एक कर्मयोगी रामदास

भास्कर केन्डे's picture
भास्कर केन्डे in जनातलं, मनातलं
6 Aug 2009 - 7:24 pm

बालवयापासून कौटुंबिक जबाबदार्‍या, काबाडकष्ट करून घेतलेले शिक्षण आणि पुढे नोकरी व एकत्रित कुटुंबासाठी वाहून घेतलेले जीवन हा आपल्या मध्यमवर्गीय कुटुंबप्रमुखाच्या जीवनाचा लेखाजोखा. यात कितीतरी मूक यातना, क्षणोक्षणी उराशी बाळगलेली परंतू कधीही पूर्ण न झालेली स्वप्ने, समाजाबरोबरच आप्तस्वकियांकडून झालेला मानसिक त्रास असा प्रचंड गाळ साचलेला असतो. या गाळात रुतून धीर खचलेल्या मनाने व क्षीण बनलेल्या शरीराने मग हा मध्यमवर्गी कुटूंब प्रमूख काळाशी तडजोडी करत उत्तर आयुष्याला खंगलेल्या अवस्थेत सामोरा जातो. त्यातही काही शारीरिक व्याधींचा ससेमिरा लागलेला असेल तर विचारायलाच नको. त्यात समाजही टिपण्ण्या टाकायला लागतो... "खूप कष्ट केलेत हो, आता थकलेत ते", "आता काय राहिलय? मुलं-मुली आपापल्या संसारात लागलेत. यांचं काम यांनी केलंय, आता सगळं भगवंताच्या हाती". आणि या अशा तिन्हीसांजेला कोणाला सुद्धा या पिकल्या पाणाच्या मनात राहून गेलेल्या स्वप्नांच्या ठाव-ठिकाणांची कल्पनाही नसते.

मात्र काही अपवाद असतात जे केवळ नातवंडासाठीच नव्हे तर पूर्ण समाजासाठीही आदर्श बनून जातात. थकलेल्या पंखात केवळ गरूडभरारी घेण्याची ताकदच नव्हे तर मनातही उमेद आहे हे ते सिद्ध करून दाखवतात. अशाच एका फिनिक्सला पाहण्याचे भाग्य मला लाभलेय, नव्हे त्यांच्या आशिर्वादाचा हातही माझ्या पाठीवरुन फिरला आहे. अशा या चिरतरुणाबद्दल लिहिणे हा सुद्धा माझे अहोभाग्यच.

दहा-पंधरा वर्षांपासून असंख्य व्याधिंनी त्रस्त असताना अन शरीर घराबाहेर पाऊल टाकायला साथ देत नसताना एखाद्या तरूण संशोधकाला सुद्धा थक्क करायला लावेल असे काही या व्यक्तिने केलय. या ऋषितुल्य व्यक्तिचं नाव उमाकंत रामदासी; आपल्या संस्कृतीनुसार माझ्यासाठी पितृतुल्य, माझे सासरे.

साधारण दहा-बारा वर्षापूर्वी मृत्यूशी झूंज देऊनही हा पठ्ठ्या सहिसलामत बाहेर आला. अजाराने शरीराकडून मुघली कर वसूल केला होता. शरीरात त्राण नसलं तरी मन मात्र अजूनही तरूणच होते. हे तरूण मन समाजासाठी काहीतरी करण्यासाठी जिद्दीने पेटून उठलेले होते. ज्या मातीत धर्म-संस्कृतीच्या रक्षणासाठी रामदास-शिवरायांपासून ते सावरकरांपर्यंत महान विभूती जन्माला आल्या त्या मातीत जन्माला येऊन किड्या-मुंगीसारखे जीवन जगणे या तरूण मनाला मान्य नव्हते. धर्म संस्कृतीसाठी काय करता येईल याच्या शोधात असताना त्यांना एक गोष्ट सापडली. बीड शहराच्या मध्यभागी बिंदूसरेच्या कडेवर एका मोठ्या उकीरड्यात आपल्या संस्कृतीचा एक मोठा वारसा नष्ट होत आहे हे लक्षात आले आणि तन-मन कामाला लागले.

साधारण एक हजार वर्षापूर्वीच्या काही समाध्या, त्यावरील शिलालेख यांचा अभ्यास होऊ लागला. जवळपासच्या शहरातील इतिहासतज्ञ, अभ्यासक, पत्रकार तसेच शहरातील मदत करु शकतील अश्या व्यक्तिंना श्री. उमाकांतराव रामदासींचे फोन यायला लागले. पुरातन पुस्तकांची पाने चाळली जाऊ लागली. बघता बघता एका ऐतिहासिक वारशाला त्याचा हक्क मिळवून देण्यासाठी समाजधुरिणांची एक फौज कामाला लागली.

दाहाव्या व अकराव्या शतकात बीड शहरात एक महान ज्ञानी योगी रहात असत. ते दुसरे तिसरे कोणी नसून संत ज्ञानेश्वरांचे, मुक्ताबाईंचे अजोबा होत. त्यांची समाधी त्या उकीरड्याखाली सापडली. तिचे हे छायाचित्र.

या संशोधनाला पुढे सरकार दरबारी मान्यता मिळाली. या चळवळीतले कार्यकर्ते, नेते व हौशा-नौशांनी मिळून या समाधिस्थळाला शहरातील इतर महान ऐतिहासिक स्थळांच्या पंक्तिमध्ये बसवण्यासाठी कार्यक्रमांची रीघ लावली.

आता तेथे मुक्ताईंची पालखी पण त्यांच्या आजोबांच्या दर्शनासाठी थांबून जाऊ लागली आहे.

आणि हे कार्य सफल झाल्याच्या आनंदात हा फिनिक्स आता नवीन भरारी घेण्याच्या विचारात आहे.

संस्कृतीधर्मइतिहाससमाजजीवनमानलेखसंदर्भबातमीअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

6 Aug 2009 - 7:30 pm | यशोधरा

किती कौतुकास्पद! अजून अधिक विस्ताराने लिहिले असते तरी आवडले असते.

ह्या आजोबांना माझा नमस्कार सांगा.

दशानन's picture

6 Aug 2009 - 7:34 pm | दशानन

असेच म्हणतो !

धमाल मुलगा's picture

6 Aug 2009 - 7:40 pm | धमाल मुलगा

माझाही नमस्कार सांगा हो!

बाकी, ही अशी आवड असणं, त्यानं झपाटून जाणं, त्यासाठी जीवाचं रान करणं...हे सगळं मुळातुनच असावं लागतं. त्याला होणारे संस्कार खतपाणी घालुन फुलवतात आणि असं काही भव्यदिव्य हातुन घडतं :)

छान वाटलं ही बातमी वाचुन. धन्यवाद भास्करराव

निखिल देशपांडे's picture

6 Aug 2009 - 7:43 pm | निखिल देशपांडे

माझाही नमस्कार सांगा हो!
अरे बापरे बिडातल्या ह्या समाधी बद्दल माहीतच नव्हते...

निखिल
================================

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Aug 2009 - 8:06 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

'दमलेय' किंवा 'कंटाळा आलाय' म्हणण्यापूर्वी आजोबांचा विचार करून पुन्हा कामाला लागेन. त्यांना माझ्याहीकडून नमस्कार सांगा.

अदिती

विशाल कुलकर्णी's picture

7 Aug 2009 - 1:24 pm | विशाल कुलकर्णी

असेच म्हणतो. आमचेही साष्टांग दंडवत !
दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती !

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

अवलिया's picture

6 Aug 2009 - 7:33 pm | अवलिया

महान विभुतीला माझे नमन !

--अवलिया

llपुण्याचे पेशवेll's picture

6 Aug 2009 - 7:42 pm | llपुण्याचे पेशवेll

सुंदर.. आडनावच रामदासी आहे तर तशी दुर्दम्य इच्छाशक्ती असणारच... माझे या महान रामदासींना प्रणाम..

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

विकास's picture

6 Aug 2009 - 7:45 pm | विकास

चांगली ओळख! अजून माहीती आणि छायाचित्रे आवडतील.

बर्‍याच दिवसांनी मिपावर आगमन असल्यामुळे वेलकम बॅक!

मन's picture

6 Aug 2009 - 8:16 pm | मन

सोलापुर ला एका तळ्याकाठी एक मंदीर आहे,
चक्क विठोबा आणि शंकर ह्यांचं एकत्रित!
ह्याचं कारण हे सांगितलं जातं की, एकदा,ते मुळात होतं शिव मंदीर.
वारीला जाणार्‍या ज्ञानेश्वरांच्या आजोबांचा मुक्काम हा तिथच पडला.
(अंधारामुळं थांबावं लागलं त्यांना तिथं.)
"एका विठुभक्तानं शिवमंदिरात थांबावं का " असा विचार त्यांच्या मनात येताच तिथल्या शिवानं त्यांना विठोबा रुपात दर्शन देउन तृप्त केलं.
परमेश्वर एकच, पण त्याची रुपं अनेक हे सांगणारी ही कथा.
वारीचा मार्ग लक्षात घेतला(बीड्-सोलापूर्-पंढरपूर) तर ह्या कथेत तथ्य वाटते.(ज्ञानेश्वरांचे आजोबा बीडाकडे राहणारे असावेत)असे वाटते.
बाकी, उत्तम माहिती.
बीडाला, भास्कराचार्यांचा एक ऐतिहासिक वाडा परवापरवापर्यंत होता, त्याबद्दल आपल्याला काही ठाउक आहे का?
पुरातत्व विभागाचं तिकडं लक्ष आहे का?
बीडाच्या कनकालेश्वराची कथा काय असावी?
बीडाची पुरातन राणी "चंपा राणी" कुक्ठल्या काळातली असावी?
चंपावती नगराला बीड्/भीर म्हणणं नक्की बहमनी काळातच सुरु झालं का?
अश्विलिंगाचं महात्म्य काय?
कपिलधार हे अति प्राचीन काळात कपिल मुनींचं(वेदांत पुर्व काळातही सांख्य तत्वज्ञान सांगणार्‍या)खरच वास्तव्यस्थान असावं का?
माहित असल्यास जरुर कळवा.

आपलाच,
बीडाकल्डा
मनोबा

भास्कर केन्डे's picture

7 Aug 2009 - 6:53 pm | भास्कर केन्डे

श्री मनोबा,

नवीन माहिती बद्दल आभार! मी तुम्हाला व्यनि मधून माझ्या सासरे बुवांचा दूरध्वनी क्र पाठवत आहे. त्यांच्या कडून तुम्हाला भरपूर माहिती मिळेल. त्यांना माहित नसेल तर ते तुम्हाला इतर जाणकारांशी संपर्क करुन देतील.

आपल्या एका प्रश्नाचे उत्तर मी अत्ता देऊ शकतो.
बीडाच्या कनकालेश्वराची कथा काय असावी?
या इथे वाचा.

आपला,
(बीडकर) भास्कर

JAGOMOHANPYARE's picture

10 Aug 2009 - 12:02 pm | JAGOMOHANPYARE

चक्क विठोबा आणि शंकर ह्यांचं एकत्रित!

त्यात आश्चर्य काय ? विठोबाच्या मस्तकावर त्याच्या टोपामध्ये शिव लिन्ग आहे, असे मानले जाते.... म्हणून तर ते एवढे उन्च आहे...

पन्ढरपूरलाही पुन्डलिक मन्दिरात शिव लिन्ग आहे ( असे ऐकले आहे, मी पन्ढरपूर पाहिले नाही.)

उमाकांत रामदासी यांना पुढील भरारीसाठी अनेकोत्तम शुभेच्छा! त्यांच्या तब्ब्येतीच्या प्रश्नांना किमान इथून पुढेतरी उतार पडावा, ही प्रार्थना.

भास्कर,

असे कार्य पाहिले की नकारात्मक विचारांखाली दडपले जाते की काय वाटायला लागावे अशा मनाला नविन उभारी मिळते. असेच आणखी लिहित रहा.

प्राजु's picture

6 Aug 2009 - 10:44 pm | प्राजु

शब्दशः फिनिक्स!!! :)
दंडवत आजोबांना!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

स्वाती२'s picture

7 Aug 2009 - 12:42 am | स्वाती२

+१
आजोबांना दंडवत.

सहज's picture

7 Aug 2009 - 9:09 am | सहज

आजोबांना दंडवत.

केन्डेसाहेबांचे पुनरागमन. आनंद झाला.

मदनबाण's picture

7 Aug 2009 - 6:59 pm | मदनबाण

आजोबांना दंडवत...
मदनबाण.....

Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa

विसोबा खेचर's picture

6 Aug 2009 - 11:59 pm | विसोबा खेचर

दंडवत....

बिपिन कार्यकर्ते's picture

7 Aug 2009 - 8:46 am | बिपिन कार्यकर्ते

धडपड्या व्यक्तिमत्वाचा उत्तम परिचय. आमचा नमस्कार सांगा. एका महान सत्पुरुषाच्या समाधीची झालेली दुरवस्था बघून वाईट वाटले.

बिपिन कार्यकर्ते

विमुक्त's picture

7 Aug 2009 - 10:05 am | विमुक्त

आमचापण नमस्कार सांगा...

स्वाती दिनेश's picture

7 Aug 2009 - 12:31 pm | स्वाती दिनेश

चांगली ओळख आणि माहिती,
स्वाती

भास्कर केन्डे's picture

7 Aug 2009 - 6:56 pm | भास्कर केन्डे

आपणा सर्वांचे प्रतिसाद पाहून मन आणखी उल्हासित झाले आहे. मी सासरे बुवांना लगेचच दूरध्वनी करून आपले निरोप कळवतो.

आपला,
(नम्र) भास्कर

क्रान्ति's picture

10 Aug 2009 - 8:17 am | क्रान्ति

मात्र काही अपवाद असतात जे केवळ नातवंडासाठीच नव्हे तर पूर्ण समाजासाठीही आदर्श बनून जातात. थकलेल्या पंखात केवळ गरूडभरारी घेण्याची ताकदच नव्हे तर मनातही उमेद आहे हे ते सिद्ध करून दाखवतात.

दिव्यत्वाची जेथ प्रचिती
तेथे कर माझे जुळती

क्रान्ति
सजदे में सर झुकाया तो मैंने सुनी सदा | कांटों में भी फूलो़ को खिलाता ही चला जा
अग्निसखा
रूह की शायरी

दीपुर्झा's picture

10 Aug 2009 - 9:51 am | दीपुर्झा

छान लिहिलस रे , आवडलं. त्यांना भेटण्याचं भाग्य लाभलेल्यांपैकी मी एक आहे ह्याचा मला खरोखर अभिमान वाट्तो :)

थोर्लेबजिराव's picture

10 Aug 2009 - 4:33 pm | थोर्लेबजिराव

Mahiti purna ani kam kryala inspiration denara lekh.