आज सत्तरच्या आसपास वय असलेल्या पिढीतील माणसांची परिस्थिती विचित्र झाली आहे. ते लहानपणी ज्या मध्यमवर्गीय वातावरणात वाढले ते आता कल्पनेतले विश्व झाले आहे. त्यांनी लहानपणी आई-वडिलांचे फटके खाल्ले, मोठ्या भावाचे शर्ट वापरले, जुनी पाठ्यपुस्तकेच शाळेत नेली. घरातली कुठलीही गोष्ट सर्वांनी वाटून घेतली, पण यात काही गैर आहे, असे कधी त्यांना वाटलेच नाही. घरात वडीलधार्या माणसांचे प्रेम, थोरल्या भावा-बहिणीची माया ममता यांचे न दिसणारे पण आश्वासक असे कवच घराच्या सगळ्या वातावरणात भ्ररलेलेच असे. भांडणे, रुसवे-फुगवे असतच पण त्याची मर्यादा काय असावी हेही आपोआप कळत असे. आपल्यावर काही अन्याय होत आहे असे कधीच वाटले नाही. वाटले तरी, लवक्ररच कळून येत होते की तो अन्याय अपरिहार्य होता. मोठा भाऊ, कितीही हुषार आला तरी त्याला मॅट्रिकनंतर, कॉलेजात न जाता, नोकरीच शोधावी लागत होती. लहान भावाचे शिक्षण, बहीणीचे लग्न, या जबाबदार्या त्यालाच उचलाव्या लागत होत्या. आई-वडीलांनी आपल्याकरता खालेल्या खस्ता त्याला कळत होत्या. स्वत:चे कर्तव्य म्हणून का होईना तो त्या पार पाडत होता. त्याची भावनात्मक मुळे त्या एकत्र कुटुंबाच्या मातीत रुजलेली होती.
पण काळ हळुहळु का होईना बदलत गेला. त्या बरोबरच कुटुंबही बदलत गेले. दोन-चार बहीण-भावांऐवजी आता एखाद दुसरेच मूल घरात वावरू लागले. त्यांचे लाडही वाढले. मग मुलाला तो त्याचा हक्कच वाटू लागला. आता "आपले" ह्या शब्दाची जागा "माझे" या शब्दाने घेतली. मग तर " मी मागेन ते त्यांनी देणे" हा माझा "हक्क" व आई-वडीलांचे "कर्तव्य" एथपर्यंत गाडी पोचली. आईने प्रेमाने व कष्टाने केलेल्या पुरणपोळीपेक्षा बाहेरचा पिझ्झा जास्त "गोड" लागू लागला. "एक कुटुंब" ही जमीन इतकी भुसभुशित झाली की प्रेमाची सावली देणारे झाड नाहिसेच झाले.आहे कां ? असे वाटू लागले. आजी-आजोबांचे सोडाच पण आई-वडीलांनाही आता’ आपण नकोसे झालो आहोत का ?" असे प्रश्न पडू लागले.
भांडणे ही काय त्यावरची मात्रा नव्हती. घराबाहेर पडून वृद्धाश्रमात राहणे हेही योग्य वाटत नव्हते. मग काय करावयाचे ?
कवी संदीप चांदणे यांची एक सुरेख कविता परवा वाचनात आली.
मुळांनी जमिनिशी अबोला धरून पानाफुलांना अडचणीत आणू नये
त्या बिचाऱ्यांच्या वाऱ्याशी बहराच्या गप्पा रंगलेल्या असतात
आपले अधाशी कोंब घेऊन वाट फुटेल तिकडे फुटू नये
जुन्या खंबीर इमारतीही मग भेगाळून ढासळू लागतात
घनघोर तूफान येतं चालून तेव्हा आपली जागा सोडू नये
मुळांवर विसंबूनच तर फांद्या तूफानाशी लढू शकतात
जावं खोल खोल रूजून, मातीवर उघडं पडू नये
वर कोरड्या उफाड्यात खाली झुळझुळ झरे असतात
इमान राखावं जमिनीशी, आभाळाकडे व्यर्थ पाहू नये
उन्मळून वर आलेल्या सांगा, मुळांना काय अर्थ आहे?
- संदीप चांदणे
मी येथे मला आवडलेल्या कविता देतो तेव्हा मला त्यात काय "भावले" व ते का ? हे काळजीपूर्वक लिहतो. रसिक. मित्रांशी संवाद साधण्याचा एक प्रयत्न. आज मात्र मी थोडासा बदल करणार आहे. ही कविता हे एक रुपक आहे असे मला वाटले व मी जराश्या विस्ताराने ते प्रथम लिहले. प्रत्येक कडव्यातील गोडवा आता तुम्हीच शोधा. जर हे रुपक बरोबर वाटले नाही तर तुम्हाला काय सुचते तेही लिहा. घटकाभर आयुष्यातील पाच-पंधरा वर्षे विसरा व एका कवितेचे रसग्रहण करावयाचे आहे असा मराठीतला परिक्षेतील प्रश्न समजून दहा-पंधरा ओळी लिहाच. सर्वांनी जरा जवळ येण्याचा प्रयत्न करू या.
साधारणत: कवीने जे लिहले त्यात फरक करू नये. पण काही वेळी असे लक्षात येते की काही तरी गफलत झाली असावी. प्रत्येक कवी आपली लिहून झालेली कविता परत तपासतोच असे नाही. आपण विचारपूर्वक वाचल्यावर जर त्यात काही चूक वाटली तर नोंद करावयास हरकत नसावी. कडवे ४ पहा.
जावं खोल खोल रूजून, मातीवर उघडं पडू नये
वर कोरड्या उफाड्यात खाली झुळझुळ झरे असतात
खोल खोल रुजून जावे,(कारण) खाली झुळझुळ झरे असतात.
वर कोरड्या उफाड्यात, मातीवर उघडं पडू नये.
उफाडा याचा शब्दकोशातील अर्थ --- जोराने वाढणे. उदा. उफाड्याची मुलगी--- उपवर, जोरात वाढ असलेली मुलगी. येथे "कोरड्या उफाड्यात" याचा अर्थ लागत नाही त्या ऐवजी "कोरड्या उन्हाळ्यात" असे म्हटले तर ते चपखल बसेल. पावसाळ्यात मातीच्या वर आलेली मुळे काही दिवस तग धरून जगू शकतील पण कोरड्या उन्हाळ्यात ते शक्य नाही.
तसे पाचव्या कडव्यात
उन्मळून वर आलेल्या सांगा, मुळांना काय अर्थ आहे?
ऐवजी
उन्मळून वर आलेल्या मुळांना, सांगा, काय अर्थ आहे?
जास्त बरे वाटते.
शरद
अवांतर १ : : ही कविता मिपावर वाचली. आवडली म्हणून copy-paste करून एव्हडे लिहले. गंमत म्हणजे ही मिपावरून नाहिशी झालेली दिसते. काय भानगड / गोधळ आहे ?
अवांतर २ : मला जर एखाद्या लेखकाचे/कवीचे नाव माहिती असेल तर त्याचे मिपावरील लेखन कसे शोधावयाचे ? नेहमी लिहणार्यांचे सोडा. थोडा वेळ खर्च केला की त्यांचे नाव सापडते व त्यांच्या track वर टिiचकी मारून सगळे लिखाण पाहता येते. पण संदीप सारख्यांचे काय ?
शरद
प्रतिक्रिया
13 Mar 2017 - 4:28 pm | खेडूत
ही कविता तेव्हाही आवदली होती, आता पुनः एकदा आवडली.
कवितेतलं काय कळत नाही, पण उफाड्याची जमीन ही उकरलेल्या मातीच्या, भुसभुशीत अश्या अर्थाने घेतली. खाली गेल्यास आधार अन ओलावा दोन्ही मिळते असे सुचवायचे असावे. अर्थात चांदणे अजून सांगतीलच.
आपला लेख आवडला.
१. अजूनही मिपावर इथे आहे ही कविता!
२. मिसळपाव + धाग्याचे, लेखकाचे/कवीचे नाव टंकले की मिळतो धागा. पण पाच वर्षांपूर्वीची शोध खिडकी सोयीची होतीच.
13 Mar 2017 - 8:14 pm | अनुप ढेरे
रसग्रहण छान आहे. मूळ कवितादेखील खूप आवडलेली.
13 Mar 2017 - 10:56 pm | एस
ही कविता छान आहेच, रसग्रहणदेखील छान.
14 Mar 2017 - 7:13 am | चांदणे संदीप
कानामात्रा वेलांटी ऊकार नसलेला आणखी एक सरळमार्गी माणूस!
रसग्रहणाबद्दल धन्यवाद! ___/\___
'उफाडा' ह्या शब्दाबद्दल किंवा एकंदरीतच त्या ओळीबद्दल थोडक्यात सांगतो.
जसं म्हणतात की, एखादा माणूस नारळासारखा म्हणजेच वरून कठीण-ओबडधोबड कवच पण आत गोड पाण्यासारखा आहे आणि त्या माणसाला खरा पाहायचा असेल तर त्याच्या अंतरंगातच पाहिला पाहिजे वगैरे. इथेही मी तेच मर्म माझ्या शब्दांत, वेगळ्या रूपकाद्वारे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. 'उफाडा' म्हणजे आवेश/वेग ह्या अर्थाने घेतलेला आहे. आणि मला तोच अर्थ प्रथम लक्षात येतो. तर त्या अर्थाने पाहिले असता त्या ओळीतून असा आशय दिसतो किंवा मला असा अभिप्रेत आहे की... वरून एखाद्याचा कितीही कोरडा, क्लेशकारक, असह्य "आवेश" असला तरी त्याच्या खोलवर आत त्या आवेशाच्या अगदी विरूध्द तुम्हांला प्रेमळ, सुखदायी, निवांत "झुळझुळ" झराच मिळेल!
फॉर रेस्ट ऑल क्लॅरिफिकेशन्स... प्लीज कॉन्टॅक्ट ओर्जिनल कविज होम ॲड्रेस डायरेक्टली! ;)
Sandy