भाग १, २, ३
(नोंद: काबूलमधील वास्तव्यावर आधारित लेखमालिका. संबंधित व्यक्तींची सुरक्षितता धोक्यात येऊ नये या हेतूने नावं बदलली आहेत. स्थळ - काळ हेतूतः मोघम ठेवले आहेत. फार फोटोही देता येणार नाहीत. माझं तिथलं अनुभवविश्व मर्यादित आहे याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.)
कोणत्याही ठिकाणी गेलं की तिथल्या सर्वसामान्य माणसांशी बोलायचं ही एक नेहमीची सवय. रिक्षावाले, टॅक्सीवाले, बसस्टॉपवरचे किंवा रेल्वेतले सहप्रवासी; ढाब्यावरचे ट्रक ड्रायव्हर; किराणा दुकानातले गि-हाईक किंवा तिथं काम करणारी पोरं; हॉटेलमधले वेटर्स; ट्रॅफिक पोलीस; बँकेत स्लिप भरुन मागणारी मावशीबाई किंवा काका; पेट्रोल पंपावर हवा भरून देणारी पोरं; शाळेत जाणा-या मुली, चणे-फुटाणे विकणारे किरकोळ विक्रेते .... यांच्यापैकी कुणाची ना कुणाची ‘अफगाणी’ आवृत्ती मला नक्की भेटणार असा मला विश्वास होता. हं! मला स्थानिक भाषा – दरी आणि पाश्तो – बोलता येत नाहीत हे खरं. पण संवाद साधायची इच्छा असेल, तर भाषेचा अडथळा येत नाही असा बहुभाषिक भारतातला आजवरचा अनुभव!
पण येऊन आठवडा झाला तरी शहर काही नीट पाहिलं नाही अजून. एक तर हॉटेल ते ऑफिस आणि ऑफिस ते हॉटेल इतकाच काय तो प्रवास. वाटेत ठिकठिकाणी दिसतात ते बंदूकधारी सैनिक, झाडांच्या पानांनी सजवल्यागत रस्त्यात उभे असणारे रणगाडे. शहर दिसतचं नाही – दिसतात त्या फक्त भिंती. सिमेंटच्या उंच भिंती.
त्यावर तारांचं कुंपण. बाजूला वाळूच्या पोत्यांच्या भिंती. त्याआड उभे बंदूकधारी सैनिक. अर्थात बुलेटप्रुफ जाकीट आणि हेल्मेटसह. त्यांची सतत भिरभिरती नजर. हे शहर सदैव लढायला सज्ज आहे. माझ्या या रोजच्या रस्त्यावर अमेरिका, इराण, ब्रिटन ... वगैरे अनेक दूतावास आहेत; नाटो मुख्यालय आहे; निवडणूक आयोग आहे. कदाचित त्यामुळे इतकी कडक सुरक्षा असेल. बघू, इतर रस्त्यांवर काही वेगळं दृष्य दिसतंय का ते.
मला काबूलमध्ये रस्त्यावर चालायची परवानगी नाही. खरेदी करायला ठराविक पाच-सहा मॉलमध्ये जाता येईल – ऑफिसच्या पूर्वपरवानगीने आणि ऑफिसच्या गाडीने. खरेदीसाठी वेळ फक्त वीस मिनिटं! काही ठराविक रेस्टॉरंटमध्ये जाता येईल – तेही पुन्हा ऑफिसच्या पूर्वपरवानगीने आणि ऑफिसच्या गाडीने. कॅमेरा शक्यतो वापरायचा नाही कारण शहरात अनेक ठिकाणी फोटो काढायला बंदी आहे. अशा ठिकाणी कुणाच्या हातात कॅमेरा दिसल्यास सैनिक आधी गोळी घालतात; चौकशी वगैरे नंतर होते – झालीच तर! गाडीच्या खिडकीतून – तेही काच बंद ठेवून – पाहताना जे काही दिसेल त्यावर समाधान मानायला लागेल! पण अर्थात तरीही बरंच काही दिसेल.
इथल्या जगण्यात मोठा आनंद आहे तो म्हणजे सभोवताली सतत दिसणारा हिंदुकुश पर्वत. माझ्या ऑफीसमधून बाहेर डोकावलं की समोर असतोच तो.
त्याच्या माथ्यावर अजून (एप्रिल महिन्यातही) बर्फ आहे – त्यामुळे तो अधिक विलोभनीय दिसतो. हिमालयाची आठवण करून देणारं दृश्य आहे हे!
या फोटोत दिसताहेत तशा पत्र्याच्या खोल्यांमध्ये ऑफिस. मात्र बाह्य स्वरूपावरून मत बनवायला नको. आत गालिचा, एसी, फ्रीज, मायक्रोवेव्ह .. अशा सोयी आहेत. आपातकालीन परिस्थितीत अशाच इमारती उभ्या करतात – ‘बांधायला’ सोप्या, अगदी कमी वेळेत तयार. आणि सोडून जायची वेळ आली तर मोडतोड करुन जायला सोप्या. शत्रूला (इथं तालिबानला) आपण क्षेत्र सोडून गेल्यावर काही सोयी मिळू नयेत याची काळजी घेणं ही जगभरातली रणनीति आहे.
माझ्या ऑफिसमध्ये किमान पन्नास अफगाण सहकारी आहेत – त्यात वाहनचालक आहेत, सफाई कामगार आहेत; कधी काळी देश सोडून जावं लागलेले आणि २००२ नंतर इथं परत आलेले लोक आहेत. ऑफिस परिसरात बरेच अफगाण काम करतात. हॉटेलमधला कर्मचारीवर्ग अफगाण आहे. ज्या मंत्रालयाशी माझा संबंध येतो तेही अफगाण आहेत. म्हणजे कमीतकमी दोनेकशे लोकांशी (स्त्रिया आणि पुरुष दोन्ही) काही ना काही बोलता येईल. हं! हे सगळे काबूलमध्ये राहतात; शिकलेले आहेत आणि नोकरी करतात – हे काही या देशाचं प्रातिनिधिक चित्र नाही. पण हे साक्षीदार आहेत इथल्या परिवर्तनाचे! ‘तालिबान’ या सर्वांना ‘इथं काम करू नका; आमचं ऐकलं नाहीत तर त्याचे वाईट परिणाम होतील’ अशी धमकी देत असतं. हे सध्या ‘आहे रे’ गटात आहेत पण कोणत्याही क्षणी देश सोडून जावं लागेल याची त्यांना भीती आहे. यांच्याही ‘खिडकी’तून पाहताना कळेल काहीतरी नव्याने!
काबूल भारतीय वाटावं इतकं अनेक बाबतीत भारतीय आहे. रस्त्यावर खड्डे आहेत, प्रचंड संख्येने वाहनं (मुख्यत्वे चारचाकी) आहेत त्यामुळे रस्त्यावर नेहमीच गर्दी असते. वाहतूक दिवे आहेत पण बहुधा ते लावल्यापासून बंदच असावेत अशी शंका आहे. सगळीकडे पोलिस अथवा/आणि सैनिक वाहतूक नियमन करत असतात. सिग्नल का बरं नसतील इथं? पुढे काही दिवसांनी एक दोन ठिकाणी सिग्नल दिसले पण ते वापरात नाहीत. वाहनं चालवतात ती अमेरिकन पद्धतीने - रस्त्याच्या उजव्या बाजूने. रस्त्यावर गाडीच्या समोर कुणी माणूस आला तर गाडीचा वेग कमी करायचा, ती थांबवायची ही अमेरिकन पद्धत दिसते आहे इथं - विशेषत: लहान मुलं - स्त्रिया -वृद्ध माणसं असतील तर जास्तच. काल दोन स्त्रियांना रस्ता ओलांडता यावा म्हणून एका सैनिकाने वाहनं थांबवली ते पाहून बरं वाटलं.
रस्त्यावर दिशादिग्दर्शक पाट्या जवळजवळ नाहीतच. धूळ खूप आहे. भिकारी खूप दिसतात – गाडी थांबली, की ते लगेच खिडकीपाशी येतात. भिका-यांमध्ये स्त्रियांचं आणि विशेषत: अपंग पुरूषांचं प्रमाण मोठं आहे. काही मुलं गाडीवर फडकं मारून मग हात पसरत होती पैशांसाठी - अगदी आपल्याकडचं दृश्य!
स्त्रिया बुरख्यात असतात. हे बुरखे वेगवेगळया रंगांचे दिसतात. बुरखा आणि ‘चादोरी’ अथवा ‘चादर’ असे दोन शब्दप्रयोग ऐकले – त्यातला फरक नीट समजून घेतला पाहिजे. शाळकरी मुलं-मुली रस्त्यावरून हस-या चेह-याने जाताना दिसतात – त्यांच्या पाठीवर दप्तराचं ओझं फार नसतं हे पाहून बरं वाटतं. मुलींचं डोकं स्कार्फने झाकलेलं दिसतं, पण त्या बुरख्यात नसतात हे पाहून हुश्श झालं. लग्नाचे भव्य हॉल दिसताहेत. ते पाहून इकडे गरीब लोक राहतचं नसावेत असं सहज वाटू शकतं. एका व्यक्तीच्या जेवणाचा खर्च सुमारे ५०० अफगाण असतो आणि या प्रकारच्या हॉलमधल्या लग्नात किमान ५०० लोक तरी जेवतातच असं एका सहका-याने सांगितलं.
रस्त्यावर फळांची दुकानं दिसतात – तिथंच शेजारी प्राण्यांचं मांसही लटकत असतं. त्या मांसाचे बरेच भाग शेळी-बोकडापेक्षा आकाराने मोठे दिसले (या विषयातलं मला काही कळत नाही म्हणा!) आणि लक्षात आलं, की हा गोमांस भक्षण करणारा देश आहे. जिकडेतिकडे ‘नान’ पण मिळतो. आपल्यासारखी चहाचे ठेले मात्र दिसत नाहीत. इथला चहा म्हणजे एक गंमतच आहे. चहाबाज लोकांचे इथं हाल होत असणार. पण अफगाण आहेत मात्र आतिथ्यशील! कुठेही गेलं की चहा नामक हे रंगीत पाणी समोर यायचं आणि त्यासोबत बशीत गोळी.
अधिका-याचा दर्जा जितका वरचा, तितकी गोळीची गुणवत्ता अधिक.
चहात साखर नसते. ही गोळी तोंडात टाकायची आणि घोट घोट चहा घेत राहायचा. एक कप संपला की दुसरा. चहा आपण घेतला नाही तर तो देणा-या व्यक्तीचा अपमान समजला जातो. त्यामुळे मी जाईन तिथं मला चहा घ्यावा लागायचाच – तो मला अजिबात आवडत नसला तरी!
आल्यावर पहिले दोन दिवस मला दुपारचं जेवण घेता आलं नव्हतं (नाश्ता, रात्रीचं जेवण चालू होतं). येताना गडबडीत दिल्ली विमानतळावर रुपयांचे डॉलर्स करून घ्यायचे राहिले होते. इथं व्यवहार करायचा तर एक तर ‘अफगाण’ पाहिजेत हातात किंवा अमेरिकन डॉलर्स. क्रेडीट कार्ड एटीएममध्ये वापरण्यात काहीतरी अडचण येत होती. ऑफिस परिसरातल्या बँकेत गेले होते परवा – रुपयांचे डॉलर्स मिळतील का ते पहायला. पण भारतीय रुपये घेण्याची त्यांना परवानगी नाही. मजिद नामक बॅंक कर्मचा-याशी बोलणं चाललं होतं माझं. ‘काम होत नाही’ म्हणाल्यावर मी निघाले, तर त्याने “कुठून आलात” ते विचारलं. नुसतं ‘भारत” सांगून चाललं नाही – “पुणे” सांगावं लागलं. मग मात्र तो एकदम मला ‘बसा’ म्हणाला, फोनवर तो कुणाशीतरी काहीतरी बोलला. हसून म्हणाला, “उद्या या. एक एजंट आणून देईल डॉलर्स तुम्हाला.” मी आभार मानल्यावर म्हणाला, “माझा भाचा पुण्यात शिकतोय. तुमचे लोक आमच्या लोकांशी फार चांगले वागतात. तुम्ही पुण्याच्या आहात तर तुम्हाला आमच्या देशात काही त्रास होता कामा नये ही माझी जबाबदारी आहे.” तर या ‘पुण्य(नगरी)महिम्याने’ त्या दिवशी डॉलर्स हातात पडले आणि मी दुपारचं जेवण करू शकले.
सुरक्षा स्थितीविषयी एसएमएस येणं आता माझ्या अंगवळणी पडत चाललं आहे. दिवसभरात सात-आठ मेसेज सहज येतात सकाळी काय तर ‘राष्ट्राध्यक्ष निवास परिसरात २०० लोक निदर्शनं करत आहेत’; दुपारी काय तर ‘रात्री अकरा वाजेपर्यंत अमुक परिसरात ‘हेवी वेपन्स ट्रेनिंग’ चालू असणार आहे; आवाज ऐकू येतील- घाबरू नका’ वगैरे वगैरे. यातले बरेचं निरोप फक्त माहितीसाठी असतात. हे निरोप अगदी त्याक्षणी मिळतात की ते मिळायला उशीर झालेला असतो हे सध्या तरी कळायला मार्ग नाही.
इथल्या पद्धतीने लोक मला "सविताजान" म्हणतात; फार आदर दाखवायचा असेल तर मग "खानम सविता". त्यात मग सविता शब्दाचा उच्चार न जमणा-या (कमी शिकलेल्या, इंग्लिश न बोलता येणा-या) लोकांसाठी मी 'स्वीताजान' झाले आहे. मीही सर्वांना ‘जान’ संबोधते. स्त्रिया आणि पुरुष दोघांनाही हे "जान" आणि "खान" संबोधन सारखंच लागू पडतं. इतकं ‘फिल्मी’ मी आयुष्यात पहिल्यांदाच बोलते आहे!
मी रोज निदान एकदा तरी 'प्यार किया तो डरना क्या' हे गाणं ऐकते. नाही, मला या गाण्याबद्दल काही विशेष आकर्षण आहे अशातला भाग नाही. पण ऑफिस –निवास – ऑफिस या रोजच्या तासाभराच्या प्रवासात हे गाणं दहादा तरी कानावर पडतंच. इथल्या एका एफ. एम. रेडिओ स्टेशनचं ते "थीम साँग" आहे त्यामुळे दर ब्रेकला ते वाजत असतं. त्यामुळे कधीकधी मी काबूलमध्ये आहे हे मी विसरून जाते! हिंदी चित्रपट संगीत इथं अगदी लोकप्रिय आहे. किशोरकुमार, महम्मद रफी नव्या पिढीलाही माहित आहेत. किंबहुना त्यांना माहिती असलेले अनेक नवे कलाकार मलाच माहिती नाहीत. माझ्या एका सहका-याला फोन आला, की त्याच्या मोबाईलवर किशोरकुमार हमखास गातो!
इथं बांगला देश, श्रीलंका, भूतान आणि पाकिस्तानमधलेही लोक आहेत. पण "आपण सगळे एक आहोत" अशा भावनेने हे लोक वागतात. आणि अफगाण लोकांना भारताबद्दल खूप प्रेम आहे - हे सामान्य लोकांच्या वागण्यातून पुन्हापुन्हा जाणवत राहतं. त्यात डिप्लोमसीचा भाग नसावा - सहजता जास्त दिसते. या सगळ्या लोकांकडून भारताचं कौतुक ऐकताना अभिमान वाटतो आणि यात आपलं काही कर्तृत्व नाही हे जाणवून संकोचही वाटतो. शेजारी देशांमधली ही तज्ज्ञ मंडळी ‘विविधता जोपासताना भारताने देशाचे तुकडे पडू दिले नाहीत’ याचं विशेष कौतुक करत होती. ‘अहो, आम्ही भरपूर ग्रस्त आहोत आंतरिक समस्यांनी’ असं एक-दोघांना मी सांगायचा प्रयत्न केला. पण पुढे पुढे ‘कशाला उगाच त्यांना नसलेली माहिती द्यायची’ (ही माहिती म्हणजे नक्षलवादी हल्ले, दहशतवादी हल्ले, दंगली, स्त्रियांवरील अत्याचार, प्राथमिक शिक्षण असे सार्वजनिक ज्ञात विषय – गैरसमज नसावा!) म्हणत मी गप्प बसायला लागले.
‘अतिपरिचयात अवज्ञा’ या न्यायाने बहुधा आपल्याला आपल्या देशातल्या वाईट गोष्टी जितक्या दिसतात; तितक्या चांगल्या दिसत नाहीत. दोन्ही गोष्टी आहेत, हे मान्य करूनही आपण चांगलं क्वचितच बोलतो – आपल्या खाजगी जीवनातही! इथं शेजा-यांच्या ‘खिडकीतून पाहताना’ लोकशाही, प्रसारमाध्यमांचं स्वातंत्र्य, न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य, सामाजिक आंदोलनांना असणारा अवकाश (स्पेस), आर्थिक प्रगती, तंत्रज्ञानाची (विशेषतः अवकाश तंत्रज्ञान), आरोग्य, ‘पंचायत राज’ मधला स्त्रियांचा सहभाग .... (हे सर्व सुधारायला अजून भरपूर वाव आहे) अशा अनेक गोष्टींच महत्त्व लक्षात आलं.
खिडकीतून पाहताना मग बाहेरचं दिसता दिसता आतलंही स्पष्ट दिसायला लागलं!
क्रमशः
प्रतिक्रिया
10 Jan 2015 - 9:12 pm | आदूबाळ
नेहमीप्रमाणेच भारी!
10 Jan 2015 - 9:20 pm | मुक्त विहारि
छान माहिती..
10 Jan 2015 - 9:26 pm | यशोधरा
तर या ‘पुण्य(नगरी)महिम्याने’ >> वाचतायत ना आमच्या पुण्याला सतत नावं ठेवणारे ते मिपाकर :)
अतिवास, मस्त वाटलं हा किस्सा वाचून. 'माणसं' भेटतात ती अशीच.
सुरेख लिहिलंय. हिदूकुश पर्वताचे अजून फोटो काढले असतील तर जरुर टाका.
ये ब्बात!
10 Jan 2015 - 9:45 pm | विशाखा पाटील
अनुभव कथन मस्तच!
10 Jan 2015 - 9:53 pm | सुधीर
अफगाण डायरी आवडते आहे...
10 Jan 2015 - 10:05 pm | बॅटमॅन
वा!!!!! लय आवडलं बगा. घाबरवणारे वर्णन सहजगत्या करणे ही तुमची खासियत. कुणी हे वाचले तर तिकडं लै काही त्रास नै असेच वाटेल त्याला. :)
तदुपरि- तो चहाच असतो की काहवा? काहव्यागत दिसतोयम्हणून विचारलं.
बाकी पुढील भागाच्या प्रतीक्षेत!!!! उत्सुकता वाढतच चालली आहे.
11 Jan 2015 - 11:38 am | आतिवास
तो चहाच असतो की काहवा? काहव्यागत दिसतोयम्हणून विचारलं.
बहुधा ''काहव्या''ची भ्रष्ट नक्कल असावी. इलेक्ट्रिक किटलीत पाणी उकळतात आणि त्यात "'ग्रीन टी"ची पानं घालतात. आणि मुख्य म्हणजे स्थानिकही मला हे देताना "चहा घ्या" या शब्दांत आग्रह करत.
11 Jan 2015 - 11:56 am | डॉ सुहास म्हात्रे
चाय/शाय सुलेमानी म्हणतात त्याला अरबी जगतात. तेथे प्याल्यात कधी कधी थोडं लिंबू पिळतात आणि पुदिन्याचे (मिंट) एक पान टाकतात. चहाची पत्ती उत्तम दर्जाची असली तर बरा लागतो, पण अस्सल अरबी काहव्याची खुमारी नाही. (कदाचित, मला चहा आवडत नसल्याने तसं वाटत असेल.)
12 Jan 2015 - 12:40 pm | आतिवास
धन्यवाद, या माहितीसाठी
13 Jan 2015 - 2:21 pm | बॅटमॅन
ओह अच्छा, माहितीकरिता धन्यवाद!
श्रीनगरमध्ये काहवा प्यालो होतो तो केवळ अप्रतीम लागला होता. एका रात्रीत ८-१० कप काहवा प्यालो होतो त्याची आठवण झाली. :)
10 Jan 2015 - 10:35 pm | टवाळ कार्टा
पुभाप्र :)
11 Jan 2015 - 2:31 am | मधुरा देशपांडे
खुप आवडला हा भागही.
11 Jan 2015 - 10:03 am | बिपिन कार्यकर्ते
छान चालू आहे. येऊ द्या सविस्तर.
13 Jan 2015 - 9:40 am | प्रचेतस
हेच म्हणतो.
11 Jan 2015 - 11:52 am | डॉ सुहास म्हात्रे
छान चालली आहे मालिका !
खिडकीतून पाहताना मग बाहेरचं दिसता दिसता आतलंही स्पष्ट दिसायला लागलं!
चपखल सत्यदर्शन !11 Jan 2015 - 12:15 pm | अर्धवटराव
+१००
11 Jan 2015 - 11:55 am | अनुप ढेरे
मस्तं!
11 Jan 2015 - 12:46 pm | राही
तिथली भयग्रस्तता अगदी भयरहित शैलीत वर्णन केलीय्.मिताक्षरी, अर्थबहुल.
आपल्या स्वतःच्या भवतालात पेला अर्धा रिकामा भासणे आणि तोच पेला पर-अवकाशात अर्धा भरलेला असा आठवल्याने त्याविषयी कृतज्ञता वाटणे हे अगदी नेमके.
जुन्या काळात फारुख अब्दुल्ला आणि शरद पवार वगैरेंनी अफ्घानी विद्यार्थ्यांसाठी (आणि कश्मिरीसुद्धा)पुण्यात शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली होती ते आठवले. दिल्लीतही खास धोरणानुसार अशी बरीच अफ्घान मुले शिकत होती, त्यात त्या वेळच्या राज्यकर्त्यांची मुलेसुद्धा असत.
12 Jan 2015 - 12:59 pm | पिशी अबोली
+१
अतिशय योग्य वर्णन.
11 Jan 2015 - 3:52 pm | बोका-ए-आझम
सुंदर वर्णन आणि सुंदर फोटो.
12 Jan 2015 - 7:37 am | स्पंदना
हं!
१ नंबर लिखाण. भरभर रस्त्याने जात असल्यासारखं. ठसठशीत मुद्दे टिपत.
वाट लागली एका सुंदर देशाची अस वाटतयं. मध्यंतरी कुठेतरी घरात पुरुष उरला नसल्याने, आणि स्त्रीया बाहेर पडुन कमवु शकत नसल्याने (शिक्षीत असुनही) भिक मागणे हाच एक मार्ग उरल्याचे कुठेतरी वाचल्याचे स्मरते आहे.
12 Jan 2015 - 1:08 pm | पिशी अबोली
मध्यंतरी अफगाणिस्तानमधील विधवांच्या स्थितीवर काम करणार्या एका अँथ्रॉपॉलॉजिस्टचा लेख वाचलेला आठवतो(कदाचित मिपावरच लिंक होती). संस्कृतीमधून निर्माण झालेल्या तिथल्या व्यवस्थेला पाश्चिमात्य मूल्यांमुळे कसा धक्का लागतोय असा. स्त्रियांनी नोकरी करायची नाही, मग विधवांच्या उदरनिर्वाहाचं काय? तर त्यांची जबाबदारी संपूर्ण समाजावर होती. शक्य तेवढी मदत त्यांना करणे हे धार्मिकरित्या बंधनकारक होते. आता 'काम केलं तरच मोबदला' अशी मूल्ये रुजत असल्यामुळे हा परोपकार आपोआप घटला आहे आणि त्यामुळे विधवांची स्थिती खूप विदारक आहे, त्यांना भीक मागण्याशिवाय पर्याय नाही, असा काहीसा लेख होता.
13 Jan 2015 - 10:14 am | मृत्युन्जय
पुभाप्र.
13 Jan 2015 - 2:11 pm | Mrunalini
खुप छान लिहले आहे. पुभाप्र. :)
16 Jan 2015 - 7:32 pm | पैसा
वाचते आहे.
23 Jan 2015 - 2:26 pm | नंदन
लेखमालिकेत शोभून दिसेल असाच भाग - अतिशय आवडला.
गोळी तोंडात टाकून चहाचे घोट घेत राहणं, हा (जान आणि खान सारखा) पर्शियन प्रभाव दिसतो आहे. फक्त तिथे साखरेचे छोटे घनाकृती तुकडे असतात. (एका इराणी मित्राच्या सांगण्याप्रमाणे, ते 'रशियन शुगर' म्हणून तिथे प्रसिद्ध आहेत.)
अगदी नेमकं!
पुढील भागाची वाट पाहतो आहे.
23 Jan 2015 - 2:40 pm | मदनबाण
पु भा वा पा....
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल जान जिगर तुझपे निसार किया है... { Saajan Chale Sasural }
27 Jan 2015 - 12:17 am | रुपी
फार छान लेखनशैली आहे तुमची!
27 Jan 2015 - 2:02 am | आदूबाळ
पुढचा भाग?
27 Jan 2015 - 2:32 am | निशदे
हा भागदेखील आवडला. पुण्यनगरीचा महिमा निदान तिथल्या लोकांना कळालाय हे पाहून अगदी भरून आले. ;)
पुभाप्र.
1 Feb 2015 - 4:14 am | आतिवास
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार.
भाग ५