अजून पण ती रात्रं लख्ख आठवतोय मला. बाबांनी walkman घेतला होता. आणि त्याच दुकानातून जगजीत सिंग ची एक कॅस्सेट. दुकानातून बाहेर पडल्या पडल्या मी त्यांच्या हातातून walkman काढून घेतला होता. इअर प्लग कानात सारून मी प्ले चं बटण दाबलं. गिटार ची जीवघेणी सुरावट कानातून सरळ मेंदूत घुसली होती. पाठोपाठ जगजीत सिंग चा आवाज मनात हळूच शिरला.
कोई ये कैसे बतायें के वो तनहा क्यू है.
त्या वेळेला शब्द समजले नाहीत. पण काहीतरी लक्कन हललं होतं आतपर्यंत. मुळात उर्दू हि भाषाच तशी आहे. प्रियकराने प्रेयसीबद्दल बोलावे तर फक्त उर्दूमधूनच हा माझा ग्रह आजतागायत कायम आहे. असे सुंदर शब्द कि बोलताना सुद्धा एक नाजूक भाव मनात जागृत व्हावा.त्यात जगजीत सिंग चा आवाज म्हणजे सतारीची तार फुलांनी छेडली गेल्याचा अनुभव यावा.
कोई ये कैसे बतायें के वो तनहा क्यू है
कुणी कसं सांगावं कि एकाकी का वाटतंय ते. माणसांच्या या गर्दीत एकटेपणा हरवून जातो असं वाटतं खरं. पण तसं नसतंच मुळी. आजूबाजूला खूप लोक असतानासुद्धा मन एकटं पडतं . कारण माहीत असतं स्वतःला पण त्यावर विश्वास ठेवण्याची हिम्मत नसते आपल्यात. पण शेवटी मनातलं ओठांवर येतंच.
वो जो अपना था वही और किसीका क्यूँ है
आणि मग बांध फुटून जातो. इतके दिवस जी तक्रार मनात साचून होती ती बाहेर पडते.
यही दुनिया है तो फिर ऐसी ये दुनिया क्यों है
यही होता है तो आखिर यही होता क्यो है
लोक म्हणतात कि हे जग असंच आहे आणि इथे असंच होतं. अरे पण का असं होतं आणि जर हे जग असंच असेल तर मुळात हे जगंच असं का आहे.
एक जरा हाथ बढा दे तो पकडले दामन
उसके सीने मी समा जाये हमारी धडकन
ऐन पावसाळ्यातला माळशेज घाट. बाकीचे मित्र मैत्रिणी इथे तिथे पांगलेत. मस्त हिरव्यागार धुक्यात ती आणि मी दोघे चाललोय. एका जलाशयाच्या काठच्या दगडावर जागा बघून आम्ही दोघे बसतो. त्या पाण्यावर पण धुक्याचा हलकासा तवंग पसरलाय. अचानक ते धुकं दाट होऊन आमच्या अवतीभोवती पसरतं. दुरून पावसाचा आवाज ऐकू येतो. मंजुळ पाय वाजवत तो पाऊस हलकेच जवळ येऊन आम्हाला मिठीत घेतो. त्या गर्द धुक्याच्या मिठीमध्ये मी, ती, तो नाजूक जलाशय आणि फक्त आमच्या करता पडत असलेला पाऊस. ती माझ्या जवळ आहे आणि नाही. एकमेकांच्या हृदयाची धडधड त्या पावसाच्या आवाजात मिसळून गेली आहे. आठवणींच्या कुपीतून त्या क्षणाचा गंध अजून दरवळतोय मनात. आज इतक्या वर्षांनी हे लिहिताना सुद्धा काटा फुललाय अंगावर आणि जगजीतचा आवाज हलकेच हृदयात मिसळतोय.
इतनी कुर्र्बत है तो फिर
फासला इतना क्यूँ है
एवढी जवळीक असून पण हा अंतराय कसला.
दिल-ए-बरबाद से निकला नही अब तक कोई
एक लुटे घर पे दिया करता है दस्तक कोई
अजून त्या दुःखातून सावरलो नाही मी. त्या जुन्या जखमेवर कोण फुंकर घालतोय कळत नाही.
आस जो टूट गयी
फिर से बंधाता क्यूँ है
आस तर कधीच सोडून दिली होती मी. मग आता मनाला उभारी कोण देतंय आणि का ?
तुम मसर्रत कहो या इसे गम का रिश्ता
केहते है प्यार का रिश्ता है जनम का रिश्ता
या नात्याला दुःखाचं नातं म्हणा किंवा आनंदाचं. ज्या नात्याला काही नाव नव्हतंच त्याला नाव देण्याचा अट्टाहास का ? जे तिचं आणि माझं होतं ते फक्त आमचं होतं. जन्मभराची असतात हि नाती.
है जनम का जो ये रिश्ता
तो बदलता क्यूँ है
आणि जर जन्मभराची असतात तर का बदलतात हि नाती. उर्दू मध्ये मारासीम म्हणजे तक्रार. कैफी आझमीची हि मरासिम माझी असेल किंवा जर भाग्यवान असाल तर तुमचीही. पण ज्याच्या काळजाला अशी मुलायम जखम असते ते खरे नशीबवान. आणि जर जगजीतचा मखमली आवाज तुमच्या काळजाच्या तारा छेडत तुम्हाला गोंजारत असेल तर तुमच्यासारखे पुण्यवान तुम्हीच.
प्रतिक्रिया
13 Mar 2017 - 6:48 pm | मारवा
या ओळी याच अल्बम मधल्या आहेत ना मित्रा ?
एक पुराना मौसम लौटा याद भरी पुरवाई भी
ऐसा तो कम ही होता है वो भी हों तनहाई भी
यादों की बौछारों से जब पलकें भीगने लगती हैं
कितनी सौंधी लगती है तब माज़ी की रुसवाई भी
फार सुंदर अलबम आहे सुंदर आठवण जागवली तुम्ही
उर्दू मध्ये मारासीम म्हणजे तक्रार. कैफी आझमीची हि मरासिम माझी असेल किंवा जर भाग्यवान असाल तर तुमचीही.
मित्रा थोडी शंका वाटते मरासिम चा अर्थ संबंध रिश्ते कनेक्शन्स या अर्थाने आहे व यावरुन तर्क ए मरासिम हा येतो.
तरी तुम्ही म्हणता तर मजकडचा शब्दकोष एकदा बघाव लागेल.
13 Mar 2017 - 7:08 pm | सानझरी
@मिडास : लेख छान लिहिलाय.. जुन्या आठवणी जाग्या झाल्या..
@ मारवा : हो, मरासीम म्हणजे नातं.. relationship
https://rekhta.org/urdudictionary?keyword=%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0...
याच अल्बम मधे 'आँखों में जल रहा है क्यूँ' ही एक ग़ज़ल आहे, त्यातल्या ह्या ओळी..
आँखों से आँसुओं के मरासिम पुराने हैं
मेहमाँ ये घर में आएँ तो चुभता नहीं धुआँ
13 Mar 2017 - 9:43 pm | नीलकांत
काय मस्त लिहीलंय तुम्ही... आवडलं.
- नीलकांत
13 Mar 2017 - 9:56 pm | प्राची अश्विनी
खूप सुरेख.
13 Mar 2017 - 10:42 pm | पैसा
माझ्याकडे ही कॅसेट होती. नंतर धूळ खात पडली. आता तर कॅसेट प्लेयर नाहीतच वापरात. मात्र गाण्याचे सूर अजून कानात आहेत.
13 Mar 2017 - 11:29 pm | आषाढ_दर्द_गाणे
अगदी १००% सहमत!!!!
का कोण जाणे, हा धागा उघडताना मला उगाचच 'रंजीश हि सही' ह्या गझलमधल्या 'मरासीम' हा शब्द असणाऱ्या ओळीबद्दल माहिती मिळेल असे वाटत होते...
पण इथे येऊन त्या शब्दाचा नेमका अर्थ समजल्यावर ह्या ओळी अजूनच चांगल्या कळल्या -
पहले से मरासिम ना सही फिर भी कभी तो
रस्म-ओ-रहे दुनिया ही निभाने के लिये आ
रंजिश ही सही...
लेखक आणि प्रतिसादकर्त्यांना धन्यवाद...
14 Mar 2017 - 1:27 am | ईंद्रधनु
मरासीम चा अर्थ 'नातं' किंवा 'संबंध' असा आहे आणि रस्म-ओ-रहे चा अर्थ 'सांसारिक शिष्टाचार' असा आहे.
13 Mar 2017 - 11:57 pm | किसन शिंदे
सुरेख लिहीलंय या गझलेबद्दल..
14 Mar 2017 - 1:17 am | पद्मावति
सुंदर लेख.
रंजीशी सही विषयी आदगा, तुमच्याशी खूप खूप सहमत. मरासीम वाचलं आणि अगदी हेच गाणं मनात आले.
14 Mar 2017 - 1:25 am | ईंद्रधनु
मरासीम चा अर्थ 'नातं' किंवा 'संबंध' असा आहे आणि रस्म-ओ-रहे चा अर्थ 'सांसारिक शिष्टाचार' असा आहे.
15 Mar 2017 - 8:59 pm | सुमीत
सुंदर, अजून शब्दच नाहीत