संस्कृत कवी पंडित होते. त्यांना धर्म, तत्वज्ञान, काव्यशास्त्र इ. चे चांगले ज्ञान होते. पण हल्लीच्या विद्वानांप्रमाणे ते हस्तिदंती मनोर्यात रहात नव्हते. सामान्य माणसाबद्दल त्यांना कणव होती. वाटसरू उगीचच लुटला जाऊं नये म्हणून एकाने दिलेली धोक्याची सुचना पहा
कामिनीकायकान्तारे स्तनपर्वतदुर्गमे !
मा सन्चर मन:पान्थ ! तत्रास्ते स्मरतस्कर: !!
(कांतार ...अरण्य, पान्थ ....वाटसरू, स्मरतस्कर ....मदन नावाचा चोर)
असे त्यांचे (मदतनीसाचे) सल्ले आपण पुढेही पहाणार आहोतच. आज एक नवीन दिशा दाखवावयाची आहे. संस्कृत कवी व उर्दु शायर यांच्यामध्ये काही शतकांचे अंतर. पण दोघांचेही एका बाबतीत एकमत दिसून येते. स्त्रीचे काळीज दगडाचेच आता शायर तसे नोंदवून आपल्यावरील अत्याचाराकडे वळतो. पण कवी मात्र त्याचे कारण व परिणाम या बद्दल जरा जास्तच खोलात शिरतो.
युवतीच्या स्तनांना पर्वताची उपमा तुम्हाला एखादेवेळी अयोग्य वाटॆल, पण ते कठीणच (असावेत) ही कवींची धारणा. या करितां ते काय म्हणतात
इन्दीवरेण नयनं, मुख्मम्बुजेन
कुन्देन दन्तमधरं नवपल्लवेन !
अङ्गानि चंपकदलै: स विधाय वेधा:
कान्ते कथं घटितवानुपलेन चेत: ? !!
(उत्पल=अंबुज . कमळ. वानुपल ...पाषाण, शिला, चेत ,, अंत:करण, हृदय)
मनधरणी करूनही वश न हॊण्यास काय कारण असे विचारतांना प्रियकर म्हणत आहे, " या ब्रह्मदेवाचे काही कळत नाही. त्याने तुला निर्माण करतांना डोळ्यात नीळकमळे, मुखात कमळे, दातांत कुंदकळ्या, ओठांत कोवळी पालवी व सर्वांगांत सोनचाफ्याच्या पाकळ्या वापरल्या. पण हृदयाकरिता याला शिळाच सापडली काय ? " हे झाले स्त्री कठोरहृदयी कां याचे उत्तर. आता पुढे पहा
स्वकीयं हृदयं भित्त्वा निर्गतौ यौ पयोधरौ !
हृदयस्यान्यदीयस्य भेदने का कृपा तयो: ? !!
जे पयोधर स्वत:च्या हृदयाला भेदूनच वर आले( कठीण हृदयाला भेदावयाला पयोधरही तेव्हढेच कठीण पाहिजेत, नाही कां ? ) त्यांना इतरांचा हृदयभंग करतांना दया कसली येणार ?
असो. (जेव्हा बोलण्यासारखे कांही उरत नाही तेव्हा असो म्हणतात )
"पंडितराज जगन्नाथ" या नाटकातील ’विद्याधर गोखले" यांचे पुढील पद प्रसिद्ध आहे
नयन तुझे जादुगार !! ध्रु. !!
हरिणीची हरिती नूर!
त्यात सुंदरी कशास
काजळ हे घातलेस ? !!
साधाही नयनबाण
विंधितसे काळजास !
मग त्याला कां उगाच
काळकूट माखतेस ? !!
गोखले संस्कृत व उर्दु या दोनही भाषांत चांगलेच पारंगत होते. त्यांनी जा सुभाषितावरून हे पद रचले ते पहा
लोचने हरिणगर्वमोचने मा विदुषय नताङ्गि कज्जलै: !
सायक: सपदि प्राणहारक: किं पुनर्हि गरलेन लेपित: !!
शरद
प्रतिक्रिया
27 Mar 2015 - 6:26 pm | बॅटमॅन
आहाहाहाहा....मस्त श्लोक दिलेत बघा. यावरून प्रथम उपमेशी संबंधित काही श्लोक आठवले.
गीतगोविंदः
धीर समीरे तटिनी तीरे वसति वने वनमाली
गोपी पीनपयोधरमर्दन चंचल करयुगशाली
अगदी प्रार्थनेतही तशी उपमा आहेचः
समुद्रवसने देवि पर्वत्स्तनमंडले |
विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे ||
प्राचीन मराठी काव्यातही अशी एक उपमा आहे:
भास्करभट्ट बोरीकर याच्या काव्यात एका युद्धप्रसंगाचे वर्णन करताना ही उपमा येते. युद्ध ऐन रंगात आलेले असते आणि तेवढ्यात एका बाजूकडून सैनिकांचे लक्ष विचलित करण्याकरिता एक सुंदर स्त्री तिथे आणण्यात येते. तिची 'चांपेगौर अंगांगे' पाहून सैनिकांचे लक्ष विचलित होते आणि तिच्या स्तनपर्वतांचे घाट चढता चढता त्यांचे डोळे शिणून जातात असे त्यात वर्णन आहे. (संदर्भः देवगिरीचे यादव, लेखकः ब्रह्मानंद देशपांडे.)
27 Mar 2015 - 8:26 pm | बाबा पाटील
*kiss3* *KISSING*
30 Mar 2015 - 5:27 pm | विवेकपटाईत
आम्ही बा बा काय म्हणणार.