मटार ,बटाटा, टोमॅटो
सालाबादप्रमाणे थंडीचा मोसम आला. मुंबईची थंडी म्हणजे औट घटकेचं राज्य ! तेवढीच मजा लुटावी म्हणून बासनातले स्वेटर ,शाली बाहेर काढल्या आणि सकाळी सकाळीच कुठलीही सबब न ऐकता , जरा हट्टानेच , स-पति फेरफटका मारायला बाहेर पडले. मस्त फिरून प्रसन्न मनाने घरी निघालो. एव्हाना ताज्या तजेलदार, नानाविध प्रकारच्या भाज्या हातगाड्यांवर लादून जाणारे विक्रेते ठायी ठायी दिसू लागले होते. आज अंगात जरा जास्तच ऊत्साह संचारला होता. पावलं आपोआपच हिरव्यागार मटारच्या शेंगांच्या ढीगांनी भरलेल्या गाडीसमोर येऊन थांबली. आणि सोसासोसाने मटारची खरेदी झाली.