आठवणींच्या जंगलात-१

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जनातलं, मनातलं
12 Jul 2022 - 1:26 pm

खाटेवर पडताच भूल दिल्या सारखी क्षणात झोप लागली......पुढे....

http://misalpav.com/node/50393/backlinks
वाचकांचे, प्रतीसादकांचे धन्यवाद.

काश्मीर खोर्‍यातील व सीमावर्ती भागातील भुमीपुत्रांना प्रतिकूल परिस्थितीची सवय आसते. सैनिकांना मात्र सर्वथा नवीन वातावरण,स्वतःला प्रकृतीशी मिळते जुळते घेताना विषम परीस्थीतीला तोंड द्यावे लागायचे/लागते. खास करून जेव्हां कडाक्याच्या थंडीत या भागात बदलून येतात त्यांना जास्त त्रास होतो. मी डिसेंबर मधे रिपोर्ट केला होता. "सर मुंडाते ही ओले पडे". &#128578 चाळीस वर्षा पुर्वीची आव्हाने काय होती आणी आता त्यात काय बदल झाला आहे हे बघण्याचा प्रयत्न या लेखात करूयात.

जरा थोडे मागे जाऊयात.जम्मू परागमन शिबीरातून उधमपुर पहिला पडाव.दोन आडीच तासाचा प्रवास,अवघे पासष्ट कि मी चे अंतर. कागद कारवाई,रोल काॅल,विषेश सुचना करता करता दहा वाजले निघायला. थंडीच्या दिवसात श्रीनगर लेह रोड बर्फवॢष्टी मुळे बंद म्हणून या क्षेत्रात जाणारे चंदिगढ वरून विमानाने जायचे.जम्मूला त्या कालावधीत गर्दी कमी.बाकीच्या दिवसात मात्र जास्त. संपुर्ण काश्मीर खोर्‍यात तैनात आसलेले सैनिक जम्मूतूनच पुढे जा ये करत.परागमन शिबीरात रिपोर्ट करणे प्रत्येकाला अनिवार्य होते, सिव्हिल अथवा प्रायव्हेट वाहानाने प्रवास करण्यास परवानगी मनाई होती. आतंकवादी गतीविधी मुळे आणखीनच सक्ती करण्यात आली. एखादा दोन दिवसच रहाणे पण कष्टदायक,आशातच जरा जास्त बर्फ किवा लॅन्डस्लाईड मुळे रस्ता बंद झाला तर मग विचारूच नका. सध्या अमरनाथ यात्रेकरूंचा जथ्था जम्मूत थांबवला आहे त्यांचे कष्ट दूरदर्शनवर दाखवत आहेत त्यावरून कल्पना येईलच. परागमन शिबीरात सेनेच्या सर्व विभागाचे सैनीक येतात त्यामुळे बरेच काही नवे शिकायला मिळते. त्याचा उपयोग कुठे ना कुठे नक्कीच होतो. आपण अपारंपरिक प्रशिक्षण म्हणू या.

जम्मू वरून गाड्यांचा काफीला उधमपुरच्या दिशेने निघाला. प्रत्येक गाडीत वीस जवान व त्यान्चे सामान. बिक्रम चौकात पोहचल्या वर प्रत्येक फौजीने चौकातल्या पुतळ्याला गाडीतुनच अभिवादन केले.गाड्या तवी नदीच्या दिशेने रवाना झाल्या.

मित्रांनो, हा पुतळा लेफ्टिनेंट जनरल बिक्रम सिह यांचा.या भागातील नागरीक व फौजी दोघांच्याही मनात त्यांना आजुनही विशेष स्थान आहे.लोकप्रिय निष्ठावान,कर्मठ सैनिक,शत्रूचा कर्दनकाळ तर मिंत्राचा सच्चा साथी.जुने वयोवृद्ध, नागरीक आपले अनुभव सांगताना जरूर म्हणायचे आसा जनरल होणे नाही.त्यांचा पुंछ क्षेत्रात हेलीकॉप्टर मधून पहाणी करत आसताना आपघाती मृत्यू झाला. त्यांच्या बरोबर पाच आणखीन वरीष्ठतम सेनानायकांचा पण मृत्यू झाला. अंत्यविधीला सर्व जम्मू शहर स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते.

कबीरा जब हम पैदा हुए, जग हँसे हम रोये,
ऐसी करनी कर चलो, हम हँसे जग रोये

लेफ्टिनेंट जनरल बिक्रम सिह, (४-७-१९११ते२२-११-१९६३ ), १९३३ मधे ब्रिटीश इंडीयन सेनेत राजपत्रित अधीकारी झाले. दुसरे महायुद्ध, १९४७ भारत पाकिस्तान व १९६२ भारत चिन युद्धा आसा मोठ्ठा अनुभव. एकाच वेळेस पाच वरीष्ठतम सेनानायकांच्या अपघाती मृत्यूने देशाची अपरिमित हानी झाली व या अपघाता नंतर खास निर्देशानुसार एका पेक्षा जास्त वरीष्ठ सेना नायकांना एकत्रीत प्रवास करण्यास प्रतिबंध घालण्यात आले. जम्मूमधे नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने कमिटी बनवली.कमीटीचे मुख्य काय म्हणतात ते खाली बघा.....

Lalita Sharma, chairperson of the Shaheed General Bikram Singh Yadgaar Committee, Jammu, says: “His statue is at the Bikram Chowk by the Tavi. We had asked the govt in 2007-08 to shift his statue to a more prominent place. We made the committee 20-25 years ago. Now, they have made a chowk here. Every family has people he has helped. His cremation was also held at Bikram Chowk because locals wanted to conduct his last rites here. His mother herself approved of the ceremony because people loved him. - अंतरजालावरून

हा चौक तवी नदी जवळच आहे. नदीचे विस्तृत पात्र व एवढा मोठ्ठा लांब पुल काश्मीर खोऱ्याला जोडतो म्हणून महत्वपूर्ण आहे. काश्मीर खोऱ्यातील संपुर्ण प्रवास घाट व दुर्गम डोगंराळ भागातील.जेमतेम पंचवीस कि मी च्या वेगाने गाड्या जात असत. काही ठिकाणी एका वेळेस दोन गाड्या सुद्धा एकमेकाना क्राॅस करणे जिकीरीचे. आता चार पदरी रोड आहे. सहा पदरी रोडचे काम सुरू आहे.जेथे शक्य आहे तेथे बोगदे व पुल बांधले जात आहेत.दोन तासाचा प्रवास कमी होऊन पंचेचाळीस मिनीटाचा होईल. देशाच्या सुरक्षेसाठी सीमावर्ती भागाशी सुचारू दळण वळण खुपच महत्त्वपूर्ण आसते हे वेगळे सांगण्याची गरज वाटत नाही. आसो, नगरोटा वरून उधमपुरला पोहोचलो. सामाना बरोबर फौजी ट्रकमध्ये प्रवास (आता सामान व प्रवाशां करता आरामदायक बसची सोय आहे.) त्यातून सतत वाहणारा थंडगार, "चिल्ड" वार्‍याने शरीर आखडले होते.जेवणानंतर थोडे शरीर गरम करण्यासाठी बाहेर पडलो. चहूकडे बर्फ होता पण जलद चालत गेलो आणी दोन कप गरमागरम चहा मुळे जरा उब आली.

या भयंकर थंडीचा सामना कशमीरी नागरीक व सैनिक कसे करतात हा पण एक महत्त्वपूर्ण विषय आहे.

येथील घरे लाकडापासून बनलेली आसतात त्या मुळे जास्त थंड पडत नाही.भींती,जमीन व उतरत्या छप्पराची, सर्वच लाकडी सामानाने बनलेली, मजबूत लाकडी पलंग. कापसाची रजाई,गादी.घर गरम ठेवण्या साठी "बुखारी", पत्र्याची गोल,चहुबाजूने बंद डब्ब्या सारखी शेगडी, इधंन टाकण्यासाठी वेगळे झाकण,त्यावर काटकोनात बसवलेले धुराडे, दुसरे तोंड घराच्या बाहेर काढलेले. बुखारीची राख जमा करण्यासाठी चौकोनी पत्र्याचा ट्रे. तीन वेगवेगळ्या प्रकारच्या इंधनावर चालणाऱ्या या शेगड्यात राॅकेल, दगडी कोळसा व लाकुड हे जळण म्हणून वापरतात. धुराड्यात कार्बन जमतो. आशा वेळेस जमलेला कार्बन काढला नाही तर धुर जाण्यास अवरूद्ध निर्माण होतो व अपघात होण्याची दाट शक्यता आसते.पंधरवडय़ात साफसफाई करावी लागते. याची एक वेगळीच गंमत आसते. धुराडे शेगडी पासुन वेगळे करतात,आत मधे थोडे केरोसिन टाकतात. दोन्हीकडून हलक्या मातीचा लेप लावून बंद करायचे आणी धुराडे तापवायचे. आतमधे जमा झालेला कार्बन पेट घेतो व हल्कासा स्फोट होऊन धुराडे साफ होते. उच्चतुंगता (High altitude) भागात जीथे माणसाला जाणे मुश्किल तेथे लाकडे,दगडी कोळसा वाहून नेणे आवघड,अशक्य आणी जास्त खर्चिक. तीथे केरोसिन ची बुखारी वापरतात.भरपुर इधंन जमा करून ठेवायला लागायचे कारण रस्ता केव्हा बद होईल याचा नेम नाही. बुखारीने घर गरम राहाते.यात जेवढा आराम तेवढाच धोका. एक हवेतील आर्द्रता कमी होते म्हणून पाणी भरून डबा,बादली खोलीत ठेवतात. दुसरे धुराड्यातुन कार्बन मोनोक्साईडचा रीसाव होऊ शकतो, विषबाधा गुदमरून प्राण पण जाण्यिची संभावना नाकारता येत नसे.

वरील व्यवस्था घराकरता पण बाहेर साठी काय? नुसते गरम कपडे थंडीला पुरेसे नसायचे. कांगडी आणी फिरन ह्या दोन गोष्टी काश्मीरी लोकांना थंडीचा सामना करण्यासाठी आवश्यक आसायच्या. सैनिकांना मात्र थंडीचे विशेष कपडे (extreem cold climate clothing ) मीळत आसल्याने कांगडी वापरायची जरूर भासत नसे.तसंही युनिफार्म बरोबर हा पर्याय बसतच नाही. कांगडी ,कशमीर संस्कृतीचा अभिन्न अंग व ओळख आहे.कांगडी बनवणे एक विशेष कौशल्यपूर्ण काम, वेळू,बांबू सदृश्य लाकडा पासून छोटी परडी बनवून. त्यामधे मातीची कटोरी ठेवायची. कटोरीत चिनारची सुख्खी पाने, थोडी राख व जळते दोनतीन निखारे घालून बाहेर जाताना गळ्यात घालायची. वरून "फिरन",म्हणजे गरम लोकरीचा चोंगा घातला की वजा तापमानात आरामशीर फिरता येते. कांगडी मुळे त्वचा रोग,धुरामुळे क्षय कर्क रोग होण्याची जास्त संभावना. अधिक माहीती साठी विकिपीडिया बघा.

https://hindi-theprint-in.cdn.ampproject.org/v/s/hindi.theprint.in/cultu...

फिरन म्हणजे घेरदार गुढग्यापोत्तूर कुर्ता. थंडीत लोकरीचा तर उन्हाळ्यात कापसाचा. बायकांचे नक्षीदार तर पुरुषांचे साधे. येथील पशमीना शाल आणी वुलन कार्पेट सुद्धा प्रसिद्ध आहेत. हुक्का सुद्धा कलात्मक ,सुंदर बनवतात.

https://en.m.wikipedia.org/wiki/Pheran

वजा तापमानात प्रत्येक गोष्टीकरता पाणी गरमच हवे.विजच नाही मग गरम पाणी कसे करणार.चुलीवर!, आणी एवढ्या लोकांना!फारच कठीण.इथे "जुगाड",कामाला येतो. पेट्रोल,डिझेलच्या रीकाम्या बॅरलचा उपयोग करून अपारंपरिक गीझर तयार करता येतो. सुस्थितीतील बॅरल घ्या.आडवा करून त्याला एक मोठे नरसाळे जोडा (fixed) ज्यातून बॅरल मधे पाणी टाकता येईल. लोखंडी नळा सारखा पाईप(fixed) आशा ठिकाणी लावायचा जेणेकरून दोन बादल्या पाणी टाकले की बॅरल मधून दोन बादल्या पाणी (ओव्हरफ्लो) तोटी वाटे बाहेर पडेल.आसा तो बॅरल चुलाणावर चढवायचा,चुलाण जळते ठेवायचे. एकदा बॅरल भरून पाणी गरम झाले की एका बाजुने थंड पाणी ओतले की दुसर्‍या बाजुने हवे तेव्हढे गरम पाणी घ्या.है ना भारी "जुगाड"!

उधम्पूरला पोहोचलो,एक आव्हान संपले होते. ऐंशी मधे काश्मीर खोऱ्यात शांतता होती,पर्यटक बिनघोर नंदनवनात फिरू शकत होते. शहरी भागात सुखसोई उपलब्ध होत्या तर ग्रामीण भागात विज,बॅक,दळणवळण सारख्या मुलभूत सोई सुद्धा उपलब्ध नव्हत्या.असामाजिक तत्त्व संघटित होण्यास सुरवात झाली होती.सेने बद्दलचा द्वेष शहरी भागात जाणवत होता पण ग्रामीण भागात जवळपास नव्हता. क्षयरोग्यां करता सेनेने चांगले काम केल्याने गावात सौहार्दपूर्ण वातावरण होते.

दोन तीन दिवसाचा मुक्काम नन्तर पुढे जाण्याचा नम्बर येणार होता. तसेहि काही काम नसल्याने व पहिल्यन्दाच आल्यामुळे थोडे बाहेर फिरावे आस विचार केला. शिवालिक पर्वतात बसलेले शहर राज उधम सिह्नाच्या नावावर आहे. येथील निसर्ग सौन्दर्य व जवळच आठव्या शतकातील क्रिमची मन्दीर समुह बगण्या सरखे आहेत. मन्दीरे दूर आसल्याने जावु शकलो नाही. काही मित्र इथेच होते त्याना मात्र बरेच दिवसानी भेतल्या मुळे आनन्द झाला. सेनेत नोकरीचा एक फयदा जरूर आहे की सगळीकडे कुणी न कुणी मित्र जरूर भेटतात. पुढ्यल्या भागात भेटुयात .

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

आलो आलो's picture

12 Jul 2022 - 4:13 pm | आलो आलो

लय भारी लिव्ह्ता राव तुमी फौजी सायब !
बसल्या ठिकानावरुन काश्मीरला घेऊन गेलात की ....

कर्नलतपस्वी's picture

12 Jul 2022 - 6:08 pm | कर्नलतपस्वी

थोडे थांबा अमरनाथ दर्शन घडवतो. सध्या दूरदर्शनवर दाखवल्या जाणार्‍या अमरनाथ यात्रेच्या रिपोर्ट मुळे जुन्या आठवणी चाळवल्या आहेत. तेथील आताची परीस्थीती व ऐंशी च्या दशकातील मी केलेली वारी याची आपसुकच तुलना होत आहे.
निःसंदेह, सुखसोई वाढल्यात पण निसर्ग सुध्धा तेवढाच डिस्टर्ब झालाय.

कुमार१'s picture

12 Jul 2022 - 4:35 pm | कुमार१

सुरेख...च...

कर्नलतपस्वी's picture

12 Jul 2022 - 6:08 pm | कर्नलतपस्वी

धन्यवाद कुमार सर.

कांगडी पोटाशी धरल्यामुळे तेथे सतत दाह होऊन तेथे कर्करोग होतो याला कांगडी कर्करोग असे म्हणतात.

हे आम्हाला एम बी बी एस ला शिकवले होते.

https://en.wikipedia.org/wiki/Kangri_cancer

https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/19932909/

कर्नलतपस्वी's picture

12 Jul 2022 - 8:37 pm | कर्नलतपस्वी

डॉक्टर खरे सर धन्यवाद.

त्यावेळेस क्षय रोग हा खेडेगावातून खुप पसरलेला होता. खाण्यापिण्याचे कमालीचे हाल,फक्त तांदूळ, राजमा हे उत्पन्न.

सेनेच्या डॉक्टरांनी अथक परिश्रम केले. शिक्षणाचा आभाव अंधश्रद्धा व धर्माचा पगडा त्यामुळे औषधोपचारा कडे दुर्लक्ष. Inj streptomycin
Tab Isonex,Tab Ethinomde ,PAS Vitamin supplement आशी १८ महिन्याची ट्रीटमेंट होती.Drug-resistant TB (DR TB) सुद्धा खुप होता.

त्यावेळेस सिव्हिलीयनला फुकट औषधोपचार आसुन लोक घ्यायला तयार नव्हते.

Nitin Palkar's picture

12 Jul 2022 - 7:41 pm | Nitin Palkar

अतिशय चित्रदर्शी वर्णन. पुभाप्र.

_/\_

सौंदाळा's picture

13 Jul 2022 - 3:28 pm | सौंदाळा

वास्तवदर्शी वर्णन आवडले.

कर्नलतपस्वी's picture

13 Jul 2022 - 4:15 pm | कर्नलतपस्वी

नितीन,सैदांळा प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

सुखी's picture

13 Jul 2022 - 10:52 pm | सुखी

मस्त लिहिलंय.. पुभाप्र

मुक्त विहारि's picture

14 Jul 2022 - 12:17 pm | मुक्त विहारि

दोन्ही भाग आवडले

ज्ञानोबाचे पैजार's picture

14 Jul 2022 - 4:38 pm | ज्ञानोबाचे पैजार

तुमच्या सोबत काश्मिर फिरायला मजा येते आहे
पुभाप्र
पैजारबुवा,