पाऊस कधीचा पडतो

बेसनलाडू's picture
बेसनलाडू in जनातलं, मनातलं
16 Oct 2009 - 3:29 am

दुर्दैव, अस्वस्थता या आणि अशा काही संज्ञांच्या व्याख्या जडगोळा तत्त्वज्ञानाची पुस्तके, वर्तमानपत्रांतील लक्षवेधी लेख किंवा थोरामोठ्यांची टाळीबाज व्याख्याने यांतून होतच नसतात. त्या होतात स्वानुभूतीतून. म्हणजे रविवारी ग्यालरीत उभे असताना खालून जाणार्‍या कोळणीच्या टोपलीत ताजा फडफडीत बांगडा दिसावा; बांगड्याची भूक तिला द्यायच्या हाकेच्या रुपाने अगदी स्वरयंत्रापर्यंत यावी आणि अचानक आज संकष्टी असल्याचा साक्षात्कार व्हावा, हे खरे तर दुर्दैव आणि या साक्षात्कारानंतर होणारी 'कसंनुसं' झाल्याची जाणीव म्हणजे अस्वस्थता. "च्यायला!" हा उद्गार म्हणजे त्या दुर्दैवाचे, अस्वस्थतेचे उत्स्फूर्त, मूर्तीमंत, सगुण रूप. परवाच्या दिवशीचा कोसळणारा पाऊस कार्यालयातील माझ्या खुराडात बसून (नुसताच) ऐकताना पदोपदी मला हेच 'च्यायला' माझ्याच आतून ऐकायला मिळत होते.

महिनाभरापूर्वीच भारतात असताना तिथला पाऊस अंगावर झेलला होता. खरे तर भाद्रपदातला पाऊस अंगावर घेणे म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवण्यासारखे आहे. त्यातून दौर्‍यातला प्रत्येक क्षण 'मंगऽलमूर्ती मोऽरया, गऽणपती बाप्पा मोऽरया' च्या जयघोषात बुडवून घेतलेला. तब्बल चार वर्षांनंतर ऐकलेले ते 'तत्तर तत्तर तत्तर तत्तर..' कानात साठवून घेताना पावसाकडे लक्ष कधी आणि कसे द्यावे?! नाही म्हणायला दोनदा शिवनेरीने मुंबई-पुणे केले तेव्हा घाटात त्याची नि माझी भेट झाली खरी; पण ती सुद्धा एका बंद काचेच्या अल्याड-पल्याडच्या अवस्थेत. एखादा कैदी नि त्याला भेटायला येणारे नातेवाईक जसे बंद गजांच्या अलीकडे-पलीकडे भेटावेत, अगदी तसे! किंवा अमेरिकन दूतावासात व्हिसाच्या रांगेत ताटकळल्यावर बुलेटप्रूफ काचेपल्याडच्या गोर्‍या अधिकार्‍याच्या प्रश्नांची इमानेइतबारे उत्तरे देण्यासाठी उभे रहावे, तसे! फरक इतकाच, की चार वर्षांपूर्वी मी मुंबईतला पाऊस मनात कैद करून घेऊन अमेरिकेत आलो होतो; नि या वर्षी मीच त्याच्याकडे त्याचाच कैदी म्हणून गेलो होतो. ते सुद्धा कोणत्याही व्हिसाशिवाय!

घाटातला पोपटीपिवळा रंग उतरणीला लागलेल्या पावसातही आपला ताजेपणा टिकवून होता. नुकतीच पावसाला सुरुवात झाल्यासारखा. खोपोली ते लोणावळा पट्ट्यामध्ये कोसळणारे दुधी धबधबे, कड्याकपारीमधून अचानक दिसणारे फेसाळते झरे मनातही कित्येक खळखळत्या आठवणी जागे करून जात होते. अशाच एका पावसाने कधी माझी आजी माझ्यापासून हिरावली होती; आणि त्याच वेळी नव्याने ओळख झालेल्या नि कालौघात सर्वोत्तम ठरलेल्या मित्रांशी गाठ घालून दिली होती. चार वर्षांपूर्वीच्या पावसाने मातृभूमी सोडताना असे काही रौद्र रूप दा़खवले होते की हाच पाऊस आपला इतका लाडका का आणि कसा असू शकतो, असा प्रश्न पडला होता. त्यावेळी नवीकोरी पुस्तके नि दप्तरे घेऊन शाळेची धरलेली वाट, रेनकोटाची टोपी मुद्दामहून काढून भिजत घरी आल्यावर आईचा खाल्लेला मार, आले-लिंबू-वेलची-पुदिना घातलेला गरमागरम चहा, हवाहवासा वाटणारा एक चेहरा, निरोप देताना पाणावलेले आईवडिलांचे डोळे, मायभूमीतला चिखल, चौपाटी, ओल्या मातीचा वास, टपरीवरचा चहा आणि वडापाव, उद्यान गणेश च्या मागचा भजीपाव, मित्रमैत्रिणीसोबतचा भिजता टाइम् पास्, सॅन्डविच् नि कॉफी, सगळे डोळ्यांतल्या ढगांमागे सारून विमानात बसलो होतो. आणि यावेळी मात्र कोणाचीतरी आयुष्यभराची साथ, स्वप्ने, आशाअपेक्षा, जबाबदारी आणि प्रेम - सगळे सामावलेली अंगठी बोटात मिरवत! पाऊस मात्र कधीचा पडतच होता नि पडतच राहिला.

पाऊस काय फक्त रेल्वे वाहतूक नि जनजीवनच विस्कळीत करण्यासाठी असतो? छे! तो विस्कळीत करतो एक चाकोरीबद्ध राहणीमान. तुमच्याआमच्यासारख्यांचे भावविश्व खुंटवणारी घर ते ऑफिस, ऑफिस ते घर, लन्च टाइम्, जिम्, स्वयंपाक ही चौकट. पावसासोबत न जगता आल्याने झालेली एकटेपणाची जाणीव आणि पावसाशिवायच्या स्वयंसिद्ध जगण्याची मिजास. मग काहीतरी सुचते, लिहावेसे-बोलावेसे वाटते, कोणासोबत तरी बाहेर जाऊन चिंब भिजावेसे वाटते; वाटते घरी जाऊन दिवाणावर अंग टाकून हजारदा वाचलेले एखादे आवडते पुस्तक हातात घ्यावे, आवडती गझल लावावी आणि कोणतेही पान उघडून वाचायला सुरुवात करावी; उगाचच दूरच्या मित्राला फोन लावून वाफाळत्या कॉफीचा कप हातात घेऊन तासन् तास गप्पा छाटाव्यात आणि ते सुद्धा पॅशिओचा दरवाजा सताड उघडा टाकून त्यालाही फोनवर तो पाऊस ऐकवत. वाटते जमेल तेव्हढा काळोख करून कोचावर पडावे आणि कोसळणारा पाऊस नुसता कानभर साठवून घ्यावा. बोलायचे, सांगायचे तर असते पुष्कळ पण..

.. पण आउटलुक मधला मीटिंग रिमाइन्डर् त्याच वेळी समोरच्या स्क्रीनवर कडमडतो. 'डिस्मिस्' म्हणावे की 'स्नूझ इन् फाइव् मिनट्स ' वर क्लिक् करावे या विचारापर्यंत पोचण्याच्या आतच हृदयाने नकळत उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला असतो - "च्यायला!"

वावरजीवनमानराहणीप्रकटनविचारलेखप्रतिसादअनुभवप्रतिभा

प्रतिक्रिया

नाटक्या's picture

16 Oct 2009 - 3:56 am | नाटक्या

यावेळी मात्र कोणाचीतरी आयुष्यभराची साथ, स्वप्ने, आशाअपेक्षा, जबाबदारी आणि प्रेम - सगळे सामावलेली अंगठी बोटात मिरवत!

च्यायला!!! असं आहे होय!!!!!!!

छान लिहीलेस रे बेला....

- नाटक्या
(अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)

निमीत्त मात्र's picture

16 Oct 2009 - 4:24 am | निमीत्त मात्र

छान लेख आवडला. विनायक पाचलगांची आठवण आली. त्यांचे निबंधपण असेच असतात.

आले-लिंबू-वेलची-पुदिना घातलेला गरमागरम चहा

लिंबू?? अहो चहा होता की उसाचा रस? :)

आण्णा चिंबोरी's picture

17 Oct 2009 - 10:48 am | आण्णा चिंबोरी

च्यायला!!!

काही कुटुंबांमध्ये दुधाऐवजी चहामध्ये लिंबु वापरतात एवढंच म्हण्टलं होतं. प्रतिसाद उडवण्यासारखं काही नव्हतं हो त्यात!!

ठीक आहे तुम्ही चहामध्ये दुधाबरोबर लिंबु पिळा! अगदी पिवळ्या डांबीसाच्या बागेतला ईडलिंबू पिळा. ;) पण विनाकारण प्रतिसाद उडवू नका.

असो मलाही लेख आवडला. विनायक पाचलगांची आठवण मलाही आली. :)

तात्या तू रजेवर असल्याचे पाहुन मनमानी चालू आहे बघ.

संपादकाना दिवाळीच्या शुभेच्छा आणि प्रतिसाद उडवणा-या संपादकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

पक्या's picture

18 Oct 2009 - 5:07 am | पक्या

साधे साधे प्रतिसाद उडतात..संपादक चांगलेच कंपूबाज झालेले दिसतायेत. कंपूबाजांनी काहिही लिखाण केले आणि कसेही प्रतिसाद दिले तर ते मात्र खपून जातात.

बाकी निबंधातील काही वाक्ये मात्र खरोखरीच आवडली.

सुनील's picture

16 Oct 2009 - 5:01 am | सुनील

खूपच छान लेख. पावसाच्या बर्‍याच आठवणी जाग्या झाल्या!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मनीषा's picture

16 Oct 2009 - 5:48 am | मनीषा

कोळणीच्या टोपलीत ताजा फडफडीत बांगडा दिसावा; बांगड्याची भूक तिला द्यायच्या हाकेच्या रुपाने अगदी स्वरयंत्रापर्यंत यावी आणि अचानक आज संकष्टी असल्याचा साक्षात्कार व्हावा, हे खरे तर दुर्दैव आणि या साक्षात्कारानंतर होणारी 'कसंनुसं' झाल्याची जाणीव म्हणजे अस्वस्थता. .... मस्त !
पाउस आवडला .
'अंगठी' साठी अभिनंदन !!!

मीनल's picture

16 Oct 2009 - 6:55 am | मीनल

सुंदर लेखन. पुन्हा पुन्हा वाचाव असं.
मीनल.

प्रशांत उदय मनोहर's picture

16 Oct 2009 - 7:47 am | प्रशांत उदय मनोहर

सुंदर. छान. आवडला.
आपला,
(मिपाकर) प्रशांत
---------
फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे.
:?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Oct 2009 - 10:37 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>> ग्यालरीत उभे असताना खालून जाणार्‍या कोळणीच्या टोपलीत ताजा फडफडीत बांगडा दिसावा; बांगड्याची भूक तिला द्यायच्या हाकेच्या रुपाने अगदी स्वरयंत्रापर्यंत यावी आणि अचानक आज संकष्टी असल्याचा साक्षात्कार व्हावा, हे खरे तर दुर्दैव आणि या साक्षात्कारानंतर होणारी 'कसंनुसं' झाल्याची जाणीव म्हणजे अस्वस्थता. "च्यायला!" हा उद्गार म्हणजे त्या दुर्दैवाचे, अस्वस्थतेचे उत्स्फूर्त, मूर्तीमंत, सगुण रूप.

आणि

>>पाऊस काय फक्त रेल्वे वाहतूक नि जनजीवनच विस्कळीत करण्यासाठी असतो? छे! तो विस्कळीत करतो एक चाकोरीबद्ध राहणीमान.

केवळ सुरेख.... =D>

स्वगत : च्यायला, या लेखात अजून थोडी भर घालून एखाद्या दिवाळी अंकातला हा सर्वोत्तम लेख ठरला असता.

-दिलीप बिरुटे

प्राजु's picture

16 Oct 2009 - 8:40 pm | प्राजु

एका सुंदर विषयावरचा उत्तम लेख..
खूप आवडलं लेखन..
- प्राजक्ता पटवर्धन
http://praaju.blogspot.com/

स्वाती२'s picture

16 Oct 2009 - 9:00 pm | स्वाती२

सुरेख लेख.

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Oct 2009 - 9:25 pm | बिपिन कार्यकर्ते

बेला, अप्रतिम रे भाऊ... मस्त लिहिलंय. बर्‍याच दिवसांनी बेलाचे लेखन वाचायला मिळाला हा ही आनंद झालाच आहे.

बिपिन कार्यकर्ते

चतुरंग's picture

16 Oct 2009 - 9:33 pm | चतुरंग

अजून पुढे वाचायला मिळेल असं वाटत असतानाच लेख संपला!!!

बाकी पाऊस हा ऋतूच असा आहे की जो सगळ्यांच्या आयुष्यात अनेक चांगल्यावाईट आठवणी रुजवून आणतो आणि त्यांची साथसोबत आयुष्यभर करत राहतो!

(भिजलेला)चतुरंग

श्रावण मोडक's picture

16 Oct 2009 - 9:43 pm | श्रावण मोडक

छान लेख. आवडला.

एक's picture

16 Oct 2009 - 10:31 pm | एक

८ वर्षांपुर्वी अगदी याच अनुभवातून गेलो आहे त्यामुळे रिलेट करू शकतो..

तेव्हा पासून पावसाळा आवडीचा ऋतु झाला.

-एक

आण्णा चिंबोरी's picture

16 Oct 2009 - 11:08 pm | आण्णा चिंबोरी

एक, नाटक्या ह्या बेलाच्या मित्रांना लेख आवडलेला दिसतोय. मलाही आवडला.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Oct 2009 - 11:16 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

लेख आवडला... खूपच!
'अंगठी'बद्दल दोघांचं अभिनंदन आणि मनापासून शुभेच्छा!

अदिती

यन्ना _रास्कला's picture

17 Oct 2009 - 10:27 am | यन्ना _रास्कला

कालजाला हात घात्लात व्हो.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
न येसा रावन आनी येसा हनम्या. हनम्या रावनाला बघुन क बोल्तो माहितीयेका. का र ए बायकाचोर, दुस्र्याच्या बाय्का पलवतस. देउ का तुला पोकल बाम्बुचे फट्के देउ का. सोर्तोस कि नाय वैनीला सोर्तोस कि नाइ.

सहज's picture

17 Oct 2009 - 10:35 am | सहज

छान लेख

धनंजय's picture

18 Oct 2009 - 6:15 am | धनंजय

लेखाने पुन्हा लहान वयात नेले.

गोव्यातल्या मुसळदार पावसाची आठवण मनाला चिंब करते.