चहा वालं प्रेम
अमेरिकेहून सुट्टीसाठी घरी आलेली ऋतु लॉकडाऊन मुळे भारतातच अडकली होती. आपलं तिकडचं सगळं काम अर्धवट सोडून आल्यामुळे घरी राहूनही तिचा अर्धा जीव सतत सातासमुद्रापलीकडे लागून राहिला होता. ऋतु ही पंचविशीच्या उंबरठ्यावरची एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील मोहन काका आणि अरुणा काकूंची एकुलती एक लाडकी कन्या. काकूंची आई सुध्दा सोबतच राहायची. खूप वयस्क असूनही आजीबाई बोलण्यात अगदी ताठ होत्या. इन्जिनीअर झालेली ऋतु काही वर्षापूर्वी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेली होती. काका काकूंनी मोठ्या हिमतीने, आपल्या काळजावर दगड ठेऊन आपल्या लेकीला दूर पाठवलं खरं पण तेव्हापासून काकू मात्र हरवल्यागत वागायच्या.