(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात. म्हणूनच तर आपण त्यांनी लिहीलेले वाचतो ना?)
आधीचे भाग येथे वाचा :
भाग एक - http://misalpav.com/node/8127
भाग दोन - http://misalpav.com/node/8138
भाग तीन - http://www.misalpav.com/node/8149
भाग चार - http://misalpav.com/node/8172
भाग पाच - http://www.misalpav.com/node/8189
भाग सहा - http://www.misalpav.com/node/8204
भाग सात - http://www.misalpav.com/node/8219
भाग आठ - http://misalpav.com/node/8233
भाग नऊ - http://misalpav.com/node/8251
भाग दहा - http://misalpav.com/node/8282
भाग अकरा - http://www.misalpav.com/node/8295
भाग बारा - http://misalpav.com/node/8309
भाग तेरा - http://misalpav.com/node/8326
भाग चौदा - http://misalpav.com/node/8349
भाग पंधरा - http://www.misalpav.com/node/8367
भाग सोळा - http://www.misalpav.com/node/8383
२८ डिसेंबर
त्या फायदे वकिलानं तीन वेगवेगळ्या केसेस करायच ठरवलंय आरक्षण घोटाळ्याबाबत. एक केस जिल्हा न्यायालयात करणार आहे, खोटी अन दिशाभुल करणारी बातमी दिली असा निराधार आरोप करुन माझी अन दैनिक बोम्बाबोम्बची बदनामी केली अशी. त्याशिवाय हायकोर्टात दोन याचिका करणार - एक सत्य बातमी छापुन घोटाळा उघडकीस आणला याचा वचपा काढण्यासाठी चौकशीचा फार्स करुन वृत्तपत्राची बदनामी केली अन वृत्तपत्र स्वातंत्र्यावर घाला घातला म्हणुन तर दुसरी याबाबत हायकोर्टाच्या मार्गदर्शनाखाली सखोल तपास करुन कारवाई करण्याचे आदेश पोलिस, अॅन्टी करप्शन अन राज्य सरकारला द्यावेत अशी मागणी करण्यासाठी. सर्व केसेसमधे माझे अन आगलाव्याचे नाव वादी म्हणुन असणार आहे, तर प्रतिवादी असणार आहेत पालिका, आयुक्त घोळे, शहर अभियंता धरसोडे, सर्व पक्षांचे नेते, लोचे अन त्याचा पार्टनर.
एकुणच बराच लीगल घोळ होणार आहे असे दिसते. फायदे वकील म्हणतोय की मुळ बातमी माझ्या नावाने छापुन आलेली असल्याने सर्व केसेसमधे माझीच साक्ष सगळ्यात महत्वाची असेल अन मला सर्व तारखांना उपस्थित रहावे लागेल. च्यायला! मग रिपोर्टिंग कधी करणार मी.
***
१ जानेवारी
परत एकदा माझ्या कामाचे स्वरूप बदललेय. ३० डिसेंबरला फायदे वकिलाने तीनही केसेस कोर्टात दाखल केल्या. त्याच दिवशी संध्याकाळी ठरले की आता माझा बराच वेळ कोर्टात जाणार असल्याने मला कॉर्पोरेशन बीट बघणे अवघड जाईल. त्यामुळे मला आता बिझिनेस बीटवर गोळे बरोबर जायला सांगितलेय. मी सरळ सांगितले, ती प्रेस कॉन्फरन्सेस, गिफ्ट वगैरेची वस्तुनिष्ठ पत्रकारिता मला जमणार नाही म्हणुन. त्यामुळे गोळे प्रेस कॉन्फरन्सेस बघणार आहे अन मी बाजारभाव वगैरे वगैरे.
***
२ जानेवारी
आज सकाळी सकाळी उठून होलसेल भाजीबाजारात अन किराणा बाजारात गेलो, या आठवड्याचे बाजारभाव घ्यायला. त्या भाजीबाजारातल्या पाटील एजंटने सरळ विचारले की पिशवी आणली नाही का? मी म्हणलो पिशवी कशाला, तर उत्तरला भाजी फुकट घरी न्यायला अन खो-खो हसला. मला वाटले थट्टा करतोय. पण नंतर किराणा बाजारातला लढ्ढा पण विचारत होता घरचा पत्ता काय? किराणा कधी भरायचाय म्हणुन. घरी आल्यावर सहज गंमत म्हणुन आईला हे सांगितले तर ती पण म्हणाली, "आता घेउन जात जा पिशवी. चांगली ताजी भाजी मिळाली तर आणायची थोडी विकत! नाही तरी इथे जवळ्पास कुठेच चांगली ताजी भाजी मिळत नाही."
***
५ जानेवारी
आज हायकोर्टात आमच्या दोन्ही याचिकांवर एकत्रित सुनावणी झाली. पहाटेच उठून आगलावेंबरोबर मुंबईला रवाना झालो. आम्हाला ऑफिसने भाड्याची कार दिली होती. फायदे वकील स्वतःच्या कारने आले. कोर्टात जोरदार आर्ग्युमेंट केले फायदेने. कोर्टाने पालिका अन सरकारला आमच्या याचिकांवर त्यांचे लेखी म्हणणे द्या असा आदेश दिला. दुपारी एक वाजेपर्यंत ऑर्डर झाली अन लगेच तिथुनच
नेटकॅफेत जावून बातमी मेल केली बाराथे साहेब अन मुख्य उपसंपादकांना. खरेतर ऑफिसमधे संध्याकाळपर्यंत पोचून बातमी लिहुन देता आली असती पण आगलावेच म्हणाले मेल कर म्हणुन. नंतर आगलावेंबरोबर जेवायला गेलो हॉटेलात तर तिथे बार होता. मग आगलावेंचा आला मूड लिटल लिटल चा. त्यांचा राष्ट्रीय कार्यक्रम चालला चांगला रात्री उशीरापर्यंत. मी आपला चकणा खावूनच भूक भागवली. तसा मी पण करतो लिटल लिटल. पण संपादकच बरोबर असल्याने गप्प बसलो. आगलावेंना त्यांच्या घरी पोचवून रात्री घरी पोचायला चांगले बारा वाजले. वर रस्ताभर आगलावेंचे राष्ट्र्गीताचे गायन ऐकुन पार डोके उठले होते. च्यायला! लिटल लिटल नेहमी लिटल लिटलच ठेवावे.
***
३ फेब्रूवारी
कंटाळा आलाय या बिझिनेस रिपोर्टिंगचा. तसे हे आरामाचे काम आहे. आठवड्याला एकदा बाजारभाव द्यायचे, रोज शेअर बाजारातले, बुलियन अन करन्सीचे भाव टेलिप्रिंटर वर येतात त्यांचे भाषांतर करायचे, झालेच तर पत्रकांवरुन दोन चार बातम्या द्यायच्या की झाले. पण त्यातच सगळा दिवस जातो. बाहेर कुठे जाताच येत नाही. मग बसतो आपला याला त्याला फोन करत. परवा तो फासळे बिल्डर सांगत होता की मंदीमुळे प्रॉपर्टी मार्केट्ची पार वाट लागलीय. लोकांकडे, विषेशतः नवविवाहित तरुणांकडे घरे घ्यायला पैसे नाहीत. त्यांना कमी खर्चाची सिंगल बेडरुमची घरे हवीत पण तशी घरेच तयार नाहीत. मंदी येण्याआधी बांधलेल्या सगळ्या इमारतीत दोन बेडरुमचेच फ्लॅट आहेत अन तेच विकले न गेल्याने बिल्डर नव्या इमारती बांधत नाहीत. त्यामुळे काही ठिकाणी दोन जोडपी एकत्र येवून दोन बेडरुमचे फ्लॅट समाईक घेताहेत. च्यायला कसे होत असेल या लोकांचे. नवीन लग्नानंतर प्रायव्हसी नको म्हणुन वेगळे रहायला फ्लॅट घ्यायचा अन तिथेपण कोणीतरी अनोळखी लोक बरोबर रहाणार. आज विचार केला ही छान बातमी होईल म्हणुन सकाळी मीटींग मधे बोललो तर आगलावेंना कल्पना एकदम आवडली. म्हणाले अशा लोकांचे इंटरव्ह्यु घे. या परिस्थितीचा परिणाम त्यांच्या सेक्स लाईफवर होतो का ते पण विचार. ऐकले अन मूडच गेला एकदम. हे म्हणजे एखाद्याच्या बेडरूममधे उगीचच डोकावणे झाले. साला आपण रिपोर्टर आहोत का दुर्बिणमास्टर? पण आपल्याला काय त्याचे, पाणी घाल म्हणले तर घालायचे असा विचार केला अन लागलो कामाला.
पण वाटले तेव्हडे सोपे नव्हते ते. च्यायला एका ठिकाणी विचारला साहेबांनी सांगितलेला प्रश्न तर दोन्ही जोडपी एकदम अंगावरच आली. घरातुन हाकलले मला त्यांनी. साला फुकट इज्जतीचा फालुदा. परत ऑफिसमधे गेल्यावर आगलावेंना सगळे सांगितले तर ते म्हणाले की जरी ही जोडपी नाजुक विषयावर बोलत नसली तरी या परिस्थितीमुळे त्यांची सेक्स लाईफ स्टाईलपण वेगळीच झाली आहे असे लिही. हे म्हणजे जरा अतिच झाले. उद्या कुणीतरी येवुन बडवायचे. शेवटी मी बायलाईन न घेताच बातमी दिली.
***
४ फेब्रूवारी
त्या फ्लॅट शेअर करणार्या जोडप्यांच्या बातमीचा मला अपेक्षित होता तोच परिणाम झाला. तीन जोडपी आली भांडत. म्हणाली जागा मिळत नाही म्हणुन आम्ही फ्लॅट शेअर करतो पण बेडरुम नाही. कचाकचा शिव्या घातल्या आगलावेंना. सगळ्यांना ऐकु येत होते केबिनमधले आवाज. बरे झाले. आगलावेला अद्दल घडली.
प्रतिक्रिया
1 Jul 2009 - 4:22 pm | घाशीराम कोतवाल १.२
तीन जोडपी आली भांडत. म्हणाली जागा मिळत नाही म्हणुन आम्ही फ्लॅट शेअर करतो पण बेडरुम नाही.
पम्या सांभाळुन रहा बाबा !!!
नाय तर लय मार खाशील लोकांचा!!!
फायदे वकिल कि लोचे वकील
पम्या तुमचे दोन वकिल आहेत कारे
कि एकच पण दोन नावांचा
**************************************************************
नकार देण ही कला असेल पण
होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)
1 Jul 2009 - 4:40 pm | श्रावण मोडक
एकदम भारीच बातमी आहे ही. पण सांभाळ रे बाबा, पेज थ्रीवर जाऊन पडायचा असल्या बातम्यांनी.
1 Jul 2009 - 4:58 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
झकास, कोर्टाची वारी झाली पण त्याबरोबर आगलाव्यांनाही तोफेच्या तोंडी जावं लागलं!
1 Jul 2009 - 4:42 pm | निखिल देशपांडे
पम्या जोरदार चालु आहे रे...
वाचतोय सगळे भाग!!!!
पण सांभाळ रे बाबा....
==निखिल
1 Jul 2009 - 7:41 pm | संदीप चित्रे
भाजी जो पर्यंत तो विकत आणेल तो पर्यंत इमानदारीत असेल नाही का?
1 Jul 2009 - 8:38 pm | प्रकाश घाटपांडे
१बीएचके खरच कळीचा मुद्दा आहे. आमच्या संकुलात १बीएचके नाहीच. आज ती गरज आहे
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.