भाग ८
(निवेदन: काही तांत्रिक अडचणींमुळे ही लेखमाला सध्या अपूर्ण ठेवावी लागत आहे. वाचकांनी त्याबद्दल मला क्षमा करावी. यथावकाश लेखन पूर्ण करेन इतकंच आत्ता म्हणेन.)
गेला एक महिनाभर आमचं मुख्य रस्त्यावरचं प्रवेशद्वार बंद होतं. ते आहे दक्षिण प्रवेशद्वार. त्यानुळे आमची नियमित ये-जा पूर्वेकडच्या प्रवेशद्वारातून चालू होती. या बाजूला एक महत्त्वाचं सरकारी कार्यालय आहे – ‘निवडणूक आयोग’. तालिबान हिटलिस्टवरचं आणखी एक ठिकाण. एक दिवस सकाळी साडेदहाला एसएमएस आला, “पूर्व प्रवेशद्वाराजवळ के ९ तपासणीत एक संशयास्पद वाहन आढळले आहे. पुढची सूचना मिळेपर्यंत हे प्रवेशद्वार टाळा”. आमचं ऑफिस त्या प्रवेशद्वाराच्या अंगणातच. ताबडतोब सुरक्षा रक्षक आले आणि आम्हाला evacuate केलं गेलं. धोका बहुधा फार नसावा, कारण परिसरातल्याच दुस-या टोकाच्या इमारतीत आम्ही गेलो.
मग बॉम्ब तपासणी पथक आलं, तपासणी झाली. तो एक कचरा वाहून नेणारा ट्रक होता, युएनचा नाही तर आउटसोर्स केलेला होता. युएनच्या परिसरात प्रवेश करणा-या प्रत्येक वाहनाची प्रत्येक वेळी श्वानपथकाद्वारे (बॉम्ब) तपासणी होते, कितीही वेळा ये-जा झाली तरी, आणि अगदी युएनच्या वाहनांचीही. शिवाय प्रत्येक व्यक्तीचं ओळखपत्र दरवेळी तपासलं जातं, त्यात अजिबात हयगय होत नसे. कुत्रा बॉम्बचा संशय येताच खाली बसतो – तसा इथं बसला आणि पुढची सगळी चक्रं फिरली. दोन तास तपासणी होऊनही काही संशयास्पद आढळलं नाही हे खरं. पण या ट्रकचा वापर अन्य कामासाठी झाला होता का, दहशतवाद्यांनी ही एक चाचणी करून बघितली का – असे अनेक प्रश्न मनात आलेच – माझ्या, इतरांच्याही.
एक दिवस नजीब होता गाडीवर. रस्त्याने येताना ‘इकडं अशी लढाई झाली होती, इतके लोक मारले गेले’ वगैरे सांगत होता तो. एकदा त्याचं एका अमेरिकन माणसाबरोबर अपहरणही झालं होतं. मग मला एकदम म्हणाला, “तुम्ही इथं काय करताय? आपल्या घरी जाऊन निवांत रहा की”. काय बोलायचं ते न सुचल्याने मी गप्प बसले.
सदैव ‘ पुढच्या क्षणी हल्ला होणार आहे ’ अशा तयारीत राहायची सवय या अशा अनुभवांमुळे होत राहिली. हल्ला झालाच तर त्याला तोंड देण्याची मानसिकताही यातून कळत-नकळत घडत गेली असावी.
हल्ल्याचा प्रत्यक्ष अनुभव एक ना एक दिवस मला येणार होताच, तो त्यादिवशी आला.
शुक्रवार हा माझ्यासाठी अगदी निवांत दिवस असायचा. एरवी सुट्टीच्या दिवशी घरातली इतर बरीच कामं उरकायची असतात, पण मी इथं हॉटेलमध्ये रहात असल्याने घरकाम सदृश्य कुठलंही काम नसायच. ‘बाहेर उगाच आपलं फिरून येऊ’ हे शक्य नव्हतं. हमीद हा माझ्या संस्थेचा एक श्रीलंकन सल्लागार याच हॉटेलमध्ये राहायचा. तो मुस्लिम होता, त्यामुळे जवळच्या मशीदीत जाऊन यायचा तासभर. पंधरा दिवसांनी एकदा ऑफिसबरोबर आधी ठरवून आम्ही मॉलमध्ये खरेदीला जायचो. हॉटेलमध्ये रात्री फक्त ठरावीक जेवण मिळायचं, आणि ते ८ डॉलर्स असं महाग होतं. दुपारी व्यवस्थित जेवले असले तर मला रात्री इतक्या भरपेट जेवणाची गरज नसायची. मॉलमधली खरेदी म्हणजे या जेवणासाठी पर्यायी व्यवस्था – दूध, फळं, ज्यूस यांचा स्टॉक करून ठेवणं. त्यामुळे ही खरेदी झटपट व्हायची. तशीही २० मिनिटं ही आम्हाला मॉलमधल्या खरेदीसाठी घालून दिलेली वेळेची मर्यादा होती, त्यामुळे तिथं उगाच रेंगाळता यायचं नाही. ज्या मॉलमध्ये आम्ही जायचो त्याच्यावर काही महिन्यांपूर्वी हल्ला झाला होता हे एकदा एकाने सांगितल्यावर मॉलमध्ये जाण्याचंही मी शक्यतो टाळायला लागले.
शुक्रवारी मी निवांत उठायचे, रोजच्यापेक्षा अर्धा तास जास्तीचा व्यायाम करायचे, भरपूर नाश्ता करायचे, वाचायचे, भारतात फोन करायचे, लिहायचे.
सोबतचे काही लोक सुरक्षा नियम मोडायचे, मलाही त्यात ओढायला बघायचे.
त्या शुक्रवारी सकाळी अकराच्या आसपास गुरखा सैनिकाशी हवापाण्याच्या गप्पा मारत मी उभी होते. तेवढ्यात माझी कॅनेडियन शेजारीण माझ्याकडं आली. तशी आमची आपली हाय-हॅलो पुरतीच ओळख होती. पण आज तिचा बोलायचा नूर दिसत होता.
“ आज काय करणार आहेस दुपारी?” शेजारणीने विचारलं.
“विशेष काही नाही, नेहमीचंच.” मी उत्तरले.
“मी जाणार आहे बाहेर जेवायला. येतेस का? ” तिचा पुढचा प्रश्न.
“तुम्ही आधी सांगितलं असतं तर मी ऑफिसची परवानगी घेतली असती, असं आयत्यावेळी नाही मला येता येणार, ” जणू काही माझाच दोष आहे अशा नम्रपणाने मी उत्तरले.
“त्यात काय विचारायचं ऑफिसला? माझ्या ओळखीचा एक टॅक्सीवाला आहे, तो घेऊन जाईल आपल्याला आणि परत आणून सोडेल, शंभर डॉलर्स घेईल तो, निम्मे मी देईन, निम्मे तू दे. ” मी येणार हे गृहीत धरून बाई बोलत होत्या.
या बाई पण युएनच्या एका संस्थेच्या होत्या. त्यांनी त्यांच्या ऑफिसची परवानगी घेतली असती तर त्या बळावर मला ऐन वेळीही जाण्याची परवानगी मिळाली असती. त्यांच्या ऑफिसचा सिक्युरिटी क्लीअरन्स आहे हे सांगितल्यावर मला काही अडचण आली नसती. पण या परवानगी न घेता चालल्या होत्या तेही खाजगी वाहनाने. अपहरणाविषयी काही दिवसांपूर्वी माझ्या सहका-यांनी केलेली थट्टामस्करी आणि एक मीटिंग सोडून निघावं लागलं होतं मला – या घटना मी विसरले नव्हते, त्यामुळे मी शेजारणीला शांतपणे नकार दिला.
“ थोडा धोका तर पत्करायला लागतोच. इथं रूममध्ये नुसत्या भिंती पहात बसणार आहेस का एकटी?” तिने मला उचकवायचा आणखी एक प्रयत्न केला पण मी बधले नाही. निराश होऊन ती आणखी कुणी सोबत येईल का ते पाहायला गेली. तोवर शांतपणे आमचा संवाद ऐकणा-या गुरख्याने मला “ या देशात काय करायचं नाही हे तुम्हाला चांगलं कळलंय, तुम्ही कधी अडचणीत नाही सापडणार तुमच्या चुकीने” असं प्रमाणपत्र कौतुकाने दिलं.
त्यातले ‘तुमच्या चुकीने’ या शब्दप्रयोगाचा अर्थ मला त्यावेळी नीट समजला नव्हता हे थोड्या वेळातच मला समजणार होतं.
चुकीच्या ठिकाणी, चुकीच्या वेळी आणि चुकीच्या लोकांबरोबर असणं टाळलं, की साधारणपणे आपण नको त्या परिस्थितीत सापडत नाही असा आजवरचा अनुभव. पण इथं मुळात परिस्थितीच असाधारण असल्याने तुम्ही कधी संकटात सापडाल त्याचा भरवसा नाही.
दुपारचे चार वाजत आले होते. ही माझी कॉफी प्यायची वेळ. किचनमध्ये जाऊन आपल्याला हवी तशी आणि हवी तितकी कॉफी पिण्याइतका निवांत वेळ. हमीदही यायचा किचनमध्ये आणि मग थोडा वेळ गप्पा मारत बसायचो आम्ही. लिहित असलेली मेल अर्धवट तशीच ठेवून मी स्वच्छतागृहात गेले.
धडाड... धडाड...
खळ्ळ....खळ्ळ
कर्कश सायरन.
तिन्ही आवाज एकदम आले.
********
स्वच्छतागृहाच्या खिडकीच्या काचांचा खच माझ्याभोवती पडला आहे, बाहेर बंदुकांच्या फैरी झडत आहेत आणि सायरन वाजत आहे या तीन्ही गोष्टींची नोंद मी निमिषार्धात घेतली. हे वाक्य वाचायला तुम्ही जेवढा वेळ घेतला असेल, त्याच्या एक दशांश वेळात मी ही नोंद घेतली.
पण आपलं मन कमालीचं हट्टी असतं. अनुभवाला नाव दिल्याशिवाय त्याला पुढं जाता येत नाही, संवेदनेची खूण ओळखण्याचा त्याचा आटापिटा असतो.
‘बहुतेक भूकंप झालेला दिसतोय’ – परिस्थितीचं आकलन करून घेण्याची मनाची धडपड.
“आधी बंकर गाठ ”, बुद्धीने प्रतिसाद नियंत्रित करण्यात पुढाकार घेतला.
स्वच्छतागृहातून बाहेर आले. खोलीतही काचांचा खच पडला होता.
सायरन वाजतच होता. बंदुकांचे आवाज येतच होते.
हेल्मेट चढवलं. जाकिट जड असल्याने घालता येत नव्हतं, ते हातात घेतलं. घाई कर.
पासपोर्ट, ओळखपत्र, पैसे असलेलं छोटं पाऊच गळ्यात अडकवलं.
किती सेकंदात? बहुधा दोन.
सायरन अजून वाजतोच आहे.
बंदुकांचे आवाज जवळून येताहेत का ?
माहिती नाही, लवकर चल.
हा तालिबान हल्ला आहे का ?
असेल किंवा नसेलही. तू पळ.
ट्राउझर घे हातात, बंकरमध्ये गेल्यावर घाल, आत्ता वेळ घालवू नकोस.
लॅपटॉप बंद करावा काय?
नाही, तेवढा वेळ नाही. तू पळ आता लगेच.
फोन? चार्जर?
हं, दोन्ही हॅन्डसेट घे.
वॉकी-टॉकी?
ती राहू दे, तू पळ आधी बंकरकडे.
बूट कुठे आहेत?
खिडकीजवळ. हं! काचांनी भरलेत ते. असू दे, तू बंकरमध्ये जा.
बाहेर सगळीकडे काचा आहेत, नीट पळ. पाय पूर्ण टेकवू नकोस.
नेहमी खोलीसमोर असतात ते आपले गुरखा ठीक आहेत ना?
त्यांची काळजी तू नको करूस. पळ जोरात.
तो गुरखा पाहिलास ? किती एकाग्रतेने नेम धरून उभा आहे तो.
त्याचा चेहरा विलक्षण शांत आहे.
नाही, त्याच्याशी आत्ता बोलू नकोस. तू पळ बंकरकडे.
तुला भीती वाटतेय ?
माहिती नाही. पण काय झालंय नेमकं ?
कळेल लवकरच.
सायरन वाजतोय अजून!
अजून ?
हं, आता उजवीकडे.
तो बघ, रशीद उभाच आहे दारात.
तो न बोलता बाजूला होतो आणि मला आत जाण्याची खूण करतो.
बंकर.
कुणीतरी माझं जाकिट चढवायला मला मदत करतं.
हेल्मेट मी नुसतं अडकवलं आहे, तेही तिसरं कुणीतरी नीट बसवतंय.
फोन चौथ्याच्या हातात देऊन मी ट्राउझर घालते.
आतमध्ये पंधराएक लोक आहेत.
हमीद कुठे आहे ? हं, आला तोही.
लोक पळत पळत येताहेत.
सायरन वाजायचा थांबला आणि बंदुकींचे आवाज अधिक स्पष्ट झाले.
****
रशीद आणि दोन गुरखा रक्षक. आधी हजेरी झाली. आम्ही २५ लोक असायला हवे होतो इथं (युएनच्या विविध संस्थांशी संबंधित २५ लोक या हॉटेलमध्ये राहतात), त्यापैकी २२ जण होतो. तिघांचा काय पत्ता ? जखमी तर नाही ना झाले ? नाही. उपस्थित सहका-यांकडून दोघे जेवायला बाहेर गेले असल्याची माहिती मिळाली – ती कॅनेडियन शेजारीण आणि आणखी एक. त्यांच्या ऑफिसला फोन केला. आता पुढचे निरोप ते लोक देतील. एकाला गुरखा सोबत घेऊन आला. नाही, तो जखमी नव्हता, पण काय करायचं हे न सुचून खोलीत नुसता उभा होता. गुरखा प्रत्येक खोलीत जाऊन कुणी जखमी होऊन पडलं नाही ना हे तपासत होते. सुदैवाने आम्हाला कोणालाही काचा लागलेल्या नव्हत्या.
रशीदने सिक्युरिटीला फोन केला. रशीद आमच्या गटाचा वॉर्डन होता, तो सांगेल तसं आम्ही वागायचं होतं.
“आपल्या परिसरात दहशतवादी हल्ला झाला आहे. कार बॉम्बचा स्फोट ही त्याची सुरूवात होती. हल्ल्याचं लक्ष्य आपण आहोत का अन्य कुणी ते अद्याप माहिती नाही. किती वेळ आपल्याला इथं थांबावं लागेल ते सांगता येत नाही, त्यामुळे मोबाईलची बॅटरी पुरवून वापरा. कदाचित evacuation होईल (या जागेतून हलवलं जाईल) . प्यायच्या पाण्याचा साठा मर्यादित आहे. कोप-यात स्वच्छतागृह आहे. मेडिकल इमर्जन्सी वाटल्यास तत्काळ मला सांगा.” रशीद हे सगळं इतक्या धीरगंभीरपणे पण सहजतेने म्हणाला की आता पुढं तो विमानाचे पायलट म्हणतात ना तसं “पुश बॅक ऍन्ड रिलॅक्स ” म्हणणार की काय असं मला क्षणभर वाटलं.
बंकरमध्ये एक प्रकारची अवघडलेली शांतता होती. त्या शांततेत मला माझ्या हृदयाची धडधड मग स्पष्ट ऐकू आली. आम्ही सगळेजण एकमेकांना ओळखत होतो पण या आकस्मिक हल्ल्याने सगळेजण हादरले होते, काय बोलायचं ते कुणाला सुचत नव्हतं.
मग ज्याने-त्याने आपापल्या सुरक्षा अधिका-याला फोन करायला सुरूवात केली. जॉर्जला मी फोन केला. एका रिंगमध्ये फोन उचलला गेला आणि मी काही बोलायच्या आधी त्याने मला विचारलं, “ तू आणि हमीद दोघेही बंकरमध्ये आहात ?” अच्छा, म्हणजे हल्ला झाल्याला अजून तीन मिनिटंही झाली नाहीत तर याला माहिती आहे हल्ला झाल्याची. “काही हेल्थ प्रॉब्लेम ? दर अर्ध्या तासाला आपण बोलत राहू. रशीद सांगेल तसं करा.” इतकंच बोलणं झालं आमचं.
मग छोट्या गटात लोक आपापसात बोलायला लागले. हमीद मला म्हणाला की तो भावाशी स्काईपवर बोलत होता. अचानक काचा पडताना पाहून ‘भूकंप’ असं वाटून तो ताबडतोब कॉटखाली जाऊन आडवा पडला. मग सेकंदभरात गोळीबाराचे आवाज ऐकल्यावर त्याला हल्ला झाल्याचं लक्षात आलं.
बंकर. अदमासे दहा बाय बाराची खोली. दोन सोफा, दोन खुर्च्या. उरलेले खाली बसले.
पुन्हा एक मोठ्ठा हादरा. जणू आमच्या दारातच.
“दुसरा स्फोट,” कुणीतरी म्हणालं.
त्याक्षणी मला एका सनातन सत्याचा साक्षात्कार झाला. मला भीती मरणाची वाटत नाही, एक ना एक दिवस तो दरवाजा उघडून त्या अनोळखी प्रदेशात पाऊल टाकायचं आहेच. खरं सांगायचं तर ‘त्या’ जगाबद्दल काहीसं कुतूहलही वाटतं. पण मृत्यूच्या त्या क्षणाकडे नेणा-या वेदनेची भीती वाटते. ‘तुला वेदनारहित मरण देतो’ अशी कुणी खात्री दिली तर मला मरायचं भय वाटणार नाही. इथं अशा हल्ल्यात मेले तर ठीकच, पण कायमचं अपंगत्व आणि परावलंबित्व नको. – अर्थातच मरणं आपल्या हाती नसतं, जगणं असतं – म्हणून विचार जगण्याचा करावा हेही ओघाने आलं.
तिस-या स्फोटाने आमचा बंकर हादरला.
हे किती काळ चालणार आहे? यातून सुखरूप बाहेर पडणार की नाही आपण? – सगळ्यांच्या मनात तेच प्रश्न. कुणीही हे प्रश्न विचारले नाहीत. हे प्रश्न विचारायचे नाहीत असा आमच्यात जणू एक अलिखित करार झाला होता.
(अपूर्ण)...
प्रतिक्रिया
24 Oct 2015 - 1:14 pm | प्रचेतस
अतिशय भीषण परिस्थितितही जगणाऱ्या अफ़गाणांचं नेहमीच कौतुक वाटतं. आणि त्या परिस्थितीतच राहून आलेल्या तुमचंही.
लेखन नेहमिप्रमाणेच उत्कृष्टच.
24 Oct 2015 - 1:25 pm | टवाळ कार्टा
खतरनाक
24 Oct 2015 - 1:38 pm | तर्राट जोकर
कधी मारधाड, गोळीबार, थ्रीलर चित्रपट बघितले की त्याचा परिणाम असा होतो की असं वाटतं आता आपल्याही खिडकीतून धडाधड गोळीबार होइल, कुठली तरी कार आपण घराबाहेर आल्यावर आपल्याला उडवून जाईल. क्षणोक्षणी काहीतरी भयंकर, रोमांचित करणारं अघटित होइल असा काल्पनिक दबाव काही काळ असतो.
इथे तो दबाव, प्रत्यक्ष, काल्पनिक नाही, तुम्ही अनुभवत होतात. आपल्यापासून काही अंतरावर घमासान आहे. फक्त एक भींत मध्ये आहे. ती भिंत कधीही कोसळेल. आत असो वा बाहेर तुम्ही आहात तसेच आहात. कायम मरणाच्या सावटाखाली. ही एक दुर्मिळ भावना असते. अपघातात लोक अचानक जातात. तिथे ही भावना जाणवायला वेळही नसतो. पण असे तासंतास एका ठिकाणी, दुसर्यांवर भरवसा ठेवून जीव धरून ठेवणं. भयंकर अनुभूती आहे. तुमच्या धैर्याला सलाम!
लेखन फारच सुंदर आहे. बाकीचे भाग आता वाचतो.....
24 Oct 2015 - 1:47 pm | बोका-ए-आझम
हा कल्पनातीत अनुभव आहे! तो शब्दबद्ध करणं हे किती कठीण आहे, पण ते तुम्ही सहजपणे केलेलं आहे!
24 Oct 2015 - 3:23 pm | नंदन
असेच म्हणतो.
नेमकं निरीक्षण!
बाकी तुम्ही सुखरूप रहाल आणि लवकरच ही लेखमाला पूर्ण वाचण्याचा योग येईल, अशी सदिच्छा व्यक्त करतो.
24 Oct 2015 - 2:15 pm | एस
काहीही बोलणार नाही. तुम्ही सुखरूप आलात याचा आनंद.
(अपूर्ण प्रतिसाद!...)
24 Oct 2015 - 2:24 pm | ज्ञानोबाचे पैजार
बापरे भयंकर अनुभव.
अशा वेळी नियमांचे काटेकोर पालन किती महत्वाचे आहे ते समजले.
जेव्हा जमेला तेव्हा लेखमाला आवश्य पूर्ण करा.
पैजारबुवा,
24 Oct 2015 - 2:38 pm | प्यारे१
(संपादित)
अपूर्ण नको. मालिका अर्धवट नको सध्या. किमान या वळणावर तरी.
24 Oct 2015 - 2:39 pm | असंका
+१
24 Oct 2015 - 2:48 pm | अजया
तुमच्या लिखाणातून तो थरार इथेही जाणवला. तिथे रहावेच लागत असणाऱ्या नागरिकांचे जीणे काय झाले असेल हा विचार सुन्न करुन गेला.
24 Oct 2015 - 3:02 pm | पैसा
हादरवून टाकणारा अनुभव. वेळ होईल तेव्हा लिहा पुन्हा. वाट बघूच.
24 Oct 2015 - 9:07 pm | चाणक्य
असेच म्हणतो.
24 Oct 2015 - 3:09 pm | बाबा योगिराज
छान लिहिता. शेवट सुद्धा खुप सुंदर असतो.
जमेल तेव्हा लेखन पूर्ण करा. शुभेच्छा.
24 Oct 2015 - 3:17 pm | सस्नेह
स्फोटक अनुभव !!!
तुम्ही हे लिहू शकला आहात याबद्दल जगन्नियंत्याचे आभार !
24 Oct 2015 - 3:21 pm | मास्टरमाईन्ड
मस्त लिहिलंय, वाचतानाही भयानक वाटतंय... तुम्ही प्रत्यक्षात जे अनुभवलं असेल त्याची इथे बसून कल्पनाही करता येणं अशक्य आहे.
तुम्ही सुखरूप आलात हे भाग्य, आणि त्याचा आनंदही आहे.
24 Oct 2015 - 3:28 pm | आतिवास
काही काळजी करणारे प्रतिसाद आल्याने एक स्पष्टीकरण - मी काबूलमधून पूर्वीच परतले आहे.
त्यानंतरचे माझे मोझाम्बिकचे लेख (काहींनी!) वाचले असतील ;-)
सदिच्छांसाठी आभारी आहे.
24 Oct 2015 - 6:28 pm | असंका
धन्यवाद.
या खुलाशामुळे बरं वाटलं...
24 Oct 2015 - 3:50 pm | खटपट्या
भयानक !
24 Oct 2015 - 4:37 pm | मार्गी
निशब्द. . . . धन्यवाद!
24 Oct 2015 - 6:16 pm | संजय पाटिल
अर्थातच मरणं आपल्या हाती नसतं, जगणं असतं – म्हणून विचार जगण्याचा करावा हेही ओघाने आलं.
जएक्दम सही!!!
24 Oct 2015 - 6:30 pm | राही
जेव्हा तुम्ही मृत्यूला सामोरे जात असता, तेव्हा तुम्ही खरे जगत असता असे कुणीसे म्हटले आहे. (यू ओन्ली लिव ट्वाइसमध्ये का कदाचित?).
ओघवते वर्णन आणि तटस्थ शैली. भीषण अनुभवाचेही तत्त्वज्ञानात उन्नयन झाले आहे.
खरंच 'भय इथले संपत नाही' अशा स्थळकाळात राहून आपण आलात. अफ्घानांबद्दल अनुकंपा वाटतेच, पण चीडही येते हे जीवन त्यांच्यावर लादणार्यांची.
24 Oct 2015 - 6:35 pm | डॉ सुहास म्हात्रे
जबरा अनुभव !
24 Oct 2015 - 6:48 pm | दमामि
भयंकर सुंदर शैली ! लवकर पुढचा भाग टाका!
24 Oct 2015 - 7:06 pm | द-बाहुबली
माय गॉड...! हा ही अनुभव आपण घेतलात ? _/\_ दंडवत. साष्टांग.
24 Oct 2015 - 7:06 pm | चतुरंग
सातत्याने मृत्यूच्या छायेत असे वावरणे म्हणजे भयावह अनुभव असणार आहे! :(
माझे जवळचे नातेवाईक काही वर्षांपूर्वी काश्मीरला आयपीएस होते. त्यावेळी अतिरेक्यांचा बराच धुमाकूळ सुरु होता. सतत अंगरक्षक बरोबर असत. ते ड्यूटीवर गेले की घरातले लोक कितीवेळ बसून राहणार. कंटाळून कधीतरी बाहेर पडत असत आणि घरासभोवती बागेत फिरताना सुद्धा दोन दोन एके४७ वाले आजूबाजूला फिरत गस्त घालत असत! सतत दडपण, सतत भीती. ड्यूटीवर गेलेली व्यक्ती हातीपायी धड परत आली की तो दिवस संपला, असं रोज! "चार अतिरेक्यांच्या डेडबॉडीज आज चौकीला आल्या होत्या मग तपासणी करुन पोस्टमॉर्टेम होऊन आल्या!" असलं काहीबाही ते सांगत असत तेव्हा आंगावर काटा येत असे..
24 Oct 2015 - 8:01 pm | पद्मावति
वाचतांना अंगावर काटा आला. प्रत्यक्ष अनुभव घेतांना तुम्हाला काय वाटलं असेल याची कल्पनाच करवत नाही. जे घडलं ते तुम्ही इतक्या सहज सुंदर ओघवत्या आणि तटस्थ शैलीत लिहिलंय त्याचं मनापासून कौतुक.
24 Oct 2015 - 8:01 pm | फोटोग्राफर243
जबरदस्त, खरोखर तुमच्या धैर्याचे कौतुक केले पाहीजे, पुढील भागाच्या प्रतीक्षेत!!
24 Oct 2015 - 8:31 pm | आरोह
तुमच्या लेखन शैलीला मनापासून दाद !
24 Oct 2015 - 9:48 pm | बिपिन कार्यकर्ते
असलं काही वाचून मी सहसा सुन्न होत नाही. आज झालोय. असे अनुभव भिडतात, पण सुन्न व्हायला होत नाही, ते झालं. कदाचित ते सगळं जगणार्या तुम्ही होता, ही लिंक असेल म्हणा. पण अत्यंत हादरवणारा अनुभव.
आणि लेखक म्हणूनही आज तुम्ही अत्यंत पुढे आला आहात असं वाटलं. बुद्धीचा आणि तुमचा संवाद खूप समर्थपणे मांडला आहेत. आणि कुठेही भावनिक किंवा मेलोड्रामा नाही. ग्रेट.
27 Oct 2015 - 11:42 am | कोमल
शब्दाशब्दाशी सहमत..
परवाना/ शौझिया वाचताना पण जितकं आत हललं नव्हतं तितकं हे वाचुन झालयं.
तुमच्या लेखनाची आणि मिपा मुळे तुमच्याशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रीतिने जोडले गेल्याची कमाल अर्थातच.
28 Oct 2015 - 4:15 am | स्रुजा
+११११११
वाचतानाच बधिर व्हायला झालं होतं . तुम्ही यातुन सुखरुप सुटुन आलात हे माहिती असल्याने काळजी कमी झाली तरी लेख माला पूर्ण होईपर्यंत हुरहुर मात्र राहणार आहे.
24 Oct 2015 - 10:24 pm | मित्रहो
भितीच्या भिंती बऱ्याच दिवसानंतर आल्या तोही सुन्न करनारा अनुभव घेऊन. लिहायचे म्हणून नाही परंतु तुमच्या अनुभवाने आणि लिखाणाने आम्ही समृद्ध होतो. ते अनुभव अफगाण मधले असो की मोझांबिक मधले. हा अनुभव काहीतरी वेगळाच. डोके बधीर करनारा.
24 Oct 2015 - 11:18 pm | मुक्त विहारि
वाचत आहे.
पुढील भाग जरा लवकर टाकलात तर उत्तम.
24 Oct 2015 - 11:26 pm | यशोधरा
गुडनेस!
25 Oct 2015 - 6:56 am | बहुगुणी
योग्य वेळी पुढचा भाग लिहालच, त्याची प्रतीक्षा आहे.
25 Oct 2015 - 3:18 pm | मारवा
अनुभव असा मांडलाय की जणु घेतांनाही एकीकडे नोंदी चालु होत्या असे वाटावे. किंवा एक दिवस मला हा अनुभव शब्दबद्ध करायचाच आहे असा नेणीवेच्या पातळीवर अट्टाहास जाणवतो.
तटस्थता तरी कशी गुढ आहे काही कळत नाही.
एक जीवन आहे त्याचा अखंड प्रवाह जीवंत संघर्ष सुरु आहे एक पर्यटक आहे ज्याचा अनुभव वेचण्याचा मांडण्याचा अट्टाहास सुरु आहे.
दोन्ही जुळल्यावर चमत्कारीक स्थिती निर्माण होते.
श्रोता तिसराच जगातला
लाइफ इज मिस्टरी आफ्टरऑल !
25 Oct 2015 - 6:32 pm | अन्या दातार
काळ आला होता, वेळ आली नव्हती.
थरारक व सुन्न करणारा अनुभव.
26 Oct 2015 - 12:12 pm | स्नेहल महेश
बापरे भयंकर अनुभव.
अशा वेळी नियमांचे पालन किती काटेकोर करावे लगते.
26 Oct 2015 - 12:33 pm | बॅटमॅन
अगदी पूर्णच सहमत.
बाकी लेखाबद्दल काय बोलावे?........असोच.
27 Oct 2015 - 7:29 am | चांदणे संदीप
+100
अगदी हेच!
27 Oct 2015 - 12:57 am | श्रीरंग_जोशी
भयंकर प्रसंग अन तेवढेच प्रसंगावधान. अधिक काय लिहू?
तुमच्या धैर्याला सलाम.
19 Nov 2015 - 11:33 am | नाखु
तंतोतंत...
पुढील लिखाणाला शुभेच्छा आणि तुमच्या सर्व सहकार्यांनाही शुभेच्छा !!!
27 Oct 2015 - 9:39 am | अर्धवटराव
शिवछत्रपतींनी आग्र्याच्या कैदेत काय अनुभवलं असणार याची झलक मिळाली तुम्हाला.
भाग्यवान आहात... या प्रसंगातुन निभावुन घेतलं म्हणुन.
धैर्याला सीमा दिसत नाहि तुमच्या
__/\__
27 Oct 2015 - 11:42 am | सुमीत भातखंडे
जबरदस्त.
लवकरच लेखमाला पूर्ण कराल ही आशा करतो. या वळणावर येऊन आता अपूर्ण नको.
27 Oct 2015 - 6:49 pm | शिव कन्या
मूर्तिमंत भीती ! पण तुमचे धाडस आणि त्यानंतरच्या या लिखाणाला सलाम.
28 Oct 2015 - 2:34 pm | सूड
अगदी हेच!!
अनुभव मात्र एकंदरीत सुन्न करणारा!!
29 Oct 2015 - 11:06 am | रुस्तम
सहमत
28 Oct 2015 - 3:25 pm | पदम
वाचताना अंगावर काटा आला.
28 Oct 2015 - 4:53 pm | मदनबाण
वाचतोय...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राधा ना बोले ना बोले ना बोले रे... :- Azaad
29 Oct 2015 - 12:35 am | जुइ
तुमच्या धैर्याला सलाम!
29 Oct 2015 - 11:43 am | अमृत
बाकी ते अफगाण लोक सतत मृत्युच्या छायेत जगून मानसिक विकारांना नक्कीच बळी पदत असतील हो. खरच विचार करून अंगावर काटा आला.
पुलेशु
29 Oct 2015 - 3:34 pm | चिगो
अत्यंत भयावह अनुभव.. आणि तरीही तो तुम्ही इतक्या शांतपणे मांडलाय.. तुमच्या धैर्याची आणि स्थितप्रज्ञतेची कमाल आहे..
29 Oct 2015 - 3:38 pm | मधुरा देशपांडे
सुन्न करणारा अनुभव. काय प्रतिसाद द्यावा हे कळत नाही.
30 Oct 2015 - 6:08 am | पीके
लिखानाबद्दल काय बोलू? दंडवत. बाकि समयसुचकता आणि सुरक्षेचे नियम अंगात किती भिनले होते हे < ट्राउझर घे हातात, बंकरमध्ये गेल्यावर घाल, आत्ता वेळ घालवू नकोस.> यातून स्पस्ट जणवलं.
30 Oct 2015 - 6:09 am | पीके
ट्राउझर घे हातात, बंकरमध्ये गेल्यावर घाल, आत्ता वेळ घालवू नकोस.
2 Nov 2015 - 10:50 am | आतिवास
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे.
17 Nov 2015 - 6:39 pm | चैतू
अफगाणीस्तानवरचे ब्रेडविनर हे पुस्तक वाचले आहे. पण तुमच्या लेखनातून आणखी काही गोष्टी समजल्या. अतिशय तटस्थपणे लिहण्याची तुमची पद्धत आवडली. मालिका लवकरात लवकर पुर्ण करावी ही विनंती.