मुळांनी जमिनीशी अबोला धरून-- संदीप चांदणे
आज सत्तरच्या आसपास वय असलेल्या पिढीतील माणसांची परिस्थिती विचित्र झाली आहे. ते लहानपणी ज्या मध्यमवर्गीय वातावरणात वाढले ते आता कल्पनेतले विश्व झाले आहे. त्यांनी लहानपणी आई-वडिलांचे फटके खाल्ले, मोठ्या भावाचे शर्ट वापरले, जुनी पाठ्यपुस्तकेच शाळेत नेली. घरातली कुठलीही गोष्ट सर्वांनी वाटून घेतली, पण यात काही गैर आहे, असे कधी त्यांना वाटलेच नाही. घरात वडीलधार्या माणसांचे प्रेम, थोरल्या भावा-बहिणीची माया ममता यांचे न दिसणारे पण आश्वासक असे कवच घराच्या सगळ्या वातावरणात भ्ररलेलेच असे. भांडणे, रुसवे-फुगवे असतच पण त्याची मर्यादा काय असावी हेही आपोआप कळत असे.