राधा …....१
आता फक्त आजचीच रात्र. तिनं स्वत:लाच समजावलं. पण मन तर बाभरं झालेलं. ऐकतय थोडंच. ते द्वारकेत पोचलं सुद्धा. काय करत असेल तो या वेळी ? इतक्या वर्षांनी आपण भेटणार म्हणून डोळ्यातून आनंद उतू जात असेल का? त्याचे भावुक डोळे मनातलं सगळं बोलून जात. म्हणून गोकुळात असताना तिची कधी काही खोडी करायची असेल तर तो तिच्या मागे उभा राहत असे, डोळे लपवून. कारण त्याचे डोळे तिच्यापासून काही लपवू शकत नसत. याउलट अनयचे डोळे, तिला त्याआडचं मन कधी समजतंच नसे.