रॉकस्टार
मी त्याला पहिल्यांदा भेटलो २०११ साली, याच दिवशी. जनार्दन, बेजबाबदारपणाचं दुसरं नाव होता तो. फार उनाड. घर व्यवस्थित भरलेलं होतं, घरचा व्यवसाय मोठे भाऊ सांभाळत होते, तशी याच्यावर जवाबदारी नव्हती कसलीच. सकाळी सकाळी कॉलेजमध्ये जायचं, टवाळकी करायची, मित्रांच्या गराड्यात रमायचं हेच काय ते काम. तो गिटार मात्र फार छान वाजवायचा. (आयुष्यात अर्धवट सोडलेल्या गोष्टींपैकी एक म्हणजे त्याला बघून मीही गिटार शिकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.) त्याचा आवाजही छान होता, वेगळ्या धाटणीचा. पण काही केल्या आयुष्यातील कला बहरत नाही अशी तक्रार होती त्याची.