बहारो फूल बरसाओ - ४

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
21 Jul 2022 - 11:07 pm

तो दिसला...... माझे डोळे बहुधा एल ई डी बल्ब लागल्यासारखे चमकले असणार. नक्कीच. पण हे त्याच्या बरोबर कोण आहे. तो एका बाई सोबत बोलतोय. वयाने त्याच्या एकढीच असेल. त्या मुलीच्या कडेवर एक लहान मूल आहे. तो हात पुढे करतो. ते मूल त्याच्या कडे बघून हसंत त्याच्या कडे झेपावलंय. ते मूल आता त्याच्या कडेवर आहे.

मागील दुवा http://misalpav.com/node/50403
मला काय करावं सुचत नाहिय्ये. गाढ झोपेत असताना तोंडावर कोणीतरी थंडगार पाण्याचा हबका मारावा तसा धक्का बसलाय. माझ्या हातून रीटर्न गिफ्ट खाली पडतात. आणि
जिन्यावरून घरंगळतात. त्यात काय आहे माहीत नाही पण जे काही आहे ते काचेचं नसावे. मी प्रार्थना करतेय. कसेबसे मी मला सांभाळते.
माझ्या डोळे एकदम डबडबून येतात. डोळ्यातल्या काजळाची सीमारेशा ओलांडून ते डबडबलेलं पाणी कधीही बाहेर येईल
स्वप्न पडत असतानाच ते मोडून पडलेय. मी जे पाहिले ते खरे नसावे. ती त्याची बायको च असेल हे कशावरून. बहीण किंवा वहिनी पण असू शकेल ती.
आपल्या मनाचे हे आशा निराषेचे खेळ पाहून मला मजा वाटते. गम्मत आहे ना. ज्याचे नावही आपल्याला माहीत नाही त्याबद्दल इतका पझेसिव्हनेस! कसा असतो ना माणसाचा स्वभाव.
"अगं कुठे आहेस तू. किती शोधतोय सगळे आम्ही तुला ! सोनी मला काहितरी विचारायला येतेय. अन हे काय काय झालं तुला. " आत्तापर्यंत आनंदाने गजबजलेलं कार्यालय मला नकोसं वाटतय. माझ्या चेहेर्यावरही हे दिसत असावे.
"काही नाही गं जरा चक्कर आली. त्यातच जिन्यावरून उतरत होते " मी काहीतरी साम्भाळून घेते.
" अगं फोटो साठी तुझी वाट पहातोय. चल चल." सोनी मला जवळजवळ ओढतच नेते. स्टेजवर सगळ्या मैत्रीणी , मायाच्या बहिणी सगळेच आहे. थट्टा मस्करीला ऊत आलाय. पण मला त्यात काहीच रस उरलेला नाहिय्ये. माझा मूडच नाहिय्ये. पण इतरांसाठी खोट खोटंच मी हसत हसत त्यात मिसळते. माया नंतर कोणाचा नम्बर लागणार यावर विनोद झडताहेत. सगळ्यांचा रोख माझ्याकडे आहे. माया नंतर मीच हे सगळ्यांचं मत.
सांग ग बाई कुणी पाहिला असलास तर.
आणि नसेल तर इथेच पाहूया कोणीतरी पांढर्या घोड्यावरचा राजकुमार.
त्या जनरल थट्टा करत होत्या पण मला माझीच मघा पाहिलेली स्वप्न ऐकू येत आहेत. इथून पळून जावसं वाटतय. त्या डोरेमॉनच्या कार्टून मधे असते तसे एनी व्हेअर डोअर माझ्या कडे असता तर आत्ता या क्षणी मी सायबेरीया , जॉर्ज सारख्या थंडगार प्रदेशात गेले असते. वेळच आली असती तर तुवालु , वानुवाटु , बर्मुडा अशा ठिपक्या एवढ्या देशात नाहिशी झाले असते.
काय झालं गं.... सोनी माझ्या पाठीवर हात ठेवून विचारतेय. माझ्या मनातल्या विचारांचं चित्र चेहेर्यावर नक्कीच उमटलेलं असणार.
त्या घोळक्यातुन सुटका नव्हती. मी हो ला हो करत त्यांच्या फिदीफिदी हसण्याला उगाच दात दाखवत रहाते.
कसेबसे जेवण उरकले. जेवताना तो दिसला. यावेळेसही त्याच्या खांद्यावर ते लहान मूल होतेच. मघाशी तो दिसावा म्हणून शोध घेणारी माझी नजर आता तो दिसला की दुसरीकडे वळत होती.
मी सोनीला काहितरी सबब सांगून कार्यालयातून सुटका करून घेते. थेट घरी जाते.
कोणकोण आलं होते.... आईच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष्य करत मी रुम मधे जाते. बाथरूम मधे जाऊन कडी लावते. मला रडू आवरत नाहिय्ये. मी अक्षरशः ढसढसा रडतेय.
मला समजत नाहिय्ये काय होतय ते. शॉवर चालू करून तो पाण्याचा फवारा मी डोक्यावर घेते. चेहेर्यावर घेते. थंड पाण्याच्या हबक्याने जरा बरे बाटते. माझे रडणे थांबलंय.
कपडे बदलून मी थेट झोपायला जाते. उजेडपण नकोसा वाटतोय. डोक्यावर पांघरून ओढून घेते.
डोकं इतके बधीर झालंय की स्वप्ने सुद्धा स्विच ऑफ करून ठेवता आली तर बरे. मला आत्ता काहीच नको आहे. हवी आहे फक्त एक एक गाढ झोप. माझ्याच विचारांपासून लांब जाण्यासाठी. डोक्यातले सगळे विचार बंद करायचे आहेत. एवढंच..... दोन दिवसांचे जागरण म्हणा की इतर काही .....हळू हळू विचार बंद होत आहेत. मी गाढ झोपते.
दूर कोठेतरी डोंगर आहेत. दोन डोंगरांच्या मधून एक प्रकाश येतोय. आकाशात चंद्र आहे. चांदण्या आहेत. डोंगरातून येणार्या उजेडामुळे चांदण्या फिकुटल्या आहेत.
त्या प्रकाशातून एक पक्षी उडत येतो. तो हळू हळू मोठा होतोय. तो पक्षी नाही एक घोडा आहे पंख असलेला घोडा. त्यावर कोणीतरी बसलंय. तो घोडा जवळ येतोय. घोडेस्वाराचा चेहेरा नीत दिसत नाहिय्ये. घोडा माझ्या जवळ आलाय. घोडेस्वाराने त्याचा हात पुढे केलाय. मी देखील हात पुढे करते. माझ्या हाताला घोडेस्वाराचा स्पर्ष होतो. मी टाचा उंचावते. घोडेस्वार मला उचलून घेतो.स्वतःच्या पुढ्यात बसवतो. आणि घोड्याला टाच मारतो. घोडा वेगात धावू लागतो. घोडेस्वार लगाम सोडून दोन्ही हाताने माझे हात पकडतो. घोड्याला ठेच लागते. स्वाराचा तोल जातो. त्याच्यासोबत मी देखील कोसळते. डोंगराच्या उतारावरून घरंगळत जाते. घोडेस्वार उताराच्या त्या बाजूला मी या बाजूला... घरंगळतेय. घरंगळतेय....... पुढे अंधार. ....... अंधार..... अंधार.

सकाळ झाली आहे. मी काल रात्री पडलेल्या स्वप्नाला हसतेय. स्वप्नातही मला वियोगच नशिबात आहे.......
मायाच्या लग्नासाठी चांगला आठवडा भर सुट्टी मूड मधे गेली.आता उद्यापासून कामांचा ढीग उरकावा लागणार. लॅपटॉप उघडून ईमेल पहायचा जाम कंटाळा येतो. ईमेल नुसत्या पहाण्यावर थाम्बत नाही. त्याला उत्तर दिले जाते. थोडे थोडे म्हणता म्हणता चांगला दीड एक तास कधी सम्पतो ते कळत नाही. आणि मग , नंतर रविवारी करू , करायचं आहे म्हणत बाजूला ठेवलेली कामे बाजूलाच पडतात. दिवसाच्या शेवटी त्या अशा पेंडिंग कामांचा आकडा तेवढाच रहातो. त्यातही काही महाभाग रीड रिसीट" ईमेल वाचल्याची खात्री" मागवतात. डोक्यात जातात असली माणसे. मी आज लॅपटॉप उघडणारच नाही काय होऊ देत व्हायचं ते. आज निवान्त आवरायचं. रीलॅक्स व्हायचं.
लग्नाचे फोटो आले की सोनी सांगेलच. खूप धमाल केली. लग्नाच्या फोटोंची एक गम्मत असते. फोटो पहाताना प्रत्येक जण आपण त्या फोटोमधे कुठे आहोत तेच पहातो.
आता प्रत्येकाकडे मोबाईलमधे फोटो घेतो पण फोटोग्राफरने स्माईलप्लीज म्हणायच्या अगोदरच हसत सुटलेल्या आमच्या सगळ्याजणींचे फोटो पहायला मज्जा येणार.
लग्नाचे फोटो आले की सोनी सांगेलच. खूप धमाल केली. लग्नाच्या फोटोंची एक गम्मत असते. फोटो पहाताना प्रत्येक जण आपण त्या फोटोमधे कुठे आहोत तेच पहातो.
आता प्रत्येकाकडे मोबाईलमधे फोटो घेतो पण फोटोग्राफरने स्माईलप्लीज म्हणायच्या अगोदरच हसत सुटलेल्या आमच्या सगळ्याजणींचे फोटो पहायला मज्जा येणार.
लग्नाचे फोटो या एका विषयावरून मनात विचारांची एक आगगाडी चालू होते. न सम्पणारी. मायाची हळद. तेंव्हा अक्षरशः हळदीने रंगपंचमी साजरी केली होती. आख्ख्या रूममधे हळद हळद झाली होती. संध्याकाळचा मायाचा मेकअप , त्या अगोदरची ती ची खरेदी. लग्नातला तीचा ब्रायडल मेक अप. सगळ्यावेळेस आपण सोबत होतो तीच्या. तीच्या लग्नाची वरात. वराती सोबत तो होता. त्याचे भुरभुरणारे रेशमी केस......आणि त्याच्या कडे झेपावणारे ते लहान मूल....
छे.... नकोच. पण मला आता हसू येतय. स्वतःचंच. आपण त्याच्याबद्दल इतके पझेसिव्ह कसे काय झालो. असं कधीच कोणाबद्दल झालं नव्हतं.
लव्ह अॅट फर्स्ट साईट... सिनेमात होतं असं. तेंव्हा आपण किती खिल्ली उडवतो त्याची. पण हे प्रत्यक्षात? .....
मला माझीच गम्मत वाटते. मी विचार तिथेच सोडून देते.कपाट आवरायचं पडलंय. कपड्यांचा ढिगारा झालाय कपाटात. आई म्हणते तुझे कपडे एकदम विनम्र झालेत .
कपाटाचं दार उघडले की एकदम कपाटातून उडी मारून पायवर लोळण घेतात.
कपडे आवरण्यात इकडे तिकडे करण्यात वेळ कसा जातो ते समजत नाही. आपण काही काळासाठी बाहेरचे जग विसरतो. हे खरे मेडीटेशन. काम करताना विचार विसरायला होते. मेडीटेशनमधे तरी दुसरे वेगळे असे काय करतात या पेक्षा? आजचा दिवस संपला. उद्यापासून ऑफिस सुरू.
..................................................................................................................................................................................................................
सोमवारी ऑफिसचे एक वेगळेच रूप असते. दोन दिवस वीकएन्ड साजरा केलेला असतो त्यांना वीकएन्ड इतक्या लवकर संपला असे वाटत असते. शनिवार रविवार ट्रेकिंग करणारांची वेगळीच तर्हा. ते त्या जगातून बाहेर यायलाच तयार नसतात. संह्याद्री ची मोहिनीच तशी असते. प्रोजेक्ट च्या डेडलाईनमुळे रविवारीही काम करावे लागलेल्यांना वीकएन्ड वगैरे काही असते याचा थांगपत्ताच नसतो. त्यातून जर सलग गेले दोन्ही रविवारी काम केले असेल तर कोणता दिवस चालू आहे याचाच गोंधळ असतो. मला मागचा आख्खा आठवडा विसरायचा आहे. मायाच्या लग्नासाठी आठवडाभर सुट्टी झाली. क्लायंटला अगोदरच कळवलं होतं म्हणून बरं. मैत्रीणींबरोबर दंगा करता आला. कित्ती बरं वाटलं. इमेल नाही, मोबाईल नाही. रीव्ह्यू मिटिंग्ज नाहीत. आयुष्य कसं सरळ साधं जगता आलं . खरेच असं सरळ जगता यायला हवं . आपण उगाचच डेडलाईन , रीव्ह्यू वगैरेंची शेपटं मागे लावून गुंता वाढवत असतो.
.................................................................................................................................................................................................................
एक बरं झालं कामाच्या नादात आठवडा कसा भर्रकन निघून गेला. कळालं ही नाही . आज पुन्हा रविवार.
टिंग टाँग............. आत्ता इतक्या सकाळी कोण असेल? सकाळ कसली ... चांगले दहा वाजले आहेत.
मीरा.... मीरा...बघ गं जरा कोण आलंय.
तू बघ ना मॉम... मला ड्रेस चेंज करावा लागेल.
अगं मी पुजेत आहे.
टिंग टाँग.... टिंग टाँग..... बेल वाजवणाराला धीर नाहिय्ये जणू. नशीब ही बेल अँब्युलन्स सरखी नाहिय्ये. नाहीतर एव्हाना सोसायटी गोळा झाली असती.
आली आले..... थांबा जरा. आत्ता हातात पिस्तूल असतं ना तर असल्या उतावीळ बेल वाजवणाराला दार उघडताच गोळी घातली असती.
टिंग टाँग..... टिंग टाँग..... कोण येडचॅप आहे हा माणूस.... आता दार उघल्यावर बुक्कीच मारते तोंडावर त्याच्या. मी धावत दार उघडते.
टू माय सरप्राईज.... ओह्ह्ह्ह माय गॉड....... माझे डोळे विस्फारले आहेत.. तोंड आख्खा पंजा आत जाईल इतकं सताड उघडं पडलंय.
क्रमशः

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

सुखी's picture

22 Jul 2022 - 8:04 am | सुखी

अरे व्वा... आला वाटत तो

श्वेता२४'s picture

22 Jul 2022 - 12:40 pm | श्वेता२४

पुढील भागात ''तो'' असेल अशी अपेक्षा. पुढील भागाच्या प्रतिक्षेत!

ज्ञानोबाचे पैजार's picture

22 Jul 2022 - 1:26 pm | ज्ञानोबाचे पैजार

डेली सोप सारखे टींग टाँग करुन भाग संपवला?

पुढचा भाग लवकर लिहा

पैजारबुवा,

सविता००१'s picture

22 Jul 2022 - 4:17 pm | सविता००१

मी आज वाचले सगळे भाग एकदम. विजूभाऊ, मस्त लिहिताय हो, छानच आहे कथा. आणि निरीक्षण जबरी

कर्नलतपस्वी's picture

22 Jul 2022 - 4:36 pm | कर्नलतपस्वी

लवकरच शुभमंगल होऊ द्यात म्हणजे म्हणता येईल "they live happily ever after".

टर्मीनेटर's picture

25 Jul 2022 - 3:18 pm | टर्मीनेटर

वाचतोय...

राजेंद्र मेहेंदळे's picture

26 Jul 2022 - 12:49 pm | राजेंद्र मेहेंदळे

विजुभाऊ मस्त लिहिताय. यौंद्या पटापट पुढचा भाग.
पुलेशु

विजुभाऊ's picture

28 Jul 2022 - 6:35 am | विजुभाऊ