बहारो फूल बरसाओ - ३

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
6 Jul 2022 - 9:28 am

माया माझ्याकडे पहाते. थोडी हसते. हसताना तीचे डोळे अधीकच पाणीदार दिसतात. ओठांना लावलेल्या ड्रीम रोझ लिप्स्टीक मुळे तीचे दात ही एकदम जहिरातीतल्या मुलीसारखे वाटताहेत.
"अगं चला , चला, तिकडे गुरुजी खोळंबलेत. नवरदेव येऊन उभा देखील राहिला. झालं ना सगळं. बघ गं मीरा, काही राहिलं नाही ना. मायाच्या आईची लगबग सुरू आहे.

मागील दुवा http://misalpav.com/node/50355

नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे. शुभमंगल सावधान..... सावधान ची सम पकडून लोक अक्षता फेकतात. ज्यांना खोड्या करायच्या असतात ते असल्या समेला वगैरे दाद देत नाहीत.पट्टीच्या गवयाने आड मात्रेवर एखादी हरकत घेऊन पुन्हा समेवर यावे तसे हे लोक सावधान वगैरे म्हंटलेले नसताना एखादे टारगेट पकडून त्यांच्या गालावर , किंवा टकलावर अक्षता नेम धरून मारत असतात. तेवढ्याच खोड्या. आत्ता ही माझ्यातली ती खोडकर मुलगी जागी आहे. मी टारगेट शोधतेय. सोना, रिया , प्रकाशकाका , रूपा कोणीच दिसत नाहीत. अंतरपाट अजून काढलेला नाहिय्ये. त्यामुळे थेट पलीकडचे दिसणे अवघड आहे. मी इकडेतिकडे पहाते.इतक्या गर्दीतूनही मला तो दिसतो. त्याच्या त्या रेशमी केसांवर अक्षता पडल्या आहेत. त्या लाल पांढर्या अक्षता ओल्या जमिनीवर प्राजक्ताची फुले पडावी तशा दिसताहेत. मी एक टक पहात रहाते ( एरवी मला या माझ्या उपमेचं हसू आलं असतं. दुसार्या कुणी ही असली उपमा दिली असती तर मी जाम खिल्ली उडवली असती. )
अचानक गलबला झाला मला कुणाचा तरी धक्का लागला. "अगं काय करतेस. इकडे ये. मायाला आता होमाला बसायचंय.तीची साडी कुठे ठेवली आहेस." सोनी माझ्या हाताला धक्का देत विचारतेय. गुरुजींनी अखेरची सावधान हाक देत अंतरपाट काढून टाकलाय.नवरानवरीनी एकमेकांच्या गळ्यात हार घातलेत.आणि बँडवाल्यानी एकदाम जोरजोरात वाजवायला सुरवात केली आहे. सोनीला मी काहितरी सांगते. या गडबडीत माझे लक्ष्य निसटते. सोनीला सांगीन झाल्यावर मी इकडे तिकडे पहाते. जिथे अगोदर पहात होते त्या जागेवर रेशमी केसांच्या राजपुत्र दिसत नाही. मी इकडे तिकडे पहाते. तो दिसत नाही. इकडे तिकडे पाहून माझी नजर परत त्याच जागेवर येते. जणू काही तो तिथे पुतळा म्हणून उभा केला होता. अर्थातच तो तिथे नाही. गेला असेल कुठे तरी . दिसेलच की नाहीतरी आम्ही दोघेही कार्यालयातच आहोत. पण दिसला तर बरे होईल.
लग्न लागले की स्टेजवर पाहुण्यांची लगबग सूरू होते स्टेजवर आता प्रत्येकालाच फोटो काढायचे असतात. सोनाला मायाच्या मागे प्रेझेंट्झ घ्यायला बसवून ठेवलंय. माझी नजर चौफेर आहेच. गर्दीत त्याला शोधतेय. मला माझीच मजा वाटते. तासाभरापूर्वी तो कोण हे मला माहीतही नव्हते आणि आत्ता मी त्याचा शोध घेतेय. अर्थात तो कोण हे मला आत्ताही माहीत नाहिय्ये. रेशमी केस आणि भरतकाम केलेला डार्क मरून रंगाचा झब्बा इतक्या भांडवलावर त्याला शोधतेय. गवतात सुई शोधण्याइतके अवघड नाही पण जरा अवघडच आहे.हिंदी सिनेमात असते तशी सिच्यूएशन यावी. कसल्याशा जादूने हे इथले सगळे लोक नाहीसे व्हावेत. फक्त तो सोडून.
स्वच्छ निळ्या आकाशात इंद्रधनुष्य असेल. समोर क्षितीजावरून तो टेकडीवरच्या हिरव्यागार गवतावर पांढर्‍या शुभ्र घोड्यावरून अवतरेल. घोड्याच्या चालीवर त्याचे ते रेशमी केस भुरभुरत उड्या मारत वरखाली होत आहेत. स्लो मोशनमधे. मागे कोरसमधे सुरेल आवाजात कोणीतरी सासासा गगग रेरेरे ममम गगग पपप गात असेल. तो माझ्याकडेच येतोय. माझ्यापर्यंत आला आहे. मागचा तो गाणारा कोरस थांबला आहे . तो घोड्यावरून उतरला. त्याच्या त्या रेशमी केसांना झटका देऊन माझ्याकडे हात पुढे केला.माझ्या डोळ्यात पाहून वार्‍यावर उडणारा माझा पदर ओढत त्याने मला हाक मारली...... मावशी..... ए मावशी.
माझ्या खांद्याला धक्का बसतोय. माझ्या खांद्याला धरून कोण हलवतंय ते मी पहाते. रेणूका मला काहीतरी सांगतेय. मायाच्य आईला काहीतरी हवंय इतकंच समजतय.
मी भर दिवसा स्वप्न पहातेय. माझं मलाच हसू येतं. मायाची आई कोणाशीतरी बोलतेय. ते लोक निघाले आहेत. त्यांना रीटर्न गिफ्ट द्यायचंय. ते आणायला मी वरच्या खोलीत जायला निघते.
स्टेजवर आता गर्दी नाही. वरच्य रूम कधे ठेवलेली ती गिफ्ट्स आनायला स्टेजच्या मागच्या बाजूला येऊन जिन्याने मी वर जायला हवं. जायला निघते. स्टेजवर डेकोरशनसाठी लावलेल्या रेशमाच्या झिरमिळ्या फॅनच्या वार्‍यामुळे हवेत भिरभिरताहेत. अगदी त्याच्या रेशमी केसांसारख्या . आता उपमा देखील त्याच सुचताहेत. मला हसू येते.
स्वतःच्याच डोक्यावर एक टपली मारत मी पुढे होते. जिना चढून वर जाते. खोलीतून रीटर्न गिफ्त घेऊन येताना. माझी नजर खाली कार्यालयात हॉल मधे जाते. त्याला शोधतेय. तो दिसला...... माझे डोळे बहुधा एल ई डी बल्ब लागल्यासारखे चमकले असणार. नक्कीच. पण हे त्याच्या बरोबर कोण आहे. तो एका बाई सोबत बोलतोय. वयाने त्याच्या एकढीच असेल. त्या मुलीच्या कडेवर एक लहान मूल आहे. तो हात पुढे करतो. ते मूल त्याच्या कडे बघून हसंत त्याच्या कडे झेपावलंय. ते मूल आता त्याच्या कडेवर आहे.
क्रमशः

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

6 Jul 2022 - 10:25 am | आनन्दा

अरे देवा..
हा लायसन्स प्रकार मुलांच्या आयुष्यात बराच ऐकलाय.
मुलींच्या आयुष्यात पण?

सुखी's picture

6 Jul 2022 - 1:25 pm | सुखी

Bhari चाललीये. पुभापटा

श्वेता२४'s picture

6 Jul 2022 - 1:34 pm | श्वेता२४

पुभाप्र

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Jul 2022 - 1:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुभाप्र.

-दिलीप बिरुटे

कर्नलतपस्वी's picture

6 Jul 2022 - 8:16 pm | कर्नलतपस्वी

पन्गत केव्हा सुरू होणार?

सिरुसेरि's picture

7 Jul 2022 - 9:24 am | सिरुसेरि

छान लेखन . नांदा सौख्यभरे . बॅन्ड बाजा बारात .

विजुभाऊ's picture

7 Jul 2022 - 9:36 am | विजुभाऊ

धन्यवाद सिरुसेरी , कर्नल साहेब , प्रा डॉ , सुखी , श्वेता , आनन्दा

विजुभाऊ's picture

21 Jul 2022 - 11:08 pm | विजुभाऊ

बहारो फूल बरसाओ - ४ http://misalpav.com/node/50468