Reprinted with permission from EnlightenNext magazine,
© 2005 EnlightenNext, Inc. All rights reserved. www.enlightennext.org
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - १
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - २
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ३
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ४
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ५
मागच्या भागात म्हटल्याप्रमाणे मेंदूचा डावा भाग हा शरीराच्या उजव्या भागावर ताबा ठेवते आणि उजवा भाग डाव्या भागावर हे आता सर्वमान्य आहे. दृष्टीच्या बाबतीत पण हेच खरे आहे. प्रत्येक डोळ्याच्या दृष्टीचे डाव्या बाजूचे क्षेत्र हे मेंदूच्या उजव्या बाजूला जोडलेले असते आणि उजव्या बाजूचे हे डाव्या. हे माहीत असल्यामुळे आता आपल्याला हे कळू शकते की दृष्टीच्या एखाद्या क्षेत्रात जर एखादी माहीती मेंदूला दिली तर ती मेंदूत कुठल्या भागात पोहोचेल. हीच पध्दत वापरून यांनी पूर्वी हे शोधून काढले होते की मेंदूचा डावा भाग हा कार्यकारणभाव, भाषा इत्यदींसाठी जबाबदार असतो. उदा. जर एखादी माहीती मेंदूच्या फक्त डाव्या भागालाच जर पोहोचती केली आणि जर त्या माणसाला त्या बद्दल विचारले तर तो बर्यापैकी माहिती देऊ शकतो. पण हेच जर उलटे केले तर तो माणूस त्या माहितीविषयी बर्यापैकी अनभिज्ञ असतो. उदा उजव्या मेंदूला जर आपण एका चमच्याचे चित्र दाखवले तर त्या माणसाचा डावा हात अनेक वस्तूमधून चमचा बरोबर शोधून काढू शकतो. एवढेच काय, तो हेही सांगतो की ती वस्तू त्याने प्रत्यक्ष बघितलेली नाही. उजवा मेंदू जरी व्यक्त करू शकत नसला तरी त्याला इच्छाशक्ती आणि स्वत: विचार करण्याची ताकद आहे हे निश्चित. हे तपासून बघण्यासाठी चेताशास्त्रज्ञ डोनाल्ड मॅकने एक २० प्रश्नोत्तरांचा खेळ तयार केला आणि तो स्वतंत्रपणे खेळायला मेंदूच्या दोन्ही भागांना शिकवले. पहिल्यांदा त्याच्या विरुध्द आणि नंतर एकामेकांविरुध्द. पण या खेळाचे लवकरच शोकांतिकेत रुपांतर झाले. या तथाकथित दोन मेंदूंच्या माणसांना त्यामुळे एका नवीन रोगाचा सामना करायला लागला. त्याचे नाव “एलियन-हॅंड सिन्ड्रोम” कल्पना करा, तुमच्या उजव्या हातानी तुम्ही तुमच्या पॅंटची चेन लावली आणि त्याच वेळी तुमचा डावा हात ती चेन काढतोय. किंवा तुम्ही मित्राशी हस्तांदोलन करायला उजवा हात पुढे केला आणि त्याच वेळी डावा हात त्याला मारण्यासाठी उगारताय ! हे काल्पनिक वाटेल कदाचित, पण त्या सर्व रुग्णांनी अशाच काहीश्या तक्रारी करायला सुरवात केली होती. एका स्त्रीने अशी तक्रार केली की तिला तिची बॅग भरायला हल्ली दुप्पट/तिप्पट वेळ लागतो कारण ती एका (उजव्या) हाताने बॅग भरते आणि लगेचच दुसर्या हाताने भरलेले कपडे बाहेर फेकते. एकाने तर अशी तक्रार केली की तो आता झोपायला घाबरतो कारण त्याला झोपायच्या वेळी असे वाटते की त्याचा डावा हात त्याचा गळा आवळतोय.
मेंदूच्या दोन्ही भागात वेगवेगळा विचार चालू असतो हे ऐकायला विचित्र वाटेल कदाचित पण हे शेवटी प्रयोगाने सिध्द झालेच आणि ते केले एका चेताशास्त्रज्ञ मायकेल गाझींगा आणि जोसेफ दू यांनी. जरी आपला डावा मेंदू भाषेचे केंद्र असले तरी काही जणांच्या बाबतीत उजवा मेंदूपण ते काम करतच असतो. एका तरूण मुलावर यासाठी प्रयोग करण्यात आला. या मुलाच्या मेंदूचे पण असेच दोन स्वतंत्र भाग झाले होते पण उजवा मेंदू भाषेच्या संदर्भात थोडेसे काम करायला शिकला होता. संशोधकांनी या मेंदूच्या दिन्ही भागांना काही प्रश्न विचारले आणि असे आढळले की जेथे मत आणि आवडीनिवडीचा प्रश्न आला तेव्हा दोन्ही मेंदूमधे मतभेद आढळले. जेव्हा त्याला तू पदवीधर झाल्यावर काय होणार असे विचारले तेव्हा डाव्या मेंदूने त्याचे उत्तर व्यवस्थित दिले “मला ड्राफ्ट्समन व्हायचे आहे. मी त्याचेच शिक्षण घेतो आहे ना !” पण हाच प्रश्न त्याच्या उजव्या मेंदूला विचारण्यात आला तेव्हा त्याने पुटपुटत अडखळत उत्तर दिले “au...to.mo....bile...r-a-c-e-r”.
मेंदूचे दोन भाग झाले तर तो दुभंगलेल्या व्यक्तिमत्वाला जन्म देतो ही कल्पना वैज्ञानिकांना आव्हानात्मक वाटते त्यापेक्षाही मेंदूमुळेच आपले चित्त आणि व्यक्तिमत्व तयार होते हे सिध्द करण्याच्या प्रयत्नांवर याचा काय परिणाम होईल, हा शोध ते घेऊ लागले. त्यामुळे वैज्ञानिकांमधे हा एक वादाचा मुद्दा झाला होता. परंतू या आभ्यासामुळे ज्यांना नोबेल पारितोषीक मिळाले त्यांच्या मते एक गोष्ट स्पष्ट आहे “आम्ही जे काही बघितले आणि प्रयोग केले त्यावरून हेच सिध्द झाले आहे की त्या शस्त्रक्रियेमुळे दोन अंतर्मने असलेली माणसे तयार झालेली होती हे निश्चित.”
मी जेव्हा संशोधन करत होतो तेव्हा म्हणजे साधारणत: बघा मागच्या उन्हाळ्यात एका सकाळी माझा कॉलेजमधला मित्र माझ्या कार्यालयात येऊन धडकला. त्याच्या चेहर्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. “ माझ्या वडिलांना काहीतरी झालंय” तो म्हणाला. “ते नेहमीसारखे वागत नाही आहेत”.
हे माझ्या मित्राचे कुटुंब माझ्या चांगल्या परिचयाचे होते. त्याच्या वडिलांनापण मी गेले कित्येक वर्षे ओळखत होतो. गेले २० वर्षे ते पार्किंसनशी लढा देत होते. त्या त्रासामुळे या एके काळच्या कायदेतज्ञ आणि धावपटूची स्वच्छ विचार करायची कुवत चांगलीच कमी झाली होती. त्यांच्या चेहर्यावर त्यामुळे वेदना आणि वैचारिक गोंधळ याची कायमची छाप पडलेली मी बघत आलेलो आहे. हे सगळे मला आणि माझ्या मित्राला माहीत होते. पण आज काहीतरी वेगळेच दिसत होते.
“म्हणजे काय? परत पार्किन्सन का ? मी विचारले.
“समजत नाही. पण त्यांच्या औषधाचा काहीतरी विचित्र परिणाम झालेला दिसतोय. ते भयंकर विचित्र वागायला लागले आहेत. काल रात्री माझ्या भावाला ते, खेळण्यातली पिस्तोल घेऊन फाटकाच्या इथे उभे राहिलेले दिसले. ते म्हणे आमच्या घराचे कुठल्यातरी दरोडेखोरांच्या टोळीपासून संरक्षण करत होते.”
“आपल्या इथे ? मी विस्मयाने विचारले. क्षणभर त्याच्या चेहर्यावर विषादपूर्ण हसू पसरले.
“हो ना ! एवढेच नाही तर माझा भाऊ तेथे पोहोचल्यावर ते त्याला म्हणाले “बरं झालं तू आलास मला जरा मदत पाहिजेच होती.
“आता कसे आहेत ते ?” मी विचारले.
त्यांना आता हॉस्पीटलमधे दाखल केले आहे. त्यांच्या खोलीत जर कोणी नसेल तर ते लगेचच पळून जायचा प्रयत्न करतात. फारच वाईट परिस्तिथी आहे त्यांची. मला सांग, ज्या माणसाला आपण आयुष्यभर जवळून बघत आलो आहोत, तो माणूस फक्त रासायनिक बदलामुळे एवढा बदलू शकतो ? काय म्हणायचे त्यांना ? कोण आहोत आपण ? कोण आहेत ते? वकील ? धावपटू का पोलीस? का फक्त मेंदू? त्याने वैतागून विचारले.
मेंदूचे रसायनशास्त्र आणि चित्त/मन यांच्यामधले नाते या सध्याच्या युगात महत्वाचे ठरत आहे. न्युरोबायोलॉजीस्ट मुळे आता मेंदूमधल्या रसायनांमधल्या बदलामुळे आपली मनस्थिती आणि हेतूही बदलत असतात हे सिध्द झाले आहे. एन्ड्रेनलीन, एन्डॉरफिन्स, डोपामाईन, सेरोटॉनीन हे शब्द आता आपल्या चांगल्याच ओळखीचे झाले आहेत. या क्षेत्रात काम करणार्या माणसांनतर आता माणसाच्या वागण्यामागे कुठल्या ना कुठल्या स्वरुपात मेंदूचे रसायनशास्त्रच आहे याची खात्रीच पटली आहे.
स्टीव्हन जॉन्सन यांनी “Mind Wide Open: Your Brain and the Neuroscience of Everyday Life.” त्याचे सार म्हणून खालील मत मांडले आहे.
“आपले व्यक्तिमत्व, (जे एकमेव आहे आणि ज्याचे एक व्यक्ती म्हणून इतरेजण मान्यता देऊ शकतात) हे मेंदूत जी वेळोवेळी रसायने तयार होतात आणि ज्या प्रकाराने तयार होतात त्यावर ठरते.” माझ्या मित्राच्या वडिलांसारख्या अनेक मनोरुग्णांच्या अभ्यासानंतर या मताला आता मान्यता मिळाली आहे. १९५० सालच्या मानसरोगतज्ञांनी जेव्हा थोराझाईन नावाच्या औषधाने अनेक मनोरुग्ण बरे केले, त्यानंतर रसायनशास्त्राचा मेंदूच्या कार्यात सहभाग या संशोधनाला बरीच चालना मिळाली. एवढेच कशाला दारु पिऊन झिंगणार्या माणसाचा आपण जर नीट अभ्यास केला तर आपल्याला हे लगेच पटेल. याचा वापर करुन जर उद्या आपला स्वभाव बदलायच्या गोळ्या मिळायला लागल्या तर आश्चर्य वाटायला नको. सायकोफार्माकॉलॉजीमधेही शक्यता पडताळून पाहिली जात आहे.
आपल्याला सगळ्यांनाच प्रोझॅक नावाचे औषध माहीत असेल. हे एक औदासिन्य दूर करायचे जालीम औषध आहे. गेली दोन दशके या औषधाने फार महत्वाची भुमीका बजावली आहे. पेशी जे रसायन बाहेर टाकतात तेच रसायन परत शोषूनही घेऊ शकतात. सेरोटोनीन हे एक संदेशवहनाचे काम करणारे रसायन आहे. मेंदूमधल्या ज्ञानतंतूच्या पेशी हे रसायन तयार करतात. याचा वापर करुन या पेशी एकामेकाम्शी संपर्क साधतात. पेशी हे रसायन त्यांच्या अवती भोवती सोडतात. हे रसायन मग प्रवास करुन दुसर्या पेशींच्या ग्रहण करणार्या जागांना चिकटतात आणि त्यांना संदेश देतात किंवा ज्या पेशींनी हे तयार केलेले आहे त्याला पण परत चिकटते. या पेशी ते रसायन ते पुढच्या वापरासाठी परत शोषून घेतात. या क्रियेला re-uptake असे म्हणतात. या स्वशोषणामधे आणि दुसर्या पेशींना जाऊन चिटकणे, यामधे एक सुवर्णमध्य साधलेला असतो. काही औषधे हे स्वशोषण थांबवतात ज्यामुळे संदेशवहनासाठी जास्त सेरोटोनीन उपलब्ध होते. हे औषध वापरुन औदासिन्य दूर करता तर येतेच पण बरेचजण हे औषध जरा 'जास्तच' बरं वाटावं म्हणूनही करतात. याचा हा वापर योग्य आहे का नाही हा वादाचा मुद्दा आहे. पण प्रोझॅकचा खरा उपयोग हा काही आजारात महत्वाचा आहे हे मात्र निर्विवाद.
क्रॅमरने त्याच्या “Listening to Prozac” पुस्तकात रोग्यांचे प्रोझॅक घेतल्यानंतरचे अनुभव नमुद केले आहेत.या अनुभवाबद्दल लिहीतांना त्यांनी म्हटले आहे की प्रोझॅक घेतल्यावर त्यांच्या चित्तवृत्ती उल्हसित तर झाल्याच पण त्यांच्या व्यक्तिमत्वात जाणवण्याइतपत बदल झाला होता. अशाच एका स्त्रीबद्दल, तिचे नाव टेस, त्याने लिहीले आहे की या बाईचे औदासिन्य तर दूर झालेच पण ती अधिक आनंदी, मित्रमैत्रिणी जोडणारी, हसतमुख, कटकट न करणारी झाली. एवढेच नाहीतर तिच्या कार्यालयीन कामात अधिक कार्यक्षम झाली. तिचे हे व्यक्तिमत्व जवळजवळ सहा महिने टिकले. क्रॅमरने जेव्हा तिचे प्रोझॅक बंद केले तेव्हा ती परत हळूहळू आपल्या मूळ स्वभावाकडे परतली. हे लक्षात आल्यावर क्रॅमरला तिचा प्रोझॅकचा डोस परत चालू करायला लागला. दुसरी एक मनोरुग्ण, जिचे नाव ज्युलिया होते तिचा आजारही बरा झाला आणि तिच्यातही असाच चांगला बदल झाला. जेव्हा क्रॅमरने तिचा डोस कमी करायचा प्रयत्न केला तेव्हा दोनच दिवसांनी तिचा फोन आला. ती म्हणाली “मला अत्यंत निराश वाटते आहे. आत्महत्या करावीशी वाटते. मला आताशा सारखा राग येतो आणि माझ्या लोकांकडून अपेक्षा अवास्तव वाढल्या आहेत. मी रात्रीच उठून घर आवरायला काढते आणि जे शेवटचे वाक्य तिने म्हटले तेच टेसनेही म्हटले होते “ मी मीच राहिले नाही”
क्रॅमरच्या या लिखाणावर भाष्य करताना त्याच्या पुस्तकात (The Future of the Self) एंडरसन म्हणतो “क्रॅमरने ज्या रुग्णांबद्दल लिहीले आहे त्या सर्व रुग्णांची अशी ठाम खात्री होती की प्रोझॅक घेतल्यावर त्यांचा जो स्वभाव झाला होता तोच त्यांचा मूळ स्वभाव आहे. मग त्यांचे खरे व्यक्तिमत्व कोणचे? आणि ते कोण ठरवते ? क्रॅमरला, ज्याने हे लिहीले त्यालाही हे कोडे उलगडलेले नाही. म्हणुन तो विचारतो “जर मेंदूतले छोटेसे बदल आपल्यात एवढे बदल घडवतात तर आपल्या व्यक्तिमत्वातील बदलांवर आपल्या मेंदूचा ताबा नसतो असे म्हणण्याचे धाडस आपण कसे करणार ? या सगळ्या अभ्यासातून हे सिध्द होण्याच्या मार्गावर आहे की आपण आपल्या मेंदूचीच एक फलोत्पत्ती आहोत.”
इजा पोहोचलेल्या मेंदूचा अभ्यास (split brain) आणि मज्जातंतूंचे रसायनशास्त्र याचा मेळ घातला तर मेंदू आणि मन यांच्यातील दृढ संबंध स्पष्ट होतो. नवनवीन छायाचित्रणाची परिभाषा वापरुन ज्या काही त्रुटी राहिल्या आहेत त्या भरुन काढायचा प्रयत्न चालूच आहे. मेंदूच्या विविध भागातील रक्ताभिसरणाचा अभ्यास करुन आणि PET,SPECT,fMRI या आधुनिक तंत्रांचा वापर करून मेंदूच्या विविध भागाम्चे सर्वेक्षण केले गेले आहे. या तंत्राचा वापर करुन शास्त्रज्ञांनी मेंदूमधील जवळजवळ बारा केंद्रे फक्त संभाषणासंबंधी आहेत हे शोधून काढले आहे. तीसहून आधिक ही दृष्टीसंबंधी शोधून काढली आहेत. एवढेच काय एक केंद्र उभ्या रेषांचे आहे तर एक फक्त आडव्या रेषांसाठी आहे. हालचाल टिपण्यासाठी एक तर निळ्या रंगासाठी एक आहे. चेहरा ओळखण्याची क्रियातर फार गुंतागुंतीची आहे. आपला विश्वास बसणार नाही पण काही चेहयाच्या प्रतिमा एका विशिष्ठ कोनात दाखवल्यावरच काही मज्जातंतू प्रकाशमान झाले असे आढळून आले आहे. आपल्या मेंदूत आपल्या आजीसाठी एक खास केंद्र असल्याचाही संशय आहे.
पुढे चालू........
जयंत कुलकर्णी.
भाग ६ समाप्त.
प्रतिक्रिया
4 Jul 2010 - 10:36 am | तिमा
जयंतराव
ही लेखमालिका अतिशय सोप्या भाषेत लिहित असल्यामुळे अत्यंत उत्कंठावर्धक व वाचनीय झाली आहे. प्रत्येक भागाची आम्ही वाट पहात आहोत.
उद्या आपला स्वभाव बदलायच्या गोळ्या मिळायला लागल्या तर आश्चर्य वाटायला नको.
'स्वभावाला औषध नाही ही ' म्हण मग कालबाह्य ठरेल. तसेच अतिरेकी वा वाईट वृत्तीचे लोक यामुळे बदलता आले तर किती चांगले होईल.
मेंदूतल्या रसायनशास्त्राच्या विवेचनावरुन अशी शंका आहे की पूर्वी 'तुम्ही जे खाता त्याप्रमाणे तुमचा स्वभाव बनतो' असे जे म्हणायचे त्यांत तथ्य आहे की काय?
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
4 Jul 2010 - 7:02 pm | मीनल
आपल्या मेंदूत आपल्या आजीसाठी एक खास केंद्र असल्याचाही संशय आहे.
मला तर वाटते प्रत्येक आप्तेष्ठांसाठी असावेत.
तो माणूस आपल्यातून गेला तरी ते केंद्र चालूच रहात असेल.
मीनल.
http://myurmee.blogspot.com/
5 Jul 2010 - 8:13 am | प्रकाश घाटपांडे
हाच प्रश्न आम्हालाही पडतो. श्रद्धा किंवा अश्रद्धा यामुळे मेंदुत बदल होतात कि मेंदुतील बदलामुळे श्रद्धा किंवा अश्रद्धा निर्माण होतात?
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.