प्रिय विनील,

श्रावण मोडक's picture
श्रावण मोडक in जनातलं, मनातलं
23 Feb 2011 - 1:07 pm

ओरिसातील मलकनगिरीचे जिल्हाधिकारी आर. विनील कृष्णा यांचे, त्यांच्यासमवेत असणारे अभियंता पवित्र माझी यांच्यासह, माओवाद्यांनी अपहरण केले. विनील यांचे मलकनगिरीतील काम असे आहे, की त्यांच्या सुटकेसाठी माओवाद्यांचा प्रभाव असूनही आदिवासीच रस्त्यावर आले आहेत. फक्त आदिवासीच नव्हे, तर सर्वदूर समाजही. नेमकं काय घडतं आहे तिथं? सुरक्षा न घेता विनील जंगलात गेले, हा आता मुद्दा होऊ पाहतोय. खरंच त्यांचं चुकलं? ओरिसातच आयएएस अधिकारी असणारे सचिन जाधव यांनी विनिलला उद्देशून लिहिलेलं हे खुलं पत्र. त्यांच्या परवानगीनेच येथे प्रसिद्ध करतो आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------

प्रिय विनील,

परवा मध्यरात्री एका जिल्हाधिकारी मित्राचा फोन आल्यापासून झोप उडालीय. म्हणाले, ‘माओवाद्यांनी विनीलला डिटेन केलंय’. फोन कलेक्टरांचाच असल्यामुळे बातमीची खातरजमा करण्याचा प्रश्नच नव्हता. मग निष्फळ फोनाफोनी सुरु झाली. काय झालंय हे समजून घेण्यासाठी फक्त. तपशील समजले. डिटेन नव्हे तर अपहरणच. पण उपयोग काय?

रात्री दोन वाजता एका मित्र एसपींचा (पोलीस अधीक्षक) फोन आला. माझ्याकडून त्यांना तपशील पाहिजे होते. मी काय कप्पाळ तपशील देणार? ते पूर्वी मलकनगिरीत एसपी होते. “कशाला असं सिक्युरिटी न घेता नक्षल भागात फिरता रे?” कळवळ्याने ते म्हणाले. त्यांची अस्वस्थता माझ्या लक्षात आली. तुझ्यावर सगळेच पोलीस वैतागले असले तर आश्चर्य नाही रे. तुझ्यावर आख्खी एस्टॅब्लिशमेंटच वैतागली असणार. अस्वस्थ करण्याची शक्ती घेऊनच जन्माला आलायस.

तू मयूरभंजमध्ये आयएएस प्रोबेशनर असतानाच एखाद्या कार्यकर्त्यासारखं स्वत:ला झोकून दिलं होतंस. मोटरसायकल घेऊन सिमलीपालच्या जंगलात वेळी-अवेळी एकटाच जायचास. आदिवासी पाड्यांवर फिरायचास. त्यांना जवळून बघायचास. त्यांच्यासाठी योजनांमध्ये, नियमांमध्ये अपवाद करण्यासाठी कलेक्टरांशी बोलायचास. आम्हाला सिमलीपाल दोनच गोष्टींसाठी माहीत होतं – पर्यटन स्थळ, आणि नंतर माओवाद्यांचा अड्डा. तू याच्या पलीकडे गेला होतास. वयाच्या पंचविशीतच. ही समज घेऊनच तू जन्माला आला होतास.

तुला एका ठिकाणी पोस्टिंग मिळालं, आणि त्याचवेळी कंधमाळमध्ये धार्मिक दंगली सुरु झाल्या. या दंगलींना आदिवासी विरुद्ध दलित असा कुठेही न सापडणारा रंग होता. सरकारला एक कलेक्टर, एक एस्पी आणि एक सबकलेक्टर हवा होता. टू फिक्स द थिंग. आणि चारच महिन्यांत तुला डिस्टर्ब करुन कंधमाळला पाठवला. तुम्ही तिघांनी तिथे अजोड कामगिरी केलीत. आंतरराष्ट्रीय निरीक्षकांचा पूर्वग्रहही तुमचे काम झाकोळू शकला नाही.

मलकनगिरी जिल्हाधिकारी पदासाठी तुझी निवड झाली तेंव्हा बऱ्याच जणांना आश्चर्य वाटले. एवढे चांगले काम करणाऱ्याला ही शिक्षा? हाच अनेकांचा प्रश्न होता. मलकनगिरीमध्ये कुणी पाय ठेऊ धजत नाही. नक्षलवाद्यांची अघोषित राजधानी. पण सुजाण मुख्यमंत्री इथे कर्तव्यकठोर अधिकारीच पाठवतात हे फार थोड्या जणांच्या लक्षात येते. तुझ्याअगोदर इथे नितीन जावळेंनी चांगल्या कामांचा पायंडा पाडून ठेवलेला होताच. तुझे ग्राऊंड बऱ्यापैकी तयार होते. तू त्यावर सुंदर बाग फुलवलीस. मलकनगिरीत आजमितीस तू जेमतेम एक वर्ष पूर्ण केलेस. लाल दिव्याच्या गाडीचे तुला कधीच आकर्षण नव्हते. मलकनगिरीत त्याची गरजही नव्हती तुला. नाडलेल्या आदिवासींना मदत करण्यासाठी तुला कशाचीच गरज नव्हती. मनासारखे काम करता येण्यासाठी तुला फक्त स्वातंत्र्य आणि एक यंत्रणा हवी होती. ती तुला मिळाली.

तुझ्या मनात या आदिवासींसाठी इतके प्रेम आहे की तुला भीती म्हणून काय ती नाहीच. या भागात दुसरा एखादा अधिकारी काय करेल? एकतर बाहेर पडायचे नाही. पडले तर हेवी सिक्युरिटी असल्याशिवाय नाही. आर ओ पी (रोड ओपनिंग पार्टी) आधी पुढे जाणार. लॅण्डमाइन्स तपासणार. साग्रसंगीत उपचार होणार. अर्धा दिवस त्यातच जाणार. मग आपलं भोज्जाला शिवून अधिकृत भेट उरकून अंधार पडायच्या आत आपल्या सुरक्षित ठिकाणी परत यायचं. पण तुझी रीतच न्यारी. तू आणि तुझा ड्रायव्हर. पीएसओ नाही, आरओपी नाही. हत्यार तर नाहीच नाही. जिथंपर्यंत गाडी जाईल तिथंपर्यंत जायचं. जिथं रस्ता संपेल तिथं तुला घ्यायला एखादा तहसीलदार, एखादा बीडीओ, एखादा इंजिनियर आलेला असायचा. मोटरसायकल घेऊन किंवा चालत. जेवण त्यांच्यासोबतच. सगळं एकदम शिवाजी महाराज स्टाइल. लोकांच्यात बसायचं. बोलायचं. आणि जे करता येण्यासारखं असेल ते लगेच करायचं. जे करता येण्यासारखं नाही, ते त्यांना समजावून सांगायचं.

हे एवढं आदिवासींसाठी खूप होतं. तू त्यांच्यासाठी वनवासात आलेला रामच जणू.

आदिवासी गांजलेले. एका बाजूने नक्षल. दुसऱ्या बाजूने पोलीस, सीआरपी. दोन्हीकडून मार. खायची मारामार. नक्षलवाद म्हणजे काय हे त्यांना कुठून समजणार? नक्षलींनी आदिवासींची पोथी बरोबर वाचलेली होती. त्यांची मनं जिंकायची त्यांना गरजच नव्हती. जे त्यांना जरा बरे वाटत, त्यांना ‘रिक्रुट’ करीत. बाकीच्यांचा काही फरक पडत नसे. अशा परिस्थितीत जिल्हाधिकारी स्वत: त्यांच्या पाड्यावर येत असेल तर त्यांना तुझ्यात देव दिसल्यास नवल नाही.

हे आम्हाला आज समजलं. तुला नक्षलवाद्यांनी पकडून नेल्यावर ज्या गावातून तुला त्यांनी नेलं, त्याच गावातल्या आदिवासींनी उत्स्फूर्त मोर्चे काढले, तुला सोडावा म्हणून. सगळं मलकनगिरी बंद आहे आज. कुणीही न सांगता. तू याआधी काम केलेला कंधमाळ जिल्हाही बंद आहे. तोही तसाच. उत्स्फूर्तपणे. ज्या आदिवासींसाठी काम करत असल्याचा दावा नक्षल करतात, त्याच आदिवासींनी नक्षलांना ठणकावून सांगितले, आमच्या कल्याणाची काळजी असेल, तर अगोदर कलेक्टरांना सोडा. आम्हाला तेंव्हा कळलं, तू काय आणि कसं काम करतोयस ते. आज सगळ्या राज्यात निदर्शने चालू आहेत. कलेक्टरसाठी नाही, तर विनीलसाठी.

एक फार मोठा विरोधाभास आज लोकांना पहायला मिळाला.

कुडमुल्गुमा नावाच्या दुर्गम ब्लॉकमध्ये तू गेला होतास. जनसंपर्क मेळाव्यासाठी. तिथं जाणं सोपंही नाही, आणि शहाणपणाचंही नाही. रस्त्या-रस्त्यावर सुरुंग लागलेले असतात. तू गेलास ते गाव तर भलतंच कुप्रसिद्ध. हे कुडमुल्गुमा त्याच भयावह बालिमेडा जलाशयाच्या जवळ, जिथे दोन वर्षांपूर्वी जवानांनी भरलेली आख्खी बोट नक्षल्यांनी बॉंबहल्ल्याने बुडवली होती. हा ‘त्यांचा’ इलाका. पंधरा ग्रामपंचायती त्यांच्या. या भागात सरकारी माणसानं यायचं नाही. पोलीस, सीआरपी तर लांब.

तू इथे जायचास. एकदा नाही, दोनदा नाही, नेहेमी. खरं तर तू इथेच, १५१ गावांवर, कट ऑफ गावांवर, तुझं लक्ष केन्द्रित केलंस. तू जाऊ लागलास, आणि लोकांनाही वाटलं इथं काम होतंय. इथल्या लोकांनी एकदा मागणी केली, आम्हाला ब्लॉक ऑफिस लांब होतंय, तर तू थेट त्या गावांमध्ये गेलास, आणि ब्लॉक ऑफिस आठवड्यातून एक दिवस तिथे, असं खरंच चालू केलंस देखील. लोकांमध्ये जसजसा प्रिय होत गेलास, नक्षली वेट अॅण्ड वॉच करत राहिले असावेत बहुदा, तुझा आत्मविश्वास वाढत गेला. तुला सिन्सिअरली वाटत होतं, इथं सरकार पोचलं नाही म्हणून नक्षलवाद आला. आता तो घालवायचा असेल, तर सरकार तिथं गेलं पाहिजे.

विनील, ज्या दिवशी तू गेलास तो दिवस इदचा होता. सरकारी सुट्टीचा. तू सुट्टी न घेता काम करत होतास. भीतीने सुनसान ओस पडलेले रस्ते पार करून तू सिलेरू नदीच्या काठी गेलास. तिथून बोटीने नदी ओलांडून त्या गावी पोहोचलास. का, तर सरकार गावांत पोचलं पाहिजे यासाठी. शिबिर झालं. लोकांचे समाधान केलंस. वनाधिकाराचे दाखले वाटलेस. पेन्शन दिलीस. आवास योजनेचे लाभ दिलेस. मग एका स्वयंसेवी संघटनेच्या कार्यकर्त्याने तुला आग्रह केला, “सर, इथे जनतापै गावात विद्युतीकरणाचं काम बघायला चला.” आणि तू विनाविलंब गेलासही. मोटरसायकलवर. सोबत फक्त दोन ज्युनिअर इंजिनियर घेऊन. जंगलात. खोल गुहेत जणू. जिथून परत आलेली पावलं दिसत नाहीत. तुझे एकूणच स्वयंसेवी संघटनांवर भाबडे प्रेम आहे. त्या लोकांनी तुला परत पाठवलेच नाही. एका इंजिनियरला परत पाठवले – असं सांगून की, ‘आम्ही सरांची काळजी घेतो, तू जाऊन सरकारला ही चिठ्ठी दे, सांग अठ्ठेचाळीस तास, आमच्या मागण्या आणि कलेक्टरचे प्राण.’ तुझे डोळे बांधून तुला चालवत सहा जण जंगलात घेऊन गेले.

आजही तुला चालवलंच जातंय. रोज वेगळ्या ठिकाणी. जागा बदलत. का, तर तुझ्या सुटकेसाठी सारं काही पणाला लावू पाहणाऱ्या आदिवासींनाही ते शक्य होऊ नये. असं म्हणतात की, त्यांनी आता मोर्चेबांधणीही केली आहे.

विनील, तू म्हणायचास, या लोकांसाठी काम करायला मला पाठवलंय, मी ते करतोय, हे लोक मला कसा काय अपाय करतील? तुझा विश्वासघात झाला दोस्ता.

आता आज बऱ्याच जणांच्या मनात काय विचार सुरू असतील ठाऊक आहे? ऐक.

विनिल, वेड्या, तुला कल्पना आहे का तू सरकारला किती मोठ्या काळजीत टाकलंयस त्याची? आम्हाला एकाच वेळी तू उत्तम अधिकारी, प्रशासक वाटतोस, आणि त्याच वेळी अविचारी साहसी आदर्शवादी तरुणही वाटतोस. तुला काय गरज होती तिथं जायची? पकडलेले जे नक्षल आता तुझ्या बदल्यात सोडले जातील त्याबद्दल तुलाच आता सगळे जबाबदार धरणार असं वाटत नाही तुला? एकतर तिथं जायचंच नव्हतंस. किंवा गेलास तर सुरक्षेचा जामानिमा घेऊनच जायचंस. वेडा. बेजबाबदार. अदूरदर्शी. असा कसा रे कलेक्टर तू?

हे आणि असंच बऱ्याच जणांच्या मनात येत असणार याची मला कल्पना आहे. हे असले प्रसंग तर होतच असतात असंही म्हणणारे महाभाग मला भेटले आहेत. विनायक सेनांच्या मानवी अधिकारांची चिंता वाहणाऱ्यांना तुझ्या मानवी हक्कांचा विचार करावासा वाटणारच नाही, कारण तू तर जालीम सरकारी व्यवस्थेतला बाबू! सरकारचा जावई! चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला वगैरे वगैरे. तुझ्यासाठी सरकार आकाशपाताळ एक करणार याची या विचारवंतांना पक्की खात्रीच. त्यामुळे ते आपली वाफ कशाला दवडतील?

पण मला काय वाटतं सांगू? तू जिंकलायस विनील. तू हादरवून सोडलंयस या तथाकथित माओवाद्यांना. ज्यांच्या कल्याणाच्या गोष्टी ते करतात, त्या आदिवासींनीच आज त्यांना सणसणीत चपराक मारलीय, ‘आम्हाला तुम्ही नको, विनील हवाय,’ असं ठणकावून सांगून. तुला प्यादं म्हणून वापरायच्या नादात नक्षल्यांनी आपलं थडगं खणून ठेवलं. यू आर देअर नेमेसिस.

विनील, आम्हाला क्रांतिकारक हवेत. आणि तेही तुझ्यासारखे. यंत्रणेचा योग्य वापर करून लोकांचं आयुष्य बदलवण्यासाठी स्वत:चं आयुष्य पणाला लावणारे. यंत्रणेच्या नावाने खडे फोडणारे विचारवंतही नकोत, आणि यंत्रणाच बदलायला हवी म्हणून अजून एक अन्याय्य यंत्रणा बळजबरीने माथी मारणारेही नकोत. तू हे अशा प्रकारे काम नसतंस केलं तरी तुला कुणी जाब विचारणार नव्हतं. उलट तुला सहानुभूतीच मिळाली असती, बिचारा मलकनगिरीत पोस्टिंग झालंय, याच्या कुटुंबाचं, मुलांचं कसं होणार, याच्या सॉफ्ट पोस्टिंगसाठी कुठे प्रयत्न करायला सांगूयात, इत्यादी.

तू हिरो आहेस विनील. आय ए एस आहेस म्हणून नाही. जिल्हाधिकारी आहेस म्हणून नाही. जिवाची बाजी लावून जग बदलायला निघालेला शिलेदार आहेस. केवळ स्वप्न न बघता झोकून देणारा कार्यकर्ता आहेस. म्हणूनच तू हवा आहेस आम्हाला.

तुझा वेडेपणा हवाय विनील आम्हाला. तुझ्यासारखे ‘वेडे’च नक्षलवादाच्या वेडाला मूठमाती देऊ शकतात.

आय सॅल्यूट यू, सर!

सचिन जाधव, आयएएस, ओरिसा.

धोरणसमाजजीवनमानराजकारणप्रकटनविचारप्रतिसादबातमीमाध्यमवेधअनुभव

प्रतिक्रिया

हरिप्रिया_'s picture

23 Feb 2011 - 1:28 pm | हरिप्रिया_

आय सॅल्यूट यू, सर!!!

विनीलची लवकरात-लवकर सुटका होवो. :(

आताच आंजा मित्र राजेशी विनीत बद्दल बोलताना त्याने ह्या (डीएम रास्ते में, रिहाई किसी भी क्षण) बातमीचा दुवा दिला.

आणि आनंद झाला... लवकरच सुटाका होवो.

वपाडाव's picture

23 Feb 2011 - 2:43 pm | वपाडाव

बातमी वाचुन खरंच छान वाटले.
असंच काम करत रहा.
भारताला शेकडो विनील भेटावेत ही इच्छा.

अमोल केळकर's picture

24 Feb 2011 - 12:35 pm | अमोल केळकर

सहमत :)

अमोल

कोमल's picture

23 Feb 2011 - 1:31 pm | कोमल

सुरेख लिहिलय...

आत्मशून्य's picture

23 Feb 2011 - 1:36 pm | आत्मशून्य

त्याच आदिवासींनी नक्षलांना ठणकावून सांगितले, आमच्या कल्याणाची काळजी असेल, तर अगोदर कलेक्टरांना सोडा.

अप्रतीम.

इन्द्र्राज पवार's picture

23 Feb 2011 - 1:50 pm | इन्द्र्राज पवार

'अगदी आमच्या मनातील विचार....' असे जरे श्री.सचिन जाधव यांच्या पत्राचे मूल्यमापन केले तर ते अगदी अचूक ठरेल. ते स्वतः एक आयएएस अधिकारी शिवाय भाषेवरून असे दिसते की श्री.विनीलबरोबर त्यांचे अगदी 'अरे-तुरे' चे संबंध आहेत त्यामुळे कोणताही आडपडदा न ठेवता त्यानी आपल्या भावना खुल्या केल्या आहेत, ज्या आम्ही (कदाचित काही मर्यादेमुळे) करू शकलो नसतो.

उदा. : "...तुला कल्पना आहे का तू सरकारला किती मोठ्या काळजीत टाकलंयस त्याची?..." जरी श्री.जाधव यानी 'अन्यांच्या मनातील' विचार म्हणून वरील वाक्य आपल्या पत्रात कोट केले असले तरी का कोण जाणे मला खात्री आहे की खुद्द त्यांच्यासारख्या अनेक प्रशासकीय अधिकार्‍यांनी तसे वाटले असणार. कारण 'विनील विषय' ज्यावेळी शांत होईल, त्याचवेळी ओरिसाच काय पण खुद्द आता केन्द्र सरकारचे गृहखातेही देशातील समस्त जिल्हाधिकारी आणि तत्सम दर्जांच्या अधिकार्‍यांसाठी एक श्वेत पत्रिका प्रसिद्ध करणार आणि त्याचे नाव Ideal Manual असे राहून या मॅन्युअलमध्ये विनीलसम अधिकार्‍यांनी कोणत्या गोष्टीचे 'पालन' केले (च) पाहिजे यावर भर दिला जाणार. एकप्रकारे अधिकार्‍यांच्या विस्तारीत पंखावर मर्यादा आणणार.

. ..."पकडलेले जे नक्षल आता तुझ्या बदल्यात सोडले जातील त्याबद्दल तुलाच आता सगळे जबाबदार धरणार असं वाटत नाही तुला? ..."

~ नक्कीच. विशेषतः या नक्षलवाद्यांना आणि माओवाद्यांना जिवंत पकडण्यासाठी किती पोलिस्/एसआरपी आणि मिलिटरीचे जवान (उदा.दंतेवाडा कांड...) धारातिर्थी पडले असतील याची आकडेवारी शासकीय यंत्रणाच काय पण मिडियाकडेही असतेच, तर या गतप्राण झालेल्यांच्या नातेवाईकाना ते समूहखुनी सुटल्याच्या बातम्या पाहून्/वाचून कोणत्या प्रकारचे दु:ख होत असेल याची कल्पना केली तर श्री.विनीलच्या 'हीरो' पणाबद्दल वरील प्रश्न उभा राहू शकतोच.

(इथे आठवण होते ती मणिरत्नमच्या 'रोजा' चित्रपटाची. मिलिटरी कर्नल '...अखेर सरकारने तुझ्या नवर्‍याच्या सुटकेच्या बदल्यात कैदेतील त्या अतिरेक्याला सोडण्याचा निर्णय घेतला...' असे रोजाला सांगतो, ती आनंदित होते....पण खिन्न झालेला हाच कर्नल पुढे असेही म्हणतो, "असो, त्या अतिरेक्याला पकडण्यासाठी आमचे किती सैनिक मारले गेले, मिलीटरीला किती प्रयत्न करावे लागले, याची आता चर्चा कोण करणार? आणि काय गरजही म्हणा....तुझा नवरा तरी सुखरूप येईल." इथे रोजाही क्षणभर सुन्न झाल्याचे दाखविले आहे.)

पण असो....शेवटी पत्रात श्री.जाधव म्हणतात तसे "विनीलसारखे अधिकारी आम्हाला हवेतच.."

इन्द्रा

प्रास's picture

23 Feb 2011 - 1:58 pm | प्रास

.

विजुभाऊ's picture

23 Feb 2011 - 1:54 pm | विजुभाऊ

श्रामो धन्यवाद . एका चांगले काही वाचायला मिळाले.
अन्यथा कलेक्टर ऑफीसच्या बाहेर उपोषण करणारांचे मंडप दिसतात. दाढी वाढलेले चिंतातूर चेहेरे दिसतात .
कलेकटराना या लोकाम्ची साधी दखल घ्यायला देखील वेळ नसतो

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Feb 2011 - 2:11 pm | बिपिन कार्यकर्ते

आय सॅल्युट यु, सर!

रणजित चितळे's picture

23 Feb 2011 - 2:23 pm | रणजित चितळे

खर आहे सगळे मी सहमत आहे. मागे छत्तिसगढला कामा निमीत्ताने गेलो होतो तेव्हा समजले की - आदिवासी लोकांकडून (जे काही लोकं त्यांना अंडरडेव्हलप्ड मानतात)- बाकी समाजाच्या (स्वतःला डेव्हलप्ड समजणा-या) अपेक्षा व त्यावर त्यांचे नैसर्गिक प्रत्युत्तर ह्या मध्ये त्यांची किती कोंडी होत आहे ती.

इन्द्र्राज पवार's picture

23 Feb 2011 - 2:48 pm | इन्द्र्राज पवार

कर्नलसाहेब, तुमचा प्रतिसाद समजला नाही. उदाहरणार्थ ~

"....आदिवासी लोकांकडून (जे काही लोकं त्यांना अंडरडेव्हलप्ड मानतात)..."

~ सर, ते अंडरडेव्हल्पडच आहेत, आणि हे 'जे काही लोक' आहेत त्यात केन्द्र सरकारदेखील आहे. या देशातील सर्वच आदिवासी [ज्यांचा शासनदरबारी Tribal Communities अशी नोंद असून आजमितीला एकूण ६४५ जमाती असून यात उपजातींचा अजून समावेश केला तर हा आकडा आणखीन् वाढेल. एकट्या आपल्या महाराष्ट्रातच शासनमान्य ४७ आदिवासी जाती आहेत.] हे 'अत्यंत मागासलेल्या प्रक्रिये' त येतात [मागासवर्गीय हा वेगळा विषय आहे]. त्यामुळे तुमच्या कंसातील वाक्यामुळे असा समज होतो की 'काहीच लोक' त्याना अंडरडेव्हलप्ड मानतात.... तर वस्तुस्थिती तशी नाही.

"....त्यावर त्यांचे नैसर्गिक प्रत्युत्तर ..."

~ याचा खुलासा कराल ज्यादाचा? आय मीन.... कसले नैसर्गिक प्रत्युत्तर?

प्लीज.

इन्द्रा

रणजित चितळे's picture

2 Jan 2013 - 6:56 pm | रणजित चितळे

त्या वेळेला मी फार घाईत तो प्रतिसाद लिहिला होता. माझे म्हणणे हे आहे की आपण त्यांना अंडर डेव्हलप्ड म्हणतो ते आपल्या परस्पेक्टीव्ह मधून त्यांच्या नाही. मी नॉर्थ इस्ट मध्ये सो कॉल्ड खासी ट्राईब्स बघितल्या आहेत त्यांचे कल्चर खूप पूढारलेले असते. ....बाकी विस्ताराने मग लिहिन. नैसर्गिक प्रत्युत्तर म्हणजे मला असे म्हणायचे होते की अशा ट्राईब्स नी स्वतःचे अस्तित्व राखण्यासाठी केलेला लढा हे आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Feb 2011 - 2:40 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

विनील, आम्हाला क्रांतिकारक हवेत. आणि तेही तुझ्यासारखे.

एक सामान्य भारतीय म्हणून मलाही हेच म्हणावंसं वाटतंय.

आय सॅल्यूट यू, सर!

बेसनलाडू's picture

23 Feb 2011 - 11:03 pm | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

नाटक्या's picture

23 Feb 2011 - 11:34 pm | नाटक्या

आय सॅल्यूट यू, सर!

प्यारे१'s picture

23 Feb 2011 - 2:45 pm | प्यारे१

>>>>>

पण मला काय वाटतं सांगू? तू जिंकलायस विनील. तू हादरवून सोडलंयस या तथाकथित माओवाद्यांना. ज्यांच्या कल्याणाच्या गोष्टी ते करतात, त्या आदिवासींनीच आज त्यांना सणसणीत चपराक मारलीय, ‘आम्हाला तुम्ही नको, विनील हवाय,’ असं ठणकावून सांगून. तुला प्यादं म्हणून वापरायच्या नादात नक्षल्यांनी आपलं थडगं खणून ठेवलं. यू आर देअर नेमेसिस.

विनील, आम्हाला क्रांतिकारक हवेत. आणि तेही तुझ्यासारखे. यंत्रणेचा योग्य वापर करून लोकांचं आयुष्य बदलवण्यासाठी स्वत:चं आयुष्य पणाला लावणारे. यंत्रणेच्या नावाने खडे फोडणारे विचारवंतही नकोत, आणि यंत्रणाच बदलायला हवी म्हणून अजून एक अन्याय्य यंत्रणा बळजबरीने माथी मारणारेही नकोत. तू हे अशा प्रकारे काम नसतंस केलं तरी तुला कुणी जाब विचारणार नव्हतं. उलट तुला सहानुभूतीच मिळाली असती, बिचारा मलकनगिरीत पोस्टिंग झालंय, याच्या कुटुंबाचं, मुलांचं कसं होणार, याच्या सॉफ्ट पोस्टिंगसाठी कुठे प्रयत्न करायला सांगूयात, इत्यादी.

तू हिरो आहेस विनील. आय ए एस आहेस म्हणून नाही. जिल्हाधिकारी आहेस म्हणून नाही. जिवाची बाजी लावून जग बदलायला निघालेला शिलेदार आहेस. केवळ स्वप्न न बघता झोकून देणारा कार्यकर्ता आहेस. म्हणूनच तू हवा आहेस आम्हाला.

तुझा वेडेपणा हवाय विनील आम्हाला. तुझ्यासारखे ‘वेडे’च नक्षलवादाच्या वेडाला मूठमाती देऊ शकतात.

आय सॅल्यूट यू, सर! >>>>>

आय सॅल्यूट यू, सर!

निशब्द ....
धन्यवाद हे पत्र येथे दिल्या बद्दल

स्पंदना's picture

23 Feb 2011 - 2:57 pm | स्पंदना

हे पत्र आमच्या पर्यंत पोहोचवल्या बद्दल धन्यवाद श्रामो!

अन विनील बद्दल म्हणाल तर ' सल्युट ' शिवाय डोक्यात आणी काही येण शक्यच नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Feb 2011 - 7:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हे पत्र आमच्या पर्यंत पोहोचवल्या बद्दल धन्यवाद श्रामो!

-दिलीप बिरुटे

पैसा's picture

27 Feb 2011 - 2:43 pm | पैसा

असंच म्हणते!

आळश्यांचा राजा's picture

23 Feb 2011 - 3:56 pm | आळश्यांचा राजा

हे पत्र आमच्या पर्यंत पोहोचवल्या बद्दल धन्यवाद श्रामो!

असेच म्हणतो.

राजेश पाटील, आय ए एस, कलेक्टर कोरापुट (मलकनगिरीचा शेजारी जिल्हा) आणि विनीलचे बॅचमेट यांनी ही एक लिंक फेसबुकावर डकवली आहे -

http://72.78.249.107/Sakal/23Feb2011/Normal/Jalgaon/page6.htm

बाकी या खुल्या पत्रात, पर्सनल टच असला तरी, काही कळीचे मुद्दे उपस्थित झालेले आहेत. या अपहरणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नक्षलग्रस्त भागात यापुढे कसे काम करील, आणि पोलीस/ सीआरपी यांची भूमीका काय असणार आहे हा उत्सुकतेचा विषय आहे.

स्वाती२'s picture

23 Feb 2011 - 5:14 pm | स्वाती२

धन्यवाद श्रामो!
विनील ना सलाम!

राही's picture

23 Feb 2011 - 5:17 pm | राही

श्रामो,आपल्या लिखाणातून दिसणारी सामाजिक बांधिलकी आणि कळकळ नेहमीच आवडते. विनील यांना सर्व थरांतून सहानुभूती मिळाली हे खरे;(आणि ती योग्यच होती,)पण वरील एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे काही कळीचे मुद्दे उपस्थित होतात. यावेळी मुंबई बाँब हल्ल्यात (हकनाक?) बळी गेलेले निधड्या छातीचे,शूर, कर्तव्यदक्ष अधिकारी कामटे, करकरे आणि साळसकर यांची आठवण होते. लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा मरता नये असे म्हणतात.ज्यांची समाजाला अत्यंत गरज आहे आणि जे समाजासाठी भरघोस योगदान देत आहेत, देण्याची क्षमता बाळगून आहेत, त्यांनी आपल्याला समाजसेवेकरता अधिकाधिक संधी आणि समय मिळेल अशा तर्‍हेने आपला आयुष्यक्रम आखला पाहिजे.त्यांच्या क्षमतेमुळे आणि सुजाणपणामुळेच हे उत्तरदायित्व त्यांच्यावर येते. सुमार वकूबाच्या माणसाकडून कोणीही अपेक्षा ठेवत नाही हे आपण पाहातोच.
शेवटी,'वेडात दौडले वीर मराठे सात' अशी हाराकिरी होऊ नये इतकेच.

धमाल मुलगा's picture

23 Feb 2011 - 5:49 pm | धमाल मुलगा

अगदी अगदी!
मनातलं बोललात.

विकास's picture

23 Feb 2011 - 8:10 pm | विकास

सहमत

श्रामोंना धन्यवाद!

शेवटी,'वेडात दौडले वीर मराठे सात' अशी हाराकिरी होऊ नये इतकेच.

असेच वाटते...

मग एका स्वयंसेवी संघटनेच्या कार्यकर्त्याने तुला आग्रह केला

ही कुठली स्वयंसेवी संस्था आहे? त्यांना कोण मदत करते?

नितिन थत्ते's picture

23 Feb 2011 - 10:38 pm | नितिन थत्ते

सहमत आहे.

ती संस्था कोणती हे कळून तिच्यावर कारवाई होणे आवश्यक.

(ता. क. : आत्ता येत असलेल्या बातम्यांवरून विनील यांची सुटका झालेली नाही. पबित्र माझी यांचीच सुटका झाली आहे).

ता. क. माओवाद्यांनी काही नवीन अटी प्रशासनासमोर ठेवल्या आहेत. त्यांना अजुन ५ नक्षलवाद्यांची सुटका करुन हवी आहे. सविस्तर माहीती
http://in.news.yahoo.com/maoists-fresh-demand-collectors-release-2011022...

सखी's picture

24 Feb 2011 - 12:52 am | सखी

सहमत

श्रामोंना धन्यवाद!

शेवटी,'वेडात दौडले वीर मराठे सात' अशी हाराकिरी होऊ नये इतकेच.

असेच वाटते...

चिगो's picture

24 Feb 2011 - 11:32 am | चिगो

शेवटी,'वेडात दौडले वीर मराठे सात' अशी हाराकिरी होऊ नये इतकेच.
<<

शतशः धन्यवाद ह्या वाक्यासाठी... श्रामोंच्या "विनिल आणि..." ह्या धाग्यावर मी दिलेल्या सगळ्या प्रतिक्रीयांमागे हीच भावना होती...

श्रावण मोडक's picture

23 Feb 2011 - 6:44 pm | श्रावण मोडक

'मी तो केवळ भारवाही' !!!
पत्राचे सारे श्रेय सचिनचे. हे त्याला लिहावेसे वाटले. इथे मी दिले ते त्याने सुचवल्यानेच.

खरच माझाही सलाम...

अप्पा जोगळेकर's picture

23 Feb 2011 - 7:53 pm | अप्पा जोगळेकर

आय सॅल्यूट यू, सर!
शिवाजी जन्मावा पण दुसर्‍याच्या घरी ही आमची मानसिकता जेंव्हा बदलेल तेंव्हाच आशेचा किरण दिसू शकेल.

स्वाती दिनेश's picture

23 Feb 2011 - 7:56 pm | स्वाती दिनेश

हे पत्र विनिलना लिहिण्यासाठी सचिन जाधवना आणि सचिनचे पत्र येथे दिल्याबद्दल श्रामोंना धन्यवाद,
विनिल , सॅल्यूट टू यू सर!
स्वाती

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

23 Feb 2011 - 11:20 pm | निनाद मुक्काम प...

सलाम

बातमी वाचून आनंद झाला कि त्यांचे साथीदार सुटले .वाईट ह्याच गोष्टीचे कि त्यांच्या सुटकेची बातमी अजून आली नाही आहे .(पण ती कधी हि होऊ शकते )
एका चांगल्या विषयाला हात घातल्याबद्दल धन्यवाद
मला फक्त सीमेपलीकडील हालचाली दिसतात .त्यांचे कुसळ दिसते पण आपले अंतर्गत लाल मुसळ दिसत नाही .
ह्या प्रकरण मध्यस्थीची भूमिका करणारे प्रोफेसर हर गोपाल ह्यांचे विशेष आभार

प्रकाश घाटपांडे's picture

24 Feb 2011 - 11:40 am | प्रकाश घाटपांडे

धन्यवाद श्रामो ! पत्र इथे उपलब्ध करुन दिल्याबद्दल.
काय बोलणार पत्र वाचून नि:शब्द झालो.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 Feb 2011 - 2:23 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आजच्या 'लोकसत्ता'मधे सचिन जाधव यांनीच लिहीलेला "नक्षलवाद आणि विनीलचा मार्ग..." हा लेख वाचनीय आहे.

बिपिन कार्यकर्ते's picture

27 Feb 2011 - 11:44 pm | बिपिन कार्यकर्ते

लेख उत्तम आहे... आवडला. श्री. जाधव यांच्याकडून अजून काही वाचायला आवडेल.