गुन्हेगारी विश्वावर आधारित अनेक टीव्ही आणि जालमालिका लोकप्रिय असतात. त्यातील काही मोजक्यांत शास्त्रीय पद्धतीने गुन्ह्याची उकल सखोल दाखविली जाते. खून,बलात्कार, जबरी मारहाण यासारख्या गंभीर गुन्ह्यांच्या तपासात न्यायवैद्यकशास्त्राची खूप मदत घेतली जाते. अशा तपासाचे अंतरंग उलगडून दाखविणारी एक सुरेख मालिका म्हणजे 'फॉरेन्सिक फाईल्स '. ही माहितीपटासारखी मालिका काही वर्षांपूर्वी अमेरिकी टीव्हीवर प्रक्षेपित झाली होती. आता त्यातले काही भाग जालावर बघण्यास उपलब्ध आहेत. वास्तवातील घटनांवर आधारित ही मालिका आहे. त्यातील एक वैशिष्ट्यपूर्ण आणि उत्कंठावर्धक भाग मी नुकताच पाहिला. त्यामध्ये एका आरोपीवरील खुनाचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी चक्क एका झाडाच्या DNA ची चाचणी उपयुक्त ठरली. अशा प्रकारे वनस्पतीच्या DNA चा उपयोग न्यायवैद्यकात प्रथमच केला गेला. गुन्हेगारीच्या इतिहासातील हे एक सनसनाटी प्रकरण ठरले. त्या अनुषंगाने गुन्हे, पोलीस तपास आणि त्यासंदर्भात सजीवांच्या DNA चे उपयोग यासंबंधी काही लिहावे असे मनात आले. त्यासाठीच हा लेख.
DNA हे सर्व सजीवांच्या प्रत्येक पेशीत असणारे मूलभूत रसायन. ते आपल्या अनुवंशिकतेचा पाया आहे.तो मूलतः ४ रासायनिक घटकांपासून (bases) तयार होतो. मानवी DNA मध्ये सुमारे ३ अब्ज असे घटक असतात. त्या घटकांचा एकमेकाला जोडण्याचा एक विशिष्ट साखळीक्रम असतो. हा क्रम त्या सजीवाच्या निर्मितीचा पाया असतो. साधारण ९९.९% लोकांत हा क्रम सारखा असतो. तरीसुद्धा उरलेला जो ०.१% भाग आहे तो प्रत्येक व्यक्तीत पुरेसा भिन्न असतो आणि हा फरकच त्या व्यक्तीची निजखूण (identity ) ठरते. या विधानाला अपवाद एकच - तो म्हणजे एकसमान जुळ्या भावंडांत DNA हा पूर्णपणे समान असतो.
DNA वरील संशोधनाने विसाव्या शतकात खूप भरारी घेतली. १९८०च्या दशकात त्यातील एक महत्वाचा टप्पा गाठला गेला. एखाद्या व्यक्तीची ‘खरी' किंवा जीवशास्त्रीय ओळख पटवण्यासाठी तिच्या DNA ची रचना हा मूलाधार ठरला. त्यासाठी आपल्या शरीराच्या एखाद्या भागातून पेशी बाहेर काढल्या जातात. पुढे त्यांच्यावर प्रयोगशाळेत विशिष्ट प्रक्रिया केली जाते. शेवटी त्यातून संबंधित व्यक्तीच्या DNA चे रेखाचित्र (प्रोफाइल ) तयार होते. अशाच प्रकारे पृथ्वीवरील कोणत्याही सजीवाचे DNA -रेखाचित्र मिळवता येते. या बहुमूल्य संशोधनाचा उपयोग मानवी शरीरशास्त्र, वनस्पती व प्राणिशास्त्र आणि शेतीच्या अभ्यासांत होऊ लागला. १९८३मध्ये प्रथमच या संशोधनाचा उपयोग गुन्हेगाराची खात्रीपूर्वक ओळख पटवण्यासाठी केला गेला.
एखाद्या गुन्ह्याच्या तपासात या शास्त्राचा उपयोग साधारण असा होतो. समजा एखाद्या ठिकाणी खून अथवा बलात्कार घडलेला आहे. तिथे प्रेत अथवा पिडीत व्यक्ती सापडते. त्या शरीरावर गुन्हेगाराच्या शरीराचे काही अंश सापडू शकतात. उदा. रक्ताचे डाग, त्वचेचे कण, वीर्याचा डाग, इ. आता अशा गोष्टी या पुरावा म्हणून गोळा करतात. पुढे प्रयोगशाळेत त्यांपासून DNA वेगळा काढून त्याचे रेखाचित्र बनवले जाते. कालांतराने पोलीस तपासात एखाद्या संशयितास अटक होते. आता त्याच्या शरीरातून पेशी काढून त्याचे DNA -रेखाचित्र मिळते. जर ते गुन्ह्याच्या ठिकाणी मिळालेल्या पुराव्याच्या रेखाचित्राशी जुळले तर हा संशयित गुन्ह्याच्या जागी हजर होता असे सिद्ध होते.
आता एक स्वाभाविक शंका अशी की (एकसमान जुळे नसलेल्या) दोन व्यक्तींचे सदर रेखाचित्र तंतोतंत जुळूच शकत नाही का? जसजशा संशोधन पद्धती विकसित होत गेल्या तसे या प्रश्नाचे संभाव्य उत्तरही बदलत गेले आहे. समजा, सध्याच्या अत्याधुनिक पद्धतीने दोन व्यक्तींची रेखाचित्रे केली आहेत. तर, ती तंतोतंत जुळण्याची शक्यता १०० अब्ज लोकांत १ इतकी अत्यल्प असते. म्हणजेच जवळजवळ नसते. दोन मानवी DNA-रेखाचित्रांची तुलना करून गुन्हेगाराची ओळख पक्की करणे हे आता न्यायवैद्यकात नियमित केले जाते आणि ते सर्वपरिचित आहे.
आता आपण या लेखाच्या अनोख्या विषयाकडे वळू. या गुन्ह्याच्या घटनेत त्या ठिकाणी आरोपीच्या शरीराचे कुठलेही अंश सापडले नव्हते. मात्र त्याच्या मालकीच्या ट्रकमध्ये एका झाडाच्या दोन बीन्सयुक्त शेंगा सापडल्या होत्या. त्यावरून संबंधित झाडाच्या DNA चे रेखाचित्र बनवले आणि त्यातून गुन्ह्याची उकल झाली. न्यायदानाच्या इतिहासातील हा अभूतपूर्व प्रसंग होता. आता वाचकांची उत्कंठा अधिक न ताणता त्या घटनेचा वृत्तांत सादर करतो.
अमेरिकेच्या ऍरिझोना राज्यातील ही घटना आहे. एका गावातील निर्जन भागात एका स्त्रीचा मृतदेह आढळतो. तो बराचसा विवस्त्र असतो. पोलीस तपासात तिच्या गळ्यावर दाबल्याच्या खुणा आढळतात. प्रेताच्या आजूबाजूस शोध घेता एक पेजर सापडत. (घटना मोबाईलपूर्व जमान्यातील आहे हे लक्षात आले असेलच). पुढे त्या देहाचे शवविच्छेदन झाले. त्यात बलात्काराचा कुठलाच पुरावा मिळाला नाही. तिचा गळा आवळून मृत्यू झाल्याचे निदान झाले. पुढील पोलीस चौकशीअंती दोन गोष्टी समजल्या. स्वैर वर्तनाची ती स्त्री त्या भागातून येणाऱ्या जाण्याऱ्या ट्रकचालकांकडून लिफ्ट मागत असे. त्यानिमित्ताने ती तिची लैंगिक भूक भागवी.
गुन्हास्थळी सापडलेल्या पेजरवरून त्याच्या मालकाचा शोध लागला. तो एक तरुण ट्रकचालक होता. त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारीची होती. त्याला अटक करून त्याची वैद्यकीय तपासणी झाली. त्याच्या चेहऱ्यावर काही ओचकारे होते. परंतु प्रेताच्या नखांमध्ये परक्या त्वचेचे अंश बिलकूल नव्हते. तसेच बलात्कार सिद्ध होईल असा पुरावा नव्हता. मग पोलिसांनी अधिक खोलात जाऊन तपास केला. त्यात तो खुनाच्या रात्री त्या भागातून गेल्याचे आणि घरी रात्री उशीरा पोचल्याचे समजले. हा सर्व परिस्थितीजन्य पुरावा मानून त्याला कोठडीत डांबण्यात आले. परंतु त्याच्यावर खुनाचा आरोप ठेवायला अजून भक्कम पुराव्याची गरज होती.
आता त्याच्या ट्रकची कसून तपासणी करण्यात आली. ट्रकचा पुढचा भाग त्याने स्वच्छ धुवून काढला होता. पण मागचा उघडा भाग मात्र धुतलेला नव्हता. त्या भागाची बारकाईने पाहणी करता त्यात दोन बीन्सयुक्त शेंगा सापडल्या. मग पोलिसांनी गुन्हास्थळाची कसून पाहणी केली. तिथे एक खास गोष्ट दिसली. तिथे रस्त्याच्या बाजूने बरीच हिरवीगार झाडे (palo verde जातीची) होती. त्यातील एका झाडाची फांदी जरा जास्तच पुढे लोंबत होती. त्याच झाडावर एके ठिकाणी जोरात घासले गेल्याच्या खुणा होत्या. या झाडालाही बीन्सयुक्त शेंगा होत्या आणि त्या दिसायला ट्रकमधील शेंगासारख्याच होत्या. हा विलक्षण योगायोग आता तपासाला महत्वाचे वळण देणार होता.
दोन्ही ठिकाणच्या शेंगा निव्वळ दिसायला सारख्या आहेत एवढ्यावर भागणार नव्हते. त्या शेंगा त्याच झाडाच्या आहेत हे सिद्ध करणे आवश्यक होते. मग पोलिसांनी वनस्पतीतज्ज्ञांना पाचारण केले. त्यांनी सांगितले की दोन्ही ठिकाणच्या शेंगांचा DNA पूर्णपणे जुळतो, हे दाखवावे लागेल. या प्रकारचे काम आतापर्यंत गुन्ह्याच्या संदर्भात कधी झालेले नव्हते. आता त्यासाठी विशेष प्रयोगशाळेचा शोध घेण्यात आला. हे काम अवघड होते. शेतीतज्ज्ञांनी देखील त्या जातीच्या झाडांचा DNA अभ्यास कधी केलेला नव्हता. अखेर पोलिसांच्या अथक प्रयत्नांती एक वैज्ञानिक हे आव्हानात्मक काम करण्यास तयार झाला.
प्रथम ट्रकमधल्या शेंगा प्रयोगशाळेत नेल्या. त्यातले बीन्स काढून निव्वळ साले मिक्सरमध्ये विशिष्ट द्रावणात घालून त्यांची पावडर करण्यात आली. नंतर वनस्पतींच्या DNA च्या अभ्यासाची विशेष चाचणी केली गेली. अखेर त्या DNA चे रेखाचित्र तयार झाले. शोधकार्यातील पुढचे टप्पे असे होते:
१. ट्रकमधील दोन्ही शेंगांचे DNA पूर्ण जुळले. त्यामुळे त्या एकाच झाडाच्या असल्याचे सिद्ध.
२. आता गुन्हास्थळीच्या झाडाच्या सालीवर तशीच प्रयोगशाळा प्रक्रिया केली. त्याचेही रेखाचित्र तयार.
३. वरील १ व २ मधील रेखाचित्रे तंतोतंत जुळली.
४. म्हणजेच, ट्रक त्या झाडाला घासल्याने त्याच्याच शेंगा ट्रकमध्ये पडल्याचे सिद्ध झाले. हा शोधकर्त्यांसाठी अत्यंत आनंदाचा क्षण होता.
पण भक्कम पुराव्यासाठी एवढ्याने भागणार नव्हते. त्या भागातील त्याच जातीच्या अन्य झाडांचीही अशीच चाचणी करणे आवश्यक होते. त्यासाठी प्रथम गुन्हास्थळीची १२ झाडे निवडून त्यांचे DNA तपासण्यात आले. ते गुन्ह्यातील झाडापेक्षा अगदी वेगळे होते. आता वैज्ञानिकांना उभारी आली. मग त्यांनी त्या राज्यातील शंभर ठिकाणच्या त्या जातीच्या झाडांचे नमुने गोळा केले. त्या सर्वांवर चाचणी झाली. या सर्वांचेही DNA पूर्ण वेगळे असल्याचे दिसले. आता वैज्ञानिकांनी त्यांचा अंतिम निर्णय दिला की, संबंधित झाडाच्याच शेंगा ट्रकमध्ये पडलेल्या होत्या.
आता सरकारपक्षाने त्यांचा न्यायालयीन मसुदा तयार केला. त्यात पुरावा म्हणून घटनास्थळी सापडलेला पेजर, ट्रकचालक त्या रात्री तिथून गेलेला असणे, त्याची पूर्वीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि ट्रकमधील शेंगांचा DNA-पुरावा हे सर्व सादर केले. घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार नव्हताच. पुराव्यांपैकी DNA वगळता अन्य सगळे 'पारिस्थितिजन्य' या सदरात मोडत होते. मृत स्त्री आणि आरोपी यांचा थेट शारीरिक संपर्क आल्याचा कोणताच पुरावा मिळालेला नव्हता. किंबहुना ही फिर्यादी पक्षाची सर्वात दुबळी बाजू होती. त्यांच्या दृष्टीने शेंगाच्या DNA ची चाचणी आणि जुळणी हाच सर्वात भक्कम पुरावा होता. न्यायदानाच्या इतिहासात असा पुरावा यापूर्वी कधीच सादर झालेला नव्हता. त्यामुळे न्यायाधीश तो कितपत गांभीर्याने घेणार अशी धास्ती होती.
खटल्यास प्रत्यक्ष सुरवात करण्याआधी न्यायालयाने एक विशेष सभा बोलावली. त्यात दोन्ही बाजूचे वकील, अनेक नामांकित वनस्पतीशास्त्रद्न्य आणि कायदेपंडितांचा समावेश होता. तब्बल ३ दिवस या सर्वांनी त्या विशेष मुद्द्यावर विचारविनिमय केला. अखेर न्यायाधीशांनी तो भक्कम पुरावा सादर करण्यास मान्यता दिली.
आता खटला उभा राहिला. दोन्ही बाजूंची छाननी सुरु झाली. आरोपीच्या वकिलांनी अर्थातच 'तो' पुरावा ग्राह्य नसल्याचे जोरदार प्रतिपादन केले. मुळात त्या झाडाच्या शेंगा पोलिसांनी मुद्दामच आरोपीच्या ट्रकमध्ये टाकल्या, असाही त्यांनी युक्तिवाद केला. या खटल्यात मानवी DNA जुळणीचा पुरावा अजिबात नसल्याने बाकीचे सर्व पुरावे गौण आहेत अशीही त्यांनी पुस्ती जोडली. अखेर दोन्ही बाजूंचे युक्तिवाद संपले. आरोपीने आपण निर्दोष असल्याचे सांगितले. तपासातील घटनाक्रमात आधी ट्रकमध्ये शेंगा सापडल्या होत्या. त्यानंतरच पोलिसांनी झाडांची पाहणी केली होती. न्यायालयाने ही बाब महत्वाची मानली.
कालांतराने न्यायालयाने पूर्ण विचारांती निर्णय दिला. आरोपीवर त्या स्त्रीच्या खुनाचा गुन्हा सिद्ध झाल्याने तो दोषी ठरला. त्याला २५ वर्षांची (विनापॅरोल) जन्मठेप सुनावण्यात आली. आरोपीने पुढे वरच्या न्यायालयात याचिका दाखल केली. तिथेही पहिल्या न्यायालयाचाच निर्णय कायम ठेवण्यात आला.
तर अशी ही गुन्हेगारी घटना. तिच्या तपासाचा केंद्रबिंदू एका झाडाचा DNA राहिल्याने वैशिष्ट्यपूर्ण ठरलेली. प्रत्येक सजीवाला त्याचा DNA त्याची निजखूण देतो, हाच मुद्दा यातून अधोरेखित झाला.
या लेखाच्या निमित्ताने गुन्हेगाराची जीवशास्त्रीय ओळख, त्यातील काही अडचणी आणि नवे संशोधन याची भर घालतो. असे म्हणतात की गुन्हेगार आणि पोलीस यांच्यात गुन्हेगार नेहमी एक पाउल पुढे राहायचा प्रयत्न करतो. विसाव्या शतकात डीएनए रेखाचित्राचे संशोधन विकसित होणे ही गुन्हेगारांसाठी मोठी डोकेदुखी ठरली. एखाद्याच्या शरीराचा थोडा सुद्धा अंश गुन्हास्थळी राहून जाणे हे त्यांच्यासाठी कटकटीचे ठरते. तेव्हा यावर कशी मात करायची हा गुन्हेगारी जमातीपुढचा पुढचा प्रश्न होता.
आता अट्टल ‘डोकेबाज’ गुन्हेगार पुढची शक्कल लढवतात. अन्य एखाद्या व्यक्तीचा खोटा (fabricated) DNA प्रयोगशाळेत तयार करतात आणि त्याचे “ठसे” गुन्ह्याच्या जागी पेरतात ! किंवा, पोलीस सुद्धा असा ‘उद्योग’ करून भलत्याच व्यक्तीला आरोपी म्हणून गोवू शकतात !!
ठीक आहे, विज्ञानही काही कमी नाही. यावर मात करण्यासाठी संबंधित चाचण्यांत देखील सुधारणा करण्यात आली आहे. एखाद्याचा ‘खराखुरा’ DNA आणि ‘बनावट’ DNA यातील फरक कळण्याची नवी पद्धत विकसित झाली आहे.
विज्ञान संशोधनाचा उपयोग विधायक कामासाठी व्हावा ही अपेक्षा असते. परंतु, अशा प्रकारचे संशोधन हे माणसातील अपप्रवृत्तीवर मात करण्यासठी खर्ची पडते हे खरे.
****************************************************************
प्रतिक्रिया
2 Dec 2019 - 5:26 pm | मुक्त विहारि
शास्त्राचा समजोपयोगी वापर. ..
2 Dec 2019 - 8:41 pm | जॉनविक्क
करेक्ट, या परिस्थितीत जर ड्रायव्हर ने त्या परिसरातून गेलोच न्हवतो असा सूर लावला असेल तरच हा पुरावा सबळ ठरतो अन्यथा तो एखादे ठिकाणी होता ही गोष्ट गुन्हा त्यानेच केला हे सिद्ध कसे करणार ? पुन्हा त्याच्या चेहऱ्यावर जखमा परंतु स्त्रीच्या शरीरावर त्याच्या कसल्याच खाणाखुणा नाहीत ही बाब गँभीर त्रुटी दाखवते.
2 Dec 2019 - 8:52 pm | कुमार१
मु वि, जॉन,
धन्यवाद.
जॉन,
बरोबर. यातले मुद्दे वादग्रस्त आहेत खरे.
2 Dec 2019 - 8:59 pm | जॉनविक्क
मग ? पहाणी काय आधी करणार का ? काय राव...
माझी मती गुंग झाली आहे अथवा सविस्तर लिखाण हवे होते
2 Dec 2019 - 9:11 pm | कुमार१
अजून स्पष्टीकरण देतो.
घटनेच्या जागी 'ती' झाडे आहेत. आरोपीचे वकील म्हणतात की पोलिसांनी प्रथम त्या झाडाच्या शेंगा तोडल्या. नंतर त्यांनी त्या ट्रकमध्ये टाकल्या.
वास्तव : ट्रकमध्ये शेंगा मिळाल्यावरच तसे झाड शोधलेले आहे.
2 Dec 2019 - 9:52 pm | जॉनविक्क
पुरावा बनावट नाही यासंदर्भात ते बरोबर आहे, मी फक्त त्याचा गुन्हा केलाच याबाबत ठोस पुरावा म्हणून सिग्निफिकेनंस काय यानुशनगे विधान केले.
3 Dec 2019 - 7:02 am | nanaba
Malahi hich shanka ahe. Seems insufficient.
Ani udya mee hee tithun pass zale asen tar Shenga mazya gadit dekhil sapadu shakatat.
3 Dec 2019 - 9:03 am | कुमार१
त्याचा पेजर, तोही प्रेता जवळ : हा मुद्दा बघावा .
3 Dec 2019 - 10:25 am | जॉनविक्क
त्यामुळे झाडाचा DNA मुद्दा अतिशय पूरक बनला हे सिद्ध व्हायला की तो प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन गेला पण...
पेजर चोरीला गेलेला असू शकतो.
विशेषतः तो त्याभागातून गेला असल्याने तिथे चोरी होऊ शकते
तो गुन्हा घडला त्या दिवशीच व त्याच वेळी झाडाला धडकला होता हे कसे सिद्ध होणार ? कदाचित गुन्हा घडल्यानंतर अथवा आधीही तो तिथून गेला असेल ?
मुळात स्त्रीच्या आसपास त्याचे काहीही पुरावे न मिळणे ही गोष्ट त्यांचा संपर्क झाला हेच सिद्ध करत नाही तर तो तिकडे होता की न्हवता हा परिस्थितीजन्य पुरावा गुन्हा त्याने केला हे सिद्ध व्हायलाही अपूर्णच राहतो आता त्याने तो तिकडे फिरकलाच नाही असा युक्तिवाद केला असेल तर तो अडकतो.
पण पेजर गायब आहे हे त्यालाही माहीत व त्याच्या वकीलालाही त्यामुळे तो तिकडून गेला हे त्याने नाकारले नसावे
3 Dec 2019 - 6:25 pm | कुमार१
* त्याने पेजर हरवल्याची पोलीस तक्रार नोंदवली नसणारच
* खुनाच्या रात्रीच एक ट्रक तिथून गेला हे पाहणारा साक्षीदार आहे.
...
शेवटी परिस्थितीजन्य अधीक वनस्पतीजन्य पुरावे एकत्रित तपासून न्यायदान झाले असावे ☺️
3 Dec 2019 - 10:42 pm | जॉनविक्क
इतकंच स्पष्ट करतात, त्याने खून केला यासाठी जे पुरावे आवश्यक आहेत ते इथं आलेले नाहीत. असो, उप्पर मला समज अजून निर्माण होत नाही हे मान्य करतो.
3 Dec 2019 - 10:11 pm | तुषार काळभोर
सोळा सतरा वर्षांपूर्वी डिस्कवरी वर पाहिला होता.
अजुन एक आठवतो ज्यात घरातील माशांच्या खाणं कुटण्याच्या खलबत्त्यात सायनाइड कुटल्याचा पुरावा सापडला होता.
त्यावेळी डिस्कवरी च दर्जा लै वरचा होता.
3 Dec 2019 - 10:27 pm | तुषार काळभोर
https://en.m.wikipedia.org/wiki/Stella_Nickell
माशांच्या टाकी मधलं शेवाळ काढण्यासाठी शेवाळविरोधी औषध ज्यात कुटलं त्यातच cynide मिक्स केलं होतं.
4 Dec 2019 - 10:48 am | कुमार१
जॉन + १
पैलवान ,
तोही भाग रोचक आहे .
4 Dec 2019 - 4:28 pm | सुधीर कांदळकर
वनस्पतीसंबंधी डीएनए जुळवणीबद्दल प्रथमच वाचले.
तरीही त्यांच्या न्यायव्यवस्थेचे कौतुक वाटते.
छान लेख, आवडला. धन्यवाद.
5 Dec 2019 - 6:22 pm | ट्रम्प
कुमार साहेब सतत काहीतरी नवीन घेऊन येत असतात !!!
हा भाग पण मस्त जमून आला आहे .
युरोप , अमेरिकावाल्यांची तपास पथके आणि त्यांची बुद्धी वाखाणण्याजोगी असते पण मला वाईट वाटते की आपल्या भारतात इथे सुद्धा उदासीनता दिसून येते .
कित्तेक केसेस तपास न लावता बंद केलेल्या असतात .
6 Dec 2019 - 8:29 am | मुक्त विहारि
हा एक संशोधनाचा विषय आहे.
5 Dec 2019 - 6:48 pm | कुमार१
सुधीर + १
ट्रम्प,
तुमच्यासारखे चोखंदळ आणि प्रोत्साहक वाचक लाभल्यामुळे लिहावे वाटते !
धन्यवाद !
5 Dec 2019 - 6:53 pm | ट्रम्प
थोडे विषयांतर होईल !!
साधारण एक महिन्यापूर्वी भारतातील काही लोकांना व्हाट्सएपग्रुप वर चाईल्ड पोर्नोग्राफी पाहिली म्हणून देशभरातील काही लोकांना पोलिसांनी अटक केली होती . परदेशी काही व्यक्ती असल्या फिल्म शूट करून यांना विकायचे .
सुप्रीम कोर्टाने पोर्नोग्राफी पाहणे हा गुन्हा नसून तिचा प्रसार करणे हा गुन्हा ठरविला असताना या लोकांना चाईल्ड पोर्नोग्राफी च्या केस मध्ये उचलले .
म्हणजे सरकार बऱ्यापैकी लोकं इंटरनेट वर काय बघतात याचा मागोवा घेऊ शकते .
5 Dec 2019 - 11:18 pm | जॉनविक्क
तुम्हाला अटक करणे जसा बिंडोक पणा ठरतो तसेच काहीसे अशा कंटेंट बाबत असते की पहाणाऱ्याला जबाबदार ठरवता येत नाही परंतु उद्या मीपा अशा कंटेंट साठीच स्थापन केले गेले असे सिध्द झाले व ते उघडही असेल तर त्याचे सदस्य सदस्य असल्या बद्दल गजाआड जाऊ शकतात.
WhatsApp group यासाठीच स्थापन झाला (जसे की त्याचे नाव व इतर माहिती) तर त्याच्या सदस्यांना अटक होऊ शकते परंतु शिक्षा होणे ही वेगळी प्रक्रिया आहे
6 Dec 2019 - 8:39 am | कुमार१
लेखात उल्लेख केलेल्या मालिकेबाबत थोडेसे:
फॉरेन्सिक फाईल्स ' मालिका सुंदरच आहे. सत्य घटनांचे सादरीकरण, भारदस्त निवेदन, वैज्ञानिक व अन्य अधिकाऱ्यांच्या थेट मुलाखती, सखोल प्रयोगशाळा तंत्रदर्शन आणि विश्लेषण.
* या भागाचे शीर्षक तर खासच - Planted Evidence.
6 Dec 2019 - 12:38 pm | डॉ. विजय
.
7 Dec 2019 - 2:17 pm | कुमार१
१. ही घटना लेखासाठी निवडताना 'वनस्पती-DNA' हाच रोचक मुद्दा केंद्रस्थानी आहे.
२. कायदेशीर वादविवाद होणे स्वाभाविक आहे.
३. खटल्यात परिस्थितीजन्य अधिक वनस्पतीजन्य पुरावे एकत्रित तपासून न्यायदान झाले असावे, असे त्यांच्या निवेदनावरून दिसते.
४. २ न्यायालयांनी तोच निर्णय दिलेला आहे. त्याला फर्स्ट डिग्री मर्डर असे दोषी ठरवले आहे.
५. पुढे आरोपी अजून वरच्या न्यायालयात जाणार आहे, या वाक्याने ते निवेदन संपते.
…… चर्चेत सहभागी सर्वांचे आभार !
7 Dec 2019 - 3:13 pm | जॉनविक्क
त्याला तिथे न्हेऊन चकमकीत संपवलं तर ?
7 Dec 2019 - 3:25 pm | कुमार१
जाऊद्यात झालं, त्यो देश येगळा
आपणास न्हाई ठाऊक तिकडं काय असतया...
10 Dec 2019 - 10:08 am | चौकटराजा
मला मागे मेडिकल डिटेक्टीव्ह या मालिकेचे वेड लागले होते . तशीच ही मालिका असावी . माझ्या मते डी एन ए चा शोध हा २० व्या शतकातील पाच अत्यंत मुलभूत अशा शोधातील एक आहे ! यात तर्क हा पाया मानला तर न्यायालयीन प्रक्रियेत डी एन ए सारख्या गोष्टीचे महत्व कमी होऊन शकते पण जास्तीत जास्त जवळचे सत्य म्हणून फोरेन्सिक पुराव्यांचा उपयोग मात्र जरूर होतो .
जाता जाता --- चीन मध्ये माकड व डुक्कर यांच्या संकराने एक नवीन प्रजाती निर्माण केल्याचा दावा चीनने केला आहे. सदर प्राणी फक्त आठेक दिवस जगला म्हणे !
10 Dec 2019 - 11:12 am | कुमार१
>>>>
भारी . सध्या चीन माणसाची जनुके देखील बदलण्याचे वादग्रस्त प्रयोग करत आहे. भविष्यात माणूस आणि अन्य प्राणी असे संकर निर्माण केले जाईल काय ?
25 Jul 2020 - 7:49 am | कुमार१
निर्जंतुकीकरणामुळे चोरीच्या तपासाचा पेच!
https://www.loksatta.com/nagpur-news/corona-positive-patient-theft-crime...
चोराच्या हाताचे ठसे गायब !
25 Jul 2020 - 1:29 pm | गामा पैलवान
सुधारित दुवा : https://www.loksatta.com/nagpur-news/corona-positive-patient-theft-crime...
-गा.पै.
25 Jul 2020 - 1:43 pm | कुमार१
धन्यवाद
काय झालं काय माहीत...
29 Apr 2022 - 11:16 am | कुमार१
एखाद्या मृत व्यक्तीच्या बाबतीत तिचा खून झाला आहे की आत्महत्या हा पेच अनेकदा पडतो.
याबाबतीत न्यायवैद्यक तज्ञांचे मत महत्त्वाचे असते.
यासंदर्भातील वाचनात येणारी काही प्रकरणे या धाग्यावर लिहायचा मानस आहे.
.....
ही एक पुण्यातील बातमी :
आपल्या जवळच्या व्यक्तीचा खून करायचा आणि त्याने आत्महत्या केली असा आभास घटनास्थळी निर्माण करायचा, या प्रकारच्या पाच घटना गेल्या चार महिन्यांमध्ये घडल्या आहेत.
संबंधित खून अगदी जवळच्या नातलगांनी केले आहेत. पुण्याच्या ससून रुग्णालयात अशा मृतदेहांचे शवविच्छेदन केल्यानंतर संबंधित गुन्हे आत्महत्या नसून खून असल्याचे सिद्ध झाले. अशी माहिती तेथील न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर अजय तावरे यांनी दिली आहे .
संदर्भ : छापील सकाळ, २९ एप्रिल २०२२