**********************
गल्लीतल्या त्या साईमंदीराच्या पुढच्या बाजूच्या बैठया चाळीत बाजूने मोठासा नाला जातो…. सततचा बगळ्याचा वावर एखादया ओढयाला लाजवेल असा… सतत पाणी वाहत असतं निवातं….. इतकं असूनही त्या परिसरात कधीही मच्छर, डास यांचा त्रास जाणवत नाही, का तर? कारण एकच, तिथं कधीही कोणत्याही वेळी धुपारे घालणं चालू असतं. कोण करतं हे? सुंदरमहाराज. इतरवेळी मस्त शर्ट-पॅन्ट घालून स्कूटीवरुन अख्खं मुंबई शहर फिरणारे पण मग संसारासाठी रोजगार आवश्यक, त्यामुळे जशी सूर्याची पाठ फिरली की भगवी लुंगी नेसत घरात प्रवेश करत आपल्या कामाला लागतात. आजूबाजूचा दाटीवाटीचा खोल्यांचा परिसर, त्यात सुंदर महाराजाचं घरसुदधा तितकचं तोकडं. बाहेर एक खोली, आत किचन आणि मोरी, हल्लीच बाहेरच्या बाजूने दरवाजा काढत घरावरती अजून एक घर बांधल त्याला इथं ‘वनप्लस करणं’ म्हणतात, साधारण चौदा फुटाच्यावरती घर बांधण्यास कायदानुसार परवानगी नाही मात्र बांधकाम ठेकेदार पोलीसांच्या ‘ओळखी’तला असला की हा प्रश्न पडत नाही, एकूण काय तर वरती रुम केल्यापासून जरा एसपैस जागा झालीयं, आज मंगळवार असल्याकारणाने जशी संध्याकाळ झाली तशी खूपच जास्त माणसं आली होती, सुंदरबाबा घरातल्या मुख्य आसनावर येऊन बसले, एक-एक करत गा-हाणी घेवून माणसं यायला सुरवात होते. लोक यांना ‘सुंदर बाबा’ म्हणतात, तशी पाटी त्यांनी आपल्या दाराबाहेर लावून घेतलीय, त्यांच्याखाली कोणतातरी ओळखीचा मंत्र लिहिलायं, सध्या बाबाचं वय आहे पन्नासच्या आसपास, बाबांना संसार आहे, एक मुलगा शिकतोय इंजिनिअरिगं वैगेरे, मुलगी कसला तरी कोर्स करतेयं, तरीदेखील घरी जेवण बनतं, सुंदरबाबाची बायकोच स्वयंपाक करते, बाबा टिपिकल लोकांसारखं कामावर जात नाहीत, मग बाबा करतात काय? त्यासाठी तुम्हाला बाबांच्या घरात डोकावायला लागेल, यासाठी तुम्हालां जास्त त्रास घेण्याची गरज नाही, सरळ येण्या-जाण्याचा रोजचा रस्ता आणि दरवाजा नेहमी सताड उघडा असला की बसं….. कुणाच्याही नजरेस घराचा आताला भाग पडतो. सगळ्यात आधी डोळ्यासमोर दिसतो तो भलामोठा देव्हारा, त्यात सगळे देव आहेत म्हणजे त्यांच्या तसबिरी आहेत. प्रत्येक फ्रेम गंधासकट हाराने सजवलेली, यासह धुपारे अष्टोप्रहरी चालूच, त्या देव्हारासमोर केळी, संफरचंद, संत्री इत्यादी फळ सिझनप्रमाणे दिसतात पण फळांची रास नेहमीचीच, या महागडया उदबत्त्याच्या वासापायी घरात मात्र देवाचं वास्तव्य असल्यासारखं बाहेरुन आलेल्या वाटू लागतं…. काहीवेळा मात्र अगरबत्तीच्या उदीच्या उदी त्या फळावर पडतात त्यांची काळजी त्यांची बायको घेते, दोन तीन दिवसानंतर चागलं पाण्याने साफ करत सुरीने फोडी करत काही फळं प्रसाद म्हणून वाटतात…. ते ही सगळं देव्हारापाशी स्वच्छता राहावी म्हणून करते, तिला या एकूण घरात चालेल्या कोणत्याही विषयाबाबत काही वाटतं नाही….. ती ची काही एक मत नाहीत…. बाकी वर्षाकाठी दागिने, साडी यांची टिपिकल रेलचेल या ही घरात आहे, मला सुंदरमहाराजाच्या बायकोचं असं नामानिराळं असण्याचं प्रचंड कुतूहूल आहे.
**********************
रेल्वेच्या किंवा बसच्या डब्यात लिहलेल्या बंगाली बाबाच्या रेसमध्ये हे नक्कीच प्रचारात कमी पडले असणार, हो, हेच ते तांत्रिक. आणि विभूतीने मानसिक आजार बरें करणारे, गा-हाणी मिटवणारे मराठी तळकोकणवासियं मुंबईस्थित बाबा, बाबा सुंदर….. म्हणजेच सुंदरबाबा. बाबाच्या घरी रोज संध्याकाळी फार मोठया प्रमाणावर लोकांची रेलचेल असते, साधारण शुक्रवार ते रविवार बहुतेक जण भजन करणारें असतात, सुंदरबाबा भजन म्हणत नाही पण त्यांना कळत थोडं-थोडं….. बाबांचा मुलगा इंजिनिअरिंगसोबत तबला-नाल वाजवण्याचं काम करत तिथल्या बाकी लोकांना साथ देतो. भजनात ही मंडळी गुंतली की मग रात्रीचे अकरा-साडेअकरा वाजतात, त्यानंतर दर गुरुवारी मोठी आरती होते, त्या आरतीचा आवाज समोरच्या साईबाबांच्या आरतीला संमातर जोडला जाईल यांची काळजी घेत आवाज वाढवत, टाळावर टाळ जोरात आपटले जातात, धुपावर धूप टाकले जातात निखा-यावर, अख्खं घर धूपाने भरुन जातं, कधी कधी वाटतं खरचं देव येईल या सा-या धुरातूनं बाहेर, सोमवारी पुन्हा गजर असतो, या सगळ्यात दररोज दुपारी देव्हा-यासमोर नैवदयाचं ताट ठेवलं जातं आणि ते ही केळ्याच्या पानातचं वाढलं जातं….. पाच मिनिटं झाली की तेच ताट बाबा घेतात, जेवतात, जेवणं आटपल्यावर केळ्याचं उष्ट पान बाहेर ठेवतात….. त्यातले काही घास खाण्यासाठी न चुकता एक कुत्रा येतो, बाबा मस्त ढेकर देत दुपारचे झोपी जातात, या राहणीमानापायी बाबांना मस्त पोट सुटलयं, दाढी फार पूर्वीपासून वाढवलीय त्यामुळे ते अध्यात्मिक दिसण्यास मदत होते, याशिवाय रुदाक्षाची माळ वैगेर आहेच, या सगळ्यात महत्तवाचा दिवस असतो मंगळवारचा, उजाडतो मंगळवार. तो महत्वाचा दिवस. या दिवशी बाबाच्या बायकोला पण सकाळी लवकर उठावं लागतं, फार लगबग असते, सकाळपासूनच घरचे सगळे संध्याकाळ व्हायची वाट बघतात, मुलगा आणि मुलगी यांना यांची सवय झालीय. दाराबाहेरच्या चपला वाढत जातात, आज जास्तीसाठी म्हणून अगरबत्याचां बॉक्स काढला जातो, माचीस मागवल्या जातात, धुपारे अंगारे बनवण्यासाठी सामान काढून ठेवलं जातं, गर्दी वाढतच चाललीय, या सगळ्यात सुंदर बाबा तिथंच आल्या-गेल्याची विचारपूस करत असतात, मग नंबर लावले जातात म्हणजे काय तर या गा-हाणी असलेल्या मंडळीना आपले प्रश्न सुंदरबाबाकडे मांडता यावेत यासाठी, हे काम नेहमी भजन करायला येणा-या मंडळीपैकी कुणीतरी करतो, तो तिथल्या रजिस्टर वहीत नाव लिहतो त्यालाही काही दक्षिणा भेटतें त्या सेवेखातर, तिथं सुंदरबाबा आसानवर बसतात तिथेचं एक पैशाची चौकोनी पेटी असते तिथं गा-हाणी मागायला आलेल्या मंडळीनीं आपल्या मर्जीनुसार पैसे टाकावेत ही प्रामाणिक इच्छा. यात साधारण लोक वीस, तीस, पन्नास रुपये पहिल्या भेटीत टाकतात, ज्यांना सुंदरबाबाच्या सल्ल्याचां, अनुभूतीचा प्रत्यय आलायं अश्याकडून रक्कमेचा आकडा वाढत जातो. शनिवारी रात्रीचे एक सुदधा वाजतात इतकी लोकं येतात, पार बदलापूरपासून पण….. यात जास्तकरुन मालवणी, कोकणी माणसं जास्त, घाटावारचा माणूस कमीच….. यातून सुदंरबाबाना महिन्याकाठी पन्नासएक हजार रुपये मिळतात. मागच्या अनेक वर्षापासून यातूनच घर चालतं, हल्ली तर ओघ वाढतचं चाललायं. आजही मंगळवार, तशीच खूप सारी माणसं आलेली, दाराबाहेरच्या चपल्यानां काही सीमारेषाच उरली नव्हती.
**********************
हया गा-हाणं सांगायला आलेल्यापैकी काही प्रकरण थोडक्यात खालीलप्रमाणे:
- रमाकांत करटले – जन्म मुक्काम पोस्ट कोकणातलं एक खेड. अख्खी हयात लालबागच्या पेरुच्या चाळीत भाडयाने जगण्यात गेली, आता इथं या एरियात राहतात तो सुदधा रुम भाडयाने, यांना एक जिवंत भाऊ, अजून एक भाऊ तो वारला. रमाकांत करटले यांच्या म्हण्यानुसार, त्यांच्या सध्या जिंवत असलेल्या भावाने त्या वारलेल्या भावाला घरात भानामती करुन मारुन टाकलयं, आणि आता त्याचं पुढचं टारगेट रमाकांत आहेत, हल्ली रमाकांतच्या पोटाच्या आसपास प्रचंड कळा मारतायतं, हे सगळे त्या जिंवत भावाने केलेल्या भानामतीचे प्रताप आणि याशिवाय रमाकांत पोटाच्या दुखण्यावर उपाचार म्हणून डॉक्टरकडे ही जाऊनं आला, हो डॉक्टरने रमाकांतला ताबडतोब भरती व्हायला सांगितलयं, रमाकांतला भरती होण्याअगोदर आपल्या भावाचा काटा काढायचायं, किमान त्याला प्रत्युत्यर दयायचं, त्यालाही असाचं काहीतरी आजार झाला पाहिजे यासाठी तो सुंदरबाबाकडे आलायं…
- रुपाली बापसके – नवीनच लग्न झालयं, हीला रात्रीची भयानक स्वप्न पडतात आणि कोणतरी हिचा गळा दाबतोय असं सारखं वाटतयं, हीची सासू हिला इथं घेवून आलीयं, सासूला वाटतयं की लग्नात कुलदेवतेचा विढा काढायचा राहिलायं म्हणून असं, तिला हेच कारण आहे का जाणून घ्यायचयं.
- संगिता सपरबारे – अजून एक स्त्री. वय बच्चेचाळीसच्या आसपास, हिच्या अंगात हिची आत्या येते आणि हिच्या घराच्यांना बघून घेण्याची भाषा करते, हिच्यासोबत तिचं अख्खं कुंटूब आलं होतं, हिच्या आत्यानं फार वर्षांपूर्वी प्रेमप्रकरणात आत्महत्या केली अशी लोकं बोलतात पण आपआपसात सांगतात की तिला घरच्याचं लोकांनी मारलं म्हणून. संगिताला काही तरी होत असल्याचा भास होतो, ती स्थिर होते एका क्षणाला आणि बडबडायाला लागते जोरजोरात, परत दुस-या क्षणाला तिला चक्कर आल्यासारखं होतं जमिनीवर पडते. आत्याची स्टोरी पार डोक्यात आतपर्यन्त गेलीय संगिताच्या.
- मधू चिरमंडे – त्याला ‘वस्तू’ हवीयं. सुंदरबाबा असल्या वस्तू देतात, वस्तूने काय होतं तर तुमच्या घरात भरभराट होते, फक्त ती वस्तू कोणालाही नजरेस पडणारं नाही अश्याजागी ठेवायची, वरुन तिला अमावास्या पौर्णिमेला बाहेर काढतं कुलदेवतेचं नाव घेतं हळद कुंकू घालायचं, यात कोणताही खंड पडू दयायचा नाही, आणि पडला तर! …… तर विपरित होईल! मधू चिरमंडेला तसंच वाटतयं की त्यांच्या वडीलांनी अशीच एखादी ‘वस्तू’ आणली होती पण त्यांच्या वडीलाचां हल्लीच हार्टअटॅकनें मृत्यु झालायं, मधूला त्यांच्या वडिलाच्यां तोंडाला लावलेल्या मास्कमुळे ही गोष्ट विचारता नाही आली यांची खंत आहे, जसे मधूचे वडील वारले तशे पंधरा दिवसाच्या आत मधू चिरमंडे यांच्या घरावर पोलीसांनी धाड टाकली आणि आयकर खात्यांच्या चौकशी सुरु झाल्या, त्यांची बॅक खातीसुदधा सील झालीयतं.
- नितीन बाबल – प्रचंड कुतूहूल आहे सुंदरबाबांबदल, नितीन पहिल्यादाचं भेटतोय त्यामुळे असेल कदाचित. “काय देणार…. उदीच ना, बघूयात काही फरक पडतो का आयुष्यात…” इत्यादी….पॅन्टीच्या मागच्या खिश्यातून वरच्या खिश्यात वीसची नोट काढून ठेवलीय…
**********************
संगिता प्रकरण सुरु होतं, बाबा आसनावरुन उठत वेताची काठी घेतात आणि सपासप मारतात….. ती तरीसदुधा बधत नाही, ती आतली ‘आत्या’ पार सुंदरबाबावर खेकसू लागते. बाबा संगिता प्रकरण गंभीर असल्याचं सांगतात आणि नंतरच्या पुढच्या आठवडयाचा अमावास्येचा एक वार देतात. सध्यापुरती एक उदी देतात. ती संगिता तिथंच पडते, ती भानावर येते, तिच्या अंगावर वेताच्या काठीचे वळ असतात. त्या नितीन बाबलला सुंदरबाबा पावतात तो आणखी चार लोकांना घेवून येतो, मधू प्रकरणात बाबा एक नवीन वस्तू देतात आणि हो वापस सगळं सुरळीत होतं, बॅक सील काढून टाकते, मधू मस्त उत्तम सटिगं करत त्यांच्या बाबाचं आतलं प्रकरण इनकम टॅक्स अधिका-यांशी बोलून मार्गी लावतो…. अशी बरीच लोकांची…. बरीच प्रकरणं….
**********************
मुंबईतल्या या दाटीवाटीच्या परिसरात हल्ली एसआरए स्कीममध्ये इमारतीत घर भेट असताना सुंदरबाबानी ते नाकारलं…. सगळं फायदयात असताना कारण काय तर या जागेत लक्ष्मी आहे असं त्याचं म्हणणं…..
**********************
बहुतेक जण येणारे हे देव-देवस्की, देवपान, करणी, उदीच्या जिवावर दुस-याचं वाईट करणारे, एखादी वस्तू मागून त्यांने घरात भरभराट आणणारे, आपल्या पाठीमागे काहीतरी भंयकर पीडा आणि साडेसाती लागली असल्याकारणाने आणि ती लावण्या-याचां माग काढण्यासाठी, आपलचं भल्लं होण्यासाठी, रात्र अपरात्री पडलेल्या स्वप्नाचा अर्थ समजवण्यासाठी, अचानक मेलेल्या नातेवाईकासाठी, मेलेल्या माणसांची इच्छा जाणून घेण्यासाठी, योजलेल्या कामात यश येण्यासाठी, घेतलेला निर्णय योग्य असेल का हे जाणून घेण्यासाठी, एखादयाच्या मानगुटीवरुन भूत उतरवण्यासाठी…..
**********************
तिथं आजूबाजूच्या लोंकाना इतक्या वर्षाच्या अनुभवामुळे काहीच नवल वाटत नाही, कोणीच तक्रार केली नाही, सगळे घाबरतात की उदया सुंदरबाबानी त्याचं, त्यांच्या कुंटूबाचं वाईट केलं तर….बाबा खूप पावरबॉज आहे……
**********************
जवळच एक नव्याने नगरसेवक झालेल्यांने वाय-फाय लावून दिल्यापासून पोरं तिथं कल्ला करत असतात बाकी त्यांनाही यांच काही वाटत नाही, पण हल्लीच एकाने रिकामटेकडेपणाचा उदयोग म्हणून हे तिथं चालू असलेलं भूत उतरवण्याचं प्रकरण शूट केलं मोबाईलच्या कॅमेरात आणि टाकलं नेटवर आणि काय व्हायचं…. सुंदरबाबा रातोरात फेमस झाले…. कायदयानुसार बाबानां आपली दुकानदारी बंद करावी लागली असेल असं तुम्हाला वाटेल पण तसं नाही झालं…. आता पूर्वीपेक्षा मोठया लांबच लांब रांगा लागल्या….पूर्वी बदलापूर-विठठलवाडीपासून येणारी लोक आता पार दूर दूर महाराष्ट्रभरातून येऊ लागलीयतं….. बाबांच्या मिडियाने मुलाखती घेतल्या….. एरियाचा डिमांड वाढला…. पुढील काळात “बिग बॉस”मध्ये दिसण्याचे चान्सेस वाढलेत….
**********************
अंधश्रदधा निर्मूलन कायदा वैगेरे सगळा भंपकपणा असतो, इथं कायदा वैगेरे तोडला जातोय असं कुणालाही वाटत नाहीय. नासा मंगळावर माणूस पाठवण्याच्या तयारीत असताना आपण माणसाला ‘माणूस’ म्हणून तयार करण्यातच वेळ घालवतो हे बघून वाईट वाटत.
**********************
-लेखनवाला
( All Copyrights with The writer . Permission from the writer is mandatory before publishing the article or the part thereof . Not to be shared in quotes , or paragraphs . If shared online, must be shared in totality . )
प्रतिक्रिया
4 Aug 2020 - 5:21 pm | गामा पैलवान
लेखनवाला,
तुमची व्यथा पोहोचली. तुम्ही म्हणता की :
कायद्याचं असंय की तो सरकारी खाक्या आहे. त्याला लोकांच्या समस्या समजंत नाहीत. लोकं अडलीनाडली आहेत, निराश आहेत. त्यांना आधार कोण देणार? लाचखोर अधिकारी? की भ्रष्ट लोकप्रतिनिधी?
लोकांना सुंदरबाबा आधार देतो. मग कायद्याला कशाला विचारायचं? तसंही पाहता लोकांना कायदा ही पाळण्यापेक्षा मोडण्याची गोष्ट जास्त वेळा दिसते. कायद्याची ताकद तो राबवणाऱ्याच्या नैतिक पातळीइतकीच असते. कायदा राबवणारे हातंच जर अनैतिक घाणीनं बरबटलेले असतील तर कोण कायद्याला भिणार?
आ.न.,
-गा.पै.
4 Aug 2020 - 5:27 pm | चौथा कोनाडा
रोचक कहाणी, सामान्य लोकांना असल्या सायकॉलॉजिस्टची गरज असल्यानं अश्या बाबांकडे तुडुंब गर्दी असणारच !
बाबा फार मोठं लफडं करत नाहीत तो पर्यंत ते सेफ आहेत !
हे वाचताना अनिल अवचट यांचे धार्मिक हे पुस्तक आठवले !
लेखन नेहमीप्रमाणेच सुंदर !
4 Aug 2020 - 6:46 pm | Rajesh188
अशा ठिकाणी केली जाणारी वातावरण निर्मिती चे योग्य वर्णन केले आहे.
बाहेरून आलेला व्यक्ती हे वातावरण बघूनच भारावून जातो.
आपण फसले जात आहोत हे त्यांना जाणवत नाही.
किंवा प्रतेक बाबा फसवतच असतो असे पण नाही.
नक्की का लोक अशी वागतात ह्याचे उत्तर अजुन तरी स्पष्ट नाही
4 Aug 2020 - 8:34 pm | बोलघेवडा
एकदम चित्रदर्शी लिखाण!!! अजुन येऊदेत सर.
4 Aug 2020 - 9:26 pm | कंजूस
बाबा सांगतो ते त्यांना पटतय, आर्थिक भरभराट होतेय, कटकटी मोडतात, मग आम्ही का बरं त्यात कोलदांडा घालावा?
बाकी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा काय आहे? कलमं काय आहेत?
4 Aug 2020 - 10:21 pm | सनईचौघडा
हे असं केल्याने नोकरी ची गरज नाही मागे मिपावर याविषयी चर्चा झाली होती. सगळ्यात आरामात मस्त पैसे कमवुन देणारा चांगला बिझिनेस आहे हा असं आमचे मुवि (अ.भा. मध्य. डोंबी. चे संस्थनिक) म्हणात होते.
सध्या त्यांचा मिपावावर कमी झालाय तेव्हा बघा बरं आमचे मुविच असे अवतार घेवुन नाही ना प्रकट झालेत ते.
4 Aug 2020 - 11:08 pm | Prajakta२१
पुण्यात पण एक बाई आहेत अशा
महादेव भक्त आहेत त्यांची प्रश्नांसाठी मदत घेण्यापूर्वी जर घरात दत्तगुरु ,स्वामी समर्थ यांचे काही असेल तर ते बंद करावे लागते (नाहीतर त्यांना घरातला प्रॉब्लेम दिसत नाही )आणि काही नसेल तर समस्येवर उपाय सूचवतात
5 Aug 2020 - 1:39 pm | चौथा कोनाडा
जर घरात दत्तगुरु , स्वामी समर्थ यांचे काही असेल तर ते बंद करावे लागते
हे सगळे त्यंन्च्या विरोधी पक्षातले असणार !
सर्व देवः नमसकारां, केशवं प्रति गच्छती !
10 Aug 2020 - 4:02 am | रातराणी
जबरदस्त लिहिलंय!