'ड' जीवनसत्व : उपयुक्तता आणि वादग्रस्तता (पूर्वार्ध)
शरीराच्या पोषणासाठी आपण आहारातून विविध पोषण-घटक दररोज घेत असतो. त्यापैकी कर्बोदके, मेद व प्रथिने ही मोठ्या प्रमाणात (ग्रॅममध्ये) लागतात. याउलट काही पोषण-घटक हे अल्प प्रमाणात (मिलिग्रॅम किंवा मायक्रोग्रॅम) जरुरीचे असतात. अशा सूक्ष्म पोषणद्रव्यांमध्ये जीवनसत्वांचा(Vitamins) समावेश होतो. आजपर्यंत एकूण १३ जीवनसत्वे माहित आहेत. त्यांना ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’ अशी एकाक्षरी नावे का दिली असावीत याचे वाचकांना कुतूहल असते. गेल्या १-२ शतकांत जेव्हा त्यांचा टप्प्याटप्प्याने शोध लागला, तेव्हा त्या प्रत्येकाचे रासायनिक सूत्र निश्चित माहित नव्हते. त्यामुळे त्यांना शोधक्रमाने अ, ब, क अशी नावे दिली गेली.