प्रकाश...
बघता बघता दिवाळीची सुट्टी संपली. पंधरा दिवस शेवरीच्या कापसासारखे भुर्रकन उडून गेले. नाहीतर शाळेतला एक तास एका दिवसासारखा, संपता संपत नाही. त्यात मधल्या सुट्टीनंतर रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र अशा किचकट विषयांचा तास असेल तर जास्तच कंटाळा येणार. हातात घड्याळ नसल्यानं किती वाजलेत समजायचं नाही, म्हणून खिडकीतून वर्गात डोकावून पाहणाऱ्या सूर्याच्या किरणांची खूण ठेवायचा प्रयत्न केला, पण सूर्यमहाराज कधी वेळेवर नसायचे.