भीतीच्या भिंती: १

आतिवास's picture
आतिवास in जनातलं, मनातलं
5 Dec 2014 - 11:35 pm

(नोंद: काबूलमधील वास्तव्यावर आधारित लेखमालिका. सुरक्षेच्या कारणांमुळे नावं बदलली आहेत. फार फोटोही देता येणार नाहीत.)

१. एक तास जास्तीचा

“विमानतळातून बाहेर पडलं की डाव्या बाजूला वळायचं, पाच मिनिटं चाललं की ‘पार्किंग बी’ अशी पाटी दिसेल, मी तिथं उभा असेन तू पोचशील तेव्हा” असं जॉर्जने मला लिहीलं होतं. आत्तापर्यंतचे सोपस्कार त्याने सांगितल्यानुसार पार पडले होते – आधी दोन फोटो देऊन आणि पासपोर्ट दाखवून नोंदणी करण्याचा सोपस्कार अपेक्षेपेक्षा फार सहजतेने पार पडला होता. माझा पासपोर्ट पाहून त्या दोनपैकी एका युवकाने “इंडिया?” असं विचारलं होतं. बहुधा ‘एअर इंडिया’च्या विमानाने मी आल्यामुळे हा प्रश्न ‘प्रश्न’ नव्हताच खरं तर! मी होकारार्थी मान हलवताच त्यानं माझ्याशी थेट हिंदीत बोलायला सुरुवात केली होती. त्यामुळे बसलेल्या आश्चर्याच्या धक्क्यातून मी सावरत होते; तोवर माझं सामान अचूक ओळखून सरकत्या बेल्टवरून ते माझ्या ताब्यात दुस-याने दिलं होतं. याला आपलं सामान कसं काय ओळखू आलं – हाही प्रश्न मनात होता माझ्या. कस्टमच्या अधिका-याने माझ्याकडे न पाहताच पासपोर्टवर शिक्का मारून दिला होता. आणि मी बाहेर आले होते.

मी डावीकडे वळणार तितक्यात एक बंदूकधारी सैनिक समोर दिसला. त्याने समोरच्या बसमध्ये चढण्याची मला खूण केली. पण मला बसने जायचं नव्हतंच! पाच मिनिटं चालत जायला बस कशाला हवी? मी त्याला शांतपणे “पार्किंग बी” असं सांगितलं. त्यावर ठसक्यात “बस” असं तो म्हणाला. ते म्हणताना त्याची नजर इतकी शांत होती की मी घाबरले. मी आणखी काही बोलायच्या आधी तो पुन्हा म्हणाला, “नो डिस्कशन”. आमचा हा प्रेमळ संवाद ऐकत असणारा बसचा चालक समोर आला आणि मला म्हणाला, “चलिये,” आणि मी काही म्हणायच्या आत त्याने माझं सामान बसमध्ये चढवलं देखील. मलाही त्या बसमध्ये चढण्याविना पर्याय नव्हता.

ही बस नेमकी कुठं घेऊन जाणार मला या विचारात मी पडले.
मग मी चालकाला विचारलं “मुझे तो ‘पार्किंग बी’ जाना था, क्यों नही जाने दिया?”
तो म्हणाला, ”व्हीआयपी है कोई आज! आप चिंता मत करो, मै आपको पार्किंग बी छोड दूंगा”.

दिल्लीत काही काळ राहून “व्हीआयपी” ही काय चीज आहे हे मला माहिती होतं. मी विचार करायचं सोडून दिलं.

पाचेक मिनिटांत ईप्सित स्थळी आमची बस पोचली होती. चालकाने सामान काढून दिलं. दुसरा कोणीतरी समोर आला – त्याला सांगितलं, “पार्किंग बी छोड दो इन्हे.” त्याने ट्रॉलीवर माझं सामान तोवर उतरवून घेतलं होतंच.

“पैसा,” चालक म्हणाला.
बक्षीसी मागतोय तो, हे मला कळलं.
माझ्याकडे डॉलर्स नव्हते. दिल्ली विमानतळावर गडबडीत रुपयांचे डॉलर्स करून घ्यायचे राहिलेच होते. “डॉलर्स नही है मेरे पास” मी स्पष्टीकरण दिलं. हो, उगाच अपेक्षाभंग नको त्याचा व्हायला.

“इंडियन रुपी चलेगा, चलता है वो यहाँ ”, तो शांतपणे म्हणाला.
एक नोट त्याच्या हातात ठेवून मी निघाले. खरं तर पैसे देण्याइतकं काही काम त्याने केलं नव्हतं. पण परक्या देशात कंजूसपणा करून मित्रांचे शत्रू करण्याचं मी टाळायला हवं – निदान जॉर्ज भेटेपर्यंत तरी – हे मला कळत होतं.

‘पार्किंग बी’ मध्ये सामसूम होती. जॉर्ज ‘वाटेल’ असा कुणी माणूस दिसत नव्हता. किंबहुना कुणी माणसं नव्हतीच. दुपारची तीनची वेळ होती – तरी एक क्षण मला भीती वाटली. अनोळखी प्रदेश; दहशतवाद्यांचा प्रदेश; युद्धाचा प्रदेश. “तिथं जायचं काही अडलंय का? एवढा अटटहास का? दुसरी ठिकाणं नाहीत का जगात जायला तुला?” या तिरकस प्रश्नाचा सामना करण्यात मागचे दोन तीन महिने गेले होते माझे. “या प्रश्नाला काहीही अर्थ नाही कारण सगळं जग आता दहशतवादाचा सामना करतंय” असा माझा त्यावरचा युक्तिवाद एक क्षणभर का होईन डळमळीत झाला.

पण आपल्या प्रतिक्रिया फार “क्षणिक” असतात, त्या बदलतात हे मला माहिती होतं आजवरच्या अनुभवाने. इथं काम करायला येण्याचा माझा निर्णय भावनिक नव्हता, पर्याय नसण्याच्या अगतिकतेतून नव्हता किंवा कसल्या उद्वेगातूनही नव्हता. ‘एक नवं जग पाहण्याची संधी’ म्हणून मी इथं आले होते. मग या जगाचे ताणेबाणे समजून न घेताच निष्कर्ष काढण्याची घाई कशाला करत होते मी ? मी स्वत:शीच हसले.

तेवढ्यात मला माझ्या ऑफिसची गाडी दिसली. पण त्या गाडीत कुणीच नव्हतं. पण गाडीच्या मागच्या बाजूला एक माणूस फोनवर बोलताना दिसला. मी त्याला “जॉर्ज?” असं विचारल्यावर गडबडीने त्याने तो फोन बंद केला, दुस-या कुणाला तरी फोन केला, आणि सामान गाडीच्या मागच्या भागात ठेवायला सुरुवात केली. जॉर्ज मला शोधत तिकडे प्रवेशद्वाराशी उभा असणार. म्हणजे हा गाडीचा चालक होता तर!

ट्रॉलीवर माझं सामान आणणारा माणूस माझ्याकडे अपेक्षेने पहात होता. त्याच्या हाती पुन्हा एकदा काही पैसे देऊन मी सुटकेचा निश्वास टाकला.

डोळे मिटले तर नुकताच पाहिलेला बर्फाच्छादित शिखरांचा हिंदुकुश दिसला. अखेर मी इथे पोचले आहे तर! आता हे माझं गाव असणार आहे आणि इथले रस्ते माझे होऊन जाणार आहेत – काही काळ तरी.
Hindukush

कारण हे आहे काबूल!
**
काबूल!
चार महिन्यांपूर्वी अफगाणिस्तानची राजधानी इतकीच मला त्याची ओळख होती.

एक दिवस उगाच ‘काबूलमध्ये अमुक एक काम आहे’ अशी जाहिरात वाचली. अर्ज ऑनलाईन करायचा होता तो केला आणि गंमतीचा अनुभव घेऊन हसत ती विसरून गेले. पुढे यथावकाश मुलाखतीचं आमंत्रण आलं. या आंतरराष्ट्रीय मुलाखतींचं एक चांगलं असतं. आपल्याकडे किती माहिती आहे यापेक्षा आपलं ज्ञान काय आहे आणि मुख्य म्हणजे दृष्टिकोन काय आहे हे तपासतात ते. त्यामुळे मुलाखत देणं हा दडपणाचा मुद्दा न ठरता आत्मपरीक्षणाची संधी ठरते. मजा आली मला ती मुलाखत देताना. मुलाखत झाल्यावर लोक ‘आपली निवड होणार का नाही’ याचा आडाखा कसा बांधतात याबद्दल मला कुतूहल वाटतं – कारण आपण इतर उमदेवार पाहिलेले नसतात. मी आपली पुढच्या कामांना लागले.

दोन-तीन आठवडे निवांत गेले. गडबड सुरु झाली ती ‘तुमची निवड झाली आहे’ हे पत्र आल्यावर. एखादी संधी आपल्यासमोर आली तर त्याला काहीतरी अर्थ असतो – त्यामुळे ती विनाकारण नाकारू नये हे माझं मत. शिवाय संस्था युनायटेड नेशन्सच्या संस्थांपैकी एक. त्याच संस्थेच्या दिल्ली ऑफिसबरोबर मी अडीच वर्ष काम करत होते – त्यामुळे संस्थेची विश्वासार्हता हा प्रश्न नव्हता. “सौदीत पासपोर्ट कंपनीला द्यावा लागतो” या बातमीचा बराच पगडा आपल्या लोकांच्या मनावर आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी मी “युएनमध्ये असं काही नसतं; माझा पासपोर्ट माझ्याकडेच राहील; मला पाहिजे तेव्हा मी परत येऊ शकते” म्हणत होते. हे वाक्य मी पुढच्या दोन महिन्यांत किमान शंभर वेळा उच्चारणार आहे याचा मला अंदाज आलाच.

‘ही संधी घ्यावी असं वाटतंय’ हे कळल्यावर मी जरा गंभीरपणे माहिती काढायला सुरुवात केली. इंटरनेटवरच्या सगळ्या बातम्या भयावह होत्या – एकही सकारात्मक बातमी नाही. तालिबानी हल्ले, बॉम्बस्फोट, अपहरण आणि मृतांची संख्या. त्यात भर पडली ती अमेरिका २०१४ पर्यंत अफगाणमधून सैन्य माघारी घेणार आणि एप्रिल २०१४ मध्ये राष्ट्राध्यक्ष निवडणूक असणार या बातम्यांची. २०१४ नंतर देश पुन्हा तालिबानच्या ताब्यात जाणार की काय, अंतर्गत यादवी होणार की काय... अशाच बातम्या.

मग मी एक काम केलं. प्रत्यक्ष काबूलमध्ये कामासाठी एक वर्ष राहून आलेल्या दोन तीन लोकांशी बोलायचं ठरवलं. पत्रकार निळू दामले यांचा नंबर मिळाला, त्यांच्याशी बोलले. “बिनधास्त जा” असं त्यांनी सांगितलं तरी मी काही पत्रकार नाही; त्यामुळे त्यांचा सल्ला जसाच्या तसा स्वीकारण्यात अर्थ नव्हता. शिवाय ‘स्त्रियांसाठी कितपत धोकादायक आहे तिथं’ हे एखादी स्त्रीच जास्त चांगलं सांगू शकेल. म्हणून मग इंडियन इकॉनॉमिक सर्विसच्या अधिकारी मंजुळा यांच्याशी बोलले. त्या २००८ मध्ये एक वर्ष तिथं काम करत होत्या. त्यांनीही “चांगला अनुभव आहे, तुला खूप काही नवं पहायला मिळेल, शिकायला मिळेल” असं प्रोत्साहन दिलं. सध्या अमेरिकेत असलेल्या रेणू यांच्याशी स्काईपवर बोलणं झालं तेव्हा काबूलमधल्या राहायच्या व्यवस्था कोणत्या आहेत, त्यापैकी मी कोणत्या व्यवस्थेचा आग्रह धरावा याबद्दल त्यांनी आवर्जून सांगितलं. सुचिथ या श्रीलंकेच्या गृहस्थांशी एकीने जोड घालून दिली होती; तोही तासभर माझ्याशी बोलला. यातल्या कुणाशीच माझी काहीही ओळख नव्हती – पण ज्या आपुलकीने त्यांनी माझ्या प्रश्नांना न कंटाळता उत्तरं दिली, त्यातून माझ्या लक्षात आलं की काबूलला मी जाण्यापूर्वीच त्या धाग्याने ते माझ्या मदतीस तयार होते. यातला ‘सुचिथ’ तर प्रत्यक्ष काबूलमध्ये होता आणि मी ज्या संस्थेत जाणार तिथं काम करत होता. त्याची पुढे मला खूप मदत झाली.

पण दरम्यान मी माझ्या मनातले सगळे प्रश्न – विशेषत: सुरक्षेविषयीचे प्रश्न – लिहून पाठवले; आणि संस्थेच्या लोकांकडून त्याचं सविस्तर उत्तरही आलं. कामाबाबत मला काळजी नव्हती, ते आव्हानात्मक असेल तितकं चांगलंच असतं. माझ्या मनाची पूर्ण तयारी झाली होती. मग ‘नको जाऊ’ असा आग्रह धरणा-या जवळच्या लोकांचं मतपरिवर्तन करण्याचं कामही पार पडलं.

मग विसा मिळण्यात ज्या यायच्या त्या अडचणी आल्या. अफगाणमध्ये नोकरीसाठी यायचं तर इथल्या परराष्ट्र मंत्रालयाकडून एक क्रमांक आपल्या देशातील अफगाण दुतावासाला कळवला जातो. तिकीट ऑफिस काढणार असल्याने विसा मिळाला नाही म्हणून प्रवास पुढे ढकलला गेला, तर त्यात माझं आर्थिक नुकसान काहीच नव्हतं म्हणून मी निवांत होते. नउ एप्रिलला मला तो नंबर मिळाला, दहा एप्रिलला मी मुंबईत. तिथल्या एका मराठी स्त्रीच्या (कर्मचारी) सहकार्यामुळे त्याच संध्याकाळी विसा मिळाला.

१३ एप्रिल. दिल्ली विमानातळ. अफगाण स्त्रिया आधुनिक पेहरावात होत्या पण डोकं झाकलेलं होतं त्याचं. पुरुष सूट-टाय-कोट या वेशात होते. म्हणजे अफगाणी लोक काही मागच्या शतकात राहत नाहीत असा दिलासा मिळाला. ते आपापसात बोलत होते; हळू आवाजात, त्यामुळे फार काही ऐकू येत नव्हतं आणि कळतही नव्हतं. बरेच विदेशी लोकही दिसत होते सोबत प्रवास करणारे. विमानतळावर वर्तमानपत्राच्या कागदात बांधून आणलेले काहीतरी सगळे अफगाण स्त्री-पुरुष आनंदाने खात होते – काय असावं ते?

काबूलमध्ये प्रवेश करताना हिंदुकुश पर्वताच्या रांगा दिसल्या - त्यावर अजून थोडं बर्फ शिल्लक होतं - हिवाळ्यात काय दृश्य दिसते असेल ना ते! काबूल खूप मोठ शहर दिसतंय - घर मातीची दिसताहेत - आणि बहुमजली इमारती जवळजवळ नाहीतच.
kabul skyview

एरवी उजाड दिसणारा भाग एकदम हिरव्या तुकड्यांचा दिसला. काय लावतात हे आत्ता उन्हाळ्यात? पाणी कुठून येतं?

प्रश्न प्रश्न आणि प्रश्न. यथावकाश या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील.

त्या दिवशी पुणे दिल्ली आणि मग दिल्ली काबूल असा प्रवास करत मी इथं पोचले. इथलं घड्याळ भारतापेक्षा एक तास मागं आहे. त्यामुळे आजच्या दिवशी आयुष्यात एक तास जास्तीचा मिळालाय.

क्रमश:

भीतीच्या भिंती:२. जिवंत असण्याचा पुरावा

समाजअनुभव

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

5 Dec 2014 - 11:49 pm | श्रीरंग_जोशी

स्वानुभावावर आधारित ही लेखमालिका उत्कंठावर्धक असणार हे नक्की.

पुभाप्र.

अत्रुप्त आत्मा's picture

6 Dec 2014 - 12:05 am | अत्रुप्त आत्मा

+++१११

राघवेंद्र's picture

6 Dec 2014 - 12:23 am | राघवेंद्र

अरे वा मस्तच!!!

रामपुरी's picture

5 Dec 2014 - 11:53 pm | रामपुरी

वाचतोय... पु भा प्र

कवितानागेश's picture

5 Dec 2014 - 11:56 pm | कवितानागेश

धास्तावतच वाचतेय....

सखी's picture

6 Dec 2014 - 1:25 am | सखी

असेच म्हणते.
पुभाप्र.

विनोद१८'s picture

6 Dec 2014 - 12:12 am | विनोद१८

ह्या अब्दालीच्या प्रदेशाविषयी अधिक जाणुन घेण्यात कुतुहल आहे. छान लिहीता.

"इथलं घड्याळ भारतापेक्षा एक तास मागं आहे. त्यामुळे आजच्या दिवशी आयुष्यात एक तास जास्तीचा मिळालाय."

जीवनाकडे बघायचा हा तुमचा द्रुष्टीकोनच खूप काही सांगून जातो.

बहुगुणी's picture

6 Dec 2014 - 1:07 am | बहुगुणी

तुमच्या मुरब्बी नजरेला हा देश कसा वाटला हे तुमच्या आधीच्या लेखापासून वाटलेलं कुतुहल आहे, ते शमेल. (ही लेखमाला chronologically 'स्थिर अफगाणिस्तान भारताच्या हिताचा' या लेखाच्या आधीच्या कालावधीचं वर्णन असेल ना?)

आतिवास's picture

6 Dec 2014 - 2:02 am | आतिवास

हो. तांत्रिक दृष्ट्या हे आधीचे अनुभव आहेत. याआधीचा लेख हा एकंदर गोषवारा होता - तो एका साप्ताहिकासाठी (की पाक्षिक? आठवत नाही आता!) लिहिला होता, तोच मिपावर प्रसिद्ध केला आहे.

उत्कंठा वाढली आहे. हे सर्व सांगता आहात. धन्यवाद. संस्थळांवरचे वाद वाचण्यापेक्षा हे ओअॅसिस आवडले. ते अफगाण काबुलीचण्याचे फलाफल खात होते वाटतं.

बोका-ए-आझम's picture

6 Dec 2014 - 8:29 am | बोका-ए-आझम

पुभाप्र! पुभाप्र! पुभाप्र!

प्रचेतस's picture

6 Dec 2014 - 9:30 am | प्रचेतस

उत्कंठावर्धक लेखन.
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.

स्पा's picture

6 Dec 2014 - 10:00 am | स्पा

असेच म्हणतो

आसुड's picture

6 Dec 2014 - 9:30 am | आसुड

वा वा वा !!! वल्लाह... दिल गुलजार हो गया !!! लगता है के काबुल कि गलिया घुमने मिलेगी .... पुढचे भाग लवकर येऊ देत.

मित्रहो's picture

6 Dec 2014 - 9:52 am | मित्रहो

फार उत्कंठावर्धक लेखन
हा सारा अनुभव तुमचा स्वतःचा, उत्कंठा फार वाढलीय. काबूल किंवा अफगणिस्तानबद्दल जे वाचायला मिळते ते फक्त वृत्तपत्रातून. असा स्वतःचा अनुभव फारसा वाचायला मिळत नाही.

विलासराव's picture

6 Dec 2014 - 10:53 am | विलासराव

काबुलबद्दल वाचायला आवडेल. त्या तालीबानी लोकांनी ज्या बुद्धमुर्ती तोडल्या त्याबद्द्ल काही माहीती, फोटोज असतील तर इथे द्या किंवा मला व्यनी करा.

मागच्या आठवड्यात आमच्या इथे लालबागला विवेकानंद व्याख्यानमालेत निळु दामले आले होते. त्यांचा विषय होता आरक्षण.एकंदरीत निर्भीड आनी अभ्यासु वाटले.

विशाखा पाटील's picture

6 Dec 2014 - 10:58 am | विशाखा पाटील

लेखन आवडलं. एका धगधगत्या देशातले आपले अनुभव रोचक आहेत. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.

सविता००१'s picture

6 Dec 2014 - 12:17 pm | सविता००१

पुभाप्र.

राजेंद्र मेहेंदळे's picture

6 Dec 2014 - 12:51 pm | राजेंद्र मेहेंदळे

अफगाणि स्तानबद्दल फारशी माहीती नाही त्यामूळे वाचायची उत्सुकताआहेच.
पुभाप्र.

पिशी अबोली's picture

6 Dec 2014 - 12:52 pm | पिशी अबोली

पुभाप्र..

मार्गी's picture

6 Dec 2014 - 1:58 pm | मार्गी

जोरदार, ग्रेट, अद्भुत!!! पु. भा. प्र. :)

श्रीगुरुजी's picture

6 Dec 2014 - 2:34 pm | श्रीगुरुजी

मस्त! उत्कंठा वाढली आहे.

भन्नाट वाटतय. तुम्ही धाडसी आहात.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Dec 2014 - 12:36 am | डॉ सुहास म्हात्रे

अफगाणिस्तानाबद्दल जबरदस्त कुतुहल आहे. तेव्हा सर्व लेखमाला उत्सुकतेने वाचली जाईल यात शंका नाही.

ग्रेट ! पुढचा भाग वाचण्याची प्रचंड उत्सुकता आहे ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी:- RJ Dhvanit on Guitar Guruwar Ahmedabad with Aishwarya Majmudar { Cool Video,Must Watch }

दिपक.कुवेत's picture

7 Dec 2014 - 7:22 pm | दिपक.कुवेत

पुभाप्र.

मृत्युन्जय's picture

8 Dec 2014 - 12:09 pm | मृत्युन्जय

लेखमाला वाचायची प्रचंड उत्सुकता आहे.

प्रचंड उत्सुकता आहे पुढील भाग वाचण्याची. हिंदू धर्माचा सर्वांत प्राचीन आविष्कार याच प्रांतात झाला असे म्हणतात. आता अशी कल्पनाही करवत नाही सध्याच्या अफगाणिस्तानाकडे पाहून.

लवकर टाका ओ पुढील भाग.

वाचत आहे.. आणि पुढील भागाची वाट देखील बघत आहे

मितान's picture

8 Dec 2014 - 5:57 pm | मितान

लेखन आवडले !

पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत...

सौंदाळा's picture

8 Dec 2014 - 6:17 pm | सौंदाळा

आपल्याकडे किती माहिती आहे यापेक्षा आपलं ज्ञान काय आहे आणि मुख्य म्हणजे दृष्टिकोन काय आहे हे तपासतात ते. त्यामुळे मुलाखत देणं हा दडपणाचा मुद्दा न ठरता आत्मपरीक्षणाची संधी ठरते.

उत्कृष्ट. आपल्याकडे मुलाखतीत एखाद्या गोष्टीला माहित नाही वगैरे उत्तर दिले की बरेच मुलाखतकार पुढची प्रश्नांची सरबत्ती मुद्दामुन त्या विषयाशी निगडीत करुन समोरच्याला पुरते नामोहरम केल्याचे असुरी समाधान मिळवतात

लेख मस्तच. शेवटची दोन वाक्य पण खासच.
अगदी बारीक्-सारीक तपशीलासकट लिहा ही विनंती, खुप उत्सुकता आहे अफगाणिस्थानबद्दल

एस's picture

8 Dec 2014 - 11:43 pm | एस

अफगाणिस्तानच्या माहितीपेक्षा तुमच्या दृष्टिकोनातून तिथल्या परिस्थितीचे संवेदनशील आणि संयत टिपण वाचायला मिळणार याचा जास्त आनंद आहे. एक प्रकारची इनसाइट असते तुमच्या लिखाणात. इथेही त्याचा अनुभव येणार याची खात्री आहे.

जास्त काही लिहीत नाही. पुभाप्र.

इनिगोय's picture

10 Dec 2014 - 10:15 am | इनिगोय

प्रतिभा आणि फिरोज रानडे यांच्याकडून अनेकदा या देशाच्या आठवणी ऐकल्या आहेत. आज तिथे काय घडतं आहे हे तुमच्या शैलीत वाचायला आवडेलच. पुभाप्र.

आजच्या दिवशी आयुष्यात एक तास जास्तीचा मिळालाय.

.. _/\_!

आतिवास's picture

10 Dec 2014 - 5:56 pm | आतिवास

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार.
माझे अनुभव अतिशय मर्यादित असल्याने वाचकांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीत - हे प्रतिसाद वाचून लक्षात आले आहे ;-)
पुढचा भाग लिहिते लवकरच!

क्या बात है! तुमच्याकडून हे लिखाण यावं असं खूप वाटत होतं. खूप आनंद झाला आहे हे लिखाण पाहून. वाचते आहे..

सुन्दर
लेख हि छान ...पु भा शु

मधुरा देशपांडे's picture

11 Dec 2014 - 3:09 pm | मधुरा देशपांडे

लेख फार आवडला. पुभाप्र.

पैसा's picture

13 Dec 2014 - 8:21 pm | पैसा

प्ढचा भाग आल्यावर आता आधीचा वाचला! मस्तच!

मुक्त विहारि's picture

15 Dec 2014 - 5:13 am | मुक्त विहारि

चला , म्हणजे हे "गमभन" फक्त आम्हालाच नाही तर बर्‍याच जणांना भोवते, हे सिद्ध झाले.

आनन्दिता's picture

15 Dec 2014 - 8:05 am | आनन्दिता

पुढचे भाग वाचण्यास अतिशय उत्सुक आहे.

चिगो's picture

25 Dec 2014 - 8:45 pm | चिगो

तुमच्यासारख्या अनुभवसमृद्ध, संवेदनशील आणि सिद्धहस्त लेखिकेचा अफगानीस्तानवरचा लेख म्हणजे ज्ञानाची आणि चांगल्या वाचनाची मेजवानी असणार हे नक्की..

आपल्याकडे किती माहिती आहे यापेक्षा आपलं ज्ञान काय आहे आणि मुख्य म्हणजे दृष्टिकोन काय आहे हे तपासतात ते. त्यामुळे मुलाखत देणं हा दडपणाचा मुद्दा न ठरता आत्मपरीक्षणाची संधी ठरते.

हा अनुभव घेण्यास उत्सुक..

त्यामुळे आजच्या दिवशी आयुष्यात एक तास जास्तीचा मिळालाय.

ह्या वाक्यासाठी आणि दृष्टीकोनाकरीता सलाम..

माझ्यामते "शतशब्दकथे"चा प्रकार आंतरजालीय मराठी साहीत्यात तुम्ही आणलाय. तो पुस्तकरुपात आणा, ही विनंती.. आणि तुमचं अनुभवसमृद्ध लिखाण तसेच इतरही लिखाण पुस्तकरुपात प्रकाशित कराच..