टिंग टाँग..... टिंग टाँग..... कोण येडचॅप आहे हा माणूस.... आता दार उघल्यावर बुक्कीच मारते तोंडावर त्याच्या. मी धावत दार उघडते.
टू माय सरप्राईज.... ओह्ह्ह्ह माय गॉड....... माझे डोळे विस्फारले आहेत.. तोंड आख्खा पंजा आत जाईल इतकं सताड उघडं पडलंय.
मागील दुवा http://misalpav.com/node/50468
माझ्या डोळ्यावर माझा विश्वास बसत नाहिय्ये. दारात माया आणि समीर उभे आहेत.मी अवाक झाले आहे.काही सूचतच नाहिय्ये. माया तू! व्हॉट अ सरप्राईज!
आनंदाने किंचाळते. मायाला घट्ट मिठी मारते.
कोण आलंय गं! माया का गं! आई विचारतेय. माझ्या आनंदाने किंचाळण्यावरून आईनेच काय कोणीही ओळखले असते. आई लगबगीने हातात पाण्याचा तांब्या घेऊन येते. अजूनही दारातच उभा असलेल्या माया समीर वरून पाणी ओवाळून टाकते.आणि त्यांना आत घेते.
माया आज येणार आहे याची जराही कल्पना नाही. माझे मलाच आश्चर्य वाटते.या प्रोजेक्ट च्या कामात आपण भोवतालचे जग विसरलेलोच असतो. माया आल्यामुळे मी खूप आनंदात आहे. तीचं लग्न अगदी काल झाल्यासारखे वाटतंय. मधला महिनाभर कॅलेंडरवरून निसटून कुठेतरी गायब झालाय.
माया आणि समीर मला भेटायला आले आहेत. काय बोलू आणि कित्ती बोलू असं झालंय. माया नेहमी मोबाईलमधे सेल्फ्या घेत असते. तीच्या लग्नात तीने हे खूप मिस केले. समीर हे सांगताना पोटधरून हसत होता.कित्ती छान जोडा आहे ना....यांचा आनंद नेहमी असाच राहू दे.मी मायाकडे पहातेय. तीने कॉलेजमधे केलेला दंगा आठवतेय.
इंद्र प्रधान.... आमच्या कॉलेजला नव्हता. इंजिनीयरिंगला होता. त्याच्या मित्रांनी की कुणीतरी रेवावर काहितरी कोमेंट केली. रेवा ने ते मायाला सांगितले.मायाला दिसताना त्या ग्रूपमधला इंद्रच तेवढा लक्ष्यात राहिला. त्याच्या कॉलेजचा जायचा रस्ता आमच्या कॉलेजच्या मागच्या बाजूस. तो तेथून जायला निघाला की माया आमची गँग रस्ता अडवायची ,त्याच्या बाईकच्या पुढे आणि मागे चारचारजणी चालत निघायच्या. आणि भरपूर कॉमेंट्स करायच्या. इंद्र बिचारा मान खाली घालून मुकाट जायचा. दुसरे तरी काय करणार तो बिचारा. शेवटी रेणूलाच तो आवडायला लागला आणि त्याची सुटका झाली त्यातून. तो किस्सा आठवला की अजूनही हसू येते.
माया लग्नानंतरही अशीच टॉमबॉय रहाणार का याची पैज लागली आहे आमची.
हॅलो... समीरचा मोबाईल वाजतो.आमच्या कधीच नं संपणार्या गप्पा थांबतात.
हो हो.... इथेच आहोत. अरे हो झालंच आमचे. हो हो हो. आलोच .
कोण आलंय.
रुग्वेद. माझा मामेभाऊ. गाडी घेऊन आलाय आम्हाला न्यायला.
अहो मग त्याला वर बोलवा ना. त्या निमित्ताने ओळखही होइल.
हॅलो तू इथे वरच ये. थर्ड फ्लोअर..... समीर त्याच्या भावाला फोनवर सांगतो.
टिंग टाँग..... मिनीटभरातच दारावरची बेल वाजते.
पुढे होऊन मी दार उघडते. दारात उभ्या असलेल्या "त्या"ची आणि माझी नजरानजर होते.तो डोक्यावरची कॅप काढत मला हॅलो म्हणतो. त्याचे ते भुरभुरणारे केस दिसतात. तो दारात उभा आहे. चेहेर्यावर तोंडभरून हास्य पसरलय. अगदी या कानापासून त्या कानापर्यंत.
मी थक्क होऊन पहातेय..... मॅट्रीक्स सिनेमात असतो ना तसा काहीसा ३६० डिग्री टाईम इफेक्ट झालाय. माझ्या भोवतालचे सगळे एकदम स्लो मोशनमधे चाललंय.
दारातून येणार्या वा-याने त्याचे केस उडताहेत. पिंगट डोळे , त्यावर चांदण्या असाव्यात तशा पडलेल्या अक्षता , लोभस स्माईल.... मी पहातेय. माझ्या मनात मायाच्या लग्नाची सी डी फास्ट फॉर्वर्ड होतेय. ती मुलगी तीच्या कडेवरचे ते लहान बाळ. त्याच्या कडे झेपावतय......" माझ्या मनातली लग्नाची फिल्म तुटते.
" या ना !आत या ना " मी सावरून त्याला आत बोलावते.काहिशा अनिच्छेने. माझ्या मनात काय वादळ चाललय याचा त्याला काहीच थांगपत्ता नाही. नाही तेच बरंय . आणि असून तरी काय होणार होतं.
माझ्या चेहेर्यावर माझ्या विचारंचं प्रतिबिंब दिसत असावं . सुरवातीला त्याच्या चेहेर्यावरचे ते पसरलेले स्माइल आता आक्रसलंय.
ये रे इंद्र आत ये. तुझी ओळख करून देतो. या मिरा. मायाची सख्खी मैत्रीण आणि माया हा इंद्र. माझा मामेभाऊ. लहानपणापासुन अगदी सख्खे मित्र.
आमच्या दोघात वर्ष भराचा फरक असेल फारतर....... समीर इंद्रची ओळख करून देतोय... मला त्यात काडीचा इंट्रेस्ट नाही.इंद्रकडे पहावसं वाटतय. पण त्याच्याकदे पहातान उगाचंच ती मुलगी आठवते. मी समीरच्या हो ला हो करते.
रुग्वेद; समीर आणि त्याचे लहानपणचे काही किस्से सांगतोय. माया , आई समीर तिघेही त्या किश्शांवर भरपूर हसताहेत. मला नाही हसू येत.
आपल्याला ज्या गावाला जायचं नाही त्या गावाची चौकशी करायची कशाला.
मला खरेतर मायाशी भरपूर बोलायचंय.तीला त्या गिष्टीबद्दल सांगायचंय......... छे.. इतका बालीशपणा नको. मायाला तर सांगायचंय ! काय बिघडणार आहे त्यात.......
जे झालंच नाही , होणारही नाहिय्ये ते बिघडायचा प्रश्नच येतो कुठे.
आणि बरंक का आई इंद्रची एक गम्मत आहे.आमच्या लग्नात त्याचा एकट्याचा असा एकही फोटो आलेला नाहिय्ये. प्रत्येक फोटोत त्याच्या कडेवर प्रिया आहे.तीने त्याला लग्नभर सोडलंच नाही.
म्हणजे त्या लहान मुलीचे नाव प्रिया..... हा विचार कशाला येतोय माझ्या मनात. त्या मुलीचे नाव प्रिया असो नाहितर अप्रिया. मला काय करायचंय.
प्रिया खरेतर शौनक ची मुलगी. याच्या बहिणीची मुलगी. वर्षाची असेल पण मामाला अजिबात सोडत नाही.माया आईला सांगतेय. एकदम चिकटू आहे.
"बरं का आई मी आणि रुग्वेद लहानपणापासून सगळ्या गोष्टी अगदी बरोबरच करायचो .शाळा सोबत केली कॉलेज सुद्धा सोबत केलं. घरातले आमची थट्टा करायचे की हे दोघे लग्न सुद्धा एकाच मांडवात करणार. " समीर आईला सांगतोय.
" पण काय करणार ते शक्य झाले नाही. माझ्या अगोदर समीर ने बाजी मारली." रुग्वेद ची समीरच्या बोलण्यावर कॉमेंट . दोघेही मोकळेपणे हसतात.रुग्वेद मायाकडे बोट दाखवतो " हे हे सगळं हीच्या मुळे...हीच्या मुळे."
माझ्या मनात वेगळंच काहितरी चाललंय. अचानक लख्ख उन पडलेलं असताना श्रावणातला पाऊस यावा मधेच इंद्रधनुष्य दिसावं आणि वार्यामुळे गवतावर एक हिरवी पोपटी लाट यावी . डोळे मिटलेले असावे. नेमके त्या वेळी चेहेर्यावर पावसाचे तुषार पडावे.असं काहीसं. बाथरुम मधे नळ चालू करावा आणि चुकुन नळाऐवजी शॉवरमधून पाणी थेट आपल्या डोक्यावर पडतं तेंव्हा वाटतं तसं. मला एकदम जोरजोरात गाणे म्हणावेसे वाटतय. ये क्या हुवा चुपकेसे. दिल ने कहा चुपकेसे ... क्युं नये लग रहे है ये धरती गगन.. ये क्या हुवा चुपकेसे . जोरात नाचावसं ही वाटतंय. चिकिलाकी चिकीलाकी चिकीलाकी चिकी चुम करत. एकटंच
काय होतंय ते माझंच मला समजत नाहिय्ये.
मी आत जाते. बेसीनवर जाऊन चेहेर्यावर पाण्याचा एक हबका मारते. नॅपकीन ने चेहेरा पुसून किचनमधे येते. सध्यातरी हीच एक सुरक्षीत जागा आहे माझ्या भावनांसाठी. मी माझ्याशीच हसते. काय हे...... एक साधे दृष्य आणि आपण त्याचे अर्थ लावून मोकळे होतो. किती पटकन आपण गैरसमज करून मोकळे होतो ना.
" अगं काय करते आहेस इथे समीर तुला बोलवतोय , आपण सगळेच जातोय आमच्या घरी चल पटकन तयार हो.. " माया मला बोलवायला किचन मधे येते. माझ्या चेहेर्यावरचे भाव मायाला दिसू नये म्हणून मी खिडकी उघडते.
रस्त्यावरून एक वरात चालली आहे. बँडवर गाणे वाजतय." बहारो फूल बरसाओ.... "
प्रतिक्रिया
28 Jul 2022 - 7:14 am | सुखी
मी पाहिला... आता वाचतो
28 Jul 2022 - 7:18 am | सुखी
छान कथा...
आजच गाणं ठरल... ये क्या हुवा चुपकेसे.
28 Jul 2022 - 7:33 am | कर्नलतपस्वी
मागचा भाग वाचल्यावर पासुन जीव टांगला होता की हिरोईणीच काय्य!
आता कसं बैजवार झालं,विजूभाऊ आता उगाच लोचा नक्को.
आवडली,भारीच नागमोडी होती.
28 Jul 2022 - 8:59 am | ज्ञानोबाचे पैजार
आता कुठे टायटल संपून सिनेमा सुरु होतो आहे.
अजून बरेच घाट जायचे आहेत.
विजुभाउ इतक्या सहज सोडणार्यातले नाहीत.
और आनेदो
पैजारबुवा,
1 Aug 2022 - 11:16 am | विजुभाऊ
धन्यवाद
1 Aug 2022 - 11:53 am | राजेंद्र मेहेंदळे
गाडी पुन्हा रुळावर आली तर!! चला, त्याची आणि तिची पुनर्भेट झाली आणि पुढच्या भेटीगाठी व्हायला निमित्तसुद्धा आहे, तेव्हा कहाणी सरकवा पुढे विजुभाऊ!!
पुलेशु
1 Aug 2022 - 4:10 pm | श्वेता२४
सरमिसळ झाली आहे. बाकी ठीक. पु.भा.प्र.
1 Aug 2022 - 9:09 pm | विजुभाऊ
हो. सम्पादक मंडळाला व्यनी केलाय दुरुस्तीसाठी.
पुभाप्र !!!!!
कथा इथेच संपवायची असं ठरवं होतं.
कथा पुढे न्यावी हा विचार चांगलाय. पहातो.
किंवा कदाचित नवी कथा होऊ शकेल
1 Nov 2022 - 4:12 pm | श्वेता व्यास
दिवाळी अंकाच्या प्रतीक्षेत जुने धागे चाळताना ही गोष्ट सापडली. खूप आवडली. पुढील भाग आला तरी आवडेल.