तत्वा, तुझी किंमत बघ!
तत्वा, तुझी किंमत बघ शून्य झालीय आता
जनता तुला टाकूनच धन्य झालीय आता
चोरी, लबाडी यांच्या वाटा गजबजल्यात सार्या
सत्याची तर वर्गवारी 'अन्य' झालीय आता
आपली झोळी भरत जावं अगदी मनोभावे
जावो बाकी खड्ड्यामधे आपण सुखी रहावे
कर्माची ही नवी व्याख्या मान्य झालीय आता
आदर बिदर लाड झाले, विचारणंही खूप
आपलं अडल्यास बोंबाबोंब बाकी चिडीचूप
वागण्याची ही तर्हाच 'सौजन्य' झालीय आता
कोण तो लाकूडतोड्या सांग त्याचे काय झाले
आज इतिहासातले आदर्शही ते चूक ठरले
माणसांची ती प्रजाती 'वन्य' झालीय आता