शाळा हा विषयच असा आहे की कितीही लिहा कमीच पडेल. पेनातली शाई संपेल (किंवा कळफलक दाबु दाबुन बोटे दुखतील) पण शाळेच्या आठवणी संपणार नाहीत. प्रत्येकाच्या हृदयात शाळेच्या आठवणींसाठी एक वेगळ कप्पा राखुन ठेवलेला असतो. त्या १०-१२ वर्षांच्या आठवणी नेहेमीच सोनेरी रुपेरी असतात असे नाही पण अटळ, अचल, अविनाशी नक्की असतात. माझ्या आठवणीत एक नाही अनेक शाळा आहेत. पण शाळेशी खर्या अर्थाने बंध जुळण्याच्या काळात म्हणजे ५ वी नंतर मी ठाण्याच्या सरस्वती मध्ये होतो.
शाळेतली ती सोन्यासारखी वर्षे अनेक समाजकंटकांनी (यात काही शिक्षकवर्ग आणि शालेय अभ्यासक्रमात गणितासारखे अनाकलनीय विषय घुसडणारे काही अभद्र प्राणिमात्र येतात) अक्षरशः पोखरुन काढली होती. पण म्हणुन शाळा मला आवडायची नाही असे नाही. आवडायचीच आणि ती आवडण्यामागे असणार्या अनेक कारणांपैकी एक होते आमच्या शाळेचे ग्रंथालय आणिअ ग्रंथपाल (च्यायला नाव विसरलो बघा त्यांचं). अनेक उत्तमोत्तम पुस्तकांचा तिथे फडशा पाडला. दिवाळी आणि मे महिन्याच्या सुट्टीत मी लायब्ररीत पडीक असायचो. आमचे लायब्ररीयन सगळी चांगली पुस्तके काढुन मला वाचायला द्यायचे आणि मी दिवसभर तिथेच बसुन ती चावायचो.
वाचली ती सगळीच पुस्तके आवडली असे नाही. पण बरीच आवडली. भावली. काही पुस्तकांची भाषा डोक्यावरुन गेली पण त्यातली भावना, त्यातली वातावरणनिर्मिती मस्त धमाल करुन जायची. पण खर्या अर्थाने भारावल्यासारखे झाले ते शिवाजी सावंतांचे मृत्युंजय वाचुन. कितीतरी दिवस मी त्यातल्या कर्णाची, कृष्णाची वाक्य येणार्याजाणार्यांच्या तोडावर फेकत होतो. डोळे बंद केले की १६व्या दिवशी रणांगणावर एकहाती झुंजणारा कर्ण दिसायचा (तेव्हा मी ६वी / ७वीत होतो. मोरपीस फिरवलं गेल्यासारख्या आठवणी निर्माण करणार्या वर्गप्रिया डोळ्यासमोर यायच्याएवढी बौद्धिक वाढ झालेली नव्हती माझी). आणि प्रत्येक वाक्यागणिक रडीचा डाव खेळलेल्या अर्जुनाची कीव यायची, चीड यायची. त्याचाच प्रभाव असेल कदाचित पण जेव्हा मिपावर सदस्यनाम घ्यायची वेळ आली तेव्हा झटकन मृत्युन्जयच सुचलं. त्यानंतर अनेक पुस्तके वाचली. सावंतांचेच युगंधरदेखील वाचले. तेही छान होते. पण छावा, पावनखिंड, पॅपिलोन अशी मोजकी पुस्तके वगळता कुठल्याही पुस्तकाने भारावुन गेलो नव्हतो. तो आनंद काल बर्याच दिवसांनंतर, किंबहुना बर्याच वर्षांनंतर मिलिंद बोकीलांचं शाळा वाचुन मिळाला.
शाळेची कथा आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या कुठल्याश्या काँक्रीटीकरण न झालेल्या उपनगरात फुलत जाते. ही कथा आहे ९वीत शिकणार्या काही मुलांची आणि मुलींची. खासकरुन जोशी, चित्रे, सुर्या (म्हात्रे) आणि फावड्याची (पांडुरंग) . त्यांच्या भावविश्वाची आणि त्यांच्या उनाडक्यांची आणि त्याहुन महत्वाचे म्हणजे त्या वयात शाळेत गेलेल्या सगळ्या मुलांची. तुमची - माझी. शाळेचं तेच वैशिष्ट्य आहे की ती या ४ मुलांची कथा असली, जोश्याच्या तोंडुन आपल्याला कळत असली, १९७५-७६ सालात घडलेली असली तरी ती आपल्याला आपल्या स्वत:ची वाटते. त्यातली प्रत्येक गोष्ट नाही जरी, तरी बहुतांश घटना अगदी आपल्या आयुष्यात घडल्यासारख्या वाटतात. अगदी त्याच वयात नाहीत पण ३-४ वर्षांच्या फरकाने समजा.
वेगवेगळ्या सामाजिक स्तरातुन आलेल्या पण मैत्रीच्या एका निरपेक्ष, निरागस, निर्हेतुक , निस्वार्थ धाग्याने बांधल्या गेलेल्या शाळेतल्या या ४ मित्रांचा आवडता उद्योग म्हणजे म्हात्रेच्या अर्धवट बांधलेल्या घरात लपून बसून कुचाळक्या करायच्या. रस्त्यावरुन शाळेत जायला निघालेल्या मुलांची आणि कधीमधी शिक्षकांची सुद्धा लपून राहुन फिरकी घ्यायची. अर्थात या कुचाळक्या तारुण्यसुलभ असतात, वयाला साजेश्या असतात. कुठल्याही शाळेतली ८वी - ९ वीतली मुलं जे काही करतात तेच ही मुले पण करतात. शाळेतल्या मुला मुलींच्या जोड्या लावतात तशीच शिक्षकांच्या जोड्याही लावतात. शिक्षकांबद्दलचा राग लोभ त्या वयाला साजेश्या निरागसपणे / आगाउपणे व्यक्त पण करतात. वर्गातल्या मुला मुलींना सुकडी, केवडा, घासु, भावमारु, फावड्या असली इरसाल नावे पण पाडतात. आणि शालेय जीवनातली सगळ्यात महत्वाची गोष्ट पण करतात. ७वी / ८वी पर्यंत वर्गातल्या पोरींशी भांड भांड भांडुन नंतर त्यांच्याच प्रेमात पण पडतात. त्या वयातले, ते प्रेम ती भावना, ती हुरहुर, ती मोरपीस फिरवल्यासारखी सुखद जाणीव, तिच्या आठवणीत "भाड मे जाये दुनिया" टाइप आलेले फीलिंग हे सगळॅ बोकिलांनी अतिशय सुरेख माडले आहे. प्रेमात पडलेल्या जोश्याच्या भावना बोकिलांनी त्याच्याच शब्दांत अश्या मांडल्या आहेतः
"त्या दिवशी मला कळलं की शाळेची मजा कशात आहे ते. वर्ग आहेत,बाकं आहेत, पोरंपोरी आहेत,सर आहेत,गणित आहे, भूगोल आहे,नागरिकशास्त्रसुध्दा; पण आपण त्यात कशातच नाही. आपण त्या गाईंच्या पाठीवर बसणार्या पांढर्या पक्ष्यांसारखे मुक्त आहोत.त्यांच्या शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते.खास एकट्याचीच . त्या शाळेला वर्ग नाहीत,भिंती नाहीत,फ़ळा नाही,शिक्षक नाहीत; पण त्यातलं शिकणं फार सुंदर आहे."
शाळेतले ते पपी लव्ह १०० पैकी ९९ वेळा शाळेतच विरुन जाते. पण ती लवशिप, ती लाइन मिळवण्यासाठी केलेल्या त्या धडपडीची, त्या क्लृप्त्यांची आठवणी बोकिलांनी आपला कथानायक जोश्याच्या कथानकतुन अक्षरशः जिवंत उभी केली आहे. शिरोडकर नामक वर्गभगिनीचे (शी शी शी. किती बकवास शब्द आहे हा. या शब्दाने आयुष्यातल्या १५ बहुमोल वर्षांचं पार मातेरं केले) प्रेम संपादन करण्यासाठी जोशी जो काही आटापिटाअ करतो आणि शेवटी यशस्वी होतो त्याच्या वर्णनाला तोड नाही. एका वर्षात जमलेले ते प्रेम त्याच वर्षात छोट्याश्या गैरसमजातुन कोलमडुन सुद्धा पडतं. सरतेशेवटी शिरोडकर निघुन गेल्यामुळे जोश्याच्या जीवाची जी घालमेल होते ती तर केवळा अप्रतिम. वर्षभर बसलेले धक्के जोश्याने सहन केलेले असते. केटी, विजय वगैरे वयाने मोठे असलेल्या तरीही आवडत्या असलेल्या मित्रांचे दुरावणे, आवडत्या शेतावर इमारत बांढली जाणे, आवडत्या सरांना काढुन टाकले जाणे, कट्ट्याचे सुटणे हे सगळे सोसलेला जोशी शेवटी शिरोडकर निघुन गेली हे कळाते तेव्हा मात्र भयानक उदास होतो. त्यावेळेस एका १४-१५ वर्षाच्या मुलाचे मन बोक्किलांनी अचुक टिपले आहे:
"मी कितीतरी वेळ तसाच बसून राहिलो. मग हळुहळु मला सगळं नीट समजत गेलं. रिझल्ट लागला होता. सुर्या आणि फावड्या नापास झाले होते. सुर्या त्याच यत्तेत राहणार होता. फावड्याची शाळा सुटणार होती, चित्र्या कदाचित बांद्र्याला जाणार होता. आता आम्ही बिल्डींगवर पुन्हा कधीही जमणार नव्हतो. पुढच्या वर्षी शिकवायला बेंद्रेबाई होत्या. आप्पा, हळाबे, केंदाळकर होते. पण झेंडेसर नव्हते, मांजरेकर सर निघुन गेले होते. वर्ग त्या जाळीच्या पिंजर्याआड होता. तिथुन ग्राउंड दिसणार नव्हतं. सोनारपाड्याचे डोंगर दिसणार नव्हते. उद्यापासुन त्या कडुसकर सरांची शिकवणी लावायची होती. सगळीकडे ती आणिबाणीची परिस्थिती तशीच होती. पण केटी नव्हता, विजय नव्हता. नरुमामाचं लग्न झालं होतं. आमच्या अंगणात कोणी चेस खेळणार नव्हतं. आता शेताडीत इमारती बांधल्या जाणार होत्या. तिथे ती पाण्याने भरलेली भाताची शेतं आता कधीच दिसणार नव्हती. भोवताली हे अफाट भव्य जग तसंच होतं, पण त्यात शिरोडकर कुठं हरवलीय ते माहित नव्हतं. शाळा संपली होती. आता होतं फक्त दहावी नावाचं भयाण वर्ष."
या वाक्याबरोबर पुस्तक संपतं. आपल्या जाणावत राहतं की आपल्या आयुष्यातुन सुद्धा आपली शिरोडकर अशीच निघुन गेली आहे. भोवताली हे अफाट भव्य जग तसंच आहे. शाळा संपली आहे आणि आता फक्त भयाण आयुष्य उरलं आहे जे पोटापाण्याच्या चिंतेत जगायचं आहे. :) नाही शाळा एवढं गंभीर नाहं. किंबहुना ते अजिबात गंभीर नाही. तो एक शाळा नावाच्या उत्सवाचा सोहळा आहे. शाळेतुन बाहेर पडुन वर्षं / शतकं उलटल्यानंतर पुन्हा तोच अनुभव घेण्यासाठी शाळा एकदा वाचाच.
जोशी १०वीची तयारी करतो आहे. मी ११ची. तुमचं काय? तुम्ही शाळा वाचा :)
प्रतिक्रिया
3 Jan 2011 - 11:04 pm | मराठे
मस्त!
लाजवाब वाक्य!
पुस्तक नक्किच वाचायला हवं!
11 Jan 2011 - 10:52 am | टारझन
काल रात्री मी शाळा वाचुन संपवलं. पण माझ्या पुस्तकात पान क्रमांक १५६ ते १७२ डायरेक्ट गायबंच आहेत. आणि त्या ऐवजी १५६ पासुन १४१ अशी उलट्या क्रमाने पानं घुसवली आहेत. इचिभनं , ते जोश्या एकदम लायनीवर येतो नं पानं गायब. टकुचं आउट झालं .. कोणाकडे ती गाळलेली पाणे असतील तर कृपया शेयर करा :)
बाकी मिपावरली कोण केवडा आपल्याला लाईन देती काय ? जी देणार नाय ती बेंद्रीण =))
- बेवडा
11 Jan 2011 - 5:12 pm | गवि
त्यातली अंबाबाई, आईसाहेब ही संबोधनं.
सुकडी, बुटकी बाक्रे, चिमण्या, घासू गोखले, जाड्या शेंब्या ही पात्रं.
शिरोडकरचं न घेतलेलं नाव.
अंबाबाईची विज्यावर असलेली लाईन.
मांजरेकरसर. त्यांचं आंबेकरशी असलेलं काहीसं काहीतरी.
मांजराला आवडतात आंबे..
..मनात मांडे जनात मिसळ.
..इचिभना गंगू कुटं गेली.
सुर्याच्या मनातली केवडा आणि मुंब्र्याच्या डोंगरावरची देवी..
हे सर्व कधीच विसरता न येण्यासारखं आणि वर्णनही न करता येण्यासारखं..
शेवटी रिझल्टच्या वेळी शिरोडकरचं गेलेलं असणं समजताच (काहीशी अपेक्षा असूनही) तोच जड फटका डोक्यात मारून सुन्न केल्याचा फील मुकुंद जोश्यासोबत आपल्यालाही येतो.
मूळ कथा सोडूनही असंख्य सुंदर गोष्टी आहेत या पुस्तकात. खूप खूप अवर्णनीय.
पानं गायब आहेत हे वाचून खरंच वाईट वाटलं. अगदी जरूर पूर्ण पुस्तक मिळव.
11 Jan 2011 - 6:07 pm | डावखुरा
शेवटी रिझल्टच्या वेळी शिरोडकरचं गेलेलं असणं समजताच (काहीशी अपेक्षा असूनही) तोच जड फटका डोक्यात मारून सुन्न केल्याचा फील मुकुंद जोश्यासोबत आपल्यालाही येतो.
गवि अगदी खरंय !!
3 Jan 2011 - 11:50 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
खुप आठवणी तरळुन गेल्या!.. नॉस्टॅल्जिक करणार्या हळुवार्..मोरपिशी,,,धमाल.. निरागस.. उमलत्या आठवणी.
किती वेगळं आयुष्य होतं ना.... जगण्याच्या वास्तवापसुन दूर! अबोध!.. शाळेत जसे होतो तसे एक चार दिवस जरी परत मिळाले तर कित्ती छान होइल ना!
,, अजुन एक बाल कल्पना!..
4 Jan 2011 - 6:10 am | शिल्पा ब
छान.
4 Jan 2011 - 7:49 am | निनाद मुक्काम प...
रुईया महाविद्यालयाने ह्यावर कादंबरीवर एकांकिका करून प्रथम पारितोषिक मिळवले होते .
हि त्याची क्लीप http://www.youtube.com/watch?v=33oc3609Slw
बाकी शाळा ह्या कादंबरीवर मिपा वर एक नितांत सुंदर लेख वाचला होता .त्यात हि शाळा माझ्या जन्मभूमी डोंबिवली येथील असावी अशी एक वंदता होती .रुईया च्या ह्या एकांकिकेत
देवळाचा जो प्रसंग आहे . .तो डोंबिवलीवरील गणपती मंदिराचा भास निर्माण करतो .
आजही आमच्या शाळेतील अनेक वर्ग मित्र आणि लग्न झालेल्या वर्ग भगिनी सोशल नेटवर्किंग मुळे संपर्कात आहेत .आमोद ( शाळेतील सुधीर गाडगीळ) सारखा मित्र मिपा वर आहे
तर वर्गातील १० अ १९९६ ची ओर्कुट वर कम्युनिटी आहे . २००१ साली आम्हा वर्गमित्रांचे स्नेहसंमेलन भरले होते .आता परत कधी भरणार देव जाणे. कारण बरीच मंडळी अमेरिका /युके /आखतात आणि युरोपात पसरली आहेत .शाळेच्या माझी विद्यार्थी मंडळाचे सदस्य सुध्धा असेच विखुरले गेले आहेत.
.शालांत परीक्षेच्या यादीत येण्यासाठी वर्गातील उच्चभ्रू असे झपाटून गेले होते .
.कि त्याची लागण वर्गातील समस्त मंडळींना ८ वी पासून लागली होती .
सांस्कृतिक कायर्क्रम हे सरकार दरबारी ज्या पद्धतीने होतात त्या पद्धतीने व्हायचे .पौगुंदावस्था वैगेरे असा काही प्रकार नव्हता टक्केवारीच्या बोजाखाली सगळेच अकाली प्रौढ झाले होते .
कशासाठी हा सर्व उपद्याव तर तीच भर पोटासाठी .अरे बबडू म्हणतो तसे '' पैसा काय साली फुल्या फुल्या पण कमावते .
'' मग त्यासाठी आयुष्यातील मयुरपंखी क्षण आम्ही असे मातीमोल केले त्याबद्दल खंत वाटते .
आजही कधी वर्गमित्रांचा कट्टा जमला कि जुन्या आठवणी ताज्या होतात . अनेक माहित नसलेल्या गोष्टी /आठवणी नव्याने समजतात
.आम्ही मामा/ काका झाल्याचे हि बरेचदा कळते
प्रत्येक शाळेला शारदाश्रम सारखे आचरेकर सर लाभले तर तर देशात अनेक सचिन विविध खेळांमध्ये निर्माण होतील .(सचिन एक संज्ञा ह्या नात्याने शब्द वापरत आहे .)
गेले ते दिस गेले .
4 Jan 2011 - 5:09 pm | अप्पा जोगळेकर
देवळाचा जो प्रसंग आहे . .तो डोंबिवलीवरील गणपती मंदिराचा भास निर्माण करतो .
फक्त हा एकच प्रसंग नाही. देउळ म्हणजे गणपती मंदिर तर वाटतंच याशिवाय सोनारपाड्याचे डोंगर, आग्री लोकांचा पुस्तकातून वारंवार येणारा उल्लेख, नव्याने डेव्हलप होणार्या शहराचे वर्णन आणि पडीक कन्स्ट्रक्शन साईट्स, शेतमळे आणि भाताची शेतं, सुर्याचे इचिभना, लोकलने अपडाउन करणारे पांढरपेशे लोकं आणि शाळेचं मोठ ग्राउड हे सगळं वाचून 'शाळा' मधली शाळा म्हणजे स.वा.जोशी विद्यालय किंवा डीएनसी हायस्कूल असणार अशी माझी खात्री आहे.
- स.वा. जोशी विद्यालंयचा पास औट (साल २०००)
4 Jan 2011 - 5:56 pm | निनाद मुक्काम प...
अप्पा
बहुदा स वा जोशी असण्याची तगडी शक्यता आहे .माझा मामा तेथूनच पास आउट झाला आहे .अर्थात खूप आधी.
पण डोंगर हे कल्याण व ठाकुर्लीचे वाटतात .बाकी हास्य सम्राट मधून डोंबिवलीच्या जॉनी इलावावर ने आगरी बाल्या उभ्या
महारष्ट्रात लोकप्रिय केला .आहे
.बाकी सवा जोशीच्या मोठ्या मैदानाचा आम्हा खर्डेघाशी करणाऱ्या स्वामी विवेकानंद राणाप्रताप ( वेस्ट ) पास (१९९६) पोरांना भयंकर हेवा वाटायचा
.संध्याकाळी माझे मित्र मंडळी बास्केट बॉल साठी तेथील मैदानात प्रशिक्षणासाठी जायचे . .राज्यस्तरीय स्पर्धा गाजवायचे .आणि तेव्हा आम्ही कोचिंग क्लासेस टिंब टिंब मारायचो .
घरच्यांची अपेक्षा बोर्ड फाडून याव (आम्हाला अपेक्षाच नव्हत्या म्हणा कसल्या .)
4 Jan 2011 - 7:02 pm | विश्वनाथ मेहेंदळे
ही कथा डोंबिवली येथे घडते असे लेखकाने लिहिले नसले तरी सुचवले नक्की आहे. वरील सर्व उल्लेख आहेतच पण एक मस्त हिंट म्हणजे पुस्तकात खालील छापाचे एक वाक्य आहे.
"आमच्या गावात इतके डास आहेत की गावाचे नाव आता डांसिवली असे असायला हवे होते असे म्हणतात"
आता इतके डास म्हटले तिथेच निम्मे पक्के झाले की डोंबिवली बद्दल बोलणे चालू आहे ;-) उरलेली शंका 'डांसिवली' नावाने फिटली.
4 Jan 2011 - 7:13 pm | मृत्युन्जय
आयला खंग्री ओब्जर्वेशन आहे एकदम.
4 Jan 2011 - 7:15 pm | अप्पा जोगळेकर
संध्याकाळी माझे मित्र मंडळी बास्केट बॉल साठी तेथील मैदानात प्रशिक्षणासाठी जायचे . .राज्यस्तरीय स्पर्धा गाजवायचे .
या बाबतीत आम्ही पण नशीबवान. खो-खो आणि बास्केटबॉल दोन्ही खेळायला मिळालं तिथे.
- राज्य स्तरीय बास्केट स्पर्धेतला राखीव खेळाडू
6 Jan 2011 - 9:26 am | स्पा
शाळेची कथा आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या कुठल्याश्या काँक्रीटीकरण न झालेल्या उपनगरात फुलत जाते.
हि कादंबरी डोंबिवली गावचीच आहे.. याबाबत लेखकाने एका मुलाखतीत खुलासा केलेला आहे
4 Jan 2011 - 11:09 am | परिकथेतील राजकुमार
जियो मृत्युंजय !
मस्त लिहिले आहे एकदम. पुन्हा एकदा शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या राव.
साला आमची शाळा बॉईज हायस्कुल असल्याने 'पपी लव्ह' वगैरेला चान्सच मिळाला नाही. आणि नशिब पण इतके फुटके की आम्ही १२ वी पास होउन बाहेर पडलो आणि त्याच वर्षी शाळेने मुला-मुलींची LIC ब्रँच ४ वर्गात भरवायला सुरुवात केली. बहुदा अखिल आर्यावर्तातील 'वापिलिंपी' शाळेतुन बाहेर पडायची शाळा वाट बघत असावी.
6 Jan 2011 - 10:25 am | Pain
किती दिवसांनी हा शब्द ऐकला (वाचला) :D हाहाहा
4 Jan 2011 - 11:13 am | रणजित चितळे
मस्त लेख आहे. आवडला
आठवणींच्या जुन्या गाठी सोडवू,
पूर्वीच्या घड्या पुन्हा उलगडू।।
परत एकदा लहान होऊ,
पुन्हा आपण वर्गात बसू।
वह्या उलगडून रोजच्या प्रश्नांना,
मग्न व्यापातून उत्तरं लिहिताना।
थोडं थांबून व्यस्त जीवनात,
हरवून जाऊ स्नेह बंधनात।
सर्व जगच जिथे शाळा,
पूर्ण आयुष्य त्याचा फळा।
जे मिळाले ते नशीब कोरले,
जे गमावले ते हसून पुसले।
आठवणींच्या जुन्या गाठी सोडवू,
पूर्वीच्या घड्या पुन्हा उलगडू।।
4 Jan 2011 - 11:20 am | मुलूखावेगळी
तुम्ही शाळा वाचा Smile
>>> नक्कीच
धन्यवाद खुप दिवसान्पासुन वाचाय्चे होते
आता ह्या वीकान्ताला 'शाळा' च
4 Jan 2011 - 11:47 am | sagarparadkar
काय योगायोग आहे पहा, नुकतीच 'शाळा' वाचून पूर्ण केली ...
आपला लेख आणि त्यावरील प्रतिक्रिया सुंदरच ...
4 Jan 2011 - 11:47 am | sagarparadkar
काय योगायोग आहे पहा, नुकतीच 'शाळा' वाचून पूर्ण केली ...
आपला लेख आणि त्यावरील प्रतिक्रिया सुंदरच ...
4 Jan 2011 - 11:51 am | दिपक
छान लिहिलय मृत्युन्जय..’शाळा’ पुस्तकाविषयी जेवढं बोलाव तेवढ कमी आहे. रुईया ची ’ग म भ न’ एकांकिका शिवाजी मंदीरात पाहिली तेव्हाच हे पुस्तक मिळवुन वाचायचे ठरवले होते. ३ वेळा वाचलं आहे. पुन्हा वाचायचे आहे
फोटो - http://www.rupeshtalaskar.blogspot.com/
4 Jan 2011 - 12:21 pm | प्रमोद्_पुणे
'शाळा' वाचायला हवेच..
4 Jan 2011 - 2:09 pm | विलासराव
हे पुस्तक.
धन्यवाद.
4 Jan 2011 - 2:33 pm | सूड
मी शाळा वाचलं ते धम्याचं 'इचिभनं' म्हणजे काय ते मला कळलं नाही, आणि ते मी त्याला विचारतोय तेवढ्यात मितानतै खव त लिहून गेली "मिलिंद बोकिलांचं शाळा वाच ". आता वाटतं मी ते का वाचलं ?? कारण त्या पुस्तकाच्या आठवणीने जाणीव होते....यार !! आपण खरंच कायतरी मिस करुन बसलोय.
4 Jan 2011 - 5:28 pm | धमाल मुलगा
इच्चिभनंवरुन शाळेवर गेलास? _/\_ क्या बात है!
गंमत सांगायची तर मी अजुन शाळा वाचलेलंच नाही. :( पण तरीही भाषेतला लडिवाळपणा तोच आहे ;)
सालं शिवीवरुन आठवलं, आमचा दहावीचा निकाल वर्गांत द्यायचे. त्याप्रमाणे सगळे आपापल्या वर्गात बसलो होतो. भावेसरांनी प्रत्येकाला मार्कलिस्ट देणं वगैरे सोपस्कार पार पाडले. मग 'भाश्यान'...'तुम्ही आता मोठे झालात वगैरे...' आणि चार वाक्यांनंतर ह्या आम्हाला बडवणार्या, शिकवायला लागलं की वेळ काळ जागा विसरुन धुंद होणार्या म्हातार्याचा गळाच दाटुन आला...आयुष्यात त्यांच्या तोंडून एकदाच शिवी ऐकली..त्यादिवशी. जड आवाजात म्हणाले, "भोसडीच्यांनो, कशाला आला होता रे इथं..कशाला जीव लावलात?' बाऽऽ.स...इच्चिभनं...वर्गातलं टग्यातलं टग्या कार्टंपण भोकाड पसरुन रडायला सुरु झालं....
साला, ज्यादिवशी शाळा संपली तेव्हा आम्हाला शाळा कळली असं वाटलं रे.
4 Jan 2011 - 5:57 pm | सूड
>>गंमत सांगायची तर मी अजुन शाळा वाचलेलंच नाही.
नक्की ?? का हा सुशि छाप ट्विस्ट म्हणायचा ?? आता असं म्हणू नका, 'सुशि कोण ?'
4 Jan 2011 - 6:01 pm | धमाल मुलगा
'विश्वास पानपतावरच गेला' हेच खरं. :(
4 Jan 2011 - 4:48 pm | प्राजक्ता पवार
मस्तं लिहलंय . आता हे पुस्तक वाचायलाच हवं.
4 Jan 2011 - 5:01 pm | बिपिन कार्यकर्ते
मिपावर आलेला 'शाळा' वरचा हा दुसरा की तिसरा धागा!
( http://www.misalpav.com/node/659 )
खरंच ग्रेट आहे ती कादंबरी. कितीही वेळा वाचली तरी कंटाळा येत नाही.
मृत्युंजयने लिहिलंयही छानच.
4 Jan 2011 - 5:19 pm | मृत्युन्जय
आयला खरंच की. जरा सर्च मारायला हवा होता मी पण लिहिण्यापुर्वी. उगाच डुप्लिकेट धागे झाले. पण पुस्तक एवढे भारी आहे की मी अतिउत्साहात लगेच धागा टाकला. मिपावर संपुर्ण रसग्रहण झालेलं दिसतय याचं आधीच आणि मास्तरांनी लिहिलय म्हटल्यावर चांगलं असणे ओघाने आलेच. :)
4 Jan 2011 - 5:25 pm | धमाल मुलगा
काही होत नाही. डुप्लिकेट नाही न काही नाही.
अरे हा विषयच असा आहे, की भले भले विरघळतातच. :)
4 Jan 2011 - 5:33 pm | बिपिन कार्यकर्ते
+१
दुसरा धागा टाकला या बद्दल आक्षेप नव्हता / नाही. एखाद्या पुस्तकावर सातत्याने प्रतिक्रिया येतात हे ते पुस्तक अजून जिवंत असल्याचं लक्षण आहे असे सांगायचे होते. 'शाळा'च्या निमित्ताने मृत्युंजयने जे लिहिले आहे ते पण वाचनियच आहे. म्हणून अजून मजा आली.
4 Jan 2011 - 5:24 pm | इन्द्र्राज पवार
"....'शाळा' वरचा हा दुसरा की तिसरा धागा!...."
श्री.बि.का. यानी दिलेल्या त्या लिंकवरील लेखही योगायोगाने २ वर्षापूर्वीच्या जानेवारीमधील आणि हा लेख यंदाच्या जानेवारीमधील हा एक योगायोग. पण दोन्ही लेखातील "शाळा" बद्दलची मोहिनी अगदी नेमकी तिच आहे...कादंबरीतील "लाईन मारणे" ही बाब दोघाही धागाकर्त्यांना भावलेला एक घटक, हाही योगायोगच.
श्री.मृत्युंजय याना 'शाळा' वर इथे पूर्वी लिखाण झाले आहे याची माहिती नसावी...कारण मला माहित आहे की, त्यानी ज्या वेगाने एका दिवसातच एका जोषात ही कादंबरी 'खाल्ली' त्याच वेगात इथला लेख लिहिला आणि चटकन प्रकाशित केला आहे. कसेही असो, त्यामुळे एका चांगल्या विषयावर दोन लेख यावेत आणि तितक्याच प्रतिक्रिया उमटाव्यात, हे मराठी साहित्याच्या दृष्टीने उत्साहवर्धक आहे.
इन्द्रा
4 Jan 2011 - 5:34 pm | बिपिन कार्यकर्ते
मिष्टर पवार, इतरांचे जाऊ द्या... 'लाईन मारणे' तुम्हाला भावले(ते) का ते सांगा! ;)
4 Jan 2011 - 5:52 pm | इन्द्र्राज पवार
"....तुम्हाला भावले(ते)...."
एका दगडात दोन पक्षी आहेत म्हणून दोन उत्तरे :
१. त्या दोघांना जे "भावले" ते एक वाचक म्हणून मलाही भावलेच.
व
२. प्रत्यक्षात 'ते' मला भावते का? तर उत्तर इल्ला असणारच नाही, कारण मग मी "शाळे"त गेलो पण "शिकलो" च नाही असे होईल. तर त्या वयात कोल्हापुरातील एका मनीम्याऊंसाठी पेठेतील जे घाऊक बोके लाईनमध्ये होते त्यात माझा, शेवटी का असेना, एक क्रमांक होताच. पण अशा प्रकरणात अनेकांचे होते तसे पुढे दहावीनंतर शिक्षणाच्या बुद्रुक आणि खुर्द अशा वेगळ्या वाटा फुटल्यावर ती मनी 'वर्गभगिनी'च झाली, राहिली. "शाळा" वाचताना ते चित्र परत समोर आले, प्रकर्षाने... हुरहुरही वाटली.
इन्द्रा
5 Jan 2011 - 9:45 pm | वाहीदा
मिलिंद बोकील ची 'शाळा' वाचताना अन http://www.youtube.com/watch?v=jyheffu5ojM&feature=related ही लिंक बघताना संदीप खरेंची खालील कविता आठवून गेली (शब्द थोडीफार चुकले ही असेतील पण जेवढी आठवली तेवढी टंकली)
काय ती करते खुणा, अन् काय माझ्या कल्पना,
काय बोले सत्य अणि काय् माझ्या वल्गना....
एकदा ती हासली, नी जन्म झाला सार्थ हा,
क्षणभरावर नोंद केवळ, युग भरावर वंचना...
क्रूर हे रस्ते तुझे पण मीही इतका निश्चयी,
टोचत्या काट्यास आता पाय देती सांन्तवना...
त्या तुझ्या वाटेवरी मज ठेच जेव्हा लागली,
गात उठले घाव ते अन् नाचल्या त्या वेदना..
एवढेही तू नको घेउ मनावर शब्द हे,
जा तुला म्हटलो खरा मी, पण् जराशी थांब ना...
गाव माझे सोडताना एवढे तू ऐक ना,
नाव माझे टाकताना तू उसासा टाक ना.....
---- संदीप खरे.
6 Jan 2011 - 1:07 am | प्राजु
ऐलदेशी शुष्करानी पंख मिटला मोर मी
पैलदेशातून थोडे पावसाळे धाड ना..
- संदीप खरे
:)
6 Jan 2011 - 10:14 am | मृत्युन्जय
कविता मस्तच आहे. आणि हे कडवे तर एक नंबर आहे. याच कवितेतले आहे की वेगळी कविता आहे? मी वाचली नव्हती ही कविता. पुर्ण आहे का तुमच्याकडे? प्लीज पाठवता आली तर बघा जरा.
7 Jan 2011 - 11:56 pm | बेसनलाडू
याच अजरामर कादंबरीवर बेतलेल्या याच नावाच्या चित्रपटाची झलक पहायला मिळाली. काही महिन्यांतच प्रदर्शित होऊ घातलेल्या या चित्रपटाविषयी उत्कंठा वाढली आहे.
11 Jan 2011 - 10:23 am | दिपक
ह्या कादंबरीवर आधी एक हिंदी चित्रपट येऊन गेला आहे त्याचे नाव "हमने जीना सीख लिया" असे होते.
1 Dec 2021 - 12:18 pm | चौथा कोनाडा
झकास लेख !
शाळातलं हे तर खुपच भावलेलं
शाळा कादंबरी भन्नाटच आहे ! वाचताना आपलीच शाळा आपण जगत राहतोय असं वाटतं !
मला शाळा सिनेमा देखिल खुप आवडला. कादंबरीचा इसेन्स सिनेमात बर्याच अंश उतरला आहे.
मुकुंद जोशीच्या भुमिकेतला अंशुमन जोशी आवडुन गेला. केतकी माटेगावकरची तर वेगळीच क्रेझ निर्माण झालेली !