर (ह्या श्वापदाला पीएम असे बटूनाम असते) मला मेडोनाच्या आवाजात "आय एम गोन्ना डाय अनदर डे!" च्या चालीत ओरडत असल्याचे स्वप्न पडलं होतं. दुसऱ्या दिवशी मी पीएमला मेडोना समजून किस्स केल्याचं अन तिसऱ्या दिवशी पीएमने माझ्यावर विनयभंगाचा आरोप करून नोकरीतून माझी हकालपट़्टी केल्याची नाइटमेअर्स मला पडू लागली होती. ते घड्याळ मी ई-बे.कॉम वर चांगलं ५०० रूपयात विकलं अन सध्या "ट्रींग! ट्रींग!" वालं ५० रूपयाचं घड्याळ वापरतोय. त्यात निदान मला नोकरी सुटल्याची किंवा पीएम बरोबरची किसिंग सीन्स असलेली भयानक स्वप्न तरी पडत नाहीत!
खिशात थोडा पैसा खेळू लागला की मग काही सॉफ्टवेअर इंजिनियर्स फोर-व्हिलर विकत घेतात. हे मला मूर्खपणाचे वाटते. सोन्यासारखे तिजोरीत बंद करता येण्याजोगे पेट्रोल हवेत उडवून, एमएम-आरडीए अधिकृत खड्ड्यांतून रस्ते शोधत ट्रॅफिकमधे पुढच्या मंद चालणाऱ्या श्कोडातील ड्रायव्हरला शिव्या हासडत आपण ऑफिसला पोहोचतो तेव्हा सकाळच्या प्रहराचा नाजूक अरूणोदय हा ग्रीष्मातला अग्निकोप वाटू लागलेला असतो. त्याच श्कोडातून उतरणारा शरद बनसोडे, "आजच घेतली!" असं सांगत आपल्या दिवसाची छान (!) सुरूवात करतो. रस्त्यांशिवाय गाडीचा मेण्टेनन्स आणि हप्ता भरणारे इतरही महाभाग असतातच. त्यांना पाहून मग मला जास्तच राग येतो. ह्या सगळ्यांचे प्रोजेक्ट त्यांच्या कंपनीतर्फे पीसीएमएम-आय आणि आयएसो-२००२ क्वालिटी असेसमेण्ट साठी निवडले जावोत हाच माझा त्यांना शाप आहे. आता माझ्या कारलोनचा हप्ता वाढल्याने आणि नो पार्किंगला लावलेली माझी सॅन्ट्रो आर.टि.ओ वाले घेऊन गेल्याने माझे मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे! हे तुम्ही माझ्या वरच्या विचारांत ताडले असेलच.
"आपण ऑफिसला नेहेमी वेळेवर पोहोचतो", असे म्हणाणारा कुणीही हा तद्दन खोटारडा आहे असे मी समजतो. त्याला खरोखरच ऑफिसात वेळेवर यायची शिक्षा मिळायला हवी. "मी कधीच ऑफिसात वेळेवर येत नाही", "बॉस नेहेमी माझ्या आधी येतो", "शरद बनसोडे माझ्या नंतर पण पीएमच्या आधी येतो" हे काळ-काम ह्याचं आयुष्याचं नेहेमीचं चुकलेलं गणित!
आधीच्या काळी वेळेवर न येणाऱ्यांवर बॉसेस तणतणायचे. पण आता ते हसतात. हे एक दुष्ट हासू असते. त्याची कॉन्स्पिरसी आपल्याला अप्रेजल मध्ये दिसते जेव्हा "ए" चा अतिसामान्य शिक्का आपल्यावर बसलेला असतो अन शेजारच्या क्युबिकल मधला शरद बिनसोडे "ट्रिपल ए" चा सर्वोत्तम शेरा घेऊन ट्रीट देत असतो. अस्सं जळायला होतं सांगू! जळत जळत त्यावर उतारा म्हणून आपण त्याच शरद बनसोड्याच्या पार्टीत बिन-सोड्याची व्होडका पीत असतो.
मग आउटलूक वर इमेल चेक करा. इकडेही सुटका नसते. आपला अ-आंग्ल (बहुदा जपानी) पण थोडी थोडकी इंग्रजी जाणणारा क्लायण्ट आपल्याला शेकडो फॉल्ट्सचे इमेल पाठवतो. त्याच्या लिखाणात त्याच्या बोलीभाषेचा (बहुदा जपानीच) अन इंग्रजीचा असा आंतरजातिय विवाह लावलेला असतो की त्यातली मंगलाष्टकं कळणे दुर्लभ होऊन जाते. हा इंटरनॅशनल इंग्रजीतला ईमेल जर मी माझ्या शाळेतल्या इंग्रजीच्या कर्वे बाईंना दाखवला तर त्या घेरी येऊन पडतील.
हे क्लायण्ट बाकी काहीही येत नसले तरी दमदाटी करण्यात उस्ताद असतात. त्यांची दादागिरी पाहून आपली बायको क्लायण्टची राईट हॅण्ड म्हणून तर काम करत नसावी अशी संशय येणे रास्त असते. क्लायण्टच्या सोबतीस त्याचा हेंचमन पीएम. त्याने नुकतीच आपल्या समोर शरद बनसोडेला पाठीवर कौतुकाची थाप दिलेली असते अन आपल्या क्युबिकलकडे येऊन तो असहायतेचा एक उसासा टाकतो आणि "होपलेस्स" असं सरळ सरळ न म्हणता "कॅरी ऑन!" असा गर्भित इशारावजा संदेश देऊन जातो.
लंच टाईम हा क्लायण्ट, पीएम अन शरद बिनसोडे ह्या त्रिकूटांपासून सुटका करून घ्यायची एकमेव वेळ. मी घरून डबा आणतो. पण ज्या सॉफ्टवेयर इंजिनियर्सना डबा आणणे जमत नाही ते कंपनीच्या लंच कुपननी तिकडचे जेवण जेवत असतात. हे जेवण परिचित असतं. कच्च्या भातासोबत पाणीवरण (म्हणजे प्यायला पाणी आणि वरण वेगळे कशाला?), वांग्याच्या भाजीचा चिखल, मटर पनीर मधला पनीर गायब, गहू आणि रबर ह्यांच्या नव्या कलमातल्या धान्याच्या पिठाची चपाती. हा मेनु कमीअधिक फरकाने सापडतो. असं सक्तमजुरीचं जेवण जेवणारे पुअर थिंग्ज पाहिले की नुसतं भडभडून येतं.
मग जेवण जेवल्यावर आलेल्या सुस्तीला "धिस इज अर्जण्ट" म्हणणाऱ्या पीएमची "फिक्स इट इन ५ मिनिट्स" अशी पुस्तीही असते. गेल्या आठवड्यात डिलिव्हर केलेल्या कामातले बग्स क्लायण्टने पाठवलेले असतात. ह्या बुद्धू क्लायण्टला हा एवढा आतला फॉल्ट कसा सापडला? असा विचार करत आपण ते फिक्स करू लागतो अन मग फिक्स करता करता नाकी नऊ आले की हा क्लायण्ट म्हणजे आपलीच बायको असल्याची शंका पूर्ण खात्रीत बदलते. मग साहाजिकच फॉल्ट्स वेळेत फिक्स होत नाहीत अन दुसऱ्या दिवशी क्लायण्टचा इमेलचा धागा वाढतो. ते ईमेलचं ठिगळ शिव्यांनी साचलेलं असतं. ह्या खेपेस पीएम आपल्या क्युबिकलशी येऊन सरळसरळ आपल्याला "होपलेस्स" म्हणालेला असतो. वाकून कोंबडा करायचं अन शंभर उठाबश्या काढायचं तेवढं त्याने बाकी ठेवलेलं असतं.
अशा प्रकारे क्लायण्ट आणि पीएमकडून आपल्या कामाचा यथोचित परामर्ष मिळाल्यावर तो जुना "जग जिंकायचा आत्मविश्वास" कालबाह्य (कॉम्प्युटरच्या भाषेत आर्काइव्ह) झालेला असतो, काम करायची उमेद नामशेष (शीफ्ट डीलीट) झालेली असते. अन जगायचा हेतू गायब (सर्च करूनही फाईल सापडत नाही तेव्हा नाऊमेदीने आपण रिसायकल बिन मध्ये शोधतो ना तसंलच) झालेला असतो. दुपारचा चहा गोड लागत नाही. कारण शरद बनसोडेला ऑनसाईट पेरोलवर ट्रांस्फर आणि प्रमोशन मिळालेलं असतं. आपल्याला त्या कपभर कडू चहात बुडून ठेवायचं काय ते फक्त नियतीने शिल्लक ठेवलेलं असतं.
संध्याकाळी पुन्हा आपण तीच बिनसोड्याच्या रम-पानासोबत 'गम'पान करत असतो. शरदाचं चांदणं (स्टार्स हो!) लकी आहेत म्हणायचे. सगळं ग्रह आणि चांदण्यांवर वर ढकलून आपण स्वतःचा उरलासुरला सेल्फ एस्टीम सावरायचा प्रयत्न करत असतो. जेव्हा दहा बारा पेग होतात तेव्हा तेथेही पराजय झालेला साफ दिसत असतो. डुलतपडत घरी परतताना आपल्याला कोणी एक भिकारी दिसतो. अन भिकाऱ्याच्या तुलनेत आपण चांगले असल्याचे आपण स्वतःला भासवतो. तसं दारूच्या नशेत आपल्याला आपण शाहरूख खान असल्याचंही भासवता येतं. त्यामुळे तेवढं जमतं. पण तोच तो भिकारी एका कचरापेटीकडे एका गाढवाला पिटाळीत असल्याचं दिसतं. कचऱ्याकडचा कुत्रा गाढवावर भुंकत असतो. भिकर्याने पाळलेला असेल. अचानक आपल्याला गाढवाच्या जागी आपण, कुत्र्याच्या जागी बनसोड्या अन भिकाऱ्याच्या जागी पीएम दिसू लागतो. गाढवाचे समदुःखी व्हायचा भास होतो अन मन गदगदीत होतं.
घरी पोहोचल्यावर आपण दुःखसागरात बुडतो अन पलंगावर पसरतो. सकाळच्या गजरात पुन्हा पीएम ऎकू येऊ लागतो. आपण अर्धवट झोपेत उठतो अन समोरचं कॅलेण्डर शनिवार दाखवतं. आपल्या झोपेतल्या आनंदाला पारावार राहत नाही. आपण पुन्हा लवंडतो अन बाजूच्या ऊशीला आनंदात कवेत घेतो. पण तोच "सोमवारी बघून घेईन!" असं कुणीतरी आपल्या कानात पुटपुटतं. कवेत ऊशी नसते. पीएम असतो. आपण हडबडून उठतो. डोळे चोळून ऊशी चाचपून पाहतो. एक नजर पलंगाखालीही जाते. पीएम आसपास कुठेच नसतो.
छातीतली धडधड कानांना ऐकू येत असते...
तेव्हा आपल्या शनिवारच्या साखरझोपेचं आपल्या प्रोफेशनल आयुष्यासारखं खोबरं झालेलं आपल्याला जाणवतं.....
- एक व्यथित सॉफ्टवेअर इंजिनियर
- विनीत संखे
प्रतिक्रिया
22 Apr 2011 - 2:15 am | नेत्रेश
लै भारी लिहीलय.
22 Apr 2011 - 2:21 am | शुचि
हा हा हा ...... मस्त!!!!
22 Apr 2011 - 3:40 am | अन्या दातार
अगायायाअयायायाया
22 Apr 2011 - 6:42 am | प्रीत-मोहर
सही ... मस्त लिहिलय ...=)) =)) =))
22 Apr 2011 - 6:52 am | पिंगू
हाहाहा.. कशाला बनसोड्याच्या पाठी लागलास रे....
- (आयटीवाला हमाल) पिंगू
22 Apr 2011 - 7:02 am | नगरीनिरंजन
मस्त!
22 Apr 2011 - 7:07 am | नरेशकुमार
खरेच लई भारी लिहिलंय.
हसुन हसुन बेजार !
---
त्याच त्याच व्यथा पण नविन शब्दांत वाचायला आवडल्या.
22 Apr 2011 - 9:25 am | सविता००१
सही लिहिले आहे.
मस्तच.
आवडेश
22 Apr 2011 - 9:31 am | निकिता_निल
छान लिहिल आहे. धम्माल !!
22 Apr 2011 - 9:43 am | टारझन
विषय तसा चांगला आहे .. आणि लिहीलंय पण ठिक .. पण काही बग्ज शोधुयात ,
मल्टिनॅशनल म्हणजे बहुराष्ट्रीय , विदेशी नव्हे . आणि इंडियन मल्टिनॅशनल म्हणजे भारतात उगम पावलेली पण दोन पेक्षा जास्त देशांत ब्रांचेस असलेली कंपनी :)
रेज्युमी हा शब्द भयंकर आवडला .. एकदम साउंड्स गुड वगैरे :) आम्ही बावळटा सारखे रेझ्युमे म्हणन्यात वेळ दवडली :)
बाकी जर एवढे सुमार काम करत असाल तर कंपनीने पेरोल वर ठेवलाय ह्यात उपकार मानायला हवेतंच :)
- एक व्यवस्थित सॉफ्टवेअर इंजिनियर
- वरद कानझोडे
22 Apr 2011 - 10:21 am | विनीत संखे
हा हा हा... खरं सांगू आजकल बनसोड्या झालोय. दोन ऑनसाईट झोडल्या आणि कंपनी सोडून ऑनसईट पेरोल वर आहे...
फक्त स्कोडा नाही आलीय अजून.
;-)
22 Apr 2011 - 4:34 pm | क्राईममास्तर गोगो
म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा म्हणा की...
कदाचित ऑनसाईटच्या आधीचं फ्रस्ट्रेशन दिसतंय...
22 Apr 2011 - 9:56 am | स्पा
लेख आवडला
अंदरकी बात :आय टी हेच जग आहे....
आय टी वाल्यांनाच व्यथा असतात , बाकीचे सगळे आनंदात असतात
आय टी वालेच महान, बाकी सर्व लहान.
एवढी सुखं असून सुद्धा सदानकदा दुर्मुखलेले
सर्व आयटी वाल्यांना माझा लाल सलाम
पळा आता , :d
22 Apr 2011 - 10:34 am | अन्या दातार
लेका आता एकदा मेकॅनिकल इंजिनीअरचे जीवन असा लेख लिहितो, मग तुला कळेल लाल सलाम काय ते!!!
22 Apr 2011 - 10:20 am | मृत्युन्जय
लेख आवडेश रे विनीत. मस्त लिहिले आहे. बाकी घरोघरी मातीच्या चुली, सगळ्या प्रोफेशन्स मध्ये हे फ्रस्ट्रेशन असतेच. प्रत्येक कंपनीत, प्रत्येक व्यवसायात हा शरद बनसोडे असतोच. आणि बहुतेक वेळा समोरच्याला योग्य जागी योग्य वेळेस योग्य व्यक्तिसमोर योग्य प्रकारे बूच कसावे मारावे याचे त्याला उपजत ज्ञान असते.
22 Apr 2011 - 12:25 pm | चिंतामणी
मस्त लिहिले आहे. बाकी घरोघरी मातीच्या चुली, सगळ्या प्रोफेशन्स मध्ये हे फ्रस्ट्रेशन असतेच. प्रत्येक कंपनीत, प्रत्येक व्यवसायात हा शरद बनसोडे असतोच.
बाडीस.
"जावे त्याच्या वंशा तेंव्हा कळे".
22 Apr 2011 - 4:54 pm | रेवती
प्रत्येक व्यवसायात हा शरद बनसोडे असतोच
आपणही कोणासाठी बनसोडे असतो.;)
लेखन आवडले.
22 Apr 2011 - 10:30 am | सौप्र
नाही आवडला लेख
22 Apr 2011 - 1:17 pm | पक्या
आपण शरद बनसोडे तर नव्हे ना?
विनीत जी, लेख आवडला.
22 Apr 2011 - 10:33 am | क्राईममास्तर गोगो
हा हा हा ... खपलो!
एक शरद बनसोडे माझ्या प्रोजेक्ट मध्येही आहे.
22 Apr 2011 - 10:38 am | सुहास झेले
हा हा हा हा... सही..
सगळ कसं अनुभवलेलं, फक्त पीएम बरोबरची किसिंग सीन्स असलेली भयानक स्वप्न सोडली तर :D
22 Apr 2011 - 11:26 am | विंजिनेर
संखेबुवा, मस्तच लिवलंय - नेहेमीप्रमाणेच!
(नॉन आयटी) विंजिनेर
22 Apr 2011 - 11:54 am | ५० फक्त
विनित मस्त लिहिलं आहेस,
बाकी इंडियन मल्टीनॅशनल बाबत टारझनशी बाडिस. आज अश्या कंपन्यांची संख्या प्रचंड आहे.
22 Apr 2011 - 11:57 am | इंटरनेटस्नेही
चान चान!
-
(आयटी मधली पोरगी शोधणारा) इंट्या गेट्स.
22 Apr 2011 - 11:58 am | विसुनाना
हा लेख चांगलाच विनोदी आहे ,
पण...
त्यात व्यक्त केलेली व्यथा(?) एखाद्या विनोदी विडंबनासारखी (किंवा विटंबनेसारखी) वाटली.
जुन्या मराठीत याला 'सुख दुखतंय' असे म्हणतात.जर मूळ लेख - "एका व्यथित शेतकर्याचे मनोगत" असा असता तर?
असो. संत तुकाराम महाराज म्हणतात तसे - 'जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे'.:(
22 Apr 2011 - 7:08 pm | चतुरंग
जिथे तिथे जाऊन रडगाणी का रे?
अरे हे तर सगळीकडे असतं कालही होते आजही आहे आणि उद्याही असणार आहे.
------------------------------------------------------------
किंचित अवांतर - पण बरेचसे समांतर
हल्ली प्रत्येक छोट्या मोठ्या प्रॉब्लेमचा बदाबदा इश्यू करणे हाच एक मोठा इश्यू झालाय.
काल परवा अॅमेझॉनचा एक 'क्लाऊड फुटल्यामुळे' बर्याचशा वेब्साईटी काही काळ बोंबलल्या होत्या तर केवढा गाजावाजा!
जिथे बघावं तिथे चेपु, ट्वीट, लिंक्डिन, बीबीसी, सीएनेन्...तेच ते तेच ते
अरे मशीन्स आहेत, तंत्रज्ञान आहे, प्रश्न हे येणारच. बंद पडणं, दुरुस्ती करावी लागणं, पुन्हा सुरु होणं हे काय आज होतंय का? पण नाही लोकांची पेशन्स लेवल एकदम कमी झाली आहे असे वाटते!
-(डिझायनर+डिबगर)रंगा
24 Apr 2011 - 7:19 am | गोगोल
> हल्ली प्रत्येक छोट्या मोठ्या प्रॉब्लेमचा बदाबदा इश्यू करणे हाच एक मोठा इश्यू झालाय.
याच्याशी सहमत.
पण त्यासाठी जे उदाहरण दिले आहे - क्लाऊड सर्व्हिसेस चे - ते अत्यंत चुकीचे आहे. तो खरोखर मोठा इश्यु होता.
मुळात क्लाऊड याच कारणासाठी तयार केला आहे की छोट्या कंपनींना २४ * ७ * ३६५ चालू रहाणार इन्फ्रा स्ट्रक्चर उभे करणं परवडत नाही. त्यासाठीच ते त्या क्लाऊड सर्व्हिसेस ला पैसे देतात. आणि मुळात क्लाऊड असाच डिझाईन केला पाहीजे (किंवा जातो) की काही भागातल्या फॉल्ट्स मुळे संपूर्ण इन्फ्रा स्ट्रक्चर बंद पडू नये. असे सगळ असताना देखील २४ तासांपेक्षा ज्यास्त वेळ ते बंद आहे हा मोठा ईश्यु आहे.
24 Apr 2011 - 10:22 am | सुहास..
मुळात क्लाऊड याच कारणासाठी तयार केला आहे की छोट्या कंपनींना २४ * ७ * ३६५ चालू रहाणार इन्फ्रा स्ट्रक्चर उभे करणं परवडत नाही. त्यासाठीच ते त्या क्लाऊड सर्व्हिसेस ला पैसे देतात. आणि मुळात क्लाऊड असाच डिझाईन केला पाहीजे (किंवा जातो) की काही भागातल्या फॉल्ट्स मुळे संपूर्ण इन्फ्रा स्ट्रक्चर बंद पडू नये. असे सगळ असताना देखील २४ तासांपेक्षा ज्यास्त वेळ ते बंद आहे हा मोठा ईश्यु आहे. >>>
मालक .. रिव्हर्स डिपेन्डसी चा बट्ट्याबोळ केलात ...तसे म्हणायला गेले तर सगळच ईन्फ्रा २४*७*३६५ हवे असते ..क्लाउड मध्ये वेगळे ते काय :(
24 Apr 2011 - 10:39 am | विनीत संखे
क्लाऊड यायच्या आधी हार्डवेयर-सॉफ्टवेयर सेटप विविध प्रकारे केली जात असे. त्यात कॉम्प्लेक्स सेटप असेल तर त्यात इनकंपॅटीबल काँफिगरेशन सर्वात मोठा दोष असल्याने झाल्याने अखंडीत सेवा (अनईंटरप्टेड सर्विसेस) मिळत नसल्याने किंबहुना सोआ (एसोए) क्लाऊड कम्युटींगचा मोठा गाजावाजा झाला. अखंड सेवाप्राप्ती देणारी सिस्टीम अशी दर्पोक्ती करण्यात आली. पण कालच्या उदाहरणावरून हे दिसले की तो दावा किती फोल होता.
पण अपयश ही यशाची पायरी असते आणि हे अपयश क्लाऊडला अजून रोबस्ट बनवेल अशी आशा.
24 Apr 2011 - 2:02 pm | गोगोल
>> तसे म्हणायला गेले तर सगळच ईन्फ्रा २४*७*३६५ हवे असते
अगदी बरोबर...हेच तर मी पण म्हणतोय.
>> क्लाउड मध्ये वेगळे ते काय?
वर मी संक्षिप्त स्वरूपात सांगितल आहे. पण आता सविस्तर सांगतो.
कल्पना करा की सुहास एक अत्यंत हुशार मुलगा आहे. तो त्याच्या घरात बसून फावल्या वेळात नाडी पट्टी ऑन्लाईन शोधून द्यायची वेबसाईट बनवतो. तो सहज गम्मत म्हणून गप्पा मारता मारता शेजारच्या ओक काकांना त्या बद्द्ल माहीती देतो. ओक काका ती साईट बघून भलतेच इम्प्रेस होतात. ते त्यांच्या घरातल्या मंडळींना तर सांगततच पण अजून आजूबाजूच्या लोकांना, मित्रांना, जिथे तिथे सगळीकडे सांगतात. हळू हळू गोष्ट पसरते. सुहास च्या साइट चा विज़िटर काउंट वाढू लागतो. . एका सर्वर नि काम भागेनासे होते. तो चार सर्वर्स अजून लावून काम सुरू करतो. पण आता या चार सर्वर्स मध्ये लोड बॅलेन्सिंग कसे करायचे त्या साठी त्याला अजून एक सर्वर फ्रंट एण्ड ला ठेवावा लागतो. पण हे सर्व करताना त्याला नेटवर्क ची बॅंडविड्त कमी पडू लागते. मग तो बी एस एन एल कडून अजून एक वाढीव पॅकेज घेतो. पण तो . पूर्ण महाराष्ट्रात गोष्ट पसरलेली असते. या वाढीव गोष्टीमुळे पण सगळ्या लोकांच्या गरजा भागात नाहीत. तसेच साइट डाउन झाली किंवा रिक्वेस्ट स्लोली सर्व व्हायला लागल्या की पुणे महाराष्ट्रातून लोक फोन करून सुहास च्या नाड्या आवळून जीव नकोसा करून सोडतात. मग सुहास जाऊन १०० सर्वर्स विकत आणतो. पण ते पाहून घरचे चिडतात (आधीच चार सर्वर्स च्या आवाजाने त्यांचे डोके उठलेले असते). म्हणून मग सुहास एक नवीन जागा विकत घ्यायचे ठरवतो. पण नक्की कुठल्या प्रकारची जागा घेतल्याने योग्य प्रकारे उष्णातेचा निचरा होईल हे त्याला माहीत नसल्याने तो एका मेकॅनिकल आणि एका सिव्हिल एन्जिनियर्स ला कामावर ठेवतो. ते त्याला योग्य तश प्रकरची जागा बनवून देतात. पण आता सुहास ला त्या १०० सर्व्हर्स्ला जोडायचे कसे ते माहीत नसल्याने तो एका नेट्वर्क एन्जिनियर्ला कामावर ठेवतो. हा एन्जिनियर त्याला एकंदर कामाचा पसारा बघून एक सुपर फास्ट ईंटर्नल प्रोटोकॉल डिझाईन करायचा सल्ला देतो. म्हणून मग सुहास नेट्वर्क एन्जिनियर्स ची एक टीमच कामावर ठेवतो. ते त्याचे ईंटर्नल प्रोटोकॉल तर बनवतातच पण ते प्रोटोकॉल समजू शकतील असे स्विचेस आणि राउटर्स पण बनवतात. त्यातला एक हुशार एन्जिनियर सुहास ला सल्ला देतो की बी एस एन एल कडून सर्व्हिस घेण्याऐवजी आपण आपलीच एक ऑटोनॉमस सिस्टिम बनवू आणि ती मॅनेज करू. तो पर्यंत सुहास च्या साईट ची किर्ती पूर्ण देशात पस्रलेली असते. त्यामुळे सुहास ला ही ते पटते. ते स्वतःची अशी ऑटोनॉमस सिस्टिम तयार करतात. मग जाऊन ट्रांझिट प्रोव्हायडर कडे जाउन त्यांची सर्व्हिस निगोशिएट करतात. मधल्या काळात बरेचसे सर्व्हर्स विविध - जसे कि हार्ड डिस्क उडणे, मदर बोर्ड उडणे - अशा कारणाने फेल होणे सुरु झालेले असते. मग सुहास एक
रीपेअर करणार्यांची टीम कामावर ठेवतो. त्यांना द्यायला सुट्टे पार्ट्स हवेत म्हणून एक सप्लाय चेन आणि इन्वेन्टरी मॅनेजमेंट ची दुसरी टीम उभी करतो. तो पर्यंत शेजारच्या राज्यातले विजेचे भाव कमी झाल्याने आणि शेजारच्या रज्यातील मुख्यमंत्र्यांशी सुहास चा वशिला असल्याने सुहासला तेथे कमी दरात वीज मिळत असते. म्हणून मग तो पुर्ण सेट अप तिकडे हल्वायचा निर्णय घेतो. पुनःश्च हरी ओम. पुन्हा सगळे सेट उप करणे भाग पडते. मधल्या काळात शेजारचे ओक काका हळूच आपली नाड्यांची
वेब साईट सुरु करतात. पण ते स्वतःचे सर्व्हर्स ठेवण्यापेक्षा अॅमॅझॉन ची क्लाऊड सर्व्हिस वापर्तात आणि सुहास एव्हढ्या झंझटी त्यांना करणे भाग पडत नाही. ते आपली साईट अधिकोधिक आकर्षक करून ज्यास्त लोकांना खेचून आणतात. सुहास ला बाकी सगळ्या गड्बडीत आपली साईट नीट करायला टाईमच भेटत नाही. त्यात पुन्हा एव्हढे सगले करून सुद्धा सुहास ची इन्फ्रा स्ट्रक्चर अॅमॅझॉन च्या तुलनेत वारंवार डाऊन् असते. हळू हळू सर्व गिर्हाईके ओक काकांच्या साईट वर जातात.
आता कळल का क्लाउड मध्ये वेगळे ते काय?
>> मालक ..
तो मी नव्हेच .. ||नीलकांतम||
>> रिव्हर्स डिपेन्डसी चा बट्ट्याबोळ केलात
"रिव्हर्स डिपेन्डसी " हे शब्द मी सर्व प्रकारे शोधून पाहीले पण या काँटेक्स्ट मध्ये ते कसे बसतात ते काही झा* डोक्यात शिरल नाही. माझ्या मते तुम्हाला त्यांचा जो अर्थ अभिप्रेत आहे तो त्यांचा अर्थ नाहिये.
24 Apr 2011 - 4:21 pm | प्रास
अवांतर -
गोगोल, लई भारी उदाहरण लिहिलंयत बघा.....
हे सगळ प्रकरण समजून घेण्याचा प्रयत्न करणारा -
24 Apr 2011 - 4:34 pm | चतुरंग
पण हा उगीच ढगात गोळीबारच नाही का? शेवटी अॅमेझॉनने ठेवलेले हे सर्वर फार्मच ना? क्लाऊड झाले तरी कुठून ढगातून येत नाहीत शेवटी फिजिकल सर्वरच! जो मोडण्या तुटण्याचा, रिपेरिंगचा प्रॉब्लेम सुहासच्या सर्वरना येतो तोच अॅमेझॉनच्या क्लाऊड सर्वरलाही कधीकाळी येऊ शकतो हे अमान्य करण्यात काय हशील आहे?
-रंगा
24 Apr 2011 - 8:00 pm | गोगोल
मी चुकलो.
22 Apr 2011 - 8:04 pm | रमताराम
मस्त रे मर्दा. मागे 'या साठेचं काय करायचं' म्हणून एक नाटक पाहिलं होतं त्याची आठवण झाली तुझं बनसोडे पुराण ऐकून.
25 Apr 2011 - 5:44 pm | टिलू
काही लोकांना रडत बसायची सवयच असते. काम हे कुठेही करावेच लागते. आपण IT वाले नशीबवान आहोत कि इतके आराम दायक work environment आपल्याला मिळते. कधी तरी रस्त्यावर काम करणाऱ्या मजुरांना किंवा दिवसभर उभे राहून लेथ मशीन वर काम करणाऱ्या लोकांना बघा. तेव्हा कळेल तुमच्याजवळ काय आहे ते?