या बँडवाल्याची एक गम्मत असते. त्यांचे पोशाख एकदम मस्त असतात . लालजर्द कोट त्यावर सोनेरी दोरीची नक्षी. सोनेरी बटणे. डोक्यावर पी कॅप. ती फरची असती ना उंच तर एकदम कोणीतरी बकिंगहॅम पॅलेसचे गार्डच शोभले असते. पण जरा नजर खाली करा. इतक्या सुंदर कोटच्या खाली पायजमा आणि पायात स्लीपर असतात. कुठल्याही लग्नात वाजणार्या बँडवाल्याना पहा थोड्या फारफरकाने हेच दिसते.
मागील दुवा http://misalpav.com/node/50337
मी कार्यालयाच्या दारात उभी आहे. मायाच्या आईने माझ्यावर दिलेली जबाबदारी म्हणजे येणार्या पाहुण्याना गुलाबाचे फूल देऊन स्वागत करणे, सांभाळतेय. मजा येते. नवे चेहरे , हसरे , सजलेले, यात एखादा ओळखीचा चेहेरा दिसला की चेहेर्यावरचे हसू आणखी दोन इंच पसरते. त्यातही तो चेहेरा बरेच दिवसानी दिसला की आनंदाचेही भरते येते. उगागचच टाळ्या वगैरे दिल्या जातात. आनंद साजरा करायला इतकाच अवधी मिळतो. मागे आणखी चेहेरे उभे असतात. त्यांचे ही स्वागत करायचे असते. मग भेटूया आत असे बोलून छोटासा निरोप घेतला जातो. पुढचा चेहेरा आपल्याला अनोळखी. या काकू आपला चेहेरा नीट न्याहाळतात. तू गौरीची मुलगी ना? थेट अगतुगं करतात. आपल्याला आईच्या नावाने ओळखणारी ही बाई कोण कोण अशा विचाराने माझ्या भुवया वर जातात. दोन्ही भुवयांच्या मधे प्रश्न चिन्हासारखी एक मुरड पडते. अभवितपणे आपण होकारार्थी मान डोलावतो. आणि जणू काही मोठी लढाई जिंकली असावी अशा आनंदाने त्या काकू सोबतच्या काकांना सांगतात. म्हणत नव्हते तुम्हाला ही गौरीची मुलगी आहे म्हणून. तुम्ही उगाच काहितरी सांगता. काका, काकूंना त्यांचा तो विश्वविजय सजरा करू देतात.
" अगं मी शैला मावशी , लहानपणी वाड्यात आमच्या शेजारी रहायचा तुम्ही. केवढी मोठी झालीस ....ह्यांनी ओळखलंच नाही. पण मी ओळखलं..... काकू मान डोलावत बरंच काही बोलत रहातात. त्यांच्या बोलण्यावर, मान डोलावून हसणे इतकेच आपल्या हातात उरते.
काका , काकूना चला पुढे अशा खुणा करतात. काकू आपला हात धरून भेटते गं नंतर म्हणून पुढे जातात.
या गर्दीत एक चेहेरा परिचित वाटतो. कधी भेटलोय बरं आपण याला... मेंदूला ताण देऊनही आठवत नाहीये. पण आपली नजर पुन्हा पुन्हा त्याच्या कडे जातेय. निमगोरा, धारधार म्हणता येणार नाही आणि फताडं ही नाही असं नाक. किंचित स्वप्नाळू वाटणारे पिंगट डोळे आणि मस्त मागे वळवलेले पण पंख्यामुळे भुरभुरणारे सरळ केस. रेशमाची लड असावी इतके भुरभुरताहेत. मस्त भरतकाम केलेला डार्क मरून रंगाचा झब्बा आणि गळ्यात मोत्याची माळ , त्या मोत्याच्या माळेमुळे की काय त्याचे ते पिंगट डोळे अजूनच मॅग्नेटीक वाटताहेत. माझं सगळं लक्ष्य त्या डोळ्यात अडकून राहिलय. याअचं स्माईल पण त्याच्या या अशा डोळ्यांना मॅच होणारे एकदम मॅग्नेटीक असावं. मी कशाला ही अपेक्षा करतेय. माझं मलाच समजत नाही. समजा हम समजा. त्याने स्माइल दिली आणि त्यात त्याचे दात पान तंबाखू खाऊन मरून झब्ब्याला मॅच होणार्या रंगाचे असतील , एखादा समोरचा दात वेडावाकडा किंवा तुटका असेल तर.... छे ... असला अपेक्षाभंग झाला तर अवघड होईल ....
पण हा तसा पान तंबाखू नसेल. इतका छान चेहेरा..... तो खिशातून खाकी पुडी काढून तंबाखू मळत असेल असे वाटत नाही. हा नक्की तसा नसेल.
..... ए मावशी ..... मी भानावर येते, रेवती माझ्या हाताला धरून काहितरी सांगतेय. बरं झालं माझी नजर त्या मॅग्नेटीक डोळ्यात अडकून बसली होती. रेवती मुळे सुटका झाली.
"ए मावशी ...चल लवकर तिकडे मायामावशी तुला बोलावतेय. लवक्कर चल. " एवढे बोलून रेवती थाबत नाही. ती माझ्या हाताला ओढतेय. काय इमर्जन्सी आलीये कोण जाणे. इकडे ती स्वागताची जबाबदारी कोणाला द्यायची ते मी पहातेय. त्या गर्दीतही मला शिल्पा सापडते. माया , अनू आम्ही सख्ख्या मैत्रीणी. कॉलेजच काय पण शाळासुद्धा सोबतीने शिकलोय. अनू कोणाचे हसून स्वागत करेल यावर माझा विश्वास नाही. पण काय करणार रेवती इकडे मला ओढतेय मी अनूच्या हातात फुलांचा ट्रे स्वाधीन करते.
आणि आत जायला निघते. आत जाण्याअगोदर मघाचा तो मॅग्नेटीक चेहेरा कुठे आहे ते पहायचा प्रयत्न करते. तो तिथे दिसत नाही. असो.
मी आत जाते. मायाचा ब्रूच नीट बसत नाहिये. तो मी बसवून देते. तीच्या सोबत एक सेल्फी काढते. फोटोग्राफर तीला ब्रूच लावताना फोटो काढण्यासाठी अॅक्षन रीप्ले करायला लावतो. हे फोटोग्राफर ना.... लग्नात नवरानवरी आणि करवल्यांपेक्षा फोटोग्राफरच जास्त उत्साही असतो. एकच प्रसंग तो तीन तीन अँगल नी टिपतो. अगदी बालाजी टीलीफिल्म्सच्या सिरीयल मधे असते ना . फरक इतकाच की तिकडे प्रत्येक अँगल दाखवताना ढँण्ण...ढॅण्ण ...ढॅण्ण असे म्युझिक असते . इथे नसते. बरेच आहे म्हणा. नाही तर बायकांनी काय केलम असते कोण जाणे..... माझ्या डोळ्या समोर दृष्य उभे रहाते. ढॅण्ण ढॅण्ण ढॅण्ण... म्यूझीक वाजते आणि नवरदेवाची आत्या म्हणते.... नही... तुम अपने आपको समझती क्या हो. हा... तुमने मुझे अभी समझा ही कहां है. लेकीन मै पूरी समझ गयी हुं . उसके आनेपर बँड पर सत्यं शिवम सुंदरम.. और मेरे आने पर " मुन्नी बदनाम हुवी" की धून... ... ये घिनौनी सोच तुम्हारे अलावा और किसी की हो ही नही सकती. याद रख्खो इस घर की हर दीवाल इटोंसे बनायी है....... " आणि पुन्हा एकदा ते म्यूझिक ढॅण्ण ढॅण्ण ढॅण्ण.......
भर लग्नात हॉलमधे शालू साड्या दागिने घालून इतक्या नटून थटून आलेल्या बायका अशा भांडताहेत हे इमॅजिन करून मला हसू येतंय.... नकळत हसतेय.
मी का हसतेय हे मायाला समजत नाही. लग्नाच्या घाईतही मायाला ते समजून घ्यायची उत्सुकता आहे. ही बदलणार नाही. काही झाले तरी. मी काहितरी कारण संगून विषय बदलते. आणि मायाच्या रूममधून बाहेर पडते.
हिंदी सिनेमात लग्न दाखवायचे असले की नवरीच्या मैत्रीणी करवल्या उगाचच इकडून तिकडे घाघरा सावरत पळत असतात. सतत फिदीफिदी हसत असतात.
प्रत्यक्षात हे असं काही घडलं तर सतत फिदीफिदी हसण्यासाठी आणि इकडून तिकडे पळत रहाण्यासाठी मुलींची वेगळी टीम बनवावी लागेल तीही अगोदर किमान आठवडाभर प्रॅक्टीस करून आलेली.
या हिंदी सिनेमावाल्यांच्या लग्नात घरची कामे कोण करतं कोण जाणे! इकडे मी मायाची सख्खी मैत्रीण आहे तरीही कितीतरी जबाबदार्या आहेत. मायाकडे लक्ष्य द्यायचे तर आहेच पण तीचे आलेलेले कॉलेजचे मित्रमैत्रीणी पाहुणे यांना पण अटेंड करायचे. कुठे काय कमी जास्त होतंय हे बघायचं. अर्थात याबद्दल काहीच कुरकूर नाही. हे सगळं करताना येणारी मजा महत्वाची. आपण उगाचच जबाबदार व्यक्तिमत्व आहोत असे वाटते. लहानपणी सगळ्या मोठ्या लोकांच्या खिशात काहितरी कागद असतात. याचे फार आकर्षण असायचे. आत्याने मला हौसेने शर्ट आणला होता . कुठल्यातरी गावाला निघालो होतो. आणि आत्याने मला बसची तिकीटे सांभाळायला दिली होती. ती तिकिटे शर्टाच्या वरच्या खिशात ठेवताना कसलं भारी वाटलं होतं.
मायाच्या साडीचा ब्रूच लावून दिला. इकडे लाऊडस्पीकरवर गुरुजींचा आवाज ऐकू येतोय" मुलीचे मामा मुलीला घेऊन या. मुलीचे मामा मुलीला घेऊन या."
माया ची आई आत येते. अगं किती वेळ लावताय मुलींनो. आवरा लवकर. गुरुजी बोलावताहेत. खोलीच्या बाहेर रंगामामा उभा आहे. अरे झालं का..... चला आटपा की लवकर.
लग्नातल्या पैठणीचा तो घोळ सावरत माया उभी रहाते. एकदम हलका मेक अप ही टीप किती लागू पडलीये ते आरशात पहातेय. मी मायाकडे डोळे फाडून पहातेय. कित्ती सुंदर दिसतेय माया. साधीशी वेणी, त्यावर गजरा, चेहेर्यावर हलकी पावडर, तेही घामेजले दिसायला नको म्हणून. कानात हलणारे झुमके, नाकात मोत्याची नथ. कमानदार भिवयांखाली चमकणारे काळेभोर डोळे. त्या डोळ्यांना अधीक रेखीव करणारी आयलायनरची रेघ. गळ्यात मोत्याची माळ. काय क्यूट दिसतेय माया. मला बालगंधर्व सिनेमातला सुबोध भावे आठवतो. अगदी तश्शी दिसतेय माया . देखणी. . ओह माय गॉड काय क्यूट दिसते आहेस गं तू. मी मायाच्या चेहेर्यावरून हात ओवाळून टाकत माझ्या गालावर बोटे दुमडत तीची दृष्ट काढते. माया माझ्याकडे पहाते. थोडी हसते. हसताना तीचे डोळे अधीकच पाणीदार दिसतात. ओठांना लावलेल्या ड्रीम रोझ लिप्स्टीक मुळे तीचे दात ही एकदम जहिरातीतल्या मुलीसारखे वाटताहेत.
"अगं चला , चला, तिकडे गुरुजी खोळंबलेत. नवरदेव येऊन उभा देखील राहिला. झालं ना सगळं. बघ गं मीरा, काही राहिलं नाही ना. मायाच्या आईची लगबग सुरू आहे
क्रमशः
प्रतिक्रिया
18 Jun 2022 - 12:51 pm | ज्ञानोबाचे पैजार
आता एक गुलाबी प्रेमकहाणी सुरु होणार असे वाटते आहे...
पुभाप्र
पैजारबुवा,
18 Jun 2022 - 1:28 pm | सुखी
विजुभाऊ, छान लिहिलंय...
18 Jun 2022 - 9:16 pm | कर्नलतपस्वी
लग्नातल्या गुलाबी कहाण्या आवकाळी पावसा सारख्या,फेऱ्या बरोबर फेर धरतात आणी विदाई बरोबर टाटा बाय बाय करतात.
मस्त लिहिलंय.
19 Jun 2022 - 12:28 pm | राजेंद्र मेहेंदळे
येउंदे अजुन!!
6 Jul 2022 - 9:29 am | विजुभाऊ
पुढील दुवा http://misalpav.com/node/50403
6 Jul 2022 - 11:06 am | कंजूस
निरीक्षण आणि घटना आणि पात्रे गुंफणे हेच कथा लेखनाचे इंगित.